Font Problem

       
 
 
 

तुकोबांचे अनुवादक

 
 
दिलीप पुरुषोत्तम चित्रे
जन्म - १७ सप्टेम्बर, १९३८ ( बडोदा).
मृत्यू - १० डिसेम्बर, २००९ ( पुणे).
 

कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कविश्रेष्ठ तुकोबांवरील अनन्यभक्‍तीचा आणि त्यातून उत्क्रांत झालेल्या त्यांच्या स्वत:च्या कवितेचा अन्वय...

 

        समृध्द आणि उज्ज्वल वारकरी परंपरेतील ज्ञानदेवांच्या अभंगातील राजस शब्दकळा, नामदेवांच्या रचनेचा डौलदार गोडवा, एकनाथांची खेळकर शैली, तुकोबांच्या अभंगांची सर्वंकष भाषा हे मूळ मराठीचे आदर्श आहेत. ही परंपरा आग्रही, आक्रमक, व्यक्‍तिकेंद्रित नसून, समावेशक सहिष्णुता जोपासणारी आहे. विठ्ठलाची प्रतिमा वाङ्‍मयीन निरुपणाची दृश्यबिंदू असलेली वारकरी परंपरा हीच मराठी वाङ्‍मयाची खरी परंपरा आहे आणि मराठी साहित्यिक या नात्याने आपल्याला याच परंपरेत स्थान हवे. ही परंपरा हरवली असेल तर साहित्यिक या नात्याने आपल्या अस्तित्वालाही अर्थ नाही, ही भावना कविवर्य दिलीप पुरुषोत्तम चित्रे आपल्या रचनेत व्यक्‍त करतात.
        हरवले जेथे ज्ञानदेव तुकाराम
        तिथेची मला तुम्ही द्यावा पूर्णविराम
        सूक्ष्मपणे सर्व परंपरा वसे
        तिथेची मला स्थान द्या थोडेसे
           ज्ञानदेव-तुकारामांचा धागा चित्रेंच्या साहित्यिक कारकीर्दीत प्रथमपासून अव्याहतपणे अनुस्यूत आहे. ‘श्रीज्ञानदेव : आद्य मराठी संतकवी’ हा लेख त्यांच्या लिखाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरील आहे. ‘ज्ञानदेव आणि आपण’ मध्ये चित्र्यांनी मांडलेले विचार मराठी संस्कृतीचे उगमस्थान दर्शवते. ज्ञानदेवांनी सर्वप्रथम मराठीला वाङ्‍मय भाषा म्हणून स्थान मिळवून दिले. त्याद्वारे मराठी वाङ्‍मयाच्या ज्ञानसाधनेचा पायाही त्यांनी रचला. स्त्रियांनी मौखिक परंपरेतून घेतलेली जात्यावरची ओवी ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’साठी निवडली.
        लौकिक-अलौकिकात अद्वैत आहे, असे सांगणाऱ्या ज्ञानदेवांनी धर्मनिरपेक्षता कृतीत उतरविली. अनेक वंश, धर्म, जाती, पंथ यांतून जो बहुपारंपरिक भारत तयार झाला, त्याचे प्रतिनिधित्व ज्ञानदेव करतात. संस्कृतीकडे बघण्याची व्यापक दृष्टी त्यांनी दिली. त्यांच्या कालखंडात अनेक दिग्गज कवी मराठीत एकत्र नांदताना दिसतात. चोखोबा, गोरोबा, नामदेव, सावता माळी हे वेगवेगळया बलुत्यांचे प्रतिनिधित्व करीत होते. त्या- त्या बलुत्यांची भाषा ज्ञानदेवांनी वापरली. एकसंध सर्वसमावेशक मराठी समाज कसा असू शकतो, याचे १३व्या शतकात त्यांनी दर्शन घडविले. भक्‍ती हा रसात्मक अनुभव आहे, हे प्रथम ज्ञानदेवांनी मांडले आणि तुकोबांनी ते पूर्णतेला नेले. तुकोबांची कविता हा भक्‍तीचा चिद्विलासात्मक प्रत्यय आहे आणि तो ‘अनुभवामृता’ पासून सुरू झालेल्या अव्याहत परंपरेचा उत्कर्ष आहे.
        ‘मुळात आपण मराठी कवितेकडे वळलो, याचे कारण तुकोबा’ असे चित्रे सांगतात. ‘१६ व्या वर्षी मला वाटले की, मी मराठी कवीच होणार. तेव्हा दहशत फक्‍त तुकोबांची वाटली होती. पण आज ५१ व्या वर्षी वाटते की, मराठी कवी तर मी आहेच आणि हा आपला खापर- खापर- खापर- खापर पणजोबा हा कवितेचाच पूर्वज आहे काय?’ चित्र्यांचे तुकोबा केवळ मराठी कवितेपुरते वा भाषेपुरते मर्यादित नाही, तुकोबांशिवाय आपण मुळात कवितेचीच कल्पना करू शकत नाही, असे ते सांगतात.
        १८६० ते १९६० या शंभर वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेऊन चित्रे निदर्शनास आणतात की, ‘आपली वाङ्‍मयीन संस्कृती ही मुळात वारकरी संस्कृती होती. वारकरी चळवळीचा मूळ गाभाच एकभाषिक आणि वाङ्‍मयीन समाजनिर्मितीचा होता. तिच्या स्वाभाविक पर्यावरणाचा त्याग करून आपले कवी व समीक्षक एक शतकभर पोकळीतच साहित्यव्यवहार करीत राहिले. तेव्हा तुकोबांची गाथा न वाचणे आणि आपले सांस्कृतिक अज्ञान सुरक्षित ठेवणे - हाच वरील लोकांना उपाय होता. जागतिक वाङ्‍मयाचा एक उच्चांक, त्यातले एक सर्वोच्च शिखर आपल्या परिसरात असताना त्याचा आपल्याला विसर पडला. ज्याप्रमाणे प्रत्येक शेर्पा काही एव्हरेस्ट चढून जात नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मराठीभाषी व्यक्‍ती काही तुकोबांची गाथा अनुभवत नाही, हेही खरे.’
        १९६४ मध्ये सुर्व्यांच्या ‘ऐसा मी गा ब्रह्म’ या संग्रहाचे परीक्षण करताना चित्रे लिहितात, ‘सुर्व्यांनीच काय, सर्व मराठी कवींनी तुकारामांकडे परत वळावे. मराठीत त्याहून जिवंत, सडसडीत, संपूर्णपणे अर्थस्वी कविता अन्य नाही.’ सुर्व्यांची ‘माझी आई’ ही कविता त्यांना सर्वात चांगली वाटली, कारण त्यात तुकारामी प्रामाणिक उच्चार आहे.
        स्वत:च्या कवितेची जाणीव असलेले चित्रे आपली ओळख सांगताना ‘कवी’ म्हणून सांगण्याऐवजी ‘तुकोबांचे अनुवादक’ अशी सांगतात. तुकोबांच्या कवितेचा अनुवाद करण्याची प्रेरणा का झाली, याचे स्पष्टीकरण करताना त्यांना तुकोबा कवी व मानवी अवस्थेचे वर्णन करून तिच्यावर मात करणारे - या दोन्ही नात्यांनी आजही प्रस्तुत वाटतात. तुकोबा जसे मराठी वाङ्‍मयाच्या पहिल्या पर्वातले शेवटचे व सर्वश्रेष्ठ कवी ठरतात, तसेच ते मराठी वाङ्‍मयाच्या आधुनिक पर्वातले पहिले आणि सर्वश्रेष्ठ कवी ठरतात. तुकोबा मराठीतले एकमेव संपूर्ण कवी म्हणावे लागतील. कारण कविता हेच त्यांनी आपले एकमेव आणि कायम कर्तव्य मानले.
