४८
शुभ मात तिही आणिली गोपाळी । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषे मात ॥२॥
हरुषली माता केले निंबलोण । गोपाळा वरून कुरवंडी ॥३॥
गोपाळा भोवते मिळाले गोकुळ । अवघी सकळ लहान थोरे ॥४॥
थोर सुख जाले ते काळी आनंद । सांगती गोविंद वरी आला ॥५॥
आले वरी बैसोनिया नारायण । काळया नाथून वहन केले ॥६॥
नगराबाहेरी निघाले आनंदे । लावूनिया वाद्ये नाना घोष ॥७॥
नारायणा पुढे गोपाळ चालती । आनंदे नाचती गाती गीत ॥८॥
तव तो देखिला वैकुंठीचा पती । लोटांगणी जाती सकळ ही ॥९॥
सकळ ही एका भावे आलिंगिले । अवघिया जाले अवघे हरि ॥१०॥
हरि आलिंगने हरिरूप जाली । आप विसरली आपणास ॥११॥
सकळांसी सुख एक दिले देवे । मायबापा भावे लोकपाळा ॥१२॥
मायबाप देवा नाही लोकपाळ । सारिखी सकळ तुका म्हणे ॥१३॥
४५५५ पृ ७६३ (शासकीय), ३८५६ पृ ६७८ (शिरवळकर)
|