|| श्रीविठ्ठल ||
श्री तुकोबारायांचे अभंग
(भिजल्या वहीचे अभंग, त्यांचा अर्थ, तुकोबांचें चरित्र, टीपा यांसह) बाबाजी गणेश परांजपे
आभार
सन 1932 मध्यें श्री. ह. भ. प. बाबासाहेब देहूकर यांच्या घराण्यांत परंपरेनें पूजेंत असलेल्या वहीचें मला प्रथम दर्शन झालें. त्यावेळी श्री तुकोबारायांच्या अभंगांच्या वहीचा मला त्यांनीं फोटो घेऊं दिला व पुढें अभंगांचे शोधार्थ ठिकठिकाणीं जाऊन संशोधनासहि मदत केली. संशोधनार्थ पंढरींत आम्ही जुन्या गाथ्यांचा शोध करीत होतों, तेव्हां हृ.भ. प. सख्या हरि शिंपी यांच्या घराण्यांत पूजेंत परंपरेनें आलेली एक वही मला त्यांनीं पहावयास दिली. त्या वहीची मीं त्यावेळीं नकल करून घेऊन त्यांची वही त्यांस परत केली. पुढें कांहीं वर्षांनीं म्हणजे सन 1940 च्या सुमारास श्री. सद्गुरु दादामहाराज सातारकर मुंबईस राहूं लागून त्यांचे तोंडून श्री तुकोबारायांच्या अनेक अभंगांचें निरूपण ऐकण्याचा योग आला. तेव्हां मी नकल करून घेतलेल्या सख्या हरि शिंपी यांच्या वहींत मला ज्या ओळी आढळत त्या त्यांचे नजरेस आणून, त्यांचेकडून या वहींतील अभंगांचें निरूपण ऐकावें अशा इच्छेनें ही वही पंढरपुराहून पुनः आणून ती श्री. दादामहाराज यांस दाखविली. त्यांस रोज तुकोबांचें वचन नव्या उल्हासानें भोगण्यास हवेंच होतें. या वहींतील अभंगांचें त्यांनीं वही परत मागितली व मीं परत केली. पण रोज सकाळीं तुकोबारायांचा अभंग सांगण्याचा क्रम श्री. दादा महाराजांनीं सुरू केला होता, तो त्यांनी कृपाळूपणानें तसाच चालू ठेविला. त्याशिवाय त्यांस करमेना. पुढें आजारानें प्रकृति फार बिघडली, तरी सकाळीं अभंग सांगण्यास ते ताजेतवाने होऊन आमची वाट पाहात बसत. तो सकाळचा औषधाचा डोस आहे असें म्हणत. येवढे ते अभंग सांगण्यास, तुकोबारायाच्या वचनासी संग करण्यास, आषख होते. त्या दीड पावणेदोन वर्षांत तुकोबारायांच्या ओळी असलेले, पंडित प्रतींतील बरेचसे अभंग झाल्यावर, करुणापर, संतपर, पंढरीपर असे अभंग होऊन त्या सर्व निरूपणावर श्री ज्ञानेश्वर माउलीच्या विरहिण्या सांगण्यानें कळस चढवून श्री. दादामहाराज आळंदीस जाऊन कायमचे बसले. तेव्हां सकाळचा अभंग ऐकण्याची संवय स्वस्थ बसूं देईना. या दीड दोन वर्षांच्या श्रवणानें मनांत ज्या गोष्टींचा ठसा उमटला होता, त्या गोष्टी या भिजल्या वहींतील अभंगांचा अर्थं स्पष्ट करूं लागल्या. अशा स्थितींत या भिजल्या वहीचीं अनेक पारायणें केलीं, तेव्हां त्यांत ब-याचशा ठिकाणीं ओळी आहेत असें वाटूं लागलें. 1947 सालीं उन्हाळयाच्या सुट्टींत श्रीक्षेत्र आळंदी येथें मी श्रीविष्णुमंदिरांत राहावयास गेलों. तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया । - तसा मी चित्ताच्या समाधानानें श्री ज्ञानेश्वर माउलीच्या सान्निध्यांत राहात होतों. तेथें सुखासहि कांहीं उणीव नव्हती - अशा सुखासमाधानाच्या स्थितींत या भिजल्या वहींतील अभंगांचें रूपांतर "माउली"च्या सहवासांत झालें. अन्तर्गत दुवेहि स्पष्ट झाले. वही, रूपांतर, त्याबद्दलची थोडी चर्चा येवढें लिहून झाल्यावर ती हस्तलिखित प्रत माझेजवळ तशीच संग्रहास होती, 1948-49 मध्यें संताजीच्या वह्यांचें रूपांतर केलें. भिजल्या वहींतील अभंग या महागाईच्या दिवसांत छापले जातील अशी कल्पना मला केव्हांच नव्हती.
गेल्या (1949) वर्षीं याच सुमारास मुंबईस श्री. धनंजय रामचंद्र गाडगीळ यांस भेटावयास गेलों असतांना आम्हां उभयतांचें दुस-या कांहीं गोष्टींवरून बोलणें होता होता श्री तुकोबारायांच्या अभंगावर आलें-तेव्हां मी सहज भिजल्यावहीचें महत्त्व माझे मतें काय आहे हें त्यांस सांगितलें व छापखान्यास छापावयास देतां येईल अशी हस्तलिखित आणून त्यांस पहावयास दिलें. त्यांचा मुक्काम त्यावेळीं 1/2 दिवस मुंबईस होता. पुण्यास परत येतांना त्यांनीं माझें हस्तलिखित परत केलें. पुढे महिन्या दीड महिन्यानें मला श्री. धनंजयराव गाडगीळ यांचें पत्र आलें कीं भिजल्या वहीचे अभंग छापले जावेत म्हणून मीं कांही जणांना विचारलें. त्यांचीं अनुकूल उत्तरें आलीं नाहींत. तेव्हां वही आपणच छापावी असें ठरविलें आहे. याप्रमाणें आर्यभूषण छापखान्यांत छापवून श्री. धनंजयराव गाडगीळ भिजल्या वहीचे अभंग प्रसिध्द करीत आहेत. ही वही महाराजांच्या निर्याणाच्या सोहळयाचे वेळी प्रसिध्द करावी असा विचार होता. परंतु पुष्कळ प्रकाशक पुष्कळशीं पुस्तकें तीनशें वर्षांच्या महोत्सवाच्या संधीचा फायदा घेऊन प्रसिध्द करीत आहेत असें ऐकून आम्ही प्रकाशनाचा बेत पुढें ढकलला, व तें काम आतां आषाढीच्या निमित्तानें होत आहे. अभंगांचा अर्थ, टिपा - निरूपणें श्री. दादामहाराजांच्या तोंडून ऐकलेल्या संतबोधाचें, प्रेमबोधाचें व त्यांच्या कृपेचें वैभव आहे. ग्रंथाचें प्रसिध्दीकरण हें श्री. गाडगीळ यांच्या सौजन्याचें व लोभाचें फळ आहे.
आर्यभूषण छापखान्यानें पुस्तक तांतडी करून वेळेवर छापून दिलें याबद्दल श्री. वि. अ. पटवर्धन यांचा आभारी आहे.
ह. भ. प. सख्या हरि शिंपी यांचा मी वही वापरावयास, नकल करावयास दिली याबद्दल आभारी आहें. श्री. ह. भ. प. बाबासाहेब देहूकर यांनीं पूजेंतील वही या ग्रंथांत छापावयास व त्या बरोबर च वहींतील एका पृष्ठाचा ब्लॉक करून छापावयास परवानगी दिली याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. मूळ वहींतील अभंग ** अशा खुणांनीं या ग्रंथांत छापले आहेत व ब्लॉक मध्यें आलेले अभंग 360 - 64 आहेत.
पुणें
21-7-1950
बा. ग. परांजपे
श्रीतुकोबारायांच्या गाथा - छापील प्रती यादी
अनुक्रम | प्रसिद्धीवर्ष | छापखाना | प्रकाशक | अभंग |
---|---|---|---|---|
1 | 1862-68 | शिळा प्रेस | माधव चंद्रोबा | 3228 |
2 | 1867 | गणपत कृष्णाजी | गणपत कृष्णाजी | 4500 |
3 | 1869 | इंदुप्रकाश | पंडित | 4621 |
4 | 1886 | निर्णयसागर | रा. वि. माडगांवकर | 4645 |
5 | 1889 | सुबोध प्रकाश | तुकाराम तात्या | 8441 |
6 | 1889 | सुबोध प्रकाश | तुकाराम तात्या | 4621 |
7 | 1901 | इंदिरा प्रेस | जोग व गुळवे | 4575 |
8 | 1903 | निर्णयसागर | काशीबाई हेर्लेकर | 4476 |
9 | 1909 | जगध्दितेच्छु | विष्णुबोवा जोग | 4141 |
10 | 1912 | निर्णयसागर | पणसीकर | 4505 |
11 | 1913 | आर्यभूषण | देवडीकर | 4092 |
12 | 1913 | जगध्दितेच्छु | गोडबोले | 4499 |
13 | 1847 शके | चित्रशाळा | देशमुख व दांडेकर | - |
14 | -- | --- | आजगांवकर | - |
15 | 1933 सन | चित्रशाळा | तुकारामबोवा वडापुरकर | 4590 |
16 | 1841 शके | आर्यभूषण | वि. ल. भावे | 1323 |
वरील सर्व प्रतींपैकीं (16वी प्रत वगळून) नीट छापलेली व व्यवस्थितरीतीनें पाठांतरें दिलेली प्रत अनुक्रमांक 3ही होय. प्रकाशकांनीं आपण ही प्रत कोणत्या प्रतीवरून छापीत आहोंत, पाठांतरे कोणत्या प्रतीवरून दिलीं ही माहीती ग्रंथास Critical Preface जोडून इंग्रजींत दिली आहे. त्यावरून ही प्रत त्र्यंबक कासार याच्या वही बरहुकूम छापली आहे, असें वाटतें. ही वही प्रकाशकांस तळेगांव येथें मिळाली, व त्यांस पाठांतरें देण्यास, (1) देहूची हस्तलिखित प्रत (2) कडूस येथील मवाळांची हस्तलिखित प्रत, व (3) पंढरपूरची गंगुकाकांची प्रत मिळाली होती. अनुक्रमांक 3ही इंदुप्रकाश किंवा पंडित यांची प्रत म्हणून प्रसिध्द आहे. ही प्रत त्यावेळचे Oriental Translator शंकर पांडुरंग पंडित यांचे सहाय्यानें विष्णु परशुराम शास्त्री पंडित यांनीं शुध्द करून छापण्याकरितां तयार केली असें मुखपृष्ठावर म्हटलें आहे. ही प्रत त्र्यंबक कासार याच्या वहीवरून छापली आहे. त्र्यंबक कासारानें आपल्या वहीच्या 68 व्या पृष्ठावर ही वही 40 वर्षे अभंग गोळा करून शके 1709 मध्यें संपविली असें म्हटलें आहे.
या सर्व प्रतींत अनुक्रमांक 1/2/3/5 या प्रती फार उपयुक्त आहेत. अनुक्रमांक 1 च्या प्रतींत अभंग संख्या 3228 आहे. देहूस थोडया वर्षांपूर्वीं मी एक 3।3॥ हजार अभंगांची हस्तलिखित प्रत पाहिली होती. तिचीच नक्कल अनुक्रमांक 1 असावी असें वाटतें. आज ती हस्तलिखित प्रत उपलब्ध नाहीं. अनुक्रमांक 1 असावी असें वाटतें. आज ती हस्तलिखित प्रत उपलब्ध नाहीं. अनुक्रमांक 2 व 12 या प्रती पंढरपुरास भागवत बोवा बेलापुरकर यांची प्रत आहे, त्याच्या नकला असाव्यात. यंदा ती प्रत केमकर यांनीं प्रसिध्द केली आहे. अनुक्रमांक 4/6 ही अनुक्रमांक 3ची नक्कल आहे. अनुक्रमांक 5चीं कांहीं पाने देहूस थोडया वर्षांपूर्वीं पाहिलीं होतीं. पण अनुक्रमांक 1च्या प्रतीप्रमाणें च सध्यां तीं पृष्ठे हि उपलब्ध नाहींत. अनुक्रमांक 11ही प्रत गंगुकाकांच्या प्रतीवरून देवडीकरांनी छापली आहे. तुकोबारायांचे टाळकरी संताजी तेली जगनाडे यांच्या दोन वह्यांवरून कै. वि. ल. भावे यांनीं आर्यभूषण मध्यें छापलेल्या प्रतीचें विवेचन पुढें स्वतंत्र येणार आहे, तेव्हां पुढील विवेचन हें संताजीची प्रत वगळून आहे, म्हणून समजावें.
माधव चंद्रोबा, गणपत कृष्णाजी व तुकाराम तात्या, यांनीं आपल्या प्रती कोणत्या पोथीवरून छापल्या आहेत, याचा कोठें च उल्लेख केलेला नाहीं. पुढें ज्या प्रती निघाल्या त्यांनीं हि आपण कोणती प्रत वापरली तें प्रसिध्द केलें नाहीं. मला वाटतें, छापण्याची कला ही गाथा छापण्याच्या कामीं वापरण्यास त्या वेळचे मठाधिपति विरूध्द असावेत म्हणून हे उल्लेख केलेले नसावेत. अनुक्रमांक 9 ही जगध्दितेच्छूनें छापलेली प्रत आळंदीस हैबत बोवांची जी प्रत आहे, त्या प्रती वरून छापली आहे असें वाटतें. जवळ जवळ अशी च प्रत 1913 मध्यें गोडबोले यांनीं जगध्दितेच्छु छापखान्यांत छापली व प्रसिध्द केली. ही प्रत माळेची प्रत माळेची प्रत किंवा ओळीचा गाथा म्हणून समजला जातो. या प्रतींत शब्द तोडलेले नाहींत. या प्रतीचें पुनर्मुद्रण सन 1936 सालीं झालें. व त्या प्रतीच्या मुखपृष्ठावर ह. भ. प. देहूकर महाराज, भागवत बोवा बेलापूरकर व वासकर यांच्या फडांतील वारकरी सांप्रदायिक ओळीचा गाथा-असें या प्रतीचें वर्णन केलें आहे. या च प्रतीची आणखी एक नवी आवृत्ति यंदा केमकर आणि मंडळी यांनीं प्रसिध्द केली आहे. सन 1901 मध्यें जोग व गुळवे यांनीं इंदिरा छापखान्यांत छापून प्रसिध्द केलेल्या गाथ्यांत पहिल्या प्रथम अभंगांत वर्गवारी (रूपाचें-नामपर-संतपर-करूणापर अशी वर्गवारी करून) केली; व या नव्या प्रथेची टूम प्रत्येकास आपण करावी असें वाटूं लागलें. ही गोष्ट निर्णयसागर प्रतीच्या दुस-या आवृत्तीच्या प्रस्तावनेंत स्पष्टपणें नमूद केली आहे. प्रकाशक म्हणतात कीं-
"आमची तुकारामाच्या गाथेची पहिली आवृत्ति ईशकृपेनें लवकर च संपल्यामुळें हल्लीं पुनः दुसरी आवृत्ति छापली आहे. पहिली आवृत्ति बाहेर पडतां च रा. रा. त्र्यंबक हरि आवटे, इंदिरा प्रेसचे मालक, पुणें यांनीं आपल्या पुस्तकांत ठेविलेल्या क्रमाप्रमाणें च या हि पुस्तकाचा क्रम असावा अशा अनेकांकडून सूचना आल्या व विशेषें करून स्फुट अभंग या सदरा खालील अनेक अभंग फोडून ते निरनिराळीं प्रकरणें करून त्यांत घालावे अशी श्री. तुकारामाच्या अभंगांचें निरंतर परिशीलन करणारे रा. रा. दादा बाळाजी पाटील मु. जोपुळ व कै. रा. रा. बळवंत खंडुजी पारख वगैरे मंडळींनीं फार अगत्याची सूचना केली व थोडी माहिती हि दिली त्यावरून आम्हीं या आवृत्तींत अनेक प्रकरणें करून त्या त्या प्रकरणांत ते ते अभंग घालून हें पुस्तक छापलें आहे."
तेव्हां अनुक्रमांक 1 - 5 या गाथ्यांतून कोणती तरी जुनी हस्तलिखित प्रत मिळवून गाथा छापावयाची रीत प्रथम इंदिरा प्रेसनें मोडली व त्या नव्या रीतीचा स्वीकार करून पुढील ब-या च प्रकाशकांनीं इंदिरा प्रेसचा कित्ता गिरविला आहे. इंदिरा प्रेसनें ही प्रथा कां सुरू केली याचें नीटसें उत्तर त्या प्रतीच्या प्रस्तावनेंत सांपडत नाहीं. त्यांस उत्तर नीटसें देतां आलें असतें असें हि वाटत नाहीं. कारण पूर्वींच्या माहीत असलेल्या प्रती अगोदर च प्रसिध्द झाल्या होत्या व त्या सर्व प्रती Copy Right Act प्रमाणें नोंदविलेल्या होत्या, शिवाय इतर ज्या हस्तलिखित प्रती उपलब्ध असतील त्या तेवढयाशा प्रसिध्द घराण्यांतील नसाव्यात. शिवाय जो कोणी मठाधिपति आपली प्रत वापरूं देण्यास तयार झाला असता त्यानें त्या प्रतीवर आपला व आपल्या मठाचे स्वामित्वाचा असा साहजिक च हक्क सांगितला असावा. त्या बरोबर थोडी दक्षणा हि मागितली असावी. अशा सर्व अडचणी (कायद्याच्या व इतर) चुकविण्याची शक्कल (अभंगांची वर्गवारी करावी ही) कोणा कायदा जाणणा-या माणसानें सुचविलेली असावी. तेव्हां जोग व गुळवे यांनीं माधव चंद्रोबा, गणपत कृष्णाजी, पंडित या तीन प्रतींची वर्गवारी करून नवी प्रत छापली. अशी प्रत आजवर प्रसिध्द झाली नव्हती, शिवाय त्यावेळीं पहिल्या तीन्ही प्रती बाजारांत मिळत नाहींशा झाल्या होत्या. अशा दोन्ही कारणांनीं या प्रतीचा बोलबाला झाला असावा. याचें प्रत्यंतर निर्णयसागर छापखान्याच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेंत (वर उध्दृत केलेल्या) पाहावयास सांपडतें. माडगांवकर यांनीं पहिल्यानें निर्णयसागर छापखान्यांत जी प्रत छापली ती पंडितांच्या प्रतीची नक्कल होती, पण त्यांनीं हि पुढें एक प्रत छापली ती इंदिरा प्रेसचे मालक यांनीं जी नवी टूम काढली, ती त्या वेळच्या मंडळीस पटली असावी. कारण तशा वर्गवारीचा एक उपयोग असा आहे कीं, कीर्तनकारास कोणत्या हि एका विवक्षित विषयावरील एका त-हेचीं वचनें फार श्रम न करतां चटकन् सांपडतात. पण या नव्या प्रथेनें एक नुकसान झालें व तें हें कीं माधव चंद्रोबा, गणपत कृष्णाजी व पंडित यांच्या प्रतींत चुकत माकत ज्या तुकोबारायांच्या ओळी (ओळ म्हणजे ज्या क्रमानें तुकोबास अभंग स्फुरून ते लिहिले गेले ती ओळ, ती माळ, तो क्रम,) शिल्लक राहिल्या होत्या त्या नष्ट झाल्या; व मौज अशी कीं त्याची क्षिती कोणास हि वाटली नाहीं, इतकेंच नव्हे तर वर उध्दृत केलेल्या निर्णयसागराच्या दुस-या आवृत्तीच्या प्रस्तावनेंत म्हटल्याप्रमाणें "श्रीतुकारामाच्या अभंगांचें निरंतर परिशीलन करणारें" वारकरी च ही नवी टूम स्वीकारा म्हणून अधिकारयुक्त वाणीनें सांगण्यास पुढें यावेत याहून दुसरी खेदाची व नवलाईची गोष्ट कोणती असणार ! छापील गाथ्यांच्या बहुतेक सर्व प्रतींच्या प्रस्तावना वाचून मला असें वाटूं लागलें आहे कीं, या प्रकाशकांनींच काय पण वर उल्लेखिलेल्या व त्या सारख्या इतर हरिभक्तपरायण वारकरी मंडळींनीं, तुकोबारायांचे अभंग मुळांत कसे प्रगट झाले असावेत, ते लेखनिविष्ट केव्हां व कोणीं केले असावेत, त्या अभंगांत विषयवारीनें किंवा कीर्तनाच्या अनुसंधानानें क्रम काय असावा, तसेंच एका वेळीं एका कीर्तनांत वा भजनांत कांहीं वृत्तींच्या आविष्करणास, एकाद्या रसाच्या परिपोषास, अनुसरून कांहीं क्रम असावा का, या गोष्टीचा कोठें हि केव्हां हि विचार केलेला दिसत नाहीं. या सर्व मंडळींनीं जुन्या प्रती डावलून जी नवी प्रथा पाडली ती गोष्ट परिस टाकून कांच पदरांत घ्यावी तशी झाली. नुसते सुटे सुटे अभंग छापून मोकळें होण्याची ही नवी प्रथा ह. भ. प. विष्णुबोवा जोग यांनीं स्वतः (1901 मध्यें) पाडली व अभंगांचा शब्दशः अर्थ देऊन गाथा छापण्याचें काम त्यांनीं (सन 1909 मध्यें) पत्करलें तेव्हां आपण च मुळांत अभंग स्फुट आहेत, म्हणून तक्रार करण्यास सुरवात केली. पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेंत कै. विष्णुबोवा जोग म्हणतात कीं :-
"ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या ग्रंथांची भाषा जरी निराळी भासते तरी अर्थ समजूत तुकाराम महाराजांच्या गाथ्यापेक्षां लवकर पटते, कारण त्यांत एक वेळ विषयसरणी किंवा कोणत्या विषयावर तें लिहिलें आहे, हें कळलें म्हणजे अर्थज्ञान होण्यास साधारण मनुष्यास सुध्दां सोपें पडतें. परंतु तुकाराम महाराजांच्या गाथ्यासंबंधानें तसें नाहीं; (1) त्यांच्यांत मुळींच अभंग स्फूट आहेत; (2) अभंगांत जरी विषयवारी लाविली तरी ती संगतवार जुळत नाहीं. (3) एका अभंगाचा अर्थ पुढच्याच्या अर्थास जुळत नाहीं, म्हणून अर्थ समजण्यास पुष्कळ कठीण पडतें. (4) कांहीं कांहीं रूपकें फारच कठीण आहेत. (अभंग होत असतांना जशी तुकाराम महाराजांची वृत्ती कशी होत असत. त्यांच्या वाणींत अभंग प्रगट होत असतांना त्यांची वृत्ती कशी असावी, हें ज्यास ताडतां येईल त्यासच त्यांच्या अभंगांचें खरें रहस्य कळेल."
विष्णूबोवा जोग यांनीं त्यांस ज्या अडचणी जाणवल्या त्यांची नोंद प्रांजलपणानें केली आहे. याबद्दल त्यांस धन्यवाद दिले पाहिजे. कारण आपणास अमुक एक गोष्ट नीट समजली नाहीं, उमजली नाहीं, असें कबूल करण्यास अहंकार गिळावा लागतो, तेवढा प्रांजलपणा विष्णुबोवांनीं दाखविला आहे. परंतु या नडी आपण (1901 मध्यें) स्वतः उत्पन्न केल्या हें त्यांच्या गावीं होतेंसें कोठें हि दिसत नाहीं. त्यांस आढळलेल्या नडींतून बाहेर पडण्याचा प्रयत्न त्यांनीं केल्यासारखा दिसत नाहीं. तुकोबारायांचें एक वचन असें आहे कीं :-
भुकेचे सन्नीध वसे स्तनपान उपायांची भिन्न चिंता नाहीं तसें या वचनावर टेकून विष्णुबोवांनीं आपल्या शंका-अडचणी फेडून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीं. विष्णुबोवा जोगांनीं आपली सार्थगाथ्याची प्रत बहुतांशीं पंडितांच्या प्रतीची नक्कल केलेली आहे. त्यांनीं आपल्या प्रतींत फरक करून दाखविला आहे व तो हा कीं जेथें जेथें एखादें स्वतंत्र प्रकरण पंडित प्रतींत आलें तें जोगांनीं उचलून शेवटीं अगर निरनिराळी वर्गवारी केलेसें दाखवून दुस-या ठिकाणी छापलें आहे. या दृष्टीनें जो कोणी दोन्ही प्रतींची तुलना करून पाहील त्याच्या ही गोष्ट सहज लक्ष्यांत येईल विष्णुबोवांनीं आपली प्रत (नक्कल) लिहून तयार करण्याचें काम दुस-या कोणाकडून करवून घेतलें असावें, कारण पंडितांच्या प्रतीवरून स्वतः नक्कल करतांना त्यांच्या एक गोष्ट लक्ष्यांत आली असती कीं पंडितांच्या प्रतींत कांहीं अभंगांच्या शेवटी आंकडे घातलेले आहेत. त्या आंकडयांचा अर्थ काय असा त्यांनीं आपणा स्वतःस प्रश्न विचारला असता तर त्या प्रश्नाचें उत्तर हि त्यांस सहज सुचलें असतें कींः- हे जे मधून मधून पंडितांच्या प्रतींत आकडे आहेत ते अभंगांचे लहान मोठे गट असून त्या अभंगांत अन्तर्गत दुवा आहे. विष्णुबोवांनीं म्हटल्याप्रमाणें त्या गटांत परस्पर विरोधीं वचनें येत नाहींत, इतकें च नव्हे तर तो अभंगांचा गट कोणत्या मनस्थितींत स्फुरला आहे, याचा हि निर्देश तुकोबारायांनीं कोठें केलेला आहे.
तुका म्हणे येथें करावा उकल । लागेची ना बोल वाढउनी । (पंडित प्रत 2706)
स्वतः तुकोबारायांची वरील चरणांत म्हटल्याप्रमाणें इच्छा असतांना विष्णुबोवा सारख्या अधिकारी पुरूषांस अर्थज्ञान होण्यास नडी व अडचणी कां जाणवाव्यात ? त्यांत त्यांची चूक नव्हती. तुकोबारायांच्या अभंगांची महाराष्ट्राकडून हयगय फार झाली. तुकोबारायांच्या अभंगांच्या व्यवस्थित केलेल्या नकला आज हि उपलब्ध नाहींत, इतकेंच नव्हे तर मुळांत तुकोबारायांचे अभंग कसे असावेत, किती असावेत याची हि कोणी क्षिती बाळगली नाहीं. सत्य ज्ञानाची महाराष्ट्रास चाड आहे कोठें ! समारंभ पार पाडावेत, दिवस साजरा करावा, आली वेळ निभावून न्यावी, चार वचनें गोळा करून कीर्तन, व्याख्यान व प्रवचन वक्तृत्वाचा पाऊस पाडून शेवटास न्यावें व लोकांकडून वाहवा म्हणवून घ्यावी या पलीकडे कितीसे सुशिक्षित लोक खोल पाण्यांत शिरण्याचा प्रयत्न करीत असतांना आढळतात ! भोळया वारक-यांबद्दल बोलावयास च नको. आपला परंपरागत नित्यक्रम पार पडला म्हणजे त्यानां आजचा दिवस पदरांत पडला, असा त्यांचा विश्वास ! तेव्हां त्यांच्याबद्दल ज्यास्त कांहीं एक न लिहितां सुशिक्षित पदवीधर वर्गानें आपलें कर्तव्य कां ओळखलें नाहीं याचा आपण विचार केला पाहिजे. असा विचार करूं लागावें तर असें आढळून येतें कीं आपला पूर्वकालीन पदवीधर वर्ग संस्कृत व इंग्रजी या भाषांच्या दास्यत्वांत होता. त्यांना असें केव्हां च वाटल्या सारखें आढळत नाहीं कीं ज्ञानेश्वरी व तुकोबारायांचा गाथा हे दोन ग्रंथ जगाच्या उत्कृष्ट वाङ्मयांत गणले जातील च. व आपलें भाग्य थोर, असें कीं, हे ग्रंथराज आपल्या मराठी भाषेंत आहेत. त्यांची गोडी, त्यांचा रस, हा केव्हां हि भाषांतरांत चाखतां येणार नाहीं. इतके ते ग्रंथ मराठी, अव्वल, अस्सल, आहेत. हे दोन्ही ग्रंथ वाचण्यास-शिकून-आपलेसे करण्यास आपण व्यर्थ आटाआट करावयास नको. आपली जन्मभाषा मराठी आहे. पण कोणा, किती, पदवीधरांस आंग्लाईत मराठी भाषेबद्दल एवढा अभिमान वाटला आहे ! नाहीं म्हणावयास आपल्या महाराष्ट्रांतील तिन्ही महापुरूष या दोन्ही ग्रंथांची योग्यता ओळखून होते व ते म्हणजे (1) महादेव गोविंद रानडे. (2) डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर व (3) बाळ गंगाधर टिळक. रानडयांनीं या ग्रंथांच्या आधारें भागवतधर्मावर व्याख्यानें दिलीं, तीं ग्रंथ-रूपानें प्रसिध्द आहेत. भांडारकरांनीं प्रवचनें व किर्तनें केलीं, व टिळकांनीं प्रत्येक अध्यात्मिक गोष्टीचा अनुभव सांगतांना गीतारहस्यांत ज्ञानोबांचें किंवा तुकोबांचें वचन उध्दृत करून अत्यंत आदरानें वापरलें. असो.
सुशिक्षित पदवीधरांनीं तुकोबारायांच्या अभंगांची संस्कृत व इंग्रजी या दोन भाषांच्या सासुरवासानें कशी उपेक्षा केली हा भाग वर आला आहे. त्यांचें विस्तरशः जास्त वर्णन नको. पदवीधरांमध्यें जो परस्पर पत्र-व्यवहार होतो तो पुष्कळ अंशीं इंग्रजींतून च होतो, हें एक प्रमाण बौध्दिक दास्यत्व सिध्द करण्यास पुरेसें आहे. असो, जे थोडेफार सुशिक्षित व पदवीधर या दास्यत्वांत न सांपडतां मोकळे राहिले व संतवाङ्मयाकडे वळले अशांतील प्रमुख नांव श्री. लक्ष्मणराव पांगारकर यांचें आहे. यांनी बहुतेक सर्व संत वाङ्मयावर कांहींना कांहीं लिहिलें नाहीं असें झालें नाहीं. या परिस्थितीमुळें रात्र थोडी व सोंगें फार अशी पांगारकरांची स्थिती झाली. त्यांनीं कोणत्या हि प्रश्नाचा सखोल विचार केला नाहीं. प्रत्येक गोष्ट ही महिपतीबोवांच्या हरिदासी कोटयांप्रमाणें झाली आहे, हें सिध्द करण्याची त्यांची केवढी आटाआटी ! विष्णुबोवांच्या सार्थ अभंगांच्या गाथ्यास पांगारकर यांनीं लिहिलेलें तुकोबांचें चरित्र जोडलें आहे. तेव्हां पांगारकर यांना विष्णुबोवांनी उत्पन्न केलेल्या प्रश्नांस उत्तर देणें, निदान ते प्रश्न लक्षांत घेणें, भाग होतें. पांगारकर यांनीं या प्रश्नांचा कसा निकाल लाविला तो आतां पाहूं.
"कोणत्या प्रसंगीं, कोणत्या अवस्थेंत, त्यांच्या मुखांतून, कोण कोणते अभंग बाहेर आले, ते संगतवार पध्दतीनें देणारा गाथा जर छापतां आला असता तर किती बहार झाली असती बरें !! पण येवढें भाग्य आम्हां मर्त्यांचें नाही. त्यामुळें परंपरागत आलेल्या साडे चार हजार अभंगांवरच भिस्त ठेवून आम्हीं राहिलें पाहिजे." पांगारकरांच्या या निरूपणानें कोणाचें समाधान होणार असेल तें होवो, पण माझें कांहीं त्यानें समाधान झालें नाहीं. पांगारकर स्वतः तुकाराम चरित्र लिहावयास बसले, तेव्हां विष्णुबोवा जोगांनीं उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्याचा कसा बसा प्रयत्न करणें त्यांना प्राप्त होतें, व तसा त्यांनी प्रयत्न केला आहे. पांगारकर यांनीं तुकोबांच्या चरित्राचा मुख्य आधार म्हणजे अभंग होत असें म्हणून तुकाराम चरित्राच्या प्रस्तावनेंत पुढें गाथ्यांची चर्चा केली आहे ती अशीः-
"इंदुप्रकाश गाथा, दोन सांप्रदायिक गाथे, संताजीचा गाथा, बहिणाबाईंचा गाथा, हे पांच गाथे मुख्य आहेत. थोडे फार पाठभेद आहेत. शुध्दाशुध्दतेंत फरक आहेत. पण तात्पर्यार्थाच्या बाजूनें पाहतां गाथ्या-गाथ्यांत डोंगराएवढे फरक आहेत, असें नाहीं. सांप्रदायाचे सिध्दांत माहीत असले, तुकोबांच्या विचारांचा व भावनांचा अंतरंग परिचय असला, निदान विचारांचा एकसूत्रीपणा पटलेला असला, म्हणजे कोणताहि गाथा वापरला तरी परमार्थाची विशेष हानि होण्याचा संभव आहे, असें मला वाटत नाहीं. अभंगांचे शुध्द पाठ मिळण्यास एक तुकोबांच्या हातचा, निदान त्यांना सर्वतोपरी मान्य असलेला गाथा तरी मिळाला पाहिजे. किंवा हे चारपांच गाथे बारकाईनें अभंगशः तपासून व आणखी शोध करून, एक सर्वजन मान्य होईल असा एक नवीन गाथा परंपरेच्या व संशोधनाच्या अशा दुहेरी द्दृष्टीनें तयार झाला पाहिजे. मीं हे सर्व गाथे पाहिले आहेत. विशेष महत्त्वाचे व मर्माचे अभंग प्रत्येक गाथ्यांत ताडून पाहिले आहेत. व अशा द्दष्टीनें सांप्रदाय-परंपरा यांच्या द्दष्टीनें, वारक-यांत प्रेमानें मिसळून वागल्यानें व आळंदी, देहू, पंढरी येथील परंपरेप्रमाणें कथा, कीर्तनें व पुराणें ऐकल्यानें व केल्यानें सांप्रदाय शुध्द विचारसरणी कळून येऊन तदनुरोधानें अभंगांचा अभ्यास व मनन माझें (पांगारकर) झालें आहे."
वरील विवेचनांत विष्णुबोवा जोग यांच्या प्रश्नास उत्तर आहे असें मला वाटत नाहीं. अभंग हा च जर चरित्राचा मुख्य आधार तर मग सांप्रदायिक व संशोधक द्दष्टीनें गाथा तयार करून त्या गाथ्यास धरून त्यांनीं चरित्र लिहिलें नाहीं. तसे करण्यास पांगारकर असमर्थ होते असें हि नाहीं. ते स्वतःस सांप्रदायिक म्हणवीत होते, व होईल तें संशोधन हि करीत होते. त्यांनीं मर्माचे अभंग ताडून पाहिले म्हणून म्हटलें आहे. परंतु संताजीचा गाथा त्यांनीं इतर गाथ्यांशीं ताडून पाहिला असतां, तर त्यांस कांहीं नवे विचार सुचले असते. पण गाथ्या-गाथ्यांत डोंगराएवढे फरक आहेत हें दाखविण्यासाठीं आहे. व या विवेचनांत विष्णुबोवांच्या प्रश्नांस मला सुचलेली उत्तरें येणार आहेत.
येथ वर ज्या लोकांनीं तुकोबांच्या गाथ्याचा विचार केला अशा दोन्ही लेखकांचें अभंगांबद्दलचें म्हणणें वर दिलें आहे. त्याचा निष्कर्ष एवढा च कीं त्यांनीं या विषयाचा जेवढा खोल विचार करावयास हवा होता, तेवढा केलेला दिसत नाहीं. असो, तो विचार आपण या प्रस्तावनेंत करण्याचा प्रयत्न करूं.
तुकोबारायांस कवित्वस्फूर्ति होऊन ते कवित्व करूं लागले तेव्हां त्यांस बाळबोध लिहिण्याची संवय नव्हती. ती संवय व्हावी म्हणून त्यांनीं एक वही तयार करून बालक्रीडा लिहावयास सुरवात केली, असें विधान महिपतीबोवांनीं आपले संतलीलामृतांत केलें आहे. मी तें विधान बरोबर आहे असें मानीत नाहीं. कवित्वस्फूर्ति होण्यापूर्वी तुकोबांनीं कांहीं पाठ केलीं संतांचीं वचनें, म्हणून स्वतः म्हटलें आहे. तीं वचनें त्यांनीं मोडींत लिहून घेतलीं होतीं कां? मी कां ? महिपतीबोवांचें वचन एवढया च पुरतें उध्दृत केलें आहे कीं कवित्वस्फूर्ति होऊन तुकोबांस जेव्हां अभंग स्फुरत तेव्हां ते अभंग तुकोबा स्वतः लिहून ठेवीत होते. अशाबद्दल वह्या बुडविल्यानंतर तुकोबांनीं जेव्हां पांडुरंगावर वह्या तारण्याचा भार घालून, अन्नपाणी वर्ज करून, धरणें धरून, दिव्य केलें तेव्हां एका अभंगांत म्हटलें कीं हातीं न धरी लेखणी, (पं. 2228)तेव्हां तुकोबा स्वहस्तें अभंग लिहीत होते ही गोष्ट त्यांच्या अभंगानें सिध्द होत आहे. याशिवाय तुकोबांचें "बुडविल्या वह्या बैसलों धरणें (पं. 1333 चरण 16) हें हि वचन अभंगांतील आहे. तेव्हां या दोन चरणांवरून येवढें अनुमान करतां येतें कीं तुकोबा स्वहस्तें अभंग लिहीत होते व अशा अभंग लिहिलेल्या वह्या एकाहून कांहीं तरी ज्यास्त बुडविल्या गेल्या होत्या. अशापैकीं तुकोबारायांच्या नंतर उपजलेले नारायणबोवा गोसावी यांच्या घराण्यांत एक तुकोबारायांच्या हातची म्हणून पूजेंत आहे. या वहींतील बरचिंशीं पृष्ठें दक्षणा देऊन नात्यागोत्याच्या किंवा इतर पैसेवाल्या लोकांनीं काढून प्रसाद म्हणून नेलेलीं आहेत. त्यांपैकीं जेवढीं पृष्ठें आज उपलब्ध आहेत, त्यांत असलेले सर्व अभंग त्याच क्रमानें यापुढें छापले आहेत. त्यावर **अशी खूण केली आहे. वहींतून प्रसाद म्हणून बाहेर गेलेलीं दोन पृष्ठें मला मिळालीं आहेत, त्यावरील अभंग हि पुढें 108-118 व 354-57 असे छापले आहेत. तुकोबांनीं ही वही स्वहस्तें लिहिलेली, बुडविली होती. अशी पूर्वीपासून वारकरी सांप्रदायांत ही परंपरागत हकीगत माहीत होती. यामुळें ज्यांना या वहीवरून नकल करून घेतां येत असेल असे कांहीं विशेष भाविक लोक या वहीवरून नकल करून घेतां येत असेल असे कांहीं विशेष भाविक लोक या वहीवरून नकला करून घे असावेत. मला अशी एक नक्कल सख्या हरि शिंपी या पंढरीच्या आस्थेवाईक वारकरी गृहस्थांकडे आढळली. ती त्यांनीं मला कांहीं दिवस कृपाळू होऊन वापरावयास दिली. त्यावेळीं मीं त्या वहीची नक्कल करून घेतली. या वहींतील पहिल्या पृष्ठावर "भिजल्या वहींतील अभंग" म्हटलें आहे. या दोन्ही वह्यांचें वर्णन पुढें देणार आहे. पण येथें अभंगांबद्दल जें विवेचन करीत आहे तें पुरें करून घेऊं. तेव्हां तुकोबांनीं ज्या वह्या बुडविल्या त्या खात्रीनें च अस्सल वह्या समजण्यास प्रत्यवाय नाहीं. या वह्या एकाहून कांहीं तरी जास्त होत्या याबद्दल हि संशय नाहीं. तेव्हां त्या सर्व वह्या अस्सल आहेत. यानंतर या वह्यांवरून केलेल्या नकला, नकला बरोबर केल्या गेल्या असल्या तर, अस्सल, पण दुय्यम प्रतीच्या, म्हणून समजण्यास हरकत नाहीं. वह्या तरल्यावर गांवोगांवचे लोक येऊन नकला करून घेऊन गेले असें महिपतीबोवांनीं म्हटलें आहे. अशा पैकीं एक नकल येथें छापली जात आहे.
सख्या हरीच्या ज्या पूर्वजानें ही नक्कल स्वतः किंवा लेखकाकडून करवून घेतली, त्यानें ही नक्कल तेवढया काळजीपूर्वक केली आहे असें मला म्हणवत नाहीं. आज देहूकरांच्या घराण्यांत पूजेंत असलेल्या वहींत जे अभंग आहेत ते हि सख्या हरीच्या पूर्वजानें किंवा त्याच्या लेखकानें सर्वच्या सर्व लिहून घेतले नाहींत. परंतु त्या लेखकानें एक गोष्ट नक्कल करतांना संभाळली आहे. ती ही कीं लेखकानें अभंगांत शब्द बदलल्याचें उदाहरण कोठें हि आढळलें नाहीं. तेव्हां सख्या हरि शिंपी याच्या पूर्वजांनीं स्वतः केलेली किंवा करविलेली नक्कल ही अस्सल वह्यांच्या खालच्या पायरीवर आहे.
या वही शिवाय संताजी तेली जगनाडे हे तुकोबारायांचे टाळकरी होते. त्यांनीं स्वहस्तें लिहीलेल्या दोन त्रुटित वह्या छापवून प्रसिध्द करून कै. विनायक लक्ष्मण भावे यांनीं मराठी सारस्वतावर फार थोर उपकार केले. पांगारकर यांना संताजीच्या वह्यांचा सुगावा लागला व ती अदभुत गोष्ट त्यांनी सन 1903 मध्यें केसरींत प्रसिध्द केली. त्यानंतर विश्वनाथ काशिनाथ राजवडे यांनी जगनाडा म्हणून एक लेख ग्रंथमालेंत लिहिला. त्यानंतर राजवाडे यांच्या सांगण्यावरून महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनीं कांहीं अभंग भारत-इतिहास-संशोधक-मंडळाच्या इतिवृत्तांत छापले पण तुकोबारायांचे संताजीच्या वह्यांत आढळले ते सर्व अभंग गोळा करून अस्सल बरहुकूम नकल करून घेऊन भावे यांनीं छापले. या संताजींच्या दोन्ही वह्या त्रुटित आहेत त्यांचीं सुरवातीचीं व शेवटची पृष्ठें हि प्रसाद गेलेलीं आहेत. संताजीबोवा हे तुकोबांचे एक टाळकरी होते. ही गोष्ट स्पष्ट आहे. तेव्हां त्यांस स्वतः करून घेतल्या आहेत. देहूकर घराण्यांत जी वही आज विद्यमान आहे, त्या वहीशीं जर संताजींची वही लावून पाहिली तर जे थोडे अभंग दोन्ही वह्यांत समान आहेत. त्यांत किरकोळ लेखनाच्या चुका पलीकडे दोन्ही वह्यांत फारसा फरक आढळत नाहीं. पण फरक नाहीं, असें नाहीं पुढें छापलेल्या अभंगांत * * असे नक्षत्रांकित अभंग हे देहूकरांच्या घरीं जेवढी वही आज विद्यमान आहे, त्या वहींतील आहेत. तेव्हां ज्या वेळी कोणत्या एखाद्या वहींत या नक्षत्रांकित अभंगांच्या क्रमाशी जुळत असलेला अभंगांचा क्रम आढळेल तेव्हां सकृद्दर्शनीं ते अभंग केव्हां तरी मूळ वहीवरून नकल करून घेतले होते असें गृहीत धरून ती वही काळजीपूर्वक तपासली पाहिजे. दुसरी गोष्ट आपण अशी लक्ष्यांत ठेविली पाहिजे कीं संताजी तेली व गंगाराम मवाळ हे तुकोबांचे लेखक होते. ते कीर्तनांत अभंग स्फुरत तेव्हां लिहून घेत असें वर्णन महिपतीबोवांनीं केलें आहे. तें विधान विश्वासार्ह आहे असें वाटत नाहीं. परंतु तें विधान विचारांत घेण्याजोगें आहे येवढें खरें. तें विधान विचारांत घेऊन मी एवढें अनुमान करतों कीं संताजी तेली व गंगाराम मवाळ या उभयतांस तुकोबारायांच्या वह्या या केव्हां हि नकल करून घेण्यास उपलब्ध होतील त्या वह्या अस्सल पण दुय्यम प्रतीच्या म्हणून समजण्यास हरकत नाहीं. संताजी सारखी गंगाराम मवाळानें स्वहस्तें लिहिलेली एक हि वही आजवर उपलब्ध झाली नाही. मवाळांच्या घराण्यांत एक गाथा दाखवितात पण तो पंढरीत देहूकरांच्या घराण्यांत जो गाथा आहे त्या च वेळचा आहे. पंढरींत तुकोविप्राचें एक घराणें आहे. तुकाविप्र हा तुकोबांच्या नंतर 100-125 वर्षांनीं झाला. त्यावेळचा त्यांच्या घराण्यांत गाथा आहे. परंतु तो गाथा मवाळांचा गाथा, देहूकरांच्या,-(पंढरींतील) घरांतील गाथा, हे सर्व कोणी तरी अभंग गोळा करून व्यवस्थित लावून, सर्वत्रांस उपयोगी पडावा, म्हणून जो गाथा तयार केला त्याच्या नकला आहेत. या नकलांत संताजीच्या वह्यांत अभंग जसे होत गेले तसे लेखनिविष्ट झालेले सांपडतात तसे सापडत नाहींत. या तिन्ही प्रतीबद्दल पुढें जास्त विवेचन करूं. पण त्यापूर्वी संताजीच्या वह्यांचें विवेचन पूर्ण करून घेऊं.
संताजी तेली हा त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणें सुरवातीस साक्षर असावा असें मला वाटत नाहीं. संताजीच्या वह्यांत एक च शब्द दोन-क्वचित्-तीन त-हांनीं लिहिलेला आढळतो. याचा अर्थ एवढाच समजावा कीं संताजीबोवा हे जेव्हां समोर दुसरी वही ठेवून नकल करीत. -तेव्हां नक्कल बरीचशी शुध्द करीत; व जेव्हां पाठ केलेले-झालेले-अभंग लिहीत तेव्हां नक्कल बरीचशी अशुध्द होई. कै. विनायकराव भावे यांनीं संताजीच्या वह्या हाच अस्सल गाथा होय, ही गोष्ट सिध्द करण्याचा जो अट्टाहास केला, त्या प्रयत्नांत, त्यांनीं दोन्ही वह्या छापवून महाराष्ट्रास आदरयुक्त भावनेनें न दिल्यामुळें त्या वह्यांचा महाराष्ट्रांत व्हावा तसा प्रसार झाला नाहीं. तसा प्रसार होऊन दुस-या जुन्या वारकरी घराण्यांतील विद्यमान पुरुषांस आपल्या संग्रहीं असलेल्या वह्या भारत-इतिहास-संशोधक-मंडळांत नेऊन दाखवाव्यात असें हि वाटलें नाहीं. भावे यांनी वह्या छापून प्रसिध्द केल्या हे महाराष्ट्रावर उपकार झाले. परंतु त्या वह्यांस जी प्रस्तावना जोडली आहे ती येनकेन प्रकारेण तुकोबांस कमीपणा देण्याच्या उद्देशानें लिहिलेली असल्यामुळें भावे यांच्या हातून नुकसान हि फार झालें. असो. भावे यांनीं ज्या वह्या छापल्या आहेत त्या संशोधनाच्या द्दृष्टीनें जेवढया व्यवस्थित छापल्या जावयास हव्यात तशाच म्हणजे ओळीस ओळ, अक्षरांत, यत्ंकिचित् फरक न करतां अक्षर बरहुकम अक्षर, अशा छापल्या गेल्या आहेत. त्या दोन्ही भागांस त्यांनीं अभंगांची अनुक्रमणिका जोडली नाहीं, येवढा च त्या प्रतींत दोष आहे. संताजीच्या हस्ताक्षराचा नमुना म्हणून त्यांनीं एका पृष्ठाचा फोटो हि दिला आहे. दोन्ही भाग प्रसिध्द करतांना त्यांनीं वेगवेगळाले प्रसिध्द केले होते. व पुढें दोन्ही भाग एकि बांधून प्रसिध्द केले आहेत. या दोन्ही वह्यांपैकीं दुस-या भागाची वही आज हि संताजी तेली जगनाडे यांचे विद्यमान वंशज मनोहर हरिश्चंद्र जगनाडे, तळेगांव दाभाडे, यांचेकडे कोणास हि पाहावयास सापडते. पहिला भाग ज्या वहीवरून छापला, ती वही, पनवेल येथील जगनाडे यांच्या हातून दुस-याच्या हातीं गेली आहे; व तो मनुष्य त्या वहीची कोणास हि दाद लागूं देत नाहीं. कांहीं हि सबब सांगून झुकांडी देतो. पनवेल येथील जगनाडे यांनीं ती वही परत आणून मला दाखविण्याचा फार प्रयत्न केला पण हा गृहस्थ कांहीं त्या माणसास बधत नाहीं. असा हा गृहस्थ त्या वहीचा स्वतः उपयोग करीत नाहीं. दुस-यास करूं देत नाहीं. तेवढयानें कांहीं बिनसणार आहे, असें मला वाटत नाहीं. कारण वर म्हटल्याप्रमाणें ही नक्कल अस्सल बरहुकूम झाली आहे. हें मीं स्वतः पाहिलें आहे.
पहिली वही प्रसिध्द करतांना रा. भावे यांनीं विज्ञाप्ति म्हणून लहान च दोन पृष्ठांची प्रस्तावना लिहिली आहे. त्यांत भावे यांनीं खालील उद्गार काढले आहेत.
(1) "तुकारामाच्या अभंगांना नीटनेटकें नागर स्वरूप रामेश्वर भटानें दिलें. व मग नागर स्वरूपांत त्याचा प्रसार सर्वत्र झाला. अशी एक आख्यायिका महाराष्ट्रांत ऐकूं येते. ही रामेश्वर भटाची झिलई चढण्यापूर्वीचें अस्सल रूप आपणांस या जगनाडी संहितेंत पाहण्यास सांपडेल. तुकाराम महाराजांच्या मुखांतून या बहुमोल अभंगांची वाणी कोणत्या स्वरूपांत प्रगट होई याचा हि अंदाज बांधण्यास यापासून मदत होईल." दुस-या भागास अस्सल गाथा म्हणून भावे यांनीं जी प्रस्तावना जोडली आहे, त्यांत खालील विधानें केलीं आहेत.
(2) महिपतीबोवा ताहराबादकर यांनीं गंगाराम मवाळ व संताजी तेली जगनाडे हे तुकोबांचे लेखक होते म्हणून म्हटलें आहे.
(3) तेव्हां गंगाराम मवाळ यांच्या हातचा किंवा इतर कोणा टाळक-याच्या हातच्या गाथा सापडल्यास तो हि या (संताजीच्या) गाथ्याच्या तोलाचा समाजावा लागेल.
(4)कदाचित् पुढें मागें खुद्द तुकारामाच्या हातचा गाथा सांपडल्यास तो मात्र या (संताजी) हून निःसंशय वरच्या दर्जाचा अस्सल होय हें निर्वीवाद होय.
(5) असें दिसतें कीं संताजी हा तुकारामाच्या सेवेंत राहूं लागला तेव्हां त्याचें वय 20/25चे सुमारास होते.रत्त
(6) अनेक वर्षें तुकारामाच्या निकट सान्निध्यांत भक्तिप्रेमानें राहिल्यावर या चुणचुणीत तरुण मुलानें आपल्या गुरूजीची प्रत्येक गोष्ट पूर्णपणे उचलली असली पाहिजे.
(7) संताजीच्या शुध्दलेखनापेक्षां तुकारामाचें लिखाण कांहीं विशेष निराळें असेल असें मला वाटत नाहीं.
(8) तुकारामास लिहिता येत होतें हें अगदीं निःसंशय आहे. परंतु स्वतःचें कवित्व तो लिहून ठेवीत असेल असें मला वाटत नाहीं.
(9) तो कीर्तनांत उभा राहिला म्हणजे तेथल्या तेथेंच अभंग रचून म्हणे व ते टाळकरी पाठ करीत किंवा मागाहून लिहून ठेवीत असा क्रम असावा.
(10) तुकारामानें स्वहस्तें लिहून ठेविलेल्या त्याच्या अभंगांच्या वह्या तेव्हां नव्हत्या, हल्लींहि नाहींत व तशा उपलब्ध होतील असा संभव दिसत नाहीं.
(11) संताजीनें एकंदर चार वह्या लिहिल्या होत्या असें त्याचे वंशज सांगतात.
(12) या वह्या संताजीने कशा लिहिल्या तें समजण्यास साधन नाहीं.
तेव्हां वर भावे यांचीं जीं मुक्ताफळें उध्दृत केलीं आहेत ही त्यांच्या बुध्दिमत्तेची आतषबाजी आहे ! ती त्यांस उत्तम साधली आहे ! भावे यांच्या विधानांचा आतां थोडक्यांत विचार करूं. तुकोबारायांच्या अभंगांस रामेश्वर भट झिलई चढवीत होते, ही आख्यायिका मला देहू, आळंदी व पंढरपूर येथें कोठें हि ऐकूं आली नाहीं व तशी आख्यायिका प्रसृत होणें शक्य नाहीं; कारण रामेश्वर भटाची तुकोबारायांशीं गांठ पडण्यापूर्वी च तुकोबांच्या अभंगांची कीर्ति महाराष्ट्रभर पसरली, सर्व साधारण लोक तुकोबांस मानूं लागले, तेव्हां कपाळाची तिडीक उठून रामेश्वर भटानें दिवाणांत फिर्याद दाखल केली. तुकोबांस देहू सोडावें लागलें, कवित्व बुडवावे लागले. तेव्हां भावे यांनीं नमूद केलेली ही आख्यायिका स्वकपोलकल्पित लोणकडी आहे. बरें रामेश्वर भटानें ठेवी मस्तकी हात-अशी विनंती केली त्या वेळीं पण दुस-या प्रसंगानें तुकोबांच्या कवित्वाबद्दल जे उद्गार काढले आहेत कींः-तुकोबा-
॥ अमृताची वाणी । वरूषाला शुध्द । करी त्या अशुध्द । ऐसा कोण । या उद्गारानें तुकोबारायांच्या वचनास हात लावून झिलई चढविण्याचा प्रयत्न रामेश्वर भटानें केला असेल असें वाटत नाहीं. आतां प्रचलित आख्यायिका च पहावयाची तर अशी आहे कीं रामेश्वरभटाचें पुस्तकी ज्ञान हें कांहीं दुरुस्त्या अभंगांत सुचवूं लागलें. तेव्हां त्यास द्दृष्टांत होऊन त्यांची समजूत घातली गेली. ॥ "मिळोनी गौळणी यशोदे देती गा-हाणीं" ॥ या गवळणींतील तिस-या चरणांत "मुखमळीण उभा हाडतीय घोणे" ॥ (पंडित 388) असे शब्द आहेत. रामेश्वर भटानें "मळीण" याबद्दल "म्लान"असा पाठभेद सुचविला तेव्हां त्यास द्दृष्टांतांत असें सांगण्यांत आलें कीं, "बा, मला असें काय कमी आहे कीं त्या विचारानें माझें मुख 'म्लान' व्हावें. मी गोपाळांबरोबर मातींत खेळत होतो, तेव्हां माती तोंडावर उडून मुख मलीन झालें होतें, तें मी जाऊन यशोदेच्या पदरानें पुसलें." मला वाटतें हा किंवा असा कांहीं द्दष्टांत पोटी धरून रामेश्वर भटानें अमृताची वाणी वरुषला शुध्द असा मुद्दाम च शब्द योजला असावा. तेव्हां भावे यांनीं दिलेली आख्यायिका कशी हि पाहिली तरी चूक आहे. संताजीबोवा व तुकोबाराय यांचे संबंध काय होते याबद्दल महिपतीबोवा ताहराबादकर यांनीं जें लिहिलें आहे त्या पलीकडे कोणास कांहीं जास्त माहिती नाहीं. तेव्हां संताजी हा 20/25 वर्षांचा होता, तेव्हांपासून तुकोबांच्या सेवेंत राहूं लागला वगैरे ज्या अघळपघळ गोष्टी वाचकांनीं सोडून द्याव्यात. "तुकोरामाचें लिखाण संताजी पेक्षां निराळें असेल असें मला वाटत नाहीं." असें भावे यांनीं ठासून विधान केलें आहे. पण प्रत्यक्ष परिस्थिति अशी आहे कीं, देहूकरांच्या घरांत पूजेंत असलेली वही व संताजी यांची वही या दोन्ही वह्या मी एकमेकांस लावून पाहून सांगत आहें कीं, तत्कालीन लेखनपध्दती प्रमाणें तुकोबांच्या लेखनांत शुध्दलेखनाची चूक नाहीं; तुकोबा स्वतःचें कवित्व स्वतः लिहून ठेवीत होते व त्यांनीं स्वहस्तें लिहिलेल्या एकाहून जास्त वह्या होत्या.
तुकोबा स्वतःचें कवित्व स्वतः लिहून ठेवीत नव्हते असें जें भावे यांनीं लिहिलें आहे तें चूक आहे हें मीं सप्रमाण वर दिलें आहे च. तुकोबा कीर्तनांत अभंग करून म्हणत व केव्हां लिहीत याचें विवेचन पुढें योग्य स्थळीं केलें आहे. तेव्हां त्याची द्विरुक्ती येथें करीत नाहीं. तुकोबा स्वतः अभंग लिहीत असत व अशा अभंग लिहिलेल्या वह्या त्यांनीं बुडविल्या ही गोष्ट मीं वर अभंगांतील वचनें दिलीं आहेत त्यावरून स्पष्ट आहे. तेव्हां भावे यांनीं भाषेच्या रूपापलिकडे व ओबडधोबड लिहिण्यापलिकडे जावून संताजीच्या वह्यांत काय नाविन्य आहे हें शोधलें असतें तर त्या वह्यांत त्यांस रत्नांच्या खाणी सापडल्या असत्या. पण त्या खाणी भावे यांस नको होत्या, त्यांस प्रस्तावनेचे निमित्त करून तुकोबांवर राजवाडे कंपूंतील एक म्हणून तोंडसुख घ्यावयाचें होतें, तें त्यांनीं यथेच्छ पोटभर घेतलें. असो, आतां संताजीच्या वह्यांत अपूर्व काय आहे तें आपण पाहूं.
संताजी हे कांहीं पढीक विद्वान शास्त्री पंडित नव्हते; व्यवसायानें तेली असल्यामुळें त्यांस कांहीं अक्षर ओळख असेल असें हि गृहित धरावयास नको. ते केव्हां तरी कीर्तनांत वा भजनांत आकर्षिले गेले, त्यांचें मन कीर्तनांत समाधान पावलें व ते तुकोबारायाकडे येऊं जाऊं लागले असावेत; संताजी मुळचे चाकणचे. तेव्हां ते सदा सर्वकाळ तुकोबाचे जवळ राहत असावेत असें म्हणावयास कांही आधार नाहीं. संताजी व तुकोबा यांच्या एकमेकांच्या वयांत अंतर किती होतें हें सांगण्यास कांहीं साधन नाहीं. परंतु तुकोबांच्या निर्याणानंतर ते पुष्कळ वर्षे हयात होते. तेव्हां ते तुकोबांपेक्षा असले च तर थोडे फार लहान होते असें आपण गृहीत धरूं. अभंगांची गोडी लागल्यावर संताजी अभंग पाठ करूं लागले असावेत. तेव्हां त्यांनीं पाठ केलेले अभंग ते लिहीत तेव्हां तोंडीं उच्चार बसला असेल तसें अशुध्द लिहीत व जेव्हां दुस-या पोथीवरून नकल करीत तेव्हां शुध्द लिहीत. संताजी केव्हां हि तुकोबांचे स्वतःचे लिखाण समोर ठेवून नकल करून घेण्यास मोकळे होते म्हणून त्यांनीं आपले कडून नकल कसोशीनें केली आहे. देहूकरांच्या घराण्यांतील मूळ वहींतः दोन शुन्यांची खूण करून चरण तोडण्याची जी त-हा आहे. ती त-हा संताजीनें बरोबर उचलली आहे. संताजींनीं काळी व तांबडी शाई अशी मूळ वहीची नक्कल केली नाहीं संताजींची तळेगांव येथील वही देहूच्या इनामदारांच्या घराण्यांतील त्रुटीत मूळ वहींत नसलेली एक गोष्ट संताजीनें केली आहे व ती ही कीं त्यांनीं ठिकठिकाणीं कांहीं अभंगांचे गटाचे शेवटीं आकडे घातले आहेत. यामुळें तुकोबांनीं कोणत्या निमित्तानें कोणते अभंग केलें हें कळतें. (मूळ वहींत अभंगांचे गटाचे शेवटीं आकडे नाहींत.) संतांजींच्या या अभंग वेगळे दाखविण्याच्या पध्दतीनें एखाद्या वेळीं एक अभंग झालेला असला तर तो त्यांनीं तसाच लिहून शेवटीं 1 असा आकडा घातलेला पाहिला कीं त्यावेळेपुरता तो विषय द्दष्टीआड झाला असें समजावयास हरकत नाहीं. एक हा आकडा 722 / 741/749 व 1294 या अभंगांचे शेवटीं आहे. असेच 2/3/4/5 असे हि आकडे ठिकठिकाणीं आहेत. कांहीं अभंगांचे गटाचे शेवटीं आकडे घालावयाचे राहिले आहेत. पण एका ओघानें बरेचसे अभंग आपण वाचीत आलों तर ओघ कोठें बदलतो हें चटकन लक्ष्यांत येते. लहान मोठया गटा गटांच्या पुष्कळशा अभंगांच्या अभ्यासानें तुकोबांच्या कवित्वाची झरवणी कशी झुळू झुळू वाहत होती हें लक्ष्यांत येतें. ही गोष्ट दुस-या कोणत्या हि गाथ्याच्या अभ्यासानें होणारी नाहीं. संताजीच्या गाथ्यांत ठिकठिकाणीं सरस पाठ आहेत. ते सरस पाठ चुकलेले असावेत असें वाटून नक्कलकारांनीं विध्दतशुध्दी केलेलीं दोन स्थळें उदाहरणार्थ देतो. संताजीमधील 652 वा अभंग पहा-जाणे भक्तीचा जीव्हाळा । तो ची देवाचा पुतळा ॥1॥ हा पाठ पंडीत यांच्या प्रतींत (730) असा च आहे. पण ओळीचा गाथा, (1153) निर्णयसागर (2057) देवडीकर 374 यांत दैवाचा पुतळा असा पाठ आहे. या अभंगांतील तिसरे चरण नामरूपी मीनलें चीत । असें आहे-तें सर्व प्रतींत जडलें असें बदललें आहे. मीनलें व जडलें यांत फरक आहे. व तो फरक अर्थपूर्ण आहे. (2) संताजीमधील अभंग 1126 हरी तुझी कांती रे सावळी । मी रे गोरी चापयाची कळी । तुझीया स्परूशें होईन काळी । यातील "स्परूशे" हा शब्द पंडीत 390, ओळींचा गाथा 651, देवडीकर 3790 निर्णयसागर 125 व इतर गाथे यांत "दर्शनें" असा येतो. या दोन शब्दांतील भेद स्पष्ट आहे. व "स्परुशे"हा पाठ निःसंशय श्रेष्ठ आहे.
असे श्रेष्ठ पाठ संताजीच्या गाथ्यांत ठिकठिकाणीं आहेत. संताजीच्या गाथ्यांत अभंग हे असे गटागटानें आलेलें असल्यामुळें त्या अभंगांत एकमेकांस जोडणारा दुवा आपल्या लक्ष्यांत येतो. व त्या एका प्रसंगाच्या अभंगांचा गट आपण अभ्यासिला तर अभंगाच्या एकमेकांच्या संदर्भानें अर्थ लागण्यास फार मदत होते. याची दोन उदाहरणें देतों.
(1) संताजी अभंग 305 ज्ञानीयांचे धरीं चोजवितां देव । हा अभंग पंडीत 1536 ओळीच्या गाथा 1892 देवडीकर 1040 निर्णयसागर 1297 असा आला आहे. पण एका हि प्रतींत या अभंगापूर्वी आम्हां घरीं गाये । येकी दुभता हे । हा अभंग आलेला नाहीं. संताजी गाथ्यांत अभंग 296 पासून जो ओघ वाहतो आहे, त्याचा कळस-आम्हां घरीं येकी गांय दुभता हे । हें सांगण्यांत होतो व लगेच ज्ञानीयांचें घरीं चोजवीतां देव । असें म्हणून फरक दाखवून ती ओळ 307 या अभंगाशीं संपते. आम्हां घरी येकी गाय दुभताहे । व ज्ञानीयांच्या घरीं चोजवीतां देव । हे एकमेकांस परस्पर विरुध्द अभंग आहेत. ही गोष्ट दुस-या कोणत्याहि कारणानें लक्ष्यांत येण्याजोगी नाहीं.
(2) संताजी अभंग 930 भक्ती प्रेमसुख नेणवे आणीकां । हा अभंग पंडीत 3048 ओळीचा गाथा 2013 निर्णयसागर 3215 देवडीकर 1099 असा आला आहे. पण कोणत्या हि गाथ्यांत संताजीमध्यें आहेत असे आधींचे 2/3 अभंग नाहींत. संताजीमध्यें अभंग 928 मध्यें, तुका म्हणे मुगुट मणी हे भक्ती । असें सांगून 929 मध्यें भक्तांचा महिमा भक्तची जाणती । असें सांगून भक्त सुख कोणते भोगतात तें सांगून पुढें अभेदूनी भेद राखीयेला अंगी वाढावया जगीं प्रेमसुख । असें सांगितलें व या अभंगाचा शेवट तुका म्हणे हे आहे तया ठावे । जीहीं एकाभावे जाणीतले या उलट भक्ती प्रेम सुख नेणवे आणीका । पंडीत वाचका ज्ञानीयांसी ॥धृ॥ आत्मनिष्ठ ज-ही जाले जीवन्मुक्त । त-ही भक्तीसुख दुर्लभ त्या ॥धृ॥ संताजीच्या तिस-या चरणांत व इतर गाथ्यांतील तिस-या चरणांत हि फरक आहे. तसेंच पुढील अभंग भक्ती प्रेम सुख ज्यांना लाभलें (931) त्यांनीं साठविला हरी जीहीं हृदय मंदीरी व या च ओळीचें आणखी तीन अभंग पुढें आहेत. पांगारकरांनीं सर्व वर्माचे अभंग सर्व गाथ्यांत ताडून पाहिले म्हणून म्हटलें, पण हें संताजीच्या गाथ्यांत आढळणारे भक्तीप्रेम सुखाचें निरूपण त्यांच्या तुकारामचरित्रांत कोठेंच आढळत नाहीं. तात्पर्य संताजीच्या गाथ्याचा कोणी तितक्या कसोशीनें अभ्यास च केला नाहीं. संताजीच्या गाथ्यानें इतर गाथ्यांत ओळी कशा बदलत गेल्या हें समजण्याचें साधन सांपडतें तें साधन असें कीं, संताजी मधील एक ओळ घेऊन ती दुस-या गाथ्याशीं लावून पाहिली म्हणजे संताजी व पंडित, ओळीचा गाथा व इतर हस्तलिखीत गाथे यामध्यें फरक कसा पडत गेला तें लक्षांत येतें. संताजीमध्यें 765-770 ही एक ओळ आहे. हे अभंग पंडीतांच्या प्रतींत 2309/10 असे आहेत. त्यापुढील चारी अभंग त्र्यंबक कासाराच्या संग्रही पूर्वीच 361 । 1143 । 1144 । 1145 या क्रमानें होते. तेव्हां ते अभंग त्यानें 2310 नंतर लिहून घेतले नाहींत, तशी कांहीं नोंद हि केली नाहीं; व तुकोबांची संताजीच्या गाथ्यांत संग्रहीत झालेली ओळ जी एकदां बिघडली ती कायमची बिघडली. संताजी 475-482 ही हि एक ओळ आहे. यांत लक्षांत ठेवण्याजोगा गोष्ट अशी आहे कीं, 475 व 476 हे अभंग पूर्वी 302 व 303 असें आले आहेत. तरी ते संताजीनें या ओळींत पुनः उध्दृत केले आहेत. कारण असें कीं या दोन्ही प्रसंगांचे वेळीं या अभंगानीं निरनिराळें कार्य होत होतें. ते उपटसुंभासारखे - अनारिसे दिसत नव्हते, हे संताजींनीं प्रत्यक्ष पाहिलें असल्यामुळें, त्यांनीं आळस केला नाहीं. दोन्ही कीर्तनें-भजनें त्यांनीं वेगवेगळीं लिहून घेतलीं. 475-82 हे अभंग वरील दुस-या कोणत्या छापील किंवा हस्तलिखित प्रतींत या ओळींनें आले नाहींत. 765-70 या अभंगांबद्दल जें वर विवेचन केलें आहे तें या अभंगांस हि लागू आहे असें आढळेल. असा या संताजीच्या गाथ्याचा गाथ्या-गाथ्यांत फरक कसा पडत गेला हें समजण्यास मला फार उपयोग झाला. संताजीनें आरत्यांच्या शेवटी 1568 पार्थिव संवत्सर आश्विन शुध्द पौर्णिमा व तीर्थावळीचे अभंगाचे शेवटीं शके 1610 विभवनाम संवत्सरे अमावास्या शुक्रवार मिती दिल्या आहेत. यावरून मी येवढें च अनुमान काढावयास तयार आहे कीं तुकोबारायांच्या निर्याणापूर्वी कांहीं वर्षे संताजी बोवा अभंग लिहूं लागले होते व तें काम 40/45 वर्षे चालूं होतें. तेव्हां भावे यांनीं नमूद केल्याप्रमाणें संताजीनें लिहिलेल्या तुकोबांच्या निर्याणानंतर संताजीनें मिळतील तेवढे महाराजांचे अभंग गोळा करून संग्रहीत केलेले असावेत व रोज नित्य नेमानें त्यांची उजळणी करीत, तुकोबांचीं कीर्तनें, भजनें, आठवीत संताजी बोवा आपल्या आयुष्याचे दिवस कंठीत असावेत. संताजींनीं नकला केल्या. त्या मुळावरून केल्या व कोणती ओळ कुठें सुरू होते, व कोठें संपते, हें सांगण्यास कांहीं दिवस लेखक च स्वतः हजर होते. तेव्हां त्यांनीं अभंगाचे शेवटीं घातलेला आंकडा पाहून त्या वेळेपुरता तो विषय संपला असें समजलें पाहिजे. संताजीस अस्सल वह्या नकल करण्यास उपलब्ध होत्या, संताजींनीं पुष्कळशा भजनांत आज क्षेपक म्हणून गणलें जातात, अशा अभंगापैकीं अभंग आले तर ते क्षेपक अभंग निवडणारांची चूक आहे असें खुशाल समजावें. येथवर संताजींच्या प्रतींत मला आढळणारे गुण सांगितलें. त्या वहींत दोष दाखवावयाचा तर सर्व च अभंगांचे गटाचे शेवटीं आकडे घालण्यास हे भक्त विसरले कसें येवढा च दोष आहे. त्यांनीं अभंग काय कारणानें झालें हें सांगितलें असतें तर दुधांत साखर पडल्या सारखें झालें असतें.
महाराजांच्या निर्याणानंतर संताजीसारख्या निस्सीम भक्तानें अभंगाचा संग्रह गोळा करून जे अभंग लिहून घेतले असतील ते वगळले तर तुकोबांच्या घराण्यांत किंवा दुस-या कोणा हि टाळक-याच्या संग्रहीं अभंगांचा संपुर्ण संग्रह सापडूं नये याचा खेद वाटतो, लाज हि वाटते. मराठी राज्यांत संस्कृताची व इंग्रजी राज्यांत इंग्रजीची सुशिक्षित वर्गाच्या मनावर एवढी छाप होती कीं कोणा हि थोर सुशिक्षित पुरुषास तुकोबांचे अभंग रत्नभांडार गोळा करावें अशी इच्छा झाली नाहीं. वारकरी मंडळींत हि एका पुढें एक शिष्यपरंपरा तेवढया अधिकाराची, आस्थेची, असते च असें नाहीं. तात्पर्य तुकोबांस ज्यांनीं प्रत्यक्ष पाहिलें होतें अशा संताजींसारख्या व्यक्ती नाहींशा झाल्यावर म्हणजे तुकोबांच्या निर्याणानंतर सुमारें 50/75 वर्षांनीं पंढरीची वारी करणा-या 1/2 मठाधिपतीस तुकोबांचा जो कांहीं अभंगसंग्रह मिळेल तो गोळा करावा असें वाटलें असावें व त्याप्रमाणें जेवढे म्हणून या कल्पनेस अनुकूल लहान मोठे दिंडीवाले, मठाधिपती असतील, अशांनीं आपापला संग्रह एकत्रित करून 4।4॥ हजार अभंगांचा एक गाथा कोणा तरी त्यांतल्यात्यांत श्रेष्ठ अशा मठाधिपतीच्या देखरेखीखालीं तयार केला असावा व मग त्या मूळ गाथ्याच्या ज्यानें त्यानें नकला आपल्या सोईप्रमाणें केल्या असाव्यात. सोईप्रमाणें म्हणण्याचें कारण त्या दिंडीवाल्यास किंवा मठाधिपतीस स्वतः जवळ जो संग्रह होता तो लिहून घेण्याचें कारण नव्हतें. स्वतः जवळ नसेल असा भाग प्रत्येक जण लिहून घेत असावा. पंढरीतील देहूकरांचा, मवाळांचा, देहूंत 3।3॥ हजार अभंगांचा गाथा, होता तो, असें कांहीं गाथे मी पाहिले तेव्हां मला कांहीं ठिकाणीं तेंच हस्ताक्षर पुनः पुनः आढळे. यावरून 4।4॥ हजार अभंगांची संख्या ठरली त्यानंतर तोच लेखक सवडी सवडीनें नकला करून देत असावा. असा एकजुटीनें वागून कांहीं मठाधिपतींनीं मिळून साडेचार हजार अभंगांचा गाथा तयार केला. हे दोन निरनिराळे प्रयत्न कसे ओळखावेत तेंमी खालीं देत आहेः- नमनाचे (1) समचरण द्दष्टी (2) सुंदर तें ध्यान हे दोन अभंग झाल्यावर जुन्या हस्तलिखीत गाथ्यांतून बालक्रीडा येते, त्यानंतर ओवीचे तीन अभंग, येवढें झाल्यावर एका गटाच्या गाथ्यास सुरवात यारे हरिदासांनो जिंको कळीकाळा । अशी होते. असे गट माधव चंद्रोबा, ओळीचा गाथा, व गणपत कृष्णाजी - या पोथ्यांच्या मालकांचा व दुसरा गट पहिले दोन नमनाचे अभंग झाल्यावर बालक्रीडा घेवोत. किंवा त्र्यंबक कासाराप्रमाणें विराण्या घेवोत. पण अभंग लिहिण्यास सुरूवात नये जरी तुज मधुर उत्तर । येथून होते. आतां या दोन्ही गटांपैकीं सर्व नकलकारांनीं आपण दुस-याची नक्कल करीत आहोंत असें दिसूं नये म्हणून खालचे अभंग वर, वरचे खालीं, लिहून घेतलें आहेत. कांहीं बहाद्दर याहि पुढें गेले. त्यांनीं अभंगांचे चरण खालचे वर केले !! पंडितांच्या प्रतीचा व देवडीकरांचा क्रम बहुतेक एक आहे. परंतु पंडितांच्या गाथ्यांत अंतरीची घेतो. गोडी (35) यानंतर सुखें वोळंब दावी गोहा हा अभंग येतो. देवडीकरांच्या किंवा गंगुकाकांच्या गाथ्यांत सुखें ओळंब हा अभंग पावलें या अभंगानंतर येतो. पुढें गंमत पाहण्याजोगी आहे. पंडितांच्या प्रतींत पावलें पावलें नंतर वंदू चरण रज सेवूं उष्टावळी हा अभंग आहे. व त्यांतील चवथा चरण गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्हीं ॥ असा आहे. या चरणांत गेलें पुढें याच्याबद्दल पुढें गेलें त्याचा । अशी त्याच अभंगास सुरवात देवडीकरांच्या गाथ्यांत आहे. कोणी कोणाची नक्कल केली व आपला गाथा निराळा दिसावा म्हणून चरण व अभंग खालचे वर व वरचे खालीं केले हे दोन्ही गाथे तपासले तर सांगतां येईल; तेव्हां या निरनिराळया प्रतीतींल क्रमातील फरकास किंवा पाठांतरास काय किंमत द्यावयाची याचा ज्यानें त्यानें विचार ठरवावा. वर वर्णिलेल्या शितावरून भाताची परीक्षा ज्यांना करतां येईल त्यांनीं तशी करावी. तेव्हा असे साडे चार हजार अभंगांचे दोन निरनिराळे पण जवळ जवळ त्याच अभंगांचे गाथे तयार झाले व त्याच्या नकला होऊं लागल्या, तेव्हां आपल्या संग्रही असतील तेवढे अभंग वगळून प्रत्येक नकलकार बाकीचे अभंग मिळतील तसे संग्रहित करूं लागला. अशा त-हेनें कोणासच (तुकोबांच्या खास टाळक-यानंतर) तुकोबांच्या ओळी कायम ठेवाव्यात अशी आस नसल्यामुळें अस्सल ओळीचे अभंग न मिळतां गाथ्या-गाथ्यांत फरक पडत गेला; हे दोन गाथे तयार होत असतांना संताजीच्या वह्या अस्सल समजून कोणी वापरल्या असतील असें मला वाटत नाहीं. कारण संताजी मधील 288 व 289 हे अभंग मला कोठच्याहि गाथ्यांत सांपडले नाहींत. फार काय पण तुकाराम तात्यांच्या 8441 अभंगांच्या गाथ्यांत हि हे दोन अभंग नाहींत. या दोन अभंगांबद्दल कोणा हि मठाधिपतीस आज विचारावयास जा तर हे अभंग क्षेपक आहेत असे तो सांगेल. संताजीच्या वहींतील अभंगांस केव्हां हि कोणास हि क्षेपक म्हणतां येणार नाहीं. असेंच जयरामस्वामी वडगांवकर यांचें मठांत तुकोबारायांचे कांहीं नवीन अभंग आढळले. त्यास हि हे लोक क्षेपक म्हणणारच. पण ज्यांनीं कोणी चार साडेचार हजार अभंगांची गाथा तयार केली त्यांनीं जुने अभंग जमेस धरले नाहींत, जुन्या वह्या शोधल्या नाहींत तेव्हां त्यांचे म्हणणें प्रमाण कसें मानावयाचे? ही चार साडेचार हजार अभंगांची संख्या कोणी व कशी ठरविली याचा शोध झाला पाहिजे. त्यांनीं कोणत्या प्रती वापरल्या हें हि कळलें पाहिजे. असो.
या दोन गटांतून अभंग मिळवून नकल करून घेतांना पंडित प्रतीचा मूळ मालक व लेखक त्र्यंबक कासार यानें चाळीस वर्षे मेहनत करून प्रत तयार केली म्हणून गंथाचें शेवटीं म्हटलें आहे; हें काम त्यानें काळजीपूर्वक केलें आहे हें हि खरें. त्र्यंबक कासारानें संताजीच्या वह्या वापरल्या होत्या असें दिसतें. त्यानें एकच गोष्ट केली नाहीं व ती ही कीं, त्यानें संताजीची ओळ जशीच्यातशी ठेविली नाहीं. पूर्वी त्याचे संग्रहीं जे अभंग होते ते वगळून नकल केलेली ओळ हि तीच ठेविली पण क्रम बदलला. त्र्यंबक कासारानें नकल करतांना एक अति उत्कृष्ट गोष्ट केली, जेथें त्यास शक्य होतें तेथें कांहीं अभंगांचे गटाचे शेवटी आंकडे घातले आहेत. ही रीत त्यानें संताजीवरून उचलली. म्हणजे तेवढयापुरती ती ओळ शाबूत राहिली. असे आकडे घातलेले गट पंडित प्रतींत पुष्कळच आहेत. त्यांत कांहीं चुका आहेत. (1975-1980) या अभंगांचे शेवटी 6चा आकडा आहे पण तो चुकीचा आहे. 1975-78 हे अभंग एका ओळीत आहेत; पुढील दोन नाहींत. तसेंच नकल करून घेतांना हि कांहीं अभंग मध्येंच येतात. 1659-1692 ही ओळ आहे पण त्या ओळींत 1667।1668 व 1690 हे अभंग उत्कृष्ट असले तरी भलत्या ठिकाणीं आले आहेत असें वाटतें. तेव्हां पंडितांची प्रत सुध्दां जरा विचार करून च वापरावी लागते. परंतु संताजीचिी प्रत वगळून सर्व छापील प्रतींत पंडिताची प्रत उत्कृष्ट आहे याबद्दल वाद नाहीं.
माधव चंद्रोबा, गणपत कृष्णाजी, पंडित, ओळीचा गाथा, देवडीकरांचा गाथा या छापील प्रती व 4।4॥ हजार अभंगांच्या इतर हस्त लिखीत प्रती यांमध्यें मूळ ओळी मुद्दाम होऊन संग्राहकांनीं मोडल्या नाहींत. पण कांहीं गट या ओळी आहेत. हें ओळखून त्यांनीं जी खबरदारी घ्यावयास हवी होती. ती त्या लोकांनीं घेतली नाहीं हें खरें पण या सर्व ओळी मोडून व जेणें करून कोणती प्रत आपण वापरली हें सांगावयास लागूं नये. म्हणून कै. विष्णूबोवा जोग व गुळवे यांनीं चार साडे चारहजार अभंगांच्या सर्व छापील प्रती गोळा केल्या, त्या अभंगांची विषयवारी केली, व एक नवीन त-हा करून दाखविली. हे गृहस्थ प्रस्तावनेच्या सुरवातीस लिहितात की "महासाधू तुकाराम महाराज यांच्या अभंगांच्या गाथा अनेक लोकांनीं छापून प्रसिध्द केल्या आहेत. ह्यापैकीं सुमारें साडेचार हजार अभंगांच्या गाथा वारकरी सांप्रदायी मंडळीस मान्य आहेत. या साडेचार हजार अभंगांच्या गाथा वारकरी सांप्रदायी मंडळीस मान्य आहेत. या साडेचार हजार अभंगांतून विषयवारीनें प्रकरणें पाडून छापण्याचा प्रयत्न केलेला आढळून येतो, परंतु बहुतकरून दीड हजार अभंगांचीच बरोबर विषयवारी लावून बाकीचे सुमार तीन हजार अभंग "स्फुट अभंग" या सदरांत घातलेले आढळतात. तुकाराम महाराजांनी निरनिराळया प्रसंगीं केलेलें अभंग निवडून काढून त्यांचीं प्रकरणें पाडण्याचा हेतु, एका विषयावरील त्यांचे अभंग एके ठिकाणीं पहावयास मिळावें हा होय. हा हेतु उपलब्ध गाथा पाहिल्या म्हणजे जसा जावा तसा शेवटास गेलेला दिसत नाहीं. ही उणीव दूर होऊन हल्लींच्या गाथांतील दुर्बोधत्व होतां होईल तितकें कमी करावें ह्या हेतूनें आम्ही ही गाथा प्रसिध्द केली आहे." येथें तुकोबारायांच्या, किंवा त्यांच्या टाळक-यांच्या, अगर त्यांच्या शिष्यांच्या वह्या मिळवून ग्रंथ छापावा असा उद्देशच नव्हता. या गाथा प्रकाशकांस तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळी असतील अशी कल्पना हि शिवलेली त्यांच्या प्रस्तावनेवरून दिसत नाहीं. ही वर्गवारीनें गाथा छापण्याची त-हा पूर्वीच्या सर्व छापील गाथ्यांच्या मुळावर आली.
एतावता भावे यांनीं काढलेली संताजीची गाथा वगळून कोणा हि गाथा प्रकाशकांस मुळांत तुकोबांचे अभंग कोणत्या स्वरूपांत असतील, आपल्या गाथेंत ते तसे कां नाहींत असला विचार स्पर्श हि करून गेला नाहीं. तसा विचार पुढें आला असतांना पांगारकरांसारख्या सुशिक्षित पदवीधर हरिभक्तपरायण माणसानें कशी बगल मारून नेली हें आपण पाहिलें. असो. आतां यापुढें देहूकर इनामदार यांच्या घराण्यांत जी मुळ वही आजपर्यंत 8/10 पिढया महाराजांच्या हातची म्हणून पूजेंत आहे व जी या गाथ्यांत* * अशा नक्षत्रांकित खुणांनीं छापली आहे. तिचें वर्णन थोडक्यांत करतों.
ही वही सुमार 1932 सालीं प्रथम पाहिली. संताजीच्या दोन्ही वह्या पूर्वी पाहिल्या होत्या, तेव्हां त्या वेळची अक्षरें लिहिण्याची रीत मला माहित होती, वही पाहतां च ती वही समकालीन आहे याबद्दल मला शंका हि आली नाहीं. या पोथींतील दोन अभंगांचा फोटो पांगारकर यांनीं श्री तुकाराम चरित्रांत छापला होता. तो फोटो पाहून भावे यांचें मत "हें अक्षर तुकारामकालीन असावें असें तो फोटो पाहून माझें मत झालें आहे." असें त्यांनीं आपल्या प्रस्तावनेंत लिहिलें आहे. नारायणबोवा (निर्याणानंतर जन्मलेले) देहूकर यांच्या घराण्यांत पिढयानुपिढया ही पोथी स्वतः महाराजांच्या हातची म्हणून पूजेंत ठेविलेली आहे. ही वही जुन्या जुन्नरी घोटीव कागदावर लिहीलेली आहे. वही 11इंच लांब व 7इंच रूंद आहे. प्रत्येक पानाच्या दोन्ही कडांस तांबडया शाईच्या दोन दोन रेघा आहेत; वही पाठपोठ लिहिलेली आहे. वहीच्या प्रत्येक पृष्ठावर 23 ते 25 ओळी असून प्रत्येक ओळींत सरासरी 24 अक्षरें आहेत. अभंगांच्या लहानमोठेपणाप्रमाणें प्रत्येक पृष्ठावर 3/4/5/6 असे अभंग आहेत. दोन अभंगामध्यें छ छ छ अशा खुणा करून एकेक ओळ जागा सोडली आहे. या वहींतील विशेष गुण असे कीं, (1) अभंग एका पृष्ठावर सुरू होऊन पुरा झाला नाहीं. म्हणून अभंग दुस-या पृष्ठावर न्यावा लागला नाहीं. (2) अभंग हे काळया व तांबडया अशा दोन रंगांच्या शाईनीं लिहिलेले आहेत. (3) अभंगांतील चरण जेथें तुटतो तें स्थान दोन शून्यांची ः अशी खूण करून दाखविलें आहे. (4) या वहीच्या लेखकाचें हस्ताक्षर संताजीच्यापेक्षां किती तरी पट चांगलें आहे. (5)या वहीच्या लेखकाच्या त्या वेळच्या शुध्दलेखनाच्या कल्पना स्पष्ट आहेत. (6) त्याप्रमाणें जोडक्षरें केव्हां हि संस्कृत उच्चाराप्रमाणें न लिहितां त्या वेळच्या प्राकृत उच्चाराप्रमाणें अक्षरें फोडून लिहिलेलीं आहेत. (7) वहीच्या लेखकाच्या -हस्व दीर्घ जोडाक्षरें व संस्कृत शब्द लिहिण्याच्या कल्पना अगदीं स्पष्ट व निश्चित आहेत; एकदां एक शब्द एका त-हेनें व दुस-या वेळीं निराळया त-हेनें लिहिलेला आढळत नाहीं. (8) या वहींत दोन स्थळें वगळून कोठें हि -हस्व इकार नाहीं. (9) अभंगांचा अन्वय अर्थ लावतांना शब्दांची ओढाताण न करतां अर्थ बरोबर लागतो. (10) वहींतील 17/18/19/20/22/30 येवढे च लेखकानें घातलेले पृष्ठांक शाबूत आहेत पण जेवढी वही आज शाबूत आहे तेवढयांत अभंगांचा क्रम उत्तम लागतो व असा क्रम संताजी शिवाय दुसरीकडे कोणत्या हि गाथ्यांत पहावयास सांपडत नाहीं. (11) ही वही खतावणीसारखी बांधलेली आहे व (12) या पोथीची जुनी बांधणी अद्याप शाबूत आहे. (13) या वहींत अनुक्रमांक नाहींत. (सध्याच्या व तुकारामकालीन लिपींत, शब्दांत, जो फरक आढळून येतो. त्याची यादी प्रस्तावने नंतर दिली आहे.
श्री. ह. भ. बाबासाहेब देहूकर इनामदार (नारायणबोवा गोसावी) यांचे विद्यमान वंशज) व मी महाराजांच्या जुन्या गाथ्यांचा शोध करीत होतों. त्या वेळीं पिढयानुपिढया वारकरी असलेल्या घराण्यांतील विद्यमान वंशज सख्या हरि शिंपी या आस्थेवाईक वारकरी गृहस्थांकडे पंढरींत एक जुनी वही सांपडली. या वहीच्या मुखपृष्ठावर "भिजल्या वहींतील अभंग" म्हणून लिहिलेलें आहे. व आंतील पृष्ठावर भिजल्या वहींतील अभंग जुने-अभंग असे म्हणून नकल करण्यास सुरवात होते. ही नकल खतावणीसारखी केली नसून पुस्तकासारखी केली आहे. ही नकल ज्यानें केली आहे, त्याचे हातून अभंग गळणें, वाचनाची चूक होणें, शब्दाचें आधुनिकीकरण होणें या चुका झाल्या आहेत. परंतु सर्व वहींत त्यानें शब्द किंवा व्याकरणाचें रूप पालटलें नाहीं. अभंग गळले आहेत. पण खालीवर केले नाहींत. केव्हां हि पदरचा चरण-प्रचलीत असलेला चरण-घातला नाहीं. आपण पूजेंतील भिजल्या वहीची नकल करीत आहोंत म्हणून जेवढा आदर मूळ ग्रंथ जशाचा तसा उतरून घेतांना नकलकरांच्या ठिकाणीं असावा तेवढा त्याच्या ठिकाणीं होता. म्हणून मूळ वहींत 'बरें झालें देवा बाईल कर्कशा' हा चरण नाहीं तसा या नकलेंत हि नाहीं. या वहींत 112 वा अभंग व मूळ त्रुटित वहींतील पहिला अभंग हे बरोबर जुळतात व तेथपासून पुढें मूळ वहींत जेवढीं पृष्ठें शिल्लक आहेत, तेवढया पुरते ते अभंग या नकलेशीं जुळते आहेत. क्रम हि तोच आहे. नकलकारांच्या हातून अभंग गळले आहेत, ही गोष्ट मूळ वहींतील पृष्ठें या वहींतील अभंगांशीं ताडून पाहिलीं तेव्हां लक्ष्यांत आलें, तसेंच पतिव्रते आनंदमनी । हा अभंग या वहींत नकलकारानें कसा लिहून घेतला याचें मला आर्श्चय वाटतें. ही नकल आजवर कोणास हि माहित नव्हती. ज्यांनीं साडेचार हजार अभंगांचा गाथा बनविला, त्यांस या वहीचा सुगावा नव्हता व सख्या हरीस मी या वहीचें महत्त्व सांगेपर्यंत कोणास कांहीं त्या वहीची कल्पना च नव्हती. ज्यांनीं साडेचार हजार अभंगांचा गाथा बनविला, त्यांस या वहीचा सुगावा नव्हता व सख्या हरीस मी या वहीचें महत्त्व सांगेपर्यंत कोणास कांहीं त्या वहीची कल्पनाच नव्हती. ही वही जुन्नरी घोटीव कागदावर लिहिलेली आहे; पण लेखकाच्या अक्षराचें वळण तितकेसें रेखीव व घोटीव नाहीं. या वहींत 673 अभंग होईपर्यंतची नकल एका हातानें केलेली आहे. पुढें मागच्या च अभंगाची पुनः नकल एका हातानें केलेली आहे. पुढें मागच्या च अभंगाची पुनः नकल केलेली आहे. व इतर संतांचे अभंग येथें छापले आहेत. या सर्व अभंगांची नकल मूळ वहीच्या नकलेशीं ताडून पाहिली तेव्हां मूळ वहींतील कांहीं अभंग नकल करून घेण्यास हा जुना नकलकार विसरला किंवा चुकला आहे असें आढळून आलें. तेव्हां मूळ वहींतून ते अभंग जागचे जागीं घातले.
सन 1947 उन्हाळयाच्या सुट्टीत या अभंगांचें शब्दशः रूपांतर स्पष्टीकरण-अन्तर्गत दुवा कोठें आहे, हें दाखविण्याच्या उद्देशानें मीं केलें. हा नकलकार अभंग लिहून घेतांना कांहीं अभंग गाळतो असें लक्ष्यांत आले होतें म्हणून छापील गाथ्यांतील उत्कृष्ट गाथ्या-(पंडित प्रत) शीं या वहींतील प्रत्येक अभंग लावून पाहिला. हेतु हा कीं त्या (पंडित) प्रतींत चुकत माकत ज्या ओळी शाबूत आहेत, त्या पाहून त्यांतून कोठें कोठें या नकलकाराच्या हातून गळलेले अभंग आढळले तर ते अभंग घ्यावेत. तसे कांहीं अभंग मला आढळले व ते मीं येथें घेतले आहेत. मूळ वहींतून नक्कल करतांना गळलेले अभंग मी पूर्वीच जागचे जागीं उध्दृत केले होते. नंतर पंडित प्रतींतून कांहीं अभंग घेऊन, केलेलें रूपांतर मला थोडें फार सुधारतां आलें. हे सर्व अधिक अभंग घेऊन, केलेले रूपांतर मला थोडें फार सुधारतां आलें. हे सर्व अधिक अभंग सख्या हरीच्या वहीचा क्रम कायम रहावा म्हणून जेथें अभंग जास्त घालावा लागे तेथें अ.आ. असें म्हणून घाली. ही वही छापून काढण्याचें ठरल्यावर माझी नकल ही सख्या हरीच्या पूर्वजांच्या नकलेपेक्षां केव्हां हि निःसंशय श्रेष्ठ आहे अशी खात्री होऊन मी माझ्या नकलेंतील अभंगांचा अनुक्रमांक बदलला आहे. या ज्यास्त अभंगांची यादी ग्रंथाचे शेवटीं दिली आहे. तेव्हां ग्रंथाचें संशोधन व संपादन करतांना खरी अस्सल संहिता लोकांचे हातीं पडावी म्हणून जेवढी खबरदारी घेता आली तेवढी घेतली आहे. मूळ वहींतील अभंग पहिल्या प्रथम च या ग्रंथांत जशेचे तसे छापले जात आहेत. त्यांत हि मीं प्रचलीत लिपी वापरली आहे. रूपांतर करून खालीं सारांश देऊन स्पष्टीकरण देत आहें. तेव्हां अभंगांचा अर्थावबोध होण्यास अडचण होणार नाहीं म्हणून व्याकरणाची-जोडाक्षरांचीं रूपें जशींचीं तशींच ठेविलीं आहेत. मुख या बदल मुष हें मुळ वहींतील रूप दिलें नाहीं, मुख असाच शब्द येथें दिला आहे.
असो, अभंगांच्या ओळीबद्दलच्या विवेचनाचा सारांश देऊन प्रस्तावनेंतील हें प्रकरण संपवितों.
(1) तुकोबाराय स्वहस्तें अभंग लिहीत होते याबद्दल संशय घेण्यास जागा नाहीं.
(2) स्वहस्तें अभंग लिहिलेल्या वह्या डोहांत बुडविल्या होत्या याबद्दल वाद नाही.
(3) या वह्या तरल्यावर ठिकठिकाणचे लोक येऊन त्यांच्या नकला करून नेत होते असें विधान महिपतीबोवांनीं केलें आहे.
(4) त्याप्रमाणें पंढरपुराच्या एका वारक-यानें एका वहीची करून नेलेली नकल, भिजल्यावहीची नकल, म्हणून आतां छापीत आहें.
(5) संताजी तेली जगनाडे व गंगाराम मवाळ, हे दोघेजण अभंग लिहून घेत असत असे महिपतीबोवांनीं नमूद केलें आहे.
(6) संताजीच्या दोन त्रुटित वह्या भावे यांनीं प्रसिध्द केल्या आहेत. संताजीच्या वह्या चार होत्या अशी भावे यांना माहिती कळली होती तेव्हां इतर वह्यांचा शोध झाला पाहिजे.
(7) गंगाराम मवाळ यांच्या संग्रहीं असलेल्या अभंगांच्या वह्यांचा अद्याप कांहीं च तपास लागला नाहीं. त्याप्रमाणें इतर टाळक-यांच्या संग्रहीं जे थोडे फार अभंग असतील त्यांचा हि आजवर कांहीं शोध झाला नाहीं, लागला नाहीं.
(8) बुडविल्या वह्यांचा हि आजवर कांहीं शोध लागला नाहीं. त्या वह्यांवरून केलेल्या नकलांचा हि कांहीं शोध लागला नाहीं. त्या वह्यांवरून केलेल्या नकलांचा हि कांहीं शोध झाला नाहीं.
(9) साडेचार हजार अभंगांचा गाथा कोणी व केव्हां निश्चित करून प्रचलीत केला याचा शोध कोणीं केला नाहीं. परंपरेप्रमाणें हा मोघम शब्द प्रत्येक जण वापरीत आला आहे.
(10) साडेचार हजार अभंगांचा गाथा परंपरागत मान्य होता म्हणून प्रत्येकानें म्हटलें होतें तरी हि तुकाराम तात्यांस 8441 अभंगांची एक प्रत मिळून छापता आली.
(11) तुकोबारायांची अपार कवित्त्व शक्ती होती. त्यांनीं नामदेवरायांची बाकी फेडली म्हणून प्रसिध्दि आहे तेव्हां तें कवित्व साडेचार हजार किंवा आठ हजार अभंगापुरतें च होतें असें म्हणण्यास सबळ कारण नाहीं.
(12) साडेचार हजार अभंगांचा गाथा तयार झाल्यावर त्याच्या नकलांच्या प्रतींची तुलना करून कांहीं ओळी निश्चित करतां येतील असें मला वाटत नाहीं.
(13) परंतु ज्या इतर वह्या बुडविल्या त्यांचा किंवा त्यांच्या नकलांचा शोध झाला पाहिजे.
(14) त्यांत संताजीच्या वह्याप्रमाणें किंवा या वहीच्या ओळीप्रमाणें ओळी सांपडल्या पाहिजेत.
(15) असल्या नकलांच्या वह्या निर्याणानंतरच्या 25/30 वर्षांच्या काळांतल्या सांपडल्या तर महाराष्ट्राचें निजधन हातीं येईल, सध्यां तरी आपल्या पूर्वजांच्या हलगर्जीपणानें, उदासीनतेनें, तें धन आपण गमावून बसलों आहोंत.
चरित्र
माऊली श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांस त्यांच्या भक्तांनीं विचारिलें कीं "माउली, आपण तर शुद्र वंशांत जन्मलेले, व्यवसायानें वाणी असें असून आपल्या ठिकाणीं ही हरिभक्ति उपजली कशी ? आपणास या विठ्ठलाच्या नामाची आवडी कशी उत्पन्न झाली ? आपले सद्गुरू आपणास कसे भेटले ? आपणास कवित्व स्फूर्ति कोठून व कशी झाली? आपणांस प्रत्येक वेळीं नवे नवे विचार कोण सुचवितो ? आपण ग्रंथाध्ययन, शास्त्रसंशोधन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ति, योग, कांहीं याग, असें जें कांहीं केलें असेल तें आम्हांस मोकळेपणानें कृपाळू होऊन सांगावें. कारण, आम्हांस असें खरेंच वाटतें कीं, आम्ही आपल्यासारखे हरिभक्त व्हावें. पण तें कांहीं जमत नाहीं. आपणास आम्ही लहानपणीं आमच्याच सारखे वागतांना पाहात होतों. आपलें स्थित्यंतर आम्ही आपल्या डोळयांनीं पाहात आहोंत. पुराणांतरीं कोणी हजार पांचशें वर्षें तपश्चर्या केली, मग इंद्राला त्या तपश्चर्येचा धाक पडला, त्यानें तपश्चर्येचा भंग करवावा, त्यास त्याच्या तपश्चर्येचें फळ हातीं लागूं नये, तपश्चर्या सिध्दीस जाऊं नये, असले दाखले पुराणिक पोथी सांगतांना आम्हीं ऐकतों. पण आपण तर "याची देहीं याची डोळां भोगूं मुक्तीचा सहळा" । मुक्ताबाईशीं मीं लग्न लाविलें आहे, माझ्या घरीं-वेदांत पाणी वाहतो, "ब्रह्मरस पिका आला," म्हणून सांगतां, आम्ही ऐकतों. आपला भक्तीचा कळस झालेला आम्ही पहातों, तेव्हां-इतर पुराणांतरींचे दाखले नकोत, पूर्वींच्या सत्पुरुषांच्या रम्य गोष्टी नकोत, आपण आपलें चरित्र आम्हांस एकवार सांगा म्हणजे आपल्या सहज बोलण्यांत तुम्हां आम्हांत फरक कोठें पडत गेला तें लक्ष्यांत येऊन आम्हांस हितोपदेश होईल." "आत्मचरित्र सांगणें हें एक अवघड काम आहे. त्यांत आपण निराळा मार्ग कसा काढीत गेलों, तुम्हांस ज्या गोष्टी रम्य वाटून समाधान वाटे, त्यांतून माझें मन कसें सुटलें-हें-सांगूं जावें-तर चर्चेला-विचाराचा फाटा फुटण्यास वाव होते, त्यांत कोणास आत्मश्लाघा वाटते. बरें त्या गोष्टी सांगूं नयेत तर जीवाच्या कळवळयानें आलेल्या आर्त माणसाची फसवणूक केल्यासारखें व्हावयाचें. अशा या गडसंदीच्या अवघड स्थितींत 6/7 अभंगांत तुकोबांनीं आपलें चरित्र सांगितलें आहे. त्यांतील कांहीं अभंग या छापलेल्या भिजल्या वहींत आले आहेत. (अभंग 177-181) (1)-याती शुद्र वैश्य केला वेवसाय (2)ऐका वचन हे संत (पं. 1333-4) हे दोन अभंग या वहींत आले नाहींत, पण हे दोन अभंग, येथें आलेले पांच अभंग, असे हे सात आत्मचरित्रपर अभंग तुकोबांच्या चरित्राचा पाया समजण्यास कांहीं हरकत नाहीं. स्वतःच्या स्तुतीपर शब्द उच्चारूं नये; ती आत्मश्लाघा होते. पण प्रश्न विचारणारांचा भाव शुध्द आहे. आर्तता खरीच आहे असें पाहून तुकोबा म्हणाले कीं-
॥ नये बोलो परी पाळीलें वचन । केलीयाचा प्रश्न तुम्हीं संतीं ॥
तुम्ही शुध्द भावानें, ख-या अवस्थेनें प्रश्न विचारला आहे. तेव्हां तुमचें वचन पाळावें म्हणून मी चार शब्द बोलतों. एरव्हीं ही गोष्ट बोलूं नये अशी आहें. हे सहासात अभंग उभयपक्षीं उत्कट शुध्द भावनेच्या अवस्थेंत स्फुरलेले असल्यामुळें ते साहजिक च मोठे उद्बोधक व अर्थपूर्ण असे असे आहेत; त्यांतील प्रत्येक चरण हा महाराजांच्या सिध्दपंथाचा एकेक टप्पा आहे. त्यांतील प्रत्येक शब्द स्थानापन्न आहे, आत्मचरित्राची फलश्रुति ॥॥ भक्तां नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळो आले ॥
अशी आहे. नये बोलो असें म्हणून आत्मचरित्र सांगण्यास जी सुरवात झाली. तो ओघ हि ॥
॥ वीस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥
असें म्हणून तुकोबांनीं आवरला आहे. तात्पर्य हें कीं, हें आत्मचरित्र अति संक्षिप्त आहे. तरी हि जिज्ञासु माणसास या चरित्रापासून वर वर्णिलेली फलश्रुति लाभेल या बद्दल शंका नको. चरित्र विस्तारपूर्वक सांगावयास लागलों तर त्याचे बहुत प्रकार होतील. तेव्हां आतां पुरे असें म्हणून तुकोबांनीं लेखणी आवरण्याचें कारण असें कीं, अभंग जे स्फुरत आहेत, ते एकप्रकारें प्रकट चरित्र कथन च आहे. ही गोष्ट या समोरच्या मूर्तीस ज्या अर्थी उमगली नाहीं तेव्हां आपण स्वचरित्र अभंगांत कसें सांठविलें आहे, तें विस्तारशः सांगावें लागलें असतें. तसें न करितां या सहा सात अभंगांत चरित्राची रूपरेषा सांगून ठेवावी व ती जो नीट आकलन करील तो सर्व अभंग कोणत्या द्दष्टीनें पहावयाचे यावर नजर ठेवील या उद्देशानें हे सहा सात अभंग झाले असावेत.
तुकोबारायांचा जन्म देहू गांवीं मोरे यांच्या कुळींत बोलोबाचे पोटीं झाला. बोलोबास पुत्र तीन. वडील सावजी, मधले तुकोबा व धाकटे कान्होबा. बोलोबांचे कुळांत विठोबा-रखुमादेवींची उपासना, पंढरीची वारी व वैश्यवृत्ति होती. हें घराणें संपन्न असावें. कारण या घराण्यांत महाजनकीचें वतन वडिलोपार्जित होतें, व त्याची खूण म्हणून या घराण्यांतील पुरुष सही करतांना निशाणी तागडी लावीत, शिवाय घरांत विठोबारखुमाईचें मंदिर होतें. तुकोबारायांचा जन्म केव्हां झाला याची निश्चित तिथि मास व वर्ष हें सांगतां येत नाहीं. त्याबद्दलचे वाद पुष्कळ आहेत. परंतु, त्यांतून फलनिष्पत्ती कांहीं झाली नाहीं. वादे वादे जायते तत्त्वबोधः असें एक वचन नेहमीं उच्चारलें जातें पण तुकोबारायांच्या जन्मशकाबद्दलच्या गुरूपदेशाच्या शकाचा व निर्याणाच्या शकाचे वाद-अद्याप अनिर्णीत आहेत. तात्पर्य, वरील वचन तुकोबांच्या चरित्रापुरतें निरूपयोगी आहे. गुरूपदेशाची मिति माघशु. 10 गुरूवार हा योग शके 1541 व शके 1561ला येतो. महाराष्ट्रांत दुष्काळ पडला तीं वर्षें 1551/1552 हीं आहेत. त्यानंतरचा माघशु. 10 गुरुवार हा योग 1561 ला येतो. तें च वर्ष गुरूपदेशाचें मानावें असें वाटतें. पांगारकरांनी 1554 हें वर्ष दिलें आहे. त्याबद्दल सूक्ष्म गणित केल्याचें म्हटलें आहे. तुकोबारायांनी येवढें सूक्ष्म गणित केलें असेल, त्यांस त्यावेळीं तसें सुक्ष्म गणित केलें असेल, त्यांस त्यावेळीं तसें सूक्ष्म गणित करण्यास साधनाची अनुकूलता होती असें वाटत नाहीं. निर्याणाचा शक 1571 फाल्गुन वद्य 2 या दिवशी सोमवार येत नाहीं, शनिवार येतो. परंतु साधारणपणें विचार करतां माणसांच्या लक्ष्यांत वर्ष महिना तीथ राहते. वार तेवढा राहत नाहीं. तेव्हां शके 1571 फाल्गुन वद्य 2 शनिवार विरोधीनाम संवत्सरे हा शक निर्याण शक मानावा असें वाटतें. संतलीलामृतांत महिपतीबुवा ताहराबादकर यांनीं तुकोबारायांचें चरित्र रसाळ भाषेंत गाइलें आहे. महिपतीबुवांनीं त्यांना त्यावेळी मिळवितां आली ती सर्व परंपरागत माहिती मिळवून चरित्र लिहिलें आहे. बहुतेक सर्व चरित्रकारांनीं आपापल्या आवडी नावडीप्रमाणें तीच माहिती रंगवून निरनिराळीं चरित्रें लिहिलीं आहेत. तुकोबारायांच्या चरित्राचा पाया त्यांचे अभंग होत. असें प्रत्येक लेखकानें वरकरणी म्हटलें आहे. पण प्रत्येक अभंगांतून चरित्र गोळा करण्याचें अवघड काम आजवर कोणी केलें नाहीं. तेव्हां तसा प्रयत्न यापुढें करून पाहूं.
(पं. 1333) याती शुद्र, वैश्य व्यवसाय । आदि तो हा देव कुळपूज्य। ही परंपरा बोलोबांच चालूं होती. या परंपरेप्रमाणें, बोलोबांचें वय होत चाललें, तेव्हां मुलांनीं व्यवसाय संभाळावा व आपण हरि हरि म्हणत स्वस्थ बसावें. अशी बोलोबास इच्छा झाली. वडील मुलगा सावजी हा संसाराची धुरा अंगावर घेईनाः सावकारींतील-वैश्यव्यवसायांतील दगदग व लटपट तो पत्करीना. तेव्हां तुकोबांनीं तें काम अंगावर घेतलें, व आईबापांच्या देखरेखीखालीं तुकोबा वैश्य व्यवसाय करूं लागले. या वेळीं बोलोबांच्या घरांत ती नवरा बायको, सावजी व त्याची बायको, तुकोबा व त्यांची बायको रुक्मिणी, कान्होबा व त्याची बायको येवढी मंडळी असावीत. तुकोबा व्यवसाय करूं लागल्यावर थोडया दिवसांत त्यांना त्यांतील खाणा-खुणा डावपेंच समजून ते तुकशेट या पदवीस चढले. या सुमारास तुकोबांच्या बायकोस रुक्मिणीस धापेची व्यथा आहे असें दिसून आलें. तेव्हां उत्साही व कर्तृत्ववान मुलास संसारांत उदास वाटूं नये म्हणून पुण्याच्या आप्पाजी गुळवे सावकारांची मुलगी मागणी घालून बोलोबांनी नवी सून करून आणली. हीच प्रसिध्द आवली किंवा जीजाई होय. सवत जीवंत असतांना पुण्याच्या संपन्न सावकारांनी आपली मुलगी दुसरेपणावर दिली यावरून तुकोबांच्या घराण्याची सांपत्तिक स्थिति त्यावेळी चांगलीच असावी, व तुकशेट व्यवसायांत दक्ष आहेत, असें ऐकून बोलोबांस सुख होई. पण हि स्थिति फार दिवस टिकली नाहीं. अशा संसाराच्या सुखांत बोलोबाचा काळ झाला. तुकशेट यांस डोक्यावर विचारण्यास वडील होते हा मोठा आधार वाटे, त्यामुळें या मृत्यूच्या घाल्यानें त्यांचें चित्त दुखावलें. पण झाली गेली गोष्ट कांहीं परत येत नाहीं या विचारानें तुकशेट संसार-सावकारी नीट चालवीत होते. त्यांतच याच सुमारास सावजीची बायको निवर्तली म्हणून तो उदास होऊन तीर्थयात्रेस निघून गेला. याच सुमारास आई हि गेली असावी. कारण पुढील चरित्रांत आईचा उल्लेख कोठें च येत नाहीं. अशा त-हेनें तुकशेट वाणी व त्यांच्या दोन्ही बायका, रुक्मिणी व आवली ऊर्फ जीजाई व रुक्मिणीचा मुलगा संतु असा तुकशेट यांचा संसार होता. तुकशेट संसार दक्षतेनें करून थोडीफार पुंजी गोळा करूं लागून त्यांची भरभराट होत होती. याच सुमारास महाराष्ट्रभर दुर्गादेवी या नांवाचा भयंकर दुष्काळ पडून सर्वत्र हाःहाःकार झाला. हीं वर्षे शके 1551/52 हीं होत. त्यांतच आई गेली, बाप गेला. भावजय गेली म्हणून भाऊ घर सोडून गेला. भरभराटीचा म्हणून जो काळ सुखाचा त्यावेळीं वाटत होता-त्याचें पुढें संतपणाची जोड झाल्यावर तुकशेट तुकोबा झाल्यावर त्यांनीं वर्णन खालीलप्रमाणें केलें आहे. अर्थात् वैराग्यानें संसार कडू वाटूं लागल्यावरचें हें वर्णन आहे. एवढी गोष्ट जमेस धरून खालील वचनें पहावयाचीं आहेत. तुकशेट दोन्ही बायका सुखानें नांदवीत होते. त्याबद्दल पुढें आपल्या गत आयुष्याकडे वळून पाहून तुकोबाराय म्हणतात.--(पं. 1237)
॥ एका पुरुषां दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥1॥
॥ पाप न लगे धुंडावे । लागेल तेणें तेथें जावें ॥धृ॥
॥ कांहीं दुसरा विचार । न लागे करावा चि फार ॥2॥
॥ असत्य जे वाणी । तेथें पापाची च खाणी ॥3॥
॥ सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती तीं सुखें ॥4॥
॥ तुका म्हणे दोन्ही । जवळी च लाभ हानी ॥5॥
सावकारीचा, देण्या-घेण्यांचा तुकशेट वाणी यांचा जम चांगला बसला होता म्हणून तुकशेट यांची स्तुति-इष्ट-मित्र-गण-गोत बोलोबांस ऐकवीत होते व त्या स्तुतीच्या श्रवणानें बोलोबांच्या कानाचें पारणें फिटे पण तुकशेट यांच्या मीपणाबद्दल तुकोबाराय म्हणतातः--(पं. 2834)
लक्ष्मीमदें मातें घडले महादोष । पत्नी दोन्ही भेदाभेद ॥
पितृवचन घडली अवज्ञा अविचार । कुटिल कुचर वादी निंद्य ॥
---- --- ---
भूतदया उपकार नाहीं शब्दाधीर । विषयीं लंपट हीन ॥
मोठया नेकीनें चालविलेला संसार दुर्गादेवीच्या दुष्काळांत सुखाच्या ऐवजीं दुःखास कारणीभूत झाला. याबद्दल तुकोबा समोरच्या श्रोत्यांस सांगतात कीं :---
1333
संवसारें जालों अति दुःखें दुःखी । मायबाप सेखीं क्रमीलीया ॥
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥
लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देखें तुटी येतां ॥
हें च वर्णन पुढील (1334) व्या अभंगांत आलें आहे.
