Font Problem

       
 
 
 

लघु कथा

 
 

         मार्क्सवादी दिनकर केशव बेडेकर(१९१०-१९७३) हे संस्कृतीचे समग्रपणे विचार करणारे अभ्यासक होते. त्यांचे असे निरीक्षण आहे की मराठीत पहिली लघुकथा, नव्हे लघुत्तम कथा तुकोबांनी अभंग छंदात लिहिली. तुकोबा अशी कथा का लिहू शकले याचे मार्मिक विश्‍लेषणही केले. बेडेकर म्हणतात,“मला तुकारामांबद्दल नेहमीच वाटत आले आहे की हा साधू खरा विरक्‍त नव्हताच. त्यांच्यात एक जिवंतपणा, आशावाद व रंग आहे. ‘असार जीवित केवळ माया’ हे रडगाणे तुकारामांनी कधी गायले का ? तुकोबा म्हणतात - ‘तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी॥’. थोडक्‍यात म्हणजे तुकारामांचे प्रेम त्यांच्या कानड्यावर असेल, नव्हे होतेच; पण हे मोठे कसदार प्रेम होते. त्यात ही मस्तपणा होता. व ज्याला आपण आधुनिक मराठीत ‘जीवनावरचे प्रेम’ म्हणतो, तोच रंगेलपणा तुकारामांच्या वाणीत व वागण्यात होता. निदान असावा, असा माझा अंदाज आहे. नाहीतर अशी सुंदर व डौलदार लघुत्तम कथा इतक्याच मोजक्‍यात शब्दांत त्यांना कशी लिहिता आली असती ? या कथेत काय नाही ? रस जवळ जवळ सगळेच आहेत. पेचप्रसंग आहे. खलपुरुष आहे. नायकनायिका तर आहेतच आणि पेचप्रसंगाची उकल अशी अनपेक्षितपणाचा टोला हाणणारी आहे की ओ. हेन्‍रीच्या आधी शेकडो वर्षे होऊन गेलेल्या या कथाकाराने, त्याच्या तंत्राने जणू मात केली आहे.”
         बेडेकरांनी कथेच्या विश्‍लेषणाबरोबर व मूल्यमापनाबरोबर कथेतून तुकोबांचे ‘खंबीर व प्रेमळ व्यक्‍तित्व’ आपल्याला दिसत असल्याचे नमूद केले आहे.

सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥१॥
व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥२॥
वृक्षाचिया माथा सोडिला ससाना । धनुष्यासी बाणा लावियेले ॥३॥
तये काळी तुज पक्षी आठविती । धावे गा श्रीपती मायबापा ॥४॥
उडोनिया जाता ससाना मारील । बैसता विंधील पारधी तो ॥५॥
ऐकोनिया धावा तया पक्षियांचा । धरिला सर्पाचा वेश वेगी ॥६॥
डंखोनि पारधी भुमीसी पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥७॥
ऐसा तू कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥८॥
तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥९॥
६०७ पृ १०९ ( शासकीय )

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग