Font Problem

       
 
 
 

आनंद ओवरी - संहिता

 

लेखक - दिगंबर बाळकृष्ण मोकाशी
रंगावृत्ती -अतुल पेठे

लेखकाची माहिती

संपूर्ण नाव : दिगंबर बाळकृष्ण मोकाशी
जन्म तारीख : २७ नोव्हेंबर १९१५
जन्म ठिकाण : उरण,जिल्हा ठाणे, महाराष्ट्र.
मृत्यू : २९ जून, १९८१, पुणे .

आजपर्यंत पुस्तक रूपाने प्रकाशित झालेले साहित्य :
१)कथासंग्रह - १३
२) कादंबऱ्या - ५
३) ललित साहित्य - ३
४) बाल साहित्य - ११

इंग्रजीत झालेली भाषांतरे :
१) देव चालले - प्रकाशक- ओरिएंट पब्लिकेशन, दिल्ली.
२) पालखी - प्रकाशक - न्यूयॉर्क युनिव्ह़र्सिटी प्रेस.

हंगेरियन भाषेतील भाषांतरे :
१)देव चालले

उडिया भाषेतील भाषांतरे :
१) देव चालले - हिंदी, तमिळ, उडिया अशा अनेक भारतीय भाषांमध्ये कथांचे भाषांतर झाले आहे.

महाराष्ट्र शासनाची बक्षिसे :
१)कथासंग्रह- १
२) ललित साहित्य - १
३) कादंबऱ्या - २
४)बालसाहित्य - ३

       साहित्य अकादमीने १९८८ मध्ये "दि. बा. मोकाशी यांची कथा " (निवडक कथांचा संग्रह ) हे पुस्तक प्रसिद्ध केले. तसेच मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदार्शनाखाली सौ. माधुरी पणशीकर यांनी मोकाशी यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट घेतली. (१९८८).

................................................................................
आनंदओवरी - संगीत नाटक
आनंदओवरी - रंगावृत्ती + संगीत निर्देशखुणा.
(संगीत*)

       तुका हरवला तो दिवस सोमवार होता. फाल्गुन वद्य द्वितिया होती. अजून रानात धुकट हवा होती. त्या दिवशी शेणगोठा उरकून, दुधे काढून, पहिला प्रहर संपतासंपता गवताचा भारा आणायला मी रानात गेलो. बरोबर भाकरी बांधून घेतली होती. विळ्याचा हात गवतावर सपासप चालत होता आणि अधूनमधून स्वत:चे पूर्वीचे रचलेले अभंग कवीच्या आत्मानंदात मी म्हणत होतो.

मूळ स्थान ज्याचे गोमतीचे तीरी । *
तो हा सारी दोरी खेळवीतो ॥ *

       पण त्यातून प्रपंचाचे विचार घुसत होते. रानात काम करताना अध्यात्माप्रमाणे प्रपंचातील प्रश्नांचा विचारही चांगला होतो. कोंडलेले विचार, संताप, निराशा यांना बडबडून वाट करून देता येते. गवत कापताना माझे तेच चालले होते. मी माझ्या बायकोला समजावीत होतो. वहिनीची - तुकाच्या बायकोची समजूत काढत होतो. दुकानाचे विचार मनात होतेच. गाठी असलेल्या तोटक्या द्रव्यात संसाराच्या खर्चाचा ताळमेळ बसवीत होतो. आणि वीसबावीस दिवस तुकाने जो वैकुंठाचा टकळा सुरु केला होता तोही मनातून जात नव्हता. मी म्हणत होतो तुकादादा ! तू जर थोडेसे प्रपंचात लक्ष घातलेस तर आपण किती सुखी होऊ.

       गेली काही वर्षे तुका प्रपंचाला निरुपयोगी झाला होताच पण मागचे काही दिवस त्याच्या वैराग्याचा आवेग वाढला होता. भजन करताना इतके बेभान मी त्याला कधी पाहिले नव्हते. आतापर्यंत कधी नव्हती एवढि आर्तता त्याच्या कवित्वात आली होती. त्या आर्त अभंगांचे शब्द मानगुटीस बसल्यासारखे मनाला सोडत नव्हते. मधून नकळतच मी गुणगुणत होतो.

पैल आले हरी । शंखचक्र शोभे करी ॥
गरूड येतो फडत्कारे । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥
मुकुटकुंडलांच्या दीप्ती । तेजे लोपला गभस्ती ॥
मेघश्याम वर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥

       कान्ह्या! सावध! इतका दंग होऊ नकोस. हा तुझा मार्ग नव्हे. मग हा तुकाचा मार्ग आहे का? केव्हा ठरला हा मार्ग तुकाचा? कुणी ठरवला? कधी? मी आठवू लागलो... लहानपणी तुका आमच्या बरोबर आमच्या प्रमाणे सर्व खेळ खेळ्ला होता. मग तो दुकानात बसू लागला. मग आमचे आई वडील गेले. आणि मागचे आठवताना नकळतच तुकाने स्वत:चे चरित्र सांगितले ते आठवले.

       चरित्र सांगण्याचा हा प्रसंग आनंद ओवरीवर घडला. आमच्या देवळाच्या ओवरीला आनंद ओवरी म्हणत. इथे आमचे बालपण हुंदडले. जाणतेपण गरजले. इथे बसून तुकाने अभंग लिहिले आणि पुष्कळदा तुका आणि त्याचे सहकारी इथेच अभंग संकीर्तन करीत. एका रात्री कीर्तन संपलं. तुकाच्या सहकाऱ्यांनी बराच आग्रह केलाकी, बोवा तुमचे चरित्र ऐकायचे आहे. तेव्हा संकोचाने पंधरावीस अभंगांतून तुकाने ते संक्षेपाने सांगितले, ते अभंग मी म्हणू लागलो. पण म्हणता म्हणता ते कशासाठी म्हणत होतो ते विसरलो. तुकाचे अभंग म्हणू लागलो की भान रहात नाही. हा नेहमीचा अनुभव आहे. मी स्वत: अभंग रचले आहेत- तुकयाबंधू म्हणून, कान्होबा म्हणून. तुकाचे पाहून अनेकांनी रचले आहेत. रामा म्हणे, गोंद्या म्हणे, किशा म्हणे असे घराघराआड कवित्व सुरू झाले तेव्हा मी सोडून दिले.

**** (अंधार) ****
****टळटळीत दुपार! ****

       त्या दिवशी दुपारपर्यंत मी गवत कापले. झाडा खाली बसून भाकर खाल्ली. नदीवर पाणी प्यालो. मग एक वाळलेले झाड दिसले. ते जळणासाठी तोडले. गवताचा भारा बांधला. त्यावर लाकडे आवळली आणि डोकीवर घेऊन घराकडे निघालो. घरी येऊन बेड्यात दोन्ही ओझी झोकून घरात गेलो.

       *आत तुकाची बायको भिंतीला पाठ टेकून समोर पाय पसरून बसली होती. ती सहा महिन्यांची गर्भार होती. तिच्या डोळ्यांतून पाण्याचि धार लागली होती. भिंतीला मान टेकून ती हताश नजरेने शून्यात पहात होती.

       तुका नक्की पुन्हा गायब होता. हा प्रसंग तसा जुनाच. गेला महिनाभर आपल्याला वैकुंठाचे बोलावणे आले आहे- आपण वैकुंठाला जात आहोत, असे गात तुका बाहेर पडत होता आणि आता गर्भार असल्यामुळे त्याला शोधायला तिला डोंगर- राने तुडविता येत नव्हती. त्यासाठी ती माझ्या येण्याची वाट पहात बसली होती. एकदा तिने माझ्याकडे पाहिले मात्र. ती थकली होती- गर्भाचा भार वाहून आणि तुकाच्या आयुष्याचा भार वाहून. "भावोजी” तिने हाक मारली आणि ती घळाघळा रडू लागली.

       माझ्या बायकोने पुढे होऊन सांगितले की, तुकाभावोजी काल जे कीर्तनाला गेले ते अजून आलेले नाहीत. मुले देवळात पाहून आली होती तुकाभावोजी तिथे नव्हते.बायकोने ऐकताच मी हातातला विळा कोनाड्यात सारला वर खोवलेले धोतर तसेच ताळ ठेवून बाहेर पडलो. तुकाची टाळ गोधडी जागेवर नव्हती. तडक देवळात गेलो. आनंद ओवरीवर पाहिले. तिथेही दादाची टाळ गोधडी दिसली नाही.
पांडुरंगा!! *

       दरवेळी याचे नाव घेत तुका कुठेतरी जाऊन बसतो. आता यानेच त्याला शोधून काढावे. "पांडुरंगा तू कोण आहेस रे? कुणी आहेस का? आमच्या संसारात सारखा व्यत्यय आणतो आहेस. तुका तुझ्यामागे मी तुकाच्यामागे. किती दिवस घालणार हा गोंधळ? गवताचे भारे आणायचे कुणी? साठवायचे कुणी? दुधे कुणी काढायची? शेतावर कुणी जायचे आणि दुकानात कुणी बसायचे? याघराचे कसे होणार? सहा महिन्यांच्या गरभारणीला का नवऱ्याला शोधायला बाहेर धाडणार? आणि तिला गर्भ का रहावा? "
*

       नमस्कार करून देवळाच्या बाहेर पडल्यावर गावातील रस्त्यातून मी धावतच निघालो. लोकाआंना आता त्याची सवय झाली होती. कुणीतरी एखादा म्हणायचा, गेला वाटते तुक्या पुन्हा? " आणि त्याला शोधून काढून आलो की म्हणायचा, सापडला वाटते?" गेला का? आणि सापडला का? - या दोहोंमध्ये कायकाय होत होते , त्यांना काय ठाऊक? (रागाने) एखादे दिवशी सापडणार नाही तेव्हा कळेल. (हसून असहाय्यपणे) मग माझ्या मनात आले काय कळणार! काही कळणार नाही. आतापर्यंत गेले त्यांना लोक विसरले. तुकाला विसरतील. परमेश्वराचे रहातगाडगे इतके जबरदस्त फिरते आहे !

****

       देवळातून बाहेर पडून मी धावत नदीकडे गेलो. इंद्रायणीच्या काठी कातळावर उभा राहिलो. दुपारची उन्हातली स्तब्धता न दी वर पसरली होती. इंद्रायणीचा प्रवाह चकाकत वाहात होता. "तुका! दादा! "* मग हाका देत, थांबत थांबत, काथाकाथाने पुधेमागे धावत, श्वासासाठी थबकत, जिथे जिथे धोका ठाऊक होता त्या ठिकाणी डोहाकडे पाहात, प्रवाहावर काही तरंगत येताना दिसले की धडधडत्या छातीवर हात देत, मी किती वेळ शोधत होतो कुणास ठाऊक !

संध्याकाळ झाल्यावर थकून एका कातळावर बसलो.
संध्याकाळ ! *

---------

       संध्याकाळचा काळोख उतरताना कित्येकदा आम्ही तिघे भाऊ इथे बसलो. सावजी, तुका आणि मी. सावजी चौदापंधरा वर्षांचा. तुका बारा वर्षांचा. मी दहाएक वर्षांचा असेन. किती वर्षे गेली! इंद्रायणीचा प्रवाह असाच वाहात होता. समोरच्या काठावरली झाडी अशीच डोहात लवून पाहात होती. इंद्रायणीच्या पलीकडल्या तीरावरल्या या झाडीचे तुकाला नेहमी गूढ वाटे. तो घटकाघटका त्या झाडीकडॆ निरखून पाहात बसे. आणि मला तिची भीती वाटे. मी झाडीकडे पाठ करी. आधी चरायला सोडलेली ढोरे वळवून आणून उभी केलेली असत. माझ्याकडे आणि तुकाकडे ते काम होते. फक्त सोबतीला असावा तसा सावजी आमच्याबरोबर असे. आम्ही ढोरे नीट चरतात की नाही इकडे नजर ठेऊन असताना सावजी काठावरील एका कातळावर बसे.
* त्यावे भजन सुरू होई.

       काळोख उतरण्यापूर्वी ढोरे वळवून आणून आम्ही दोघेही सावजीच्या शेजारच्या एखाद्या कातळावर बसत असू. मग तुका समोरच्या झाडीकडे टक लावून बसल्यावर , त्या झाडाची गर्द पालवी , मोठेमोठे तपकिरी बुंधे , त्यांना विळखा घालीत चढत गेलेल्या वेली , या सर्वांमागे काहीतरी भयंकर * लपलेय असे मला वाटत राही. तिथून निरनिराळे चित्कार घुमत कानावर येत. डोह काळेभोर चकाकत. मधेच वाळकी फांदी पडून धप्प आवाज होई. रात्री तिथूनच कोल्हेकुईला आरंभ होई.

       संध्याकाळ वाढून आकाश लाल पडू लागले की झाडी काळा रंग घेऊन तटासारखी उभी ठाके. मला अधिकच भीती वाटू लागे आणि तुका झाडीविषयी बोलत राही. त्याला पडणारी स्वप्ने * तो सांगे. एका स्वप्नात त्याला दिसे- इंद्रायणीचा प्रवाह ओलांडून त्या झाडीत आपण शिरलो आहोत. झाडीतील पाऊलवाटेने जाता जाता मागची वाट बंद होत आहे. आपले आईवडील, भाऊबहीण, देहू गाव नाहीसे झाले आहे. आपण अगदी एकटे पडलो आहोत.

       दुसऱ्या स्वप्नात हीच झाडी त्याला विलक्षण आनंदाची वाटे.* सूर्यप्रकाशात, निळ्या आकाशावर झाडीतून , झाडीतूनही उंच गेलेल्या एकच एका फांदीवर एखादा शुभ्र बगळा झोके घेत बसलेला दिसे. तुका नदी ओलांडून झाडीत शिरताक्षणीच झाडी प्रकाशाने फुलून जाई. पक्ष्यांची सुस्वर गीते चहू बाजूने कानांवर येत. वृक्षवेली कोवळ्या,जांभळ्या, पोपटी पानांनी फुललेल्या असत. फुले बहरलेली असत. हवेत मंद सुगंध भरलेला असे. आणि पाऊलवाट आपोआप वाट मोकळी करून देई. त्याला वाटे प्क्ष्यांबरोबर आपणही गावे. त्याचा गळा शब्दांनी दाटून येई. पण शब्द फुटण्यापूर्वीच तो श्वास कोंडून जागा होई.

       तुकाने ही दोन स्वप्ने त्या कातळावर बसलो असता कितीतरि वेळा सांगितली असतील. माझे अर्धे लक्ष उभ्या करून ठेवलेल्या आमच्या गुरांकडे असे. ती पुन्हा उधळली तर अंधारात सापडणारही नाहीत आणि अधेमधे गावाशी येऊन जाणारा वाघ त्यांना खाईल. अशी भीती मला वाटत राही.* सावजीबुवा...

       मला वाटते, संध्याकाळ्च्या त्या लाल प्रकाशातच आम्ही तिघे भाऊ मोठेपणी जसे होणार होतो तसे घडलो. त्या कातळावर तिघांचे भविष्य ठरले. सावजी पुढे संसारमुक्त झाला. मी संसाराच्या दरीवर , ब्रम्हद्य्नाव्या फांदीवर लोंबकळत राहिलो. आता त्याच कातळावर बसलो असता माझ्या मनात आले, जर तुका सापडला नाही तर तिघा भावांतला मि एकटाच उरलो असं होईल. जिथे तिघांनी बसायचे तिथे मी एकटाच बसलेला राहीन. (क्ष्ण्भर थांबून)जे विठ्ठलाच्या मागे लागले त्यांचे असेच होते. द्न्यानेशाचे आणि त्याच्या भावंडांचे असेच झाले. पण विठ्ठलाच्या मागे लागणे म्हणजे तरी काय?
*
(काळोखी दाटते)
मिट्ट कालोख!

       आपल्याला दिसत नाही तरी काळोखातही सृष्टी चालूच आहे. फाल्गुनातली आटलेली इंद्रायणी वाहातच आहे. आपल्या दृष्टिक्षेपासाटी सृष्टी खोळंबत नाही. आपला अगदी सख्खा भाऊ असला तरी तो सृष्टीत नाहीसा होतो. सृष्टीला भाऊ नाही, बहीण नाही. वडील नाहीत. सृष्टीला कुणाचे काही नाही. मग सृश्टीला कोण आहे? विठ्ठल. तुकाचा तॊ लाडका विठ्ठल.? इथे कातळावर बसल्यावर वाटणारी भीती आठवली. ती भीती कुठे गेली? (थांबून) ती भीती आहेच. तिची रूपे बदलली आहेत. तुकाचे काय झालेय याची भीती. योगक्षेम कसा चालेल ही भीती.

       योगक्षेमाचे विचार मनात येताच घर आठवले. (उभा राहातो) घरी सर्व काळजी करत असतील. वहिनीचा जीव अर्धा झाला असेल. लेकरांना जवळ घेऊन दोन्ही बाया बसल्या असतील. जाऊन वहिनीला काय सांगू?

       मग मनात विचार आला तुका घरी आला असेल . आणि तो माझी वाट पाहात असेल. तो माझी चिंता करत असेल. तो मला शोधायला बाहेर पडेल. "कान्हा.... " (हसून) संसारी माणसाच्या चिंता कशा पलट्या घेत असतात. एक दुसऱ्याची चिंता करतो. दुसरा पहिल्याची चिंता करतो. एकमेकांच्या चिंतेत राहाणे त्याला आवडते. तो तेव्हाच खरा जगतो. गर्भार बायकोची पर्वा न करता तुकाने जावे! ... "तुका! दादा! "
*

       घराशी पोहोचताच मला कळले, तुका आलेला नाही. उघडया दरातून आतली दिव्याची लाल ज्योत दिसली. घर सामसुम ! समोर दरवाजा उघडा होता. पण आत जावेसे वाटत नव्हते. किती हौसेने अनेकदा आम्ही हे आमचे घर सारवले होते. रंगवले होते. तुळया-खांबांना तेलपाणी केले होते. त्या घरात माझी बायकोमुले होती. तरी ते उदास वाटत होते.

       डोक्यावर काळ्या ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली मागची सारी वर्षे रोज रोज हेच तारे डोक्यावरून गेले असतील. त्याचे कधी भान केले नव्हते. असेनाका वर आकाश. तारे उगवेनातका. सूर्य-चंद्र उगवोत, मावळोत- या पृथ्वीवर आम्ही किती गमतीत होतो. आम्ही, ही मोऱ्यांची मुले, ही महाजनांची मुले आम्हाला कधी काही कमी पडण्याचे कारण नव्हते. कधी दु:ख होण्याचे कारण नव्हते. * ज्या बैलगाडीच्या जोखडावर मी आता बसलो होतो ती गाडी रात्रभर जागून आम्ही रंगवली होती. वारीला जाताना इतर गाडयांबरोबर झडपा लावून आम्ही अग्रेसर राहिलो होतो. रंगवलेली आमची गाडी रस्त्याने जाऊ लागली की लोक टकामका बघत रहायचे. आम्हा भावांचा प्रत्येकाचा एकेक बैल लाडका होता.

       आम्हाला लहानपणीच केव्हातरी कळले. आम्ही शूद्र आहोत. * जातीने कुणबी आहोत. आणि आमचा धंदा वाण्याचा आहे.* या सर्वाला मोठा अर्थ आहे असे आमच्यावर ठसवण्यात आले. आम्हांला कळले की, आमचा सातवा पूर्वज प्रथम देहूला आला आणि आम्ही देहूकर झालो. आम्हांला हे कळले की, जातीचा आम्ही अभिमान बाळगला पाहिजे. आम्हांला हेही कळले की, ज्याने त्याने आपली जात सांभाळली पाहिजे. * आईने महाजनकीचा अभिमान आमच्यात घातला तर सावजीने आमच्यात आमच्या मोरे घराण्यात चालत आलेली विठ्ठलाची मिराशी भिनवली.

       आणि तुकाने ? तुकाने तर आम्हांला आमचे बालपण दिले. तो आम्हां मुलांचा सर्वस्व होता. तुका इतकी हौस कुणाला नसेल. लहान भावाला मोठया भावात जे जे हवे असते ते ते तुकात होते. अंथरुणातून उठताच तोंड वगैरे धुवून, भाकर खाऊन, तू बाहेर धावायचास. तुझ्यामागे बाहेर पडण्यास माझी धावपळ व्हायची. आणि तू रस्त्यावर येताच, बाळकृष्णामागे गोपांची मुले येत तशी घराघरांतून गावातील मुले बाहेर पडत. विटीदांडू तुझा लाडका खेळ. पण सगळे खेळच तुझे लाडके होते. विटी कोलायला लागलास की अगदी समोर जवळ उभा राहायचास. तुला भीती ठाऊकच नव्हती. आणि विटी मारू लागलास की, टोले कसे धडाडत डोक्यावरून जायचे.

       गावच्या मुलींबरोबर वारुळाची पूजा करायला आम्ही मुले जायचो. त्या गाणी म्हणत जात असता आम्ही दगडादगडी खेळत मागे असायचो. मुलींची गाणी तुकाला सर्व पाठ होती. (गाणं) एवढेच काय, पहाटे दळताना बाया ओव्या म्हणत त्या त्याला पाठ होत्या. सर्वांना त्याचे नवल वाटायचे. श्रावणात झाडांना बांधलेल्या हिंदोळ्यांवर तो सर्वांत उंच झोके घ्यायचा आणि मुलींना घाबरवून सोडायचा.

       एकदा उंच झोका गेल्यावर खाली येण्यापूर्वी क्षणभर थबकतो, त्याक्षणी खरी मजा येते. तू म्हणायचास, तेव्हा काय वाटते सांगता येत नाही.
*
दादा, डोंगरावर तू एकदा बेभान अवस्थेत सापडलास तेव्हा तीच भावना तुला झाली असेल का ? *

       जोकडावरून उठलो. घरात आलो. खाली मान घालून एखाद्या अपराधी माणसासारखा मी झर्रकन तुकाच्या बायकोच्या अंगावरून पुढे गेलो. स्वयंपाकघरात चूल थंड होती. आमची दोन लहान मुले कोपऱ्यात गोधडे टाकून बायकोने झोपवली होती. पुढे होऊन मी चूल पेटवू लागलो. मागोमाग माझी बायको आत आली. शेजारी बसून माझ्या हातातले फाटे घेत तिने हळूच विचारले,
"काय झाले ? सापडले का ? "
मी " सापडला नाही " अशी मान हालवली. म्हणालो,
" नदीवर पाहिले. डोंगरावर जाऊन येईन उद्या. "

       बायको चुलीत फाटे हालवीत खालच्या मानेनी म्हणाली, " भावोजी सापडणार नाहीत ! " मागच्या जन्मीच्या कोणत्या पापामुळे या वेडया घरात येऊन पडल्ये ! तुम्ही मात्र वेडे होऊ नका ! तुम्ही वेडे होणार नाही. सोडू या आपण हे गाव. या घराला विठ्ठलाचा शाप आहे. "
विठ्ठलाचा आणि शाप !
मी संतापाने ओरडलो, " गप बस रांडे ! "
*** (अंधार)
केव्हातरी अपरात्री मी जागा झालो ते तुकाचे स्वप्न पडून !

       बालवयातही तुकाचा चेहरा गोल होता. डोळे वाटोळे मोठाले होते. भुवया जाड होत्या. त्याच्या डोळ्यात स्वप्ने होती. त्यात सावजी सारखे टक लावून बसलेले एकच स्वप्न नव्हते. मला स्वप्न पडले होते ते तुका पेढीवर जाऊ लागला त्या पहिल्या दिवसाचे. पहाटे लवकर उठून मोठया आनंदाने तो वडिलांबरोबर दुकानात गेला होता. तुका .. तुकाशेठ..

