१.
देवा आदि देवा जगत्रया जीवा । परियेसी केशवा विनंती माझी ॥१॥
माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम काही कळा ॥२॥
कळा तुजपाशी आमुचे जीवन । उचित करून देई आम्हा ॥३॥
आम्हा शरणागता तुझा चि आधार। तू तव सागर कृपासिंधु ॥४॥
सिंधु पायावाट होय तुझ्या नामे । जाळी महाकर्मे दुस्तरे ती ॥५॥
ती फळे उत्तम तुझा निजध्यास । नाही गर्भवास सेविलिया ॥६॥
सेविलिया राम कृष्ण नारायण । नाही त्या बंधन संसाराचे ॥७॥
संसार ते काय तृणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रे ॥८॥
क्षणमात्रे जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी
॥९॥
करी ब्रिदे साच आपली आपण । पतितपावन दिनानाथ ॥१०॥
नाथ अनाथाचा पति गोपिकाचा । पुरवी चित्तीचा मनोरथ ॥११॥
चित्ती जे धरावे तुका म्हणे दासी । पुरविता होसी मनोरथ ॥१२॥
४५०८ पृ ७४४(शासकीय), ३८०९ पृ ६५७(शिरवळकर) |