३८
पाषाण फुटती ते दुःख देखोनि । करिता गौळणी शोक लोका ॥१॥
काय ऐसे पाप होते आम्हा पासी । बोलती एकासी एक एका ॥२॥
एकाचिये डोळा असुं बाह्यात्कारी । नाही ती अंतरी जळतील ॥३॥
जळतील एके अंतर्बाह्यात्कारे । टाकिली लेकुरे कडियेहूनि ॥४॥
निवांतचि एके राहिली निश्चिंत । बाहेरी ना आत जीव त्यांचे ॥५॥
त्यांचे जीव वरी आले त्या सकळा । एका त्या गोपाळा वाचूनिया ॥६॥
वाचणे ते आता खोटे संवसारी । नव्हे भेटी जरी हरिसवे ॥७॥
सवे घेऊनिया चालली गोपाळा । अवघीच बाळा नर नारी ॥८॥
नर नारी नाही मनुष्याचे नावे । गोकुळ हे गाव सांडियेले ॥९॥
सांडियेली अन्ने संपदा सकळ । चित्ती तो गोपाळ धरुनि जाती ॥१०॥
तिरी माना घालूनिया उभ्या गाई । तटस्थ या डोही यमुनेच्या ॥११॥
यमुनेच्या तिरी झाडे वृक्ष वल्ली । दुःखे कोमाइली कृष्णाचिया
॥१२॥
याचे त्याचे दुःख एक जाले तिरी । मग शोक करी मायबाप ॥१३॥
मायबाप तुका म्हणे सहोदर । तोवरीच तीर न पवता ॥१४॥
४५४५ पृ ७५९ (शासकीय), ३८४६ पृ ६७४ (शिरवळकर)
|