       " शपथ घेऊन सांग , तुका ! तेराव्या वर्षी ऐटदार फेटा बांधून पेढीवर जाऊन तू उदीम करू लागलास, तो हौसेनेच की नाही ? सावजीने दुकान सांभाळणार नाही असे म्हणताच तू सरसावून पुढे आलास आणि एका वर्षात तुकाशेट म्हणून लोक तुला ओळखू लागले. सावजीचे वैराग्य हा तेव्हा तुला वेडेपणाच वाटला होता. दोन वर्षांत सावकारीचे, महाजनकीचे व्यापार तू सांभाळू लागलास. होन मोजताना तुला आनंद होत होता. तुरा उगवलेल्या कोंबडया सारखी , व्यवहार कळला आहे याची जाण तुझ्या प्रत्येक शब्दात, वागण्यात दिसू लागली . माणसातली जगण्यातली धडपड तुला नीट कळली. तुझे नाव पुण्यापर्यंत गेले. तुझी पहिलीबायको दमेकरी होती. तिला मूल होणार नाही असे वाटून बाबांनी तुझे दुसरे लग्न करून दिले. ही तुझी दुसरी बायको श्रीमंताची. विशेष म्हणजे सुदृढ ! ती तुला एवढी आवडली नाही. मनोमन तुमचे पटले नाही तरी तिच्यापासून मिळणाऱ्या शरीरसुखाचा मोह तुला कधी आवरला नाही. कबूल ? सावजीने भोग नाकारले. तू सारे भोगलेस. घरातला मोठा मुलगा म्हणून खरे सावजीने दुकान सांभाळायचे, पण सावजीने दुकानात बसायला नकार दिला होता. तो आपले भजन-पूजन करीत राहिला.

       हा सर्व काळ सावजीची बायको कुठे होती ? ती कधी होती का या आमच्या घरात ?खरे पाहिले तर, ती सर्वात लक्षात राहायला हवी होती. आमच्या घरात विठ्ठलाचा ती पहिला बळी होती. सावजीने तिच्याशी कधी नवऱ्याचे नाते ठेवले होते का या बद्दल मल शंका आहे.

       तुकाची शेवटची वर्षे गूढ होती तर सावजीचा आरंभच गूढ होता. दुसरी कसलीच जाण येण्यापूर्वीच त्याला वैराग्याची जाण कशी आली असेल ? एखादे इंद्रिय नसावे तसे त्याला ऐहिकतेचे इंद्रिय जन्मत:च नव्हते का ? किती विचित्र ? आम्हाला तो जसा कधी कळला नाही, तसा त्याच्या बायकोलाही तो कधी कळला नसावा. पडल्या पडल्या मला वाटले, कोणत्याही क्षणी अंधाऱ्या दारातून सावजीची बायको पुढे येऊन तुका न सापडल्याने कष्टी झालेल्या आमच्याकडे पाहून करुण हसेल.
*
( अंधार. दिवस पहिला समाप्त. )

       पहाटे उठून मी तुकाला शोधायला बाहेर पडलो. हातातली खुळखुळ्याची काठी आपटीत मी परत नदीकडे निघालो. पाचपन्नास पावले गेलो नाही तोच गावातला वेडा, म्हातारा जन्या समोर उभा ! मला पाहताच तो हसला आणि ओरडला, " हरवला - हरवला - तुक्या पुन्हा हरवला ! " ओरडत नाचू लागला. हा जन्या जेव्हा वेडा झाला आणि मुले त्याव्या मागे दगडे मारत येऊ लागली तेव्हा, दादा ! तूच मुलांना पिटाळून लावून अनेकदा त्याला वाचवलेस. आणि आता तोच जन्या तू हरवलास म्हणून नाच्तोय ! दादा ! तू हरवलास हे ऐकून काहींना आनंद होईल - मला ठाऊक आहे. पण या वेड्यालाही आनंद व्हावा !
" कुठे पाहिलेस दादाला ? बोल. "
"कुठे ? नदीपलीकडे ? "

       न बोलता तो धोतर वर खोचण्याची नक्कल करीत राहिला. त्याला सोडून मी पुढे निघालो. माझ्या पाठीला त्याचे खळखळून हसणे ऐकू आले.मला एकदा वाटले, त्याने माझी गंमत चालवली आहे; एकदा वाटले तो खरे पाहिलेले सांगतोय. मी मागे वळून पाहिले, चिपळ्या धरल्यासारखे हात वर करून तुकाच्या नाचण्याची नक्कल करीत तो कर्कश भेसूर सुरात म्हणू लागला. * मला तो भेसूर सूर ऐकवेना. कानांवर हात ठेऊन मी धावत सुटलो. गेला महिनाभर असेच अभंग म्हणत बेभान होऊन तुका बाहेर पडत होता.

       नदीवर येऊन श्वास आवरीत ऊभा राहिलो. पण वेडयाचे मनातून जाईना. या वेडयाचे नि आपले नाते असल्या सारखे तुका बोलत असे. कित्येकदा वेडया जन्याकडे तो टक लावून बसे. एकदा मला तुका म्हणाला, "कान्हा, जन्या वेडा असला तर सगळ्यांनी वेडे व्हावे. वस्त्रप्रावरणांसाठी आम्ही तगमगतो तर शरीराला लंगोटीसुद्धा पुरते हे त्याने दाखवून दिलेय. बायको,मुले, मित्रपरिवार यांच्या मायेशिवाय जगता येते हे त्याने आम्हांला शिकवलेय. राहायला प्रासादाची गरज नाही, वर निळे आकाशही पुरते- त्याने सिद्ध केलेय. पोटाला भाकरी-कालवणच लागते आणि दिवसातून तीन वेळा लागते- त्याने तेसुद्धा खोटे ठरवलेय. कान्हा ! त्याने मला शिकवलेय की, जे जे आपण मूल्यवान मानतो ती ती माया आहे. अरे ! त्याला देव सुद्धा लागत नाही जगायला. काय सांगावे ! आपण जगतो ते खोटे असेल. त्याचेच खरे असेल. तो आपल्या कुणाहूनही सुखी दिसतो, पाहिलास ना ? "

( शांततेनंतर *)

       पळसामध्ये कोवळी, तांबडी पालवी फुटायला लागली आहे. करवंदी हिरव्या व्हायला लागल्या आहेत. गावाकडून एक कोकिळा ओरडते आहे. दादा ! ती सृष्टी बघ कशी आनंदात नाचते आहे. या सृष्टीचे हे वैभव पाहून तू अनेकदा वेडा झाला आहेस. ती सृष्टी सोडून तू निघून गेला आहेस हे खरेच वाटत नाही. या सृष्टीवे मला काय असे तू म्हणूच शकत नाहीस. आमच्या कोणाहीपेक्षा या सृष्टीत तू जास्त रमला होतास. जीवनावर तुझी जास्त आसक्ती होती आणि तू आपल्या कुलदैवताचे करत होतास. तोही एक आसक्तीचाच भाग होता. आम्हा चारचौघांसारखीच तुझी देवावरली श्रद्धा व्यवहारमिश्रीतच होती.

       मग दादा ! तू केव्हा बदललास ? केव्हा बदललास तू ? ( शांतता ) आपले सगळे घरच बदलले. एखाद्या झाडाची फुले गळावी, मग पाने गळावी, मग फांद्या शुष्क व्हाव्यात तसे या आपल्या घराचे झाले. आपले घर !! केव्हापासून हे आमचे घर बदलले ? आनंदात असलेल्या घराला एकदम दृष्ट लागली तो दिवस !! पांडुरंगा !! मृत्यू !!
**
मृत्यूनी सगळ्यांची घरं बदलत नाहीत, पण आमचे बदलले !

       वडील... मग आई... मग सावजीची बयको!!