बहु पीडीलों संवसारे । मोडी पुसे पीटी मेली ढोरें ।
न पडतां पुरें । या विचारें राहिलों ॥
सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें बहु तें ही ॥
---- --- ---
प्रिया पुत्रं बंधु । यांच्या तोडीला संबंधु ॥
सहज जालो मंदु । भाग्य हीन करंटा ॥
तोंड न दाखवें जना । शिरें सांदी भरें राणां ॥
एकांत तो जाणा । तयासाठीं लागला ॥
पोटें पीटिलों काहारे । दया नाहीं या विचारें ॥
वर जे उतारे दिले आहेत ते स्वचरित्राचें सिंहावलोकन आहे व त्यांतल्या त्यांत संतांनीं मुद्दाम विनयपूर्वक सांगितलेलें व्यवसायी संसारिकाचें वर्णन आहे. तेव्हां तें चित्र थोडें फार भडक रंगवलें असण्याचा संभव आहे. वरील उता-यांत स्वदोषांची निंदा थोडया अतिशयोक्तीनें केली नसेल असें मला म्हणवत नाहीं. दोन जिवंत बायकांना नांदवितांना त्यांच्यांतील मत्सरास सांभाळण्यासाठीं ह्या दादल्यानें जेवढी लपंडाई-खरें खोटें करावयास हवें तेवढें तुकशेट करीत होते, असें आपण गृहीत धरूं. कर्तृत्ववान मनुष्य उमेदीनें, धिटाईनें, उडी टाकून व्यापार करीत असतांना, ज्यांच्या नाडया थंडावल्या आहेत, अशा वडिलांचें जेवढें वचन मोडतों. तेवढी तुकशेट पितृवचन मोडून अवज्ञा करीत होते असें हि आपण गृहीत धरूं. पण त्यावेळच्या रीतिरिवाजाप्रमाणें त्यांनीं नांव व भूषण मिळविलें होतें. ही हि गोष्ट आपण जमेस घेऊं. अशा मनुष्यास स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली. व पोटें पीटिलो काहारें या गोष्टी केव्हां हि जिव्हारीं लागतीलच. तशी ती तुकशेट यास जिव्हारीं जखम झाली असावी. तेव्हां कोणाशीं संबंध नको. असें वाटून एकांत आवडावा हें सहज आहे. अशा एकांतांत असतांना आपलें काय व कोठें चुकलें हा विचार कोणी हि करणार च. मनुष्य अशा त-हेंने आपली चूक शोधीत असतांना, आपण उत्साहानें ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्या कोठें-घसरल्या-फसल्या सिध्दिस कां गेल्या नाहींत, या सर्वांचें कारण दुष्काळ हें लक्ष्यांत आल्यावर हा दुष्काळ निवारण करणें हें कांहीं माझ्या हातचें नाहीं-हा दुष्काळ कांहीं मी आणला नाहीं तेव्हां दुष्काळें आटीलें द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न अन्न करीतां मेली, याबद्दल एकबार बुध्दिनिश्चय झाल्यावर, परंपरागत समजुतीप्रमाणें, ईश्वरी क्षोभानें, ही अवनत अवस्था आली आहे, असें पटल्यावर, लज्जा वाटे जीवा । त्रासलो या दुःखें । वेवसाय देखें तुटी येतां ही अवस्था प्राप्त झाली. तेव्हां घराण्यांत परंपरेनें आलेलें (1) हरिनाम (2) पंढरीची वारी व (3) विठोबा रखुमाईचें देऊळ होतें इकडे तुकशेट यांची द्दष्टि वळली. तेव्हां खालील शब्दांत नव्हे (कारण ही शब्दरचना-पुढें देशाउर झाल्यानंतरची आहे.) पण खालील अभंगांत जो अर्थ सांठवला आहे त्या अर्थानें तुकशेट यांनीं देवास म्हटलें असावें कीं-बा पंढरीनाथा-तुम्ही उभयतां आमच्या घराण्याचें सात पिढया संरक्षण करीत आहांत. माझी स्थिति अति बिकट झाली आहे-यांतून बाहेर पडण्याचा मला तर मार्ग दिसत नाहीं. जो जो उपाय करावा, तो तो अपाय होतो, तेव्हां बा मी तुला मी शरण आहे ही स्थिति तुम्ही आणली आहे. तेव्हां ती कशी निवारावयाची तें तुम्ही पाहून घ्या. मी परंपरेनें आलेलें तुमचें नाम गाईन, नाम ध्याईन. हा संसाराचा भार माझ्यानें पेलवत नाहीं. यावेळीं तुकशेट यांनीं खालील शब्दांनीं नव्हे पण या अवस्थेनें विठोबास म्हटलें असावें कीं :- (पं. 3631)
॥ माझीये बुध्दीच्या खुंटला उपाव । करसील काय पाहेन तें ॥ 1 ॥
॥ धृ ॥ सूत्रधारी तूं हें सकळ चाळीता । कासया अनंता भार वाहों ॥ धृ ॥
॥ वाहीले संकल्प न पवती सीध्दी । येऊं देह बुध्दी वरी नये ॥ 2 ॥
॥ तुका म्हणे दुःखी करीती तरंग । चिंतूं पांडूरंग आवरूनी ॥ 3 ॥
मनांत जे निरनिराळे तरंग येऊनी दुःख होई, तें निवारण्यास्तव आपण केलेले सर्व उपाय निरुपयोगी झाले असें पाहून-वाहीले संकल्प न पवती सीध्दी । अशी स्थिति झाली असतांना करशील काय पाहेन तें । असें म्हणून देवावर भार घालून तुकशेट स्वस्थ झाले. तेव्हां देवानें उपाय करण्यास सुरवात केली. देवानें पहिली गोष्ट केली ती ही कीं, देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेसें ॥ 5 ॥
देवाचें देऊळ भंगलें आहे. तसा च आपला संसार हि भंगला आहे. यांच्या संबंध कांहीं असेल काय, नसेल हि, पण आतां तें देऊळ स्वतः अंगमेहनत करून दुरुस्त करावें. अशी च वृत्ती-अशा च मनाच्या स्थितींत च्ठ्ठत्दद्य क़ध्दठ्ठदड़त्द्म दृढ ॠद्मद्मत्द्मद्मत् या संतास आली होती. परंपरेनें चालत आलेलें हरिनाम घ्यावें व तें घेत घेत देवाचें देऊळ दुरुस्त करावें असा हातापायांस व वाणीस व्यवसाय सुरू झाला. यापूर्वीं परंपरेनें आलेली एकादशी तुकशेट पाळीत होते. हरिकीर्तनास हि जात होते. परंतु संतवचनें पाठ करावीं. त्यांचा अभ्यास करावा अशी बुध्दि झाली नव्हती. परंतु मुखीं नाम वास करूं लागल्यावर पुढची पायरी आपोआप पुढें आली ती ही कीं :-
॥ कांहीं पाठ केलीं संतांची उत्तरें । वीश्वासें आदरें करूनीयां ॥
ही वचनें नीट पाठ व्हावींत, त्यांचा भाव मनीं नीट ठसावा म्हणून
॥ गाती पुढें त्यांचे धरावें ध्रुपद । भावें चित्त शुध्द करूनीयां ॥
तुकोबांनीं विश्वासानें व आदरानें संतांचीं कांहीं वचनें पाठ केलीं. या वचनाचा आधार घेऊन कै. ल. रा. पांगारकर यांनीं तुकोबांचें ग्रंथाध्ययन असें एक सहासष्ट पृष्ठांचें रसभरीत प्रकरण लिहिलें आहे. पण देहूसारख्या ठिकाणीं येवढे ग्रंथ त्यावेळीं मिळणें शक्य होतें का ? बरें ग्रंथ होते असें जरी मानलें तरी ते ग्रंथ तुकोबांस वाचावयास मिळण्यासारखे होते का- ? कोणी वाचूं दिले असते का ? ग्रंथाध्ययन करण्याजोगें तुकोबांचें बाल वय होतें का ? जाती वगैरे मनांत न आणतां ग्रंथाध्ययन करण्याजोगें तुकोबांचें बाल वय होतें का ? जाती वगैरे मनांत न आणतां ग्रंथांतील रहस्य उकलून सांगतील असे महात्मे देहूच्या आसपास कोणी होते का ? या गोष्टींचा पांगारकरांनीं विचार करावयास हवा होता. पण यांपैकीं एक हि विचार त्यांना शिवला नाहीं. अभंगांत आलेल्या विचारासारखा विचार एखाद्या ग्रंथांत आलेला पाहिला कीं तो ग्रंथ तुकोबांनीं अभ्यासिला होता, असें म्हणण्यास पांगारकर तयार !! सुमारें 100/125 वचनें अभंगांत व बायबलमध्यें सारखीं आहेत. एवढयानें तुकोबा बायबल शिकले होते असें का म्हणावयाचें ? अध्यात्माचा विचार करूं लागावें तों कांहीं श्रुतींच्या वचनांप्रमाणें अभंगांचे चरण सांपडतील, यावरून तुकोबांनीं उपनिषदांचा अभ्यास केला होता असें का म्हणावयाचें ? शिवाय कांहीं पाठ केली यापेक्षां, विश्वासें आदरें करूनीयां, हें चरण जास्त महत्त्वाचें आहे. तुकोबांनीं पाठ केलीं अशीं जीं "कांहीं" वचनें असतील, तीं निवडक असतील. वचनें नारायणाची जोडी करून देणारीं असतील हें खरें, पण तीं वचनें कांहीं म्हणजे थोडीं याचा अर्थ केव्हां हि पुष्कळ असा होत नाहीं. ग्रंथाध्ययनाबद्दल तुकोबांचें मत काय होतें तें त्यांनीं धरणेक-यास उपदेश केला तेव्हां पहिल्या च वाक्यांत "नको कांहीं पडो ग्रंथाचीये भरी" असें निश्चित सांगितलें आहे. तेव्हां समग्र साडेचार हजार अभंगांत ग्रंथाध्ययनाबद्दल आलेले सर्व उल्लेख (अभंग 423-426) येथें आले आहेत ते विचारांत घेतले पाहिजे. 423 अभंगांत तुकोबा म्हणतातः- आपण पाठांतर करावयाचें तें असें करावयाचें कीं, तीं वचनें करुणापर असावींत, त्या वचनांत देव प्रत्यक्ष भेटावा, त्या वचनांनीं कैवल्याच्या सोज्वळ वाटा स्पष्ट व्हाव्यात, व त्या पाठांतराचा उपयोग ती जोडी मला व्हावी असा हेवा उत्पन्न करण्यास व्हावा. या पुढील अभंगांत स्पष्ट म्हटलें आहें कीं :- (424)
॥ पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐसी मती अर्थ कळें ॥
शिवाय ग्रंथाध्ययन केलें तरअंगासी एखादा येईल प्रकार । तेव्हां पुढील अभंगांत म्हणतात कीं (426)
॥ तुका म्हणे बहुं सांडीयली मतें । आपुल्या पुरतें धरूनी ठेलो ॥
तेव्हां मतांतरें गोळा न करितां अभंग 423-426 या वचनांस धरून तुकोबांनीं कांहीं पाठ केलीं संतांचीं वचनें, विश्वासें आदरें करूनीयां । हीं तुकोबांनीं पाठ केलेलीं वचनें कोणतीं असावींत हें समजणें केव्हां हि तुकोबांच्या चरित्रलेखनास अत्यंत आवश्यक आहे. तीं वचनें अभंग 423 च्या कसोटीस उतरलीं पाहिजेत. सध्यां ती यादी आपणास उपलब्ध नाहीं. परंतु पूर्वीच्या संतांच्या वचनांतून कांहीं वचनें त्यांनीं विश्वासें आदरें पाठ केलीं हा चरित्रांतील एक टप्पा आहे. हरिपाठ (ज्ञानेश्वर), श्रीज्ञानेश्वरी, अमृतानुभव, पासष्टी, श्रीज्ञानेश्वर अभंग-निवृत्तिनाथ-अभंग, नामदेवराय (अभंग), जनाबाई (अभंग), एकनाथ, भागवत रामायण, अभंग-व कबीर यांच्या वचनांचा तुकोबारायांच्या मनावर पुष्कळच संस्कार झाला असणार. ग्रंथांचे इतर पढीक विद्वान व तुकोबा यांत मुख्य फरक विश्वासें आदरें व भावें चित्तशुध्द करोनिया । या वृत्तींत आहे. तुकोबारायांनीं विश्वासें आदरें पाठ केलेल्या वचनांचा संग्रह आज तरी काळयाच्या उदरांत गडप झाला आहे, पण यदाकदाचित् तसा हस्तलिखित संग्रह, त्यांनीं वापरलेले ग्रंथ, कदाकाळी उपलब्ध होतील, तर त्या वचनांच्या आधारें किती तरी अभंगांचा अर्थ स्पष्ट होईल ! सध्यां त्याबद्दल अनुमान च कलं पाहिजे, पण तें अनुमान च केलें पाहिजे, पण तें अनुमान असें केलें पाहिजे कीं, आज तुकोबांचे जे अभंग उपलब्ध आहेत, तें ज्या वचनांचें फळ शोभेल अशीं बीज-वचनें तुकोबारायांनीं आपल्या मनोभूमींत रूजत घातलीं असावीत. तीं वचनें कोणतीं असावींत अशा विचारानें पूर्वीच्या संतांचे ग्रंथ आपण जरूर पाहावे.
तेव्हां माझीया बुध्दीचा खुंटला उपाव । असें म्हणून तुकोबांनीं जेव्हां घरच्या कुळदेवतेस-करशील काय पाहेन तें । असें म्हटलें-व देवावर भार घालून राहिले. तेव्हां हरिमुखें म्हणा-हरिमुखें म्हणा । या ज्ञानराज माऊलीच्या उपदेशाप्रमाणें तुकोबांचा आचार होता, हा आचार त्यांनीं (179)
॥ बोलावा वीठल पाहावा वीठल करावा वीठल जीवभाव ॥
असा पाळला. करावा वीठल जीवभाव। हें चरण मोठें च अवघड आहे, व त्याची साक्ष ज्याची त्यानें च द्यावयाची असते. पण हा आचार असा साच भावानें वागून संभाळला म्हणून काय झालें तें पुढील चरणांत त्यांनीं सांगितलें आहे.
॥ धृ ॥ येणें सोसें मन जालें हावभरी । परती माघारी घेत नाहीं ॥
॥ बंधनापासुनी उकलली गांठी । देतां आली मिठी सावकासें ॥
॥ तुका म्हणें देह भरीला वीठलें । कामक्रोधीं घर केले ते ॥
संतांचीं वचनें विश्वासानें व आदरानें पाठ करीत असतांना त्या ऐश्वर्यवंत वचनाचा प्रभाव दिसूं लागून तुकोबांचा आचार बदलला. त्यांनीं स्वचरित्रपर अभंगांत म्हटलें आहे कीं, 1333
॥ गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुध्द करोनियां ॥
भावें चित्तशुध्द करोनिया । हा चरण विश्वासें आदरें करोनिया या चरणाचा च पाठचा भाऊ आहे.
॥ संतांचे सेवीलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली. ॥
या लाजेवर पुढें 3/4 अभंग झणझणीत च केले आहेत.
॥ ठाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवुनी ॥
हा उपकार शरीर कष्टवून कसा केला हें सांगतांना महिपतीबोवांनीं तुकोबांनीं एका वृध्द ब्राह्मणीस तेल आणून दिलें. तें पुष्कळ दिवस पुरलें. तेव्हां गांवच्या सर्वच बायका आपली तेलाची बुधली व पैसे तुकोबांजवळ देऊं लागल्या, तुकोबा ते पैसे व बुधले गळयांत अडकवून तेल्याकडे जात; तेल्यापुढें ते पैसे व बुधले टाकीत. तेली ज्याचे जेवढे पैसे तेवढें च तेल अन्तज्र्ञानानें प्रत्येक बुधल्यांत बरोबर भरी-असें मोठे चटकदार वर्णन महिपतीबुवांनीं केलें आहे. पण मला ही हरदासी कोटी आहे असें वाटतें. अंतरीं ज्ञानज्योती प्रकट होत असतांना मनुष्य गाफील-उदास व पिसा होतो कीं काय? तेव्हां तुकोबांस गांवच्या (महिपतीनें म्हटल्याप्रमाणें) बायकांनीं वेठीस धरलें असेल हें संभवत नाहीं. त्यांच्या ज्ञानांत जास्त जास्त स्पष्टता होत होती म्हणून ते केव्हां हि-ऐकावें जनाचें करावें मनाचे या वृत्तीचे होते म्हणून तुकोबा स्वचरित्रपर अभंगांत पुढें सांगतात कीं,
वचन मानीलें नाहीं सुहृदाचें । समूळ प्रपंचे वीट आला ॥
सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानीयलें नाहीं बहुमता ।
तुकोबा होयबा नव्हते ही गोष्ट त्यांनी वचन मानीयलें नाहीं सुहृदयाचें । या शब्दांत स्पष्ट सांगितली आहे. अत्यंत उत्साहानें संसार करीत असतांना आपल्या बुध्दीचे सर्व उपाव कुंठीत जाले, तेव्हां जो माझ्या जीवाचें सूत्र हालवीत आहे, तो आपलें काम कसें करतो हें पाहण्याचें काम कांहीं माझें नाहीं. तो मज व्हावा । तो मज व्हावा । अशी मला आतां आस लागली आहे-तेव्हां त्याचें काम तो करो-माझें काम मी करतों. अशा निश्चयानें तुकोबा वागत म्हणून संसारांत काय किंवा परमार्थांत काय, त्यांस कोणी कांहीं हि सांगून भुलवूं शकेल, कोणी कांहीं शिकवूं शकेल अशी स्थिति उरली नव्हती. त्यांनीं स्पष्ट सांगितलें आहे कीं,
सत्य असत्यासी मन केलें ग्वाही । मानीयलें नाहीं बहुमतां ।
या एका वचनांत केवढा अर्थ सांठविला आहे ! हें वचन बहुंशीं ज्ञानेश्वर माउलीचे शिकवणीवर आधारलेलें आहे. श्रीज्ञानेश्वरींत नवव्या अध्यायांत खालील ओव्या आहेत. म्हणौनि ज्ञान तें चि आंधारें । ज्ञानासि करिति ॥ 170
आंधलेया गरूडाचे पांख आहाति । ते कोण्हाहि उपेगां जांती ।
तैसे सत्कार्याचे उपखे ठांती । अज्ञानां तेवी । 303 ।
ऐसे दीक्षीत जे सोमप । जे आपण चि यज्ञाचें रुप ।
तीहीं तेया पुण्याचेनि नांवें पाप । जोडीलें देखै ॥ 306 ।
जे श्रुतीत्रयींतें जाणौनि । शतवे-हीं यज्ञ करुनि ।
यजियेला हि मातें चुकउनी । स्वर्गु वशंति ॥ 307 ।
जैसें कल्पतरु तळवटीं । बैसोनि झोलीये पाडी गांठी ।
मग निर्दे निगे किरीटी । दैन्य करूं ॥ 308 ।
तैसें शतक्रतु याजिले मातें । कीं इच्छिताती स्वर्गादि सुखाते ।
आतां हें पुण्य कीं निरुतें । पाप नोहे ॥ 309 ॥
म्हणौनि मजवीण पावीजे स्वर्गु । तो अज्ञानाचा का पुण्यमार्गु ।
ज्ञानीये तेयातें उपसर्गु । हाणि म्हणती ॥ 310 ॥
ए-हवीं तरी नरकीचें दुःख । पाहूनि स्वर्गा नांव की सुख ॥
वाचूनि नित्यानंद निर्दोष । तें स्वरुप माझें ॥ 311 ॥
मज येतां पै सुभट । हा द्विविधु गा अव्हांटा ।
स्वर्ग नरक इगा वाटा । चोरांचिया ॥ 312 ॥
स्वर्गा पुण्यात्मकें येईजे । तें शुध्द पुण्य ॥ 313 ॥
आणि मज चि माझि असतां । जेणें मी दूरी होये पांडुसुता ।
तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न झडे ॥ 314 ॥
मग तेया पुण्याची पाहुती सरे । सवें चि इंद्रपणाची उटी उतरे ।
आणिं येवो लागती माघारे । मृत्यु लोका ॥ 325 ॥
जैसा भाडीचा कवडा वेचे । मग दार ही चेपूं नैये तेयाचें ।
ऐसें लाजीरवाणें दीक्षीताचें । काइ सांधो ॥ 326 ॥
अर्जुना वेदु ज-ही जाला । त-ही मी नेणतां वाया गेला ।
कनु सांडौनि उपणीला । कोंडा जैसा ॥ 329 ॥
आतां आणीक संप्रदाये । परी माते नेणति समवाए ।
जे अग्नये इंद्राय अर्यमणें सोमाय ॥ म्हणौनि भजती ॥ 340 ॥
तें हि कीर मातें चि होये । कां जें हें आघवें मी चि आहे ।
परि भजती उजिरी नोहे । विखम पडे ॥ 341 ॥
पाहे पां शाखा पल्लव वृक्षाचे । हे न्हवति येका चि बीजाचे
परी पाणी घेणें मुलांचें । ते मुलीच घापे ॥ 342 ॥
कां दाही इंद्रियें आथि । इयें ज-ही एकीची देहिचिं होति ॥
आणि इहीं सेविले विखम जांती । एका चि ठाया ॥ 343 ॥
तरी करूनि रसोये बरवी । कानि केवी भरावी ।
फूलें आणुनु बांधावी । डोलां केवि ॥ 344 ॥
तेथ रसु तो मुखे चि सेवावा । परिमलु तो घ्राणें चि घेयावा ।
तैसा मी तो यजावा । मी चि म्हणौनि ॥
येर मातें नेणौनि भजन । तें वाया चि गा आनीआन ।
म्हणौनि कर्माचे डोले ज्ञान । तें निर्दोष होआवे ॥ 349 ॥
तसें च तेराव्या अध्यायांत खालील ओव्या आहेतः
नीच आराधन माझें । कां जी कुलदेवतीं भजे ।
पर्व विशेषें भोजें । पूजा आन ॥ 814 ॥
माझें आधिष्ठान घरीं । आणि वौरो आनाचे करी ॥
पितर कार्य अवसरी । पितराचा होए ॥ 815 ॥
एकादशीच्या दिसीं । जेतुला पाडु आमसीं ।
तेतुला चि नागासी । पंचमीसी ॥ 816 ॥
चौथि मोटकी पाहे । आणि गणेशांचा हि होए ।
चाउदसिं म्हणें माए । तुझा चि वो दुर्गे ॥ 817 ॥
नवमीतें मांडी । आणि बैसे नवचंडी ।
आदित्यावारिं वाढी । भैरवा भरी ॥ 818 ॥
पाठीं सोमवार पावे । आणि बेलेेंसि लिंगा धावे ।
ऐसें एकला चि आघवें । जोगावी जो ॥ 819 ॥
अखंड भजन करी । उगा न राहे क्षणभरीं ।
आघवेति गांवंदारी । ऐहेव जैशी ॥ 820 ॥
तैसेनि जो गा भगतु । वेखासि सैरा धावंतु ।
जाण अज्ञानाचा मूर्तु । अवतारु तो ॥ 821 ॥
याशिवाय अमृतानुभवांत खालील ओव्या आहेत.
आणि ज्ञानबंधु ऐसें । शिवसूत्राचेनि मिसें ।
म्हणितले असें । सदाशिवें ॥ प्र. 3।16 ॥
आणि वैकुंठीचे हि सुजाणें । ज्ञानापाशीं सत्वगुणें ।
बांधिजे हें बोलणें । बहु केलै ॥ 17 ॥
परि शिवें कां श्रीवल्लभें । बोलील येणें चि लोभें ।
मानु तें हि लाभे । न बोलतां हि ॥ 18 ॥
जें आत्मज्ञान निखळ । तें हि घे ज्ञानाचें बळ ।
तैं सूर्य चिंती सबळ । तैसे नोव्हे ॥
ज्ञानें श्लाघ्यतु आहे । तें ज्ञानपण धाडीले वाये ।
दीप वाचूंन दिवा लाहे । तै अंग भुलला चि कीं ।
आपण चि आपणापाशीं । नेणता देशोदेशीं ।
आपण पें गिवशीं । हें कीरु होय ।
परिबहुता कां दिया । आपणापें आठवलिया ।
म्हणे मी यया । कैसा रिझो ॥
तैसा ज्ञानरुप आत्मा । ज्ञानें चि आपली प्रभा ।
करीतसे सोहं मा । ऐसा बंधु ॥
या शिवाय ज्ञानोबारायांचें (1) कां सांडीसी गृहाश्रम । व (2)घरदार वोखटे त्यजूं म्हणसि । हे व असले इतर अभंग हि तुकोबांनीं नीट मनन करून म्हटलें कीं :-
॥ सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानीयले नाहीं बहुमतां ॥
मानीयलें नाहीं बहुमतां । ही गोष्ट तेव्हां आचरण्यास अवघड होती व आज हि अवघड च आहे. पण हा च तुकोबारायांचा दंडक होता. म्हणून ते परमार्थाच्या नांवानें शाक्त, संन्यासी, जटाधारी, कानफाटे, मलंग, महानुभव, जंगम, मुद्राधारी असल्या कोणत्या हि फंदांत अगर छंदांत सांपडले नाहींत. त्या सर्वांस त्यांनीं ओळखून ठेविले. पुढें जगास नीती शिकविण्याची कामगिरी अंगावर आली त्या वेळीं प्रत्येकास तुझें कोठें चुकतें आहे हें हि बुक्का लावून अचुक सांगितलें. तुका म्हणें हे मावेचे मइंद । या पाशीं गोविंद नाहीं नाहीं (पं. 3939) असें दोनदा ठासून सांगितलें व वर म्हणाले कीं सोंगें छंदें कांहीं देव जोडे ऐसा नाहीं । (पं. 1507)
तात्पर्य ज्ञानोबारायांचीं कांहीं वचनें पाठ केलीं त्यावरून ज्ञान च बंध कसा होतो हें तुकोबांनीं समजून घेतलें असावें, वाटेल त्या देवतेचें रोज नवेपणानें केलेलें भजन पूजन उपयोगी पडत नाहीं, इतकें च नव्हे तर तें भजन ऐहेव जैसी । असें होतें; विखम पडे, अशा सर्व वचनांचें वर्म लक्ष्यांत घेऊन तुकोबांची सर्व भजन पूजना बद्दलची ज्ञानदृष्टी चोख झालेली असावी. अशा चोख दृष्टीनें विश्वासें आदरें जीं संत वचनें गाऊन विठू आळवीत असतील तीं ऐश्वर्याचीं वचनाक्षरें मनांत खोल रुजून-आपला प्रभाव दाखविल्याशिवाय कशी राहणार ! रोज इंद्रायणींत स्नान करावें. देवपूजा करून-एकांत साधावा म्हणून भंडा-यावर (बसून वा उभ्याने कधीं नाचून) भजन करीत असतील त्यावेळची त्यांची एकतानता, एकविधता व उत्कटता केवढी असेल ! त्या उत्कट भजनांत डोळा लागला तर झोप; नाहीं तर आहे च अखंड मुखीं नाम. अशा स्थितींत असतांना एका गुरूवारीं (तो दिवस माघ शुध्द दशमी हा होता) तुकोबास एक दिव्य स्वप्न पडलें. त्या स्वप्नांत त्यांनीं असें पाहिलें कीं - आपण गंगेवर - इंद्रायणीवर - स्नानास जात आहोंत - अशा स्थितींत कोणी तरी मुद्दाम येऊन आपणांस गांठलें - व मस्तकावर हात ठेवून (संत गुरुरायांनीं) कृपा केली. आपलें नांव बाबाजी असें सांगितलें. राघो चैतन्य व केशव चैतन्य अशी आपल्या मालिकेची खूण सांगितली. मला रामकृष्ण हरि हा मंत्र दिला. हा मंत्र संत गुरुरायांनीं माझ्या मनींचा भाव ओळखून माझ्या आवडीचा सोपा ज्यांत कोठें गुंतांगुंत नाहीं असा मंत्र मला सांगितला. सर्व साधुसंत हा भवसागर या मंत्राच्या साहाय्यानें च पैलपार झाले आहेत, मग तो मनुष्य जाणता असो वा नेणता असो. हा मंत्र च त्याला भवसागर तरून जाण्यास सांगड झालेला आहे असें सांगून संत गुरूरायांनीं मला कृपेचा सागर पांडुरंग दाखविला व भोजनासाठीं पावशेर तूप मागितलें तें मी आणावयास गेलों. येवढयांत त्यांचे मनांत काय आलें नकळे; पण त्यांस जाण्याची त्वरा झाली. ते गेले. मी जागा झालों. या दिवशीं माघ शुध्द दशमी होती. त्या दिवशीं संत गुरूरायांनीं माझा अंगीकार केला.
हा दृष्टांत संताजीच्या गाथ्यांत अभंग 215-16 असा आलेला आहे. गुरूकृपेचे म्हणून सर्व गाथ्यांतून चार अभंग एकत्रित केलेले आढळतात. (1) घालुनियां भार बैसलों निश्चिंतीं । (2) माझीया मनाचा जाणा हा निर्धार । हे अभंग संताजीचे गाथ्यांत 400-01 असे आहेत. तेव्हां हे चारी अभंग एका वेळीं झालेले नसावेत असें वाटतें. 216 व्या अभंगाचे शेवटीं 2 चा आकडा घालून तो विषय संताजीनीं संपला असें दाखविलें आहे. अन्तर्गत पुराव्यानें असें हि वाटतें कीं - घालुनीया भार । हा अभंग विठोबाशीं तक्रार केल्यासारखा दिसत आहे. त्यांत असें म्हटलें आहे कीं- देवा मी तुमच्यावर भार घालून निश्चिंत बसलों आहे याचें कारण असें कीं, पूर्वी संतांनीं मला माझा माथा हातानें कुर्वाळला व विठोबा दाखविला यास मला निरविलें व सांगितलें कीं चिंता करूं नयें तेव्हां घालुनीया भार । व माझीया मनाचा जाणा हा निर्धार । हे अभंग वेगळे आहेत. तेव्हां स्वप्नांतील दृष्टांताचे दोन्ही अभंग आपण जास्त बारकाईनें पाहूं.
संताजीमधील संत गुरुराये-हा पाठ गुरु हा संत कुळीचा राणा-या ज्ञानोबांच्या अभंगास ज्यास्त जुळता आहे. तेव्हां हा पाठ सत्य गुरुराये व सदगुरुराये या पाठांतरापेक्षां निःसंशय श्रेष्ठ आहे. तुकोबांस जो गुरु हवा होता तो नुसता ब्रह्मज्ञान करून देणारा नको होता तर तो विठोबाची प्रेमखूण सांगणारा हवा होता. तसा संत गुरु बाबाजी यानें- तुका म्हणे मज दावियेला तारु । कृपेचा सागर पांडुरंग । सद्गुरुयाये व सत्यगुरुराये असे पाठ आजवर कसे प्रचलीत झाले याचें मला आश्चर्य वाटतें. कारण पुढील अभंगांत गुरु व संत यांतील फरक तुकोबांनीं स्पष्ट मांडला आहे. (पं. 4406)
॥ गुरुचीया मुखें होईल ब्रह्मज्ञान । न कळे प्रेमु खुण वीठोबाची ॥
॥ वेदांतें वीचारा पुराणां ते पुसा । वीठोबाचा कैसा प्रेमभाव ॥
॥ तुका ह्मणे सांडा जाणीवेचा शीण । वीठोबाची खूण जाणती संत ॥
तेव्हां हाताने विठोबाकडे बोट दाखवून-विठोबावर भार घालून कसली हि काळजी करूं नको म्हणून सांगणारा नुसता गुरु नव्हता तर तो संत होता असें घालुनीया भार । या अभंगांत निरविलें संतीं । असें च म्हटलें आहे. तेव्हां सत्य गुरुराये किंवा सद्गुरुराये हे पाठ अस्सल पोथी केव्हां हि पुढें न आल्यामुळें कोणा तरी विद्वानाचे शोध आहेत. सत्य गुरुरायांनीं किंवा सद्गुरूरायांनी तुकोबांच्या पाठीस ब्रह्मज्ञानाच्या जाणीवेचा शीण लावला असतां तो शीण हातानें विठोबा दाखवून संत गुरुरायानें चकविला व विठोबाची प्रेमखूण हातीं दिली. या पुढील गोष्ट पहावयाची तर ती ही कीं या संतांनीं आपण होऊन तुकोबांस गाठलें. आपण होऊन त्यांनीं रामकृष्ण हरि हा मंत्र दिला. आपलें नांव, आपली गुरु परंपरा सांगितली. भवसागर तरून जाण्यास चंद्रभागेच्या तीरीं कटीं कर धरून जी नाव उभी आहे तें उत्तम तारु आहे असें सांगितलें, म्हणजे ज्ञानोबारायांनीं म्हटल्याप्रमाणें दाविलें निधान वैकुंठीचें ।
सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन । दावीलें निधान वैकुंठीचें ॥ 1 ॥
सद्गुरु माझा जीवीचा जिवलग । फेडीयेला पांग प्रपंचाचा ॥ 2 ॥
सद्गुरु हा अनाथ माऊली । कृपेची साउली केली मज ॥ 3 ॥
ज्ञानदेव म्हणे अवचित घडलें । निवृत्तीनें दिधलें निज बिज ॥ 4 ॥
ज्ञानोबांनीं म्हटलें कीं निवृत्तिनाथांनीं निज बिज मला दिलें ही गोष्ट अवचित घडली. तसें च बाबाजी चैतन्यांनीं तुकोबांस आपण होऊन गांठलें, स्वतःहोऊन मंत्र दिला, विठोबा दाखविला, ही गोष्ट हि अवचित घडली. स्वचरित्रपर अभंगांत तुकोबा म्हणतात कीं :-
॥ मानीयेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरीला विश्वास द्दढ नामीं ॥
गुरुपदेशानें एक गोष्ट झाली ती ही कीं आपण जो मार्ग आक्रमत आहोंत तो देवा घरीं रूजू आहे याची प्रतीति आली. गुरुपदेशाच्या अनुभवानें साक्षात्कारानें तुकोबांचा नामावरील विश्वास द्दढ झाला.
॥ बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ॥ करावा विठ्ठल जीव भाव । 1336( शासकीय )
यापुढें ती च गोष्ट गुरूपदेशानंतर ते सोसासोसानें करूं लागले असावेत व मनांत सारखी हाव भरून वाहात असावी व हा सोस एवढा वाढला असावा कीं तुका-वेडा झाला आहे, अशी समजूत प्रचलत झाली असावी. कारण ही गोष्ट तुकोबांनीं एका अभंगांत कवतुकानें सांगितली आहे. त्या अभंगाचा मागचा पुढचा संबंध जुन्या अस्सल वह्या सांपडतील तेव्हां स्पष्ट होईल. तोपर्यंत खालील अभंगाच्या आधारें आपणास येवढें म्हणतां येईल कीं तुकोबांस नामाचा छंद एवढा जबरदस्त लागला कीं लोक हा वेडा आहे, बडबड फार करतो, असें म्हणूं लागले. या अभंगावरून तुकोबांस त्यावेळीं गुरुज्ञानाशिवाय दुसरें कांहीं दिसत नव्हतें-सुचत नव्हतें-दुसरी कोणती हि गोष्ट ते ऐकावयास तयार नव्हते-विदवान् माणसांस तुका थुंकोन टाका-म्हणजे तुका हें नांव च वाचेनें उच्चारूं नका, माझें नांव सोडा असें सर्वत्रास सांगत होते. क्षो अभंग हा. (पं.2868)
॥ तुका वेडा अवीचार । करी बडबड फार ॥ 1 ॥ 2839( शासकीय )
॥धृ॥ नित्य वाचे हा चि छंद । राम कृष्ण हरि गोविंद ॥धृ॥
॥ धरी पांडुरंगीं भाव । आणीक नेणें दुजा देव ॥ 2 ॥
॥ गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥ 3 ॥
॥ बोल नाईके कोणाचे । कथे नागवा चि नाचे ॥ 4 ॥
॥ संग उपचारे कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥ 5 ॥
॥ कांहीं उपदेशीले नेणें । वाचे विठ्ठल विठ्ठल ह्मणे ॥ 6 ॥
॥ केला बहुतीं फजीत । परी हें चि करी नित्य ॥ 7 ॥
॥ अहो पंडित जन । तुका टाकावा थुंकोन ॥ 8 ॥
या अभंगांत रामकृष्ण हरि हा मंत्र आहे. गुरुज्ञानाचा उल्लेख आहे. संत गुरुरायानें कृपेचा सागर पांडुरंग म्हणून सांगितलें त्या गोष्टीचा उल्लेख आहे, व विठ्ठल विठ्ठल असा मनास छंद लागला होता असें हि म्हटलें आहे. तेव्हां हा अभंग गुरुपदेशानंतरच्या व देवदर्शनापूर्वींच्या स्थितीच्या वर्णनपर आहे. तुका वेडा अवीचार असें लोक म्हणत होते. त्याबद्दल तुकोबांस काय वाटत असावें हें खालील अभंगांत लोक वेडा कोणास म्हणतात. तें सांगतांना स्पष्ट झालें आहे. तो अभंग खालीलप्रमाणे :- (पं. 4350)
॥ कोटीजन्म पुण्यसाधन साधिलें । तेणें हातां आलें हरिदास्य ॥ 1 ॥
॥ धृ ॥ रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । कायावाचा मन भगर्वेतीं ॥ धृ ॥
॥ ऐसीया प्रेमळा म्हणताती वेडा । संसार रोकडा बुडवीला ॥ 2 ॥
॥ एकवीस कळें जेणें उध्दरिली । हे तो न कळे खोली भाग्यमंदा ॥ 3 ॥
॥ तुका म्हणे त्याची पायधुळी मिळे । भव भय पळे र्वेदीता चि ॥ 4 ॥
वरील अभंगांतील पहिल्या दोन चरणांत जें शब्दचित्र रेखाटलें आहे त्यास तुकोबा प्रेमळ म्हणतात. एवढेंच नव्हें तर यानें संसार बुडविला म्हणून नांवें ठेवतात. तुकोबा म्हणतात अरे मी सर्व पूर्वजांचा उध्दार केला आहे हें या बुध्दीहीन जीवांस कळत नाहीं. नुसता मला नमस्कार केलात, नुसते माझे चरणरज, तुमचे अंगावर आले, तर तुमचे भव भय नाहींसें होईल. तुमचें भवभय पळेल. तेव्हां आपण त्यांची पायधुळी मिळावी-त्यांच चरणरज अंगावर यावेत म्हणून आस धरून राहूं या. वर उध्दृत केलेल्या अभंगावरून एवढी गोष्ट स्पष्ट होत आहे कीं, गुरुपदेशानंतर कांहीं दिवस तरी लोक तुका, वेडा, अविचारी, समजत होते व तुकोबा (पं. 4348)
कोटीजन्म पुण्यसाधन साधीलें । तेणें हातां आलें हरीदास्य ॥
रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । काया वाचा मन भगर्वेतीं ॥
लावून होते. अशा स्थितींत किती दिवस गेले हें कांहीं सध्यां सांगतां येत नाहीं. याबद्दल कोणी कांहीं शोध केला नाहीं. महिपतीबोवांनीं कांहीं लिहिलें नाहीं या अभंगाकडे त्यांचें लक्ष्य वेधलें नव्हतें तेव्हां याबद्दल कांहीं वाद हि नाहींत. पण अशा स्थितींत कांहीं दिवस गेल्यावर स्वचरित्रपर अभंगांत तुकोबा म्हणतातः-
यावरी या जाली कवित्वाची स्फूर्ती । पाय धरीले चीत्तीं विठोबाचें ॥
तुकोबांस कवित्वस्फूर्ती स्वप्नांत दृष्टांत होऊन झालेली आहे. त्याबद्दलचा खालील अभंग स्पष्ट आहेः-(पं. 1320)
॥ नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥
॥ धृ ॥ सांगितलें काम करावें कवित्व । वाऊगें निमित्य बोलो नये ॥ धृ ॥
॥ माप टाकी सळ धरिली विठ्ठले । थापटोनि केले सावधान ।
॥ प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी । उरले शेवटीं लावी तुका ॥
हा अभंग संताजीबोवांच्या गाथ्यांत सांपडता तर त्याचा अर्थ करणें सोपें झालें असतें. असो, या अभंगाचा अर्थ असा कीं-स्वप्नांत-नामदेवांनीं मला जागें केलें. बरोबर पांडुरंगराय होते. नामदेवांनीं मला थापटोनि सावधान केलें व सांगितलें, यापुढें तुम्ही काम करावें, व्यर्थ बोलूं नये. काम जें करावयाचें तें कवित्व करावयाचें आहे. मी शतकोटी अभंग करीन म्हणून प्रतिज्ञा केली होती. तें काम माझे हातून पुरें झालें नाहीं. तें काम पुरें व्हावें अशी सळ म्हणजे अभिमान विठ्ठलानें धरिला आहे. एवढें नामदेवरायांचें भाषण होतां च उरले शेवटी लावी तु कां ? हे शब्द पांडुरंगरायांनीं उच्चारिले असावेत व देवाच्या तोंडचा तुका हा शब्द आपलें नाम असें सदरहु भक्तांनीं मानलें असावें असें मला वाटतें. ज्ञानेश्वर महाराजांचें ज्ञानदेव हें नाम गुरूकृपेनें च साधलेलें आहे.
विदेह आत्मलिंगा गुरुकृपेचा तुषारु । पूर्णें पूर्ण भरीला घटु ।
हळू हळू बिंदु उदारु । वरुषला लिंगावरी तेणें तुष्टला श्रीगुरु ।
प्रसन्न निवृत्तीराजा ज्ञान देऊनी उदारु ॥ 1 ॥
या लागी ज्ञान-देव नाम गुरुकृपेनें पावलों ॥
ज्ञानेश्वर महाराजांस ज्ञान-देव असें नांव जसें गुरूकृपेनें प्राप्त झालें तशीच निवृत्ती, सोपान, मुक्ताई हीं नांवें हि गुरुकृपेची आहेत. पांडुरंगरायाच्या तोंडची तुका हीं अक्षरें टोपण नांव-लाडकें नांव घेणें ही कांहीं कोणा हि अनन्य भक्तांच्या ठिकाणीं वावगी गोष्ट होणार नाहीं.
कोणत्या हि घराण्यांतील पुरुषांचीं व बायकांचीं नांवें- मागील बायका पुरुषांची पुनः पुनः येतात. मोरे यांच्या घराण्यांत पूर्वीचीं नांवें पाहावींत तर त्यांत तुकाराम असें नांव नाहीं. बोलोबा किंवा दामशेट यांच्या पूर्वीचीं नांवें-विश्वंभर-हरि-मुकुंद-विठ्ठल-पदाजी-शंकर-कान्हया अशी आहेत. या व्यक्तीच्या वडील भावाचें नांव सावजी म्हणजे शंकर असें ठेविलें होतें. ही व्यड़ती जन्मली त्यावेळीं बोलोबांचे वडील कान्हया हयात असावेत. त्यामुळें तें नांव ठेवितां येईना. तेव्हां या व्यक्तीचें नांव राम असें ठेविलेलें असावें. व या व्यड़तीनें त्यास तुका जोडून उत्तम नांव बनविलें. खुद्द देहूकरांच्या घरांत या व्यक्तीच्या पूर्वीचा कागद एक हि नाहीं. समकालीन कागद हि नाहींत. तेव्हां मला सुचलेला नवा विचार येथें प्रथमच मांडला आहे. तुकाराम असें नांव या व्यक्तीच्या वेळीं प्रचलीत होतें असें समकालीन पत्रव्यवहारांत आढळलें तर मी सुचविलेल्या नव्या कल्पनेस वाव होणार नाहीं. व तुकाराम असें या व्यक्तीचें प्रथम पासून नांव असेल हि. पण सरळ गोष्ट सांप्रदायिक अभिमानानें मनुष्य उलटी कशी सांगतो-याचा धडधडीत नमुना दास -विश्राम-धाम या रामदासी अगडबंब भारूडात पहावयास सांपडतो. त्यांत असें लिहिलें आहे कीं या व्यक्तीचें नांव पूर्वी तुका-तुकावा असें कांहीं तरी होतें. पण ही व्यक्ती समर्थ रामदास यांच्या भेटीस गेली तेव्हां समर्थ रामदासांनीं तुकोबांस तेराक्षरी (श्री राम जय राम जय जय राम) मंत्र देऊन सनाथ केलें व तुका याचे पुढें राम हीं अक्षरें जोडिली. तुकोबांनीं केव्हां हि त्रयोदशाक्षरी मंत्र घेतला नाहीं. ते सज्जनगडावर गेले असले तरी सज्जनगड स्थापन होण्यापूर्वी, फार काय, पण नारायणाचा रामदास होण्यापूर्वी च तुकोबांस साक्षात्कार झाले होते. शिवाजी राजा त्यांचे कडे कितीतरी पूर्वी आला होता. त्याचे सैनिकांस प्रसाद म्हणून पाइकीचें अभंग झालेले होते. तेव्हां दास-विश्राम-धाम या भारूडाच्या अजब कल्पनेचा जेव्हां मी शोध करूं लागलो तेव्हां तुकाराम असें नांव जुन्या कागदांत आढळलें. तुकाराम या नांवाबद्दल दास-विश्राम-धाम कर्त्यांचे वेळीं मी वर सुचविली आहे अशा अर्थाची कांहीं दंतकथा प्रचलित असावी त्यास दास-विश्राम-धाम कर्त्यानें निराळें स्वरूप दिलें असावें असो.
नामदेवरायांनीं "माप टाक" असें म्हटल्यावर तेथें हो-ना असें कांहीं करावयाचें नव्हतें च. तशी हो ना करावयास जागा राहूं नये म्हणून नामदेवरायांनीं आधीं च सांगून ठेविलें कीं सळ धरीली विठ्ठलें । माझी बाकी फिटावी, प्रतिज्ञा फोल होऊ नये, अशी सळ म्हणजे आग्रह विठ्ठलानें धरिला आहे. इतर लोक सळ याचा अर्थ माप असा करितात. पण कवित्वाबद्दल काळजी नको. ती बाकी कशी फिटेल याबद्दल शंका नको. या सर्व गोष्टी ध्वनित करण्यासाठीं सळ या शब्दाचा अर्थ आग्रह-अभिमान असा घ्यावा, असें वाटतें. व तसा अर्थ जास्त च चांगला लागतो. सळ धरिली विठ्ठलें । एवढें च सांगून नामदेवराय थांबले नाहींत. तर त्यांनीं काय केलें असावें. हें सुचविणारा एक अभंग संताजीच्या गाथेंत द्याल ठाव तरी । या पूर्वी आलेला आहे; तेव्हां संताजीमध्यें द्याल ठाव तरी या अभंगापूर्वी आलेला अभंग नामदेवें केलें स्वन्पामाजी जागे या नंतर घ्यावा असें मला वाटतें. तो अभंग खालीलप्रमाणे (संताजी 283)
॥ बाप करी जोडी लेकराचे ओढी । आपली करवंडी वाळऊनी ॥ 1 ॥
॥ धृ ॥ येकायेकीं केलों मिराशीचा धनी । कडीये वागवुनी भारखांदी ॥ धृ ॥
॥करूनीया पाहे डोळां अलंकार । ठेवा दावी थोर करुनीयां ॥ 2 ॥
॥ तुका म्हणे नेदी गांजुं आणीकासी । उदार जीवासी आपलीया ॥ 3 ॥
3267( शासकीय )
तेव्हां " उरलें तें सेंवटीं लावी तुका " ? हा जो प्रश्न विचारला, त्यास हो म्हणून उत्तर देतां यावें म्हणून नामदेवरायांनीं या व्यक्तीस (1) येकायेकीं केलों मीराशीचा धनी । (2) करूनीयां पाहे डोळा अलंकार (3) ठेवा दावी थोर करूनीयां व आपल्या जीवावर उदार होऊन मला कोणी गांजूं नये गांजणार नाहीं असें केलें. विठ्ठलाचें नाम विठ्ठलाचें प्रेम विठ्ठलाची भक्ति-या सर्वांतून उत्पन्न होणारें भक्तिप्रेमसुख ही नामदेवरायाची मिरासी. त्याचा धनी तुकोबांस-एकाएकीं केला. जसा एखादा मुलगा दत्तक घ्यावा व तो सर्व मिराशीचा एकाएकी धनी होतो किंवा दत्तक घेणारा त्या मुलास करतो तसा, आपण जो थोर भक्तिप्रेमसुखाचा ठेवा, करून ठेविला होता तो दाखविला. करूनियां पाहे डोळा अलंकार । म्हणजे तुकोबांनीं म्हटल्याप्रमाणें-कृपा या केली संतजनीं । माझी अलंकारियेली वाणी । प्रीत ही लाविली कीर्तनीं । असा, करूनीयां पाहे डोळा अलंकार । या चरणाचा अर्थ करावा असें मला वाटतें. तेव्हां हा अभंग नामदेवरायांनीं सर्वआयुष्यभर आपली करवंडी (पोटाची खळगी) वाळवून जी भक्तिप्रेमसुखाची जोडी केली ती निमिषार्धांत तुकोबांस (दत्तक घ्यावा) तशी दिली. आपला मिराशीवरचा हक्क सोडून त्या गादीवर तुकोबांस बसविलें. पहिल्या अभंगांत नामदेवरायांनीं म्हटलें होतें कीं, तूं माप टाकूं लाग. तसें तुकोबा माप टाकूं लागले. तें खालील वचनानें.
॥ पांडुरंगा करूं प्रथम नमना । दुसरें चरण संतांचीया ॥ 4505 ( शासकीय )
॥ यांच्या कृपादानें कथेचा विस्तारु । बाबाजी सद्गुरूदास तुका ॥
॥ काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवुं चित्तासी आपुलीया ॥
॥ या मनासी लागो हरीनामाचा र्छेद । आवडी गोविंद गावयासी ॥
॥ सीण जाला मज संसार संभ्रमें । सीतळ या नामें जाली काया ॥
॥ या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निर्विकार ॥
महिपतीबोवा ताहराबादकरांनीं बालक्रीडा हा पहिला प्रयत्न व तो बाळबोध लिहिण्याचा सराव नव्हता, तेव्हां नवी वही घालून केला, असें पदरचें तिखटमीठ लावून, वर्णन केलें आहे. परंतु वरील नमन व बालक्रीडेचें नमन हीं दोन्हीं नमनें पाहून मला या ओव्या अगदीं पहिलें कवित्व असावें असे वाटतें. तेव्हां नामदेवरायांनीं या ओव्या पहिल्या करून घेतल्या असाव्यात. यापुढें बालक्रीडा झाली असावी व मग या भिजल्या वहींतील अभंग झाले असावेत. नामदेवरायांचे शंभर शंभर ओव्यांचे कांहीं अभंग आहेत. तसे पहिले दोन तुकोबांचे आहेत. त्यापुढें ही ओव्यांची संख्या कमी होत होत-बालक्रीडेच्या अखेरी आटोपशीर प्रमाणबध्द अभंग होऊ लागले व तेथून या वहीस सुरूवात आहे.
नामदेवरायांनीं एकाएकीं मिराशीचा धनी करण्याचे वेळीं काय क्रिया केली असेल ती त्यांची त्यास माहीत. पण तुकोबावर त्या गोष्टीचा परिणाम एवढा झाला कीं त्यांनीं अत्यंत विनयपूर्वक उत्तर दिलें (पं. 1321)
॥ द्याल ठाव तरी राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥ 1 ॥
॥ आवडीचा ठाव आलोसें ठाकून । आतां उदासीन न धरावें ॥ धृ ॥
॥ शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती । आधारें वीश्रांती पावईन ॥ 2 ॥
॥ नामदेवापायीं तुकया स्वन्पीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहीलासे ॥ 3 ॥
या अभंगाचा अर्थ स्पष्ट आहे व तो हा कीं तुकोबांनीं नामदेवरायांची बाकी आपल्या कृपेनें, आपण दिलेला प्रसाद पोटीं साठवून, फेडीन असें म्हटलें.
ओव्यांच्या तीन अभंगांची ठेवण, घडण, पहावी तर ओबडधोबड शब्द ओवीमध्यें कसे तरी बसविल्यासारखे वाटतात. शिवाय विषय हि तेवढा मुद्देसूद रीतीनें, सुटसुटीतपणानें, मांडलेला नसतो. शंभर-शंभर ओव्यांचे दोन अभंग होतांच तिसरा अभंग 31 ओव्यांचा होतो. बालक्रीडेत जास्तींत जास्त एका अभंगांत ओव्या 30/31 आहेत. व शेवटास अभंग लहान लहान आटोपशीर आहेत. ओव्यांच्या अभंगाचें नमन व बालक्रीडेचें नमन यांत फरक आहे. ओव्यांचे नमन समोरच्या व्यक्तीस नमन करावें तसें आहे. ओवीच्या अभंगांत आत्मचरित्रपर ओव्या ब-याच आहेत. बालक्रीडा ही पूर्वीच्या संतांचीं वचनें पाठ करून जें कृष्णचरित्र मनांत साठविलें होतें, त्याचें प्रतिबिंब आहे, असें समजावयास हरकत नाहीं.
अशा त-हेनें नारायणाची जोडी झाल्यावर, आपणास सर्वतोपरी त्राहे, त्राहे, त्राहे-सोडवी अनंता अशी जी स्थिति झाली, त्यामुळें च पूर्ण निराशेनें हरिनाम मुखानें घेऊं लागलों, व तें अट्टाहासानें घेऊं लागलों-तेव्हां विठोबानें आपणास वाट दाखवीत दाखवीत- आम्हां हें कवतुक जगा द्यावी नीत । या कामावर नेमलें-तेव्हां सहज च तुकोबांस म्हणावेसें वाटलें कीं:- (177)
॥ बरें जालें देवा नीघालें दीवाळें । बरी या दुहकाळें पीडा केली ॥ 1 ॥
॥ धृ ॥ अनुतापें तुझें राहीलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ धृ ॥
॥ बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥ 2 ॥
॥ बरें जालें नाहीं धरीली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥ 3 ॥
॥ बरें जालें तुझें केलें देवाईल । लेकरें बाईल उपेक्षीली ॥ 4 ॥
॥ तुका म्हणें बरें व्रत एकादशी । केलें उपवासी जागरण ॥ 5 ॥
ही च गोष्ट पुनः केव्हां तरी सांगण्याची वेळ आली तेव्हां ती गोड करून निराळया शब्दांत तुकोबांनीं सांगितलीः- (पं. 231)
अवघेची गोड जालें । मागीलीये भरी आले ॥ 1 ॥
॥धृ ॥ साह्य जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरी संग ॥ धृ ॥
॥ थडीये पावतां तो वाव । मागें वाहवतां ठाव ॥ 2 ॥
॥ तुका म्हणे गेले । स्वप्नींचे जागें झालें ॥ 3 ॥
मानीयेला स्वप्नी गुरुचा उपदेश । असें जें तुकोबांनीं म्हटलें आहे-त्याचें कारण असें कीं जें मनीं वसे-तें स्वप्नीं दिसे अशी त्या गोष्टींचा निजध्यास लागून आपली स्थिति झाली नाहीना ? असें साहजीक च मन साशंक झालें. पण स्वप्नांत जो उपदेश झाला होता त्याप्रमाणें वागू लागले. तरी गुरुपदेशाच्या ज्या खुणा अनुभवांत यावयाच्या त्या खुणा त्यांस जेव्हां रोज स्पष्ट होऊ लागल्या व त्याचा कळस नामदेवराय व पांडुरंग यांच्या दर्शनानें झाला, तेव्हां म्हणाले-"मानीयेला" स्वप्नीं गुरूचा उपदेश या गुरूपदेशाच्या खुणा नामदेवरायांनीं व ज्ञानेश्वरमाउलीनीं प्रगट केल्या आहेत.
तुकोबारायास जो गुरूपदेश झाला व नामदेवराया समवेत श्रीपंढरीनाथाचें दर्शन झालें त्याचें वर्णन त्यांनीं पुढील प्रमाणें केलें आहे (181)
॥ मीच मज व्यालों । पोटाआपुलीया आलों ॥ 1 ॥
॥ धृ ॥ आतां पुरला नवस । नीरसोनी गेली आस ॥ धृ ॥
॥ आलों बारांबळी । गेलो मरोन ते काळीं ॥ 2 ॥
॥ दोही कडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥ 3 ॥
तुकोबांनीं कवित्व करावें म्हणून नामदेवरायांनीं त्यांस मिराशीचे एकाएकी धनी केलें. संतांनीं म्हणजे नामदेवरायांनीं त्यांचे वाणीवर कवित्वाचा अलंकार चढविला. तो अलंकार ते हरिकिर्तनांत मिरवूं लागल्यावर तें कवित्व जीवंत झ-याचें होतें म्हणून चमकूं लागलें. देव व संत यांचें गुणगान भाट होऊन करावें, असें च तुकोबांस भक्तिसुखानें डवरल्यामुळें झालें असावें. तेव्हां त्या वेळचें त्यांनीं स्वतःचें वर्णन खालीलप्रमाणें केलें आहे. (पं. 3495)
॥ मन जालें भाट । कीर्ती मुखें घडघडाट ।
पडीयेली वाट । येची चाली स्वभावें ॥ 1 ॥
॥ धृ ॥ बोले देवाचे पवाडे । नित्य नवेची रोकडे ।
ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनी ॥ धृ ॥
॥ रोखीं रहावें समोर । पुढें मागें चाले भार ।
॥ करावें उत्तर । सेवा रुजू करुनी ॥ 2 ॥
॥ पूर वर्षला देकारें । संतोषाच्या अभयकरें ।
॥ अंगीच्या उत्तरें । तुकया स्वामी शृंगारी ॥ 3 ॥
माझें मन च देवाचे भाट होऊन त्याची मोठयानें व सतत कीर्ति गाऊं लागलें. रोज नवा देवाच्या प्रत्यक्षतेचा पवाडा स्वतःस आवडेल असा करावा, प्रत्यक्ष समोर उभा राहून म्हणून दाखवावा अशी माझी नित्याची चालीरहणी होऊन बसली. देवाच्या प्रत्यक्ष समोर उभे राहिल्यावर मागचा पुढचा विचार करावा लागत नसे. देवांनीं हि संतुष्ट होऊन आपल्या देकाराचा पूर वाहवावा व त्यामुळें स्वतःच्या अनुभवानें तुका स्वामीस शृंगारतो आहे. तेव्हां कवित्व कसें स्फुरें याचें हे स्पष्टीकरण आहे. हा जो स्वामीच्या कृपेचा, देकाराचा, पूर वाही त्याचें वर्णन तुकोबा खालीलप्रमाणें करितातः- (संताजी 1073)
॥ पुर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥ 1 ॥
॥ धृ ॥ बांधो वीठल सांगडी । पोहोन जाऊं पैलथडी ।
॥ अवघे जन गडी । घाला उडी भाईं नो ॥ धृ ॥
॥ हें तो नाहीं सर्वकाळ । अमुप आनंदाचें जळ ॥ 2 ॥
॥ तुका म्हणे बहुते पुण्यें । बोध आला पंथे येणें ॥ 3 ॥
हा महापुण्यानें जो ओघ तुकोबांवर आला होता, तो आनंदाच्या जळाचा ओघ अंगावर घेऊन "डौरलों भक्तीसुखें" असें होऊन तुकोबा विठोबास म्हणत आहेत कीं, (पं. 3594)
॥ पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कार्यी देहाकडे नांवलोकीं ॥ 1 ॥
॥ धृ ॥ म्हणवूनी मागे कंठीचा सौरस । पावतील नास वीघ्ने पुढें ॥ धृ ॥
॥ कृपेच्या कटाक्षें न भे काळीकाळा । येतां येत बळाशक्ती पुढें ॥ 2 ॥
॥ तुका म्हणे गुढी आणीन पायांपें । जगा होईल सोपें नाम तुझें ॥ 3 ॥
॥ धरील्या देहाचे सार्थक करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥ 1 ॥
॥ धृ ॥ लावीन निशाण जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या ॥ धृ ॥
॥ नामाचीया नौका करीन सहस्त्रवरी । नावाडा श्रीहरी पांडुरंग ॥ 2 ॥
॥ भाविक हो येथें धरारे आवांकां । म्हणे दास तुका शुध्द याती ॥ 3 ॥
अवांका हा शब्द जुना व सुंदर आहे. ही गोष्ट तुमच्या आवांक्यांतील आहे म्हणजे वैकुंठास जावयास निशाण लावणें तुमच्या हातचें आहे. तुम्हांला शक्य आहे व तें कसें शक्य आहे तें सांगतात कीं, तुम्ही मी दाखवितों त्या वाटेनें चला. (पं. 3739)
॥ करणे न करणें वारलें जेथें । जातो तेणें पंथें संतसंगें ॥ 1 ॥
॥ धृ ॥ संतीं हें पहीले लावीलें निशाण । ते खुणा पाहोन गर्जे नाम ॥ धृ ॥
॥ तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे । भरंवशानें भेटे पांडुरंग ॥
पूर्वीच्या संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटांत पुंडलिकाचे समोर भक्तिप्रेमसुखाचें जें निशाण रोविलें होतें त्या पूर्वींच्या संतांच्या बोध, प्रेमाच्या निरनिराळया खुणा, जशा तुकोबांस प्रतीत होत, तसतसे तुकोबा त्या संतांच्या नामाचा व पंढरीनाथाच्या नामाचा कृतज्ञतेनें गजर करीत.
॥ तुका म्हणे तुम्ही चला याचि वाटे । भरवंशाने भेटे पांडुरंग ।
असें सांगत. एवढें करून वर तुकोबा जेव्हां म्हणूं लागले कीं भरंवशानें भेटे पांडुरंग । मला देव भेटला आहे. व तो मी योगयाग करून ज्यांना भेटला नाहीं, तपतीर्थाटण करून ज्यांना आढळला नाहीं, दानधर्म हीं ज्यांचीं फुकट गेलीं आहेत, अनंत वाचाळांची बरळ जेथें फुकट गेलीं आहे, अशा ज्यांनीं ज्यांनीं म्हणून देव पाहिला नाहीं, त्या प्रत्येकास नामसंकीर्तनानें प्राप्त करून देईन कारण भगवंत जाणीव व नेणीव ओळखीत नाहीं. फक्त नुसतें एक नाम घे; हरीला तुझी करूणा येईल व तुला जवळ कसा करावयाचा याचा उपाय त्याचा तो च योजील. संतांचे संगतींत श्रीपती कसा आकळावा हें तुम्हांस मी शिकवितों, देव त्वरित प्रसन्न कसा होतो हें तुम्हांस सांगतों. तुम्ही मला गुरु करा असें मी मुळींच म्हणत नाहीं. पण माझ्या स्वतःच्या अनुभवाची गोष्ट सांगतो. देव हा कांहीं एकांतांत कान फुंकून, चोरून गुपचूप दाखविण्याचा विषय नव्हे. ही जादु नव्हे, टाणाटोणा नव्हे, माझें जीवनवृत्त जरा विश्वास ठेवून ऐका तर खरें.
॥ नेणें फुंकूं कान । नाहीं येकांताचें ग्नान ॥ (2774)
॥ तुम्ही आईका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥ धृ ॥
॥ नाहीं देखीला तो डोळा । देव दाखउं सकळा ॥
॥ चींतनाच्या सुखें । तुका म्हणे नेणें दुःखे ॥ 3 ॥
अशा विश्वासानें-धैर्यानें-स्वानुभवानें-तुकोबा जेव्हां (सं.402) देव घ्या कोणी । देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी । म्हणून प्रत्येकाच्या पाठीस लागले तेव्हां देव नलगे । देव नलगें । साठवणेचे रुधले जागे । प्रत्येकजण पूर्व संस्कारानें जखडलेला होता तेव्हां तो देव नलगे । देव नलगे । म्हणून म्हणे. पण त्यांत कांहीं नव्या रक्ताचे होते, त्यांनीं म्हटलें कीं, तुकोबांच्या जिवंत वाणीचा प्रभाव काय आहे हें एकवार पहावें तर खरें. देवाच्या घरीं उपाध्यासारखा, गुरुसारखा, बडव्यासारखा, वकील नको; आपण सरळ जाऊन त्याच्या पायीं मिठी घालावी, त्याच्या नामाचा उच्चार अट्टाहासानें करावा; म्हणजे त्याचा तो च सरळ रस्ता दाखवील, असें म्हणून तुकोबा कीर्तनांत, भजनांत, रोज नवा रंग खेळूं लागले. तेव्हां तें वक्तृत्व जिवंतपणानें प्रभावी होऊ लागलें. एकास अनुभव आला. सुख झालें, कीं, तें त्यानें दुस-यास सांगावें असें होऊन, (पं. 2664)
॥ चंदन तो चंदनपणें । सहजगुणें संपन्न ॥ 1 ॥
॥ धृ ॥ वेधलीया धन्य जाती । भाग्यें होती सन्मुख ॥
अशी नवीं माणसें सन्मुख होऊं लागलीं. तसेंच (पं. 289/90)
नलगे चंदना सांगावा परीमळ । वनस्पती मेळ हाकारुनी ॥ 1 ॥
॥ धृ ॥ अन्तरीचें धांवें स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ धृ ॥
॥ सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हणु ॥ 3 ॥
॥ तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥ 4 ॥
॥चंदनाचे हात पाय हि चंदन । परीसा नाहीं हीन कोणी अंग ॥
॥ धृ ॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साखर अवघी गोड ॥ धृ ॥
(सं. 201)
॥ नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावीते मनीं शुध्द होतां ॥ 1 ॥
॥ धृ ॥ वा-याहातीं माप चाले सज्जनाचे । कीर्ती मुख त्याचें नारायण ॥ धृ ॥
प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तवं जन सकळ साक्षी ॥
नारायणानें जशी कवित्व स्फूर्ति दिली, तसाच नारायण स्वतः तुकोबांची कीर्ति पसरविण्यास कारण झाला. त्यानें तुकोबांच्या कवित्वाची कीर्ति, संतपणाची साक्ष, वा-याहातीं पसरविली. त्यासाठीं त्यांना कोणा हि वर्तमानपत्राची आराधना करावी लागली नाहीं. अशी सर्वत्र कीर्ति पसरत होती. पण जो आपला वाणी वदवितो आहे तो च ही कीर्ति पसरवीत आहे या विचारानें तुकोबा करशील काय पाहेन तें । असें विठोबास म्हणत स्वस्थ होते. ते म्हणतात, (पं. 695)
॥ कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥ 1 ॥
॥ धृ ॥ नेलें वा-या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ धृ ॥
कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदवीता ॥ 2 ॥
तुका म्हणे या निश्चये । माझें निरसलें भय ॥ 3 ॥
तुकोबांची अशी सर्वत्र वा-याहातीं कीर्ति पसरूं लागली, तेव्हां देव हा पोथ्या पुराणांत, श्रुतींत, राउळांत, बडव्यांच्या, उपाध्यायांच्या, शास्त्रीपंडितांच्या सोवळया ओवळया आचारांत, पापपुण्याच्या विचारांत, गुरफटलेला आहे असें समजणा-या प्रत्येक व्यक्तीचें धाबें दणाणलें असावें. त्यांतल्या त्यांत पुराण सांगणें, हव्यकव्य करणें, पूजा करणें, यज्ञयाग करून पोट भरणें, शास्त्राधार काढून देणें, या वृत्तींवर ज्यांचें पोट अवलंबून होतें अशांना तर तुकोबा हा सनातन धर्मास, चातुरर््वण्यास शत्रू च वाटला असावा. तेव्हां यापैकीं एकानें - रामेश्वर भट वाघोलीकर यानें - ग्रामाधिका-यांकडे तक्रार केली कीं यानें धर्माचा उच्छेद मांडला आहे. याच्या प्राकृत कवित्वांत श्रुतींचा अर्थ सांगितलेला असतो. या वेळचें वर्णन महिपतीबोवांनीं केलें आहे तें असें.
रामेश्वर भट
॥ म्हणे तुका शुद्र जातीचा निश्चीत । आणि श्रुती मथीतार्थ बोलतो ॥
॥ हरिकिर्तन करून तेणे । भावीक लोकांसी घातलें मोहन ॥
॥ त्यासी नमस्कार करिती ब्राम्हण । हें आम्हां कारणें अश्लाघ्य ॥
॥ सकळ धर्म बुडउनी निश्चित । नाम महिमा बोले अभ्दुत ॥
॥ जनांत स्थापिला भक्तिपंथ । पाखंड मत हें दिसे ॥
॥ ऐसें सांगतां रामेश्वरीं । चित्तीं क्षोभला ग्रामाधिकारी ॥
॥ मग देहूच्या पाटलास ताकीद करी । कीं तूकयासी बाहेरी दवडाया ॥
॥ चिठी देखोनि ग्रामाधिकारी । दाखविते झाले तुकयासी ॥
रामेश्वर भट हा दशग्रंथी ब्राम्हण असल्याचा लौकिक होता. त्याची वृत्ति जोशीपणाची, पुराणिकाची अशी कांहीं तरी असावी. तेव्हां पुराणास हव्यकव्यास ही आड येणारी भानगड मिटवा म्हणून त्यानें त्या वेळच्या मोकाशास कळविणें अगदीं साहजिक आहे. त्यानें पाटलास या धर्माच्या विरुध्द असलेल्या गोष्टीची व्यवस्था लावा म्हणून ताकीद पत्र पाठविणें हें हि रितसर होतें. तसें पत्र देहूच्या पाटलास गेल्यावर राजाज्ञा प्रमाण म्हणून त्यानें तें तुकोबांस दाखवून तुमचीं कीर्तनें थांबवा, तुमचें कवित्व बंद करा, असें म्हणणें हें त्याचें काम च होते व तें त्यानें बजावलें. पण तुकोबा कीर्तनें करीत, कवित्व करीत हें कांहीं स्वतःच्या बुध्दीनें करीत नव्हते. त्यांचा बोलविता धनी वेगळाच होता. तेव्हां पाटलानें ताकीदपत्र दाखवितां च तुकोबांस वाटलें असावें कीं मोकाशास, कमाविसदारास, दिवाणांत जाऊन भेटावे व त्यांची समजूत घालावी. मी जें कवित्व करीत आहे तें विठोबाच्या आज्ञेनें करीत आहे. तेव्हां ती गोष्ट पदरीची होईल कशी ? तेव्हां पुण्यास कमाविसदाराकडे किंवा मोकाश्यांकडे जाण्यापूर्वीं त्यांनीं खालील अभंग केला. (पं. 676)
॥ काय खावें आतां । कोणीकडे जावे । गावांत राहावें । कोण्या बळे ॥
॥ धृ ॥ कोपला पाटील । गावचे हे लोक । आतां घाली भीक । कोण मज ॥ धृ ॥
आतां येणें चवी । सांडीली म्हणती । निवाडा करिती । दिवाणांत ॥ 2 ॥
भल्या लोकीं यास । सांगितलीं मात । केला माझाघात । दूर्बळाचा ॥ 3 ॥
तुका म्हणे याचा । संग नव्हे भला । शोधींत विठला । जाऊं आतां ॥ 4 ॥
हे ताकीद पत्र आल्यावर गांवच्या लोकांनीं-पंचांनीं-कीं ज्यांनी तीं कीर्तने ऐकिलीं असतील आशा कोणी हि किंवा त्या गांवाच्या पाटलानें असें मनांत आणलें नाहीं कीं आपण जाऊन दिवाणांत सांगावें कीं तुकोबा विठुचें सप्रेम भजन करतात. विठु कनवाळु, कृपाळु कसा आहे, किती आहे. तो केव्हां हि जीवास सोडून नसतो, असें तुकोबा सांगतात तें आम्हांस पटतें. असो, आपण कीर्तन करीत आहोंत. तें जर विठ्ठलाच्या आज्ञेनें करीत आहोंत तर मग तो अधर्म होईल कसा? तेव्हां मी म्हणतों त्याप्रमाणें ते विठोबाचे शब्द आहेत, ते शब्द ख-या अवस्थेचे आहेत, असें पाहून कांहीं ब्राम्हणांनीं ते शब्द खरोखर च विठुचे आहेत असें पटून ज्या मुखांतून ते शब्द बाहेर आले त्या देहास वंदन केलें, तर तो अधर्म होतो-असें म्हणणारा हा दुसरा देव कोणचा ? तेव्हां चला आपण मला बोलविणारा देव खरा-कीं मी कीर्तन करीत आहे म्हणून अधर्म होत आहे असें म्हणणारा देव खरा. त्याचा निर्णय करूं या. असें म्हणून तुकोबा ताकीदपत्रानंतर जे 4/2 लोक त्यांस चिकटून राहिले असतील-त्यास म्हणाले असतील. शोधीत विठ्ठला जाऊं आता --
तुकोबा व त्यांचे अनुयायी हे कमाविसदाराकडे किंवा मोकाशाकडे गेले असतील. त्यांस तुकोबांनीं आपला सविस्तर वृत्तांत सांगितला असेल. त्यांनीं सरळ सांगितलें असेल कीं - आम्हांस एवढया खोलांत शिरतां येत नाहीं. शिरण्याचें कारण नाहीं. आमच्याकडे जी फिर्याद-अर्जी आली आहे ती ही. रामेश्वर भट यांचा अधिकार हा असा आहे. तेव्हां तुमचें म्हणणें त्यांस पटवा व आमच्याकडे तुमचें म्हणणें बरोबर आहे-तुम्ही अधर्म करीत नाहीं, असें त्यांचें पत्र आणा म्हणजे मग आम्ही ताकीदपत्र फिराऊन देऊं. तेव्हां तुकोबा रामेश्वर भटाकडे गेले असावेत. व त्यांनीं आपला सविस्तर वृत्तांत रामेश्वर भटास सांगितला असावा. रामेश्वर भटानें तुझ्या कवनांत श्रुतीचा मथितार्थ उमटतो. श्रुति उच्चारण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांस तेवढा शास्त्रतः आहे. शुद्रास तो अधिकार नाहीं. असें म्हटलें असावें. तों तुकोबा म्हणाले असणार च कीं अहो, मी कधीं हि श्रुती ऐकिल्या नाहींत, मी वेदाचें अक्षर पाहिलें नाहीं, दुरून सुध्दां ऐकलें नाहीं. एवढयानें रामेश्वर भटास असा विचार सुचावयास हवा होता कीं,खुद्द देहू गांवांत ब्राम्हण आहेत किती, तेथें श्रुतींचा वेदघोष कोठें तरी होतो कां ? तसें जर नाहीं तर मग या स्वयंभू श्रुती तर नसतील ना ? पण सत्तेपुढें कधीं शहाणपण उपयोगी पडलें आहे का ? तुकोबांनीं परोपरीनें सांगितलें असेल कीं. (पं. 1007)
॥ करीतो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥ 1 ॥
॥ धृ ॥ माझीये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वभंर बोलवितो ॥ धृ ॥
॥ काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदे ॥ 2 ॥
॥ निमित्त मापासी बैसविलों आहे । मी तो कांहीं नव्हे स्वामी सत्ता ॥ 3 ॥
॥ तुका म्हणे आहे पाइक चि खरा । वागवितो मुद्रा नामाची हें ॥ 4 ॥
तुम्ही रागावला आहांत-पण मी तुम्हांस खरंच सांगतों कीं, तुम्ही या कवनांत श्रुतींचा मथितार्थ उमटतो म्हणून म्हणता पण मी काय बोलतों किंवा लिहितों-हें मी लिहीपर्यंत माझें मला च माहीत नसतें. (पं. 1790)
॥ नेणें अर्थ कांहीं नव्हती माझें बोल । विनवितो कोपाल संत झणी ॥ 1 ॥
॥ धृ ॥ नव्हती माझे बोल पांडुरंग । असे अंगसंगे व्यापूनियां ॥ धृ ॥
॥ मज मूढा शक्ती कैंचा हा विचार । निममादिका पार बोलावया ॥ 2 ॥
॥ रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी । बोबडया उत्तरी हें चि ध्यान ॥ 3 ॥
॥ तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगे भार घेतला माझा ॥ 4 ॥
या अभंगावरून तुकोबांनीं आपणावर प्रथम गुरूकृपा कशी झाली. त्या नंतर साक्षात्कार होऊन आपण पंढरीनाथाच्या आज्ञेनें कवित्व कसें करूं लागलों व त्यांत नामदेवांनीं दिलेलें धन आपण कसें वापरतों-असें आळवीन, आळवून, रामेश्वर भटास सांगितलें असेल. ( पं. 2014 )
॥ बोलीलो जैसें बोलवीलें देवें । माझें तुम्हां ठावें जाती कुळ ॥ 1 ॥
॥ धृ ॥ करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरी ॥ धृ ॥
॥ वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥ 2 ॥
॥ तुका म्हणे घडे अपराध नेणता । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥ 3 ॥
श्रुतींचा मथितार्थ कवित्वांत नकळत कसा उमटतो याची प्रतिती पाहण्यासाठीं रामेश्वर भटानें एक कीर्तन आपल्यासमोर करावयास सांगितलें असावें. तेव्हां तुकोबांनीं रामेश्वर भटास दंडवत घालून महिपतीबोवांनीं म्हटल्याप्रमाणें-
॥ सप्रेम नामाच्या गजरें जाण । ते स्थळीं मांडीलें हरिकीर्तन ॥
॥ कवीत्व बोले प्रसाद वचन । संकोच मनीं न धरीतां ॥
तेव्हां आपणास जें कवित्व स्फुरतें तें कोठून स्फुरतें, कोण स्फुरवितो, हें सांगण्यासाठीं तुकोबांनीं वक्तृत्वाचा पाऊस पाडला असावा व विश्वाचें बीज जो ऊँकार तो कोणास व केव्हां स्फुरतो, याचें तुकोबांनीं भावारूढ अवस्थेंत अत्यंत सुरस वर्णन करून जेथून ऊँकार ध्वनि उत्पन्न होतो, त्याच ठिकाणीं म्हणजे क्षीरसागर नारायण यास आपण अध्यात्मविद्या प्रगट करावी असें मनांत येऊन त्यानें तें ज्ञान भक्तांच्या ध्यानांत प्रगट केलें, त्याचें नांव ऊँकारः तेंच सर्व ब्रह्मज्ञानाचें गूज होय-ते जेव्हां कांहीं भक्तांच्या अवचित कानीं पडतें. तेव्हां श्रुती या संज्ञेस प्राप्त झालें, त्याच नारायणास विवेक, वैराग्य, निजशांति याची साक्षात् मूर्ति म्हणजे हा पुंडलीक पुढें अनंत सुखाचा हारिख म्हणून पंढरीस उगवला. यानंतर सुचलीं तीं सर्व विशेषणेें लावून-देवा तूं अनंत अवतार धरणारा आहेस मग याच वेळीं तूं असा मुका कां असें त्या विठ्ठलास विचारलें आहे. भोळया भक्तांस तुझ्याशिवाय-दुसरा कोणीहि सौख्य देण्यास समर्थ नाहीं. तूं माझ्या मनाचा चित्तचालक आहेस. सर्व कांहीं दुस-यास करावयास लावून स्वतः अकर्ता राहतोस. देवा तूं केव्हां हि वर्णाश्रम धर्ममर्यादा पाळीत नाहींस मग याच वेळीं तूं मुका कां ? या भूदेवास तूं साक्ष कां पटवीत नाहींस ? तुझा लौकिक तूं सकळ दुःखनिवारिता आहेस म्हणून आहे. मग तूं आतां माझ्यावर कां कोपलास ? देवा, तूं उलट सुलट अशा वाटेल त्या गोष्टी करवितोस व त्या श्रेष्ठ म्हणून संपादून हि नेतोस, देवाची वाणी हें वेदवाक्य म्हणून किंवा उपनिषद म्हणून तूं प्रगट केलीस तीच गोष्ट मी कांहींहि वेदपठण, शास्त्राध्ययन न करितां माझ्या तोंडून उच्चारवितोस तेव्हां तो अधर्म होतो. देववाक्य हें वेदवाणीनें, ब्राह्मणाच्या मुखानें च बाहेर पडलें पाहिजे असा तूं च नियम घालून देतोस व माझ्या तोंडून तसे खुणेचे शब्द उच्चारवून ते नियम तूं च मोडतोस. तेव्हां हें तुझें विराट स्वरूप देववाक्य हें वेदांत च प्रगट झालें पाहिजे असें म्हणणा-या या भोळया भक्तास कळत नाहीं. त्याला तूं तुझ्या विराट स्वरूपांत हा काय खेळ करून आहेस हें कळत नाहीं तेव्हां
॥ सगुण रूप धरूनि त्यासी । लावि भजनासि तुका म्हणे ॥
अशा अर्थाचे अभंग (पं. 672-3-4-5) करून तुकोबांनीं रामेश्वर भट हा भजन करूं लागला असें पुढें होणा-या गोष्टींचें चित्र मनापुढें आणून आळविलें खरें. पण देव प्रगट होणार होता, रामेश्वर भटास साक्ष पटविणार होता, पण त्यास थोडा अवकाश होता. तें विराट स्वरूप स्वतःस भारी च तुकोबांच्या इच्छेप्रमाणें बांधून घेणार होतें त्या विराट स्वरूपास आणखी थोडा ज्यास्त खेळ खेळायचा होता; त्या विराट स्वरूपानें कांहीं हि खूण दाखविली नाहीं. तेव्हां तुकोबांस रामेश्वर भट म्हणेल तें मान्य करणें प्राप्त होतें. रामेश्वर भट म्हणाले असावेत कीं, बा, तुझें हें कवित्व लबाडी लाचाडीचें नाहीं हें खरें, तुझें माझें कांहीं वाकडें नाहीं, पण तुझ्या या कवित्वांत वेदवाणी प्रगट होते यास मीं काय करावें? हा धडधडीत अधर्म आहे. शूद्राचे तोंडून वेदवाक्य देववाक्य बाहेर पडणें ही गोष्ट केव्हां हि शास्त्रविरूध्द आहे. तेव्हां तू असें कर-कीं यापुढें कवित्व करूं नको. हें कांहीं तरी कर्णपिशाच्च आहे म्हण, तुला कांहीं भूतबाधा झाली आहे खास. तेव्हां यापुढें कवित्व करणार नाहीं, असें तुला कबूल असेल तर माझें कांहीं म्हणणें नाहीं. मी तसें कमाविसदारास पत्र लिहून देईन. येवढें बोलणें झाल्यावर तुकोबांनीं विचारलें कीं पुढील कवित्वा बद्दल तुमची आज्ञा प्रमाण-पण आजवर जें कवित्व केलें आहे त्याचें काय करूं ? तेव्हां हा श्रुतिस्मृतिपुराणोक्त ब्राम्हण दुसरें काय सांगणार त्यानें सांगितलें कीं ते कवित्व बुडवून टाक तुकोबांनीं हो म्हटलें. अशा त-हेंनें रूढीनें स्फुर्तीवर पहिल्यानें जय मिळविला. बहुधा या अर्थाचें पत्र कमाविसदारास रामेश्वर भटानें लिहून दिलें असावें. तें पत्र घेऊन तुकोबांनीं कबूल केलेल्या अटी लक्ष्यांत घेऊन कमाविसदारानें ताकीदपत्र परत घेतलें असावें. तुकोबा देहूस परत गेले. व कबूल केल्याप्रमाणें त्यांनीं केलेलें कवित्व खालीवर दगड बांधून इंद्रायणींत बुडविलें. लोक काय बोलूनचालून दुतोंडी आहेत. त्यांनीं कवित्वाची हि वाहवा केली. पुढें राजसत्ता त्याविरूध्द आहे असें पाहतां च कवित्व पाखांड आहे म्हणून म्हणण्यास हि ते च लोक तयार होते बरं कवित्व बुडविलें तेव्हां या च मंडळींनीं तुकोबांची हुर्यो केली असेल व पुढें जीं कीर्तनें ऐकू येत होतीं, आनंद भोगावयास सापडे तो मिळेना, पुनः भेटेना. तेव्हां ती च मंडळी वरवर हळहळण्याचा आव आणून म्हणूं लागली कीं तुम्ही पूर्वीं आपल्या वाटयाचीं खतें पत्रें बुडवून संसार आटोपलात, आतां कवित्व बुडवून, परमार्थ बुडवून, स्वस्थ झालांत, तेव्हां आतां जगलांत तरी कशास ? लोक काय बोलून चालून बेजबाबदार असतात, त्यांना काय माहीत कीं हें वाक्य या माणसाच्या मनास किती टोचेल वर्मी बाण लागावा तसे हे शब्द तुकोबांच्या हृदयास काटयासारखे टोचूं लागले. खरं च, संसार बुडविला व परमार्थाचें फळ जें हें कवित्व तें हि बुडविलें, पुढें कवित्व करणार नाहीं, हें हि कबूल केलें, तेव्हां खरोखर च यापुढें जगून तरी काय करावयाचें असा विचार त्यांचे मनांत आला. तेव्हां कवित्वाबरोबर च आपण हि स्वतःस बुडवून घ्यावें तर ती आत्महत्या होईल. हा विचार आड आला. तेव्हां विठुरायाचें मनोगत काय आहें ? त्यास हें कवित्व हवें आहे का नको ? याचा निर्णय करून घ्यावा असें म्हणून त्यांनीं देवापुढें जें वृंदावन होतें त्या शिळेवर बसून वा निजून देवाचा धावा, देवाचें ध्यान, देवाचें अखंड नामस्मरण सुरू केलें. हा निर्धार वह्या बुडविल्यावर पांचव्या दिवशीं झाला. अशा स्थितींत असतांना तुकोबांस स्फुरलेले अभंग (वीस) प्रसिध्द आहेत. परंतु हे अभंग नंतर केव्हां तरी लिहून ठेविलेले असावेत. कारण कवित्व करणार नाहीं असें तुकोबांनीं कबूल केलें होतें. परंतु आपल्या जीवनयात्रेंतील ही मुख्य गोष्ट त्यांनीं पुढें नमूद करून ठेविली आहे. त्यांत त्यावेळीं मनांत घोळत असलेल्या विचारांचें शब्दचित्र (पं 2222 - 2240 व 2491) या वीस अभंगांत गंथित केलें आहे.
मनांत विचार आणून व देवास आळवीत तुकोबा-अन्नपाणी वर्ज करून शिळेवर पडून दिवसा पाठीमागून दिवस कंठीत होते. तों रामेश्वर भटास स्वल्प श्रमानें मिळालेल्या मोठया जयानें हुरूप चढून ज्या आळंदीच्या अनुयायांनीं तुकोबांच्या कवित्वाचा निषेध केला होता, त्या आपल्या अनुयायांस व साथीदारांस झालेलें वृत्त सांगण्यास रामेश्वर भट हे वाघोलीहून आळंदीस यावयास निघाले. वाटेंत पुण्याजवळ एका चांगल्या तलावांत उत्तम पाणी आहे असें पाहून ते त्या तलावांत स्नानास उतरले. तों तलाव अनगडशा फकीराचा होता. त्याला या ब्राह्मणानें आपलें पाणी बाटवलें याचा आला राग. त्यानें रामेश्वर भटास शाप दिला कीं तूं ज्या शीतळ पाण्याच्या लोभानें या तलावांत शिरलास त्या पाण्यांतून बाहेर येतांच तुझ्या अंगाचा दाह होईल. तसा रामेश्वर भटास अनुभव आला. त्यानें ओलीं वस्त्रें अंगावर घेऊन आळंदीची वाट धरली. आळंदीस अजानुवृक्षाखालीं बसून अंगावर ओल्या वस्त्रांच्या घडया घेऊन अनुष्ठान आरंभिलें. त्यास कांही दिवसांनी स्वप्नांत ज्ञानेश्वर महाराजांनीं सांगितलें की
॥ तुका सर्वां श्रेष्ठ प्रिय आम्हां थोर । कां जे अवतार नामयाचा ॥
॥ त्याची तुज कांहीं घडली रे निंदा । म्हणोनि हे बाधा घडली तुज ॥
॥ आतां येक करी सांगेन तें तुला । शरणं जाई त्याला निश्चयेसीं ॥
॥ दर्शनें चि तुझ्या दोषा पंरिहार । होय तो विचार सांगितला ॥
असा स्वप्नांत दृष्टांत झाला तेव्हां रामेश्वर भटानें आपले शिष्य देहूस तुकोबांस हें वृत्त सांगण्यास पाठविले. शिष्यांनीं हे वृत्त तुकोबास सांगितल्यावर तुकोबांनीं खालील अभंग शिष्यांजवळ लिहून दिला. (पं. 1751)
॥ चित्त शुध्द तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हि न खाती सर्प तया ॥ 1 ॥
॥धृ॥ विष ते अमृत अघात ते हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥धृ॥
॥ दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्नी ज्वाळा ॥ 2 ॥
॥ आवडेल जीवा जीवाचीये परी । सकळां अंतरी एकभाव ॥ 3 ॥
॥ तुका म्हणे कृपा केली नारायणें । जाणीजेते येणें अनुभवें ॥ 4 ॥
तेव्हां ज्या रामेश्वर भटाच्या आज्ञेने कवित्त्व करणार नाहीं म्हणून तुकोबांनीं कबूल केलें होतें त्याच्या च अंगास अग्नीज्वाळा होत होत्या त्या निवारण व्हाव्यात म्हणून तुकोबांनीं पहिला अभंग केला. तो अभंग घेऊन शिष्य आळंदीस गेले. तो अभंग रामेश्वर भटानें वाचतां च त्याचा दाह शमला. हा स्पष्ट साक्षात्कार स्वतःच्या अनुभवाचा साक्षात्कार पाहून, रामेश्वर भटाची वृत्ति पालटली. तुकोबांचें चित्त शुध्द होतें. तेव्हां रामेश्वर भट हा त्यांचा जो शत्रु होता तो भक्त झाला. रामेश्वर भटानें तुकोबांवर वार केला होता. ती च गोष्ट आघाता सारखी न होतां तुकोबांच्या नारायणाची कृपा झाली व त्यांस श्रीहरि बाळवेश घेऊन, सगुण साकार भेटला. त्या नारायणानें तुझें कवित्व शाबूत जाहे. नदीवर तरंगत आहें काढ जा. असें सांगितलें. त्या पूर्वींच तसें स्वप्न इतर भक्तगणांस पडलें. त्यांनीं नदीवर जाऊन वह्या तरंगत आहेत असें पाहिलें, त्या पाण्यांत उतरून बाहेर काढल्या व तुकोबांचे पुढें ठेविल्या. हें शुभवर्तमान तुकोबांनीं 7 अभंगांत सांगितलें आहे. (पं. 2241-47) ते अभंग एवढे स्पष्ट आहेत कीं ते मुळांत च वाचणें ज्यास्त सोईचें होईल. तूं माउलीहुनी मवाळ । या अभंगांत देवाचें स्वरूप तुकोबांस कसें भेटलें तें त्यांनीं शब्दांत आणलें आहे.
तूं माउलीहून मयाळ । चंद्राहुनी शीतळ । पाणीयाहुनी पातळ । कल्लोळ प्रेमाचा ॥
एवढे सुंदर वर्णन आपण किती जरी शोध केला तरी दुस-या भाषेंत संस्कृत, इंग्रजी, किंवा इतर दुस-या कोणत्याहि भाषेंत नाहीं. या सात अभंगांत मी हीन बुध्दीचा, मतिमंद, उतावीळ अशा सर्व कबुल्या देऊन तुकोबांनीं देवास एकच अवघड प्रश्न विचारला कीं, देवा, (पं. 2244)
तूं देवांचा ही देव । अवघ्या ब्रह्मांडाचा जीव ।
आम्हां दासां कींव । कां भाकणें लागली ॥
या प्रश्नास देवानें काय उत्तर दिलें तें तुकोबांनीं नमूद केलें नाहीं. देव उत्तर काय देणार त्यानें तुकोबांची कीर्ति पसरावी म्हणून हा खटाटोप केला होता. चमत्काराशिवाय नमस्कार होत नाहीं. तेव्हां रामेश्वर भटासारख्या जाड बुडाच्या माणसास ईशसत्तेची चुणूक विठूनें दाखविली. पण या खेळांत तुकोबांचा जीव हैराण झाला. तेव्हां तुकोबांनीं तोच प्रश्न नेमका पुढें मांडल्यावर देव काय उत्तर देणार बहुधा देवानें लाजून मान खालीं घातली असेल
वह्या तरल्या-कवित्वास मार्ग मोकळा झाला. जनापवाद् टळला या आनंदांत तुकोबा आहेत तों च त्यांस कोणा भक्तानें सांगितलें कीं रामेश्वर भट त्यांचे दर्शनास आळंदीहून येत आहेत. तेव्हां तुकोबा त्यांस सामोरे गेले. त्यावेळीं रामेश्वर भट देहूस आले ते पुनः परत गेले च नाहींत. असें महिपतीबोवांनीं लिहिलें आहे. रामेश्वर भटानीं तुकोबारायावर कांहीं अभंग व दोन आरत्या केल्या आहेत. त्यांतील एक आरती खालीलप्रमाणें :-
तूंचि आत्माराम नव्हेसी देहधारी । स्तुती जरी होय झडो माझी वैखरी ॥
पातकी मूढ जन पडतील अघोरीं । या लागीं अवतार केला महीवरी ॥ 1 ॥
जय जय भक्तराया धर्ममुतिं तुकया । आरती ओवाळीभावें तुझीया पायां ॥
तुझे ठायीं असे भ्रम कोणा न कळे नेम । जन हे काय जाणे अनुभवितो राम ॥
टाकोनी अभिमान जीवीं धरिलें प्रेम । बोलोनि महिमा तुझा जना दिला विश्राम ॥
अद्भुत महिमा तुझा काय वर्णु दातारी । उदकेंवीण अन्न दिवस क्रमीले तेरा ॥
आतां हे ऐसी प्राप्ती काय घडेल येरा । उदकीं कागददीन रक्षिले अठरा ॥
ऐकतां तुझें वचन मन होय उन्मन । सच्चिदानंद गाभा तुजठायीं पूर्ण ॥
नित्य हे असों माझें तुझें पायीं अनुसंधान । करुनि कृपादान देई इतुके दान ॥
शास्त्र आणि वेदांत शिष्टाचारसमस्त । आणिला एकवाक्य जनलोक कृतार्थ ॥
येवढयानें वाचकांच्या हें लक्ष्यांत येईल कीं तुकोबांचें चरित्र अभंग वाचून आपल्या जें लक्ष्यांत येईल तें च खरें चरित्र. असें चरित्र अभंगांतून निवडून काढून स्वतंत्र ग्रंथ च प्रसिध्द केला पाहिजे, पण त्याचे आधीं तुकोबा ज्या क्रमानें अभंग लिहीत, म्हणत, प्रगट करीत, त्या क्रमानें अभंग आपणापुढें आले पाहिजेत. हा क्रम कोणास हि स्वतःचे बुध्दीनें जुळवितां येणार नाहीं. ज्या वह्या बुडविल्या होत्या त्यांपैकीं एका वहीची नक्कल सख्या हरी शिंपी या आस्थेवाईक वारकरी गृहस्थाकडे आढळली. ती वही मूळ पूजेंत असलेल्या वहीच्या आधारें दुरुस्त केली व त्यानंतर पंडीत यांच्या प्रतीशीं ती नकल ताडून पाहतांना जे अभंग मूळ पोथींत असून नकलकाराच्या हलगर्जीपणानें गळले असें वाटलें, ते पंडितांच्या प्रतींतून घेऊन या ज्यास्त अभंगांची यादी शेवटीं जोडली आहे. ही प्रत तयार केली आहे. या प्रतींत जेथें जशा ओळी आढळल्या त्या तशा निरूपणांत स्पष्ट करून दाखविल्या आहेत. दोन अभंग कोणत्या अन्तर्गत दुव्यानें जोडले गेले आहेत. हें हि शक्य झालें तेथें दाखविलें आहे. पुढें छापलेल्या 751 अभंगांत नारायणाची व गोविंदाची जोडी, कवित्व, आत्मचरित्र, शिकवण, लोहगांवचा वेढा, धरणेक-यास उपदेश, देवाशीं अनन्यगतीनें केलेलीं भाषणें, भांडणें, आळवण, देवाचें भोगिलेलें सान्निध्य इत्यादि विषय आले आहेत. हे सर्व रूपांतरांत शब्दशः आलेले आहेत. तरी त्यांतील कांहीं प्रकरणें निवडून त्यांचें विवेचन-अर्थावबोध जास्त स्पष्ट व्हावा म्हणून पुढें केलें आहे.
४५११ पृ ७४५(शासकीय), ३८१२ पृ ६५८(शिरवळकर)
अभंग वृत्त
नामदेवरायांनीं कवित्व करण्याचा नि्श्चय केल्यावर त्यांस अभंग वृत्तांत कवित्व करण्यास पंढरीनाथानें जी शिकवण दिली तें वृत्त नामदेवरायांनीं खालील अभंगांत गोविलें आहे.
॥ अभंगाची कळा नाहीं मी नेणत । त्वरा केली प्रीत केशीराजे ॥ 1 ॥
॥ अक्षरांची संख्या बोलले उदंड । मेरु सुप्रचंड शर आदी ॥ 2 ॥
॥ सहा साडेतीन चरण जाणावे । अक्षरें मोजावी चौक चारीं ॥ 3 ॥
॥ पहिल्या पासोनी तिस-या पर्यंत । अठरा गणित मोज आलें ॥ 4 ॥
॥ चौक चारी आधीं बोलीलों मातृका । बावीसावी संख्या शेवटील ॥ 5 ॥
॥ दीड चरणाचें दीर्घ तें अक्षर । मुमुक्ष विचार बोध केला ॥ 6 ॥
॥ नामा म्हणे मज स्वप्न दिलें हरी । प्रीतीनें खेचरों आज्ञा केली ॥ 7 ॥
नामदेवराय म्हणतात कीं, मला अभंगाची कळा म्हणजे अभंग करण्याची कला अवगत नव्हती. तेव्हां श्रीहरीनें मला स्वप्नांत सांगितलें कीं, अभंगाची मुख्य गोष्ट ही कीं त्यांत अक्षरें उदंड आलीं तरी चालतील परंतु मुख्य (मेरू) गोष्ट ही कीं त्यांत सहा-सहा अक्षरांचे तीन चरण करून पुढील अर्ध्या चरणाचीं चार अक्षरें असावींत. अशा त-हेनें ओळींतील अक्षरांची संख्या बावीस असावी. दुसरी गोष्ट जी संभाळावयाची ती ही कीं दीड चरण झाल्यावर जें अक्षर येईल तें दीर्घ असावें. (शर आदी या शब्दांचा अर्थ नीट लक्ष्यांत आला नाहीं) हा नामदेवरायांस श्रीहरीनें घालून दिलेला नियम तुकोबांनीं पुष्कळसा पाळला आहे. उदाहरणार्थ या वहींतील खालील अभंग आपण पाहूं :-
(१) लेकरा आईतें, पीत्याची जतन । दावी नीज धन, सर्व जोडी त्यापरी आमचा, जालासे सांभाळ । दे. येथें प्रत्येक ओळींत सहा सहा अक्षरांचे तीन चौक व चवथा चौक चार अक्षरांचा अशी प्रतेक ओळ असून-दीड चरण झाल्यावर दीर्घ अक्षर दे हें आलें आहे.
(२) शुध्द चर्या हेंच संतांचें पूजन व
(३) चीत्ताच्या संकोचे कांहींच न घडे या अभंगांतून हि हा नियम पाळला आहे असें स्पष्ट होईल.
अभंगांच्या या प्रकाराशिवाय तुकोबांनीं आणखी हि अभंगांचे निरनिराळे प्रकार केले आहेत व त्यांची म्हणण्याची पध्दत हि वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ
- (१) होतों तें चिंतीत मानसीं
- (२) एका हातीं टाळ, एका हातीं चिपळीया ।
- (३) कोण आतां कळीकाळा । येऊ बळा देईल ।
- (४) अंगीं देव खेळे ।
- (५) माझे मज आतां न देखे निरसतां ।
- (६) खेळ मांडीला वाळवंटी घाई ।
- (७) पांगुळ जालो देवा । नाहीं हात ना पाय ।
याशिवाय आणखी 2/4 प्रकारचे अभंग आहेत.
कवित्व
श्रीतुकोबाराय कवित्व करूं लागल्यावर प्रथम त्यांनीं ओव्याचे अभंग केले, त्यांतून कवित्वाचा जो अनुभव आला, त्या अनुभवानें बालक्रीडा बनली. यानंतर श्रीहरीचे कीर्तनास सुरवात झाली. हें कीर्तन सुरू झालें तेव्हां प्रेममूर्ति श्रीपंढरीनाथ व बोधरूपी नामदेवराय यांच्या मूर्ति तुकोबांच्या मनश्चक्षूपुढें उभ्या होत्या, असें त्यांच्या अभंगांतील शब्दयोजनेवरून वाटत आहे. ताप हें हरण श्रीमुख । या अभंगांची शब्दयोजना तशी आहे. गुरूपदेश झाल्यावर आपणास देवदर्शन व्हावें म्हणून (७५१) तुकोबाराया जो टाहो करीत होते तो पाहून रखुमादेवीवरांनीं त्यांचे हातीं प्रेमाचें भातुकें दिलें, बोलावयास बोल शिकविले. ते बोल तुकोबांच्या तोंडून नीट बाहेर पडलेले पाहून तुकोबांचे पंढरीनाथांनीं कौतुक केलें, अशा त-हेनें आपली करमणूक पंढरीनाथ करून घेत आहेत अशी तुकोबांची निष्ठा होती. नामदेवरायांनीं आपणास एकाएकीं आपल्या मिराशीचा धनी करून आपल्या वाणीस कवित्वाचा अलंकार चढविला, असें हि तुकोबांस वाटत होतें. ज्ञानीयाचे गुरु ज्ञानेश्वर माउली यांनीं, त्यांचेकडे धरणेकरी आला तेव्हां त्यास तुकोबांकडे पाठविलें, त्या कार्यास्तव ''भातुकें'' दिलें म्हणून क्रीडा करीत असतांना-म्हणजे अभंग स्फुरत असतांना ज्ञानेश्वरमहाराज आपणास आड घालून बोलताहेत (२३८) (तुजवीण सत्ता नाहीं वाचा वदविता । तुका म्हणे आड । केलों मी हे तुझें कोड) अशी तुकोबांची खात्री होती. त्यांस असें हि वाटें कीं, (२३४) आपल्या डोळयांत कृष्णांजन मायबापांनीं घातलें आहे. त्यामुळें आपली द्दष्टि सोज्वळ झाली, तेव्हां कोणता हि जिन्नस बरा किंवा वाईट, सरस कीं निरस आपणास चटकन कळतो. श्रहरीस, जनास निरोप सांगण्याची त्वरा झालेली असते तेव्हां तो गडबड फार करतो, माझी वाणी मला आवरत नाहीं असें होतें. तसेंच मला स्वामीच्या सत्तेनें (११६) रोज नव्या नव्या गोष्टी स्पष्ट होत जातात. श्रीहरी आपलें मन माझ्या मनांत मिळवितो व त्यामुळें अंतरांत प्रत्येक गोष्टींतील वर्माची खूण प्रगट होते. आपणास नारायणाची जोडी झाली आहे. ही जोडी म्हणजे हातीं वैरागारमणी यावा तशी आहे. या वैरागारमण्याच्या पोटीं रत्नांच्या खाणी (१४८) आहेत. तेव्हां येथें तर्कवितर्कास वाव नाहीं. या रत्नांच्या खाणी ज्या भांडारांत ठेविल्या आहेत त्या भक्तिप्रेमसुखाच्या भांडाराची किल्ली माझे हातीं आहे. तेव्हां तें भांडार उघडून मी हा त्या धन्याचा माल विकावयास (१५१) आणला आहे. त्यासाठीं ऐसपैस दुकान घातलें आहे; त्यांत निरनिराळे-उत्तम-मध्यम-कनिष्ट-असे जिन्नस (२००) निवडून सांठविले आहेत. तुम्ही जेवढया मोलाचा जिन्नस घ्यावयास याल तेवढया मोलाचा जिन्नस देण्यास तुका दुकानीं बसला आहे. सर्वत्रांस विनवणी करून अहो श्रोते-वक्ते तुमच्या पायांवर मी मस्तक ठेवून एकच गोष्ट सांगतों कीं (१५१) माल खरा घ्या व तो बरा पारखून घ्या. येथें (७०१) माझें असें सांगावयास कांहीं नाहीं. पण (६९३) तुम्हांस एवढेंच सांगतों कीं यासारखे जिन्नस कोठें मिळाले नाहींत, पुढे मागें कधीं हि मिळणार नाहींत. कारण मीं भांडारांतील सर्व माल झाडून आणला आहे. तेव्हां तुम्हांस जी जी गोष्ट हवीशी वाटेल अशी प्रत्येक गोष्ट माझ्याजवळ सिध्द आहे. या सर्व जिन्नसा मला गोळा करून आणतां आल्या याचें कारण एकच कीं माझ्या अंतरांत चिन्मणी दीप लागला असल्यामुळें -मला या भांडारांत विश्वासानें हा चिन्मणी दीप हातीं देऊन सोडलें, मीं सर्व जिन्नस गोळा केले. संतजनांनीं माझ्यावर कृपा केली. (१) माझ्या वाणीवर कवित्वाचा अलंकार चढविला. पंढरीनाथानें मला मोठया कौतुकानें (२२४) जगास नीति काय -८३४(शा) हें सांगण्याच्या कामावर नेमलें. इतकेंच नव्हें तर जे चुकत असतील त्यांची फजिती करावयास हि सांगितलें आहे. (पं. १७७५)
॥ सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोवरी हा प्राण जाय त्याचा ॥ १ ॥
॥ आणीकांचा धाक न धरावा मनीं । नीरोपा वचनी टळो नये ॥धृ॥
॥ समय सांभाळूनि आगळे उत्तर । द्यावें भेदी वज्र तयापरी ॥ २ ॥
॥ तुका म्हणे तरी ह्मणवावे सेवक । खादलें तें अन्न हक होय ॥ ३ ॥
१७७५ (शा) त्या जगदीशाची सत्ता माझ्या पाठीशी असतांना-कोणी रागावेल की काय अशी भीति बाळगण्याचें मला कारण नाहीं. रागावोत बापडे ! त्यांची पर्वा नाहीं. या जगदीशाचा निरोप लोकांस सांगतांना-रामकृष्ण नाम हा तीक्ष्ण बाण माझे हातीं असतांना अविद्या आंत शिरेल कशी ? येईल कोठून ? तशी वेळ आली तर वज्रा प्रमाणें कठीण उत्तर योजावें अशी श्री विठ्ठलाजी आज्ञा आहे या दुकानीं फक्त ख-याचा च विकरा होणार-येथें खोटा माल ख-यासारखा खपविण्याचें कारण नाहीं. शिवाय या दुकानीं सर्व माल (२३१) सवंग आहे. येथें (पं. ३३९५) आम्हां घरी शब्दाची रत्नें मिळतात. तुम्हांस कांही शस्त्र हवें तर आम्ही शब्दच देतों. हे शब्द (१५०) देवाच्या कृपेचा प्रसाद आाहे. तो जगांत आनंद वाढवावा म्हणून देवांनीं माझे हातीं दिला आहे. मी एक मोठें जहाज भरून हा माल या मनुष्य देहाच्या बंदरांत आणला आहे. हे जिन्नस अलभ्य आहेत व मी ते तुम्हांस फुकट देत आहे. शीग लावून जिहुवा व कान या मार्गांनीं पुरेपुर माप भरून घ्या. मी (१०९) हीं जीं शब्दरत्नें तुम्हांस देत आहे तीं (१०९) नारायणामिश्रित आहेत. त्यांत वचना वचनाला तुम्हांस नारायण भेटेल. माझ्या अंतरांत मनाच्या सिंहासनावर देवादिदेव पंढरीनाथ विराजमान झाले आहेत. (१५२) मी हात वर करून सर्वत्रांस ही गोष्ट सांगत आहे कीं जो जो येथें येईल तो कोणती हि इच्छा मनांत धरून येवो त्याची येथें हौस फिटेल. कारण एकाच्या कैवाडें म्हणजे पुंडलिकाच्या व माझ्या कैवारानें-सकळांच्या शिरावर बसून मी वचनें उच्चारीत आहे. (६०७) माझी वाणी प्रेम अमृतानें ओलावली आहे. (६०७) रामनामानें पिकली आहे. (पं. ३९१९) व विठ्ठल विठ्ठळ गजरानें गोडावली आहे. येथे सकल मंगलें वोळलीं व येथें आनंदाची च वृष्टि मेघवृष्टीसारखी अनिवार होत असते. भाग्यवंत जे असतील (३०८) त्यांनीं एवढें च करावें कीं आपल्या वाणीनें विठ्ठल नामाचें माप भरून घ्यावें. म्हणजे ते आनंदानें पुष्ट होतील व माझ्या बरोबर त्यांचा हि उध्दार होईल. माझे घरीं ब्रह्मरस पिकास आला आहे. तेव्हां पंगतीस सुकाळ आहे. (४१९) माझें भाग्य फळलें, गोविंदाची भेटी झाली. त्यानें आपला सर्व ठेवा माझे हातीं अवचित दिला. आतां दैन्य कसलें? चिंता तरी कसली करावयाची ? आम्हीं या नर देहाच्या क्षेत्रांत (६१३) संन्याशासारखे दिसत असलों, तरी इतर संन्याशांप्रमाणें आम्हीं आशा, काम, यांची होळी केली नाहीं. सर्व अंग प्रेमानें भरलेले-भारलेले आहे, पण मी वेशधारी संन्याशासारखा उगा च कांहीं तरी आहे असें समजूं नका-तर मी वेदांची बरी वाईट खंडें निवडतों. (१५३) क्षर अक्षरा वेगळा होऊन वेदांच्या सर्व कला पाहतो. विठ्ठलाच्या प्रसादानें तुम्हांस सांगत असतो. हे हाततुके म्हणजे अटकळीचे शब्द नाहींत. हे कोणाचे उसने आणलेले बोल नाहींत; येथें मतांतरें गोळा केलेलीं नाहींत; तर अन्तरीच्या ध्यानांत माझ्या जें अनुभवास आलेले असतें, तेवढेंच सांगतों. माझ्या अंतरांत सुखाचा झरा लागला आहे. तेव्हां माझ्या मुखावाटे जीं अमृतवचनें बाहेर पडत आहेत (२५६) त्या शब्दांच्या ओळी दिसल्या तरी त्या रत्नांच्या माळा आहेत. हें लक्ष्यांत ठेवा. सूर्य प्रकाशला (२५७) म्हणजे त्याचीं किरणें जशीं सर्वत्र पसरतात तशी या शब्दरत्नांची प्रभा पसरलेली तुम्हांस दिसेल. हे शब्द बोबडे आहेत असें तुम्हांस वाटलें तरी प्रेमानें ते बोबडे आहेत म्हणूनच देव गोड करून घेत आहे. त्यास शब्दरत्नांनीं वाहिलेली पूजा ही मोलाच्या मोत्यांनीं पूजा करावी अशी वाटते. हे शब्द तुम्हांस फुलासारखे सुशोभ्य दिसतील. (२९३) तसेच हे शब्द तुम्ही आदरयुक्त मनानें कानांत विसावलेत तर तुमच्या अन्तःकरणांत त्यांचा परिपाक होईल. त्यांचा परिणाम तुमचा तुम्हीच पाहून घ्या. श्रीहरीस तुमच्या हिताचा कळवळा आहे. तुम्ही काळाचे हातीं पडूं नये, म्हणून, तुमच्यांतील दोष निवडून, मी त्यांवर राम नाम बाण सोडतों. माझ्यासारखा तुम्हांस सखा दुसरा कोणी भेटणार नाहीं. मी सहज बोलत जातों. त्यांत तुमचे अंगीं जे दोष असतील त्यांची निंदा होते ती तुमच्या कोणाच्या वर्मास झोंबते. मी कांहीं एखाद्या सांप्रदायिकाप्रमाणें वाटेल (२१०) ती बाजू घेऊन हट्ट धरणारा खळ नव्हे; फक्त सत्याच्या सत्तेनें उपदेश करीत आहे. माझ्या शब्दांची जो साक्ष पाहील त्यास त्याचा परिणाम कळेल. (२५६) हा शब्द ब्रह्मांडास पुरून उरेल एवढा सामर्थ्यवान आहे. गंगा जशी आपल्या ओघानें वाहात जाते-तसा-मी गात जात आहें. तो बोल च लोकांना उपदेशासारखा पुरेल. जे कोणी भाग्यवंत असतील-त्यांस या उपदेशामृतांचें (५५२) सेवन होईल. पण हे लोक असे खमंग आहेत, कीं तोंडांत घास द्यावयास जावें तर तोंड पळवितात; पळवीत तोंड बापुडे-मी ही जी वाणी वदत आहे ती दुस-या कोणासाठीं नाहीं. मी स्वतःच्या आवडीनें विठुरायाची रोज पूजा नवी नवी करीत असतों. माझे शब्द हे एवढे स्पष्ट, सोपे, आहेत कीं माझ्या वचनांची शब्दसृष्टि वाढवून कोणीहि उकल करावयास नको. (पं. १७७५)
प्रेममूर्ति पांडुरंग हें जगाचें जिव्हार म्हणजे मर्म अन्तःकरण-बीज-आमच्या वाटयास बहुतांच्या भाग्यानें आलें आहे. (३६) त्यास मीं एकविधभावानें घट्ट धरून ठेविला आहे; त्यास रूपास आणून मीं जवळ उभा करून ठेविला आहे. तो माझ्या शब्दानें अंकित होऊन-वैकुंठ, क्षीरसागर सोडून या भूतलावर-चंद्रभागेच्या तीरीं उभा आहे. तेव्हां आमच्या फडावर येऊन त्यास देव भेटला नाहीं असें म्हणून कोणास हि निराश होण्याचें कारण नाहीं. (पं. ८९०/३७६७) कीर्तनांत स्फूर्तीनें आलेले अभंग म्हणत ही गोष्ट कोणी तत्कालीन माणसानें नमूद केली नाहीं. महिपतीबोवांनीं लिहिलें आहे कीं, तुकोबा स्फूर्तीनें अभंग करीत व ते संताजी तेली व गंगाराम मवाळ लिहून घेत. पण ही गोष्ट मला शक्य वाटत नाहीं - दोन्ही व्यक्ती फारशा शिकलेल्या नव्हत्या. त्यांतल्या त्यांत संताजी तेली यांस अक्षर ओळख किती होती हें आपण प्रत्यक्ष पाहून महिपतीबोवांनीं लिहिलेली गोष्ट अशक्य आहे, असें एका व्यक्तीपुरतें निःसंशय विधान करूं शकूं. या दोन्ही व्यक्ती कांहीं लघुलेखकाची कला शिकलेले नव्हते. तेव्हां एक तर अगोदर करून ठेविलेले अभंग तुकोबा कीर्तनांत किंवा भजनांत वापरीत असावेत किंवा हें भजन वा कीर्तन झाल्यावर तुकोबा हे अभंग स्वतः लिहून ठेवीत असावेत. स्वयंस्फूर्तीनें अन्तर्प्रतीतीनें प्रभावी व प्रयोगी शब्दरचना होऊन कीर्तनांत वा भजनांत ऐश्वर्याचीं वचनाक्षरें तुकोबांच्या मुखावाटें बाहेर पडत असावींत, त्या अभंगांचे आरंभ हे लेखक लिहून तरी किंवा ध्यानांत ठेवीत असावेत व त्या दिवशीं किंवा दुस-या दिवशीं तुकोबा स्वतः ती शब्दसृष्टि लेखनिविष्ट करीत असावेत. तुकोबा कीर्तन वा भजन करीत तेव्हां रसपरिपोष कसा करीत, रंग कसा भरीत, उपमा-अलंकार-दृष्टांत-कोठें व किती व कोणचे वापरीत-देवाची व संतांची आळवण कशी करीत-हें समजण्यासाठीं आज कांहीं हि साधन नाहीं. फक्त धरणेक-याचे अभंग आपणापुढें आहेत. त्यांत सुरवातीचे सात अभंग नमनाचे आहेत. पुढील अकरा अभंग उपदेशाचे आहेत. हे अभंग, ज्ञानोबांस पत्र, म्हणून केले. त्यांत सात व अकरा या अभंगाचेद्वारें हरिकथा केली असें म्हटलें आहे व तेथें या हरिकथेचें अति गोड वर्णन केलें आहेः- (सं. ९६२)
॥ परम अमृताची धार । चाले देवा हे समोर ॥ १ ॥
॥ धृ ॥ उर्ध्ववाहिनी हरीकथा । मुगुटमणी सकळां तीर्था ॥ धृ ॥
॥ शिवाचें जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥ २ ॥
॥ तुका म्हणे हरी । स्तुती वाणी इची थोरी ॥ ३ ॥
तेव्हां त्या धरणेक-यांसाठीं तुकोबारायांनीं कीर्तन केलें असावे-व ते अभंग लिहून त्यास दिले असावेत. येथें एक गोष्ट पाहण्याजोगी आहे व ती ही कीं तुकोबांनीं पंढरीनाथांची व ज्ञानोबांची आळवण पहिल्या सात अभंगांत केली आहे. या सात अभंगांत वापरलेलीं विशेषणें लक्ष्यांत घेतलीं तर पुढें जें कार्य करावयाचें आहे-त्यासाठीं शक्ति-स्फूर्ति-देऊन सांगावयाची गोष्ट काय तें सांगा अशी आळवण केली आहेसें दिसतें. त्या आळावणीप्रमाणें-माझ्या बापानें भातुकें दिलें म्हणून मीं क्रीडा केली--मीं जी आळी घेतली ती तुम्हीं पुरविलीत व हें उत्तम दान हातीं आलें म्हणून म्हटलें (२५०). हें उत्तम दान हातीं आलें तें पाहून पुढील अभंगांत तुकोबा म्हणतात-मायबाप-ज्ञानीयांचा तुं राजा महाराव-म्हणती ज्ञानदेव यैसें तुम्हां । तुम्हीं मला तुमच्या योग्यतेस आणून बसवितां यास काय म्हणावें ! मला कांहीं तुमच्यासारखी खोल युक्ति साधत नाहीं. तेव्हां आतां तुमचे पायावर डोकें ठेवतों. मी जीं वेडींवाकडीं वचनें-माझा अधिकार काय हें लक्ष्यांत न घेतां बोललो, हा माझा अपराध क्षमा करा. असें हें तुकोबांनीं नमूद केलेलें कीर्तन सुसूत्र आहे. प्रमाणबध्द आहे. परंतु या गोष्टींचा आजवर कोणी हि अभ्यास केला नाहीं. तेव्हां त्याबद्दलचे ज्यास्त शोध कोणी केले नाहींत. हें सांगावयास च नको.
तुकोबारायांची शब्दसृष्टि पढिक विद्वानाची नव्हती. त्यांनीं विश्वासानें, आदरानें-जीं कांहीं संतांची वचनें पाठ केलीं होतीं, तेवढींच त्यांचीं शब्दसृष्टि ! ती संतांचीं वचनें कानांत विसावून मनांत परिपाक होऊन त्यांच्या अंतरांत जेव्हां सुखाचा झरा लागला, आनंदाला पूर आला तेव्हां प्रेमामृतानें ओलावलेल्या, हरिगुणगानानें गोडावलेल्या, विठ्ठल गजरानें पिकलेल्या वाचेच्याद्वारां तो प्रेमाचा पूर-तो सुखाचा झरा-वाट काढूं लागला; तेव्हां त्या निःशब्दाचे शब्दांनीं आळें करून परब्रह्म कवळावें अशी स्थिति झाली. प्रत्येक शब्द हा अरवस्थेच्या प्रतीतीनें स्थानापन्न असल्यामुळें तो ज्या कळकळीनें उच्चारला जाई तेवढया च आर्ततेनें त्या समोरच्या श्रोत्यांच्या आर्त मनोभूमींत रुजे. त्यामुळें तुकोबांचें कीर्तन वा भजन परिणामकारक होई. अगदी बालपणांतच शिव छत्रपती त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रभावांत सांपडले. त्यांनीं इतर उपदेशकांनीं सांगितल्याप्रमाणें सर्वसंग परित्याग करून भजन पूजन कीर्तनांत आयुष्य वेचावें असें मनांत आणलें व तसा क्रम सुरू केला. तुकोबांस ही गोष्ट कळली तेव्हां तुम्ही स्वराज्यस्थापनेच्या कामावर रहा आम्ही भजन कीर्तन द्वारां लोकांची अवनत स्थिती सुधारण्याच्या, त्यांच्या अंतरांत रवीचा प्रकाश पाडण्याच्या, त्यांच्या हातून पाप कृत्य होणार नाहीं, अशा त-हेनें त्यांच्या विचारांच दिशा बदलविण्याच्या कामावर राहूं असें आपण एकमेक एकमेकांस सहाय्य करूं व सर्व जण सुपंथ धरतील असें वागूं; असें म्हणून तुमच्या कार्याच्या पाठीशीं मी आहें याची खूण म्हणून तुमच्या सहका-यांना प्रसाद म्हणून अभंग देतों, असे हे पाइकीचे अभंग आहेत. आज जरी स्वराज्य आहे तरी सध्याचे सरकार त्या अभंगांचें निरूपण पटवून घेऊन पचवितील अशी मला खात्री देववत नाहीं. असो, तात्पर्य काय, कीं अभंगवाणी ही फार प्रतापवंत व प्रभावी होती. याची साक्ष रामेश्वर भटाची फिर्याद, व ''गुरुत्व गेले नीच याती'' अशी रामदासांची पोटदुखी, मंबाजीबोवांचा तडफडाट, व चिंतामणी देवांची परीक्षा अशा गोष्टी देत आहेत. अशीं आणखी हि कांहीं उदाहरणें झालीं असतील. पण अशा अडथळयांस न जुमानतां देवा हातीं रूप धरवूं आकार नेदु निराकार होऊं त्यासी । या बाण्यानें तुकाराम महाराज वागत होते.
तुकोबारायांनी अभंग रचण्यास सुरुवात करण्यापूर्वी, अभंग हें जो तो निरनिराळया त-हांनीं परंतु अक्षरांची संख्या कमीजास्त करून करीत होते. त्यांत गोडवें म्हणजे धृपद कोठें यावयाचें यास नेम नसे. नामदेवरायांचे असे कित्येक अभंग आहेत कीं, त्या अभंगांत पहिलें चरणच गोडवे होण्याच्या लायकीचें आहे. ज्ञानेश्वर माउलीच्या कांहीं अभंगांच्या चाली चरणा-चणास बदलाव्या लागतात. निवृत्तिनाथांचे अभंग हे कोणी गाऊन म्हटले असतील असें मला वाटत नाहीं. तीच गत सोपानकाकांच्या अभंगांची व मुक्ताबाईंच्या अभंगांची. त्यावेळीं कांहीं सांगावयाचें तर तें पद्यांत सांगावें लागे म्हणून या मंडळींनीं आपलें म्हणणें छंदोबध्द केलें आहे एवढेंच. या उलट मृदंग लावून गात नाचत विनोदें । टाळ घाग-यांच्या छंदे । असे म्हणून सर्व महाराष्ट्रास सादावीत तुकोबाराय निघाले व कीर्तन व भजन हें एवढेंच साधन अभंगद्वारा ते वापरूं लागले, तेव्हां, आपलें सांगणें परिणामकारक व्हावें येवढयासाठी त्यांनीं अभंगांची मांडणी व्यवस्थित केली. सात्विक व प्रेमळ असे द्दष्टांत घेऊन-घरगुती नातीं-गोतीं, नित्यपरिचयांतील प्रत्येक चीजवस्तु-चंद्र सूर्य, राजाराणी, यच्चावत प्रत्येक गोष्ट, त्यांनीं द्दृष्टांस वापरली. प्रत्येक द्दष्टांतांत द्रष्टा जो श्रीहरी तो कोठें पहावा हें लोकांस शिकवलें. राजापासून रंकापर्यंत सर्व दर्जाचे लो त्यांचेकडे उध्दारार्थ येत. तेव्हां त्यांनीं मानव जातींतील सर्व वर्णाचे, सर्व दर्जाचे, लोक दाखल्यास घेतले. बालशिवाजीराजा व मातोश्री जिजाबाई यांस एकाच अभंगांत दृष्टांतासाठीं घेऊन लोक, शहाजीराजांनीं बायको टाकली, मुलगा वांड निघाला म्हणून जें कांहीं वावदुकपणानें, बेजबाबदारपणानें, बोलत होते त्यांच्या तोंडास कुलूप घातलें. (पं. २३९३)
॥ प्रीती नाहीं वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥ २३९४ (शा)
॥ धृ ॥ तैसे दंभी जालो तरी तुझें भक्त । वास यमदूत न पाहती ॥ धृ ॥
॥ राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणीका दंडवेल ॥
॥ बाहात्तर खोडी तरी देवमणी कंठीं । तैसा जगजेठी म्हणे तुका ॥
पक्षिणी व पिल्लें, दुकान-धनको-ऋणको-गाय व वत्स, माउली व लेकरुं, पति-पत्नी, सासू, जार-जारिणी. हे सर्व दृष्टांतात घेतले आहे. मानवी प्राण्याच्या सर्व खोडया लक्ष्यांत घेऊन दृष्टांतासाठीं वापरल्या आहेत.
मानवी नात्यागोत्याचे घरगुती दृष्टांत तुकोबा येवढया बारीक नजरेनें वापरीत कीं त्या दृष्टांतांतून तुकोबा द्रष्टा, पांडुरंग, न सांगतां श्रोत्यांस न समजतां, हातीं देत, तेव्हां तो पुनः श्रोत्यांच्या हातून निसटत नसे.
सर्व धंदे दृष्टांतास घेतलेले आहेत. प्रत्येक धंद्यातील कला-कुसरी लबाडया-लाचाडया सर्व कांहीं दृष्टांतात वापरलें आहे. रोज खावयाचा भात दृष्टांतास घेऊन भक्ति, ज्ञान, व वैराग्य यांची मिळणी एका अभंगांत स्पष्ट केली आहे (भक्ति ते, नमन, वैराग्य तो त्याग ! ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रह्म तनु ।
आम्हां घरी धन । शब्दाचीच रत्नें ।
तुकोबारायांनीं, अभंग, हें सहज सुलभ असें वृत्त वापरलें, सर्व जग दृष्टांतास घेतलें तशी त्यांची शब्दसृष्टि त्या वेळच्या शेतकरी-कुळंबी-माळी-सुतार, गवंडी, पाथरवट व थोडया फार अंशानें पांढरपेशा वर्ग यांच्या नित्याच्या वापरांत असलेली होती. ते कांहीं पढीक शास्त्री पंडीत नव्हते, पुराण-कीर्तन ऐकून व कांहीं संतांचीं वचनें विश्वासानें, आदरानें पाठ केलेले बहुश्रुत असे गृहस्थाश्रमी मराठे पण व्यवसायानें वाणी असे गृहस्थ होते. मर्यादित शब्दसृष्टीच्या भांडवलावर अफाट व्यापार करणारे ते स्फूर्तिवंत वक्ते होते. त्यांची स्फूर्ति जिवंत होती. यामुळें नित्याच्या वापरांतील साध्यां शब्दांना त्यांनीं धीरगंभीर अर्थ सूचित करण्याचें साधन बनविलें. उदाहरणार्थ माउली हा एकच शब्द घेऊं. हा शब्द साडेचार हजार अभंगांच्या गाथ्यांत २५/३० वेळां आला आहे, तेव्हां माउली हा शब्द कोठें आला तर तो एवंगुणविशिष्ट असा स्थानापन्न आहे. असें समजावें. तुकोबांनीं आम्हां घरीं धन । शब्दाचीच रत्नें । म्हणून म्हटलें, त्यांतील हा अत्यंत देदीप्यमान हिरा आहे रत्नासारखे चमकणारे तुकोबांच्या शब्दसृष्टींत खालील शब्द आहेत. त्या प्रत्येकास विशिष्ट अर्थ आहे.
भक्तिप्रेममुख, प्रेमबोध, प्रेमखुण, संतांचा पढिया, सोलीव सुख, तीळ तांदळया, निःशब्दाची वाणी, प्रेमपान्हारस, नामामृतगोडी, निज, सोय इ. आळी, जोडी, लडिवाड, कौतुक, डौरणे, दसरा, सोवळा, माहेर, निजबोध, वोरस, इ. इ.
याप्रमाणें त्यांनीं विषय, प्रतिपादनाच्या, सहज ओघानें शेपन्नास शब्दांच्या व्याख्या साधल्या आहेत. त्यांतील नमुन्यासाठीं कांहीं खालीं देत आहे. त्या एखाद्या कायद्याच्या पुस्तकांत सुरवातीस जशा शब्दांच्या व्याख्या दिलेल्या असतात तशा रेखीव व स्पष्ट आहेत असें दिसून येईल. अभंगांचें रूपांतर करतांना अशा व्याख्या भिजल्या वहींत जेवढया आल्या त्या स्पष्ट करून दाखविल्या आहेत.
पंडित :
॥ आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥ १ ॥
॥ धृ ॥ करवी आणिकांचे घात । खोडी काढुनि पंडित ॥ धृ ॥
॥ श्वानाचिया परी । मिष्टान्नासी विटाळ करी ॥ २ ॥
आवडी:
॥ जिवीच जाणावें या नांवें आवडी ।
आचार्य :
॥ भाग्यवंता हें चि काम । मापी नाम वैखरी ।
आनंदाची पुष्टी अंगीं । श्रोते संगें उध्दरती ।
पिकला तया खाणें किती । पंगतीस सुकाळ ।
गाढव:
आधींच आळशी । वरी गुरुचा उपदेशी ।
मग त्या कैची आडकाठी । विधीनिषेधाची भेटी ॥
नाचरवे धर्म । न करवे विधी कर्म ।
तुका म्हणे ते गाढव । घेती मनासवे धांव
चाट:
॥ कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाटत्या परतें आणीक नाहीं ॥
देव ॥ नामाची आवढी तो चि जाणावा देव ।
अशाच सहजसुलभतेनें अभंगांतून कित्येक म्हणी साधल्या गेल्याचें आढळेल. अशा म्हणी साडेचार अभंगांच्या गाथ्यांत ५/६ शें आहेत, व भिजल्या वहींत जेथें जेथें आल्या आहेत तेथें त्याचेकडे लक्ष्य वेधावें म्हणून त्या म्हणी वेगळया दाखविल्या आहेत. येथें ४/५ नमुना म्हणून देत आहे.
- (१२) क्षणभंगूर हा येथीचा पसारा । आलीया हाकारा अवघे राहे ।
- (७१) नेम नाहीं लाभ हानी । अवचीत घडती दोन्ही ।
- (१०३) क्षीर मागे तया रायते वाढी । पाधाणी गधडी ऐशा नांवें ।
- (१०४) विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे आंगीं ।
- (१०४) मधुरा उत्तरीं । रावां खेळे उरावरी ।
याशिवाय तुका म्हणे माझी केळवते वाणी । असे कांहीं नवे शब्दप्रयोग हि अभंगांतून आहेत. अभंगांत ठिकठिकाणीं विनोद, धट्टा वक्रोक्ति, उपहास, या वक्तृत्वाच्या अंगांना हि स्थान मिळालेलें आहे.
कारुण्यरस-करुणापर अभंग
अभंगवाणीनें तुकोबारायांनीं श्रीपंढरीनाथाची पुष्कळशी आळवण केलेली आहे; ती आळवण करुणापर अभंगांत सर्वत्र पसरलेली आहे. त्यांतून कारुण्यरस वाहात असलेला आढळेल. हा कारुण्यरस काय आहे याबद्दलची कल्पना स्पष्ट नसल्यामुळें हें अभंग अपूर्ण स्थितींतील असे शेरे कांहीं पदवीधर व्यक्तीनीं मारले, कवित्वाच्या स्फूर्तीचें मूळ लक्ष्यांत न ठेविल्यामुळें त्यांची ही गैरसमज झालेली होती. पंडित गाथ्यांतील 525-37 अभंगावरील चर्चा अभंग चर्चा या पुस्तकांत (229-41) पाहावी तर त्या चर्चेंत भक्ती प्रतिपाळे, दीनवो वत्सले, विठ्ठले, कृपाळे, माये, हीं विशेषणें प्राप्त पुरुषानें अनुभवलेलीं, अनुभवानें सिध्द झालेलीं विशेषणें, आहेत असा विचार त्या थोर विद्वान पंडितास शिवला नाहीं. कमुदिनी व भ्रमर हा दृष्टांत प्राप्त पुरुषाशिवाय कोण वापरूं शकेल ! असा विचार ती चर्चा करणा-या विद्वानांस शिवला नाहीं.
तुकोबारायांनीं अभंग द्वारां जी विठ्ठलाची करुणा भाकली ती कशाबद्दल भाकली ? ती अशाबद्दल भाकली कीं, सर्व सत्ता हातीं आल्यावर ज्ञानानें द्दष्टि चोख झाल्यावर असें लक्ष्यांत आलें कीं, सर्व कांहीं बा विठ्ठला तुझे आहे. सर्व सत्ता तुझी आहे, मी, माझे, हे शब्द फोल आहेत, असें असून हि जिव्हेस लागलेली संवय सुटत नाहीं. ते शब्द समोर येतातच तेव्हां तशी वृत्ति जागृत होऊं नये, तसा शब्द मुखावाटे बाहेर पडूं नये म्हणून श्री. विठ्ठलाची करुणा भाकावयाची. करुणा म्हणजे भीक नव्हे. समोर आई दिसते आहे. स्वतःस थंडी लागत आहे, आई मला थंडी लागत आहे म्हणून उचलून कडेवर घेण्यासाठीं घाई करीत आहे. ती उचलून कडेवर घेणार आहे याबद्दलहि खात्री आहे. अशा वेळी त्या सोनुल्या बालकाचे तोंडून जे कांही हट्टाचे-कांहीं रागाचे-कांहीं सत्तेचे शब्द बाहेर पडतात- ती करुणा समोर ताटांत पेढा दिसत असतांना तोंडांत लाळ येऊन ''वाटा पेढे लवकर'' म्हणून जेव्हां एखादा मनुष्य सत्तेनें सांगतो त्याचें नांव करुणा. पाट ताटें मांडलीं आहेत, जेवण सर्व सिध्द आहे, त्या जेवणाचा परिमळ बाहेर येत आहे अशा वेळीं घरचा मालक, पानावर बसून बायको, मुली, सुना या आपलें कर्तृत्व दाखविण्यासाठीं चटण्या, कोशिंबिरी वाढण्यांतच वेळ फुकट दवडताहेत, तेव्हां कांहीं प्रेमाने कांहीं रागानें बोलतों त्याचें नांव करुणा. मूल आईच्या कडेवर आहे पण ती शेजारणीशीं गप्पांचा पट्टा चालविण्यांत गुंग आहे. तिचें अशावेळीं मूल रडून-रागावून-तोंड धरून-तिच्या सर्व लक्ष्यांस वेध मी व्हावा म्हणून इच्छा करून जेव्हां तो बालहट्टाचे बोबडे शब्द उच्चारतो, त्याचें नांव करुणा. प्रत्येक नात्यांत नित्य नवा रंग भरावा, व त्यामुळें सुख वाढीवर असावे, म्हणून प्रेमाच्या सत्तेनें जेव्हां माणसें-कधीं हासून, कधी रुसून-कधीं खेळत-तर कधीं खोडया करीत प्रेम भोगतात, आनंद लुटतात, त्या वेळीं जी शब्दसृष्टी निर्माण होते ती करुणा. तेव्हां तुकोबांचें म्हणणें असें की देवा, शास्त्रें तुम्हीं निर्माण केलींत, त्यांत संसार वाईट म्हणून तुम्ही शिकवलेत. आम्ही ते अनुभवानें शिकलों. पण तुम्ही संसाराची गोष्ट नित्य नवी गोडी उत्पन्न करून समोर उभी करतां हा तुमचा नष्टपणा, खाष्टपणा, कृष्णावतारांतील खोडकर स्वभाव ! आतां या भोगास काय करावें ! म्हणून बा. तुझी करुणा भाकतो. तुला नित्य भेटावें, तुझ्याशींच नित्य बोलावें-तुझ्या संगतींत सदा असावें असा साच संकल्प असतांना देवा तुम्ही त्या संकल्पाप्रमाणें मन-बुध्दी अचल राहूं देत नाही म्हणून करुणा. लहान मुलास आपण मांडीवर बसविलेलें असावें त्याच्या अंगाभोवतीं आपले हात असावेत. पण त्यास कांहीं कारणानें जी प्रेमाची उकळी आलेली असते ती एवढी अनिवार असते कीं त्या बाळाचे मुखावाटा जी गोड वाणी बाहेर पडते तिचें नांव करुणा. प्रीयु व प्राणेश्वरी (अशा नात्यानें वागणारी पतिपत्नी किती असतील ! ) ही अधीर होऊन एकमेकांपाशीं ज्या गोडीनें बोलत असतात-ती करुणा. प्रीय एखादी अति गोड गोष्ट-सुखावह वृत्त, प्राणेश्वरीस सांगण्यास अधीर झालेला असतो. तें वृत्त काय आहे हें ओळखून-ती कांहीं तरी कामांत गुंतल्यासारखी दाखवून एकांतास उशीर करते त्यावेळीं उत्पन्न होणारी शब्दसृष्टी करुणा. आई बराच वेळ बाहेर गेलेली असावी, मूल दारांतच वाट पाहात बसलेलें असतें- एवढयांत आई परत येते व आपल्याच रंगांत इतर गोष्टींत दंग होते, पण बाळास उचलून आवळून कवळून घेत नाहीं त्यावेळीं, रागाचें, रडण्याचें, जे शब्द बालाचे मुखावाटा बाहेर पडतात ती करुणा. आपली प्रेमाची सत्ता असतांना ती सत्ता चालविण्यास उशीर झाला कीं करुणा उत्पन्न होते. तात्पर्य उत्कटत्वाची अधीरता, अतिस्नेहाच्या पोटीं उपजणारी अनिश्चितता, सत्तेची निश्चितता-अशा सर्व गुणांत झुळुझुळु वाहणारी अनन्यता-अशा सर्व गुणांनीं सुखानेंच पण घायाळ झालेली मनाची स्थिती-ती करुणा. या कारुण्यरसानें मन जेव्हां घायाळ अवस्थेंत प्रेमानें वाहत असतें तेव्हां त्या प्रेमाच्या पुरांत देवास जन्म घेण्यास जागा होते.
सांपडे भरलीये वाहीं । भाव शुध्द पाही याचे भातुकें ।। (2)664(शा)
म्हणून तुकोबांनीं आपला अनुभव नमूद केला आहे. तुका वेडा अविचार । या अभंगांत तुकोबांनीं आपली घायाळ स्थिति वर्णिली आहे. पण ही अवस्था काय आहे. याचें आकलन नीट न झाल्यामुळें, प्रार्थना समाजाच्या सभासदांनीं चालविलेल्या तुकाराम चर्चा मंडळानें लाविलेले अभंगांचे अर्थ चुकीचे आहेत. तसेंच ख्रिश्चन मिशन-यांना या अभंगांत पापाची कबुली, दुर्गुणांची कबुली दिसली.
(1) पतीत मी पापी शरण आलो तुज ॥
(2) पतित पतित । परी मी त्रिवाच्या पतित ॥
असल्या अभंगांचा अर्थ, कारुण्य म्हणजे काय रस आहे हें न कळल्यानें त्यांचे अर्थ चुकले आहेत. असो, या रसांत सारखे अठरा दिवस देवाचा धावा करीत तुकोबा शिळेवर पडून राहिले. तेव्हां पांडुरंग बाळमूर्ति प्रगट झाली. वह्या रक्षिल्या आहेत म्हणून म्हणाली. तेव्हां देवा हातीं रूप-धरवूं आकार-ही गोष्ट ज्या रसानें सिध्द होते तो रस केवढया उत्कटत्वांत-केवढया अनन्यत्वाच्या घायाळपणांत उत्पन्न होतो हें या उदाहरणानें लक्षांत यावें. ही गोष्ट आपण कोणा तज्ज्ञ माणसाचे तोंडून समजून घेतली पाहिजे, इ्तकेंच नव्हे तर तशा घायाळ स्थितींत असणा-या एखाद्या महापुरूषाची गांठ पडणें जरूरीचे आहे. त्या महापुरूषास आपला विश्वास पटला पाहिजे, आपण सांगूं त्या गोष्टीचा हा श्रोता विपर्यास करणार नाहीं, भलतीच शंका मध्यें घेणार नाहीं, असें त्यास अंतरांत पटलें पाहिजे, शिवाय तो मनमोकळा असावा, चोरटा नसावा, तसा तो महापुरुष उदासीन हि नसावा, या दृष्टीनें संतभेटी बहू अवघड आहे असें तुकोबारायांनीं म्हटलें आहे. असा महापुरुषच अनुभवलेलें सुख पोटीं घेऊन जेव्हां अभंगांचें निरूपण करील, तेव्हांच या अभंगांचें वर्म पडे ठावें । त्या शिवाय
उड रे उड रे काऊ । तुझें सोन्यानें मढवीन पाऊ ।
ही स्थिती समजणार नाहीं. तें भावगीत वाटेल तसें तें चरण भावगीत नाही. ती अन्तर्यामींची विरहावस्था आहे. त्या अभंगाचा शेवटचा चरण
ज्ञानदेव म्हणे जाणीजे ये खुणे । भेटती पंढरीराणे शकुन सांगे ॥
अंन्तर्यामीं ही एवढी घायाळ स्थिति झाली आहे का ? तर मग पंढरीराणे भेटतीलच अशी खात्री असूं द्यावी, असें ज्ञानदेव म्हणें. हा कारुण्यरस तुकोबांच्या कवित्वांत सर्वत्र पसरलेला आहेच पण या 751 अभंगांत तर तो ओतप्रोत आहे. आजवर हे करुणापर अभंग सुट्टे सुट्टे वापरले जात. परंतु या वहीच्या आधारानें आपणास यापुढें या कारुण्यरसाचा परिपोष अभंगा-अभंगानें कसा होत गेला हें सुरवातीपासून अखेरपर्यंत पहावयास सांपडेल. आजवर ही गोष्ट वक्त्याच्या, कीर्तनकाराच्या मर्जीवर असे. तो अभंगांची निवड करून विषय प्रतिपादन करितांना जसा रंग भरील तें तुकोबांचें निरूपण असें समजावें लागे. आतां या 750 अभंगांपुरते तसें करावयास नको. उदाहरणार्थ, स्त्री-पुत्रादिकीं राहिला आदर हा अभंग घेऊं. पूर्वी हा अभंग वैराग्य अंगी बाणावें म्हणून घेऊन वक्ता त्याचें रसभरित वर्णन चरणा-चरणास करीत असे-आतां निरूपण निराळया त-हेनें करावें लागेल. या अभंगाच्या वरचा अभंग गंगेचिया अंतावीण काय चाड असा आहे. त्यांत वर्णिल्याप्रमाणें आनंदसोहळयांत असतांना देवा-मध्येंच स्त्रीपुत्रांदिकांबद्दल मनांत आदर डोकावतो याचें कारण काय, असें म्हणून देवास धावा म्हणतात- धावा म्हणण्याचें कारण मी असा स्वतंत्र पाईक नाहीं-कीं-या गोष्टी स्वतः करूं शकेन. पुढें 24-25-26-27-28-29-30 एवढे अभंग एकापुढें एक पण चढत्या प्रमाणांत होऊन पुढें म्हणतात.
भोगावरी आम्ही घातला पाषाण । मरणा मरण आणीयेले ।। 856(शा)
स्त्रीपुत्रादिकीं राहीला आदर अशी सुरवात होऊन एकापुढें एक चढत्या प्रमाणानें अभंग होऊन
आमुच्या हें आलें भागा । जिव्हार या जगाचें ॥ 889(शा)
म्हणून सांगितलें तेव्हां या 8/10 अभंगांतील रसपरिपोष नवीन आहे. हा प्रथमच या स्वरूपांत आपल्यापुढें येत आहे. असो. येथें, स्त्रीपुत्रादिकीं राहीला आदर, या अभंगापासून कारुण्यरसास जी सुरवात आहे. त्याच रसांच्या ओघांत तुकोबा 751 व्या अभंगापर्यंत आहेत.
शिकवण
तुकोबारायांचीं लोकजागृतीचीं साधनें, भजन व कीर्तन हीं होतीं. या साधनांची मांडणी अशी आहे कीं, यांत मुळांत भजनद्वारा एकांत व्हावयाचा श्री विठुशीं व त्या भजनांत जो बोध पदरांत पडेल तो जनतेस द्यावयाचा हरिकीर्तनांत. जेव्हां कोणी आपलें मन उघडें करून स्वतःचें साकडें तुकोबारायास सांगून तें निवारण्याचा उपाय विचारावयास येई, तेव्हां त्या अडचणी तीं सांकडीं-ते अवघड प्रश्न विठुरायास सादर करावयाचे व तल्लीनतेंत-त्या प्रश्नांस जें उत्तर भावारूढ स्थितींत स्फुरे तें प्रगट व्हावयाचें कीर्तनांत. तुकोबा स्वतः ''नव्हे माझी वाणी पदरींची !'' अशी पदोपदीं ग्वाही देत असतांना आढळतात. तेव्हां जें कांहीं तत्त्वनिदर्शन व्हावयाचें, संतबोध प्रगट व्हावयाचा-तो कोणाच्या तरी गरजेनें-एखाद्याचें कोडें सोडविण्यास्तव-त्या त्या व्यक्तीच्या गरजेपुरता व्हावयाचा. तुकोबा कांहीं गंथकार नव्हते-कीं तेवढयासाठीं कोणत्या हि विषयाचें सांगोपांग विवेचन त्यांनीं करावें! त्यांचेकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचें जीवाचें कोडें ते उकलीत होते. एकाच्या कैवाडे उगवें बहुतांचें कोडे । या नियमानुसार त्यांच्या बोधवाणींत इतरांना ''कल्याणाचा ठाव'' सांपडे. त्यात्पर्य तुकोबारायांच्या अभंगांत केव्हांहि हा बोध, ही भक्ति, हें ज्ञान, हें वैराग्य, हा व्यवहार, हा उपदेश अशीं सदरें घालून अभंग केलेले सांपडणार नाहींत. तर एकाच अभंगांत गोडव्यांत अगर धृपदांत तत्त्व सांगितलेलें व त्या धृपदाच्या वरच्या खालच्या चरणांत त्या तत्त्वाचा विस्तार केलेला, त्यापुढें १/२ दृष्टांत समोरच्या श्रोत्यास पटतील असे व अखेर तुका म्हणे असें म्हणून या सर्व निरूपणाचा तूं बोध काय घे-हें सांगितलेलें असावयाचें. अशा २/४ अभंगांत शिकवण सांगविलेली, ती हि हंसत, खेळत, सहज हातीं दिलेली असावयाची. तेव्हां तुकोबारायांच्या शिकवणींतील बोधरत्नें हीं प्रत्येकानें आपापल्या जरूरीप्रमाणें गाथ्यांत (बोध रत्नांच्या खाणींत). ज्याची त्यानें आपल्या नडी प्रमाणें आपल्या जरूरी प्रमाणें, आपल्या जरूरी प्रमाणें, आपल्या योग्यते प्रमाणें निवडून घ्यावींत.
॥ माझा मज उपदेश । इतरां नाहीं त्याचा रीस ॥
॥ नाहीं मज कोणी उरला दुर्जन । माय बापावीण ब्रम्हांडांत ॥
समोरच्या प्रत्येक व्यक्तीस प्रेमस्वरूप पांडुरंग, सच्चिदानंद गाभा, -असे पाहण्याची तुकोबांची रीत. जगांत वाईट मनुष्य असतोच कां-तर हा विठु कृष्णावतारांत फार खोडयाळ होता त्यास पूर्वाश्रमीची आठवण होऊन-आमची नजर चुकवून हा कांहीं तरी उपद्याप करून तें गा-हाणें, तें कोडें, ती उपाधी, आमचेपुढें उभी करतो. हेतु हा कीं त्या उपाधींत हें चैतन्य, हें सांवळें परब्रह्म, कसें गुप्त आहे तें, आम्हीं शोधून काढावें. तात्पर्य, तुकोबांच्या ज्ञान व प्रेम यांच्या संमिश्रणानें बनलेल्या बोधदृष्टींतून केव्हां कोणती गोष्ट सुटली आहे असें होत नाहीं. त्यांनीं अभंगद्वारा येवढा मोठा आरसा प्रत्येकाचे पुढें उभा केला आहे कीं, त्यांत प्रत्येकास आपला चेहरा पहावयास सांपडेल. तसा स्वतःचा चेहरा पाहिला कीं आपण संतबोध पदरांत घेऊन आपली चर्या-म्हणजे राहणी शुध्द कशी करावी याचा हि बोध आढळेल व हें सर्व, कांहीं हि मोल न घेतां सवंगपणानें कोणी वर्म हातांत द्यावें, तसे तुकोबा स्वतः देत आहेत असें आढळेल. ज्ञानेश्वरींत-ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी असें जें म्हटलें आहे, त्याप्रमाणें तुकोबा प्रत्येकाचा प्रश्न-ज्ञान व विज्ञान सांगून सोडवितांना आढळतील. असे एकेक, दोन दोन, तीन तीन, अभंगांचे सुटे सुटे गट संताजीच्या गाथ्यांत व्यवस्थितपणें पहावयास सांपडतात. ती सर्व शिकवणच आहे. या वहींत हि सुरवातीपासून अखेरपर्यंत नुसती, शिकवण काय, म्हणून कोणी शोधील त्यास २/४ अभंगांत मिळून कोठें तरी स्पष्ट शिकवणीच्या शब्दांच्या ओवणी रत्नांचीया माळा आढळतील. कोणा हि व्यक्तीस त्याच्या नडीस्तव गीतेसारखा ग्रंथ सांगावा लागत नाहीं. व समरांगणांत ७००/७५० श्लोक सांगितले नसावेत. तेथें झालेल्या संवादाचा तो व्यासांनीं केलेला विस्तार आहे. परंतु जेवढा प्रश्न अवघड-तेवढें विषयप्रतिपादन विस्तृत व सखोल तुकोबांचें झालें आहे असें आढळेल. तुकोबारायांची बोध दृष्टि जेव्हां एखाद्या प्रश्नावर पडे ' हा दिठीवा जयावरी झळके ' म्हणजे च पदकरु माथां पारुखे । तो जीव चि परी तुके महेशेंशीं. । तेव्हां ज्ञानस्वरूप नारायणानें तो प्रश्न सोडवून, बोधस्वरूप सदाशिवाचे हातीं तो लखोटा द्यावा, व त्या महेशानें तो बोध तुकोबांच्या मुखा वाटा (तूं बोलसी माझे मुखें) बाहेर द्यावा, स्पष्ट करावा, अशा अखंड समाधींत-तुकोबा होते. अशा स्थितींत तुकोबा असतांना त्यांच्याकडे बीड परगण्यांतील एक देशपांडया ब्राह्मण आला व त्यानें स्वतःचें वृत्त तुकोबांस सांगितलें. तें खालील प्रमाणेंः- मी पंढरपुरीं धरणें धरून बसलों होतों, हें धरणें मी उपाशी राहून करीत होतों, हेतु, हा कीं, मला व्युत्पत्तिज्ञान होऊन-पुराण सांगता यावें. तसा मी दहा दिवस बसल्यावर मला दृष्टांत झाला कीं-तुला जी कांहीं आराधना करावयाची ती आळंदीस जाऊन ज्ञानेश्वरांची करावी. व ते जे युक्ति सांगतील त्याप्रमाणें तूं वागलास तर तुझे मनोरथ पूर्ण होतील. त्याप्रमाणें मी आळंदीस आलों व तेथें अन्नपाण्याशिवाय धरणें धरून बसलों. तेथें दृष्टांत झाला मी तुमचे कडे यावें व तुम्ही मजवर अनुग्रह कराल, तो मीं मानावा.
हा वृत्तांत ऐकून व त्या माणसाचें वयोमान, बुध्दिमत्ता-सर्व कांहीं लक्ष्यांत घेऊन तुकोबांस मोठें संकट पडलें असावें. परंतु पंढरीनाथाचें कार्य ज्ञानराजांकडून आपणाकडे आलें तेव्हां तेथें हो ना करण्याची सोय नव्हती. तेव्हां तुकोबांनीं देवाच्या व संतांच्या सेवेस्तव कीर्तन केलें. त्यांत पहिल्या ७ अभंगांत पंढरीनाथाची व ज्ञानेश्वर माउलीची अत्यंत कळकळीची आळवण आहे व त्यापुढें त्यांस जो स्फुरला तो अकरा अभंगांत साठविला आहे. या अकरा अभंगांत तुकोबांनीं खालीलप्रमाणें बोध केला आहेः- बा, तुझे वय झालें आहे. तेव्हां तूं कांहीं साधन करून मोक्ष मिळविण्याच्या किंवा ग्रंथाध्ययन करून ज्ञान मिळविण्याच्या भानगडींत पडूं नकोस-साधनें हीं काळाच्या मुखांत नेऊन तुला घालतील. व ग्रंथ पाहून वेदपठण करून जी, गोष्ट व्हावी ती, मी तुला सांगतों कीं, तूं ग्रंथांच्या भानगडींत पडूं नकोस-साधनांच्या खटपटीस लागू नकोस, मोक्ष ही उधारीची व मेल्यावरची गोष्ट आहे. तर तूं एक च कर कीं:-
॥ देवाचिये चाडे आळवावे देवा । वोस देहभावा पाडोनीया ॥
२३२४(शा)९४३(सं) हें तुला सांगण्याचें कारण असें कीं हा पांडुरंग नामासाठीं उडी घालतो व तसा तो तुझ्या हांकेसरसीं धावून आला कीं तो तुला भवनदीच्या पैलपार नेईल. बा तुला मोक्ष मिळावा अशी जी इच्छा झाली आहे ती तृप्त करावी म्हणून पांडुरंगाचे मनांत आलें तरी मोक्ष हें असें एखादें डबोलें-गाठोडें-नाहीं, जें तो तुला सहजच उचलून हातांत देईल. त्यासाठीं आपलें मन आपल्या ताब्यांत येऊन इद्रियें हीं आपल्या हातीं यावीं लागतात. असें आपलें मन निर्विषय होतें. म्हणजे कोणत्या हि विषयाचें त्या मनावर बळ चालत नाहीं. उपासतापास करून, अक्षरांची आटाआटी करून व सत्कर्म करून जें साधावें म्हणून साधनें करतात तीं एवढयाचसाठीं. तेव्हां कोणत्या हि गोष्टीचा आत्यंतिक आदर धरिला नाहींस कीं जी गोष्ट सहज आहे त्याचें दुःख होणार नाहीं. तूं इतरांचे शब्द ऐकून स्वप्नांत जसा एखादा मनुष्य-मेलों मेलों म्हणून विव्हळत असतो-तसा भाव-बंध-वगैरे शब्द शास्त्रीपंडितांचे ऐकून विव्हळतो आहेस-तेव्हां तुला जें फळ प्राप्त व्हावें अशी इच्छा आहे तें फळ ज्या मूळ-ईश-शक्तीस देतां येईल त्या ईशसत्तेस तूं शरण जा. म्हणजे ' देवाचिये चाडे आळवावे देवा । वोस देह भावा पाडोनीयां ॥-म्हणजे तुझें काम होईल. इतर साधनें करतांना कांहीं सोडा-कांहीं धरा-अशी सांडी मांडी करावी लागते; तसें आपण कांहीं टाकून दिलें, सोडून दिलें, असा जनांत डंका पिटवून उपयोग होत नाहीं. तेव्हां आपण देवास करुणा भाकून आळवावें. आपण देवाची करुणा साच भावानें भाकीत आहोंत किंवा नाहीं.-यांस आपलेंच मन आपणास साक्षी असतें. त्यासाठीं आपण कोणत्या क्षेत्रास जावयास नको. आपल्या अंतरांत-हृदयस्थ-जो आहे-तो आपल्या मनांत जो विचार उत्पन्न होतो-तो कोठून होतो काय विचारानें होत आहे, हें ओळखून असतो. हा जो हृदयस्थ आहे, तो कृपासिंधु आहे व तो आपणास बांधणारा भवबंध तात्काळ तोडतो, येवढयासाठीं मी तुला सांगितलें कीं ' देवाचीये चाडे आळवावें देवा । वोस देहभावा पाडोनीयां ।' अशी आळवण करून जर गोविंद-गोविंद हा एवढाच तुझ्या किंवा कोणाच्या मनाचा छंद होऊन बसला तर ती कायाच गोविंद होते-त्या व्यक्तींत व देवांत भेदभाव उरत नाहीं. याची खूण अशी कीं हा स्वतः च गोविंद झाल्यानें मन आनंदित होतें व डोळयावांटा प्रेमाचे पाझर वाहूं लागतात. बा, आळी जशी त्या फुलपाखराच्या ध्यासानें फुलपाखरूं होतें-तिला वेगळें राहतां येत नाहीं-तसें ज्या माणसास ज्याचा ध्यास लागेल तसें त्याचें मन होतें-तेव्हां इतर सर्व कांहीं बाजूस सार व पांडुरंग हा मनीं दृढ धर-त्याचीं सम पाऊलें विटेवर उभीं ठाकलीं आहेत. तो आकाशाहून मोठा व अणुहून हि लहान असा आहे. ग्रंथ पाहून वेदाध्ययन करून हरिगुणगान करावें अशी बुध्दि झाली तर ठीक, नाहीं तर ती नुसती तोंडपिटी व्हावयाची, तपतीर्थाटणें करून हरिनामीं बुध्दी स्थिर झाली तर ठीक, नाहीं तर ती पायपिटी व्यर्थ जावयाची. यज्ञयाग, दानधर्म, करून कंठीं नाम स्थिर झालें तर ठीक नाहीं तर आयुष्य व्यर्थ जावयाचें. तेव्हां या कोणत्या हि काबाडाचें भरीस न पडतां मी या सर्वांचे तुला जे सार सांगत आहे तें मनीं धर. तूं उपाशीं राहून जें धरणें धरतोस तसें करूं नकोस-खुशाल पोटभर अन्न खा-व दिवसभर त्या पांडुरंगाचें चिंतन कर-म्हणजे ज्यानें तें अन्न आपणास दिलें, ते त्याचें त्यास पावेल व आपल्या पदरांत त्या चिंतनाचे फळ पडेल. हा जो देणारा आहे त्याचें नांव विश्वंभर आहे-हा जगाचा आधार आहे. याची सत्ता नाहीं असा रिता ठाव त्रिभुवनांत नाहीं. तेव्हां मला हें एवढेंच हवें-असें म्हणून स्वतःचा संकोच करून, लहान कां होतोस-सर्व ब्रह्मांड एका आपोष्णीनें गट्ट कर-असें पारणें तूं कर व संसारास तूं आंचव-म्हणजे संसारांतून संसाराच्या नांवानें हात धुवून मोकळा हो. हें करण्यास तूं उशीर लावूं नकोस. मी-माझें असें लहानसें घरकुल करून आंधारांत कां सांपडतोस? त्यानें फार कासाविसी होते. तेव्हां आई जशी एखादी गोष्ट लांब झुगारून दिल्यासारखें दाखवून काखेंत ती गोष्ट लपविते-तसें हा पांडुरंग सर्व जगाचा पसारा दाखवून मूळ गोष्ट-वर्माची गोष्ट-आपल्या जवळच लपवून ठेवितो.
