लोहगांवचा हें तुकोबारायांचें आजोळचें गांव. येथें तुकोबारायांस बरेच भक्त व
अनुयायी लाभले. तुकोबारायांच्या निर्याणापूर्वी लोहगांवकरांनीं तुकोबांस जवळ जवळ एक
महिनाभर ठेवून घेतलें. रोज तुकोबांचें सकाळीं भजन व रात्रीं कीर्तन असा कीर्तन असा
कार्यक्रम असे. अशा रीतीनें लोहगांवकर भक्तिप्रेमसुखाची लूट करण्यांत दंग होते अशा
वेळीं मोगलांचा लोहगांवावर छापा पडला, त्यांनीं सर्व गांव लुटून नेला. जें नेतां
आलें नाहीं तें जाळून खाक केलें. हा लोहगांवकरांवर जो परचक्राचा फेरा आला तो तेथें
तुकोबा भजन कीर्तन द्वारा, हरिप्रेमाचा रंग लुटवीत होते, त्यावेळीं आला, म्हणून
तुकोबांस अति दुःख झालें. त्याची मजल देवा मला यापुढें जगांत ठेवूं नको असें
म्हणण्यापर्यंत गेली. हा छापा जो पडला त्याचें मुळांत कारण असें असावें कीं
तुकोबारायांचीं लोहगांवास कीर्तनें चालू आहेत व तीं जवळ जवळ महिनाभर चालूं आहेत ही
बातमी आजूबाजूच्या मुसलमान मुलखांतील अधिका-यास लागली असावी. राजा शिवाजी यास
तुकोबांच्या कीर्तनांत पुण्यास पकडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर हा दुसरा प्रयत्न झाला
असावा. आज हि पाकिस्तान हिंदुस्थान यांच्या सीमेवरचीं कितीतरी खेडीं पाकिस्तानी
सेनेनीं वा गुंडांनीं उध्वस्त केलीं असतील ! पण दुसरा प्रयत्न झाला असावा. आज हि
पाकिस्तान हिंदुस्थान यांच्या सीमेवरचीं कितीतरी खेडीं पाकिस्तानी सेनेनीं वा
गुडांनीं उध्वस्त केलीं असतील ! पण आपत्काळीं ऐवढा खोल विचार कोण करतो ! जो तो
म्हणूं लागला असावा कीं, केलेत हरिभक्तीचे उत्सव व झाला गांव उध्दवस्त. लोक तैसा
ओक. लोकांच्या तोंडास कधीं कोणास सत्तेशिवाय कुलूप घालतां आलें आहे ! तेव्हां तो
झालेला आकांत, त्यामुळें होत असलेली ही भक्तीची निंदा तुकोबांस कांहीं सोसली नाहीं.
विठ्ठल सुखा-विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल । हा तुकोबांचा नियम असल्यामुळें
त्यांनीं विठुरायाच्या धावा अत्यंत कळकळीनें केला आहे. ते अभंग ५६४-७९ पर्यंत आहेत.
तुकोबा म्हणतातः- देवा, तुम्हांस सत्ता नाहीं. नामांत वीर्य नाहीं, व कोणाचें तरी
पाप उभें राहतें ते तुमच्या आड उभें राहतें हें आम्हांस आतां कळलें. देवा कोण्या
पापाचा उदय झाला व मला हा प्रळय पाहवा लागला ! देवा हें कांहीं मला सोसवत नाहीं.
तुमचें नांव बुडतें. आम्ही हीनवर ठरलों. तेव्हां आतां त्वरा करून धावा . देवा माझी
वाणी तुम्ही लाजविलीत ! तुमचा सर्वत्र, वास असतांना ही गोष्ट तुमच्या लक्ष्यांत आली
नाहीं ! हरिदासांच्या घरीं परचक्र यावें कां? हें मी हरिकथेचें फळ मानूं का ? असें
जर परचक्र येऊं लागलें तर तुझी भक्ति तरी लोक कशी करतील ! मला मरण येईल तर त्याचें
मला दुःख वाटणार नाहीं. पण या लोकांचें दुःख मला पहावत नाहीं. आमची तशी परंपरा
नाहीं; देवा भजनांत विक्षेप यावा ! हें आमचें मरणच म्हणावयाचें. भजनाशिवाय असा एक
हि क्षण वाया जाऊं नये; पण तशी वेळ आली खरी. तेव्हां जेथें आघाताचा वारा लागणार
नाहीं अशा स्थळीं मला ठेवा. असे एकाहून एक जास्त कळकळीचे अभंग करुण रसानें ओथंबलेले
तुकोबांच्या मुखावाटा बाहेर पडत होते. ५७८ वा अभंग संतांच्या तोंडून तुझी कीर्ति
ऐकून तर आम्ही या मार्गास लागलों, या स्थळास पावलों. त्यांनीं जी तुझी कीर्ति गाइली
आहे, त्याप्रमाणें आम्हांस कांहीं प्रतीति यावी अशी विनंती केली आहे. ५७९ व्या
अभंगांत आम्ही समर्थांचीं बाळें आहोंत या अभिमानानें आम्ही भिति न बाळगतांना वागत
होतों. देवापाशीं कधीं कळी काळ बळ करूं शकेल का ? तेव्हां मी दंड थोपटतों. पंढरीया
तूं हि दंड थोपट अशी पंढरीराजास विनंति केली आहे. अशी विनंति आपल्या इष्टदेवतेस
भक्तानें केल्याचें दुसरें कोठें उदाहरण आहे का ? अशा रीतीनें समोर असलेल्या
मूर्तीस आव्हान करतांच त्या विठुरायानें कांहींतरी खूण काय दाखविली असावी ! पण
महिपतीबोवांनीं ती खूण काय होती हें कांहीं नमूद केलें नाहीं. दुस-या कोणी तशी नोंद
केल्याचें आपणास माहीत नाहीं. परंतु कांहीं तरी खूण पटविली असावी हें निश्चित. कारण
यापुढील दोन अभंग ती गोष्ट स्पष्ट करीत आहेत. (५७९/८०)
॥ डोळा भरीलें रूप । चीत्तां पायांपें संकल्प ॥ १ ॥
॥ धृ ॥ अवघी घातली वाटणी । प्रेम राहिलें कीर्तनीं ॥ धृ ॥
॥ वाचा केली माप । रासीं हरी नाम अमूप ॥ २ ॥
॥ भरूनीया भाग । तुका बैसला पांडुरंग ॥ ५८०
॥ आता आहे नाहीं । न कळे आळी करा कांहीं ॥ १ ॥
॥ धृ ॥ देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरी नीवासा ॥ धृ ॥
॥ नेणें भाग सीण । दुजें कोणी तुम्हावीण ॥ २ ॥
॥ आतां नव्हे दुरी । तुका पायीं मीठी मारी ॥ ३ ॥ ५८१
आजवर लोहगांवच्या वेढयाचे ३ अभंग सर्व प्रती देत आल्या आहेत. परंतु अभंग ५६४-५८० हे
सतरा अभंग या प्रकरणाचे आहेत. तुका म्हणे पंढरीराया । थापटीतों ठोक बाह्या । हें
पंढरीरायास केलेलें आव्हान - या संदर्भानें डोळयापुढें आलें - कीं याचा अर्थ काय
करावा असा विचार करावयास लावील असा प्रश्न पुढें उभा राहतो. थापटीतो ठोक बाह्या
असें जें तुकोबाराय म्हणताहेत, याचा पुष्कळांना अचंबा वाटेल. पण आम्हां
महाराष्ट्रीयांचा हा स्वभाव आहे. हें वचन तुकोबांच्या टीकाकारांच्या पाहण्यांत कधीं
आलें नसावें. एरव्हीं त्यांनी संत-राष्ट्रहिविन्मुख असतात म्हणून सरसकट टीका केली
आहे ती केली नसती. प्रल्हादानें-क्षमेसहि अपवाद आहे म्हणून म्हटलें तें याच
तत्त्वानें.५७९/८० या अभंगांत जी खूण पटत आहे, ती अश्रुतपर्व आहे. ऐतिहासिक दृष्टया
या लोहगांवच्या वेढ्याची तारीख-मिति ठरविली पाहिजे. तसेंच त्यांत कोणाकोणाच्या
झटापटी झाल्या हें पाहिलें पाहिजे. माझी अशी समजूत आहे कीं, थापटीतो ठोक बाह्या
म्हणून जें म्हटलें आहे, त्या सुमारास या परचक्राची बातमी कळून शिवाजी राजांनीं
सैन्य पाठवून वेढा उठविला असेल. हें प्रकरण आतां ऐतिहासिक दृष्टया नीट पाहिलें
पाहिजे.
संताजीच्या गाथ्यांत १५-२० हे अभंग हि याच अर्थाचे आहेत. तेव्हां ते अभंग या बरोबर
घ्यावे लागतील. हे सर्व अभंग एका प्रसंगाचे आहेत. म्हणून एकाच वेळीं झाले असतील
असें नाहीं. तेव्हां संताजीसारख्या आणखी कांहीं वह्या मिळतील तेव्हां या गोष्टीचा
निर्णय ठरवितां येईल. सध्यां एवढें म्हणतां येतें कीं या लोहगांवच्या परचक्रानें
तुकोबारायांच्या मनास फार मोठी जखम झाली व ती पुष्कळ दिवस वाहत राहिली असावी.
न घडे यावरी न धरवे धीर । पीडीलीया राष्ट्र देखोनी जग ।
हे शब्द राष्ट्रहिताबद्दल विन्मुखता दाखवितात काय ?