Font Problem

     
 

 

 

तुकाराम गाथा (निवडक अभंग)

 
 

संपादक : भालचंद्र नेमाडे

 

 

 

प्रस्तावना भाग - ३

 

 

        तुकारामाच्या जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी त्याने स्वत:बद्दल भरपूर लिहून ठेवलेले आहे. शिवाय त्याच्या काळातील संत बहिणाबाई व इतर कवीमंडळींनी लिहून ठेवलेल्या त्याच्या चरित्रपर आठवणी, नंतरच्या काळात महिपतीबुवा कांबळे ताहराबादकर यांनी लिहिलेले चरित्र आणि वा.सी.बेंद्रे यांनी १९६३ मध्ये लिहिलेले महत्त्वाचे चरित्र -- अशा त्रोटक माहितीवर त्याच्या अखंड संघर्षशील आयुष्यातील प्रमुख घटनांबद्दल थोडीफार माहिती रचता येते. एखाद्या महाकवीचे आयुष्य त्याच्या कवितेतच प्रतिबिंबित होते, या न्यायाने तुकारामाच्या अभंगांमधून त्याचे संपूर्ण मानवतेचा कळवळा असणारे मन तर जाणवतेच; परंतु सतत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मोठे होत गेलेले अवाढव्य व्यक्तिमत्त्वसुद्धा अनेक अंगांनी सामोरे येते. गॄहस्थ, कवी, भक्त, आणि संत असे बहुग्राही व्यक्तिमत्व क्वचितच जागतिक वाङमयात आढळून येते.

        तुकारामाचा जन्म १६०९ मध्य़े पुण्याजवळच्या इंद्रायणीकाठच्या देहू या लहानशा खेडयात झाला. त्याचे आंबिले ऊर्फ मोरे घराणे प्रतिष्ठित असून त्यांच्याकडे गावाची मानाची महाजनकी होती. तुकारामाच्या वंशपरंपरागत मालकीची पंधरा एकर बागायती जमीन नदीकाठी होती. तो जातीने कुणबी असून त्याचे एक वाण्याचे दुकानही गावात होते. त्याशिवाय थोडाफार सावकारीचा धंदाही तो तरुणपणी करीत असे. त्याच्या शेतातच घराण्याच्या मालकीचे जुने विठ्ठलाचे देऊळ होते. अशा रीतीने लहानपणापासूनच तुकाराम हा वारकर्‍यांच्या नामदेव-ज्ञानदेव-जनाबाई-चोखा-एकनाथ अशा प्रतिभावंत कवींच्या परंपरेशी जोडला गेला होता. खाऊनपिऊन सुखी अशा शेतकरी कुटुंबातले त्याचे देहूमधले बालपण, एकत्र कुटुंब पद्धतीतील समॄद्ध भावनिक नातेगोतेसंबंध, खेळकूद, गावठी आडदांड जगणे, शेतीची न संपणारी कष्टाची कामे, गॄहस्थीपण, प्राचीन ग्रामसंस्थेतले सण, उत्सव, रीतीरिवाज, परंपरा यांचा एकसंधपणा, पारंपारिक धार्मिक आचार, परंतु सामाजिक बाबतीत ब्राह्मणवर्चस्व आणि संकुचित जातियता तसेच विचारशून्यता -- अशा वातावरणात साधारणत: व्यतित झाले.

        कुणबी असल्याने शूद्र असण्याचे सर्व चटके तुकारामासारख्या संवेदनशील माणसाला अतिशय तीव्रपणे जाणवलेले दिसतात. आपल्या वरकरणी समावेशक दिसणार्‍या हिंदू परंपरेत ब्राह्मणेतर शूद्रांच्या विचारस्वातंत्र्यावर किती मर्यादा होत्या, हे तुकारामाच्या स्वत:च्या अनुभवांवरून व्यक्त होते. लहानपणापासून धर्मजिज्ञासेचा आणि पर्यायाने आध्यात्मिक उन्नतीचा ध्यास या वेदपठणाचा अधिकार नसलेल्या शूद्राच्या व्यक्तिमत्त्वातच असावा, असे त्याच्या आत्मपर अभंगावरून दिसून येते. संपूर्ण वारकरी परंपरेची तर त्याला माहिती होतीच; परंतु उत्तर हिंदुस्थानातील कबीर, मीरा आदी मोठमोठे संतकवी-कवयित्री आणि दक्षिणेतील भक्तिमार्गातील बंडखोर नेत्यांची तुकारामाला उत्तम माहिती होती. त्याने स्वत: हिंदुस्थानी भाषेत अभंग रचनाही केली आहे. त्याला उत्तम लिहितावाचता येत होते. वेदउपनिषदे, गीता, पुराणे, बौद्ध, रामायण-महाभारत आदी ग्रंथ त्याच्या परिचयाचे होते. भागवत पुराणाचा त्याच्यावर अधिक प्रभाव दिसतो. संस्कृत दर्शनामधील संज्ञांचा त्याचा वापर अचूक आहे. सूफी तत्त्वज्ञांचाही त्याच्या क्रांतिकारक जीवनदृष्टीशी जवळचा संबंध असावा. महाराष्ट्राच्या किनार्‍यावर कार्यरत असलेल्या पोर्तुगीज ख्रिस्ती धर्मप्रसारकांकरवी प्रसृत तत्त्वेही त्याच्या परिचयाची दिसतात. एकूण आपल्या काळातल्या आवश्यक त्या सर्व लहानमोठ्या देशी आणि भक्‍तीमार्गी परंपरांशी तुकारामाचा घनिष्ट संबंध होता. तत्त्वज्ञानातील खरेखोटे, अस्सल-भोंदू सर्व सिद्धांत, चर्चा, आचारविचार यांची त्याला चांगली माहिती होती. त्या काळातल्या इतर संतांप्रमाणे तुकारामही बहुश्रुत, संस्कृत थोडेफार जाणणारा, देशात कोणते धार्मिक प्रवाह चालू आहेत याची दखल घेणारा होता. तुकारामाच्या तीव्र संवेदनशीलतेला ही ज्ञानजन्य शहाणपणाची जोड होती, हे लक्षात घेतले पाहिजे.

        तुकारामाची आई कनकाई आणि बाप वाल्होबा ऊर्फ बोल्होबा यांना तीन मुलगे व दोन मुली झाल्या. सर्वात थोरला मुलगा सावजी हा पारमार्थिक प्रवृत्तीचा असल्याने त्याचे संसारात लक्ष नव्ह्ते. त्याची बायको वारल्यानंतर त्याने गोसावी होऊन घर सोडले व तो घरी परत आला नाही. त्याचासुद्धा तुकारामाच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव असावा. तुकाराम स्वत:ला ‘दोन्हीकडचे’ पाहणारा समजतो, हे याचेच लक्षण होय. वयाच्या तेराव्या वर्षापासून तुकाराम घरदार, शेती, व्यापार, दुकान आणि सावकारी सांभाळू लागला. या गोष्टी त्याने अत्यंत नेटाने केल्याचे दिसते. वयाच्या सतराव्या वर्षी त्याचे आईबाप वारले. यामुळे दुसरे मोठे वळण त्याच्या आयुष्याला लागले. तुकारामाचा विवाह रुखमा नावाच्या मुलीशी झाला होता व तिजपासून त्याला संताजी नावाचा एक मुलगाही झाला होता. रुखमा हीस दम्याचा विकार जडल्याने त्याला जिजा ऊर्फ आऊली हिजबरोबर दुसरे लग्न करावे लागले. एकंदरीने ‘संसारतापे तापलो मी देवा | करिता या सेवा कुटुंबाची ||’ असे लिहून ठेवणारा हा तरूण कवी संसाराच्या चक्रात कुणबिकीच्या रगड्यात चांगलाच भरडून निघत असावा. या दिवसांमधल्या व्यवहारी जगाचे असंख्य संदर्भ त्याच्या पुढील आयुष्यातल्या चिंतनात सतत येत राहतात. यावरून त्याने अत्यंत निष्ठेने प्रत्येक व्यवहार करून पाहिला असावा. या गोष्टींमध्ये अर्थातच त्याला मनापासून रस नव्हता.

        तथापि त्याचे आयुष्य उद्‍ध्वस्त करणारी आणखी एक घटना घडली. इसवी सन १६२९ आणि १६३० या दोन तीन वर्षात दख्खनमध्ये भयंकर दुष्काळ पडला आणि त्यातून तुकारामाचा पूर्ण कायापालट झाला. आधीच फारसा रस नसतांना संसाराचा गाडा ओढणार्‍या त्याच्यासारख्या मुळात निवृत्तीकडे कल असणार्‍या तरुणाची मन:शांती या दुष्काळाने कायमची घालवली. अनेकांनी या दुष्काळाची वर्णने लिहून ठेवली आहेत. सतत दोन वर्षे पाऊस झाला नाही. नद्यानाले कोरडे झाले. पाण्याचे दुर्भिक्ष झाले. धान्य दिसेनासे झाले. दळणवळणाच्या सोयी नसलेल्या त्या धामधुमीच्या काळात गरीब मुक्या प्रजेसाठी पाणी किंवा धान्य दुसरीकडून आणणे कल्पनेतही शक्य नसावे. त्यातून युद्धखोर राजे म्हटल्यावर शेतकर्‍यांचे हाल किती होत असावेत, हे आजच्याही शेतकर्‍यांच्या तुलनेने कल्पना करून अनुभवता येतील. रस्तोरस्ती माणसांच्या प्रेतांचे खच पडलेले पाहिल्याचे तत्कालीन परदेशी प्रवासी लिहितात. त्यानंतर रोगराई आली. कोल्हे-लांडगे माणसांना खाऊ लागले.

        अशा परिस्थितीतली तुकारामाच्या मनाची तडफड दु:स्वप्नांसारखी नंतरच्या काळात लिहिलेल्या काही अभंगातून सतत उमटते. ही आजन्म अस्वस्थता त्याचा स्थायीभाव होऊन राहिली. दुष्काळात त्याची शेती संपुष्टात आली. गुरेढोरे तडफडून मेली. धंदाही बुडाला. दिवाळखोर झाल्याने कोणाकडे तोंड दाखवणे कठिण झाले. घरातली पंधरावीस माणसे जगवणे अशक्य झाले. त्यासाठी काढलेले कर्जही संपले. ते फेडता येईना, त्यामुळे नवीन कर्जही कोणी देईना. सासर्‍याकडून मदत घेण्याची नामुष्की एकदोनदा आली. कुटुंबातले अन्नाअभावी निस्तेज होत मातीआड जाणारे लाडके चेहरे पाहून इहलोकीच्या अस्तित्वाची क्षणभंगुरता त्याच्या जाणिवेचा एक अविभाज्य भाग होऊन बसली. संसारातले भ्रामक सुख लक्षात आले. एकूण जीवनाच्या भयंकर असुरक्षिततेची जाणीव होऊन त्याला आपण निराधार, एकाकी असल्याची कायमची व्यथा लागली.त्याच वेळी भूकेने त्याची बायको रुखमा ‘अन्न अन्न करता’ मेली. लवकरच त्याचा मुलगा संतूही मेला. तुकारामाच्या मनावर असे एकामागून एक आघात होत गेले आणि त्याची झोप उडाली. सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक अशा सगळ्या पातळ्यांवर लज्जित झालेला हा पराजित गॄहस्थ आता सगळ्या मानवी अस्तित्वाचा विचार करू लागला. सुरक्षिततेची भावना नष्ट झाल्यावर चिरंतन असा काही आधार कुठे सापडतो का, याचा तो जीव तोडून शोध घेऊ लागला.

        पुढे दुष्काळ संपला. सुस्थिती आली; परंतु तुकारामाच्या सर्व जाणिवांना विरक्तीने जे झडपले ते अत्यंत प्रखर आत्मपरिक्षणाच्या वणव्यात आणून सोडले. त्या मन:स्थितीतल्या नानाविध अवस्थांचे दर्शन त्याचे विरक्तीचे अभंग घडवतात. नाही मज कोणी आपुले दुसरे या अवस्थेत मुळातच घराण्यात असलेल्या विठ्ठलभक्तीच्या आधारावर तो दिवस कंठू लागला. दु:ख सोसणे हा कोणत्याही थोर साहित्याचा कणा असतो; परंतु तुकारामाने या दु:खाचा आविष्कार देवाला समोर ठेवून, विठ्ठलाला उद्देशून केल्याने या विरक्तीच्या अभंगांना एकूण मानवतेच्या असहाय आर्ततेचे काव्यात्म स्वरूप लाभून, तळमळणार्‍या त्याच्या निवेदनाला अदृश्य अशा सार्वभौम शक्तीपुढे शरण जाणार्‍या सत्यकथनाचे उदात्त परिमाण आले आहे.केवळ सत्य मानणार्‍या एका असहाय माणसाचे पापोद्धाटन म्हणूनही या अभंगांचे मूल्य वाढले आहे.

        भक्तीपर अभंग तुकारामाच्या अभंगाचा बराच मोठा भाग व्यापतात. सामान्य माणूस स्वत:चे उन्नयन संतत्वात कसे घडवून आणतो याचा एक आलेखच या कठोर आत्मपरीक्षण दर्शवणार्‍या, विरक्तीकडे त्याच्या मनाची ओढ व्यक्त करणार्‍या अभंगात दिसतो. घरदार शेतीधंदा सोडून देहूजवळच्या भंडार्‍याच्या डोंगरात निवांतस्थळी जाऊन विश्वाशी ‘संवाद करू पाहणारा हा पश्चातापदग्ध साधक हळूहळू चित्तशुद्धीसाठी विठ्ठलाचा अखंड धावा करू लागला.’ ‘मनुष्यपणाला चिरा पाडणारी देवाची खूण’ घरावर आल्याची चिन्हे येथे दिसतात. या काळात तुकाराम अनेक योगी, फकीर, साधू, तत्वज्ञ यांच्यातही मिसळत असावा. संतांचा संग वारंवार घडल्याने तो आनंद व्यक्त करतो. याच तप:साधनेच्या काळात आद्य संतकवी नामदेव याने विठ्ठलासमक्ष तुकारामाच्या स्वप्नात येऊन ‘भरपूर कविता करत रहा’ असा पथ्यावर पडणारा संदेश दिल्याने स्वत: कविता करत, घरादाराची, शेतीभातीची सर्व जीवघेणी कामे जिजाबाईच्या अंगावर टाकून तो ‘सांडा’ होऊन नि:संग जगला. या प्रकाराने चरफडणार्‍या जिजाबाईचा नवर्‍यावरचा त्रागा साहजिकच पुरुषप्रधान दंतकथांनी अमर केला. मराठी शेतकर्‍याच्या बायकोच्या पुरुषाहून अधिक कष्ट उपसण्याच्या पारंपारिक कर्तबगारीमुळेच संपूर्ण जगणे कवितेत बुडविण्यासाठी लागणारा निवांत काळ तुकारामाला मिळाला. निर्विघ्न काव्यनिर्मितीसाठी लागणारी मन:शांती मिळेल, असे सुखवस्तु दिवस तुकारामाला भरपूर मिळाले असावेत. ‘निर्लज्ज होऊन’ विठ्ठलापुढे गाणे-नाचणे एकंदरीने त्याला शक्य झाले.

        तुकारामाने अंगिकारलेल्या वारकरी संप्रदायाचे आणि एकूण आपल्या देशातील भक्तीच्या चळवळींचे सर्वात महत्वाचे सामाजिक योगदान म्हणजे, परमेश्वर आणि सामान्य माणूस यांमधला दलालासारखी भूमिका हक्क म्हणून बजावणारा शोषक पुरोहित वर्गच त्यांनी नाहीसा केला. पंढरपूरच्या वाळवंटात घाईघाईने हा सामाजिक न्यायाच खेळ मांडण्यात आला, असे एक सुंदर रूपक तुकारामाने रचले आहे. ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट | उतरावया भवसागर रे ||’ अशी त्याची स्पष्ट भूमिका असल्याने पूर्वी कोणी केले नसतील इतके प्रखर हल्ले त्याने अहंमन्य भ्रष्ट ब्राह्मणवर्गावर केले आहेत. त्याच्या भक्तिपर काव्यातसुद्धा तत्कालीन भ्रष्ट प्रस्थापित ब्राह्मणवर्ग आणि सरंजामदार यांच्यावर मर्मभेदक टीका आली आहे. त्याने स्वतंत्रपणे बाह्या देखाव्याचा उपहास व खलदुर्जनांवरील प्रहार या विषयांवर रचना केली आहे, ती तर उघडपणे गावातील किंवा पंचक्रोशीतील परिचित किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना समोर ठेवून केली असावी. सत्याची प्रचीती आल्यावर त्याचा आविष्कार करतांना होणार्‍या, रात्रंदिवस चालणार्‍या या युद्धाच्या प्रसंगी सगळ्याच र्‍हासकारक प्रवृत्तींना तुकारामाने धारेवर धरले. स्वत:ला तावूनसुलाखून शुद्ध केल्यावर विठ्ठलाच्या आधारे ‘तुका म्हणे मज बोलवितो देव’ असे म्हणत त्याने तत्कालीन समाजाचे अभूतपूर्व असे नैतिक विच्छेदन केले. ‘सत्यासाठी माझी शब्दविवंचना’ असे स्वत:च्या कवित्वाबद्दल त्याने एका अभंगात म्हटले आहे. त्याच्या सामाजिक टीकेवरून सतराव्या शतकातील देहू गावाचे आणि आसपासच्या परिसरातील लोकांचे एक समाजशास्त्रीय प्रारूप आपल्याला रचता येईल, इतके तुकारामाचे नैतिकतेसंबंधीचे अभंग सुस्पष्ट, सडेतोड आहेत. त्यातली ढोंगी माणसे ओळखू येतील इतक्या प्रामाणिकपणे मांडलेली दिसतात. यासाठी केवढे आत्मबळ तुकारामापाशी असेल, याची कल्पना त्या काळातल्या बेबंदशाहीच्या पार्श्वभूमीवर करता येते. आपण या देशातल्या एका मोठया आध्यात्मिक परंपरेचे वारसदार असून खर्‍याखोटयाचा निवाडा करणे आपलेच कर्तव्य आहे, अशी त्याची स्वत:बद्दलची धारणा आहे.

 
 

प्रस्तावना भाग - ४