Font Problem

       
 
 
 

ओविया

 
 

गाईन ओविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥
रंगले हे चित्त माझे तया पायी । म्हणउनि घेई हा चि लाहो ॥२॥
लाहो करीन मी हा चि संवसारी । राम कृष्ण हरि नारायण ॥३॥
नारायण नाम घालिता तुकासी । न येती या रासी तपतीर्थे ॥४॥
तीर्थे रज माथा वंदिती संतांचे । जे गाती हरिचे गुणवाद ॥५॥
गुणवाद ज्याचे गाता पूज्य जाले । बडिवार बोले कोण त्या चा ॥६॥
त्याचा नाही पार कळला वेदांसी । आणीक ही ॠषि विचारिता ॥७॥
विचारिता तैसा होय त्यांच्या भावे । निजसुख ठावे नाही कोणा ॥८॥
कोणा कवतुक न कळे हे माव । निजलिया जिवे करी धंदा ॥९॥
करुनि कवतुक खेळे हा चि लीळा । व्यापूनि वेगळा पाहातसे ॥१०॥
सेवटी आपण एकला चि खरा । सोंग हा पसारा नट केला ॥११॥
लावियेले चाळा मीपणे हे जन । भोग तया कोण भोगविशी ॥१२॥
विषयी गुंतली विसरली तुज । कन्या पुत्र भाज धन लोभे ॥१३॥
लोभे गिळी फांसा आविसाच्या आशा। सापडोनि मासा तळमळी ॥१४॥
तळमळ याची तरी शम होईल । जरी हा विठ्ठल आठविती ॥१५॥
आठव हा तरी संतांच्या सांगात। किंवा हे संचित जन्मांतर ॥१६॥
जन्मांतरे तीन भोगिता कळती । केले ते पावती करिता पुढे ॥१७॥
पुढे जाणोनिया करावे संचित। पुजावे अतीत देव द्विज ॥१८॥
जन्म तुटे ऐसे नव्हे तुम्हा जना । पुढिल्या पावना धर्म करा ॥१९॥
करा जप तप अनुष्ठान याग । संती हा मारग स्थापियेला ॥२०॥
लावियेली कर्मे शुध्द आचरणे । कोणा एका तेणे काळे पावे ॥२१॥
पावला सत्वर निष्काम उदार। जिंकिली अपार वासना हे ॥२२॥
वासनेचे मूळ छेदिल्या वाचून । तरलोसे कोणी न म्हणावे ॥२३॥
न म्हणावे जाला पंडित वाचक । करो मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥
चाळविली एके ते चि आवडीने । लोक दंभमाने देहसुखे ॥२५॥
सुख तरी च घडे भजनाचे सार । वाचे निरंतर रामनाम ॥२६॥
राम हा उच्चार तरीच बैसे वाचे । अनंता जन्माचे पुण्य होय ॥२७॥
पुण्य ऐसे काय रामनामापुढे । काय ते बापुडे यागयज्ञ ॥२८॥
यागयज्ञ तप संसार दायके । न तुटती एके नामेविण ॥२९॥
नामेविण भवसिंधु पावे पार । अइसा विचार नाही दुजा ॥३०॥
जाणती हे भक्तराज महामुनि । नाम सुखधणी अमृताची ॥३१॥
अमृताचे सार निजतत्त्व बीज । गुह्याचे ते गुज रामनाम ॥३२॥
नामे असंख्यात तारिले अपार । पुराणी हे सार प्रसिध्द हे ॥३३॥
हे चि सुख आम्ही घेऊ सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥३४॥
कथाकाळी लागे सकळा समाधि । तात्काळ हे बुध्दि दुष्ट नासे ॥३५॥
नासे लोभ मोहो आशा तृष्णा माया । गाता गुण तया विठोबाचे ॥३६॥
विठोबाचे गुण मज आवडती । आणीक हे चित्ती न लगे काही ॥३७॥
काही कोणी नका सांगो हे उपाव । माझ्या मनी भाव नाही दुजा ॥३८॥
जाणोनिया आम्ही दिला जीवभाव। दृढ याचे पाये धरियेले ॥३९॥
धरियेले आता न सोडी जीवेसी । केला येच विशी निरधार ॥४०॥
निरधार आता राहिलो ये नेटी । संवसार तुटी करूनिया ॥४१॥
येणे अंगीकार केला पांडुरंगें । रंगविला रंगे आपुलिया ॥४२॥
आपुली पाखर घालुनिया वरि । आम्हासी तो करी यत्‍न देव ॥४३॥
देव राखे तया आणिकांचे काय। करिता उपाय चाले तेथे ॥४४॥
तेथे नाही रिघ कळिकाळासी जाता । दास म्हणविता विठोबाचे ॥४५॥
विठोबाचे आम्ही लाडिके डिंगर । कापती असुर काळ धाके ॥४६॥
धाक तिही लोकी जयाचा दरारा । स्मरण हे करा त्याचे तुम्ही ॥४७॥
तुम्ही निदसुर नका राहू कोणी । चुकावया खाणी गर्भवास ॥४८॥
गर्भवास दुःख यमाचे दंडण । थोर होय शीण येता जाता ॥४९॥
तान भूक पीडा जीता ते आघात । मेल्या यमदूत जाच करिती ॥५०॥
जाच करिती हे कोणा आहे ठावे । नरकी कौरवे बुडी दिली ॥५१॥
बुडी दिली कुंभपाकी दुर्योधने । दाविना लाजेने मुख धर्मा ॥५२॥
धर्म हा कृपाळू आलासे जवळी । बैसला पाताळी वरि नये ॥५३॥
न ये वरि काही करिता उपाव । भोगवितो देव ज्याचे त्यासी ॥५४॥
त्यासी अभिमान गर्व या देहाचा । नुच्चारिती वाचा नारायण ॥५५॥
नारायण विसरली संवसारी । तया अघोरी वास सत्य ॥५६॥
सत्य मानूनिया संतांच्या वचना । जा रे नारायणा शरण तुम्ही ॥५७॥
तुम्ही नका मानू कोणी विसवास। पुत्र पत्‍नी आस धन वित्त ॥५८॥
धन वित्त लोभ माया मोहपाश । मांडियले फासे यमदूती ॥५९॥
दूती याच्या मुखा केलेसे कुडण । वाचे नारायण येऊ नेदी ॥६०॥
नेदी शुध्दबुध्दि आतळों चित्तासी । नाना कर्म त्यासी दुरावती ॥६१॥
दुराविली एके जाणतीच फार । निंदा अहंकार वादभेद ॥६२॥
वाद भेद निंदा हे फंद काळाचे । गोवितील वाचे रिकामिके ॥६३॥
रिकामिक देवा होय नव्हे मना । चिंतेचिये घाणा जुंपिजेसी ॥६४॥
सेवटी हे गळा लावुनिया दोरी । सांभाळ ये करी वासनेचा ॥६५॥
वासनेचा संग होय अंतकाळी । तरी तपोबळी जन्म धरी ॥६६॥
धरूनिया देव राहतील चित्ती। आधीचिया गती आठवाया ॥६७॥
आठवावा देव मरणाचे काळी। म्हणउनि बळी जीव दिले ॥६८॥
दिले टाकूनिया भोग ॠषेश्वरी । खाती वनांतरी कंदमूळे ॥६९॥
मुळे सुखाचिया देव अंतरला । अल्पासाटी नेला अधोगती ॥७०॥
गति हे उत्तम व्हावया उपाव । आहे धरा पाव विठोबाचे ॥७१॥
विठोबाचे पायी राहिलिया भावे । न लगे कोठे जावे वनांतरा ॥७२॥
तरती दुबळी विठोबाच्या नावे । संचित ज्या सवे नाही शुध्द ॥७३॥
शुध्द तरी याचे काय ते नवल। म्हणता विठ्ठल वेळोवेळा ॥७४॥
वेळा काही नाही कवणाचे हाती। न कळे हे गति भविष्याची ॥७५॥
भविष्य न सुटे भोगिल्यावाचूनि । संचित जाणोनि शुध्द करा ॥७६॥
करावे सायास आपुल्या हिताचे । येथे आलियाचे मनुष्यपण ॥७७॥
मनुष्यपण तरी साधी नारायण । नाही तरी हीन पशुहूनी ॥७८॥
पशु पाप पुण्य काय ते जाणती । मनुष्या या गति ठाउकिया ॥७९॥
ठाउके हे असे पाप पुण्य लोका । देखती ते एका भोगितिया ॥८०॥
भोगतील एक दुःख संवसारी । काय सांगो परी वेगळाल्या ॥८१॥
ल्यावे खावे बरे असावे सदैव । हे चि करी हाव संवसारी ॥८२॥
संवसारे जन गिळिले सकळ । भोगवितो फळ गर्भवासा ॥८३॥
वासनेचे मूळ छेदिल्यावाचून । नव्हे या खंडण गर्भवासा ॥८४॥
सायास केलियावाचुनि ते काही । भोगावरी पाही घालू नये ॥८५॥
नये बळे धड घालू काट्‍यावरि । जाये जीवे धरी सर्प हाती ॥८६॥
हाती आहे हित करील तयासी । म्हणउनि ॠषी सांगितले ॥८७॥
सांगती या लोका फजित करूनि ।आपण जे कोणी तरले ते ॥८८॥
तेणे वाळवंटी उभारिले कर । कृपेचा सागर पांडुरंग ॥८९॥
गंगाचरणी करी पातकांची धुनी । पाउले ती मनी चिंतिलिया ॥९०॥
चिंतने जयाच्या तरले पाषाण । उध्दरी चरण लावूनिया ॥९१॥
लावूनिया टाळी नलगे बैसावे । प्रेमसुख घ्यावे संतसंगें ॥९२॥
संतसंगें कथा करावे कीर्तन । सुखाचे साधन रामनाम ॥९३॥
मग कोठे देव जाऊ न सके दुरी । बैसोनि भीतरी राहे कंठी ॥९४॥
राहे व्यापुनिया सकळ शरीर । आपुला विसर पडो नेदी ॥९५॥
नेदी दुःख देखो आपुलिया दासा । वारी गर्भवासा यमदूता ॥९६॥
तान भूक त्यासी वाहो नेदी चिंता । निश्चिंत हे घेता नाम होती ॥९७॥
होती जीव त्यांचे सकळ ही जंत । परि ते अंकित संचिताचे ॥९८॥
चेवले जे कोणी देहअभिमाने । त्यासी नारायणे कृपा केली ॥९९॥
कृपाळू हा देव अनाथा कोवसा । आम्ही त्याच्या आशा लागलो ॥१००॥
लावियेले कासे येणे पांडुरंगे । तुका म्हणे संगे संतांचिया ॥१०१॥
३९१० पृ ६९६ (शिरवळकर), ४५०६ पृ ७३९(शासकीय)
 

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग