तुको बादशहा - श्रीकृष्ण राऊत

श्रीकृष्ण राऊत यांनी मराठी कवितेत देशीय जीवन-जाणिवांच्या अंगाने काही प्रयोग केले आहेत. कवितेच्या अभिव्यक्तीचे निरनिराळे छंद, वृत्ते हाताळली. मुक्तछंदातही प्रयोगशीलता दाखविली. महाराष्ट्रात मराठी कवितेच्या छंदवृत्ती अंगांचा आणि काव्यनिर्मितीच्या अंगांचा खोलवर अभ्यास असणारे जे मोजके कवी आहेत, त्यात श्रीकृष्ण राऊतांचा समावेश करावा लागतो. कवितेची मांडणी आणि कवितेची निर्मिती ह्यांचा जाणीवपूर्वक विचार करणारा हा कवी सलगपणे काव्यनिर्मिती करूनही मराठी काव्यक्षितिजावर ठळकपणे उमटला नाही. कारण कोणत्याही एका विशिष्ट साच्यात या कवीने आपली कविता ओतली नाही. आशय, मांडणी आणि विचारसरणीच्या कोणत्याही गटाचे सदस्यत्व धारण केले नाही. विविध छंदाचे प्रयोग करून, आजच्या काळाला जिवंत करण्याचा ह्या कवीचा ध्यास, कवितेविषयी सजग नसलेल्या मराठी बाण्याने, कधी लक्षात घेण्याचा प्रयत्नच केला नाही.तुकोबांच्या देशीय काव्य परंपरेशी भिडण्याचा आजवर अनेक मराठी आणि मराठी भाषेतर कवींनी प्रयत्न केला. मधुकर केचे, दिलीप चित्रे आणि श्रीकृष्ण राऊत अशी मराठी भाषेतील कवींची उदाहरणे देता येतील. श्रीकृष्ण राऊतांची कविता म्हणजे तुकोबांच्या काव्याभिव्यक्तीचे आधुनिक काळातील पुनरूज्जीवन होय. कोणत्याही पद्घतीने स्थिरत्व न पावलेला हा कवी ताकदीचा असूनही दुर्लक्षित राहिला. 'तुको बादशहा' ही कविता, तुकोबा परंपरेत काव्यनिर्मिती करण्याचा मूलभूत प्रेरणा-स्त्रोत म्हणून ह्या कवितेकडे पाहता येते.तुकोबांच्या वाट्याला आयुष्यभर मंबाजींसारख्यांचा-विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी-छळ आणि दु:खाचा भोगवटा आला. कविता हा शुद्घ आणि निखळ वाङ्मय प्रकार असून कवितेच्या निर्मितीचे लक्षण हे दु:खमूळ असल्याचा आजवरचा इतिहास आहे. वाल्मिकी पासून तर तुकोबांच्या काव्यनिर्मितीची साक्ष देता येते. कवी तुकोबांच्या दु:खमुळांशी भिडला आहे. तुकोबा हे संतकवी आणि महाकवी होते, म्हणून जगाच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले. समाजाच्या कळवळ्याचे अनुभवामृत असलेल्या शब्दकळेचा स्वीकार करून, मराठीत श्रीकृष्ण राऊतांची कविता तुकोबांच्या अभंगशैलीचे अनुसरण करून, 'तुको बादशहा' संग्रहातून प्रकटली आहे. - डॉ. किशोर सानप.


तुको बादशाह - श्रीकृष्ण राऊत


मंबाजी,
तुमचे आभार मानावे
तेवढे थोडेच.

तुमच्या वाकड्या सहाणेने
लावली शब्दांना अभंग धार
नि
वीणेला दिला
तुमच्या तेढ्या खुंटीने आधार.

तुमच्या दगडी भिंतीशिवाय
एवढा उसळलाच नसता
‘त्रिगुणांचा चेंडू’.

तुमच्या विज्ञानाने तर
कमालच केली मंबाजी,
पूर्वी त्यान
भिंतीला मोटार काय लावलीन्
रेड्याच्या मुखी स्पीकर काय बसवला.
अन्
आता
बनवलं
खास विमान
तुक्याचा देह उडवण्यासाठी.

तुम्ही असे टाचा उंचावून
त्याच्या शेजारी उभे राहिले
की तो आकाशाहूनही मोठा वाटतो.
साध्यासुध्या गावक-यांच्या
हृदय-सिंहासनावर
त्याला विराजित करण्यात
तुमचा वाटा आहे सिंहाचा
आणि
तोच आहे
तुमच्या मुक्तीचा मार्ग
मिळवा
तुमचा सानुनासिक स्वर
त्यांच्या घोषात-
बोऽल
तुकोऽबादशाहऽऽकीऽ
जयऽऽ!

*****

तुको बादशहा । देई शब्ददान ॥
करी धनवान । लेखणीला ॥

अगा शब्दराजा । होई कृपावंत ॥
ओत आशयात । पंचप्राण ॥

नामयाने तुज । सांगितले गुज ॥
पेर तेच बीज । अप्रतिम ॥

परम अर्थाची । पायाखाली वीट ॥
बसवावी नीट ।घडवोनी ॥

श्लील - अश्लीलाचा । करी तू निवाडा ॥
भाषेच्या कवाडा । उघडोनी ॥

*****

तुका झालासे प्रसन्न ।
माग म्हणे वरदान ॥

काय मागू मी बापडा ।
शब्द माझ्या कामी पाडा ॥

नको गरुडविमान ।
नको संतत्वाचा मान ॥

मोक्ष, मुक्ती घेई कोण ।
ज्यासी हुंगे ना तो श्वान ॥

आकाशीचा स्वर्गवास ।
खाऊ कशा संगे त्यास ॥

असे नको काहीबाही ।
घाल विठोबाचे पायी ॥

*****