Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

७८
अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥१॥
परपीडा करी दैत्य कंसराव । पुढे तो ही भाव आरंभिला ॥२॥
लाविले लाघव पाहोनिया संधी । सकळा ही वधी दुष्टजना ॥३॥
दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणि न साहती ॥४॥
न साहवे दुःख भक्‍तांचे या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥५॥
रूप हे चांगले रामकृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारिता ॥६॥
उच्चारिता नाम कंस वैरभावे । हरोनिया जीवे कृष्ण केला ॥७॥
कृष्णरूप त्यासी दिसे अवघे जन । पाहे तो आपण कृष्ण जाला ॥८॥
पाहिले दर्पणी आधील मुखासी । चतुर्भुज त्यासी तोचि जाला ॥९॥
जाली कृष्णरूप कन्या पुत्र भाज । तुका म्हणे राज्य सैन्य जन ॥१०॥
४५८४ पृ ७७० (शासकीय), ३८८६ पृ ६८६ (शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग