प्रस्तावना
महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष तुकाराम (१६०९-१६५०) यांचे काव्य
मराठी मनाचा चिरंतन आविष्कार आहे आणि तो ज्ञानदेव-नामदेवांपासून उत्क्रांत होत आलेल्या मराठी काव्याचा
उत्कर्ष आहे.
“शुध्द बीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ॥”
शुध्द बीजापासून उगम पावलेले, त्यांच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाला वारकरी परंपरेचे अधिष्ठान लाभले व हे काव्य
मराठी संस्कृतीची गुण वैशिष्टये सारभूत होउन प्रगट झाले.
मराठी साहित्य समृध्द करणारे हे काव्य मानवी जाणिवांचा आणि मराठी संवेदन स्वभावाचा
गाभा स्पर्श करणारा तरल अविष्कार आहे. पेशाने वाणी आणि पिंडाने शेतकरी असल्यामुळे
अस्सल मराठी पोताची शब्दकळा, भाषेच्या सूक्ष्म पदरांसह तुकोबांच्या काव्यात उमटली
आहे. त्यांचे अंत:स्फूर्त शब्द मराठी भाषेच्या रसरशीतपणा मुळे, तिच्यात गर्भित
असलेल्या उर्जेमुळे अजरामर झाले. त्या द्वारे मराठी माणसाला कायमस्वरूपी काव्याचा
एक निर्मळ, नितळ, निखळ खळाळत वाहणारा झरा लाभला.
“झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥”
“तुका म्हणे झरा । आहे मुळीचाचि खरा ॥”
साडेतीन शतके उलटली तरी आजही त्यांच्या कविता आपल्याला भिडतात, आवडतात, समकालीन
वाटतात. याच महत्त्वाच कारण म्हणजे मानवी मनाचा तळ धुंडणारी आणि माणसाच्या जगण्यातील
ताणतणाव सूक्ष्मपणे टिपणारी त्यांची असाधारण प्रतिभा. कवितेवर नितांत प्रेम
करणाऱ्या या प्रतिभावंत कवीने स्वत:ला कवितेच्या ताजव्यात टाकून घेतले. आपले स्वायत्त आत्माविष्काराचे माध्यम आणि आपल्या आत्मभानाचे माध्यम कविता हेच राहिल हे जीवनध्येय ठरविले. सामूहिक मनाची अचूक संवेदना पकडणाऱ्या काव्याला नैतिक परिमाण असल्यामुळे त्यांची प्रतिभा अधिक वृद्धिंगत होते आणि हेच त्यांच्या प्रतिभेच बलस्थान आहे.
मानवी जीवनातील भावनिक कल्लोळ, मानसिक उलघाल व मूल्यांसाठी संघर्ष तुकोबांच्या
काव्यात उमटले आहेत. मराठी भाषेचा कस असणाऱ्या या काव्यातिल मानवी भावभावनांच्या तरल
व भेदक मांडणीत प्रादेशिक विशिष्टतेचे लेणे लेवूनही ते वैश्विक आशय मांडतात. चिरंतन
मानवी मूल्यांचा शोध घेत हा कवी व्यक्तिगत अनुभवांनाच वैश्विक परिमाण देऊन जातो.
त्यांच्या कवितेचा संदर्भ वर्तमान काळाशी, वर्तमान काळातील जगण्याशी आहे म्हणून ते
आजचेच आहे. त्यामुळेच त्यांची कविता देश-काल परिस्थितीच्या सीमा ओलांडून सर्वांना
आपली वाटते.
तुकोबांचे काव्य याचे आकर्षण महाराष्ट्रपुरते मर्यादित नाही.भाषा, प्रांत यांच्या मर्यादा पार करुन हे काव्य आज डॉट कॉमच्या युगात लोकांना मोलाचा ठेवा वाटत आहे. तुकाराम डॉट कॉम (www.tukaram.com) या संकेतस्थळाच्या लोकप्रियतेवरून याचीच प्रतीती येते. जगाच्या पाठीवर कुठल्याही नात्यामध्ये चपखल बसेल असे चिंतन मांडणारा या कवीची पांचही खंडात लोकप्रियता वाढत आहे. तब्बल एकशे चाळीस देशातील वाचकांनी या
संकेतस्थळाला भेट दिली आहे. पुरातन चीन, इजीप्त पासून नवनिर्मित पॅलस्टीन, बेनिन मध्ये तुकोबांच्या साहित्यात रस घेणाऱ्या या वाचकांना आजच्या काळाच्या प्रतिनिधित्व करण्याची ताकद त्यांच्या काव्यात दिसून येते.