       सावजीची बायको मेली आणि घराला अवकळा सुरू झाली. सावजीची बायको मेली- दु:खांतून सुटली. ती मेली आणि सावजी यात्रेला गेला. पण एखाद्या कुटुंबात कोणी विरक्त निघत नाही का ? आणि ( शांतता ) आईबाप केव्हा ना केव्हा जातातच प्रत्येकाचे. आणि दुष्काळ पडला तो एकट्या मोरे घराण्यावरच पडला का ? सबंध देहूवर, सबंध प्रांतावरच पडला. सर्व घरी कुणी ना कुणी उपाशी मेले आणि कुणाचे दिवाळे निघाले. मग आमच्याच घरात हा सावजी, हा तुका असे का निर्माण व्हावे ?
*

       डोंगर चढताना मी रुळलेली पायवाट सोडून मुद्दाम आडवाटा जवळ केल्या. मला वाटत होतं की, अशाच एखाद्या जाळीत, खबदाडात तुका सापडणार. डोंगर माथ्यावर आलो. तुका बसे त्या जागेवर बसलो.** ( ध्यानस्त होत ) मी तुका आहे.. मी तुका आहे.. मी कान्हा नाही.. मी तुका आहे.. आता मी इथून उठून कोठे जाईन ? काय करीन ? .. असं दोन क्षण तुकाच्या आयुष्यात नाही डोकावता येणार. शक्यच नाही ते. तुकाचे मन मी कसे पकडणार ? तो नाहीसा झाला तेव्हा त्याच्या विचारांची परिणती कुठपर्यंत कशी झाली असेल ? तुकाचे काय काय झाले असेल ? याच्या कल्पना मनात येऊ लागल्या. तुका बेभान अवस्थेत नदीत शिरला असेल आणि वहात गेला असेल ? किंवा नदीत शिरला असताना एखाद्या सुसरीने त्याला ओढून नेले असेल ? किंवा नदी ओलांडून काठ चढून जाऊन तो सरळ चालत राहिला असेल आणि एखाद्या श्वापदाने त्याच्यावर झडप घातली असेल ? पांडुरंग ! पांडुरंग ! ** त्याने बेभान होऊन नाचत गात म्हणलेले अलिकडचे अभंग माझ्या कानात घुमू लागले. वैकुंठाला जातो म्हणून तो निरोप घेत होता. दादा! येतो. जातो वैकुंठाला ! जातो जातो जातो म्हणत भेटेल त्याचा निरोप घेत होता. आपणच कल्पना करायच्या आणि आपणच नवनवी विश्वं निर्माण करायची . परस्त्रीने आपल्यावर मोह घातला तर ? अशी एकदा कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि लगेच "आपण त्या मोहातून सुटलो " असा त्याने अभंगही रचून टाकला.तसा मोहही नव्हता आणि तशी स्त्रीही नव्हती. तसंच हे विमानही नाही आणि वैकुंठही नाही. तो इथेच कुठेतरी जाळीत, खबदाडात मला सापडणार. माझी खात्री आहे. मागल्यावेळी सात दिवस शोधले होते. आता वेळ आली तर सतरा दिवस शोधेन.
पण तुका असा का झाला ?
**
ते दोन मृत्यू झाले नसते तर ? तुका असा झाला नसता.

      
आमचे वडिल अवचित गेले. ते गेले तेव्हा बैलावर गोणी लादून तुका व्यापाराला कोकणात गेला होता. वडलांचे अंत्यसंस्कार उरकून आम्ही त्याची वाट पहात होतो. घर उदास होते. आईने अंथरूण धरले होते. तुकाने बाहेरच्या अंगणात बैल थांबवले. मग तो गोणी उतरवू लागला. त्याला पहाताच मी आवेगाने ओरडलो, " दादा.."
" काय झाले कान्ह्या ? "
"बाबा गेले रे ! "
( शांतता )
आई..

       मी हळूच बाहेर आलो. बैलांवरच्या, जोत्यावर आणून ठेवलेल्या गोणी व्यवस्थित लावल्या. त्यातच पैशांची थैली होती. ती आत आणून कपाटात ठेवली. कुणीतरी हेही करायला हवे. इतक्यात तुका उठून बाहेर आला. आणि अनवाणीच नदीच्या रस्त्याने चालू लागला. मी चमकून हातातले काम टाकून त्याच्या मागे गेलो. स्मशानात येऊन थांबलो. मी तुकाच्या मागे जाऊन उभा राहिलो. तुकाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. तुका तेव्हा रडला. मग आईच्यावेळी रडला. त्यानंतर तो कधी रडलेला मला आठवत नाही. ते दोन मृत्यू झाले नसते तर ? वडिलांचा , नंतर आईचा.

       या दोन मृत्यूंनी पुढचा तुका घडला. माझी खात्री आहे.
आई गेल्यावर त्याने केलेला विलक्षण शोक !

       "तुकादादा ! तुझ्या त्यावेळच्या अतीव दु:खाचा मला उलगडा होत नाही. दादा ! तुला ठाऊक नव्हते का की, कुणाचेच आईबाप रहात नाहीत. आपले आईवडील जातात. आपल्या मुलांचे आईवडील, म्हणजे आपण जातो. हे असेच होत असते, ही जग रहाटी आहे. असेच जग जगत राहात असते. तुझा अहंकार तरी केवढा होता ? की साध्या माणसालाही ज्या गोष्टी कळतात , त्या न कळण्याइतका तू अद्न्यानी आहेस ? "

       अर्थात हे मी तुकाला बोललो नाही. पण दिवसभर त्याच्याजवळ बसून होतो. संध्याकाळी तुका माझ्याशी बोलण्याइतपत शांत झाला. " कान्हा ! बाबा गेल्यावर आईने विचारले, "हे काय झाले रे ?" मी तेच विचारतो, हे काय झाले ? बाबा का गेले ? आई का गेली ? सावजीने अंग काढून घेतल्यावर किती हिरिरीने मी उदीम करू लागलो. हौसेने व्यापार केला. कसोशीने सावकारी केली. थैल्या भरभरून होन घरी आणले. वडलांना धन्य वाटले, आईने कुरवाळले. आणि काय झाले ? मला वाटले मी उद्योग नीट संभाळू लागलो आहे. वडलांना सुख देत राहू. मोठया वैभवात जगू. सगळे उत्तम होत राहाणार. कष्टाची फळे मिळणारच. पण काय झाले ? काय मिळाले ? धन मिळाले. आईबाबा गेले. त्यांचा मृत्यू टाळण्यास धनाचा उपयोग झाला नाही. भरलेल्या सुखी संसारातून बाबा-आईला कुणी उचलून नेले? हा मृत्यू कोण आहे ? * आणि त्याला माणसांच्या भावनांची चाड का नाही ? आम्ही करतो त्याच्याशी मृत्यूचा काही संबंध नाही.कान्हा किती भय़ंकर आहे हे ! एक मृत्यू सारे संपवतो आणि आपल्याला त्याची जाणच नसते ? "
( शांतता ) कोण आहे ?
(शांतता. नुसता डफ चालू होतो. ** )

       एकीकडे डोके या असल्या विचारात ! उन्हाची काहिली ! ज्या उन्हात शेत नांगरत असताना, गवत कापत असताना, खड्डा खणत असताना, शक्ती कमी न होता वाढल्यासारखी वाटली होती. ज्या उन्हात हातावरल्या, पायावरल्या, मानेवरल्या शिरा टरा टरा फुगल्या होत्या, जे ऊन्ह जीवनाने रसरसलेले वाटले होते, तेच ऊन्ह आता पार निराळी भावना देत होते. तुकादादा सापडला की ही भावना कोठल्याकोठे निघून जाईल.

       ( हसतो ) सृष्टी तीच असते. मनाची अवस्था बदलली की वेगळी दिसते. तुकाऽऽ दादा.
दुष्काळ !
या दुष्काळातच , तुका ! तुझी पहिली बायको अन्न अन्न करत तडफडत मेली.

       त्या वेळी दादा ! तू विठ्ठलवेडा नव्हतास . तू कवीही नव्हतास. त्यावेळी आज जी चार संतमंडळी तुझ्याभोवती आहेत ती नव्हती. लहानपणी न खेळता येणारा खेळ तू जिद्दीने खेळलास. अंगावर पडलेली सावकारी चोखपणे सांभाळलीस. तसाच दुष्काळाचा तडाखा तू हिमतीने अंगावर घेत होतास. तो "दादा " मला आवडत होता. अजूनही तोच आवडतो. हालाखी सहन करीत पहिली बायको आणि मुलगा मेल्यावर भयंकर दु:खाने तू हतबल झालस. तुला इतके हतबल मी कधी पाहिले नव्हते. तरी तो दादा मला आवडला. कारण अशा संकटात आम्ही जसे वागू तसा तू वागत होतास.
...आणि हतबल झाल्यावर घराचा कारभार मी हिमतीने अंगावर घेतला.
त्यावेळी सावकार आपल्या दारी आला ! !
आकाश कोसळले ! तरी काय बिघडले दादा ! दुष्काळ संपतो . पुन्हा पाऊस पडतो. धान्य येते. व्यवहार सुरू होतात. पुन्हा सावकारी सुरू करता येते. पण तुझे विश्वच निराळे झाले.
**
( थांबून )( डोळे पुसून ) पाऊस !!!

       दुष्काळानंतरचा पाऊस !! मला आठवतंय की मी या पायथ्याशी खाण्यासाठी कंद किंवा मुळे किंवा पाला मिळतोय का ते पहात होतो. गेले काही दिवस आकाशात ढग दिसत होते-जात होते. ढगांनी जोर धरावा म्हणून मनात प्रार्थना करीत होतो. आणि...

       आणि एकदम पावसाचे थेंब सडसडून पडू लागले. ते तोंडावर घेत, खोल श्वास ओढीत मी नाचू लागलो. .. मी थेंब पकडू लागलो. गारा पकडू लागलो... नंतर गारा थांबून जोराचा पाऊस सुरू झाला. मी कृतद्न्य उभा होतो ! चहूकडून पाणी वाहण्याचे गोड आवाज येत होते.मघा मी मेलेल्या ढोराचा सापळा समजलो होतो त्या सापळ्याने मान वर केली.

       दादा ! माझ्यासारख्या साध्या संसारी माणसाला आनंद होण्यास दुसरे काय हवे असते? देवाने पाऊस द्यावा. शेतात कणसे चांगली यावीत. विहिरींना पाणी यावे. पोरेबाळे, बायको आनंदात, सुखात असावीत. सण-समारंभ थाटात साजरे करावे. आणखी काय हवे?

       दादा ! माझे खोटे आहे का सांग ? पण हे सारे मला वाटले. तुला नाही !! तू आपला उठलास आणि आपल्या घरातील भंगलेल्या देऊळ दुरुस्तीला लागलास. पाऊस चांगला झाला होता. तुझ्यासारख्या अनुभवी वाण्याला धंदा सहज उभा करता आला असता, पण तू तिकडे वळलाच नाहीस. आईवडील गेले. बायको-मुले गेली. दुष्काळात अपमान झाले. लोकांत छी थू: झाली. हृदय पिळवटून निघाले. पण आमच्यासाठी काळ त्यावर इलाज करतो. दु:ख भरून निघतात. पण तू मात्र मनाला लावून घेतले. भंगलेले देऊळ तू उभारत राहिलास. हाती जे काही द्रव्य होते ते तू त्यात घातलेस. दुकानाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेस.

       आम्हांला तुझा राग आला. मी बायकोला म्हटले, प्रत्येक दमडी आपल्याला हवी आहे आणि दादा हातात द्रव्य आले की देवळाकडे घालतोय. कसे निभायचे आपले ? तुझ्या बायकोने-आवलीने त्यावेळी प्रथम तोंड सोडले. पण पहिल्यांदाच तू तिचे ऐकले नाहीस. भंगलेले देऊळ बांधत राहिलास. एकदा बेभान अवस्थेत तू मला डोंगरावर सापडलास तेव्हा तुझ्या त्या कृत्याबद्दल मी एकदा न राहववून विचारले तेव्हा तू म्हणालास..

       " कान्हा ! भिंत नीट करून, हातपाय धुवून मी देवळात जाऊन विठ्ठलाला नमस्कार करून बाजूला बसलो. माझ्या मागून एक गावकरी आला. तोही नमस्कार करून बसला. मला नवल वाटले. कारण माझी जराही चलबिचल झाली नाही. दुष्काळानंतर माणसांची मला भीती वाटू लागली होती. प्रत्येक जवळ आलेला माणूस मला घेणेकरी वाटू लागला होता. कित्येकदा मी भिऊन घरात अगदी आत काळोखात जाऊन बसे. पण यावेळी त्या दोघांची मला थोडीही भीती वाटली नाही. माझे मन निवांत होते ! त्यापूर्वी मी अनेकदा देवळात गेलो असेन, पण त्या दिवशी मला देऊळ काय असते हे कळले. गावात देऊळ हेच एक असे ठिकाण असते, जिथे व्यवहार संपतात . विठ्ठल-रखुमाई असलेल्या या चार भिंतींत माझ्यासारखा दिवाळे निघालेला येतो. माझा सावकार येतो. पांडुरंगापुढे सर्व समान होतात. आपण माणूस म्हणून हे समानतेचे तत्त्व हरवून बसतो. -कान्हा मी ठरवले, " सावकारी " इंद्रायणीत बुडवायची!!!
***
( शांतता. प्रखर निश्चयाने - )
कान्हा ! ज्याच्या घरावर मी जप्ती आणेन , ज्याच्या दाराशी धरणे धरेन त्याचा आणि माझा शेवट एकच ! मग मी धनको होऊन दुसऱ्याला का लुबाडावे ? मी ठरवले "सावकारी " इंद्रायणीत बुडवायची!!!*** (अंधार) ( पाण्यात पाहातोय )

       दादा! सर्वांना वाटतेय , केवळ भावाच्या नात्यामुळे मी तुला शोधतोय. असेही वाटेल की, भावाने भावाला शोधले नाही तर लोकापवाद येईल म्हणून मी तुला शोधतोय. मी तुला का शोधतोय हे मला मनोमन ठाऊक आहे. मी युला शोधतोय पण जे मी हरवून बसलोय ते शोधतोय ? दादा ! तू जे शोधत असायचास त्याची चुणुक मी अनुभवली आहे. तू ज्या विरक्तीत पूर्ण बुडला होतास, त्यात चुकलीमाकली बुडी मारून घाबरा होत मी बाहेर आलो आहे. ज्या विरक्तीने आपल्या कुटुंबाला पछाडले तिने मला तरी कुठे सोडले ? संपूर्ण विरागी होणे कदाचित सुखाचे असेल पण विरक्तीचे झटके येण्यासारखे दुर्दैवाचे काही नाही. मधूनच संसार वमन वाटतो. पण तो सोडवत नाही .

       दादा, तुला सावकारी इंद्रायणीत बुडवायची होती ! सावकारी इंद्रायणीत बुडवायची!! तुझे ते बोलणे ऐकून मी इतका भारावलो की सरळ उठून गहाणखतांची दप्तर आणायला घरात गेलो. कपाट उघडताना माझ्या पाठीला आपल्या दोन्ही बायकांच्या नजरा टोचत होत्या. इतक्यात मुलांपैकी एकजण येऊन माझ्या धोतराचा सोगा धरून पायाशी उभा राहिला. मी त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, गहाणखत बुडवल्यावर या मुलांचे कसे होणार ? ही अन्न अन्न करीत दारोदार भटकणार. तू आपल्या सगळ्या कुटुंबालाच भिकेला लावणार ? आमचा दुष्काळ कधीच संपणार नाही ? दादा, मी त्यावेळी तुझ्याशी भांडलो, क्षमा कर. तुझी मनस्थिती मला तेव्हा कळली नव्हती. तुझ्या मनात काय चालले आहे हे कळण्याचा पोच मला नव्हता. तू आपला एकेक मार्ग मोकळा करत चालला होतास हे माझ्या ध्यानातच आले नाही.

       संसारी, स्वार्थी, संकूचित वृत्तीचा भाऊ जे बोलेल ते मी तुला त्यावेळी बोललो. तुला बायकोमुलांची, भावाची, भावाच्या कुटुंबाची पर्वा नाही म्हटले. आपल्या वडिलांनी कष्टाने बांधीत आणलेला धंदा तू धुळीला मिळवतो आहेस. विरक्त पुष्कळ आहेत. आपला सावजी विरक्त होता. पण सर्व जबाबदारी संपल्यावर तो निघून गेला. पण तुझी बायको-मुले आहेत. माझी बायको-मुले आहेत. सर्वांच्या पोटापाण्याचा प्रश्न असता तू गहाणखतं बुडवायला निघालास ? " तुका ? तू संसार बुडवणार आहेस ? मग माझा गहाणखतातील हिस्सा मला दे आणि तुझे तुला काय करायचे तू कर. " तुझा चेहरा कष्टी झाला. मी दिलेले दप्तर तू परत माझ्या हातात दिलेस.

       मी ती निवडून काढली.उरलेली तुझ्या हाती ठेवली. तू डोहाशी गेलास. दप्तरात दगड ठेवलास. आणि ती दूर भिरकावलीस. ** इंद्रायणीत ती गहाणखतं खोल तळाशी गेली असतील. तुझा चेहरा विलक्षण आनंदला होता. तू कसलेतरी जड वजन दूर केले होतेस.

