|
|
|
|
|
परिशिष्ट १.
१.
काहिंच मी नव्हे कोणिये गावीचा ! एकट ठायीचा ठायीं एक !!१!!
नाहीं जात कोठे येत फिरोनिया ! अवघेचि वायांविण बोले !!२!!
नाहीं मज कोणी आपुले दुसरें ! कोणाचा मी खरें काहीं नव्हें !!३!!
नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत ! आहो अखंडित जैसे तैसे !!४!!
तुका म्हणे नावरूप नाहीं आम्हां ! वेगळा ह्या कर्मा अकर्मासी !!५!!
२.
धन्य देहू गाव पुण्य भूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥
धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे । उच्चारिती वाचे नाम घोष ॥धृ॥
कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगी ते माता रखुमादेवी॥२॥
गरूड पारीं उभा जोडूनिया कर । अश्वत्थ समोर उत्तरामुख ॥३॥
दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥४॥
लक्ष्मीनारायण बल्लाळाचें वन । तेथें अधिष्ठान सिद्धेश्वर ॥५॥
विघ्नराज द्वारीं बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारी सहित दोघे ॥६॥
तेथे दास तुका करितो कीर्तन । ह्रुदयीं चरण विठोबाचें॥७॥
३.
पवित्र तें कूळ पावन तो देश । जेथें हरिचें दास घेती जन्म ॥१॥
कर्मधर्म त्याचें जाला नारायण । त्याचेंनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
वर्ण अभिमानें कोण जाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशीं ॥२॥
कर्मधर्म त्याचें जाला नारायण । त्याचेंनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
अंत्यजादि योनी तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं ॥३॥
कर्मधर्म त्याचें जाला नारायण । त्याचेंनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥
कर्मधर्म त्याचें जाला नारायण । त्याचेंनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
कबीर मोमीन लतीब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥५॥
कर्मधर्म त्याचें जाला नारायण । त्याचेंनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
कणोपात्र खोदु पिंजारी तो दादू । भजनीं अभेदू हरीचें पायीं ॥६॥
कर्मधर्म त्याचें जाला नारायण । त्याचेंनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
चोखामेळा बंका जातीचा महार । त्यासीं सर्वेश्वर ऐक्य करीं ॥७॥
कर्मधर्म त्याचें जाला नारायण । त्याचेंनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवीं पंढरिराव तियेसवें ॥८॥
कर्मधर्म त्याचें जाला नारायण । त्याचेंनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥९॥
कर्मधर्म त्याचें जाला नारायण । त्याचेंनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥१०॥
कर्मधर्म त्याचें जाला नारायण । त्याचेंनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
तुका म्हणें तुम्ही विचारावें ग्रंथ । तारिलें पतीत नेणों किती ॥११॥
कर्मधर्म त्याचें जाला नारायण । त्याचेंनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
४अ.
हातीं होन दावी बेना । करिती लेकीच्या धारणा ॥१॥
ऐसे धर्म जालें कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ धृ॥
सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥
टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥३॥
बैसोनिया तक्तां । अन्नेवीण पिडीती लोकां ॥४॥
मुदबख लिहिणे । तेलतुपावरी जिणें ॥५॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती भार ॥६॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥८॥
अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥९॥
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥
४ब
पाहा हो कलिचें महिमान । असत्त्यासी रिझलें जन ।
पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥१॥
ऐसे अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ ।
केले धर्माचे निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥धृ॥
थोर या युगाचें आश्चर्य । ब्रम्हकर्म उत्तम सार ।
सांडुनिया द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥२॥
ऐसे यथार्थाचे अनर्थ । जाला बुडाला परमार्थ ।
नाही जाली ऐसी नीत । हा हा भूत पातलें ॥३॥
शांति क्षमा दया । भावभक्ति सत्क्रिया ।
ठाव नाहीं सांगावया । सत्त्व धैर्य भंगिलें ॥४॥
राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरिती कर्म ।
म्हणविता रामराम । श्रम महा मानिती ॥५॥
थेर भोरपाचे विशीं । धावती भूतें आविसां तैसीं ।
कथा पुराण म्हणतां सिसी । तिडीक उठी नकऱ्याचे ॥६॥
विषय लोभासाटीं । सर्वार्थेंसीं प्राण साटी ।
परमार्थी पीठ मुठी । मागतां उठती सुनीसीं ॥७॥
धनाढ्य़ देखोनि अनामिक । तयातें मानिती आवश्यक ।
अपमानिलें वेदपाठक । सात्विक शास्त्रद्न्य संपन्न ॥८॥
पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी ।
सुनांचिया दासी । सासा जाल्या आंदण्या ॥९॥
खोटें जालें आली विंवसी। केली मर्यादा नाहिंसी।
भ्रतारें तीं भार्यासी । रंक तैसीं मानिती ॥१०॥
नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा ।
पोटासाठी खौसा । वंदिती मलिंछाच्या ॥११॥
बहुत पाप जालें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ ।
अभक्ष भक्षिती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥१२॥
कैसे जाले नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ।
विडे घेऊनि ब्राम्हण । अविंदवाणी वदताती ॥१३॥
कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दासिंचीं चुंबिती।
सोवळ्याच्या स्फ़िती । जगीं मिरविती पवित्रता ॥१४॥
मद्यपानाची सुराणी । नवनीता नपुसे कोणी ।
केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥१५॥
केवढी दोषाची सबळता । जाली पाहा हो भगवंता ।
पुण्य धुडावोनी संता । तीर्था हरी आणिती ॥१६॥
भेणे मंद जाल्या मेघवृष्टि । आकांतली कांपे सृष्टि ।
देव रिगाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥१७॥
अपीक धान्ये दिवसें दिवसें । गाई म्हैसी चेवल्या गोरसें ।
नगरें दिसती उध्वंसे । पिकली बहुवसें पाखांडे ॥१८॥
होम हरपलीं हवनें । यद्न्ययाग अनुष्ठानें ।
जपतपादि साधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥१९॥
अठरा यातींचें व्यापार । करिती तस्कराई विप्र ।
सांडोनिया शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळीं पांघरती ॥२०॥
गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्री ।
अष्वाचिया परि । कुमारी विकिती वेदवक्ते ॥२१॥
वेदाध्ययनसंहितारुचि । भकाद्या करिती तयांची ।
आवडी पंडितांची । मुसाफ़ावरी बैसली ॥२२॥
मुख्य सर्वोत्तम साधनें । तीं उच्छेदूनिं केलीं दीनें ।
कुडीं कापटें महा मोहने । मिरविताती दुर्जन ॥२३॥
कळाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदे ठायीं ।
विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसीं नाडलीं ॥२४॥
जें संन्यासी तापसी ब्रह्मचारी । होता बैरागी दिगांबर निस्पृही
वैराग्यकारी। कामक्रोधे व्यापिले भारी। इच्छाकरी न सुटती ॥२५॥
कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे जालें प्रजांचें अंतक ।
पिते पुत्र सहोदर । एकाएक शत्रुघातें वर्ततीं ॥२६॥
केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविलें अवघें जन ।
याती अठरा चारी वर्ण । कर्दम करुनी विटाळलें ॥२७॥
पूवाअहोतें भविष्य केलें । संती ते यथार्थ जालें ।
ऐकत होतो ते देखिलें । प्रत्यक्ष लोचनीं ॥२८॥
आतां असो हे आघवे । गति नव्हे कळीमध्येवागवरावे ।
देवासी भाकोनि करुणावें । वेगें स्मरावें अंतरीं ॥२९॥
अगा ये वैकुंठनायका । काय पाहतोसि या कौतुका ।
धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३० ॥
५अ.
संतां नाही मान । देव मानीं मुसलमान ॥१॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥धृ॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचें चरण ॥२॥
तुका म्हणें धर्म । न कळें माजल्याचा भ्रम ॥३॥
५ब.
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भूत चराचरीं ।
ऐसिया अनंतामाजी तू अनंत । लीलावेश होता जगत्राता ॥१॥
ब्रह्मानंद तुकें तुळें आल तुका । तो हा विश्वसंख्या क्रीडे जनीं ॥धृ॥
शास्त्रा श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली ।
देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिवीण योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥
संत ग्रहमेळीं जगधंद्या गिळी । पैल उदयाचळी भानु तुका ।
संत वृंदे तीर्थ गौतमी हरिकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली॥३॥
शांति पतिव्रते जाले परिनयन । कामसंतर्पण निष्कामता ।
क्षमा क्षमापणें प्रसिद्ध प्रथा जगीं । तें तों तुझ्या अंगीं मूर्तीमंत ॥४॥
दया दीनानाथा तुव जीवविली । विश्वीं विस्तारलीं कीर्ती तुझी ।
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिलें देव द्विज सर्वभूतें ॥५॥
अधर्म क्षयव्याधी धर्माशीं स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ति ।
ब्रह्म ऐक्यभावें भक्ति विस्तारिली । वाक्यें सपळ केली वेदविहितें ॥६॥
देहबुद्धि जात्या अभिमानें वंचलों । तो मी उपेक्षलों न पाहिजें ।
न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥
६.
अर्भकाचे साटीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥१॥
तैसे संत जगीं । क्रिया करुनि दाविती अंगीं ॥ धृ॥
बालकाचें चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥२॥
तुका म्हणें नांव । जनांसाठीं उदकीं ठाव ॥३॥
७.
ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें ॥१॥
तोचि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥धृ॥
रज्जु सर्प होता । तोंवरी चि न कळतां ॥२॥
तुका म्हणें साचें । भय नाहीं बागुलाचें ॥३॥
८.
बाप करी जोडी लेकराचें ओढी । आपुली करवंडी वाळवूनि ॥१॥
एकाएकीं केलों मिरासीचा धनी । काडिये वागवूनी भार खांदी ॥धृ॥
लेवऊनि पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करुनिया ॥२॥
तुका म्हणें नेदी गांजू आणिकांसी । उदार जीवासी आपुलिया ॥३॥
९.
बाप मेला न कळतां । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
विठो तुझें माझें राज्य । नाही दुसऱ्याचें काज ॥धृ॥
बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥२॥
पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥३॥
माता मेली मजदेखतां । तुका म्हणें हरली चिंता ॥४॥
१०.
काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥१॥
काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥२॥
अमंगळपणें कंटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥३॥
लेववी आपुले अंगें अळंकार । संतोषाये फार देखोनियां ॥४॥
तुका म्हणें स्तुति योग्य नाहीं परी । तुम्म्म्हां लाज थोरी अंकिताची ॥५॥
११.
याति शूद्र वैश्य केला वेवसाव । आदि तो हा देव कूळपूज्य ॥१॥
नयें बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्ही संतीं ॥धृ॥
संवसारें जालों अतिदु़खें दुखी । मायबाप सेखी कर्मलिया ॥२॥
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली।३॥
लज्जा वाटें जीवा त्रासलों या दु:खें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥
देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥
आरंभी कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ।
कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें । विश्वासें आदरें करोनियां ॥७॥
गातीं पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥
संतांचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली॥९॥
टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥१०॥
वचन मानिलें नाहीं सहुदांचें । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥
सत्य असत्यासीं मन केलें ग्वाहीं । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥१३॥
यावरि या जालीं कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिलें चित्तीं विठोबाचें ॥१४॥
निषेधाचा कंहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥
बुडविल्या वह्या बैसलो धरणें । केले नारायणें समाधान ॥१६॥
विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आता पुरें ॥१७॥
आता आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणें ॥१८॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥
तुका म्हणें माझें सर्व भांडवल । बोलविलें पांडुरंगें ॥२०॥
१२.
ऐका वचन हें संत । मी तो आगळा पतित ।
काय काजें प्रीत । करितसां आदरें ॥१॥
माझें चित्त मज ग्वाही । सत्त्य तरलों मी नाहीं ।
एकाचिये वांहीं । एक देखीं मानितीं ॥धृ॥
बहू पीडिलों संसारें । मोडीं पुसें पिटीं ढोरें ।
न पडतां पुरें । या विचारें राहिलों ॥२॥
सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें बहु तें हीं ।
त्याग केला नाहीं दिलें द्विजां याचकां ॥३॥
प्रियापुत्रबंधु । यांचा तोडिला संबंधु ।
सहज जालों मंदु । भाग्यहीन करंटा ॥४॥
तोंड न दाखवें जनां । शिरे सांदी भरें राणां ।
एकांत तो जाणां । तयासाटीं लागाला ॥५॥
पोटें पिटिलों काहारें । दया नाहीं या विचारें ।
बोलवितां बरें । सहज म्हणें यासाटीं ॥६॥
सहज वडिलां होती सेवा । म्हणोनि पूजितों या देवा ।
तुका म्हणें भावा । साटी झणीं घ्या कोणीं ॥७॥
१३.
संसाराच्या नांवें घालूनिया शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥
हरिभजनें हें धवळिलें जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥धृ॥
कोणां ही नलगें साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी ॥२॥
तुका म्हणें सुख समाधि हरिकथा । नेणें भाववेथा गाईल तो ॥३॥
१४.
विचारिलें आधी आपुल्या मानसीं । वाचों येथें कैसीं कोण्या द्वारें ॥१॥
तंव जाला साह्य हृदयनिवासी । बुद्धि दिली ऐसी नास नाहीं ॥धृ॥
उद्वेगाचे होतों पदिलो समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥२॥
तुका म्हणें दु:खें आल आयुर्भाव । जाला बहू जीव कासावीस ॥३॥
१५.
पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥१॥
भंबगिरीपाठारीं वस्ती जाण केली । वृत्ती थिरावली परब्रह्मीं ॥धृ॥
निर्वाण जाणोनि आसन घातलें । ध्यान आरंभिलें देवाजीचें ॥२॥
सर्प विन्चू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकळिक ॥३॥
दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका म्हणें ॥४॥
१६.
करूं तैसें पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥
जिहीं केला मूर्तीमंत । ऐसें संत प्रसाद ॥धृ॥
सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटां मागीलां ॥२॥
तुका म्हणें घेऊं धांवा । करूं हांवा ते जोडी ॥३॥
१७,
तुजवीण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥१॥
ऐसा न देखें मी कोणीं । तुजा तिहीं त्रिभुवनीं ॥धृ॥
पाहिलीं पुराणें । धांडोळिलीं दरुषणें ॥२॥
तुका म्हणें ठायीं । जडून ठेलों तुझ्या पायीं ॥३॥
१८.
पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥
नव्हती हें आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥धृ॥
भावें घ्या रें भावें घ्या रें । एकदा जा रें पंढ्रिये ॥२॥
भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥
पापपुण्या करील झाडा । जाईल पीडा जन्माचीं ॥४॥
घ्यावी हातीं टाळदिंडी । गावें तोंडीं गुणवाद ॥५॥
तुका म्हणें घटापटा । न लागें वाटा शोधाव्या ॥६॥
१९.
वृक्ष वल्लीं आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१
येणें सुखें रुचें एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥धृ॥
आकाश मंडप पृथुवी आसन । रमें तेथें मन क्रीडा करी ॥२॥
कथाकुमंडलु देह उपचारा। जाण्वितो वारा अवश्वरू॥३॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥
तुका म्हणें होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥५॥
२०.
नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सावें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितकें काम करावें कवित्व । वाउगें निमित्त बोलू नको ॥धृ ॥
माप टाकी सल धरिला विठ्ठलें थापटोनि केलें सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी । उरलें शेवटीं लावी तुका॥३॥
२१.
द्याल ठाव तरी राहेन संगती । संतांचे पंगती पायापाशीं ॥१॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आता उदासीन न धरावें ॥धृ॥
सेवतील स्थळ निंच माझी वृत्ती । आधारें विश्रंती पावईन ॥२॥
नामदेवापायीं तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥३॥
२२.
सेवितां रस तो वाटितों आणिकां । घ्या रें होवू नका राणभरी ॥१॥
विटेवरी ज्याचीं पाऊलें समान । तो चि एक दानशूर दाता ॥धृ॥
मनाचें संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचें पायीं ॥२॥
तुका म्हणें मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
२३.
बोलावे म्हूण हें बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥१॥
भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैचें येथें जन अधिकारी ॥धृ॥
मुखीं देतां घांस पळवितीं तोंडें । अंगीचियां भांडें असुकानें ॥२॥
तुका म्हणें पूजा करितो देवाची । आपुलियां रुची मनाचियें ॥३॥
२४.
करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हें माझी वाणी पदरींची ॥१॥
माझियें युक्तीचा नव्हें हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥धृ॥
काय मी पामर जाणें अर्थभेद । वदवी गोविंद तेचि वदें ॥२॥
निमित्त मापासी बैसविलो आहें । मी तो काहीं नव्हें स्वामीसत्ता ॥३॥
तुका म्हणें आहे पाईक मी खरा । वागवितो मुद्रा नमाची हे ॥४॥
२५.
नेणें अर्थ कांहीं नव्हती माझें बोल । विनवितो कोपाल संत झणीं ॥१॥
नव्हती माझें बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनिया ॥धृ॥
मज मूढा शक्ति कैचा हा विचार । निगमादिका पार बोलावया ॥२॥
राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । बोबडा उत्तरी हें चि ध्यान ॥३॥
तुका म्हणें गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥४॥
२६.
काय खावें आतां कोणीकडें जावें । गावांत राहावें कोण्या बळें ॥१॥
कोपला पाटील गांवचें हे लोक । आता घाली भीक कोण मज ॥धृ॥
आतां येणें चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणांत ॥२॥
भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥
तुका म्हणें याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठ्ला जाऊ आतां ॥४॥
२७.
तेरा दिवस जालें निश्चक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥१॥
पाषाणाची खोळ घेऊनि बैसलासी । काय हृषिकेशी जालें तूज ॥धृ॥
तुजवरीं आतां प्राण मी तजीन । हत्त्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥
फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणें आतां मांडिलें निर्वाण । प्राण हा सांडिन तुजवरी ॥४॥
२८.
थोर अन्याय मी केला तुझा अंत म्यां पाहिला | जनाचिया बोलासाटी चित्त क्षोभविलें ॥१॥
भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥धृ॥
अवघें घालुनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योग क्षेम पुढें तुज करणें लागेल ॥२॥
उदकीं राखिलें कागद चुकविला जनवाद । तुका म्हणें ब्रीद साच केलें आपुलें ॥३॥
२९
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हें न खाती सर्प तयां ॥१॥
विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥धृ॥
दु:ख तें देइल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥२॥
आवडेल जीवां जीवांचें परी । सकळां आंतरीं एक भाव ॥३॥
तुका म्हणें कृपा केली नारायणें । जाणियेतें येणें अनुभवें ॥४॥
३०.
काखें कडासन आज पडें । खडबड खडबडे हुसकलें ॥१॥
दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाहीं ॥धृ॥
अवघा जाला राम राम । कोणीं कर्म आचरे ना ॥२॥
हरिदासांच्या पडती पायां । म्हणती तयां नागवावें ॥३॥
दोहिं ठायीं फजीत जालें । पारणें केलें अवकळा ॥४॥
तुका म्हणें नाश केला । विटंबिला वेश जिहीं ॥५॥
३१.
अविट हें क्षीर हरिकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥१॥
अमृत राहिले लाजुन माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदे ॥धृ॥
पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥२॥
सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें वाटणी या वैष्णवांची ॥३॥
निर्गुण हे सोंग धरिले गुणवंत । धरूनिया प्रीत गाये नाचे ॥४॥
तुका म्हणें केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनी होवोनि ठेला ॥५॥
३२.
श्रीपंढरीशा पतित पावना । एक विद्न्यापना पायांपाशीं ॥१॥
अनाथां जीवांचा तू काजकैवारी । ऐसी चराचरीं ब्रिदावळी ॥धृ॥
न संगतां कळे अंतरीचें गूज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥
आळिकर ज्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देऊनियां ॥३॥
तुका म्हणें तू चि खेळें दोहीं ठायीं । नसेल तो देइ धीर मना ॥४॥
३३.
नको काहीं पडों ग्रंथांचे भरीं । शीघ व्रत करी हे चि एक ॥१॥
देवाचियें चाडे आळवावें देवा । ओस देहभावा पाडोनियां ॥धृ ॥
साधनें घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकी न चुकती ॥२॥
उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासि इच्छा आवश्यक ॥३॥
रोकडी घातला अंगसंगे जरा । आता उजगरा कोठवरि ॥४॥
तुका म्हणें घाली नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥
३४.
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद तो काया । भेद नाही देवा तया ॥धृ॥
आनंदलें मन । प्रेमें पझरती लोचन ॥२॥
तुका म्हणें आळी । जेवीं नुरे चि वेगळी ॥३॥
३५.
बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥१॥
करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥धृ॥
सुखाची समाधी हरिकथा माउली । विश्रांती साउली सिणलियांची ॥२॥
तुका म्हणें बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥३॥
३६.
तुम्ही येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका तें ॥१॥
आतां काय पुढे वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥धृ॥
देवाचें उचित एकदश अभंग । महाफळ त्याग करुनि गेला ॥२॥
तुका म्हणें सेवा समर्पूनि पायीं । जालो उतराई ठावें असो ॥३॥
३७.
नावडें जे चित्ता । तें चि होसिपुरविता ॥१॥
कां रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाटीं ॥धृ॥
न करावा संग । वाटें दुरावावें जग ॥२॥
सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥३॥
जन धन तन । वाटें लेखावें वमन ॥४॥
तुका म्हणें सत्ता । हाती तुझ्या पंढरिनाथा ॥५॥
३८.
काय दिला ठेवा । आम्हां विठ्ठलचि व्हावा ॥१॥
तुम्हीं कळलेती उदार । साटीं परिसाची गार ॥धृ॥
जीव दिला तरी । वचना माझ्या न ये सरी ॥२॥
तुका म्हणें धन । आम्हां गोमांसा समान ॥३॥
३९.
मुंगी आणि राव । आम्हां सारखाची जीव ॥धॄ॥
गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥धृ॥
सोनें आणि माती । आम्हां समान हें चित्तीं ॥२॥
तुका म्हणें आलें । घरां वैकुंठ सगळें ॥३॥
४०.
आम्ही तेणें सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी॥१॥
तुमचें येर वित्त धन । तें मज मृत्तिकेंसमान ॥धृ॥
कंटी मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥२॥
म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥३॥
४१.
पाइकीचें सुख पाइकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटीं ॥१॥
येतां गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षता अपार वृष्टी वरी ॥धृ॥
स्वामीपुढे व्हावे पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी॥२॥
पाइकांनी सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥३॥
तुका म्हणें या सिध्दांताच्या खुणा । जाणे तो शहाणा करी तो भोगी ॥४॥
४२.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आफ्ण चि देव होय गुरू ॥१॥
पढिये देहभावें पुरवितो वासना । अतीं तें आपणांपाशीं न्यावें ॥धृ॥
मागे पुढे उभा राहें सांभाळीत । आलिया आघात निवारावें ॥२॥
योग क्षेम जाणे जड भारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥
तुका म्हणें नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥
४३.
मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य | वांटा लाभे त्यास केल्या
अर्धकर्माचा ॥१।
द्रव्य वेचावे अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । नेदावा हा पुत्र उत्तमयाती पोसना
॥धृ॥
बीज न पेरावें खडकीं ओल नाही ज्याचें बुडखीं । थीतां ठके सेखी पाठी लागे दिवाण ॥२॥
गुज बोलावे संतांशी पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी वाटा पावें कर्माचा
॥३॥
शुद्ध कसूनि पाहावें वरि रंगा न भुलावें । तुका म्हणें घ्यावें जया नये तुटी तें
॥४॥
४४.
याजसाठी वनांतरा । जातो सांडुनियां घरां ॥१॥
माझें दिठावेल प्रेम । बुद्धी होइल निष्काम ॥धृ॥
अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥२॥
तुका म्हणे अहंब्रह्म । आड येऊं नेदीं भ्रम ॥३॥
४५.
सद्गुरुरायें कृपा मज केली। परि नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥
सापडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥धृ॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥
काहीं कळहे उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा जाली ॥४॥
राघवचैतन्य केशवचैतन्य सांगितली खूण माळिकेची ॥५॥
बाबाजी आपले सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥६॥
माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगिकार तुका म्हणे ॥७॥
४६.
नाहीं म्या वंचिला मंत्र कोणापाशी । राहिलों जिवासीं धरुनि तो ॥१॥
विटेवरी भाव ठेवियलें मन । पाउलें समान चिंतीतसें ॥धृ॥
पावविला पार धरिला विश्वास । घालूनियां कास बळकट ॥२॥
तुका म्हणे मागें पावले उद्धार । तिहीं हा आधार ठेविलासे ॥३॥
४७.
नेणें फुकों कान । नाहीं एकांतींचें द्न्यान ॥१॥
तुम्ही आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥धृ॥
नाही देखिला तो दोळां । देव दाखवू सकळां ॥२॥
चिंतनाच्या सुखें । तुका म्हणें नेणें दु:खें ॥३॥
४८.
आपला यो एक देव करुनी घ्यावा । तेणें विण जीवा सुख नव्हें ॥१॥
तें तीं माइकें दु:खाची जनितीं । नाही आदिअंतीं अवसान ॥धृ॥
अविनाश करी आपुलिया ऐसें । लावी मना पिसें गोविंदाच्या ॥२॥
तुका म्हणें एका मरणें चि सरें । उत्तम चि उरे कीर्ती मागें ॥३॥
४९.
माझा पहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥
बोलविलें तें चि द्यावें । उत्तर व्हावें तें काळीं ॥धृ॥
सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद म्हणियारा ॥२॥
तुका म्हणें धीर केला । तेणें याला गोविलें ॥३॥
५०.
हा गे माझा अनुभव । भक्तिभाव भाग्याचा ॥१॥
केला ऋणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥धृ॥
घालोनिया भार माथा । अवघी चिंता वारली ॥२॥
तुका म्हणें वचन साटीं । नाम कंठीं धरोनि ॥३॥
५१.
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकदें जातो हरी ॥१॥
मनें सहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥धृ॥
सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुलती ॥२॥
तुका म्हणें ठेवी तैसें । आम्हीं राहों त्याचें इच्छें ॥३॥
५२.
आम्हीं घ्यावें तुझें नाम । तुम्हीं आम्हां द्यावें प्रेम ॥१॥
ऐसें निवडिलें मुळीं । संतीं बैसोनि सकळीं ॥धृ॥
माझी डोई पायांवरीं । तुम्ही न धरावी दुरे ॥२॥
तुका म्हणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥३॥
५३.
संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाही तळमळ दु:ख लेश ॥१॥
तेथे मी राहीन होवोनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥धृ॥
संतांचिये गांवीं वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥
संतांचे भोजन अमृताचें पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥
संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साटीं घेती देती ॥४॥
तुका म्हणे तेथे आणिक नाही परी । म्हणोनि भिकारी जालों त्यांचा ॥५॥
५४.
भक्तिप्रेमसुख नेणवें आणिकां । पंडित वाचकां द्न्यानियांसी ॥१॥
आत्मनिष्ठ जरीं जाले जीवन्मुक्त । तरी भक्ति सुख दुर्लभ त्यां ॥धृ॥
तुका म्हणे कृपा करील नारायण । तरीच हें वर्म पडे ठायीं ॥२॥
५५.
उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्ती धरावा ॥१॥
नयें जाऊ पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥धृ॥
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥२॥
तुका म्हणें रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥३॥
५६.
आतां तरी पुढें हा चि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पायां माझें दंड्वत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥धृ॥
हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥
५७.
काय तो विवाद असो भेदाभेद । सधा परमानंद एक भावें ॥१॥
निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारी पांहीत लवलाहीं ॥२॥
तुका म्हणे भावभक्ति हे कारण । नागवी भूषण्दंभ तो चि ॥३॥
५८.
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥
बरे सेवन उपकारा । द्यावे द्यावे या उत्तरा ॥धृ॥
सरळ आणि मृद । कथा पाहावी तें ऊर्ध ॥२॥
गात जात तुका । हा चि उपदेश आइका ॥३॥
५९.
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळी कन्यापुत्र होतीं जीं सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥धृ॥
गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥२॥
तुका म्हणें मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥
६०.
भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरी हा सुलभ उपाव ॥धृ॥
आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥२॥
मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥३॥
वेची तें वचन । जेणें राहें समाधान ॥४॥
तुका म्हणें फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥
६१.
इतुले करी भलत्या परी । परद्रव्य परनारी ।
संडुनि अभिलाष अंतरीं । वर्ते वेव्हारीं सुखरूप ॥१॥
न करी दंभाचा सायास । शंती राहे बहुवस ।
जिव्हे सेवी सुगंधरस । न करी आळ्स रामनामीं ॥२॥
जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा ।
संग न धरावा दुर्जनांचा । करी संतांचा सायास ॥३॥
करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास ।
तृष्णा अडविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥
धरुनि विश्वास करीं धीर । करितां देव हा चि निर्धार ।
तयाचा वाहे योगक्षेमभार । नाही अंतर तुका म्हणे ॥५॥
६२.
जावे बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥
कांहीं न कळें तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥
कवतुकासाठी भक्त देहावरि । आणिताहे ह्री बोलावया ॥३॥
यासि नाव रूप नाहीं हा आकार । कळला साचार भक्त्त मुखें ॥४॥
मुखें भक्त्तांचिया बोलतो आपण । अम्गसंगें भिन्न नाहीं दोघां ॥५॥
दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥
तयासी घडलीं सकळ ही पापें । भक्तांचिया कोपें निंदा द्वेषें ॥७॥
द्वेषियांचा संग न घडावा कोणा । विष जेवीं प्राणां नाश करी ॥८॥
करितां आइके निंदा या संतांची । तया होती ते चि अध:पात ॥९॥
पतन उद्धर संगाचा महिमा । त्यजावें अधमा संत सेवीं ॥१० ॥
संतसेवीं जोडे महालाभरासी । तुका म्हणे यासि नाश नाहीं ॥११॥
६३.
जोडोनिया धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥धृ॥
पर उपकारी नेणें परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥२॥
हूतदया गायी पशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥३॥
शांतिरूपें नव्हें कोणाचा वाईट । वाढवी महत्व वडिलांचें ॥४॥
तुका म्हणें हे चि आश्रमाचे फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥५
६४.
धर्माचें पाळण । करणे पाषांड खंडण ॥१॥
हें चि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥धृ॥
तीक्ष्ण उत्तरें । हाती घेऊनि बाण फिरे ॥२॥
नाही भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥३॥
६५.
नव्हों वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥१॥
कुपथ्य करुनी विटंबावे रोगी । का हे सलगी भीड त्याची ॥धृ॥
तुका म्हणे लासूं फांसूं देऊं डाव । सुखाचा उपाव पुढे आहे ॥२॥
६६.
भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग । द्न्यान ब्रह्मीं भोग ब्रह्मतनु ॥१॥
देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥धृ॥
उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक । एकविण एक कामा नये ॥२॥
तुका म्हणे मज केले ते चाचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥
६७.
घोटवीन लाळ ब्रह्मद्न्यान्या हातीं । मुक्तां आत्मस्थिती संडवीन ॥१।
ब्रह्मभूत होते कायाच कीर्तनीं । भाग्य तरी ऋणीं देवा ऐसा ॥धृ
तीर्थ भ्रमकासी आणीन आळस । कडू स्वर्गवास करिन भोग ॥२॥
सांडवीन तपोनिधा अभिमान । यद्न्य आणि दान लाजवीन ॥३॥
भक्तिभाग्यप्रेमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा ॥४॥
धान्य म्हणवीन येहें लोकीं लोकां । भाग्य आम्हीं तुका देखियेला ॥५॥
६८.
न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडें चित्त दु:खी होतें ॥१॥
काय तुम्ही येथे नसालसे जाले । आम्ही न देखिलें पाहिजें हें ॥धृ॥
परचक्र कोठें हरिदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥२॥
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें जालें ॥३॥
६९.
बोलतो निकुरें । नव्हेत सलगीची उत्तरें ॥१॥
माझें संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥धृ॥
अंगावरी आलें । तोंवरी जाईल सोसिलें ॥२॥
तुज भक्तांची आण देवा । जरि तुका येथे ठेवा ॥३॥
७०.
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरां जावें तुम्हीं ॥१॥
कर्म धर्में तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥धृ॥
वाढ्वुनि दिला एकाचियें हातीं । सकळ निश्चिंती जाली तेथें ॥२॥
आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥३॥
वढवितां लोभ होईल उसीर । अवघीच स्थीर करा ठायीं ॥४॥
धर्म अर्थ काम जाला एकें ठायीं । मेळविला जिहीं हातां हात ॥५॥
तुका म्हणें आता जाली हेवि भेतीं । उरल्या त्या गोष्टीं बोलावया ॥६॥
७१.
आम्हीं जातों तुम्हीं कृपा असों द्यावीं । सकळां संगावी विनंती माझी ॥१॥
वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलवितो॥२॥
अंतकाळी विठो आम्हांसि पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥३॥
७२.
अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥
ऐसियांचा संग देई नारायणा । बोलावा वचन जयांचिया ॥धृ॥
उत्तम सेवन सितळ कंठासी । पुश्टी कांती तैसी दिसे वरी ॥२॥
तुका म्हणें तैसे होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥३॥
**************************************************************************
परिशिष्ट २.
रामेश्वरभट यांचे अभंग.
-------------------------------
७३. (१०७९}
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं ।
ऐसिय़ा अनंतामाजी तू अनंत । लीला वेश होत जगत्राता ॥१॥ ॥धृ॥
ब्रह्मानंद तुके तुळे आलातुका । तो हा विश्वसखा क्रीडे जनीं ॥ऽ॥
शाखा शिष्ताचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियली।
देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविण योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥
संत ग्रहमेळि जगधंद्यागिळी । पैल उदयाचळी भानु तुका ।
सत वृंदें तीर्थ गौतमी हरिकथा ।तुकयानर सिंहस्ता भेटों आली ॥३॥
शाती पतिव्रते जाले परि नयन । काम संतर्पण निष्कामता ।
क्ष्मा क्षमापणें प्रसिद्ध प्रथा जगीं । तें तों तुझ्या अंगी मूर्तीमंत ॥४॥
दया दीनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ती तुझी ।
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्व भूतें ॥५॥
अधर्म क्षयव्याधि धर्माशी स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ति ।
ब्रह्म ऐक्यभावें भक्ति विस्तारली । वाक्यें सपळ केलीं वेदविहितें ॥६॥
देहबुद्धी जात्या अभिमानें वंचलो । तें मी उपेक्षिलों न पाहिजें ।
न घडों याचें पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥
७४. (१०८०)
पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परि सरी न पवती तुकयाची ।
शास्त्र ही पुराणें गीता नित्य नेम । वाचिताती वर्म न कळे त्यांसी ॥१॥।धृ॥
कर्म अभिमानें वर्ण अभिमानें । नादलें ब्राह्मण कलियुगीं ॥ऽ॥
तैसा नव्हें तुका वाणी व्यवसाई । भाव त्याचा पायीं विठोबाचॆं ।
अमृताची वाणी वरुषला शुद्ध । करी त्या अशुद्ध ऐसा कोण॥२॥
चहूं वेदांचें हें केलें विवरण अर्थ हि गहन करुनिया ।
उत्तम मध्यम कनिष्ट वेगळे। करुनि निराळे ठेविले ते ॥३॥
भक्तिद्न्याने आणि वैराग्यॆं आगळा । ऐसा नाहीं डोळा देखियेला ।
जप तप यद्न्य लाजविली दानें । हरिनाम कीर्तनें करुनियां ॥४॥
मागें कवीश्वर जालें थोर थोर । नेलें कलिवर कोणें सांगा ।
म्हणें रामेश्वर सकळा पसोनि । गेला तो विमानि बैसोनियां ॥५॥
७५. (१०८१)
माझी मज आली रोकडी प्रचित । होऊनि फजित दु:ख पावें ॥१॥ ॥धृ॥
कांहीं द्वेष त्यांचा करितां अंतरीं । व्यथा या शरीरीं बहुत जाली ॥ऽ॥
द्न्यानेश्वरें मज केला उपकार । स्वप्नीं सविस्तर सांगितलें ॥२॥
तुका सर्वां श्रेष्ठ प्रिय आम्हां थोर । कां जे अवतार नामयाचा ॥३॥
त्याची तुज काही घडली रे निंदा । म्हणोनि हे बाधा घडली तुज ॥४॥
आतां एक करीं सांगेन ते तुला । शरण जाई त्याला निश्चयेशीं ॥५॥
दर्शनें चि तुझ्या दोषा परिहार । होय तो विचार सांगितला ॥६॥
तो चि हा विश्वास धरूनि मानसीं । जाय कीर्तनासी नित्य काळ ॥७॥
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमॆं । जालें हें आराम देह माझें ॥८॥
७६. (१०८२)
वैष्णवांची याती वाणी जो आपण । भोगी तो पतन कुंभपाकीं ॥१॥ ॥धृ॥
ऐशी वेद श्रुति बोलती पुराणें । नाहीं तें दुषण हरिभक्ता ॥ऽ॥
उंच निंच वर्ण न म्हणावा कोणी । जें कां नारायणीं प्रिय जालें ॥२॥
चहूं वर्णासी हा असे अधिकार । करितां नमस्कार दोष नाहीं ॥३॥
जैसा शालिग्राम न म्हणावा पाषाण । होय पूज्यमान सर्वत्रासीं ॥४॥
गुरु परब्रह्म देवांचा तो देव । त्यासी तो मानव म्हणूं नये ॥५॥
म्हणें रामेश्वर नामिं जे रंगले । स्वयें चि ते जाले देवरूप ॥६॥
********************************************************************************
|
|