“ऐसी कळवळयाची जाती । करी लाभेविण प्रीती ॥”
अंतिम लाभाची आशा न धरता, सर्व मानवतेविषयी जिव्हाळा असणे ही वैश्विक संस्कृती त्यांना भावते.
अखिल मानवते विषयी जिव्हाळा असणार्या या कवीने मानवी संवेदनांचे सारच जणू काव्यातून व्यक्त केले आहे. समाजातील वास्तावर आधारित , समस्यांशी निगडित थेट मनाला आकळणारे आणि हृदयाला भिडणारे त्यांचे काव्य मराठी माणसाच्या स्मृतीत शतकानुशतके तळ ठोकून आहेत. एक अनुभवी सखा, धीर देणारा सांगाती, हात धरून वाट दाखवणारा मार्गदर्शक या स्वरूपात त्यांची सोबत होते. आपल्यासारख्याच उणिवांनी ग्रासलेला या कवीने काळांतराने आंतरिक सामर्थ्याच्या बळावर आणि असामान्य कवित्वाच्या आधारे आयुष्यातल्या प्रत्येक संकटावर मात केली याचा प्रत्यय येतो. आत्मिक संघर्षातून निर्माण झालेले या काव्याचे नाते थेट जीवनानुभवाशी आहे, म्हणून ते जिवंत आहे.
तुकोबांचे कवितेचे जीवनानुभवाशी हे नाते रघुनाथ वामन दिघेंनी (१८९६-१९८०) समर्थपणे आपल्या कादंबरीत आणले आहेत.
‘पड रे पाण्या’ मध्ये संतू म्हणतो ‘‘मानसाचा अनुभव मोठा
भयंकर असतो तो मानसाला धोबीपछाड मारतो. अवो पुस्किल वेळा तुकारामबुवा बद्दलबी मला
तेच वाटत. मास्तर हा देहूचा गाडीवान खोपोलीच्या घाटातन हाळीचा धंदा करायचा. कोकणात
घाटावरन मिरची, कांदे न्यायचा आन कोकणातन घाटावर मीठ आणायचा. गाडी तळात वाटेन त्याला
लाख लोक भेटले असतील, लाख गोस्टी त्यान पाहिल्या असतील. लाख अनुभव त्येला आले
असतील. तवा त्येच्या मुखातून अभंगवाणी बाहिर पडली.’’
मुळात कवित्व करणे ही तुकारामांची सहज प्रवृत्ती आहे. “अंतरीचे धावे स्वभावे
बाहेरी । धरिता ही परी आवरे ना”. श्रेष्ठ भाषिक आविष्कार असलेल्या या काव्याचे
लोकप्रियतेचे रहस्य बोलीभाषेच्या वापरात आहे. अलंकारितेचा आश्रय न घेता अगदी
रोखठोकपणे तात्कालीन बोलीतल्या स्वाभाविक सहजसुंदर, भावपूर्ण शब्दांमध्ये
अभिव्यक्ती असल्यामुळे आशयसुलभ आहे. तुकोबांचे अभंग जितके सोपे, सरळ तितके त्यात
भावाची आर्द्रता अधिक दिसून येते. सामान्य माणसाच्या भाषिक विश्वात वावरणारे तुकाराम
जीवनाचे अंतरंग आपल्या भाषेत सांगतात ज्यामुळे तुकोबा आपल्यातलेच एक आहेत हा आंतरिक
दिलासा मिळतो. म्हणून तुकोबांची कविता महत्त्वाचीच नव्हे तर आपलीशी वाटते.
कवितेचा प्रवास हा आत्मशोधासाठी असतो आणि त्या अनुषंगाने जीवनशोधाचा असतो. हा शोध
काळ, परिस्थितीशी संबधित तर असतोच पण त्या कवीच्या सर्जनशिलतेशी, संवेदनशीलतेशी
असतो. जगत असताना माणूस प्रेमाच्या बंधनात बांधला जातो. हे बंध जितके घट्ट, एकबीज
होतात, तितक्याच त्याच्या तुटताना होत असणाऱ्या यातना जीवघेण्या असतात. एकत्र
कुटुंबिय पध्दतील समृध्द भावनिक संबंधाचे अनुभव घेणाऱ्या या कवी वर ऐन तारुण्यात
दु:खाचे डोंगर कोसळले.