        तुकाराम वाचताना किर्केगार्द यांची त्यांना आठवण येते. तुकोबांची पार्श्वभूमी असल्यामुळे एखार्ट, क्रुझ, ब्लेक कवींचे चांगले आकलन होणे आपणाला शक्य झाले, असाही एक अनुभव ते नोंदवतात. इतकेच काय, पण तुकोबांचे हे साम्य केवळ साहित्य क्षेत्रापुरते मर्यादित न राहता त्यांना तुकोबांची कविता आणि बाखचे संगीत यांच्यात साम्य दिसते. ‘कन्या सासुरासि जाये’ सारख्या सांसारिक जीवनातल्या काळजाला स्पर्श करणाऱ्या अभंगाची वाजीद अली शाहांच्या ‘बाबुल मोरा...’ या अप्रतिम बंदिशीशी तुलना करण्याचा त्यांना मोह होतो.
        १९७६ मध्ये अमेरिकेतील वास्तव्यात चित्र्यांनी तुकोबांच्या अनुवादाचे हस्तलिखित रशियन कवितेचा इंग्रजी अनुवाद करणारे डॅनियल वाईसबोर्ट यांना दाखविले. ते वाचून डॅनियल वाईसबोर्ट यांना तुकोबा वैश्विक महात्म्याचे कवी वाटले. विल्यम ब्राऊन, ऍंजला एल्सटोन अशा इतरही कवी-अनुवादक मित्रांना त्यांनी अनुवाद वाचायला दिले. चित्रे सांगतात, ‘यातल्या कोणाला तुकारामाची कविता जॉन डन या एलिझाबेथकालीन कवीसारखी भासली, तर कोणाला विल्यम ब्लेकसारखी, कोणी सान हुआन द ला कुझ या स्पॅनिश गूढवादी कवीशी तुकारामांची तुलना केली, तर कोणाला माइष्टर एखार्टसारख्या जर्मन गूढवादी भक्‍ताची आठवण झाली. काहींना तिच्यामुळे नित्शे, हायडेगर यांच्यासारख्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञांची आठवण झाली. या वाचकांच्या दृष्टीने तुकाराम जुना नव्हता, निव्वळ मराठी नव्हता, भक्‍तीमार्गी हिंदूही नव्हता, तर कायमचा समकालीन असा अभिजात कवी होता. त्या लोकांना ना विठ्ठल ठाऊक, ना पंढरपूर! मानवी आत्मस्थिती त्यांना ओळखता येते. कारण तिला स्थळ-काळाचं बंधन नाही.’
        वैश्विक परिप्रेक्ष्यात मराठी असण्याचे जे भान चित्रे दाखवतात, ते फार महत्त्वाचे आहे. ते केवळ वाङ्‍मयीन नसून, सांस्कृतिक आहे. तुकोबांची गाथा ही वाङ्‍मयीन महाकृती आहे आणि म्हणून मानवाच्या वैश्विक वाङ्‍मयीन वारशाचा एक भाग आहे. मराठी संस्कृतीत, मराठी भाषेत एका विशिष्ट कालखंडात तुकोबांची गाथा निर्माण झाली असली तरी तिचा संदर्भ वैश्विक आणि मानवी आहे. कारण तुकोबा स्वत:चे अनुभव वैश्विक परिप्रेक्ष्यात किंवा सार्वभौम मानवी पातळीवरच मांडतात.
        ‘पुन्हा तुकाराम’ मध्ये मराठीतल्या वाङ्‍मय-विचारांचा आणि वाङ्‍मय-अभ्यासाचा तुकाराम केंद्रबिंदू आहेत, अशी भूमिका चित्र्यांनी मांडली आहे. ‘पुन्हा तुकाराम’ आणि जर्मन भाषेतला अनुवाद ‘वोर्ट देस तुका’ (Wort des Tukaram) हे त्यांनी तुकोबांचे इंग्रजी अनुवाद ‘सेज तुका’ला (Says Tuka) समांतर असे रचलेले आहेत. एकाच वेळी तीन वेगळया संस्कृतींमधून तुकोबांच्या गाथेसारख्या वाङ्‍मयीन महाकृतीकडे येण्याचा तो प्रयत्‍न आहे. तुकोबांच्या व्यक्‍तित्वाच्या अनेक पैलूंपैकी ‘कवी असणे’ यावर चित्र्यांचा भर आहे आणि त्याद्वारे ते एका महाकवीचे दर्शन घडवितात.