Font Problem

     
 

 

 

‘तुकाराम गाथा’ ( निवडक अभंग )

 

भालचंद्र नेमाडे - (जन्म: २७ मे, १९३८)
मराठवाडा विद्यापीठात  इंग्रजीचे प्राध्यापक आणि गोवा विद्यापीठात इंग्रजी

विभागप्रमुख . त्यानंतर मुंबई विद्यापीठात गुरुदेव रविन्द्रनाथ ठाकुर तौलानिक साहित्य अभ्यास केन्द्राचे प्रमुख .‘कोसला’, ‘बिढार’,‘जरीला’, ‘हूल’ आणि ‘झूल’ 

 

या कादंबर्‍या.‘मेलडी’ हा काव्यसंग्रह. ‘टीका स्वयंवर’ - या समिक्षा ग्रंथास १९९१ साहित्य अकादमी पुरस्कार.

 

प्रस्तावना

 


         प्रस्तुत ग्रंथात तुकारामाच्या सर्वोत्कृष्ट अशा पाचशे अभंगांचे संकलन केले असून केवळ कविता म्हणून श्रेष्ठ ठरतील, अशा अभंगांची निवड केली आहे. वस्तुत: तुकारामाच्या कित्येक अभंगांची एकदोन चरणे म्हणीसारखी वापरली जातात, कित्येक अभंगातील एखादी ओवी मानवी अस्तित्वाचे मनोहर आकलन दर्शवते आणि शेकडो अभंगातील एकाददुस‍र्‍या ओव्या मोठे वैश्विक सत्य सांगून जातात.परंतु एकूण सबंध रचनाच कविता म्हणून अंतर्लयीने भारलेला श्रेष्ठ भाषिक आविष्कार ठरेल, असे काही निकष लावून निवड्लेले अभंग येथे एकत्र केले आहेत.मराठी भाषेचा सर्वोत्तम अर्थविलास तुकारामाच्या या अभंगामध्ये सापडतो.
         तुकारामाचे अभंग आज आपण बहुधा लिखित किंवा मुद्रित संहितेच्या रूपात ग्रहण करतो;परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की हे अभंग मुळात मौखिक स्वरूपात निर्माण झाले. त्यामुळे त्यांची लय कानाने ग्रहण करणे, टाळमृदंगाच्या तालावर अनुभवणे यात खरे अभंगाचे सार्थक आहे. तुकारामाच्या भाषेचा गोडवा श्रवणातून खरा प्रतीत होतो.न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तुकारामाचा अभंग म्हणतांना सद्‍गदित होत आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत हे जसे सर्वश्रुत आहे, तसे दिवसभराच्या काबाडकष्टानंतर तुकारामाचे अभंग म्हणण्यात तल्लीन होणारी खेड्यापाड्यातली अगणित निरक्षर माणसे आजही सर्वत्र आढळतात.
         अभंग ही प्राचीन महाराष्ट्री भाषेपासून रूढ असलेल्या ओवीची तेराव्या शतकापासून संतांनी रूढ केलेली रचना असून तुकारामाने अभंगाची शैली पूर्णतेला नेल्याचे दिसते.या छंदात कोणताही स्वर कितीही दीर्घ किंवा ‍‍र्‍हस्व उच्चारता येण्याची सोय असते. वर्णांची किंवा अक्षरांची संख्याही काटेकोरपणे पाळली जात नाही. तुकारामाचे बहुसंख्य अभंग साडेतीन चरणी आहेत, ह्यांत पहिल्या तिन्ही चरणांची लांबी गेयतेनुसार कमीज्यास्त करता येते. शेवटचा म्हणजे चौथा चरण बहुधा आखूड असल्याने अभंगातील ओवीच्या अर्थाचा एक भाग संपल्याची आवर्तने त्यामुळे स्पष्ट होतात. तुकारामाच्या अभंगाची रचना वेग्वेगळ्या गेय प्रकारांनी समृद्ध आहे. त्यात लोकगीतांचे रूपबंधही वापरलेले आहेत. छंदांचे अनेक प्रयोग असून उपमारूपकांचे अपूर्व विश्व ओळीओळीतून प्रकट होते.
         तुकारामाच्या अभंगांचे वर्गीकरण करणे अशक्य असले तरी स्थूलमानाने जे सूत्र अभंगात अधिक प्रभावीपणे व्यक्त झालेले दिसते, त्या सूत्रानुसार त्या त्या अभंगाची वर्गवारी येथे केली आहे.
         तुकाराम जसा भक्तिमार्गातला थोर पथदर्शक आहे आणि संत म्हणून त्याचे कर्तृत्व दैदीप्यमान आहे, तसाच तो एक असामान्य कवी म्हणूनही अजरामर झाला आहे.गेली साडेतीनशे वर्षे मराठी भाषिकांच्या धार्मिक आणि सामाजिक विचारांवर तुकारामाचा विलक्षण प्रभाव पडला आहे.दूर दूर पसरलेल्या खेडयापाडयांतील घराघरांत तुकारामाचा अभंग ऐकू येतो,इतका त्याने ज्याला त्याला कवितेचा लळा लावला आहे. प्रत्येक पिढीने त्याचे अभंग सद्‍गदित होऊन म्हटले, पोथ्यांच्या हातोहात प्रती होत राहिल्या. सर्व थरांत ते उस्फूर्तपणे वापरले जातात. हा प्रभाव केवळ धार्मिक व निरक्षर भाविकांपुरताच मर्यादित राहिला नाही. गेली साडेतीनशे वर्षे विकसित होत आलेल्या सर्व प्रकारच्या लिखित गद्य व पद्य वाङ्‍मयावरही त्याची छाया आहे. असे भाग्य त्या त्या भाषेतल्या एकाद्‍दुस‍र्या कवीलाच प्राप्त होते. कबीर, शंकरदेव, तुलसीदास, वेमन्ना, शाह लतीफ कींवा गालिब हे आपापल्या भाषांशी चिरंतन जोडले गेले आहेत, त्याचप्रमाणे तुकाराम मराठी मनाचा चिरंतन आविष्कार आहे.
         हे अभंग सर्वसामान्य लोक नैतिक आधार म्हणून नेहमीच्या व्यवहारात वापरत असतात. विद्वज्जन आपल्या विधानांना पुष्टी देण्यासाठी तुकारामाच्या अभंगातल्या मार्मिक ओळी उद्‍धृत करीत असतात. वक्ते आपल्या व्याख्यानाचा परिणाम वाढवण्यासाठी तुकारामाच्या ओळी म्हणून दाखवतात. राजकारणी नेते जनतेला वश करण्यासाठी तर समाजसुधारक अंधश्रद्धा बाळगणा‍‍र्‍यांशी त्यांच्या बुद्धीचा पालट करण्यासाठी तुकारामाची वचने पेरत बोलत असतात. तुकारामाच्या अभंगातील चरण, तुकडे किंवा वाक्प्रयोग मराठीतल्या अनेक कादंबर्‍यांची , नाटकांची, निबंधांची, अग्रलेखांची आणि चित्रपटांची शीर्षके म्हणून गाजली आहेत. तुकाराम झाला नसता तर मराठी भाषा खरोखरच दरिद्री राहीली असती. सर्व प्रकारच्या व्यक्तींना आपल्या नानाविध भावभावना यथायोग्य तर्‍हेने व्यक्त करता येतील, अशी सोय तुकारामाच्या अभंगांनी करून ठेवली आहे.
         तुकारामाच्या या प्रचंड लोकप्रियतेचे रहस्य त्याच्या महान व्यक्तिमत्वाबरोबरच त्याने वापरलेली सर्वसामान्यांची दैनंदिन व्यवहारातली बोलीभाषा हे आहे. काळावर विजय मिळवल्याचे अद्‍भुत सत्य तो

“तुका म्हणे काळे काळे केले तोंड”

         अशा साध्या शब्दांत सांगतो. कुठल्याही चार जणांसारखे पारंपारिक आयुष्य घालवलेला, देहूसारख्या चिमुकल्या खेडयात सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत फक्त बेचाळीस वर्षे जगलेला हा शूद्र कुणबी केवळ आपल्या आंतरिक प्रतिभेवर निष्ठा ठेवत कठोर आत्मपरिक्षण करत जाणिवांचे स्वत:चे विश्व निर्मित गेला. तुकाराम महाकवी झाला तो त्याच्या खर्‍या मानवी आस्थेमुळे, सर्व मानवजातीच्या करुणेमुळे. आयुष्यातल्या प्रत्येक संकटावर त्याने केवळ आंतरिक सामर्थ्याने मात केलेली दिसते. खरे तर त्याला ना जातीचे पाठबळ, ना गुरूचा आधार, ना कोणी मार्गदर्शक, ना काही अधिकार; परंतु सशक्त बीजापासून संपूर्ण पानांफुलांफळांसकट फोफावणार्‍या प्रचंड वृक्षासारखे त्याचे सर्जनशील व्यक्तिमत्व प्रत्येक विरोधी गोष्टीचा आपल्या वाढीसाठी उपयोग करून घेणारे ठरले.

  ‘तुकाराम गाथा’ (निवडक अभंग)
संपादक : भालचंद्र नेमाडे
साहित्य अकादमी प्रकाशन
(प्र.आवृत्ती:२००४)
(प्र.पुनर्मुदण:२००६)
(द्वितीय पुनर्मुद्रण:२००७)
मूल्य : ११० रुपये
 
 

प्रस्तावना भाग - २