देहू दर्शन :


संकल्पना व छायाचित्र - संदीप आपटे
विठोबा-रखुमाई :
गरुडाचे वारिके कासे पीतांबर ।
सांवळे मनोहर कै देखेन ॥१॥
बरवया बरवंटा घनमेघ सावळा ।
वैजयंतीमाळा गळा शोभे ॥२॥
मुकुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ ।
कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ॥३॥
श्रवणी कुंडले नक्षत्रे शोभती ।
रत्नप्रभा दीप्ती दंतावळी ॥४॥
ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ ।
वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ॥५॥
उध्दव अक्रूर उभे दोही कडे ।
वर्णिती पवाडे सनकादिक ॥६॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा ।
तोची माझा सखा पांडुरंग ॥७॥

तुकोबांचे आठवे पूर्वज श्रीविश्वंभर बुवा एकनिष्ठ वारकरी होते. महाराष्ट्रात श्रीविठ्ठलाची उपासना एवढी सुंदरतेने प्रज्वलित झाली की, मूळचा हा कानडा विठ्ठल, अगदी प्राकृत मऱ्हाठा होऊन राहिला. भोळेभाळे वारकरी त्या सुंदर ध्यानाकडे पाहता पाहता संसार हरपून त्याच्या भेटीसाठी श्रीनामयाच्या आर्ततेने वारंवार पंढरीला येऊ लागले. विश्वंभर बुवांनी देवाला पाहून हृदयात एवढासाठविला की, विश्वंभराचे घर आणि कुळ सारेच आपलेसे करावे, असे विठ्ठलालाही वाटू लागले. तो विश्वंभर बुवांच्या स्वप्नात जाऊन ‘मी तुझ्याकडेच वस्तीला येतो’ म्हणून ‘आपण आंबियाच्या वनांत झोपलो आहोत’ असा दृष्टांत दिला.विश्वंभरबुवांनी गावकऱ्यासहित तेथे जाऊन हातांनी जागा उकरली. तो बुक्क्याचा सुगंध सुटून तुळशी-फुलेही विखुरलेली आढळली, आणि नंतर हल्लीचे देहूतले श्रीतुकोबारायांच्या प्रीतीतले ध्यान रुक्मिणी मातु:श्रीसह प्रगट झाले. मोठया समारंभाने बुवांनी विठूची प्रतिष्ठापना कुळपूज्य देव म्हणून केली.
हल्लीच्या देवळापूर्वी या मूर्ती तुकोबांच्या पूर्वजांच्या राहत्या घरी होत्या असे समजते. अशा रमणीय स्थळी विश्वंभर बुवांनी आपल्या कुळाची राखण करण्यासाठी स्थिर केला आणि आपण यथाकाल त्याच्या चरणी विलीन झाले.

भंडारा :
अंतरीचा रंग उमटेल व सादावील असे तुकोबांचे जीवन होते. त्यांचा दिवसातला पुष्कळसा काळ भंडारा डोंगरावर जात होता .भंडारा हे त्यांचे विशेष आवडीचे ठिकाण होते. दिवसभर तेथे अंगी रस भिनला म्हणजे देवभक्त आणि नाम यांचा संगम असलेल्या कथाकीर्तनरूपाने सकळ जनासहित ते सुख भोगावयाला, वाटावयाला गावात येत. भंडारा व भोवतालच्या परिसरात वृक्षवल्लीच्या सहवासात ते आत्मानंद गात विहरू लागले.

ध्यानी योगीराज बैसले कपाटी । लागे पाठोवाटी तयांचिया ॥१॥
तान भुक त्यांचे राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥२॥
कोण सखे तया आणीक सोयरे । असे त्या दुसरे हरीविन ॥३॥
कोण सुख त्यांच्या जिवासी आनंद । नाही राज्यमद घडी तया ॥४॥
तुका ह्मणे विष अमृता समान । कृपा नारायण करिता होय ॥५॥


वृक्ष वल्ली आह्मा सोयरी वनचरे । पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु॥३॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवू रुची ॥४॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी ॥५॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥


मंदीर परिक्रमा:
बहेणाबाई शिऊरकर (इ.स. १६५० ते १७००)
बहेणाबाई देहूला मुक्कामी असता, त्यांनी मंबाजी यांचे शिष्य होण्यास नकार दिल्यावर, मंबाजीने चिडून बहेणाबाईंची कपिला गाय चोरली व घरात ठेवून तिला मारले. कपिला गाईला पाठीवर मारल्याचे वळ तुकोबांच्या पाठीवर उठले. पुढे मंबाजीच्या घरी आग लागली तेव्हा लोकांनी कपिला सोडवून आणली.तुकोबांच्या पाठीवरील वरील वळ व कपिलाच्या अंगावरील वळ सारखेच आहेत हे पाहून रामेश्वर भट यांना गहिवरून आले.

रामेश्वर भटे ऐकिला वृत्तांत । धावोनी त्वरीत तेथे आले ॥१॥
तुकोबाचे तेही घेतले दर्शन । गाय तेही पूर्ण पाहियेली ॥२॥
दोहीचा पाठीचा दिसे एक भाव । रूदनी ते सर्व प्रवर्तले ॥३॥
तुकोबाचा पार वर्णीलसा कोण । कलियुगी जाण प्रल्हाद हा ॥४॥
सर्वांतर साक्षी करूनिया स्तुती । स्वमुखे रमती आपुलिया ॥५॥
बहेणी म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ॥६॥