तुक्याची वीणा - बाबूराव बागूल
‘जेंव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाने ६०च्या दशकात खळबळ माजवणारे फुले, आंबेडकरी विचारवंत,विद्रोही साहित्यिक बाबूराव रामजी बागूल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी नाशिक येथील विहित गाव येथे झाला.१९६० च्या दशकात मराठी साहित्यात दलित साहित्याचा प्रवास सुरू झाला.त्या प्रवाहाच्या जडणघडणीत बाबूरावांची भूमिका फार मोलाची आहे. बाबूरावांच्या साहित्यावर मार्क्सवादाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव होता. त्यांचे आयुष्य तसे कष्टातच गेले. पेट्रोलपंप, रेशन दुकानात, रेल्वेत कुली अशी कामे करत करत अखेर सुरतेत रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरी लागली खरी, पण जात आडवी आली. कारण त्यांना कोणी राहायला घरच देईना. अखेर जात चोरून सुरतेत काही दिवस राहिले. या अनुभवावरच ‘जेव्हा मी जात चोरली’ या कथासंग्रहाने खळबळ माजली. यानंतर ते लिहितच राहिले. ‘मरण स्वस्त आहे’ हा कथासंग्रह, 'आंबेडकर भारत १ आणि २' हे जातककथांच्या रूपात मांडलेले बाबासाहेबांचे चरित्र, सूड, अघोरी, पाषाण, अपूर्वा या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या साहित्यातून बंडाची, नवनिर्माणतेची भाषा असते. ‘वेदा आधी तू होतास, वेदांच्या परमेश्वराआधी तू होतास’ या त्यांच्या कवितेनेही खळबळ माजवली. ‘हे माणसा’ ही त्यांची कविताही गाजली. त्यांच्या वाट्याला इतकी दु:खं आली तरीही ‘अरे ती माझी बंदूक तरी द्या, नाही तर तुक्याची वीणा तरी द्या, गावोगावी जाईन म्हणतो.....,या वीणेवर क्रांतीची कीर्तने गाईन म्हणतो.’ असे म्हणून मुंबई सोडली ती कायमचीच. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले, तरीही कोणाची हांजी हांजी करणे हा त्यांचा स्वभाव नसल्याने त्यांचे म्हणावे तसे कौतुक झाले नाही. त्यांच्या निधनाने एक युगप्रवर्तक साहित्यिक हरपला. २६ मार्च २००८ रोजी त्यांचे निधन झाले. - संजय शा. वझरेकर.