       आणि त्यानंतर काही क्षण तुकात आणि माझ्यात आतापर्यंत कधी न उत्पन्न झालेला दुरावा उत्पन्न झाला. इन्द्रायणीवर आम्ही दोघे उभे होतो. मला गदगदून येत होते. झालेल्या अपराधाबद्दल क्षमा मागावी आणि बाजूला काढलेली गहाणखतं पाण्यात फेकावीत असे मनात येत होते. पण ते धैर्य मला झाले नाही. मला गोंजारीत तुका म्हणाला, " मी तुझ्यावर रागावलो नाही. चल ! घरी जाऊ." ***

       भामनाथ डोंगर शोधल्यावर मी भंडारा डोंगराकडे निघालो. गहाणखतं बुडवल्यावर या इथेच तुकाने संतांची अक्षरे अभ्यासायची ठरवली होती. दादा..**

       माझ्या नकळत मी कधी बालपणीच्या कातळावर येऊन बसलो मळा कळलंच नाही. का कोणास ठाऊक काल पासून सारखे येथे येऊन बसावेसे वाटतेय. का कोणास ठाऊक, काल पासून सारख्या तुकाच्याच आठवणी येतायत. पुष्कळांचे भाऊ विरक्त होऊन गेले असतील. आमचा सावजीही विरक्त होऊन गेला. केवळ विरक्तीचे काय आठवायचे ? की तुकाने आमचे सगळे कुटुंबच विरक्तीत ओढून नेण्याचा प्रयत्न केला म्हणून आठवतोय? आणि ही विरक्ती तरी कोणत्या तऱ्हेची आहे ? ती सावजीची विरक्ती नाही . एखाद्या नव्या प्रदेशात वस्ती करायला न्यावे तशा आनंदाने तुका आम्हांला नेऊ पाहातोय. हा नवा विलक्षण प्रदेश कुठे आहे, कसा आहे याचा त्याला स्वत:लाच अनेकदा संदेह पडतोय. तरी तो आम्हांला ओढतोय. आम्ही ओढाळपणा केला की चिडतोय., रागावतोय, आक्रस्ताळा होतोय. प्रथम त्याला वाटत होते, माणसांची दु:खे दूर केली पाहिजेत. जे संत आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. दुसऱ्या जीवांशी एकरूप होता आलं पाहिजे. अवघे जग ब्रह्मरूप पाहिले पाहिजे. मग घरात कित्येकदा अन्नाचा कण नव्हता तरीही तू इतर संत मंडळी घरी आणायचास. त्यांची सेवा करायचास, कोणी म्हातारी जड ओझे घेऊन जाताना दिसली की तिचे ओझे घेऊन तिला घरी पोहोचवायचास. कोणी पांथस्थ आजारी दिसला की त्याला धर्मशाळेत नेऊन त्याची सुश्रुषा करायचास. लोकांनी सोडून दिलेल्या गुरांढोरांना तू दवापाणी करायचास. सांगितलेली कुठलीही कामे तू फुकट करतोस हे पाहून लोकं तुला वाटेल ती कामे सांगायची आणि तू ती करायचास. दादा, मग तुझ्या केव्हा लक्षात आले की, माणुसकी वगैरे गोष्टी तोकडया आहेत ?

       " कान्ह्या, माणसांची जी सांसारिक दु:खे दिसतात, ती खरी दु:खे नव्हेतच. व्यवहारातून दु:खे निर्माण होतात, ती दु:खे खोटी. खरे दु:ख जन्म घेण्याचेच आहे. कारण एखाद्याचे एक दु:ख दूर करावे तोच तो दुसरे दु:ख करू लागतो. एक गरज पुरवावी तर दुसरी उत्पन्न होते. अशी दु:खे निवारण करणे पोरपणाचे आहे. कान्हा, माणसाचे दु:ख निराळेच आहे. " (शांतता )

       जय जय रामकृष्ण हरी ! जय जय रामकृष्ण हरी ! ( उदघोषानंतर अंधार ) पोटापाण्याच्या उद्योगात धडपडीत दिवस-महिने कसे जातात कळत नाही. आमचा संसार आणि अडचणी वाढत होत्या. मागे वळून पाहिले की कधी कधी वाटते, किती कंटाळवाणे तेच तेच काम आपण करीत आलो ! मी दुकानदारी करतो आहे. माझ्या वडलांनी केली . आजोबांनी केली. माझ्याप्रमाणे माझे पूर्वज नांगर धरीत आले. रानात गवत कापायला गेले. त्या सर्वांतून काय निष्पन्न झाले ?

       सूर्य क्षितिजाकडे उतरू लागला आहे. यथाक्रम रात्र पडेल. तुका सापडला किंवा न सापडला याचे सूर्याला काही आहे का ? माणसाचे महत्त्व फक्त माणसाला. पंच महाभूते त्याला पुसत सुद्धा नाहीत. दादा ! त्या निर्घृण पंचमहाभूतांपासून तुझ्या देहाचे संरक्षण करायला आम्ही पाहत आहोत. शरीर म्हणजे सर्व आहे एवढेच आम्हांला कळते. माझ्या एका हाकेला तरी उत्तर दे.

       (शंका येऊन ) का तू मला आता कधीच सापडणार नाहीस ? तू असा कोठे लपला आहेस, की ती जागा मला अपरिचित आहे ? तू गेल्यावर मला काय उरले? लोकांना काय तुझे कवित्व पुरेल. पण मला मात्र तुझे कवित्व तुझ्यावाचून वाचवणार नाही. ते नुसते कागद पाहून मला रडू कोसळेल. तू माऊलीहून मायाळ । चंद्राहून सीतळ । पाण्याहून पातळ । कल्लोळ प्रेमाचा । (शांतता) आंधळयासि जग अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ।

       तुला एक सांगू का ? तू लिहिलेले अभंग वाचून मीही अभंग करू लागलोय. तुला अभंगामागून अभंग कसे सुचतात हे मला कधी कळले नाही मी खूप विचार करायचो. अमुक एक अभंग तुला कसा सुचला असेल ?

       परिमळ म्हणोन चोळू नये फूल । खाऊ नये मूळ आवडते । मोतियाचे पाणी चाझू नये स्वाद । यंत्र भेदुनिया नाद पाहू नये ।

       त्याची गाभ्याची कल्पना तुला कशी सुचली असेल ? तुझ्या अभंगाचे मूळ विठ्ठल आहे का "तुका" आहे ? काही विचार सुचला की त्याचा अभंग तयार होतो, की काही प्रसंग पाहून तुला अभंग सुचतो ? मीही एखादी उत्कट भावना मनात येऊन अभंग करायचो. मग पुढचे कित्येक दिवस थंड जायचे. कधी महिनेही. तुझ्या डोक्यात एवढे अभंग कसे येतात ते कळत नाही. अखादी मधमाशी जशी भराभरा फुलाफुलांवरून जाते, तसे तुझे अभंग वस्तू-विषयांवरून मध वेचत जातात. प्रत्येक क्षण तुझ्या लेखी जिवंत, उल्हासित आहे. मला सांग, माझे जीवन जास्त धडपडीचे असूनही माझ्यापेक्षा जीवनातले सूक्ष्म तुला कसे कळते ? जणू तुला पाहाताच जीवन आपल्या अंतरंगाच्या पाकळ्या उघडून तुझ्यापुढे उभे रहाते आणि मला पहाताच ते डोळे मिटून घेते. मरण माझे मरोनि गेले । मज केले अमर ।
ठाव पुसिले बूड पुसिले । वोस वोसले देहभाव ।
आला होता गेला पूर । धरिला धीर जिवनी ।
तुका म्हणे अनिकेचे । झाले साचे उजवणे ।
जलदिव्य !! ***

