Font Problem

       
 
 
 

पक्षी

 
 

मयूर, मोर

 

न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरेना ॥धृ॥

सूर्य नाही जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हून ॥२॥
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरेना ॥धृ॥

तुका म्हणे मेघ नाचवी मयूरे । लपविता खरे येत नाही ॥३॥
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरेना ॥धृ॥

छायाचित्र : विलास आंब्रे


पैल सावळे तेज पुंजाळ कैसे । सिरी तुर्बिली साजिरी मोरवीसे ।
हरे त्यासि रे देखता ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥१॥

जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा ।
शोभे मध्यभागी कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठी ॥२॥

असे यादवा श्रेष्ठ हा चक्रपाणि । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही ।
महाकाळ हे कापती दैत्य ज्यासी । पाहा सांवळे रूप हे पापनासी ॥३॥

कसी पाउले साजिरी कुंकुमाची । कसी वीट हे लाधली दैवाची ।
जया चिंतिता अग्नि हा शांति नीवे। धरा मानसी आपला देहभाव ॥४॥

मुनी देखता मूख हे चित्त ध्याय। देह मांडला भाव हा बापमाय ।
तुक्या लागले मानसी देवपीसे । चित्त चोरटे सावळे रूप कैसे ॥५॥

 

***

 

भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती ।
पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ॥१॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा ॥धृ॥

काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती ।
कोटि ब्रम्हहत्या मुख पाहता जाती॥२॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा ॥धृ॥

राही रखुमाई दोही दो बाही ।
मयूर पिच्छचामरे ढाळिति ठायी ठायी ॥३॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा ॥धृ॥

तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनति शोभा ।
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥४॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा ॥धृ॥
 

छायाचित्र - प्रदीप हिरुरकर
 

 

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग

 
 
 

सूची