६२
म्हणविती भक्त हरीचे अंकित । करितो अनंत हित त्यांचे ॥१॥
त्यांसी राखे बळे आपुले जे दास । कळिकाळासि वास पाहो नेदी ॥२॥
पाउस न येता केली यांची थार । लागला तुषार येऊ मग ॥३॥
येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारी शिळाचिये ॥४॥
शिळांचिये धारी वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरे ॥५॥
एक सरे गिरि धरिला गोपाळी । होतो भाव बळी आम्ही ऐसे ॥६॥
ऐसे कळो आले देवाचिया चित्ता । म्हणे तुम्ही आता हात सोडा ॥७॥
हासती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥८॥
दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलिता ॥९॥
भार आम्हा वरी घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥१०॥
निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहो कैसा गिरी धरितोसि ॥११॥
सिणले हे होते ठायींच्या त्या भारे । लटिकेचि खरे मानुनिया
॥१२॥
यांणी अंत पाहो आदरिला याचा । तुका म्हणे वाचा वाचाळ ते ॥१३॥
४५६९ पृ ७६६ (शासकीय), ३८७० पृ ६८२ (शिरवळकर) |