       तेरा दिवसांचा निश्चक्र उपवास !! जीव कासावीस !! अभंगांच्या वह्या तरल्या तरच पुढे कवित्व !! "कान्हा, मी वह्या इंद्रायणीत बुडवणार. माझ्या वह्यांचे कागद बुडणार की कवित्व हे पांडुरंगाला आणि ज्या लोकांना माझे अभंग महत्त्वाचे वाटतात त्यांना ठरवू दे ! अनुभवाचे शब्द बेगडी असतील तर रसातळाला गेलेले बरे. त्यानिमित्ताने आपलीपण पारख होईल. केवळ जन्माच्या आधाराने कोणी मनुष्य द्न्यानी-अद्न्यानी ठरत नाही आणि आपले तोंड शक्तीच्या जोरावर दाबले जाऊ शकते, मन आणि बुद्धी नाही. अन्याय करणारा कोणीही मक्तेदार असेच वागतो. पण आपण का घाबरावे ? चोखोबा, द्न्यानोबा कुठे घाबरले ? दह्यामध्ये लोणी असते हे सर्वांना ठाऊक असते पण जो मंथन कसे करायचे हे जाणतो, तोच ते लोणी वेगळे काढू शकतो. लाकडात आपोआप अग्नी प्रज्वलीत कसा होईल ? त्यासाठी घर्षण करावे लागते ना ? खडे निवडले तरच दळण चोख मिळेल. तण काढूनच शेताचे हित राखावे लागते. वागण्याची ही नीती हे नियम यांचा विचार केला नाही तर हित होत नाही. माणसाने स्वत: हालचाल केली तरच त्याच्यावरची सर्वसंकटे निवारली जातील . मी वेद बोलतो. काही ब्राह्मण माझ्या पाया पडतात आणि धर्म बुडतो. मला गुरु-शिष्य भोंदूबाजी मान्य होत नाही. हा माझा दोष असेल तर त्याचे प्रायश्चित्त ** घ्यायला हवे. आणि मी नाही म्हणले तरी ते मला भागच पाडतील. माझा भरंवसा आता पांडुरंगावर आणि लोकांवर आहे कान्हा ! "

       जलदिव्य झाले. उपवास झाला. आणि वह्या तरल्या....जलदिव्यातून सुरक्षित बाहेर आल्या. त्या कशा तरल्या कोण सांगणार ? वर ठेवलेला दगड कासवाने किंवा मगरीने ढकलला किंवा नंतर लॊक म्हणू लागले तशा त्या विठ्ठलाने काढून तुझ्यापुढे धरल्या. पांडुरंग ! पांडुरंग ! * नदीवरच्या या अंधारात तू शेजारी नाहीस याची तीव्र वेदना होत आहे. तू खरा काय होता हे थोडे थोडे कळू लागल्यावर आता तू सापडावास म्हणजे काय मजा येईल ! तू म्हणत होतास ते खरेच आहे. हा प्रपंच खोटा आहे.येथील सर्व खोटे आहे. पाहा ! तुझा सहवास आहे म्हणता म्हणता चाळीस वर्षे गेलीही आणि आणखी पंधरावीस वर्षांत आपल्यापैकी कुणी राहणार नाही. जसे बाबा होते, आई होती असे म्हणता म्हणता दोघेही गेली. सावजी गेला सगळे जाण्यासाठीच आले. कुठून आले ? कुठे गेले ? या विचाराने तू वैतागलास. तुझा मागचा अटटाहास याचसाठी होता. हे सृष्टीतले सारे कुठे गेले हे शोधण्याचा हा प्रयत्न होता ?

       तू जीवनात खोल बुडया मारीत होतास आणि लहानपणी मी डोहाच्या काठावर तुझ्या बुडया पहात विचारीत होतो, दादा ! तळ लागला का ? श्वासासाठी धडपडत पाण्यावर मान काढून , चूळ टाकत तू " नाही-नाही " मान हालवीत होतास. तसेच मला आताही वाटत होते. कित्येक जागी तू " सापडले - सापडले" ओरडत , दोन्ही हात वर करून मुठी उघडत होतास आणि मूठ मोकळी होती. कित्येकदा काही हातात येत होते आणि मला ते कळत नव्हते. **

       ( शांतता )

       तुकाच्या शोधाचा हा तिसरा दिवस. !

       शोधाच्या तिसऱ्या दिवशीही मी इंद्रायणीवर जाऊन पोहोचलो. मागोमाग रामेश्वर भट., बहिणाबाईचा नवरा, मंबाजी आले. तुका विषयी उशिरा का होईना पण त्यांना ममत्व वाटू लागले होते. पाठोपाठ काही गावकरीही आले. गप्प उभे. कोणीच काही बोलेना. असह्य शांतता. मग एकजण धीर घेऊन म्हणाला , " तुका सदेह वैकुंठाला गेल्याच्या वदंता आहेत. एका गुराखी पोराने म्हणे विमानही पाहिले. कुणी म्हणतात, तुकाने डोहात उडी घेतली. कुणी म्हणतात, त्याला मगरीने ओढून नेले. कुणाचे म्हणणे, तो आपला निघून गेला तर कुणाचे म्हणणे त्याला...

       मला कुठलेच काही ऐकू येई नाहीसे झाले. डोळ्यांपुढे अंधारी आली. पायाखालची जमीन हादरू लागली. डोक्यात सर्वत्र कोलाहल सुरू झाला. तुका मला या पुढे दिसणार नाही ही जाणीव मी सहनच करू शकत नव्हतो. मी एकटाच झरझर इंद्रायणीच्या काठाकाठाने निघालो. मन अस्थीर झाले होते. तुकादादा असा जाईल कसा हा प्रश्न मनात उसळून येत होता. मन सर्व संशयाने ग्रासले गेले. पण कोणी सांगावे प्रत्यक्ष पांडुरंगानेही त्याला आपल्याबरोबर नेलेही असेल. पण कुठे ? दादा ! *** ( अंधार )

       काय रे नष्ट्या नारायणा, बरा भेटलास आम्हाला. काळतोंडया, तू आमच्या घराची पुरती विल्हेवाट लावलीस. काय रे बाबा, आम्ही निष्काम राहिलो म्हणून का रे तुझ्या मनात येईल ते करतोस ? बोल कुठाय माझा भाऊ ? ***

धींद धींद तुझ्या करीन चिंधडया !
ऐसे काय वेडया जाणितले॥
केली तरी बरे मज भेटी भावास ।
नाही तरी नास आरंभिला ॥ **
मरावे मारावे या आले प्रसंगा ।
बरे पांडुरंगा कळलेसावे ॥
तुकयाबंधू म्हणे तुझी माझी उरी ।
उरली न धरी भीड काही ॥ **
भक्ति मुक्ति तुझे जळो ब्रह्मद्न्यान ।
दे माझ्या आणोनी भावा वेगी ॥
रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळून ।
दे माझ्या आणून भावा वेगी ॥ **
नको आपुलीया नेऊ वैकुंठासी ।
दे माझ्या भावासी आणून वेगी ॥
नको होऊ काही होशील प्रसन्न ।
दे माझ्या आणून भावा वेगी ॥
तुकयाबंधु म्हणे पाहा हो नाही तरी ।
हत्त्या होईल शिरी पांडुरंगा ॥ **

       तुका जाऊन दोन दिवस उलटले मी सारखा आत बाहेर करतो आहे. दर वेळि माझी दृष्टी घरातले सामान पाहण्याऐवजी त्याला चिकटून बसलेल्या स्मृती पाहत आहे. आम्ही येथे जन्मलो, वाढलो, हसलो, रुजलो,जेवलो, खेळलो दंगलो, रंगलो, भंगलो... ( रडू लागतो )

       " पांडुरंगा ! परवा मी तुझ्यावर संतापलो. शुद्धहरपलो, पाया पडतो. क्षमा कर ! आता राग संपले. या पुढचे दिवस मी सरळ योगक्षेमात, मुलेबाळे वाढवण्यात घालवणार. तुकाचे अभंग गात जबाबदारीने वागणार. विठ्ठला तू आहेस - नाहीस, तुझी कृपा आहे - नाही हा आता कसलाच विचार नाही. तू असशील तर सुखाने घरी अस. मी माझ्या घरी सुखाने असेन. जरी आमच्या भावातला मी एकटाच उरलो आहे तरी तुला दोष देत नाही, तुझ्यावर राग नाही. तू कोणत्या गावी आहेस ? तुका तुला विचारीत होता. तो तुझे गाव शोधायला गेला. तुझे गाणे गायचे सोडून गेला. मी तुझे गाणे गातच संसाराच्या सागरात उतरत आहे. जोवर माझ्या भावाची माझी भेट होत नाही तोवर तुझे नाव मी घेत राहीन. तुकाच्या आकांताने घेत राहीन. "

       ( प्रथम वीणा वाजते. पखवाज, टाळ वाजू लागतात. अंधारत जाताना- पडदा )

 

*****