Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

९२
रचियेला गाव सागराचे पोटी । जडोनि गोमटी नानारत्‍ने ॥१॥
रत्‍न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥
कळा सकळ ही गोविंदाचे हाती । मंदिरे निगुती उभारिली ॥३॥
उभारिली दुर्गें दारवंठे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥
शोभले उत्तम गाव सागरात । सकळा सहित आले हरि ॥५॥
आला नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणी ॥६॥
निवडीना याति समानचि केली । टणक धाकुली नारायणे ॥७॥
नारायणे दिली अक्षई मंदिरे । अभंग साचारे सकळांसी ॥८॥
सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्‍त नारीनर ॥९॥
रचिले ते देवे न मोडे कवणा । बळियाचा राणा नारायण ॥१०॥
बळबुध्दीनीति देवाच सारिखी । तुका म्हणे मुखी गाती ओव्या ॥११॥
४५९८ पृ ७७३ (शासकीय), ३९०० पृ ६९० (शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग