४५
अवचित त्यांनी देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥
आला घेऊनिया यमुने बाहेरी । पालवितो करी गडियांसी ॥२॥
गडियांसी म्हणे वैकुंठनायक । या रे सकळिक मजपाशी ॥३॥
मजपाशी तुम्हां भय काय करी । जवळी या दुरी जाऊ नका ॥४॥
कानी आइकिले गोविंदाचे बोल । म्हणती नवल चला पाहो ॥५॥
पाहो आले हरिजवळ सकळ । गोविंदे गोपाळ आळिंगिले ॥६॥
आल्या गाई वरी घालितील माना । वोरसले स्तना क्षीर लोटे ॥७॥
लोटती सकळे एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळली ॥८॥
कुर्वाळली आनंदे घेती चारा पाणी । तिही चक्रपाणि देखियेला ॥९॥
त्यांच पाशी होता परी केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥
याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसी कृष्णे काया दिव्य दिली॥११॥
दिले गोविंदे त्या पदा नाही नाश । तुका म्हणे आस निरसली ॥१२॥
४५५२ पृ ७६२ (शासकीय), ३८५३ पृ ६७७ (शिरवळकर)
|