क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥१॥
आता झडझडा चाले । देई उचलू पाउले ॥धृ॥
सांडी हंसगती । बहु उत्कंठा हे चित्ती॥२॥
आता झडझडा चाले । देई उचलू पाउले ॥धृ॥
तुका म्हणे आई । श्रीरंगे विठाबाई ॥३॥
आता झडझडा चाले । देई उचलू पाउले ॥धृ॥
***
आणिता त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥
नाकेविण मोती । उभ्या बाजारे फजिती ॥२॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥
हुकुमदाज तुका । येथे कोणी फुंदो नका ॥३॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥
***
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ?
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ?
मर्कटे अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तू नेणे ?
जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिही
लोकी ? |