अभंग गाथा
 
चरित्र
 
लेख
 
रंगभूमी
 
विश्व कोश
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
   
देहू दर्शन
 
कला दालन
 

पालखी प्रस्थान

 
मुख्य पान
 

Font Problem

श्रीधर महाराज मोरे - दिलीप पुरुषोत्तम चित्रे

    अण्णा , म्हणजे श्रीधर महाराज मोरे , हे तुकोबांचे मधले पुत्र विठ्ठल महाराज यांचे थेट वंशज . तुकोबांची पालखी त्यांचे धाकटे पुत्र नारायण महाराजांनी सुरु केली आणि तिचा इतिहास श्रीधर महाराज आणि त्यांचे थोरले पुत्र डॉ. सदानंद मोरे यांनी एका पुस्तिकेत नोंदून ठेवलेला आहे. अण्णा माझे मित्र सदानंद मोरे यांचे वडील म्हणून मी त्यांना "अण्णा" आणि त्यांच्या पत्‍नींना "आई" म्हणून संबोधू लागलो. त्यांच्या तीन मुली मुक्‍ता, प्रज्ञा आणि श्रुती आणि धाकटा मुलगा विवेकानंद या सर्वांशीच आमचे कौटुंबिक संबम्ध जुळले.

 

    "पुन्हा तुकाराम" आणि "सेज तुका " ह्या माझ्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा शेवटचा खर्डा लिहीत असताना मी वारंवार देहू गावाला जाऊन अण्णांशी चर्चा करु लागलो कारण अण्णा हे वारकरी परम्परेचा बोलता-चालता इतिहास आहेत असे सदानंदकडून मला कळले होते.पुरुषोत्तम मंगेश लाड, बा.ग. परांजपे, भालचंद्र पंढरीनाथ बहिरट, वा.सी. बेंद्रे अशा अनेक अभ्यासकांनी श्रीधरबुवा मोरे नावाच्या कोशाचा उपयोग केला होता. अण्णा प्रसिध्दीपराङ्‍मुख होते . ते मितभाषी होते पण तुकोबांचा आणि वारकरी सांप्रदायाचा उल्लेख होताच ते बोलके होत.

 

    तुकोबांचे जन्मक्षेत्र आणि कार्यक्षेत्र देहू गाव. अण्णांचे एक पूर्वज नारायण महाराज यांनी तेथे तुकोबांचे वृंदावन आणि विठ्ठल मंदिर बांधले ; त्या मंदिराचा सभामंडपही बांधला. पुढे देवळाभोवतीची भिंत , दरवाजे, राम मंदिर वगैरे बांधकाम तुकोबांचे भक्‍त सरदार इंगळे पाटील यांनी करवून घेतले . देऊळवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला जी चढण आहे, ती " तुकाराम महाराजांचे राहाते घर" अशी पाटी असलेल्या इमारतीपाशी थांबते. ही इमारत जरी विसाव्या शतकाच्या सुरवातीला बांधलेली असली तरी त्याच जागेवर सतराव्या शतकांतले तुकोबांचे मूळ घर होते. ह्याच घरात अण्णा आजन्म राहिले. येथेच त्यांनी संसार केला. राहात्या घराचा पुढील भाग एक ओवरी आणि मंडप आहे, आणि त्यात तुकोबांची पूर्णाकृती मूर्ती आहे. ही मूर्ती जणुकाय विठोबाचेच प्रतिबिंब आहे.

 

    त्यांच्या हयातीत अण्णा ’तुकाराम महाराजांच्या राहात्या घराचे’च नव्हे तर देहू गाव आणि त्याच्या परिसराचा एक केंद्र बिंदु होते. आपल्या वंश परंपरेचा कोठलाही गैरफायदा न घेता त्यांनी ती आपल्या काळात जिवंत आणि जागरुक ठेवली. सदानंद मोरे यांच्या संशोधनात आणि लेखनात प्रेरणेचा भाग अण्णांकडून आला, तर शिक्षण आणि विद्येच्या महत्वाकांक्षेचा भाग त्यांच्या आईच्या काळे घराण्यातल्या सत्यशोधक चळवळीच्या संस्कारांमधून, असा माझा कयास आहे. परिणामी अण्णांनी जी पुस्तके लिहिली नाहीत, पण ज्यांच्या पाठीशी त्यांच्या परंपरेवरील अढळ श्रध्दा होती , ती सदानंदकरवी लिहिली गेली. बाप-लेकांचे इतके दृढ नाते क्वचितच पहायला मिळते.

 

    अण्णांचे देहू गावावर अपरिमित प्रेम होते. देऊळवाडा, गोपाळपुरा, इंद्रायणीचा डोह, भैरवनाथाचे मंदिर, चोखोबंचे मंदिर, येलवाडी, भंडारा डोंगर, भामचंद्राचा डोंगर ह्या स्थळांची अण्णांनीच मला महती सांगितली. भंडारा डोंगराच्या उतारावर तुकोबांचे ’कपाट’ आहे. ह्या बौध्द विहारात तुकोबांनी चिंतन , मनन आणि अभंगलेखन केले. मी वारंवार तिथे जात असे. परतीच्या वाटेवर अण्णांच्या घरी आईंच्या हातचा चहा पीत असे. प्रत्येक वेळी अण्णा मला ’कपाटा’ची नवी माहिती व तपशील सांगत . तुकोबांचा दिनक्रम आणि चरित्रपटच ते माझ्या डोळ्यांपुढे उभा करत.

 

    अण्णा थकत चालले होते. अखेरचे काही दिवस ते अंथरुणावर पडून असत. नामस्मरणावर सर्व लक्ष्य केंद्रित करून असत. ते आता लवकरच जाणार याची चाहूल आम्हाला लागली होती. अखेर अण्णा गेल्याची बातमी कळली. पुण्यातले त्यांचे सगे सोयरे, स्नेही , संबंधी देहू गावाकडे रवाना झाले. त्यात आम्ही पती-पत्‍नी होतो. सदानंद रडवेले झाले होते. आई विठ्ठलनामाचा जप करत अंगणात उभ्या होत्या. सगळा देहू गाव आणि बाहेरगावची पुष्कळ मंडळी जमली होती.मोरेंच्या घरापासून इंद्रायणीचा घाट लांब नाही. अण्णांची अंत्ययात्रा तिथे पोहचल्यावर मी एकदा सदानंदच्या पाठीवर हात ठेवून, "धीराने घ्या " असे पुटपुटलो.

 

    क्षेंत्री जन्म, क्षेंत्री जीवन, क्षेंत्री मरण याचा पारंपरिक महिमा आम्हा आधुनिकांना कळत नाही. आम्हाला श्रध्देची देणगी मिळालेली नसते. ’पुन्हा तुकाराम’ आणि ’ सेज तुका’ ह्या पुस्तकांच्या प्रती अण्णांच्या चरणी ठेवण्यासाठी मी देहू गावी गेलो होतो. मला अण्णांनी आशिर्वाद दिला तो तुकोबांचा एक अभंग म्हणून. नंतर ते म्हणाले, " तुकोबांचे खरे वंशज तुम्ही. तुम्ही त्यांचा झेंडा जगभर फडकावला." ही अतिशयोक्‍ती ऐकून मी लज्जित झालो. तरीही अण्णांच्या त्या अभिप्रायाचा मला आजतागायत अभिमान वाटतो.