४३
म्हणे चेंडू कोणे आणिला या ठाया । आलो पुरवाया कोड त्याचे ॥१॥
त्याचे आइकोन निष्ठुर वचन । भयाभीत मन जाले तिचे ॥२॥
तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधी ते माघारी फिरली वेगी ॥३॥
वेगी मन गेले भ्रताराचे सोयी । विघ्न आले काही आम्हा वरी ॥४॥
वरी उदकास अंत नाही पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥
संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायीच देखिला अवचिता ॥६॥
अवचिता नेणो येथे उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥
मोठयाने बोलतो भय नाही मनी । केला उठवूनि काळ जागा ॥८॥
जागविला काळसर्प तये वेळी । उठिला कल्लोळी विषाचिये ॥९॥
यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळयाकृतांत धु धुकारे ॥१०॥
कारणे ज्या येथे आला नारायण । जाले दरुषण दोघांमध्ये ॥११॥
दोघांमध्ये जाले बोल परस्परे । प्रसंग उत्तरे युध्दाचिया ॥१२॥
चिंतावला चित्ती तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥
जाला सावकाश झेप घाली वरी । तव हाणे हरि मुष्टिघाते ॥१४॥
तेणे काळे त्यासी दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव जाला ॥१५॥
आठवले काळा हाकारिले गोत । मिळाली बहुते नागकुळे ॥१६॥
कल्हारी संधानी धरियेला हरि । अवघा विखारी व्यापियेला ॥१७॥
यास तुका म्हणे नाही भक्ताविण । गरुडाचे चिंतन केले मनी ॥१८॥
४५५० पृ ७६१ (शासकीय), ३८५१ पृ ६७६ (शिरवळकर)
|