७३
नाचता देखिली गाई वत्से जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥
लागला पाऊस शिळांचिये धारी । वाचली ही परी कैसी येथे ॥२॥
येथे आहे नारायण संदेह नाही । विघ्न केले ठायी निर्विघ्न ते
॥३॥
विचारिता उचलिला गोवर्धन । अवतार पूर्ण कळो आला ॥४॥
आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचे ॥५॥
त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा
ब्रम्हयासि ॥६॥
सीणता जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळा समागमे ॥७॥
समागमे गाई वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळिता अंगसंग ॥८॥
संग जाला मायबापां लोकपाळा । आळिंगिती गळा कंठाकंठ ॥९॥
करिते हे जाले स्तुती सकळीक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥
करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला ॥११॥
पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणे नादे ॥१२॥
नामाचे गजर गंधर्वा चीं गाणी । आनंद भुवनी न माये तो ॥१३॥
तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळी देवासी दोही ठायी ॥१४॥
दोही ठायी सुख दिले नारायणे । गेला दरुषणे वैरभाव ॥१५॥
भावना भेदाची जाय उठाउठी । तुका म्हणे भेटी गोविंदाचे ॥१६॥
४५८० पृ ७६९ (शासकीय), ३८८१ पृ ६८५ (शिरवळकर) |