वामांगी - अरुण कोलटकर

       आपल्या आधुनिकतेची पाळेमुळे भक्ती परंपरेत शोधणारे मर्ढेकरोत्तर पिढीतले महत्त्वाचे कवी अरुण कोलटकर (१९३२-२००४) यांचा जेजुरी इंग्रजी कविता संग्रह अमेरिकेतील प्रतिष्ठित प्रकाशन संस्था द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सतर्फे त्यांच्या अभिजात साहित्य मालेत प्रकाशित झाला आहे. या मालेत डांटे, हेनरी जेम्स, चेकॉव व पुशकिन आहेत.
       वैश्विक पातळीवर जाणाऱ्या मराठीतल्या मोजक्या कवींमध्ये कोलटकर होते. प्रवाही व विचारपूर्वक मांडणी हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यातून प्रसवणारी कविता एक संपूर्ण भावचित्राचे दर्शन घडविते. त्यामूळे त्यांची कविता विश्लेषक बुध्दीला अधिक भिडणारी आहे.
       Poetry India १९६६ च्या अंकात त्यांचे तुकाराम - ९, मुक्ताई -३ व जनाबाई - १ यांचे अभंगाचे अनुवाद आहेत. पुढे १९९५ मध्ये डच भाषेत 'Een Tuiltje Tukaram' या पुस्तिकेत लिओ व्हॅन दर झाल्म या कवीने कोलटकरांनी केलेले तुकारामांचे अनुवाद डच भाषेत आणले.
       कोलटकरांवर तुकारामांचा प्रभाव होता.अशोक शहाणेंशी बोलता बोलता कोलटकर म्हणाले होते, “विठोबाची न् आपली डायरेक्ट ओळख नाही, तुकारामाची न् आपली आहे, अन् तुकाराम विठोबाला ओळखत होता.” त्यांच आणखी एक विधान मोठ मार्मिक होत “मरण पुढ उभ ठाकलेल असताना माणसान मोठ्ठ्यान हसाव अशी तुकारामांची कविता आहे.” अशोक शहाणे म्हणतात “हे कुणा समीक्षकाला सुचण दुरापास्त आहे. तिथ जातिवंत कवीच हवा.अरुणन तुकारामांचा रोखठोकपणा लावून धरला. इतका, की अरुणच्या बहुतेक कविता प्रत्यक्ष घटनांवर किंवा प्रत्यक्ष माणसांवर रचलेल्या आढळतात.”
       मराठी संस्कृतीचे अभ्यासक जर्मनीचे गुंथर सोन्थायमर (१९३४-१९९२) यांनी हेन्निंग स्टेगम्यूलर यांच्या सहकार्याने त्यांनी निर्मित केलेल्या 'वारी'(१९८९) या लघुपटात कोलटकरांचे तुकारामांचे दोन अनुवादित अभंग घेतले आहेत. सोन्थायमर यांनी अतिशय मौलिक विवेचन केलेल आहे. ते म्हणतात “मराठी संस्कृती असेपर्यंत तुकारामांची मराठी भाषा असणार आहे. आजही अरूण कोलटकर सारखे कवी मराठीत आहेत.त्यामुळे काळजीच कारण नाही.” - दिलीप धोंडे.


वामांगी

देवळात गेलो होतो मधे
तिथ विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट

मी म्हणालो ऱ्हायल
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोक ठेवायच

पायावर ठेवलेल डोक
काढून घेतल
आपल्यालाच पुढ माग
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठ गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठ गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला











मी परत पाह्यल
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथ
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकड जरा
होत नाही

कधी येतो कधी जातो
कुठ जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कस कुणी
सांगितल नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आल
अठ्ठावीस युगांच
एकटेपण

कवितसंग्रह - चिरीमिरी
सौजन्य : प्रास प्रकाशन

प्रकाशित काव्यसंग्रह :
मराठी:
अरूण कोलटकरच्या कविता (१९७७)
चिरीमिरी (२००४)
भिजकी वही (२००४)
द्रोण (२००४)

इंग्रजी:
Jejuri
Kala Ghoda Poems
Sarpasatra
The Boatride

पुरस्कार:
साहित्य अकादमी पुरस्कार २००५,
भिजकी वही काव्यसंग्रहासाठी.
मराठवाडा सहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार.
बहिणाबाई पुरस्कार.
राष्ट्रकुल काव्य पुरस्कार १९७६.