७१
काकुलती एके पाहाती बाहेरी । तया म्हणे हरि वोसरला ॥१॥
वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥
कवतुक जाले ते काळी आनंद । कळला गोविंद साच भावे ॥३॥
भावे तयापुढे नाचती सकळे । गातील मंगळे ओव्या गीत ॥४॥
गीत गाती ओव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥५॥
वत्से गाई पशु नाचती आनंदे । वेधलिया छंदे गोविंदाच्या ॥६॥
चित्त वेधियेले गोविंदे जयाचे । कोण ते दैवाचे तयाहुनि ॥७॥
तयाहुनि कोणी नाही भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥
गोविंदाचा संग तुका म्हणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळीचे ॥९॥
४५७८ पृ ७६८ (शासकीय), ३८७९ पृ ६८४ (शिरवळकर) |