“संवसारे जालो अतिदुःखे दुखी । मायबाप सेखी कर्मलिया ॥”
“दुष्काळे आटिले द्रव्ये नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली ॥”
इथून तुकोबांची आत्मशोधाची आणि जीवनशोधाची सुरुवात झाली. दुष्काळाने होरपळलेल्यांचे
खतपत्र जेव्हा त्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविले, तेव्हा त्या देणेकऱ्यांचे दु:ख
त्यांनी बुडविले. मनात खोलवर रुजलेली सतत सळसळणाऱ्या माणुसकीचे, सामाजिक बांधिलकीची
ही संवेदनशीलता तुकोबांच्या “जे का रंजले गांजले” मध्ये दृगोच्चर होते आणि त्यांची
मानवतेवरील निष्ठा आपल्याला स्पर्श करते.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” या अप्रतिम अभंगात तुकोबांनी निसर्गातील पशुपक्षी,
लतावेली यांचे नितांत सौंदर्य आपल्या सर्जनशिलतेने टिपले आहेत. हा अभंग तुकोबांची
अनुकंपा, सर्व सजीव सृष्टी बरोबरचे त्यांची तद्रूपता याचे मनोहर आकलन दर्शवतो.
कला आणि समकालीन संस्कृतीचा एक प्रतिकात्मक संबंध असतो. तुकोबांची गाथा एका कवीमनाने
कवितेच्या माध्यमातून रचलेल्या व्यापक समग्र सांस्कृतिक जीवनाचे रेखाचित्र आहे.
त्यात तात्कालीन समाजाचे आकांक्षाचे प्रतिबिंब आहे. मावळ भागातील जनजीवन, भोवतालचा
निसर्ग, रुढी, चालीरीती , ग्रामीण भावविश्व आणि समाजजीवनाचे मनोज्ञ तपशील त्यांनी
टिपले आहेत. मानवी व्यवहारातील अंतर्विरोध, सामाजिक ढोंग, धंदेवाईक बाह्य धर्माचार,
जातीभेदभावातून होणारे शोषण यांचे पडसाद काव्यात उमटले आहेत. त्यांच्या भोवतालच्या
वास्तवातून, त्यातल्या जगण्यातून आणि स्वत:च्या चिंतनातून त्यांना पडलेले प्रश्न
आणि त्यांनी शोधलेली उत्तरे स्वत:च्या सद्सद्विवेक बुध्दीच्या आधारे मांडले आहेत.
एका मूल्याधिष्ठित जीवन जगणाऱ्या कवीचे हे वास्तवदर्शी आत्मकथन आहे. त्यात आंतरिक
विकासक्रमाचा आलेख आहे. आत्मिक आणि सामाजिक संघर्षाचे प्रत्यक्षपणे आलेल्या
अनुभवांना वास्तवतेचा स्पर्श असल्यामुळे आयुष्याचे विविध कंगोरे अतिशय सहजपणे यात
उतरले आहेत. संवेदनशीलता हा या अनुभवाधिष्ठित, चिंतनात्मक आत्मकथनचा गाभा आहे.
आत्मीयतेने मांडलेल्या या कथनात वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक , धार्मिक अशा अनेक
स्तरांवरील घटनाक्रम वेधक शैलीत रेखाटले आहेत. जीवनानुभवावर मर्मभेदी भाष्य
असणाऱ्या या आत्मकथनातील विचार व व्यवहारातील नैतिक मूल्यांच्या सातत्यामुळे त्याचे
प्रभावीपण आजही टिकून आहे.
तुकोबांच्या कवित्वावर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे (१८९९-१९८६) यांनी अतिशय मौलिक
आणि मनोज्ञ विवेचन केलेले आहे. “तुकारामांची कविता एका अवरुध्द भावजीवनाची
वास्तवपूर्ण अभिव्यक्ती आहे. संत या नात्याने तुकाराम कदाचित विसरला जाईल. पण कवी या
नात्याने तुकारामांचे महाराष्ट्राला विस्मरण पडणे दुरापास्त आहे. कारण
तुकारामांच्या काव्यातील वास्तवतेचा स्पर्श इतका प्रभावी आहे की, त्यामुळे धार्मिक
आणि आध्यात्मिक कल्पनांची गडद् नी गूढ आवरणे क्ष किरणांप्रमाणे आरपार छेदून त्यातील
विशुध्द मानवता आजही आपल्या नजरे समोर मनोरम स्वरूपात तरंगू लागते.”