Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

२.
मनोरथ जैसे गोकुळीच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥
ऋण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥
सीण जाला वसुदेव देवकीस । वधी बाळे कंस दुराचारी ॥३॥
दुराचारियासी नाही भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥
पुण्यकाळ त्यांचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥
गर्भासी तयांच्या आला नारायण । तुटले बंधन आपेआप ॥६॥
आपेआप बेडया तुटल्या शृंखळा । बंदाच्या अर्गळा किलिया कोंडे ॥७॥
कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष न लगता ॥८॥
न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरी ॥९॥
नंदाघरी जाता येता वसुदेवा । नाही जाला गोवा सवे देव ॥१०॥
सवे देव तया आड नये काही । तुका म्हणे नाही भय चिंता ॥११॥
४५०९ पृ ७४४(शासकीय), ३८१० पृ ६५७(शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग