गोणी आली घरा (94) येथपासून माउलीची चाली लेंकराची ओढी (102)
असे हे 7/8 अभंग तुकोबारायांनीं पाखरें राखण्याची नोकरी पत्करली. ती नोकरी नीट झाली
नाहीं. तेव्हां त्या शेतक-यास-पंचाईत होऊन नवीन करार लिहून दिला व अखेर धान्य
निघाल्यावर तें धान्य बरें च वाढलेलें आढळलें, तेव्हां दरसालप्रमाणें होईल येवढें
धान्य घेऊन बाकीचें धान्य तुकोबांच्या घरीं आलें-तेव्हां तुकोबा तें धान्य घेईनात.
तुकोबांचें म्हणणें कीं मला ज्या कामावर नेमलें तें काम माझे हातून नीट झालें
नाहीं, तेव्हां तें धान्य मला घेतांच येत नाहीं. माझ्या वाटयाचा यांतील एक हि कण
नाहीं. हें म्हणणें जिजाबाईंस कसें काय पटणार होतें ! तेव्हां भरी लोकांची पाटोरी ।
हा त्यांच्या रागाचा पहिला फणकारा ! व असा तोंडाचा पट्टा सुरु झाल्यावर पिसाळलेल्या
कुत्र्याप्रमाणें-मेला चोरटा-खाणोरी (ऐत्ता खाणारा) अशी पुष्पांजली त्यांनीं वाहिली
व तुकोबा गोणी-(एक वा अनेक) परत करीत असावेत. तेव्हां त्यांच्या हातास जिजाबाई
झोंबल्या असाव्यात हा एका दृष्टीनें अति प्रसंगच होतां-तेव्हां रागावून
तुकोबांनीं-मेला या स्वतः मिळालेल्या विशेषणाचा उपयोग करून जिजाबाईंस म्हटलें
असावें कीं-अग रांडे (विधवा) (तेव्हां तुकोबा मेल्यावरची स्थिति,) संचिताच्या साठा
खोटा असतो. हा साठा कांहीं उपयोगी पडत नाहीं. तो दुष्काळ आला होता, तेव्हां आपण
कांही हि न करतांना सांठा गेलेला तूं पाहिलास ना ? तेव्हां आपल्या तहानभुकेची काळजी
ज्यानें आपणास जन्मास घातलें त्याला आहेच प्रत्येक तहानभुकेला त्याची आठवण व्हावी.
त्याची आठवण करावी-जरूरीपुरतें तो देईल. तें घ्यावें खावें. साठा करून उपयोगी पडत
नाहीं. ही ठेंच एकवार लागल्यावर तीच ती गोष्ट पुनः काय म्हणून करावी ? बरे
खाण्यापिण्याची निश्चिती असली कीं श्रीपतीची आठवण कोठें होते ? तेव्हां मला सकळ
वैभव हें विटाळ आहे असें वाटतें. त्यावर जिजाबाईंचे उत्तर-रोज गांवें काय, घेईल तें
तें घ्यावें काय, हा वांझ आहे. हें जे तुमचे भोवती लोक आहेत ते तरी काय करणार आहेत
? यावर तुकोबांनीं आपलें स्वतःचे वैष्णवांबद्दलचें मत असें सांगितलें कीं साखर
म्हटल्यानें-जशी गोडी आठवते तसें वैष्णव म्हटल्यानें-ज्यांनीं मोक्ष गांठीं बांधून
भजनीं सोस धरला आहे अशा माणसांच्या सहवासांत भोगलेलें प्रेमसुख मला आठवते व ह्या
विठाईमावलीचें चित्त माझ्या खाण्यापिण्याची चिंता वाहून सदा माझ्याबद्दलच्या
मोहानें मोहलेलें आहेच - ती आपल्या प्रेमाचा वोरस देऊन आपले दास संभाळते. ही
अनुभवाची सिध्द गोष्ट तुकोबा सांगत आहेत व ती जिजाबाई पटवून घेत नाहींत मानीत
नाहींत. अशी ही परिस्थिति आहे. 323-26 तुकोबारायांकडे भजनास व कीर्तनास जीं मंडळी
येत त्यांचा हि जिजाबाईस मोठा त्वेष वाटे, आपल्या मालकांस हे लोक भजन-कीर्तनांत
गुंतवून बिघडवितात अशी त्यांची समजूत. तेव्हां तुकोबांनीं त्यांची समजूत घालण्याचा
प्रयत्न केलेला दिसत आहे. ते जिजाबाईस म्हणाले कीं आपण मोठया अगत्यानें आमचे घरीं
बोलाविलें तरी आपल्या घरीं यावयास ज्यांना सवड नाहीं-असे लोक केवळ माझ्यावर प्रीति
म्हणून आपल्याकडे येतात व अशा रीतीनें भजन-कीर्तनानें सर्व ब्रह्मांड माझें सोयरें
झालें आहें. ते लोक दुसरें कांहीं तुझ्याजवळ मागत नाहींत. फक्त एका सुखाच्या,
आदराच्या, गोड शब्दाची अपेक्षा करतात - त्यांच्याशीं कोमल शब्दानें बोलण्यांत
तुझ्या पदराला काय खार लागणार आहे ? कोवळया उत्तरें काय वेचें ? काय ज्याचा त्याला
धंदा नाहीं ! ते आमच्या घरीं कशासाठीं येतात; विचार करून पहा तर खरें ! परंतु या
रांडेला तेवढें हि माझें भूषण सोसत नाहीं. ती श्वान-कुतरें-पिसाळलेलें कुत्रें
पाठीस लागावें डसावें तशी पाठीस लागते. तेव्हां देवा मला खरंच तुमच्या अंगांत लपवा.
आणि हिच्या हातून सोडवा. उडी घालून मला हिच्या हातून सोडवा. मी या लीगाडांत सापडलों
आहे. माझें माझें मन चरफडतें पण कांहीं इलाज चालत नाहीं. गृहकलहाचें तिसरें उदाहरण.
452-66 एकदां तुकोबा कीर्तन करीत होते तेव्हां श्रीविठुराया हा प्रत्येक ठिकाणीं
जीवमात्रास केवढया अनन्यत्वानें सरसा सरसा असतो याचें वर्णन करूं लागले. त्यांनीं
देव बासर (अमर्यादित) आहे, खोळंबा (अडकलेला) आहे, झळंबा (लोबंकळत) आहे. थोडया
भक्तीसाठीं फार भाग्य देतो, चांगला आहे, भाजीच्या एका देठासाठीं उडी घालणारा बराडी
आहे, देव भ्याड आहे, बळीच्या दारांत उभा आहे, भावीक आहे, दासांचा सेवक होऊन राहतो,
व तुम्ही म्हणाल तसा होतो. देव अणुपेक्षांहि लहान आहे, देव भला आहे, देव बळी आहे.
त्यास भूमंडळांत जोडा नाहीं. तेव्हां आपण चला देव पाहूं-त्यासी जीवभाव सांगूं, तो
आपल्या मनींची गोष्ट ओळखून पुरवील. तो आपल्या सर्वांचा आहे, आंत बाहेर भरलेला आहे,
देव गोड आहे. तो आपले कोड पुरवील, तो कळीकाळास काखेंत मारून नेतो, असा त्या
देवाच्याहि देवानें तुक्याचा सांभाळ केला आहे तेव्हां आपण त्याच्या गांवास जाऊं तो
आपणास विसावा देईल, तो आपली तहानभूक निवारील. तो सुखाचा सागर आहे, आपण त्याच्या
पायापाशी जडून राहूं-आपण या देवाचीं लडीवाळ बाळें आहोंत. जेथें अशा भावनेचे भक्त
असतात तेथें प्रेम वस्तीस येतें, तें आपण होऊन या वैष्णवांचें घर शोधीत येतें. असें
तुकोबांनीं अति रसभरीत कीर्तन केलें-तेव्हां जिजाबाईंनीं-उलट विचारिलें कीं-या
तुमच्या देवानें माझें चांगलें तें काय केलें ? त्यानें माझ्या नव-याचें रूप घेऊन
मागील जन्मीचें वैर साधलें-मी सर्व काळ दुःख तरी किती सोसूं ? प्रत्येकापुढें तोंड
तरी किती वासूं ? या विठ्ठलानें माझ्या संवसारांत धड असें काय केलें ? सर्व सुखें
घरीं चालून येतात-पण माझी फजिती कांहीं चुकत नाहीं-संवसारांत मी आपदा तरी किती
काढूं ? मुलें सारखीं तोडीत असतात ? घरांत कांहीं राहून देत नाहींत-घर सारवीन
म्हणतें-तर सारविण्यास शेण हवें. तेवढें एकहि ढोर घरांत नाहीं-या फणका-यांत
जिजाबाईंनीं विठ्ठलास शिवी हि दिली. पण त्यांत सर्व सुखें घरा चालोनियां येती । अशी
कबुली हि दिली-तुकोबांना देवास शिवी दिली त्याचा राग येणें साहजिकच होतें. तसा राग
हि आला व पुढें बायकोची कींव हि आली-तेव्हां म्हणाले-तुका म्हणे येती बाइले आसडें
फुंदे कांहीं हासे । असें एका अभंगांत म्हणाले व दुस-या अभंगांत म्हणाले-कीं-सर्व
सुखें घरा चालोनीया येति याचें वर्म काय तें जर ही लक्ष्यांत घेत नाहीं तर हिला काय
सांगावें ? हीं सर्व सुखें घरां चालून कां येतात याचा तर हिनें थोडा विचार करावा !
(463)
॥ तुका म्हणे रांड न करितां विचार । वाहोनीया भार कुंथे माथा ॥
रांड या शब्दाचा सध्यां जो अर्थ प्रचलीत आहे तो तुकोबांचे वेळीं नव्हता. सध्यां हि
खेडयांतून आई अविवाहित मुलीला रागानें किंवा लोभानें हि रांडे म्हणून हाक मारतांना
किंवा उल्लेख करतांना ऐकूं येते.
मी हिला सांगतों कीं हा भार माझा आहे असें म्हणून तूं डोक्यावर घेऊं नको, तो ज्याचा
आहे त्याचा तो घेईल, पण हिला हें पटत नाहीं, विचार करवत नाहीं यास मी काय करूं ?
तेव्हां विचार काय करावयाचा हें पुढील अभंगांत सांगताहेत. असा हा अभंग दुस-या
कोणत्या हि गाथ्यांत मज चि भोवता केला यांनें जोग । या अभंगानंतर आलेला नाहीं. अशी
या वहीची अपूर्वता आहे. तुकोबा विचार काय करायचा ते संदिग्धपणें सांगताहेत कीं:-
सर्व सुखें घरा चालून कां येतात याचा थोडा विचार कर नां !
(464) ॥ देव सखा तरी । जग अवघे कृपा करी ॥
असा अनुभव असतांना जीवानीं कासावीशी कां करावी ! प्रल्हादासी अग्नि बघूं शकला
नाहीं. याला कारण त्याला देवाची जतन होती हें ना ? मग तो आपली जतन करणार नाहीं असें
कसें होईल ! तेव्हां तें प्रल्हादाचें चरित्र आठवून, व आपणा स्वतःस देवानें कसें
सहाय्य केलें तें आठवून म्हणतात कीं
(465)॥ वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ।
॥ विश्वासीया घडे लाभ । देईल तरी पद्मनाभ ॥
॥ भाव शुध्द तरी । सांगितले काम करी
॥ तुका म्हणे देव । भोळा-तरी नागवी संदेह ॥
या पुढचा विचार तुकोबा सांगतात. सर्व सुखें घरा चालोनीयां येती-ती आपण संचय करून
ठेवावा म्हणून नाहीं, तर-माणूस भुकेला असला तर त्याची जात गोत हें न विचारतां-त्यास
आपण अन्न द्यावें. व्याजीं पैसे द्यावयाचे असतील किंवा मुलगी द्यावयाची असेल तर
त्याचें कुळ कोणतें त्यांचा धंदा काय याची चवकशी करावी-तेव्हां केव्हां कसें
वागावें याचें वर्म कळणें हा खरा धर्म आहे. कांहीं पुण्य गांठीं असेल तर च उचीत काय
तें गाठीं पडेल. असा हा गृहकलह तुकोबांनीं कीर्तन करून गोड करून घेतला. जी जी
वृत्ति जशी उठेल-तशी ती देवास नेऊन भिडवावयाची हा तुकोबांचा प्रघात. देवाच्या
वाटयास शिवी आली-ती हि त्यास समर्पण केली व आपण कोणता विचार करतो कसा विचार करतो
हें हि देवास सांगितलें. तुकोबारायांचें देशाउरस्थित्यंतर झालें होतें-जिजाबाईचें
झालें नव्हतें. संतांचे ते आप्त नव्हती संत । तुकोबांनीं जेव्हां जेव्हां वेळ येई
तेव्हां तेव्हां वर्माची गोष्ट जिजाबाईस आपल्या बरोबर मार्ग दाखवून उध्दरण्याचा
शिकस्त प्रयत्न केला. तेथें तुकोबांनीं आपलें मन उघडें करून कोणता हि आडपडदा न
ठेवतां आपण स्वतः कोणत्या पदावर आहोंत हें स्पष्ट केलें. सत्य देवें माझा केला
अंगीकार । असें सांगितलें. या अकरा अभंगांत तुकोबांनीं आपल्या वक्तृत्वाची शिकस्त
केली; त्या वक्तृत्वाचा परिणाम हि कांहीं वेळ झाला असें महिपतीबोवांनीं म्हटलें
आहे. परंतु तो टिकला नाहीं. व तुकोबारायांच्या पाठचा गृहकलह निर्याणापर्यंत सुटला
नाहीं. हें असें थोडयाफार प्रमाणानें असावयाचेंच. दोन व्यक्तींच्या दृष्टींतील अंतर
हें कांहीं सांगून शिकवून नाहींसें होत नाहीं. ही गोष्ट विश्वासानें
साधते-शुध्दभावानें होते. एरव्हीं संदेह आला कीं तो नागवणूक करतो. जेथें देवाच्या
घरीं शुध्दभावाचें सांकडें-तेथें इतरांची काय कथा ? |