१.
फिराविली दोन्ही । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
तुटली बंधने । वसुदेव देवकीची दर्शने ॥२॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
गोकुळासी आले । ब्रम्ह अव्यक्त चांगले ॥३॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥४॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
निशी जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥५॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥६॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
तुका म्हणे कंसा । आट भोविला वळसा ॥७॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
३१० पृ ५७ (संताजी), ११५९ पृ १९५ (शिरवळकर), २८३६ पृ ४७५(शासकीय) |