३५
मुखे सांगे त्यांसी पैल चेंडू पाहा । उदकात डोहाचिये माथा ॥१॥
माथा कळंबाचे अवघडा ठायी । दावियेला डोही जळामाजी ॥२॥
जळात पाहाता हाडति या दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसे नव्हे ॥३॥
नव्हे साच चेंडू छाया दिसे आत । खरा तेथे चित्त लावा वरी ॥४॥
वरी देखियेला अवघ्यानी डोळा । म्हणती गोपाळा आता कैसे ॥५॥
कैसे करूनिया उतरावा खाली । देखोनिया भ्याली अवघी डोहो ॥६॥
डोहो बहु खोल काळया भीतरी । सरली माघारी अवघी जणे ॥७॥
जयाचे कारण तयासीच ठावे । पुसे त्याच्या भावे त्यास हरि ॥८॥
त्यांसी नारायण म्हणे राहा तळी । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥
वरी जाता हरि पाहाती गोपाळ । म्हणति सकळ आम्ही नेणो ॥१०॥
नेणो म्हणती हे करितोसि काई । आम्हा तुझी आई देइल सिव्या ॥११॥
आपुलिया काना देउनिया हात । सकळी निमित्य टाळियेले ॥१२॥
निमित्याकारणे रचिले कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥
खांदीवरी पाव ठेवियेला देवे । पाडावा त्या भावे चेंडू तळी ॥१४॥
तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरीचा देव जाणो नेदी ॥१५॥
४५४२ पृ ७५८ (शासकीय), ३८४३ पृ ६७३ (शिरवळकर)
|