महाराष्ट्राच्या
या दोन परमोच्च विभूतींची भेट हा एक सूर्यचंद्र, गंगायमुना, मेरुमंदार, यांच्या
मीलनाचा, श्रेष्ठ तत्त्वांचा संगम होता. आमच्या दृष्टीने
यातल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक शिवाजी व तुकोबा यांच्या भेटीचा काल
साधारणत: शके 1565 ते 1570-71 एवढाच असू शकेल. रामदास, शिवाजी व तुकोबा यांच्या
संबंधाबद्दल सर्वसामान्य वाचक जेव्हा विचार करू लागतो तेव्हा हे तिघेही
एकमेकांच्या संपूर्ण हयातीत जिवंतच होते असे गृहीत धरलेले असते. तीत एक स्पष्ट
कल्पना ध्यानी घेणे अवश्य आहे. ती म्हणजे शिवरायाचा जन्म सन 1630 चा निश्चित
असेल तर तुकोबांचे निर्याणप्रसंगी ते फक्त एकोणीस वर्षाचे होते. तेव्हा
तुकोबांची व शिवरायाची भेट, वह्या तरल्यानंतर जी तुकोबांची प्रसिध्दी झाली त्या
सुमारास व शिवराय स्वराज्याकरिता चळवळ करू लागले त्या त्यांच्या वयाच्या 15 व्या
वर्षानंतर झाली आहे. शिवराय हे स्वराज्यासाठी जशी मावळयांची प्रत्यक्ष मदत घेत
होते, त्याचप्रमाणे ते हिंदवी राज्यासाठी साधुसंतांचा आशीर्वाद मिळवीत होते.
त्यांनी या कामी मुसलमान साधूकडूनही जर शुभकामना अपेक्षिल्या व त्यांच्या
परामर्ष घेतला तर हिंदुधर्मातले त्याकाळचे निरपेक्ष सर्वश्रेष्ठ साधुवर्य
यांनाच तेवढे न भेटता, वगळले असेल हे शक्यच नाही. शिवराय व तुकोबा
यांच्या भेटीबद्दलची तुकोबारायांची प्रत्यक्ष अक्षरे आता पाहा. ते गातात-
‘दिवटया
छत्री घोडे। हे तो बऱ्यात न पडे॥
आता येथे पंढरिराया। मज
गोविसी कासया॥
मुंगी आणि राव। आम्हा
सारखाची देव॥
गेला मोह आणि आशा।
कळिकाळाचा हा फासा॥
सोने आणि माती। आम्हा
समान हे चित्ती॥
तुका म्हणे आले। घरा
वैकुंठ हे सावळे॥’
या प्रसंगातील दोन्ही पुरुषांचे वर्तन त्यांचे जीवनाचे पैलू अधिक उजळविणारे
आहेत असे दिसेल. आर्यधर्मातील राजा हा सत्तेने उन्मत्त नसतो तर तो
संतश्रेष्ठांचे आशीर्वाद घेणारा व आपले शिर त्या चरणावर ठेवणारा असतो. म्हणून
सारे राज्य आणि जीवनही त्यांना समर्पण करण्याची इच्छा झाल्याने बहुमोल रत्नांचा
नजराणा शिवरायाने पाठविला, हे उल्लेखनीय आहे. तुकोबाही हे साधुश्रेष्ठ एवढे की,
असा बहुगुणी राजा आपणाला शिष्य म्हणून लाभतो म्हणून ते हुरळले नाहीत.
‘इंद्रपदादिक
भोग। भोग नव्हती ते भवरोग॥’
अशा सत्य
जीवनधारणेमुळे आलेला नजराणा त्यांनी परत करून
‘राजा!
प्रभूला स्मरून जनकल्याण करणे हेच आम्हाला आवडते, ते तू आम्हाला पुरवावे’
असा उलट निरोप
पाठविला. या अभंगावरून संत तुकोबाराय राजाच्या समृध्द
स्वराज्यसिध्दीसाठी चिंत्ता करीत होते हे निश्चित.
मात्र, हा नजराणा पाहून
देवाला त्यांनी ऐकवले ते महत्त्वाचे आहे. धनराज्य, ऐश्वर्यसत्ता, लौकिक यांचा
पाऊस पडला तरी न डगमगण्याचे धैर्य जिथे ते हृदय प्रभूला त्या निमित्ताने सांगते-
आता पंढरिराया। येथे मज
गोविसी कासया॥
आम्ही तेणे सुखी। म्हणा
विठ्ठल विठ्ठल मुखी॥
तुमचे येर ते धन।
ते मज मृत्तिकेसमान॥
तुकोबांचे
शिवरायभेटीबद्दलचे आणखीही अभंग आहेत. पण दिलेले उतारे सूचक व परिपूर्ण आहेत.
दिवटया छत्रीचा उल्लेख,
शिवरायांनी त्या पाठविल्या नसत्या तर एवढया तपशिलाने वर्णन होण्याची आवश्यकता
काय? मुंगी आणि राव, सोने आणि मृत्तिका समान असून आम्हाला तुम्ही प्रभुचिंतन
करण्याचे खरे सुख आहे ही भूमिका त्या भेटीखेरीज इतरत्र चपखल बसूच शकत नाही.
यावरून जे घडले ते साहजिक
दिसते. तुकोबांची दिगंतकीर्ती ऐकून-वाऱ्याहाती गेलेल्या मापाने-भक्तिभाव व सत्पुरुषाबद्दल आदर असणारा हा धर्मवृत्तीचा बालराजा त्यांना नजराणा पाठविणे सहज
शक्य आहे. याप्रमाणे तो धर्मरत बालराजा न पाठविता तर त्याच्या
स्वभावप्रवृत्तिविरुध्द आक्षेप आला असता. फकीरांच्या कबरींना जो दान देतो तो
सजीव, साक्षात्कारी आणि कीर्तनसिंधू वाहणाऱ्या व पुण्यापासून 16 मैलांवरील
साधूला न भेटता विसरला असेल हे शक्यच नाही.
अर्थात शिवरायाची व
तुकोबांची भेट होण्यावर दोघांचाही मोठेपणा अवलंबून नाही. दोघेही आपापल्या
क्षेत्रात स्वयंभू, स्वप्रकाशी आहेत. मात्र स्वराज्य उदयकाली स्वराज्याची
स्वप्ने साकार व्हावी म्हणून गगनपाताळ उचंबळविणारा हा दूरदृष्टी धर्मनिष्ठ राजा,
सर्व आचारधर्माला लाजविणाऱ्या भक्तिमान व अखंड गर्जणाऱ्या कीर्तनश्रेष्ठाला ओळखू
शकला नसेल, व महाराष्ट्राच्या भाग्यनौबती गर्जविणाऱ्या या बालाकरिता, देवाला तो
संतश्रेष्ठ सादावीत नसेल हे शक्यच नाही. अधर्म व अंदाधुंदी वाढल्याने
‘पांडुरंगा
तुम्ही निजलेत काय’
असा खडसावून सवाल
विचारणारे, पांडुरंगच शिवरायाच्या रूपाने धर्माची पहाट घडवीत असल्याचे पाहून
डोळे झाकून बसले असतील काय? तुकोबांची वचने सांगतात की, ते तसे गप्प बसले नव्हते.
जो अल्पकाल या दोघात समान होता, त्या चारपाच वर्षांच्या अवधीत तुकोबांनी पाईक
कसे असावेत, रणात कोण नीतीने वर्तावे याचे धडे घातले तेही जाणत्यांचे डोळे
उघडण्यास पुरे आहेत. अर्थात निजलेल्यांना जागे करणे शक्य आहे. जागे असून झोपेचे
सोंग घेणारांना नाही. त्या मोकळया आत्मप्रत्ययी जीवापुढे तुकोबांच्या पाईकावरील
अभंगातील काही मार्मिक वचने ठेवीत आहे. ती वाचा, मनन करा. (येथे पाईक म्हणजे
शिपाई हा अर्थ प्रथम ध्यानी घेणे अवश्य आहे.)
पाईकी वाचून नव्हे कधी
सुख। प्रजामध्ये दु:ख न सरे पीडा॥
तरि व्हावे पाईक जीवाचे
उदार। सकळ त्यांचा भार स्वामी वाहे॥
पाईकीचे सुख जया नाही
ठावे। धि त्यांनी जियावे वायावीण॥
तुका म्हणे एका क्षणाचा
करार। पाईक अपार सुख भोगी॥
शिपाई कर्तव्यतत्पर असले
तरच प्रजेला सुख शक्य आहे. तो पाईक राजासाठी जिवावर उदार असावा लागतो. मग त्याचा
धनी त्याचे सर्व काही बरे करतो. हे धन्याकरिता जीवन अर्पण करण्याचे सुख ज्यांना
नाही ते फुका कशाला जगावे? म्हणजे तुकोबांना असे शिपाई देशरक्षक नाहीत ते सारे
भूमीभार आहेत असे वाटतात. हा शिपाईपणा एका क्षणात जिवाचा करार करून भेटू शकतो.
त्या एका क्षणाच्या निश्चयाने जे ध्येय अंगी जडते, त्यात अपार सुख असते.
पाईकीचे सुख पाईकासी
ठावे। म्हणोनिया जीवे केली साटी॥
येता गोळया बाण साहिले
भडिमार। वर्षता अपार वृष्टी वरी॥
स्वामीपुढे व्हावे पडता
भांडण। मग त्या मंडण शोभा दावी॥
पाईकांनी सुख भोगिले
अपार। शूर आणि धीर अंतर्बाही॥
पाईक तो जाण पाइकाचा
भाव। लगबग ठाव चोरवाट॥
आपण राखोनी ठकावे आणिक।
घ्यावे सकळीक हिरोनिया॥
तुका म्हणे ऐसे जयाचे
पाईक। बळिया तो नाईक त्रैलोकीचा॥
पाईक असेल त्याला ते खरे
ध्येयसुख माहीत, म्हणूनच जीवाभावापासून त्या जीवनाची साठवण (जोडी) केली. ते
अंतर्बाह्य शूर आणि धीर असल्याने स्वामीपुढे होऊन गोळया आणि बाणांच्या वर्षावाला
छाती पुढे करतात. असे शिपाई ज्याच्याजवळ तो कुठल्यातरी एखाद्या राज्याचा नव्हे
तर त्रैलोक्याचाही धनी-बळिया म्हणून शोभेल. म्हणजे असे शिपाई शिवरायाचे होते,
असावे ही आकांक्षा, धर्मजीवनाने आधार पुरविणाऱ्या या साधुश्रेष्ठाची होती.
पाईकावरील अभंग ज्ञानराजादि
इतर संतांचेही आहेत. पण त्यात शूरधीरत्वाचे व एकनिष्ठतेचे वर्णन प्रमुख आहे.
तुकोबाराय "आपणा राखूनि ठकावे आणिक'' म्हणतात, चोराच्या वाटा माहीत
असाव्या असे दाखवितात ते वैशिष्टय इतर पाईक अभंगात नाही. आणि याचे कारण उघड आहे.
त्याकाळच्या परिस्थितीला तुकोबा जागे होते, त्या कालच्या राजाला अभिष्ट चिंतून
देता येईल ते साह्य देण्याचे उत्कट प्रयत्न त्यात दिसून येतात.
‘रणी
निघता शूर न पाहे माघारे’
‘एका
बीजा केला नास। मग भोगिले कणीस।’
‘तुका
म्हणे आधी करावा विचार। शूरपणे तीर मोकलावा॥’
‘मनाचा
उदार रायाचा झुंजार। फिरंगीचा मार करीतसे॥’
‘शूरत्वावाचूनी
शूरामाजी ठाव। नाही आविर्भाव आणिलीया॥’
अशी अनेक वचने तुकोबांच्या
अंगीचे शौर्यचैतन्य राष्ट्रात फुलवीत होते, शिवप्रभूला साह्य देत होते.
ईश्वरीलिखित एवढेच की, ही दोन श्रेष्ठांची संगती तुकोबांचा निर्याणकाळ येऊन
चारपाच वर्षात संपली. ती अधिक काळ राहती तर?
पाईकीचे अभंग परमार्थवीर
आणि राज्यचालक या दोघांनाही लागू पडणारे आहेत. पण ती अक्षरे ज्या परिस्थितीत
उमटली तेथला वेष घेऊन आली आहेत असे वरील उदाहरणांनी स्पष्ट म्हणावेसे वाटते.
नाथांनी भावार्थ रामायणात राक्षसांना दाढया असल्याचे वर्णन व्यर्थ केले नव्हते;
तसेच तुकोबांचे पाईक दैवावर हवाला ठेऊन बसणारे नव्हते हे त्या अक्षरातून आपण
ओळखू शकलो तर संत देश बुडवे होते, ते परिस्थितीपासून दूर राहणारे, पलायनवादी
होते, इत्यादी आळशी व पोकळ डोक्यातील निंदेला वाव न देता कुठल्याही व्यक्तीचे
मूल्यमापन त्या कालची परिस्थिती, व त्यांची कृत्ये व अक्षरे यांना धरूनच करू शकू.
पण शब्दशूर व जगाला धक्के
देणारांना हे पटत नाही. ते आजचे संकेत, आजचे जीवन डोळयापुढे ठेऊन मागील काळातील
लोकांचे मूल्यमापन करतात. तुकोबांच्या काळी यथा राजा तथा प्रजा हा राजधर्म होता,
वर्णाश्रम हा समाजधर्म होता आणि वेदांतवाणी ही अध्यात्माची बाब हेती. तुकोबांनी
आपले ध्येय, भक्तीने स्वत:चे व जगत्कल्याण साधण्याचे मानले. ते करताना हा देश
सामाजिक दृष्टयाही पतित आहे हे जाणून उपदेशपर अभंगाने त्याला जागविला. प्रभूने
अवतार घेऊन दुष्टाला दमन करावे ही आर्त वाणी ऐकविली. |