Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

३.
चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी । प्रवेश भीतरी केला देवे ॥१॥
देव आला घरा नंदाचिया गावा । धन्य त्यांच्या दैवा दैव आले ॥२॥
आले अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥
करावया भक्तजनांचे पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥
गोकुळी आनंद प्रगटले सुख । निर्भर हे लोक घरोघरी ॥५॥
घरोघरी जाला लक्ष्मीचा वास । दैन्य दारिद्रास त्रास आला ॥६॥
आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारी लोका ॥७॥
लोका गोकुळीच्या जाले ब्रम्हज्ञान । केलियावाचून जपतपे ॥८॥
जपतपे काय करावी साधने । जव नारायणे कृपा केली ॥९॥
केली नारायणे आपुली अंकित । तो चि त्यांचे हित सर्व जाणे ॥१०॥
सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाही नाही ॥११॥
नाही भक्ता दुजे तिही त्रिभुवनी । एका चक्रपाणीवाचूनिया ॥१२॥
याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजूनिया ॥१३॥
४५१० पृ ७४५(शासकीय), ३८११ पृ ६५८(शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग