Font Problem

       
 
 
 

नमन

 
 

पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया॥१॥
यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु । बाबाजी सद्गुरुदास तुका ॥२॥
काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवू चित्तासी आपुलिया ॥३॥
या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥
सीण जाला मज संवसार संभ्रमे । सीतळ या नामे जाली काया॥५॥
या सुखा उपमा नाही द्यावयासी । आले आकारासी निर्विकार ॥६॥
नित्य धावे तेथे नामाचा गजर । घोष जयजयकार आइकता ॥७॥
तातडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥
मूळ नरकाचे राज्य मदे माते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥
दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसे गोचिडासी क्षीर राहे ॥१०॥
हे वाट गोमटी वैकुंठासी जाता । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥
जाणते तयांनी सांगितले करा । अंतरासी वारा आडूनिया ॥१२॥
यासी आहे ठावे परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥
नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥
चित्त ज्याचे पुत्र पत्‍नी बंधूवरी । सुटल हा परि कैसे जाणा ॥१५॥
जाणते नेणते करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥
माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥
कोणी तरी काही केले आचरण । मज या कीर्तनेविण नाही ॥१८॥
नाही भय भक्ता तराया पोटाचे । देवासी तयाचे करणे लागे ॥१९॥
लागे पाठोवाटी पाहे पायां कडे । पीतांबर खडे वाट झाडी ॥२०॥
डिंकोनिया का रे राहिले हे लोक । हे चि कवतुक वाटे मज ॥२१॥
जयाने तारिले पाषाण सागरी । तो ध्या रे अंतरी स्वामी माझा॥२२॥
माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥
हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचे ॥२४॥
चेतवला अग्नि तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥
मना धीर करी दृढ चित्ता धरी । तारील श्रीहरि मायबाप ॥२६॥
बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरी होय दासी कामारी त्या ॥२७॥
त्याचा भार माथा चालवी आपुला। जिही त्या दिधला सर्व भाव ॥२८॥

भावेविण जाणा नाही त्याची प्राप्ति । पुराणे बोलती ऐसी मात ॥२९॥
मात त्याची जया आवडे जीवासी। तया गर्भवासी नाही येणे ॥३०॥
यावे गर्भवासी तरी च विष्णुदासी । उध्दार लोकासी पूज्य होती ॥३१॥
होती आवडत जीवाचे ताइत। त्या घडी अच्युत न विसंभे ॥३२॥
भेदाभेद नाही चिंता दुःख काही । वैकुंठ त्या ठायी सदा वसे ॥३३॥
वसे तेथे देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥
संपदा तयांची न सरे कल्पांती। मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥
लाभ तया जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥
लागलेसे पिसे काय मूढजनां । काय नारायणा विसरली ॥३७॥
विसरली तया थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौऱ्यासी ॥३८॥
शिकविले तरी नाही कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥
गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥४०॥
तळमळ त्याची काही तरी करा । का रे निदसुरा बुडावया ॥४१॥
या जनासी भय यमाचे नाही । सांडियेली तिही एकराज्ये ॥४२॥
जेणे अग्निमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥
तान भूक जिही साहिले आघात । तया पाय हात काय नाही ॥४४॥
नाही ऐसा तिही केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥
याच जन्मे घडे देवाचे भजन । आणीक हे ज्ञान नाही कोठे ॥४६॥
कोठे पुढे नाही घ्यावया विसावा । फिरोनि या गावा आल्याविण॥४७॥
विनविता दिवस बहुत लागती । म्हणउनि चित्ती देव धरा ॥४८॥
धरा पाय तुम्ही संतांचे जीवासी । वियोग तयासी देवा नाही ॥४९॥
नाही चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया॥५०॥
त्याचीच उच्छिष्ट बोलतो उत्तरे । सांगितले खरे व्यासादिकी ॥५१॥
व्यासे सांगितले भक्ति हे चि सार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥
तरावया जना केले भागवत । गोवळ गोपी भक्त माता पिता ॥५३॥
तारुनिया खरे नेली एक्यासरे । निमित्ते उत्तरे ऋषीचिया ॥५४॥
यासी वर्म ठावे भक्ता तरावया । जननी बाळ माया राखे तान्हे ॥५५॥
तान्हेले भुकेले म्हणे वेळोवेळा । न मगता लळा जाणोनिया ॥५६॥
जाणोनिया वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवे धावे ॥५७॥
धावे सर्वथा धेनु जैसी वत्सा । भक्तालागी तैसा नारायण ॥५८॥
नारायण व्होवा हाव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाही ॥५९॥
पार नाही सुखा ते दिले तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥६०॥
रामनाम दोनी उत्तम अक्षरे । भवानी शंकरे उपदेशिली ॥६१॥
उपदेश करी विश्वनाथ कानी । वाराणसी प्राणी मध्ये मरे ॥६२॥
मरणाचे अंती राम म्हणे जरी । न लगे यमपुरी जावे तया ॥६३॥
तयासी उत्तम ठाव वैकुंठी । वसे नाम चित्ती सर्वकाळ ॥६४॥
सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरी । नसे क्षणभरी स्थिर कोठे ॥६५॥
कोठे नका पाहो करा हरिकथा । तेथे अवचिता सापडेल ॥६६॥
सापडे हा देव भाविकांचे हाती। शाहाणे मरती तरी नाही ॥६७॥
नाही भले भक्ती केलियावाचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥
नागवलो म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकला तो ॥६९॥
तो चि देव येर नव्हे ऐसे काही । जनार्दन ठायी चहू खाणी ॥७०॥
खाणी भरूनिया राहिलासे आत । बोलावया मात ठाव नाही ॥७१॥
ठाव नाही रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥
वाणी बोलूनिया गेली एक पुढे । तयासी वाकुडे जाता ठके ॥७३॥
ठका नाही अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥
दास ठेला पोट अर्थ दंभासाटी । म्हणउनि तुटी देवासवे ॥७५॥
सवे देव द्विजा तीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥
पाड करूनिया नागविली फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥
वादका निंदका देवाचे दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकर्मी ॥७८॥
षडकर्मी हीन रामनाम कंठी । तयासवे भेटी सवे देवा ॥७९॥
देवासी आवडे भाविक जो भोळा । शुध्द त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥
मानियेला नाही विश्वास या बोला । नाम घेता मला युक्ति थोडी ॥८१॥
युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥
बोलता पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढे त्याच्या ॥८३॥
पुढे पार त्याचा न कळे चि जाता । पाउले देखता ब्रम्हादिका ॥८४॥
काय भक्तीपिसे लागले देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥
होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥
या बापासी बाळ बोले लाडे कोडे । करुनि वाकुडे मुख तैसे ॥८७॥
तैसे याचकाचे समाधान दाता । होय हा राखता सत्त्वकाळी ॥८८॥
सत्त्वकाळी कामा न येती आयुधे । बळ हा संबंध सैन्यलोक॥८९॥
सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥
कोपा मरण नाही शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्त्वगुणी ॥९१॥
सत्त्व रज तम आपण नासती । करिता हे भक्ति विठोबाची ॥९२॥
चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथे उणे काय निजसुखा ॥९३॥
सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥९४॥
एक चित्त धरू विठोबाचे पायी । तेथे उणे काही एक आम्हा ॥९५॥
आम्हासी विश्वास याचिया नामाचा । म्हणउनि वाचा घोष करू ॥९६॥
करू हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुध्दी दुष्ट नासे ॥९७॥
नासे संवसार लोक मोहो माया । शरण जा रे तया विठोबासी ॥९८॥
सिकविले मज मूढा संतजनी । दृढ या वचनी राहिलोसे ॥९९॥
राहिलोसे दृढ विठोबाचे पायी । तुका म्हणे काही न लगे आता ॥१००॥

३९०९ पृ ६९२(शिरवळकर),४५०५ पृ ७३६(शासकीय)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग