१६
तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासी खेळता दिवस गमे
॥१॥
दिवस राती काही नाठवे तयांसी । पाहाता मुखासी कृष्णाचिया ॥२॥
याच्या मुखे नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थचि ॥३॥
ताटस्थ राहिले सकळ शरीर । इंद्रिये व्यापार विसरली ॥४॥
विसरल्या तान भुक घर दार । नाही हा विचार आहो कोठे ॥५॥
कोठे असो कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥
विसरल्या आम्ही कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या
॥७॥
एक जाल्या तेव्हा कृष्णाचिया सुखे । निःशंके भातुके खेळतील ॥८॥
खेळता भातुके कृष्णाच्या सहित । नाही आशंकित चित्त त्यांचे ॥९॥
चित्ती तो गोविंद लटिके दळण । करिती हे जन करी तैसे ॥१०॥
जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनिया ॥११॥
करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥
त्यांणी केला हरि सासुरे माहेर । बंधु हे कुमर दीर भावे ॥१३॥
भावना राहिली एकाचिये ठायी । तुका म्हणे पायी गोविंदाचे ॥१४॥
४५२३ पृ ७५०(शासकीय), ३८२४ पृ ६६४(शिरवळकर)
|