Font Problem

     
 

 

 

तुकाराम गाथा (निवडक अभंग)

 
 

संपादक : भालचंद्र नेमाडे

 

 

 

प्रस्तावना भाग - २

 

 

        तुकारामाच्या संपूर्ण आयुष्यभर (१६०९-५०) महाराष्ट्रातली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत उलथापालथीची होती. त्याच्या उत्तर आयुष्यात शिवाजीने (१६३०-८०) मराठी साम्राज्याचा पाया घातला आणि नव्या युगाची सुरुवात केली. महाराष्ट्रात तेराव्या शतकातल्या यादवांच्या काळापासून पोसले गेलेले कर्मठ वैदिक ब्राह्मणी वर्णवर्चस्व नष्ट करणा‌र्‍या अनेक चळवळी, संप्रदाय आणि पंथ सतत कार्यरत होते. या बंडखोर समतावादी विचारप्रवाहांमध्ये वारकरी संप्रदायाप्रमाणेच नाथ, महानुभाव आणि मुसलमानी सूफी संतांचे अनेक पंथ प्रमुख होते. मोगलांच्या उत्तरेकडील स्वार्‍यांनी आणि बहामनी राज्यांच्या परस्परांतील लढायांनी तीनशे वर्षे सबंध दख्खन म्हणजे रणभूमी करून टाकली होती. तुकाराम जन्मला त्या सुमारास मोगलांनी उत्तरेकडे तापीपर्यंत आपले साम्राज्य वाढवत आणले होते आणि दक्षीणेतील आदिलशाही, निजामशाही व कुतुबशाही यांच्याशी सतत युद्धे होतच असत.या वर्षानुवर्षांच्या धुमश्चक्रीत तुकारामाचा भीमा आणि नीरा नद्यांमधला भूप्रदेश नेहमीच भरडला जात होता. या प्रदेशातली आर्थिक घडी बिघडलेली असे. एरवी शेती करून सुखाने जगू पाहणारा शेतकरी समाज अशा परिस्थितीने शिपाईगिरीकडे वळू लागला. शूर वृत्तीचा पाइक होणे तुकारामानेही गौरवले आहे.

        मुसलमानी राजे सत्तेवर असले तरी प्रत्यक्षात देशावरचे हिंदू मराठी सरदार हीच या राज्यांची खरी शक्ती होती. त्यामुळे दक्षिणेत आणि विशेषत: महाराष्ट्रात धार्मिक तेढ नव्हती. यवनांपेक्षा सनातनी ब्राह्मणांचा तुकारामाला जाच झाल्याचे त्याच्या अभंगावरून दिसते. तुकारामाच्या गुरुपरंपरेतील बाबाजी दीक्षित, त्यांचे गुरू केशव चैतन्य आणि तुकारामाचे आजेगुरू राघव चैतन्य या सर्वांना हिंदू , मुसलमान , जैन , लिंगायत; महानूभाव, वारकरी, ब्राह्मण व ब्राह्मणेतर; मराठी , तेलुगु व कानडी असे सर्व प्रकारचे लोक भजत. एवढेच नव्हे तर त्यांची मुसलमानी नावेही प्रसिद्ध असून ते मुसलमान भक्तांमध्ये मुसलमानी सूफी पंथाचे अवलिया समजले जातात. वर्णातीत, धर्मातीत व जातींपलीकडचे हे वातावरण दख्खनमध्ये विशेषकरून धार्मिक सहिष्णुता नांदत होती, हे दाखवते. तुकारामाच्या जगाकडे पाहण्याच्या दॄष्टीत याही उदार, सहिष्णु प्रवॄत्तींचा वाटा आहे, हे विसरता कामा नये.

        तुकारामाच्या अभंगातील बराच भाग जातीयतेविरुद्ध आणि संकुचित धार्मिकतेविरुद्ध शस्त्र उगारणारा आहे. त्या काळातल्या अत्यंत उदार अशा बंडखोर परंपरांशी तुकारामाने नाते जोडल्याने मराठीत नव्या मूल्यांचा पुरस्कार त्याने प्राण पणाला लावून केला आणि तो शूद्र असूनही सर्वांचा ’सदगुरू’ हे स्थान मिळवता झाला. तुकारामाचे हे उदाहरण त्याच्या श्रेष्ठतेबरोबर आपल्या उदार परंपरेची महती सांगणारे आहे. इतका मोठा कवी नंतर मराठीत झाला नाही, त्यामुळे धार्मिक सहिष्णुतेलाही विसाव्या शतकापर्यंत अवकळा आल्याचे दिसते. वारकरी पंथावरही प्रतिगामी वॄत्तींचा पगडा वाढला. या पंथाची पायाभूत तत्त्वे लुप्‍त झाली.

        वारकरी संप्रदायाला महाराष्ट्रात तेराव्या शतकापासून अत्यंत उज्ज्व्ल असा इतिहास आहे. नामदेवाने लोकप्रिय केलेल्या या संप्रदायाचे दैवत विठ्ठल असून हा संप्रदाय शैव आणि वैष्णव पंथांचा समन्वय म्हणून सांस्कॄतिक इतिहासात सुप्रसिद्ध आहे. या संप्रदायाला एक असा प्रेषित नाही, एक अशी विशिष्ट लिखित संहिता नाही, एकसत्ताक स्वरूप नाही आणि कोणत्याही एका वर्णाचे, वर्गाचे, अथवा जातीचे यावर वर्चस्व नाही. विठ्ठलाचा उगमसुद्धा अज्ञात असून पंढरपूरला चंद्रभागेतीरी कर कटावर ठेवून उभी असलेली काळ्या पाषाणाची ही मूर्ती शिल्पलेचा अप्रतीम आविष्कार आहे. या पंथाने काळानुसार विकेंद्रीकरणाच्या तत्त्वाने पंढरपूरशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, आणि तेलंगण या प्रदेशात अन्य बर्‍याच ठिकाणी आपली तीर्थक्षेत्रे वाढवली. आळंदी, देहू, पैठण, मुक्ताई या ठिकाणीसुद्धा वार्‍या जातात.

        या संप्रदायाचे लोक प्राय: गरीब शेतकरी व अधिकारहीन वर्गातले असल्याने गरीब अर्थव्यवस्थेला पोषक अशीच साधने धर्मव्यवहारामध्ये त्यांनी ग्राह्य मानली: वारकरी होण्यासाठी भक्तांनी साधी बिनखर्चिक अशी तत्वे पाळायची असतात. वर्षातून एक वेळ पंढरपूरची किंवा जवळच्या तीर्थक्षेत्राची पायी वारी, रोज आंघोळ करून घरातल्या लहानशा मूर्तीची अथवा खेड्‍यातल्या देवळातल्या मूर्तीची पूजा करून कपाळी टिळा लावणे, गळ्यात साधी तुळशीमाळ फक्त घालणे, पूर्ण शाकाहारी असणे, मद्यपान-धूम्रपान वर्ज्य, एकच देव विठ्ठल मानणे, कीर्तन-भजन हा नवविधा भक्तीपैकी सर्वात सोपा मार्ग, जातींची उच्चनीचता न मानणे, एकादशीचा उपवास आणि बाह्य उपचारांपेक्षा आंतरिक शुद्धतेवर भर--अशी साधी तत्त्वे जोपासून हा पंथ महाराष्ट्रातला सगळ्यात अधिक सर्जनशील पंथ ठरला. तुकारामाचे एकूण जीवन आणि तत्वज्ञान या पंथाचे आदर्श मानले गेले आहेत.
 

 
 

प्रस्तावना भाग - ३