३१
नाही त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥
जाणतिया सवे येऊ नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले॥२॥
वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनिया दूर दुराविले ॥३॥
दुरावले दूर आशाबध्द देवा । करिता या सेवा कुटुंबाची ॥४॥
चित्ती द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥
नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥६॥
जीही हरिसंग केला संवसारी । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७॥
४५३८ पृ ७५६ (शासकीय), ३८३९ पृ ६७१ (शिरवळकर)
|