१८
लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥
मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनिया करी स्तनपान ॥२॥
नभाचा ही साक्षी पाताळा परता । कुर्वाळिते माता हाते त्यासि
॥३॥
हाते कुर्वाळुनी मुखी घाली घास । पुरे म्हणे तीस पोट धाले ॥४॥
पोट धाले मग देतसे ढेकर । भक्तीचे ते फार तुळसीदळ ॥५॥
तुळसीदळ भावे सहित देवापाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥
क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचे ते जळ गोड देवा ॥७॥
देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्या ठायी ॥८॥
त्यांचा हा अंकित सर्व भावे हरि । तुका म्हणे करी सर्व काज ॥९॥
४५२५ पृ ७५२ (शासकीय), ३८२६ पृ ६६६ (शिरवळकर)
|