१९
जयेवेळी चोरूनिया नेली वत्से । तयालागी तैसे होणे लागे ॥१॥
लागे दोही ठायी करावे पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥
माय जाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरी वत्से जीची तैसा जाला ॥३॥
जाला तैसा जैसे घरिचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पावे ॥४॥
मोहरी पावे सिंगे वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रम्हादिकी
॥५॥
ब्रम्हादिका सुख स्वप्नी ही नाही । तैसे दोही ठायी वोसंडले
॥६॥
वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आई तैसा जाला
॥७॥
लाघव कळले ब्रम्हयासी याचे । परब्रम्ह साचे अवतरले ॥८॥
तरले हे जन सकळ ही आता । ऐसे तो विधाता बोलियेला ॥९॥
लागला हे स्तुती करू अनंताची । चतुर्मुख वाची भक्ती स्तोत्रे
॥१०॥
भक्तिकाजे देवे केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥
पृथिवी दाटीली होती या असुरी । नासाहावे वरी भार तये ॥१२॥
तया काकुलती आपल्या दासांची । तयालागी वेची सर्वस्व ही ॥१३॥
स्वहित दासांचे करावया लागी । अव्यक्त हे जगी व्यक्ती आले ॥१४॥
लेखा कोण करी याचिया पुण्याचा । जया सवे वाचा बोले हरि ॥१५॥
हरि नाममात्रे पातकांच्या रासी । तो आला घरासि गौळियांच्या
॥१६॥
गौळिये अवघी जाली कृष्णमय । नामे लोकत्रय तरतील ॥१७॥
तरतील नामे कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशी होइल पाप ॥१८॥
पाप ऐसे नाही कृष्णनामे राहे । धन्य तो चि पाहे कृष्णमुख ॥१९॥
मुख माझे काय जो मी वर्णू पार । मग नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥
ब्रम्हा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हा चि देव ॥२१॥
देव चि अवघा जालासे सकळ । गाई हा गोपाळ वत्से तेथे ॥२२॥
तेथे पाहाणे जे आणीक दुसरे । मूर्ख त्या अंतरे दुजा नाही ॥२३॥
दुजा भाव तुका म्हणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥
४५२६ पृ ७५२ (शासकीय), ३८२७ पृ ६६६ (शिरवळकर)
|