तेव्हां बाप श्रीज्ञानेश्वर माउली यांच्या पुढें मीं तुझी आळी मांडली व त्यांनीं मला जो खाऊ दिला त्या आनंदांत मीं क्रीडा केली. त्याचें फळ म्हणून हें दान माझे हातीं आलें तेव्हां यांत जो तुझा विभाग आहे तो घेऊन तूं आपल्या स्थळास काळ व्यर्थ न दवडतां जा. तेथें ज्ञानेश्वर माउलीच्या नांवानें तूं समुदाय गोळा केलास कीं मी तुमचे व त्यांचे पाय वंदण्यास तेथें येईन. तूं ज्ञानीयांचा राजा, महाराव, तुम्हांस लोक ज्ञानदेव, असें म्हणतात. तेव्हां ज्ञानाचें दान तुम्ही द्यावेंत. हें थोरपण मला कशाला ? माउली, पायीची वहाण पायी असावी हें बरें. मला तुमच्या युक्तीची खोली कोठें साधणार ? तेव्हां तुमच्या पायांवर मला डोई ठेवूं द्या. महाराज, मी माझा अधिकार काय ही गोष्ट लक्ष्यांत न घेतां आलीं तशीं वेडींवांकडीं उत्तरें म्हणजें वचनें बोललों. महाराज तुम्ही सिध्द च आहांत तेव्हां तो अपराध क्षमा करा व बा ज्ञानेश्वरा, या आपल्या पायाच्या सेवकास तेथें च पायीं राखा. या अकरा अभंगांत तुज व्हावा जरी देव । तरी हा सुलभ उपाव असा हा स्वयें अंगें ब्रह्म होण्याचा सुलभ उपाव सांगितला आहे. हा बोध माझ्या बापानें मला जें भातुकें पाठविलें त्या बळानें मीं क्रीडा व त्यांत हे अभंग झाले. तेव्हां ज्ञानेश्वर माउलीनें जो खाऊ पाठविला तो पाठाविला तो कोणता असावा असा साहजिकच प्रश्न उद्भवेल. तो खाऊ हरिपाठ होय. हरिपाठांत ज्ञानेश्वर माउलीनें जो बोध केला, तोच बोध थोडया फार फरकानें या अकरा अभंगांत आहे व तीच गोष्ट पंढरीनाथानें पंढरपुरच्या ब्राह्मणांस ज्ञानोबाच्या मुखानें एक वार सांगितली होती. ही गोष्ट नामदेव रायाच्या तिर्थावळीच्या अभंगांतील शेवटच्या दोन तीन अभंगांवरून स्पष्ट होईल, पंढरीनाथ ज्ञानोबा यांच्याकडे जाऊन जसा धरणेकरी तुकोबांकडे आला तसाच पंढरीच्या ब्राह्मणांस करावयाचा बोध ज्ञानोबांच्या मुखानें होऊन तो हरिपाठांत गोवला गेला त्याचें सार तुकोबांनीं त्या धरणके-यास अकरा अभंगांच्या रूपानें दिलें, अशी या अकरा अभंगांस ज्ञानदेव व नामदेव यांच्या बोधाची बैठक आहे. परंपरा आहे. या अभंगांत सर्व काय सांगितलें याचें थोडें ज्यास्त स्पष्टीकरण करतों. या अकरा अभंगांत सर्व पुस्तकी ज्ञान सांडावयास सांगून देवाचीये चाडे आळवावे देवा । वोस देहभावा पाडोनीया अशी पहिली गोष्ट सांगितली आहे.
ही गोष्ट ज्ञानेश्वरींत
तेव्हां देवाचीये चाडे आळवावे देवा ।
तेथ रसु तो मुखेंचि सेवावा । परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा ।
तैसा मी तो यजावा । मींच म्हणौनि ॥
म्हणून (अ. ९/३४५) सांगितली आहे व वोस देवभावा पाडोनीयां याचें स्पष्टीकरण जरा पुढें आहे.
मग मीची डोळा देखीला । जीहीं कानीं मीच आइकिला ।
मीचि मनीं भावीलां । वानीलां वाला ॥ ३५५ ॥
सर्वांगें सर्वांठायी । नमस्कारिलांमीचि जिहीं ।
दान पुण्यादीकी जें कांहीं । तें माझीयाचि मोहरां ॥ ३५६॥
जिहिं मातेंचि अध्ययन केलें । जे आंत बाहेरि मियांचि धाले ।
जयांचें,जीवीत्व जोडलें । मज चि लागी ॥ ३५७॥
जे अहंकारु वाहत आंगीं । आम्हीं हरिचे भुषावया लागीं ।
जे लोभी जगीं । माये नि लोभें ॥ ३५८ ॥
जे माझोनि कामें सकाम । जे माझेनि प्रेमें सप्रेम ।
जे माझिया भुली सभ्रम । नेणती लोक ॥ ३५९ ॥
जयांचीं जाणती मजचि शास्त्रें । मी जोडे जयाचेनि मंत्रे ।
ऐसें जे चेष्टामात्रें । भजले मज ॥ ३६० ॥
ते मरणा ऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे ।
मग मरणीं आणिकी । जातील केवीं ॥ ३६१ ॥
ग्रंथाध्ययन केलें, वेदपठण केलें, तीर्थयात्रा केल्या तर त्यानें अंगीं अहंकार उत्पन्न व्हावयाचा, ज्ञानीयांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठीमागे ।- तेथें देवाचीये चाडे आळवावे देवा ही गोष्ट भेटावयाची नाहीं. पंडित झालास तर शब्दांचें पांडित्य करशील, एका शब्दाचे दहा अर्थ सांगशील व विद्वान् म्हणून तुझी वाहवा हि होईल पण ती विद्वत्ता अंगे ब्रह्म व्हावयाचें वर्म तुझ्या हातीं देणार नाहीं. तूं यज्ञयाग केलेस तर तुला दीक्षित असें म्हणतील. पण ज्ञानेश्वरींत म्हटल्याप्रमाणें तें पुण्याच्या नांवानें पाप केल्यासारखें होईल. ती गोष्ट तुला श्रीहरीच्या पायावर नेऊन घालणार नाहीं. तूं गाणें शिकलास तर नव्या नव्या ताना घेशील. हाव भाव करून गाशील हि; त्यानें तुझी प्रसिध्दी हि होईल-पण ती गोष्ट तुला जीवाच्या जिव्हाळयाची ओळख करून देणार नाहीं-तूं धन कुबेरासारखें मिळविलेस-तरी त्यांतील एक कवडी हि तुझ्याबरोबर येणार नाहीं. राज्य मिळविलेस तर जेथें देवादिकांचे अवतार उरले नाहींत तेथें तुझा काय पाड ! या सर्व गोष्टी व येथें न सांगितलेल्या अनेक गोष्टी हि तुझ्या देहभावाच्या कल्पना वाढवितील पण त्यांपैकीं कोणती हि गोष्ट तुला 'जेणें अंगें चि ब्रह्म व्हावें.' हें सांगणार नाहीं. ती गोष्ट मी तुला अभदीं सुलभ करून सांगतों कीं :-
देवाचिये चाडे आळवावे देवा । वोस देहभावा पाडोनियां ।
अशा त-हेनें तुझ्या मनास दुसरा कसला हि वेध न लागतां तुझ्या सर्व देहभावांस एकीएक गोविंद गोविंद हा एवढाच वेध राहिला-म्हणजे साहजीकच तूं म्हणशील कीं :-(सं. ७३४)
॥ येणें मुखें तुझें वाणी गुणनाम । तेंची मज प्रेम देई देवा ॥ १ ॥ २४३४(शा)
॥ डोळे भरुनीयां पाहे तुझे मुख । तेंची मज सुख देई देवा ॥ धृ ॥
॥ कान भरूनीयां आईके तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥ २ ॥
॥ वाये रंगीं टाळी नाचैन उदास । हे देई हातांस पायां सुख ॥ ३ ॥
॥ तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चींतुं त्यासी ॥
व असें होण्यास्तव सहजच तूं म्हणशील कीं, (पं. ७५६)
॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ १ ॥ ७५६ (शा)
॥ तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ धृ ॥
॥ तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥ २ ॥
॥ मना तेथें धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥ ३ ॥
॥ तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥ ४ ॥
अशा एकविधतेंत व उत्कटत्वांत कोणाच्या हि तोंडून एकच शब्द बाहेर पडणार व तो असणार कीं (सं. ७३५)
॥तूं माझा मायबाप । सकळ वीत्त गोत । तूंची माझें हीत । करितां देवा ॥१॥
॥ धृ ॥ तूं माझा देव । तूं माझा जीव । तूं माझा भाव । पांडुरंगा ॥ धृ ॥
२४३५ (शा)
॥ तूं माझा आचार । तूं माझा वीचार । तूं चि सर्व भार चालवीसी ॥ २ ॥
॥ सर्व भावें मज । तूं होसी प्रमाण । यैसी तुझी आण । वाहातुसे ॥ ३ ॥
॥ तुका म्हणे तुज । वीकला जीव भाव । कळे तो उपाव । करी आतां ॥ ४ ॥
॥ गोविंद गोविंद मना बैसलीया छंद ॥ २३२७ (शा) ९४७ (सं)
॥ ज्याचें जया ध्यान । तेंच होय त्याचें मन ॥ २३२८ (शा) ९४८ (सं)
हे दोन अभंग या अकरा अभंगांचें सार आहे. याच मार्गानें जाऊन श्री ज्ञानेश्वर माउलीनें म्हटलें कीं,
॥ विठ्ठल म्हणतां हरलें पाप । पदरीं आलें पुण्य माप ॥
॥ मन हें धाले मन हें धालें । पूर्ण विठ्ठल चि झालें ॥
सर्व संतांचा हि हाच अनुभव असल्यामुळें सार सार सार विठोबा नाम तुझें सार असें संतांच्या सर्व शिकवणीचें सार काढून तुकोबांनीं त्या धरणे-याचे हातीं दिलें. हेतु हा कीं, त्याच्या वाणीवर विठ्ठल नामाचा उच्चार ठेवून दिला कीं, तें लहानसें रोप असलें तरी त्याचा वेल गगनापर्यंत जाऊन भिडावा. परंतु हा बीड येथील ब्राह्मण. देशपांडया, विश्वास, हें मुख्य, भांडवल बरोबर घेऊन आला नव्हता. त्यास एका क्षणांत चमत्कार होऊन त्याचे तोंडीं संस्कृत भाषा यावयास हवी होती. त्यास या मराठी अभंगांची प्रतीति पहावी अशी हि बुध्दि सुचली नाहीं. तो ते अभंग टाकून गेला. त्यानंतर कोंडभट लोहकरे या नांवाचा एक ब्राह्मण तुकोबांकडे आला, त्यानें ते अभंग व त्याबरोबर तुकोबांनीं ज्ञानेश्वर महाराजांकडून आलेलें श्रीफळ (नारळ) दिलें तें घेतलें. त्या नारळांत त्यास जडजवाहीर सांपडून त्याचें दैन्य फिटलें. व हे अभंग पाठ करून त्यास सर्व ज्ञान झालें, तो शिवछत्रपतींच्या दरबारीं हुद्यावर चढला अशी कथा महिपतीबोवांनीं वर्णिली आहे. असो, ती कथा बाजूस ठेवून आपण येवढेंच पहावयाचें कीं या अकरा अभंगांत तुकोबारायांनीं स्वयें अंगेंची ब्रह्म होण्याची युक्ति सांगितली आहे. हीच युक्ति त्यांनीं स्वतः अनुभवानें सिध्द केली होती. नुसत्या नामानें त्यांचें सर्व सांग झालें होतें.
॥ नामाचिया बळें कैवल्य साधन । उगेचि निधान हातां चढे ॥
असा स्वतःचा अनुभव होता. तोच सुलभ उपाय त्यांनीं या अकरा अभंगांत सांगितला आहे. ऐके रे जना (पं. ११४२) या अभंगाचा शेवटचा चरण खालीलप्रमाणें आहेः-
॥ तुका म्हणे अनुभवे । आम्ही पाडीयलें ठावें ११४२ (शा)
॥ आणीक ही दैवें । सुख घेती भावीकें ॥
तेव्हां जे दैववान व भावीक असतील ते या शिकवणीचा अनुभव घेतील. या अकरा अभंगांत संतबोधाचा गाभा तुकोबारायांनीं महाराष्ट्राच्या हातीं दिला आहे. बुडता हें जग न देखवे डोळां-व त्या जगाच्या हिताचा कळवळा त्यांस येई तेव्हां ज्ञान म्हणजे काय व त्याचा विहार कसा-व त्यामुळें व्यवहार कसा करावा ही शिकवण अभंगांतून ठिकठिकाणीं सांठविलेली या भिजल्या वहींत आढळते.
टीप : शा - शासकीय गाथा, सं - संताजी गाथा , पं - पंडीत गाथा
गृहकलह
गोणी आली घरा (94) येथपासून माउलीची चाली लेंकराची ओढी (102) असे हे 7/8 अभंग तुकोबारायांनीं पाखरें राखण्याची नोकरी पत्करली. ती नोकरी नीट झाली नाहीं. तेव्हां त्या शेतक-यास-पंचाईत होऊन नवीन करार लिहून दिला व अखेर धान्य निघाल्यावर तें धान्य बरें च वाढलेलें आढळलें, तेव्हां दरसालप्रमाणें होईल येवढें धान्य घेऊन बाकीचें धान्य तुकोबांच्या घरीं आलें-तेव्हां तुकोबा तें धान्य घेईनात. तुकोबांचें म्हणणें कीं मला ज्या कामावर नेमलें तें काम माझे हातून नीट झालें नाहीं, तेव्हां तें धान्य मला घेतांच येत नाहीं. माझ्या वाटयाचा यांतील एक हि कण नाहीं. हें म्हणणें जिजाबाईंस कसें काय पटणार होतें ! तेव्हां भरी लोकांची पाटोरी । हा त्यांच्या रागाचा पहिला फणकारा ! व असा तोंडाचा पट्टा सुरु झाल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणें-मेला चोरटा-खाणोरी (ऐत्ता खाणारा) अशी पुष्पांजली त्यांनीं वाहिली व तुकोबा गोणी-(एक वा अनेक) परत करीत असावेत. तेव्हां त्यांच्या हातास जिजाबाई झोंबल्या असाव्यात हा एका दृष्टीनें अति प्रसंगच होतां-तेव्हां रागावून तुकोबांनीं-मेला या स्वतः मिळालेल्या विशेषणाचा उपयोग करून जिजाबाईंस म्हटलें असावें कीं-अग रांडे (विधवा) (तेव्हां तुकोबा मेल्यावरची स्थिति,) संचिताच्या साठा खोटा असतो. हा साठा कांहीं उपयोगी पडत नाहीं. तो दुष्काळ आला होता, तेव्हां आपण कांही हि न करतांना सांठा गेलेला तूं पाहिलास ना ? तेव्हां आपल्या तहानभुकेची काळजी ज्यानें आपणास जन्मास घातलें त्याला आहेच प्रत्येक तहानभुकेला त्याची आठवण व्हावी. त्याची आठवण करावी-जरूरीपुरतें तो देईल. तें घ्यावें खावें. साठा करून उपयोगी पडत नाहीं. ही ठेंच एकवार लागल्यावर तीच ती गोष्ट पुनः काय म्हणून करावी ? बरे खाण्यापिण्याची निश्चिती असली कीं श्रीपतीची आठवण कोठें होते ? तेव्हां मला सकळ वैभव हें विटाळ आहे असें वाटतें. त्यावर जिजाबाईंचे उत्तर-रोज गांवें काय, घेईल तें तें घ्यावें काय, हा वांझ आहे. हें जे तुमचे भोवती लोक आहेत ते तरी काय करणार आहेत ? यावर तुकोबांनीं आपलें स्वतःचे वैष्णवांबद्दलचें मत असें सांगितलें कीं साखर म्हटल्यानें-जशी गोडी आठवते तसें वैष्णव म्हटल्यानें-ज्यांनीं मोक्ष गांठीं बांधून भजनीं सोस धरला आहे अशा माणसांच्या सहवासांत भोगलेलें प्रेमसुख मला आठवते व ह्या विठाईमावलीचें चित्त माझ्या खाण्यापिण्याची चिंता वाहून सदा माझ्याबद्दलच्या मोहानें मोहलेलें आहेच - ती आपल्या प्रेमाचा वोरस देऊन आपले दास संभाळते. ही अनुभवाची सिध्द गोष्ट तुकोबा सांगत आहेत व ती जिजाबाई पटवून घेत नाहींत मानीत नाहींत. अशी ही परिस्थिति आहे. 323-26 तुकोबारायांकडे भजनास व कीर्तनास जीं मंडळी येत त्यांचा हि जिजाबाईस मोठा त्वेष वाटे, आपल्या मालकांस हे लोक भजन-कीर्तनांत गुंतवून बिघडवितात अशी त्यांची समजूत. तेव्हां तुकोबांनीं त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. ते जिजाबाईस म्हणाले कीं आपण मोठया अगत्यानें आमचे घरीं बोलाविलें तरी आपल्या घरीं यावयास ज्यांना सवड नाहीं-असे लोक केवळ माझ्यावर प्रीति म्हणून आपल्याकडे येतात व अशा रीतीनें भजन-कीर्तनानें सर्व ब्रह्मांड माझें सोयरें झालें आहें. ते लोक दुसरें कांहीं तुझ्याजवळ मागत नाहींत. फक्त एका सुखाच्या, आदराच्या, गोड शब्दाची अपेक्षा करतात - त्यांच्याशीं कोमल शब्दानें बोलण्यांत तुझ्या पदराला काय खार लागणार आहे ? कोवळया उत्तरें काय वेचें ? काय ज्याचा त्याला धंदा नाहीं ! ते आमच्या घरीं कशासाठीं येतात; विचार करून पहा तर खरें ! परंतु या रांडेला तेवढें हि माझें भूषण सोसत नाहीं. ती श्वान-कुतरें-पिसाळलेलें कुत्रें पाठीस लागावें डसावें तशी पाठीस लागते. तेव्हां देवा मला खरंच तुमच्या अंगांत लपवा. आणि हिच्या हातून सोडवा. उडी घालून मला हिच्या हातून सोडवा. मी या लीगाडांत सापडलों आहे. माझें माझें मन चरफडतें पण कांहीं इलाज चालत नाहीं. गृहकलहाचें तिसरें उदाहरण. 452-66 एकदां तुकोबा कीर्तन करीत होते तेव्हां श्रीविठुराया हा प्रत्येक ठिकाणीं जीवमात्रास केवढया अनन्यत्वानें सरसा सरसा असतो याचें वर्णन करूं लागले. त्यांनीं देव बासर (अमर्यादित) आहे, खोळंबा (अडकलेला) आहे, झळंबा (लोबंकळत) आहे. थोडया भक्तीसाठीं फार भाग्य देतो, चांगला आहे, भाजीच्या एका देठासाठीं उडी घालणारा बराडी आहे, देव भ्याड आहे, बळीच्या दारांत उभा आहे, भावीक आहे, दासांचा सेवक होऊन राहतो, व तुम्ही म्हणाल तसा होतो. देव अणुपेक्षांहि लहान आहे, देव भला आहे, देव बळी आहे. त्यास भूमंडळांत जोडा नाहीं. तेव्हां आपण चला देव पाहूं-त्यासी जीवभाव सांगूं, तो आपल्या मनींची गोष्ट ओळखून पुरवील. तो आपल्या सर्वांचा आहे, आंत बाहेर भरलेला आहे, देव गोड आहे. तो आपले कोड पुरवील, तो कळीकाळास काखेंत मारून नेतो, असा त्या देवाच्याहि देवानें तुक्याचा सांभाळ केला आहे तेव्हां आपण त्याच्या गांवास जाऊं तो आपणास विसावा देईल, तो आपली तहानभूक निवारील. तो सुखाचा सागर आहे, आपण त्याच्या पायापाशी जडून राहूं-आपण या देवाचीं लडीवाळ बाळें आहोंत. जेथें अशा भावनेचे भक्त असतात तेथें प्रेम वस्तीस येतें, तें आपण होऊन या वैष्णवांचें घर शोधीत येतें. असें तुकोबांनीं अति रसभरीत कीर्तन केलें-तेव्हां जिजाबाईंनीं-उलट विचारिलें कीं-या तुमच्या देवानें माझें चांगलें तें काय केलें ? त्यानें माझ्या नव-याचें रूप घेऊन मागील जन्मीचें वैर साधलें-मी सर्व काळ दुःख तरी किती सोसूं ? प्रत्येकापुढें तोंड तरी किती वासूं ? या विठ्ठलानें माझ्या संवसारांत धड असें काय केलें ? सर्व सुखें घरीं चालून येतात-पण माझी फजिती कांहीं चुकत नाहीं-संवसारांत मी आपदा तरी किती काढूं ? मुलें सारखीं तोडीत असतात ? घरांत कांहीं राहून देत नाहींत-घर सारवीन म्हणतें-तर सारविण्यास शेण हवें. तेवढें एकहि ढोर घरांत नाहीं-या फणका-यांत जिजाबाईंनीं विठ्ठलास शिवी हि दिली. पण त्यांत सर्व सुखें घरा चालोनियां येती । अशी कबुली हि दिली-तुकोबांना देवास शिवी दिली त्याचा राग येणें साहजिकच होतें. तसा राग हि आला व पुढें बायकोची कींव हि आली-तेव्हां म्हणाले-तुका म्हणे येती बाइले आसडें फुंदे कांहीं हासे । असें एका अभंगांत म्हणाले व दुस-या अभंगांत म्हणाले-कीं-सर्व सुखें घरा चालोनीया येति याचें वर्म काय तें जर ही लक्ष्यांत घेत नाहीं तर हिला काय सांगावें ? हीं सर्व सुखें घरां चालून कां येतात याचा तर हिनें थोडा विचार करावा ! (463)
॥ तुका म्हणे रांड न करितां विचार । वाहोनीया भार कुंथे माथा ॥
रांड या शब्दाचा सध्यां जो अर्थ प्रचलीत आहे तो तुकोबांचे वेळीं नव्हता. सध्यां हि खेडयांतून आई अविवाहित मुलीला रागानें किंवा लोभानें हि रांडे म्हणून हाक मारतांना किंवा उल्लेख करतांना ऐकूं येते.
मी हिला सांगतों कीं हा भार माझा आहे असें म्हणून तूं डोक्यावर घेऊं नको, तो ज्याचा आहे त्याचा तो घेईल, पण हिला हें पटत नाहीं, विचार करवत नाहीं यास मी काय करूं ? तेव्हां विचार काय करावयाचा हें पुढील अभंगांत सांगताहेत. असा हा अभंग दुस-या कोणत्या हि गाथ्यांत मज चि भोवता केला यांनें जोग । या अभंगानंतर आलेला नाहीं. अशी या वहीची अपूर्वता आहे. तुकोबा विचार काय करायचा ते संदिग्धपणें सांगताहेत कीं:- सर्व सुखें घरा चालून कां येतात याचा थोडा विचार कर नां !
(464) ॥ देव सखा तरी । जग अवघे कृपा करी ॥
असा अनुभव असतांना जीवानीं कासावीशी कां करावी ! प्रल्हादासी अग्नि बघूं शकला नाहीं. याला कारण त्याला देवाची जतन होती हें ना ? मग तो आपली जतन करणार नाहीं असें कसें होईल ! तेव्हां तें प्रल्हादाचें चरित्र आठवून, व आपणा स्वतःस देवानें कसें सहाय्य केलें तें आठवून म्हणतात कीं
(465)॥ वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ।
॥ विश्वासीया घडे लाभ । देईल तरी पद्मनाभ ॥
॥ भाव शुध्द तरी । सांगितले काम करी
॥ तुका म्हणे देव । भोळा-तरी नागवी संदेह ॥
या पुढचा विचार तुकोबा सांगतात. सर्व सुखें घरा चालोनीयां येती-ती आपण संचय करून ठेवावा म्हणून नाहीं, तर-माणूस भुकेला असला तर त्याची जात गोत हें न विचारतां-त्यास आपण अन्न द्यावें. व्याजीं पैसे द्यावयाचे असतील किंवा मुलगी द्यावयाची असेल तर त्याचें कुळ कोणतें त्यांचा धंदा काय याची चवकशी करावी-तेव्हां केव्हां कसें वागावें याचें वर्म कळणें हा खरा धर्म आहे. कांहीं पुण्य गांठीं असेल तर च उचीत काय तें गाठीं पडेल. असा हा गृहकलह तुकोबांनीं कीर्तन करून गोड करून घेतला. जी जी वृत्ति जशी उठेल-तशी ती देवास नेऊन भिडवावयाची हा तुकोबांचा प्रघात. देवाच्या वाटयास शिवी आली-ती हि त्यास समर्पण केली व आपण कोणता विचार करतो कसा विचार करतो हें हि देवास सांगितलें. तुकोबारायांचें देशाउरस्थित्यंतर झालें होतें-जिजाबाईचें झालें नव्हतें. संतांचे ते आप्त नव्हती संत । तुकोबांनीं जेव्हां जेव्हां वेळ येई तेव्हां तेव्हां वर्माची गोष्ट जिजाबाईस आपल्या बरोबर मार्ग दाखवून उध्दरण्याचा शिकस्त प्रयत्न केला. तेथें तुकोबांनीं आपलें मन उघडें करून कोणता हि आडपडदा न ठेवतां आपण स्वतः कोणत्या पदावर आहोंत हें स्पष्ट केलें. सत्य देवें माझा केला अंगीकार । असें सांगितलें. या अकरा अभंगांत तुकोबांनीं आपल्या वक्तृत्वाची शिकस्त केली; त्या वक्तृत्वाचा परिणाम हि कांहीं वेळ झाला असें महिपतीबोवांनीं म्हटलें आहे. परंतु तो टिकला नाहीं. व तुकोबारायांच्या पाठचा गृहकलह निर्याणापर्यंत सुटला नाहीं. हें असें थोडयाफार प्रमाणानें असावयाचेंच. दोन व्यक्तींच्या दृष्टींतील अंतर हें कांहीं सांगून शिकवून नाहींसें होत नाहीं. ही गोष्ट विश्वासानें साधते-शुध्दभावानें होते. एरव्हीं संदेह आला कीं तो नागवणूक करतो. जेथें देवाच्या घरीं शुध्दभावाचें सांकडें-तेथें इतरांची काय कथा ?
लोहगांवचा वेढा
लोहगांवचा हें तुकोबारायांचें आजोळचें गांव. येथें तुकोबारायांस बरेच भक्त व अनुयायी लाभले. तुकोबारायांच्या निर्याणापूर्वी लोहगांवकरांनीं तुकोबांस जवळ जवळ एक महिनाभर ठेवून घेतलें. रोज तुकोबांचें सकाळीं भजन व रात्रीं कीर्तन असा कीर्तन असा कार्यक्रम असे. अशा रीतीनें लोहगांवकर भक्तिप्रेमसुखाची लूट करण्यांत दंग होते अशा वेळीं मोगलांचा लोहगांवावर छापा पडला, त्यांनीं सर्व गांव लुटून नेला. जें नेतां आलें नाहीं तें जाळून खाक केलें. हा लोहगांवकरांवर जो परचक्राचा फेरा आला तो तेथें तुकोबा भजन कीर्तन द्वारा, हरिप्रेमाचा रंग लुटवीत होते, त्यावेळीं आला, म्हणून तुकोबांस अति दुःख झालें. त्याची मजल देवा मला यापुढें जगांत ठेवूं नको असें म्हणण्यापर्यंत गेली. हा छापा जो पडला त्याचें मुळांत कारण असें असावें कीं तुकोबारायांचीं लोहगांवास कीर्तनें चालू आहेत व तीं जवळ जवळ महिनाभर चालूं आहेत ही बातमी आजूबाजूच्या मुसलमान मुलखांतील अधिका-यास लागली असावी. राजा शिवाजी यास तुकोबांच्या कीर्तनांत पुण्यास पकडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर हा दुसरा प्रयत्न झाला असावा. आज हि पाकिस्तान हिंदुस्थान यांच्या सीमेवरचीं कितीतरी खेडीं पाकिस्तानी सेनेनीं वा गुंडांनीं उध्वस्त केलीं असतील ! पण दुसरा प्रयत्न झाला असावा. आज हि पाकिस्तान हिंदुस्थान यांच्या सीमेवरचीं कितीतरी खेडीं पाकिस्तानी सेनेनीं वा गुडांनीं उध्वस्त केलीं असतील ! पण आपत्काळीं ऐवढा खोल विचार कोण करतो ! जो तो म्हणूं लागला असावा कीं, केलेत हरिभक्तीचे उत्सव व झाला गांव उध्दवस्त. लोक तैसा ओक. लोकांच्या तोंडास कधीं कोणास सत्तेशिवाय कुलूप घालतां आलें आहे ! तेव्हां तो झालेला आकांत, त्यामुळें होत असलेली ही भक्तीची निंदा तुकोबांस कांहीं सोसली नाहीं. विठ्ठल सुखा-विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल । हा तुकोबांचा नियम असल्यामुळें त्यांनीं विठुरायाच्या धावा अत्यंत कळकळीनें केला आहे. ते अभंग ५६४-७९ पर्यंत आहेत. तुकोबा म्हणतातः- देवा, तुम्हांस सत्ता नाहीं. नामांत वीर्य नाहीं, व कोणाचें तरी पाप उभें राहतें ते तुमच्या आड उभें राहतें हें आम्हांस आतां कळलें. देवा कोण्या पापाचा उदय झाला व मला हा प्रळय पाहवा लागला ! देवा हें कांहीं मला सोसवत नाहीं. तुमचें नांव बुडतें. आम्ही हीनवर ठरलों. तेव्हां आतां त्वरा करून धावा . देवा माझी वाणी तुम्ही लाजविलीत ! तुमचा सर्वत्र, वास असतांना ही गोष्ट तुमच्या लक्ष्यांत आली नाहीं ! हरिदासांच्या घरीं परचक्र यावें कां? हें मी हरिकथेचें फळ मानूं का ? असें जर परचक्र येऊं लागलें तर तुझी भक्ति तरी लोक कशी करतील ! मला मरण येईल तर त्याचें मला दुःख वाटणार नाहीं. पण या लोकांचें दुःख मला पहावत नाहीं. आमची तशी परंपरा नाहीं; देवा भजनांत विक्षेप यावा ! हें आमचें मरणच म्हणावयाचें. भजनाशिवाय असा एक हि क्षण वाया जाऊं नये; पण तशी वेळ आली खरी. तेव्हां जेथें आघाताचा वारा लागणार नाहीं अशा स्थळीं मला ठेवा. असे एकाहून एक जास्त कळकळीचे अभंग करुण रसानें ओथंबलेले तुकोबांच्या मुखावाटा बाहेर पडत होते. ५७८ वा अभंग संतांच्या तोंडून तुझी कीर्ति ऐकून तर आम्ही या मार्गास लागलों, या स्थळास पावलों. त्यांनीं जी तुझी कीर्ति गाइली आहे, त्याप्रमाणें आम्हांस कांहीं प्रतीति यावी अशी विनंती केली आहे. ५७९ व्या अभंगांत आम्ही समर्थांचीं बाळें आहोंत या अभिमानानें आम्ही भिति न बाळगतांना वागत होतों. देवापाशीं कधीं कळी काळ बळ करूं शकेल का ? तेव्हां मी दंड थोपटतों. पंढरीया तूं हि दंड थोपट अशी पंढरीराजास विनंति केली आहे. अशी विनंति आपल्या इष्टदेवतेस भक्तानें केल्याचें दुसरें कोठें उदाहरण आहे का ? अशा रीतीनें समोर असलेल्या मूर्तीस आव्हान करतांच त्या विठुरायानें कांहींतरी खूण काय दाखविली असावी ! पण महिपतीबोवांनीं ती खूण काय होती हें कांहीं नमूद केलें नाहीं. दुस-या कोणी तशी नोंद केल्याचें आपणास माहीत नाहीं. परंतु कांहीं तरी खूण पटविली असावी हें निश्चित. कारण यापुढील दोन अभंग ती गोष्ट स्पष्ट करीत आहेत. (५७९/८०)
॥ डोळा भरीलें रूप । चीत्तां पायांपें संकल्प ॥ १ ॥
॥ धृ ॥ अवघी घातली वाटणी । प्रेम राहिलें कीर्तनीं ॥ धृ ॥
॥ वाचा केली माप । रासीं हरी नाम अमूप ॥ २ ॥
॥ भरूनीया भाग । तुका बैसला पांडुरंग ॥ ५८०
॥ आता आहे नाहीं । न कळे आळी करा कांहीं ॥ १ ॥
॥ धृ ॥ देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरी नीवासा ॥ धृ ॥
॥ नेणें भाग सीण । दुजें कोणी तुम्हावीण ॥ २ ॥
॥ आतां नव्हे दुरी । तुका पायीं मीठी मारी ॥ ३ ॥ ५८१
आजवर लोहगांवच्या वेढयाचे ३ अभंग सर्व प्रती देत आल्या आहेत. परंतु अभंग ५६४-५८० हे सतरा अभंग या प्रकरणाचे आहेत. तुका म्हणे पंढरीराया । थापटीतों ठोक बाह्या । हें पंढरीरायास केलेलें आव्हान - या संदर्भानें डोळयापुढें आलें - कीं याचा अर्थ काय करावा असा विचार करावयास लावील असा प्रश्न पुढें उभा राहतो. थापटीतो ठोक बाह्या असें जें तुकोबाराय म्हणताहेत, याचा पुष्कळांना अचंबा वाटेल. पण आम्हां महाराष्ट्रीयांचा हा स्वभाव आहे. हें वचन तुकोबांच्या टीकाकारांच्या पाहण्यांत कधीं आलें नसावें. एरव्हीं त्यांनी संत-राष्ट्रहिविन्मुख असतात म्हणून सरसकट टीका केली आहे ती केली नसती. प्रल्हादानें-क्षमेसहि अपवाद आहे म्हणून म्हटलें तें याच तत्त्वानें.५७९/८० या अभंगांत जी खूण पटत आहे, ती अश्रुतपर्व आहे. ऐतिहासिक दृष्टया या लोहगांवच्या वेढ्याची तारीख-मिति ठरविली पाहिजे. तसेंच त्यांत कोणाकोणाच्या झटापटी झाल्या हें पाहिलें पाहिजे. माझी अशी समजूत आहे कीं, थापटीतो ठोक बाह्या म्हणून जें म्हटलें आहे, त्या सुमारास या परचक्राची बातमी कळून शिवाजी राजांनीं सैन्य पाठवून वेढा उठविला असेल. हें प्रकरण आतां ऐतिहासिक दृष्टया नीट पाहिलें पाहिजे.
संताजीच्या गाथ्यांत १५-२० हे अभंग हि याच अर्थाचे आहेत. तेव्हां ते अभंग या बरोबर घ्यावे लागतील. हे सर्व अभंग एका प्रसंगाचे आहेत. म्हणून एकाच वेळीं झाले असतील असें नाहीं. तेव्हां संताजीसारख्या आणखी कांहीं वह्या मिळतील तेव्हां या गोष्टीचा निर्णय ठरवितां येईल. सध्यां एवढें म्हणतां येतें कीं या लोहगांवच्या परचक्रानें तुकोबारायांच्या मनास फार मोठी जखम झाली व ती पुष्कळ दिवस वाहत राहिली असावी.
न घडे यावरी न धरवे धीर । पीडीलीया राष्ट्र देखोनी जग ।
हे शब्द राष्ट्रहिताबद्दल विन्मुखता दाखवितात काय ?