Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

१७
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामे भेद परि एक चि तो ॥१॥
एकाचीच नामे ठेवियेली दोनी । कल्पितील मनी यावे जावे ॥२॥
जावे यावे तिही घरीचिया घरी । तेथिची सिदोरी तेथे न्यावी ॥३॥
विचारिता दिसे येणे जाणे खोटे । दाविती गोमटे लोका ऐसे ॥४॥
लोक करूनिया साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥
लटिकी करिती मंगळदायके । लटिकीच एके एका व्याही ॥६॥
व्याही भाई हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायी केला एक ॥७॥
एकासिच पावे जे काही करिती । उपचार संपत्ति नाना भोग ॥८॥
भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाई ॥९॥
लटिकाच त्यांणी केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥
त्यांणी मृत्तिकेचे करूनि अवघे । खेळतील दोघे पुरुषनारी ॥११॥
पुरुषनारी त्यांणी ठेवियेली नावे । कवतुकभावे विचरती ॥१२॥
विचरती जैसे साच भावे लोक । तैसे नाही सुख खेळतीया ॥१३॥
यांणी जाणितले आपआपणया । लटिके हे वाया खेळतो ते ॥१४॥
खेळतो ते आम्ही नव्हो नारीनर । म्हणोनि विकार नाही तया ॥१५॥
तया ठावे आहे आम्ही अवघी एक । म्हणोनि निःशंक खेळतील ॥१६॥
तया ठावे नाही हरिचिया गुणे । आम्ही कोणकोणे काय खेळो ॥१७॥
काय खातो आम्ही कासया सांगाते । कैसे हे लागते नेणो मुखी ॥१८॥
मुखी चवी नाही वरी अंगी लाज । वर्ण याती काज न धरिती ॥१९॥
धरितील काही संकोच त्या मना । हासता या जना नाइकती॥२०॥
नाइकती बोल आणिकांचे कानी । हरि चित्ती मनी बैसलासे ॥२१॥
बैसलासे हरि जयाचिये चित्ती। तया नावडती मायबापे ॥२२॥
मायबापे त्यांची नेती पाचारुनि । बळे परि मनी हरि वसे ॥२३॥
वसतील बाळा आपलाले घरी । ध्यान त्या अंतरी गोविंदाचे ॥२४॥
गोविंदाचे ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती ॥२५॥
न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जाले ॥२६॥
एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागी तैशा ॥२७॥
तैसा त्यांचा भाव घेतला त्या परी । तुका म्हणे हरि बाळलीला॥२८॥
४५२४ पृ ७५१ (शासकीय), ३८२५ पृ ६६५ (शिरवळकर)
 

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग