|| तुकाराम ||
तुकोबांचे हात लिहिताती जे जे । ते ते सहजे पांडुरंग ॥
बहेणि म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ॥
बाळक्रीडा अभंग
१
देवा आदि देवा जगत्रया जीवा । परियेसी केशवा विनंती माझी ॥१॥
माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम काही कळा ॥२॥
कळा तुजपाशी आमुचे जीवन । उचित करून देई आम्हा ॥३॥
आम्हा शरणागता तुझा चि आधार। तू तव सागर कृपासिंधु ॥४॥
सिंधु पायावाट होय तुझ्या नामे । जाळी महाकर्मे दुस्तरे ती ॥५॥
ती फळे उत्तम तुझा निजध्यास । नाही गर्भवास सेविलिया ॥६॥
सेविलिया राम कृष्ण नारायण । नाही त्या बंधन संसाराचे ॥७॥
संसार ते काय तृणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रे ॥८॥
क्षणमात्रे जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥
करी ब्रिदे साच आपली आपण । पतितपावन दिनानाथ ॥१०॥
नाथ अनाथाचा पति गोपिकाचा । पुरवी चित्तीचा मनोरथ ॥११॥
चित्ती जे धरावे तुका म्हणे दासी । पुरविता होसी मनोरथ ॥१२॥
४५०८ पृ ७४४(शासकीय), ३८०९ पृ ६५७(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
२
मनोरथ जैसे गोकुळीच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥
ऋण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥
सीण जाला वसुदेव देवकीस । वधी बाळे कंस दुराचारी ॥३॥
दुराचारियासी नाही भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥
पुण्यकाळ त्यांचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥
गर्भासी तयांच्या आला नारायण । तुटले बंधन आपेआप ॥६॥
आपेआप बेडया तुटल्या शृंखळा । बंदाच्या अर्गळा किलिया कोंडे ॥७॥
कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष न लगता ॥८॥
न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरी ॥९॥
नंदाघरी जाता येता वसुदेवा । नाही जाला गोवा सवे देव ॥१०॥
सवे देव तया आड नये काही । तुका म्हणे नाही भय चिंता ॥११॥
४५०९ पृ ७४४(शासकीय), ३८१० पृ ६५७(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
३
चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी । प्रवेश भीतरी केला देवे ॥१॥
देव आला घरा नंदाचिया गावा । धन्य त्यांच्या दैवा दैव आले ॥२॥
आले अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥
करावया भक्तजनांचे पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥
गोकुळी आनंद प्रगटले सुख । निर्भर हे लोक घरोघरी ॥५॥
घरोघरी जाला लक्ष्मीचा वास । दैन्य दारिद्रास त्रास आला ॥६॥
आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारी लोका ॥७॥
लोका गोकुळीच्या जाले ब्रम्हज्ञान । केलियावाचून जपतपे ॥८॥
जपतपे काय करावी साधने । जव नारायणे कृपा केली ॥९॥
केली नारायणे आपुली अंकित । तो चि त्यांचे हित सर्व जाणे ॥१०॥
सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाही नाही ॥११॥
नाही भक्ता दुजे तिही त्रिभुवनी । एका चक्रपाणीवाचूनिया ॥१२॥
याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजूनिया ॥१३॥
४५१० पृ ७४५(शासकीय), ३८११ पृ ६५८(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
४
यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिही तो मुरारी खेळविला ॥१॥
खेळविला जिही अंतर्बाहयसुखे । मेळवूनि मुखे चुंबन दिले ॥२॥
दिले त्यासी सुख अंतरीचे देवे । जिही एका भावे जाणितला ॥३॥
जाणितला तिही कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचे ॥४॥
ज्यांचे कृष्णी तन मन जाले रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥
विष तया जाले धन मान जन । वसविती वन एकांती त्या ॥६॥
एकांती त्या जाती हरिसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥
वयाच्या संपन्ना तैसा त्या कारणे । अंतरीचा देणे इच्छाभोग ॥८॥
भोग त्याग नाही दोन्ही जयापासी । तुका म्हणे जैसी स्फटिकशिळा ॥९॥
४५११ पृ ७४५(शासकीय), ३८१२ पृ ६५८(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
५
शिळा स्फटिकाची न पालटे भेदे । दाउनिया छंदे जैसी तैसी ॥१॥
जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावे ॥२॥
फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥
मायबापा सोडविले बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥
आदिक नाही देणे अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥
मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥
पाप कोठे राहे हरि आठविता । भक्ती द्वेषे चिंता जैसा तैसा ॥७॥
साक्षी तयापाशी पूर्वील कर्माच्या। बांधला सेवेच्या ऋणी देव ॥८॥
देव भोळा धांवे भक्ता पाठोवाटी । उच्चारिता कंठी मागेमागे ॥९॥
मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी। धावे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥
४५१२ पृ ७४५(शासकीय), ३८१३ पृ ६५९(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
६
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हाती गौळणीच्या ॥१॥
गौळणि या गळा बांधिती धारणी । पाया चक्रपाणी लागे तया ॥२॥
तया घरी रिघे चोरावया लोणी । रिते पाळतूनि शिरे माजी ॥३॥
माजी शिरोनिया नवनीत खाये । कवाड ते आहे जैसे तैसे ॥४॥
जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारी । म्हणउनि चोरी नसंपडे ॥५॥
नसंपडे तया करिता खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥
वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥७॥
निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळ ज्या ध्यानी कृष्णध्यान ॥८॥
नये क्षणभरी योगियांचे ध्यानी । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥
भाविका तयांसी येतो काकुलती। शाहाण्या मरती नसंपडे ॥१०॥
नलगे वेचावी टोळी धनानावे । तुका म्हणे भावे चाड एका ॥११॥
४५१३ पृ ७४६(शासकीय), ३८१४ पृ ६५९(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
७
चाड अनन्याची धरी नारायण । आपणा समान करी रंका ॥१॥
रंक होती राजे यमाचिये घरी । आचरणे बरी नाही म्हूण ॥२॥
न संपडे इंद्र चंद्र ब्रम्हादिका । अभिमाने एका तिळमात्रे ॥३॥
तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥
भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥
दुष्ट अभक्त जे निष्ठुर मानसी । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥
यमदूत त्यांसी करिती यातना । नाही नारायणा भजिजेले ॥७॥
जे नाही भजले एका भावे हरि । तया दंड करी यमधर्म ॥८॥
यमधर्म म्हणे तया दोषियांसी । का रे केशवासी चुकलेती ॥९॥
चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हा कान डोळे मुख ॥१०॥
कान डोळे मुख संतांची संगती । न धराच चित्ती सांगितले ॥११॥
सांगितले संती तुम्हा उगवूनि । गर्भासी येऊनि यमदंड ॥१२॥
दंडू आम्ही रागे म्हणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥
दुर्जनाचा येणे करूनि संहार । पूर्ण अवतार रामकृष्ण ॥१४॥
रामकृष्णनामे रंगले जे नर । तुका म्हणे घर वैकुंठी त्या ॥१५॥
४५१४ पृ ७४६(शासकीय), ३८१५ पृ ६५९(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
८
वैकुंठीच्या लोका दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमे ॥१॥
समागम त्यांचा धरिला अनंते । जिही चित्तवित्त समर्पिले ॥२॥
समर्थे ती गाती हरिचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥
रामकृष्णे केले कौतुक गोकुळी । गोपाळांचे मेळी गाई चारी ॥४॥
गाई चारी मोहोरी पावा वाहे पाठी । धन्य जाळी काठी कांबळी ते ॥५॥
काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या म्हैसी गाई पशु ॥६॥
सुख ते अमुप लुटिले सकळी । गोपिका गोपाळी धणीवरि ॥७॥
धणीवरि त्यांसी सांगितली मात । जयाचे जे आर्त तयापरी ॥८॥
परी याचे तुम्ही आइका नवळ । दुर्गम जो खोल साधनासि ॥९॥
शिक लावूनिया घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवे चि तो ॥१०॥
तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुके । शिव्या देता सुखे हासतुसे ॥११॥
हासतसे शिव्या देता त्या गौळणी । मरता जपध्यानी न बोले तो ॥१२॥
तो जे जे करिल ते दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपे ॥१३॥
४५१५ पृ ७४६(शासकीय), ३८१६ पृ ६६०(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
९
दावी वर्म सोपे भाविका गोपाळा । वाहे त्यांच्या गळा पाले माळा ॥१॥
मान देती आधी मागतील डाव । देवा ते गौरव माने सुख ॥२॥
मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरि स्नान तेणे ॥३॥
वस्त्रे घोंगडिया घालुनिया तळी । वरी वनमाळी बैसविती ॥४॥
तिही लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतिया ॥५॥
यांच्या वचनाची पुष्पे वाहे शिरी । नैवेद्य त्या करी कवळ मागे ॥६॥
त्यांचिये मुखीचे हिरोनिया घ्यावे । उच्छिष्ट ते खावे धणीवरी ॥७॥
वरी माथा गुंफे मोरपिसा वेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदे ॥८॥
छंदे नाचतील जयासवे हरि । देहभाव वरी विसरली ॥९॥
विसरली वरी देहाची भावना । तेचि नारायणा सर्वपूजा ॥१०॥
पूजा भाविकाची न कळता घ्यावी । न मागता दावी निज ठाव ॥११॥
ठाव पावावया हिंडे मागे मागे । तुका म्हणे संगे भक्तांचिया ॥१२॥
४५१६ पृ ७४७(शासकीय), ३८१७ पृ ६६०(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
१०
भक्तजना दिले निजसुख देवे । गोपिका त्या भावे आळंगिल्या ॥१॥
आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरी हरि ॠणी ॥२॥
रुसलिया त्यांचे करी समाधान । करविता आण क्रिया करी ॥३॥
क्रिया करी तुम्हा न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥४॥
गोपिकांसी म्हणे वैकुंठीचा पति । तुम्ही माझ्या चित्ती सर्वभावे ॥५॥
भाव जैसा माझ्या ठायी तुम्ही धरा । तैसा चि मी खरा तुम्हा लागी ॥६॥
तुम्हा कळो द्या हा माझा साच भाव । तुमचा चि जीव तुम्हा ग्वाही ॥७॥
ग्वाही तुम्हा आम्हा असे नारायण। आपलीच आण वाहातसे ॥८॥
सत्य बोले देव भक्तिभाव जैसा। अनुभवे रसा आणूनिया ॥९॥
यांसी बुझावितो वेगळाल्या भावे । एकीचे हे ठावे नाही एकी ॥१०॥
एकी क्रिया नाही आवघियांचा भाव । पृथक हा देव घेतो तैसे ॥११॥
तैसे कळो नेदी जो मी कोठे नाही । अवघियांचे ठायी जैसा तैसा ॥१२॥
जैसा मनोरथ जये चित्ती काम । तैसा मेघश्याम पुरवितो ॥१३॥
पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥
गोकुळींच्या लोका लावियेला छंद । बैसला गोविंद त्यांचे चित्ती॥१५॥
चित्तें ही चोरूनि घेतली सकळा । आवडी गोपाळा वरी तया ॥१६॥
आवडे तयासी वैकुंठनायक । गेली सकळिक विसरोनि ॥१७॥
निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाही या देहाची शुध्दि कोणा ॥१८॥
कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव म्हणुनि तया चुंबन देती ॥१९॥
देती या टाकून भ्रतारांसी घरी । लाज ते अंतरी आथीच ना ॥२०॥
नाही कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका म्हणे वाचा काया मने ॥२१॥
४५१७ पृ ७४७(शासकीय), ३८१८ पृ ६६१(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
११
मने हरिरूपी गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥
यांच्या भ्रतारांची धरूनिया रूपे । त्यांच्या घरी त्यापे भोग करी ॥२॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एका दिसे हरि एका लेक ॥३॥
एक भाव नाही सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीती तैसे रूप ॥४॥
रूप याचे आहे अवघेचि एक । परि कवतुक दाखविले ॥५॥
लेकरू न कळे स्थूल की लहान । खेळे नारायण कवतुके ॥६॥
कवतुक केले सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥
४५१८ पृ ७४८(शासकीय), ३८१९ पृ ६६२(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
१२
जगाचा हा बाप दाखविले माये । माती खाता जाये मारावया ॥१॥
मारावया तिणे उगारिली काठी । भुवने त्या पोटी चौदा देखे ॥२॥
देखे भयानक झाकियेले डोळे । मागुता तो खेळे तिये पुढे ॥३॥
पुढे रिघोनिया घाली गळा कव । कळो नेदी माव मायावंता ॥४॥
मायावंत विश्वरूप काय जाणे । माझे माझे म्हणे बाळ देवा ॥५॥
बाळपणी रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥
गळा बांधऊनि उखळासी दावे । उन्मळी त्या भावे विमळार्जुन ॥७॥
न कळे जुनाट जगाचा जीवन । घातले मोहन गौळियांसी ॥८॥
सिंकी उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥
तरी दूध डेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥१०॥
दुणी जाले त्याचा मानिती संतोष । दुभत्याची आस धरूनिया ॥११॥
आशाबध्दा देव असोनि जवळी । नेणती ते काळी स्वार्थामुळे ॥१२॥
मुळे याच देव न कळे तयांसी । चित्त आशापाशी गोवियेले ॥१३॥
लेकरू आमचे म्हणे दसवंती । नंदाचिये चित्ती तोचि भाव ॥१४॥
भाव जाणावया चरित्र दाखवी। घुसळिता रवी डेरियात ॥१५॥
डेरियात लोणी खादले रिघोनि । पाहे तो जननी हाती लागे ॥१६॥
हाती धरूनिया काढिला बाहेरी। देखोनिया करी चोज त्यासी ॥१७॥
सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियात ॥१८॥
यासी पुत्रलोभे न कळे हा भाव । कळो नेदी माव देव त्यांसी ॥१९॥
त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देव आपणास कळो नेदी ॥२०॥
नेदी राहो भाव लोभिकांचे चित्ती। जाणता चि होती अंधळी ती ॥२१॥
अंधळी ती तुका म्हणे संवसारी । जिही नाही हरि ओळखिला ॥२२॥
४५१९ पृ ७४८(शासकीय), ३८२० पृ ६६२(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
१३
ओळखी तयांसी होय एका भावे । दुसरिया देवे न पविजे ॥१॥
न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तोचि वाया नागवण ॥२॥
वनवास देवाकारणे एकांत । करावी ही व्रत तपे याग॥३॥
व्रत याग यांसी फळली बहुते । होतीया संचिते गौळियांची ॥४॥
यांसी देवे तारियेले न कळता । मागील अनंता ठावे होते ॥५॥
होते ते द्यावया आला नारायण । मायबापा ऋण गौळियांचे ॥६॥
गौळियांचे सुख दुर्लभ आणिकां । नाही ब्रम्हादिकां तुका म्हणे ॥७॥
४५२० पृ ७४९(शासकीय), ३८२१ पृ ६६३(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
१४
नेणतिया साटी नेणता लाहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥१॥
माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तया वरी ॥२॥
तया वरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥
घेउनिया एके ठायी अवतार । एकी केला थोर वाढवूनि ॥४॥
उणा पुरा यासी नाही कोणी ठाव । सारिखाचि देव अवघियांसी ॥५॥
यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥
वाढला तो सेवाभक्तिचिया गुणे । उपचार मिष्टान्ने करूनिया ॥७॥
करोनिया सायास मेळविले धन । ते ही कृष्णार्पण केले तीही ॥८॥
कृष्णासी सकळ गाई घोडे म्हैसी । समर्पिल्या दासी जीवे भाव ॥९॥
जीवे भावे त्याची करितील सेवा । न विसंबती नावा क्षणभरी ॥१०॥
क्षणभरी होता वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥
त्यांचे ध्यानी मनी सर्वभावे हरि । देह काम करी चित्त त्यापे ॥१२॥
त्याचेचि चिंतन कृष्ण कोठे गेला । कृष्ण हा जेविला नाही कृष्ण ॥१३॥
कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयरा भेटो कृष्णा ॥१४॥
कृष्ण गाता ओव्या दळणी कांडणी । कृष्ण हा भोजनी पाचारिती ॥१५॥
कृष्ण तया ध्यानी आसनी शयनी । कृष्ण देखे स्वप्नी कृष्णरूप ॥१६॥
कृष्ण त्यांस दिसे आभास दुश्चिता । धन्य मातापिता तुका म्हणे ॥१७॥
४५२१ पृ ७४९(शासकीय), ३८२२ पृ ६६३(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
१५
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥
म्हणे कृष्णाविण कैसे तुम्हा गमे । विळ हा करमे वायाविण ॥२॥
वायाविण तुम्हीं पिटीतां चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥
क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनिया ॥४॥
याचे सुख तुम्हां कळलियावरि । मग दारोदारी न फिराल ॥५॥
लटिके हे तुम्हां वाटेल खेळणे । एका कृष्णाविणे आवघेचि ॥६॥
अवघ्यांचा तुम्हीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥७॥
नावडे तुम्हांस आणीक बोलिले । मग हे लागले हरिध्यान ॥८॥
न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥९॥
आणिका ही तुम्हां येती काकुलती। जवळी इच्छिती क्षण बैसो ॥१०॥
बैसो चला पाहो गोपाळाचे मुख। एकी एक सुख सांगतील ॥११॥
सांगे जव ऐसी मात दसवंती । तव धरिती चित्ती बाळा ॥१२॥
बाळा एकी घरा घेउनिया जाती । नाही त्या परती तुका म्हणे ॥१३॥
४५२२ पृ ७५०(शासकीय), ३८२३ पृ ६६४(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
१६
तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासी खेळता दिवस गमे ॥१॥
दिवस राती काही नाठवे तयांसी । पाहाता मुखासी कृष्णाचिया ॥२॥
याच्या मुखे नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थचि ॥३॥
ताटस्थ राहिले सकळ शरीर । इंद्रिये व्यापार विसरली ॥४॥
विसरल्या तान भुक घर दार । नाही हा विचार आहो कोठे ॥५॥
कोठे असो कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥
विसरल्या आम्ही कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥
एक जाल्या तेव्हा कृष्णाचिया सुखे । निःशंके भातुके खेळतील ॥८॥
खेळता भातुके कृष्णाच्या सहित । नाही आशंकित चित्त त्यांचे ॥९॥
चित्ती तो गोविंद लटिके दळण । करिती हे जन करी तैसे ॥१०॥
जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनिया ॥११॥
करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥
त्यांणी केला हरि सासुरे माहेर । बंधु हे कुमर दीर भावे ॥१३॥
भावना राहिली एकाचिये ठायी । तुका म्हणे पायी गोविंदाचे ॥१४॥
४५२३ पृ ७५०(शासकीय), ३८२४ पृ ६६४(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
१७
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामे भेद परि एक चि तो ॥१॥
एकाचीच नामे ठेवियेली दोनी । कल्पितील मनी यावे जावे ॥२॥
जावे यावे तिही घरीचिया घरी । तेथिची सिदोरी तेथे न्यावी ॥३॥
विचारिता दिसे येणे जाणे खोटे । दाविती गोमटे लोका ऐसे ॥४॥
लोक करूनिया साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥
लटिकी करिती मंगळदायके । लटिकीच एके एका व्याही ॥६॥
व्याही भाई हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायी केला एक ॥७॥
एकासिच पावे जे काही करिती । उपचार संपत्ति नाना भोग ॥८॥
भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाई ॥९॥
लटिकाच त्यांणी केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥
त्यांणी मृत्तिकेचे करूनि अवघे । खेळतील दोघे पुरुषनारी ॥११॥
पुरुषनारी त्यांणी ठेवियेली नावे । कवतुकभावे विचरती ॥१२॥
विचरती जैसे साच भावे लोक । तैसे नाही सुख खेळतीया ॥१३॥
यांणी जाणितले आपआपणया । लटिके हे वाया खेळतो ते ॥१४॥
खेळतो ते आम्ही नव्हो नारीनर । म्हणोनि विकार नाही तया ॥१५॥
तया ठावे आहे आम्ही अवघी एक । म्हणोनि निःशंक खेळतील ॥१६॥
तया ठावे नाही हरिचिया गुणे । आम्ही कोणकोणे काय खेळो ॥१७॥
काय खातो आम्ही कासया सांगाते । कैसे हे लागते नेणो मुखी ॥१८॥
मुखी चवी नाही वरी अंगी लाज । वर्ण याती काज न धरिती ॥१९॥
धरितील काही संकोच त्या मना । हासता या जना नाइकती॥२०॥
नाइकती बोल आणिकांचे कानी । हरि चित्ती मनी बैसलासे ॥२१॥
बैसलासे हरि जयाचिये चित्ती। तया नावडती मायबापे ॥२२॥
मायबापे त्यांची नेती पाचारुनि । बळे परि मनी हरि वसे ॥२३॥
वसतील बाळा आपलाले घरी । ध्यान त्या अंतरी गोविंदाचे ॥२४॥
गोविंदाचे ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती ॥२५॥
न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जाले ॥२६॥
एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागी तैशा ॥२७॥
तैसा त्यांचा भाव घेतला त्या परी । तुका म्हणे हरि बाळलीला॥२८॥
४५२४ पृ ७५१ (शासकीय), ३८२५ पृ ६६५ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
१८
लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥
मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनिया करी स्तनपान ॥२॥
नभाचा ही साक्षी पाताळा परता । कुर्वाळिते माता हाते त्यासि ॥३॥
हाते कुर्वाळुनी मुखी घाली घास । पुरे म्हणे तीस पोट धाले ॥४॥
पोट धाले मग देतसे ढेकर । भक्तीचे ते फार तुळसीदळ ॥५॥
तुळसीदळ भावे सहित देवापाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥
क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचे ते जळ गोड देवा ॥७॥
देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्या ठायी ॥८॥
त्यांचा हा अंकित सर्व भावे हरि । तुका म्हणे करी सर्व काज ॥९॥
४५२५ पृ ७५२ (शासकीय), ३८२६ पृ ६६६ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
१९
जयेवेळी चोरूनिया नेली वत्से । तयालागी तैसे होणे लागे ॥१॥
लागे दोही ठायी करावे पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥
माय जाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरी वत्से जीची तैसा जाला ॥३॥
जाला तैसा जैसे घरिचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पावे ॥४॥
मोहरी पावे सिंगे वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रम्हादिकी ॥५॥
ब्रम्हादिका सुख स्वप्नी ही नाही । तैसे दोही ठायी वोसंडले ॥६॥
वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आई तैसा जाला ॥७॥
लाघव कळले ब्रम्हयासी याचे । परब्रम्ह साचे अवतरले ॥८॥
तरले हे जन सकळ ही आता । ऐसे तो विधाता बोलियेला ॥९॥
लागला हे स्तुती करू अनंताची । चतुर्मुख वाची भक्ती स्तोत्रे ॥१०॥
भक्तिकाजे देवे केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥
पृथिवी दाटीली होती या असुरी । नासाहावे वरी भार तये ॥१२॥
तया काकुलती आपल्या दासांची । तयालागी वेची सर्वस्व ही ॥१३॥
स्वहित दासांचे करावया लागी । अव्यक्त हे जगी व्यक्ती आले ॥१४॥
लेखा कोण करी याचिया पुण्याचा । जया सवे वाचा बोले हरि ॥१५॥
हरि नाममात्रे पातकांच्या रासी । तो आला घरासि गौळियांच्या ॥१६॥
गौळिये अवघी जाली कृष्णमय । नामे लोकत्रय तरतील ॥१७॥
तरतील नामे कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशी होइल पाप ॥१८॥
पाप ऐसे नाही कृष्णनामे राहे । धन्य तो चि पाहे कृष्णमुख ॥१९॥
मुख माझे काय जो मी वर्णू पार । मग नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥
ब्रम्हा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हा चि देव ॥२१॥
देव चि अवघा जालासे सकळ । गाई हा गोपाळ वत्से तेथे ॥२२॥
तेथे पाहाणे जे आणीक दुसरे । मूर्ख त्या अंतरे दुजा नाही ॥२३॥
दुजा भाव तुका म्हणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥
४५२६ पृ ७५२ (शासकीय), ३८२७ पृ ६६६ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
२०
कुंभपाक लागे तयासि भोगणे । अवघा चि नेणे देव ऐसा ॥१॥
देव ऐसा ठावा नाही जया जना । तयासि यातना यम करी ॥२॥
कळला हा देव तया साच खरा । गाई वत्से घरा धाडी ब्रम्हा ॥३॥
ब्रम्हादिका ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥
जाणवेल देव गौळियांच्या भावे । तुका म्हणे सेवे संचित हे ॥५॥
४५२७ पृ ७५३ (शासकीय), ३८२८ पृ ६६७ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
२१
संचित उत्तम भूमि कसूनिया । जाऊ नेणे वाया परि त्याचे ॥१॥
त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईवरी आणिक गाई ॥२
॥
गाई दवडुनि घालिती बाहेरी । तव म्हणे हरि बांधा त्याही ॥३
॥
त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाडयातुनि
॥४॥
पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥
नारायण नांदे जयाचिये ठायी । सहज तेथे नाही घालमेली ॥६॥
मेली ही शाहाणी करिता सायास । नाही सुखलेश तुका म्हणे ॥७॥
४५२८ पृ ७५३ (शासकीय), ३८२९ पृ ६६७ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
२२
तुका म्हणे सुख घेतले गोपाळी । नाचती कांबळी करुनि ध्वजा ॥१॥
करूनिया टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥
दगडाचे टाळ कोण त्याचा नाद । गीत गाता छंद ताल नाही ॥३॥
नाही ताळ गाता नाचता गोपाळा । घननीळ सावळा तयामध्ये ॥४॥
मध्ये जया हरि ते सुख आगळे । देहभाव काळे नाही तया ॥५॥
तयांसि आळंगी आपुलिया करी । जाती भूमीवरी लोटांगणी ॥६॥
निजभाव देखे जयाचिये अंगी । तुका म्हणे संगी क्रीडे तया ॥७॥
४५२९ पृ ७५३ (शासकीय), ३८३० पृ ६६८ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
२३
तया सवे करी काला दही भात । सिदोऱ्या अनंत मेळवुनी ॥१॥
मेळवुनी अवघियांचे एके ठायी । मागे पुढे काही उरो नेदी ॥२॥
नेदी चोरी करू जाणे अंतरीचे । आपले ही साचे द्यावे तेथे॥३॥
द्यावा दही भात आपले प्रकार । तयाचा वेव्हार सांडवावा ॥४॥
वाटी सकळांसि हाते आपुलिया । जैसे मागे तया तैसे द्यावे ॥५॥
द्यावे सांभाळुनी सम तुकभावे । आपण हि खावे त्यांचे तुक ॥६॥
तुक सकळांचे गोविंदाचे हाती । कोण कोणे गति भला बुरा ॥७॥
राखे त्यासि तैसे आपलाल्या भावे । विचारुनि द्यावे जैसे तैसे ॥८॥
तैसे सुख नाही वैकुंठीच्या लोका । ते दिले भाविका गोपाळांसि ॥९॥
गोपाळांचे मुखी देउनी कवळ । घास माखे लाळ खाय त्या ची ॥१०॥
त्यांचिये मुखी चे काढूनिया घास। झोंबता हातास खाय बळे ॥११॥
बळे जयाचिया ठेंगणे सकळ । तयाते गोपाळ पाडितील ॥१२॥
पाठी उचलूनि वाहातील खांदी । नाचतील मांदी मेळवुनी ॥१३॥
मांदी मेळवुनी धणी दिली आम्हा । तुका म्हणे जमा केल्या गाई ॥१४॥
४५३० पृ ७५४ (शासकीय), ३८३१ पृ ६६८ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
२४
केला पुढे हरि अस्तमाना दिसा । मागे त्यासरिसे थाट चाले ॥१॥
थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढे कृष्ण राम तया सोयी ॥२॥
सोयी लागलिया तयांची अनंती । न बोलविता येती मागे तया ॥३॥
तयांचिये चित्ती बैसला अनंत । घेती नित्य नित्य ते चि सुख ॥४॥
सुख नाही कोणा हरिच्या वियोगे । तुका म्हणे जुगे घडी जाय ॥५॥
४५३१ पृ ७५४ (शासकीय), ३८३२ पृ ६६९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
२५
जाय फाकोनिया निवडिता गाई । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥
घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे॥२॥
गोविंदे वेधिले तुका म्हणे मन । वियोगे ही ध्यान संयोगाचे ॥३॥
४५३२ पृ ७५४ (शासकीय), ३८३३ पृ ६६९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
२६
संयोग सकळा असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥
गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिले ॥२॥
उतरूनि हाते धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली॥३॥
दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥४॥
लहान हा थोर जीवजंत भूते । आपण दैवते जाला देवी ॥५॥
देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरि ॥६॥
हरि तुका म्हणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तीसाटी ॥७॥
४५३३ पृ ७५५ (शासकीय), ३८३४ पृ ६६९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
२७
भक्तीसाटी केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥
देव गिळुनिया धरिले मोहन । माय म्हणे कोण येथे दुजे ॥२॥
दुजे येथे कोणी नाही कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥३॥
देवापाशी पुसे देव काय जाला । हासे आले बोला याचे हरि ॥४॥
यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिके मानिती साच खरे ॥५॥
लटिके ते साच साच ते लटिके । नेणती लोभिके आशाबध्द ॥६॥
सांग म्हणे माय येरु वासी तोड । तंव ते ब्रम्हांड देखे माजी ॥७॥
माजी जया चंद्र सूर्य तारांगणे । तो भक्तांकारणे बाळलीला ॥८॥
लीळा कोण जाणे याचे महिमान । जगाचे जीवन देवादिदेव ॥९॥
देवे कवतुक दाखविले तया । लागतील पाया मायबापें ॥१०॥
मायबाप म्हणे हा चि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥११॥
तो हि त्यांचा देव दिला नारायणे । माझे हे करणे तो हि मी च ॥१२॥
मी च म्हणउनि जे जे जेथे ध्याती । तेथे मी श्रीपति भोगिता ते ॥१३॥
ते मज वेगळे मी तया निराळा । नाही या सकळा ब्रम्हाडांत ॥१४॥
तद्भावना तैसे भविष्य तयाचे । फळ देता साचे मी च एक ॥१५॥
मी च एक खरा बोले नारायण । दाविले निर्वाण निजदासां ॥१६॥
निजदासां खूण दाविली निरुती । तुका म्हणे भूती नारायण ॥१७॥
४५३४ पृ ७५५ (शासकीय), ३८३५ पृ ६६९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
२८
नारायण भूती न कळे जयांसि । तयां गर्भवासी येणे जाणे ॥१॥
येणे जाणे होय भूतांच्या मत्सरे । न कळता खरे देव ऐसा ॥२॥
देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुध्दि ॥३॥
बुध्दीचा पालट नव्हे कोणे काळी । हरि जळी स्थळी तया चित्ती ॥४॥
चित्त ते निर्मळ जैसे नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥
तयामाजी हरि जाणिजे त्या भावे । आपले परावे सारिखे चि ॥६॥
चिंतने तयाच्या तरती आणीक । जो हे सकळिक देव देखे ॥७॥
देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥८॥
काया वाचा मने पूजावे वैष्णव । म्हणउनि भाव धरूनिया ॥९॥
यांसि कवतुक दाखविले रानी । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥१०॥
गोपाळांसि डोळे झांकविले हाते । धरिले अनंते विश्वरूप ॥११॥
पसरूनि मुख गिळियेले ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥
संधि सारूनिया पाहिले अनंता । म्हणती ते आता कळलासी ॥१३॥
कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥
तो तया कळला आरुषां गोपाळा । दुर्गम सकळा साधनांसि ॥१५॥
सीण उरे तुका म्हणे साधनाचा । भाविकासि साचा भाव दावी ॥१६॥
४५३५ पृ ७५५ (शासकीय), ३८३६ पृ ६७० (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
२९
भाव दावी शुध्द देखोनिया चित्त । आपल्या अंकित निजदासा ॥१॥
सांगे गोपाळांसी काय पुण्य होते । वा चलो जळते आगी हाती ॥२॥
आजि आम्हा येथे राखियेले देवे । नाही तरी जीवे न वंचतो ॥३॥
न वंचत्या गाई जळतो सकळे । पूर्वपुण्यबळे वाचविले ॥४॥
पूर्वपुण्य होते तुमचिये गांठी । बोले जगजेठी गोपाळांसी ॥५॥
गोपाळांसी म्हणे वैकुंठनायक । भले तुम्ही एक पुण्यवंत ॥६॥
करी तुका म्हणे करवी आपण । द्यावे थोरपण सेवकांसी ॥७॥
४५३६ पृ ७५६ (शासकीय), ३८३७ पृ ६७० (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
३०
काय आम्हा चाळविसी वायाविण । म्हणसी दुरून देखिलासि ॥१॥
लावूनिया डोळे नव्हतो दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥
होती दृष्टि आत उघडी आमची । बाहेरी ते वाया चि कुंची झाकू ॥३॥
जालासि थोरला थोरल्या तोडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥४॥
आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदे नाचती भोवताली ॥५॥
भोवती आपणा मेळविली देवे । तुका म्हणे ठावे नाही ज्ञान ॥६॥
४५३७ पृ ७५६ (शासकीय), ३८३८ पृ ६७१ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
३१
नाही त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥
जाणतिया सवे येऊ नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले॥२॥
वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनिया दूर दुराविले ॥३॥
दुरावले दूर आशाबध्द देवा । करिता या सेवा कुटुंबाची ॥४॥
चित्ती द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥
नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥६॥
जीही हरिसंग केला संवसारी । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७॥
४५३८ पृ ७५६ (शासकीय), ३८३९ पृ ६७१ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
३२
खेळीमेळी आले घरा गोपीनाथ । गोपाळा सहित मातेपाशी ॥१॥
मातेपाशी एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥
ओवाळिले तिने करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसी ॥३॥
पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥
कवतुक कानी आइकता त्याचे । बोलता ये वाचे वीट नये ॥५॥
नयन गुंतले श्रीमुख पाहता । न साहे लवता आड पाते ॥६॥
तेव्हा कवतुक कळो आले काही । हळुहळु दोही मायबापां ॥७॥
हळुहळु त्यांचे पुण्य जाले वाड । वारले हे जाड तिमिराचे ॥८॥
तिमिर हे तेथे राहो शके कैसे । जालिया प्रकाशे गोविंदाच्या ॥९॥
दावी तुका म्हणे देव ज्या आपणा । पालटे ते क्षणामाजी एका ॥१०॥
४५०९ पृ ७४४(शासकीय), ३८१० पृ ६५७(शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
३३
काय आता यासि म्हणावे लेकरू । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥
माया याची यासि राहिली व्यापून । कळो नये क्षण एक होता ॥२॥
क्षण एक होता विसरली त्यासी । माझे माझे ऐसे करी बाळा ॥३॥
करी कवतुक कळो नेदी कोणा । योजूनि कारणा ते चि खेळे ॥४॥
ते सुख लुटिले घरिचिया घरी । तुका म्हणे परी आपुलाल्या ॥५॥
४५४० पृ ७५७ (शासकीय), ३८४१ पृ ६७२ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
३४
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥
खेळ मांडियेला यमुने पाबळी । या रे चेंडुफळी खेळू आता ॥२॥
आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वाटी गडिया गडी ॥३॥
गडी जव पाहे आपणासमान । नाही नारायण म्हणे दुजा ॥४॥
जाणोनि गोविंदे सकळांचा भाव । तयांसी उपाव तो चि सांगे ॥५॥
सांगे सकळांसी व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुम्ही माझा ॥६॥
मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुती हाल माझी ॥७॥
माझे हाके हाक मेळवा सकळ । न वजा बरळ एकमेका ॥८॥
एका समतुके अवघेचि राहा । जाईल तो पाहा धरा चेंडू ॥९॥
चेंडू धरा ऐसे सांगतो सकळा । आपण निराळा एकला चि ॥१०॥
चिंतूनिया चेंडू हाणे ऊर्ध्वमुखे । ठेली सकळिक पाहात चि ॥११॥
पाहात चि ठेली न चलता काही । येरू लवलाही म्हणे धरा ॥१२॥
धरावा तयाने त्याचे बळ ज्यासि । येरा आणिकांसी लाग नव्हे ॥१३॥
नव्हे काम बळ बुध्दि नाही त्याचे । न धरवे निचे उंचाविण ॥१४॥
विचारी पडिले देखिले गोपाळ । या म्हणे सकळ मजमागे ॥१५॥
मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥
चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनिया ॥१७॥
या मागे जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठाया ॥१८॥
पंथ जे चुकले आपले मतीचे । तया मागे त्याचे ते चि हाल ॥१९॥
हाल दोघा एक मोहरा मागिला । चालता चुकला वाट पंथ ॥२०॥
पंथ पुढिलांसी चालता न कळे । मागिलांनी डोळे उघडावे ॥२१॥
वयाचा प्रबोध विचार ज्या नाही । समान तो देही बाळकांसी ॥२२॥
सिकविले हित नायिके जो कानी । त्यामागे भल्यांनी जाऊ नये ॥२३॥
नये ते चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥२४॥
रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥
लाज सांडूनिया मारितील हाका । कळले नायका वैकुंठीच्या ॥२६॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची ॥२७॥
गोपाळांचा धांवा आइकिला कानी । सोयी चक्रपाणि पालविले ॥२८॥
साया धरूनिया आले हरिपासी । लहान थोरांसी सांभाळिले ॥२९॥
सांभाळिले तुका म्हणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखे॥३०॥
४५४१ पृ ७५७ (शासकीय), ३८४२ पृ ६७२ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
३५
मुखे सांगे त्यांसी पैल चेंडू पाहा । उदकात डोहाचिये माथा ॥१॥
माथा कळंबाचे अवघडा ठायी । दावियेला डोही जळामाजी ॥२॥
जळात पाहाता हाडति या दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसे नव्हे ॥३॥
नव्हे साच चेंडू छाया दिसे आत । खरा तेथे चित्त लावा वरी ॥४॥
वरी देखियेला अवघ्यानी डोळा । म्हणती गोपाळा आता कैसे ॥५॥
कैसे करूनिया उतरावा खाली । देखोनिया भ्याली अवघी डोहो ॥६॥
डोहो बहु खोल काळया भीतरी । सरली माघारी अवघी जणे ॥७॥
जयाचे कारण तयासीच ठावे । पुसे त्याच्या भावे त्यास हरि ॥८॥
त्यांसी नारायण म्हणे राहा तळी । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥
वरी जाता हरि पाहाती गोपाळ । म्हणति सकळ आम्ही नेणो ॥१०॥
नेणो म्हणती हे करितोसि काई । आम्हा तुझी आई देइल सिव्या ॥११॥
आपुलिया काना देउनिया हात । सकळी निमित्य टाळियेले ॥१२॥
निमित्याकारणे रचिले कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥
खांदीवरी पाव ठेवियेला देवे । पाडावा त्या भावे चेंडू तळी ॥१४॥
तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरीचा देव जाणो नेदी ॥१५॥
४५४२ पृ ७५८ (शासकीय), ३८४३ पृ ६७३ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
३६
नेदी कळो केल्याविण ते कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥
न पुरेसा हात घाली चेंडूकडे । म्हणीतले गडे सांभाळावे ॥२॥
सांभाळ करिता सकळा जिवांचा । गोपाळांसी वाचा म्हणे बरे ॥३॥
बरे विचारुनी करावे कारण । म्हणे नारायण बर्या बरे ॥४॥
बरे म्हणउनि तया कडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥५॥
तयासवे उडी घातली अनंते । गोपाळ रडते येती घरा ॥६॥
येता त्यांचा लोकी देखिला कोल्हाळ । सामोरी सकळ आली पुढे ॥७॥
पुसतील मात आपआपल्यासि । हरिदुःखे त्यांसी न बोलवे ॥८॥
न बोलवे हरि बुडालासे मुखे । कुटितील दुःखे उर माथे ॥९॥
मायबापें तुका म्हणे न देखती । ऐसे दुःख चित्ती गोपाळांच्या ॥१०॥
४५४३ पृ ७५९ (शासकीय), ३८४४ पृ ६७४ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
३७
गोपाळा उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा जाली त्यांची ॥१॥
जाले काय ऐसे न कळे कोणासी । म्हणती तुम्हांपासी देव होता ॥२॥
देवासवे दुःख न पवते ऐसे । काही अनारिसे दिसे आजी ॥३॥
आजी दिसे हरि फांकला यांपाशी । म्हणउनि ऐशी परि जाली ॥४॥
जाणविल्याविण कैसे कळे त्यांसी। शाहाणे तयांसी कळो आले ॥५॥
कळो आले तीही फुंद शांत केला । ठायींचाच त्याला थोडा होता ॥६॥
होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणे ॥७॥
सांगे आता हरि तुम्हा आम्हा नाही । बुडाला तो डोही यमुनेच्या ॥८॥
यासी अवकाश नव्हेचि पुसता । जालिया अनंता कोण परि ॥९॥
परि त्या दुःखाची काय सांगो आता । तुका म्हणे माता लोकपाळ ॥१०॥
४५४४ पृ ७५९ (शासकीय), ३८४५ पृ ६७४ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
३८
पाषाण फुटती ते दुःख देखोनि । करिता गौळणी शोक लोका ॥१॥
काय ऐसे पाप होते आम्हा पासी । बोलती एकासी एक एका ॥२॥
एकाचिये डोळा असुं बाह्यात्कारी । नाही ती अंतरी जळतील ॥३॥
जळतील एके अंतर्बाह्यात्कारे । टाकिली लेकुरे कडियेहूनि ॥४॥
निवांतचि एके राहिली निश्चिंत । बाहेरी ना आत जीव त्यांचे ॥५॥
त्यांचे जीव वरी आले त्या सकळा । एका त्या गोपाळा वाचूनिया ॥६॥
वाचणे ते आता खोटे संवसारी । नव्हे भेटी जरी हरिसवे ॥७॥
सवे घेऊनिया चालली गोपाळा । अवघीच बाळा नर नारी ॥८॥
नर नारी नाही मनुष्याचे नावे । गोकुळ हे गाव सांडियेले ॥९॥
सांडियेली अन्ने संपदा सकळ । चित्ती तो गोपाळ धरुनि जाती ॥१०॥
तिरी माना घालूनिया उभ्या गाई । तटस्थ या डोही यमुनेच्या ॥११॥
यमुनेच्या तिरी झाडे वृक्ष वल्ली । दुःखे कोमाइली कृष्णाचिया ॥१२॥
याचे त्याचे दुःख एक जाले तिरी । मग शोक करी मायबाप ॥१३॥
मायबाप तुका म्हणे सहोदर । तोवरीच तीर न पवता ॥१४॥
४५४५ पृ ७५९ (शासकीय), ३८४६ पृ ६७४ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
३९
तीर देखोनिया यमुनेचे जळ । काठीच कोल्हाळ करिताती ॥१॥
कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासी ओढी भय मागे ॥२॥
मागे सरे माय पाउला पाउली । आपल्याच घाली धाके अंग ॥३॥
अंग राखोनिया माय खेद करी । अंतरीचे हरि जाणवले ॥४॥
जाणवले मग देवे दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ॥५॥
४५४६ पृ ७६० (शासकीय), ३८४७ पृ ६७५ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
४०
भावनेच्या मुळे अंतरला देव । शिरला संदेह भये पोटी ॥१॥
पोटी होते मागे जीव द्यावा ऐसे । बोलिल्या सरिसे न करवे ॥२॥
न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥३॥
अंतरला बहु बोलता वाउगे । अंतरीच्या त्यागेविण गोष्टी ॥४॥
गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवे । कोण कोण्याभावे रडती ती ॥५॥
ती गेली घरास आपल्या सकळ । गोधने गोपाळ लोक माय ॥६॥
मायबापांची तो ऐसी जाली गति । तुका म्हणे अंती कळो आले ॥७॥
४५४७ पृ ७६० (शासकीय), ३८४८ पृ ६७५ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
४१
आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरी कारणासाठी होता ॥१॥
होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधी ॥२॥
आधी पाठीमोरी जाली तीसकळे । मग या गोपाळे बुडी दिली ॥३॥
दिली हाक त्याणे जाऊनि पाताळा । जागविले काळा भुजंगासी ॥४॥
भुजंग हा होता निजला मंदिरी । निर्भर अंतरी गर्वनिधी ॥५॥
गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचे ॥६॥
चेंडुवाचे मिसे काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण हे ॥७॥
४५४८ पृ ७६० (शासकीय), ३८४९ पृ ६७५ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
४२
काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशी । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥
लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥
उगवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदे वांकी नभा देखे पायी ॥३॥
पाहिला सकळ तिने न्याहाळूनि । कोण या जननी विसंबली ॥४॥
विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥५॥
दिसतसे रूप गोजिरे लाहान । पाहाता लोचन सुखावले ॥६॥
पाहिले परतोनि काळा दुष्टाकडे । मग म्हणे कुडे जाले आता ॥७॥
आता हा उठोनि खाईल या बाळा । देईल वेल्हाळा माय जीव ॥८॥
जीव याचा कैसा वाचे म्हणे नारी । मोहिली अंतरी हरिरूपे ॥९॥
रूपे अनंताची अनंतप्रकार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥
४५४९ पृ ७६१ (शासकीय), ३८५० पृ ६७६ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
४३
म्हणे चेंडू कोणे आणिला या ठाया । आलो पुरवाया कोड त्याचे ॥१॥
त्याचे आइकोन निष्ठुर वचन । भयाभीत मन जाले तिचे ॥२॥
तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधी ते माघारी फिरली वेगी ॥३॥
वेगी मन गेले भ्रताराचे सोयी । विघ्न आले काही आम्हा वरी ॥४॥
वरी उदकास अंत नाही पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥
संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायीच देखिला अवचिता ॥६॥
अवचिता नेणो येथे उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥
मोठयाने बोलतो भय नाही मनी । केला उठवूनि काळ जागा ॥८॥
जागविला काळसर्प तये वेळी । उठिला कल्लोळी विषाचिये ॥९॥
यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळयाकृतांत धु धुकारे ॥१०॥
कारणे ज्या येथे आला नारायण । जाले दरुषण दोघांमध्ये ॥११॥
दोघांमध्ये जाले बोल परस्परे । प्रसंग उत्तरे युध्दाचिया ॥१२॥
चिंतावला चित्ती तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥
जाला सावकाश झेप घाली वरी । तव हाणे हरि मुष्टिघाते ॥१४॥
तेणे काळे त्यासी दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव जाला ॥१५॥
आठवले काळा हाकारिले गोत । मिळाली बहुते नागकुळे ॥१६॥
कल्हारी संधानी धरियेला हरि । अवघा विखारी व्यापियेला ॥१७॥
यास तुका म्हणे नाही भक्ताविण । गरुडाचे चिंतन केले मनी ॥१८॥
४५५० पृ ७६१ (शासकीय), ३८५१ पृ ६७६ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
४४
निजदास उभा तात्काळ पायापे । स्वामी देखे सर्पें वेष्टियेला ॥१॥
लहान थोरे होती मिळाली अपारे । त्याच्या धुधुकारे निवारिली ॥२॥
निघता आपटी धरूनि धावामधी । एकाचेचि वधी माथा पाये ॥३॥
एकी जीव दिले येताच त्या धाके । येतील ती एके काकुलती ॥४॥
यथेष्ट भक्षिली पोट धाये वरी । तव म्हणे हरि पुरे आता ॥५॥
आता करू काम आलो जयासाटी । हरि घाली मिठी काळयासी ॥६॥
यासी नाथूनिया नाकी दिली दोरी । चेंडू भार शिरी कमळाचा ॥७॥
चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुन बहुडविले ॥८॥
विसरु न पडे संवगड्या गाई । यमुनेच्या डोही लक्ष त्यांचे ॥९॥
त्याच्या गोष्टी काठी बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथे हरि ॥१०॥
हरिचे चिंतन करिता आठव । तुका म्हणे देव आला वरी ॥११॥
४५५१ पृ ७६२ (शासकीय), ३८५२ पृ ६७७ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
४५
अवचित त्यांनी देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥
आला घेऊनिया यमुने बाहेरी । पालवितो करी गडियांसी ॥२॥
गडियांसी म्हणे वैकुंठनायक । या रे सकळिक मजपाशी ॥३॥
मजपाशी तुम्हां भय काय करी । जवळी या दुरी जाऊ नका ॥४॥
कानी आइकिले गोविंदाचे बोल । म्हणती नवल चला पाहो ॥५॥
पाहो आले हरिजवळ सकळ । गोविंदे गोपाळ आळिंगिले ॥६॥
आल्या गाई वरी घालितील माना । वोरसले स्तना क्षीर लोटे ॥७॥
लोटती सकळे एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळली ॥८॥
कुर्वाळली आनंदे घेती चारा पाणी । तिही चक्रपाणि देखियेला ॥९॥
त्यांच पाशी होता परी केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥
याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसी कृष्णे काया दिव्य दिली॥११॥
दिले गोविंदे त्या पदा नाही नाश । तुका म्हणे आस निरसली ॥१२॥
४५५२ पृ ७६२ (शासकीय), ३८५३ पृ ६७७ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
४६
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥
पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देउनि चपळा हाती गुढी ॥२॥
हाका आरोळिया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥३॥
आरंधी पडिली होती तया घरी । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥
लोका भूक तान नाही निद्रा डोळा । रूप वेळोवेळा आठविती ॥५॥
आहाकटा मग करिती गेलिया । आधी ठावा तया नाही कोणा ॥६॥
आधी चुकी मग घडे आठवण । तुका म्हणे जन परिचये ॥७॥
४५५३ पृ ७६२ (शासकीय), ३८५४ पृ ६७८ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
४७
जननी हे म्हणे आहा काय जाले । शरीर रक्षिले काय काजे ॥१॥
काय काज आता हरिविण जिणे । नित्य दुःख कोणे सोसावे हे ॥२॥
हे दुःख न सरे हरि न भेटे तो । त्यामागेचि जातो एका वेळे ॥३॥
एकवेळ जरी देखते मी आता । तरी जीवापरता न करिते ॥४॥
करिता हे मात हरिचे चिंतन । शुभ तो शकुन तुका म्हणे ॥५॥
४५५४ पृ ७६३ (शासकीय), ३८५५ पृ ६७८ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
४८
शुभ मात तिही आणिली गोपाळी । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषे मात ॥२॥
हरुषली माता केले निंबलोण । गोपाळा वरून कुरवंडी ॥३॥
गोपाळा भोवते मिळाले गोकुळ । अवघी सकळ लहान थोरे ॥४॥
थोर सुख जाले ते काळी आनंद । सांगती गोविंद वरी आला ॥५॥
आले वरी बैसोनिया नारायण । काळया नाथून वहन केले ॥६॥
नगराबाहेरी निघाले आनंदे । लावूनिया वाद्ये नाना घोष ॥७॥
नारायणा पुढे गोपाळ चालती । आनंदे नाचती गाती गीत ॥८॥
तव तो देखिला वैकुंठीचा पती । लोटांगणी जाती सकळ ही ॥९॥
सकळ ही एका भावे आलिंगिले । अवघिया जाले अवघे हरि ॥१०॥
हरि आलिंगने हरिरूप जाली । आप विसरली आपणास ॥११॥
सकळांसी सुख एक दिले देवे । मायबापा भावे लोकपाळा ॥१२॥
मायबाप देवा नाही लोकपाळ । सारिखी सकळ तुका म्हणे ॥१३॥
४५५५ पृ ७६३ (शासकीय), ३८५६ पृ ६७८ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
४९
नेणे वर्ण धर्म जी आली सामोरी । अवघीच हरि आळिंगिली ॥१॥
हरि लोकपाळ आले नगरात । सकळा सहित मायबाप ॥२॥
पारणे तयांचे जाले एका वेळे । देखिले सावळे परब्रम्ह ॥३॥
ब्रम्हानंदे लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरी ॥४॥
घरोघरी सुख आनंद सोहळा । सडे रंग माळा चौकदारी ॥५॥
दारी वृंदावने तुळसीची वने । रामकृष्णगाणे नारायण ॥६॥
नारायण तिही पूजिला बहुती। नाना पुष्पयाती करूनिया ॥७॥
याचे ॠण नाही फिटले मागील । पुढे भांडवल जोडिती ही ॥८॥
ही नव्हती कधी या देवा वेगळी । केला वनमाळी सेवाॠणी ॥९॥
सेवाॠणे तुका म्हणे रूपधारी । भक्तांचा कैवारी नारायण ॥१०॥
४५५६ पृ ७६३ (शासकीय), ३८५७ पृ ६७९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
५०
नारायण आले निजमंदिरासि । जाले या लोकांसी बहुडविले ॥१॥
बहुडविले बहु केले समाधान । विसरू तो क्षण नका माझा ॥२॥
मात सांगितली सकळ वृत्तांत । केले दंडवत सकळांनी ॥३॥
सकळा भातुके वाटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥४॥
लोक गेले कामा गाईपे गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥५॥
लोभ दावुनिया आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥६॥
आशेचे बांधले तुका म्हणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥७॥
४५५७ पृ ७६३ (शासकीय), ३८५८ पृ ६७९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
५१
जाला कवतुक करिता रोकडे । आणीक ही पुढे नारायण ॥१॥
येउनिया पुढे धरिला मारग । हरावया भाग इंद्रयाजी ॥२॥
इंद्रा दही दूध तूप नेता लोणी । घेतले हिरोनि वाटे त्याचे ॥३॥
हिरोनि घेतल्या कावडी सकळा । म्हणती गोपाळा बरे नव्हे ॥४॥
नव्हे तेचि करी न भे कळिकाळा । तुका म्हणे लीळा खेळे देव ॥५॥
४५५८ पृ ७६४ (शासकीय), ३८५९ पृ ६७९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
५२
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तया भेऊ नका ॥१॥
नका धरू भय धाक काही मनी । बोले चक्रपाणि गौळियांसी ॥२॥
गौळियांसी धीर नाही या वचने । आशंकितमने वेडावली ॥३॥
वेडावली त्यांसी न कळता भाव । देवआदिदेव नोळखता ॥४॥
नोळखता दुःखे वाहाती शरीरी । तुका म्हणे वरी भारवाही ॥५॥
४५५९ पृ ७६४ (शासकीय), ३८६० पृ ६७९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
५३
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असता अंगसंगे ॥१॥
अंगसंगे तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥
मागुती पडती चिंतेचिये डोही । जयाची हे नाही बुध्दि स्थिर ॥३॥
बुध्दि स्थिर होउ नेदी नारायण । आशबध्द जन लोभिकांची ॥४॥
लोभिका न साहे देवाचे करणे । तुका म्हणे तेणे दुःखी होती ॥५॥
४५६० पृ ७६४ (शासकीय), ३८६१ पृ ६८० (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
५४
दुःखी होती लोभे करावे ते काई । उडतील गाई म्हैसी आता ॥१॥
आणीकही काही होईल अरिष्ट । नायिके हा धीट सांगितले ॥२॥
सांगो चला याच्या मायबापांपाशी । निघाले घरासि देवा रागे ॥३॥
रागे काला देता न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसी ॥४॥
क्रोध देवावरी धरियेला राग । तुका म्हणे भाग न लभती ॥५॥
४५६१ पृ ७६४ (शासकीय), ३८६२ पृ ६८० (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
५५
भाग त्या सुखाचे वाकड्या बोबड्या । आपलिया गड्या भाविकांसी ॥१॥
भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसी ॥२॥
काला करूनिया वाटिला सकळा । आनंदे गोपाळांमाजी खेळे ॥३॥
खेळे मेळे दही दूध तूप खाती । भय नाही चित्ती कवणाचे ॥४॥
कवणाचे चाले तुका म्हणे बळ । जयासी गोपाळ साह्य जाला ॥५॥
४५६२ पृ ७६४ (शासकीय), ३८६३ पृ ६८० (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
५६
जाणवले इंद्रा चरित्र सकळ । वाकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥
तातडिया मेघा आज्ञा करी राव । गोकुळीचा ठाव उरो नेदा ॥२॥
नेदाविया काई म्हसी वाचो लोक । पुरा सकळीक शिळाधारी ॥३॥
धाक नाही माझा गोवळिया पोरां । सकळीक मारा म्हणे मेघा ॥४॥
म्हणविती देव आपणा तोवरी । जव नाही वरी कोपलो मी ॥५॥
मीपणे हा देव न कळेचि त्यांसी । अभिमाने रासि गर्वाचिया ॥६॥
अभिमान राशी जयाचिये ठायी । तुका म्हणे तई देव दुरी ॥७॥
४५६३ पृ ७६५ (शासकीय), ३८६४ पृ ६८० (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
५७
देव त्या फावला गोपाळा । नाही तेथे कळा अभिमान ॥१॥
नाडली आपल्या आपणचि एके । संदेहदायके बहु फार ॥२॥
फार चाळविली नेदी कळो माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥
विश्वासावाचूनि कळो नये खरा । अभक्ता अधीरा जैसा तैसा ॥४॥
जैसा भाव तैसा जवळी त्या दुरी । तुका म्हणे हरि देतो घेतो ॥५॥
४५६४ पृ ७६५ (शासकीय), ३८६५ पृ ६८१ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
५८
तो या साच भावे न कळेचि इंद्रा । म्हणउनि धारा घाली मेघा ॥१॥
घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरी अवचिता देखियेला ॥२॥
देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥
विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ म्हणती केला ॥४॥
लागले से गोड न कळे ते काळी । भेणे वनमाळी आठविती ॥५॥
आता कायकैसा करावा विचार । गोधनासी थार आपणिया ॥६॥
यांचिया विचारे होणार ते काई । तुका म्हणे ठायी वेडावली ॥७॥
४५६५ पृ ७६५ (शासकीय), ३८६६ पृ ६८१ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
५९
वेडावली काय करावे या काळी । म्हणे वनमाळी गोपाळांसी ॥१॥
शिरी धरू गोवर्धन उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊ नका ॥२॥
नका सांडू कोणी आपला आवांका । मारिता या हाका आरोळिया ॥३॥
अशंकित चित्ते न वटे त्या खरे । धाकेच ते बरे म्हणती चला ॥४॥
चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका म्हणे घात होऊ नेदी ॥५॥
४५६६ पृ ७६५ (शासकीय), ३८६७ पृ ६८१ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
६०
नेदी दुःख देखो दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधी ॥१॥
आधी पुढे शुध्द करावा मारग । दासा मागे मग सुखरूप ॥२॥
पर्वतासि हात लाविला अनंते । तो जाय वरते आपेआप ॥३॥
आपल्या आपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥४॥
निमित्य करूनि करावे कारण । करिता आपण कळो नेदी ॥५॥
दिनाचा कृपाळू पतितपावन । हे करी वचन साच खरे ॥६॥
सांगणे न लगे सुखदुःख दासा । तुका म्हणे ऐसा कृपावंत ॥७॥
४५६६ पृ ७६५ (शासकीय), ३८६७ पृ ६८१ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
६१
कृपावंते हाक दिली सकळीका । माजिया रे नका राहो कोणी ॥१॥
निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥२॥
लाविले गोपाळ फेरी चहूकडे । हासे फुंदे रडे कोणी धाके ॥३॥
धाके ही सकळ निघाली भीतरी । उचलिला गिरी तयाखाली ॥४॥
तयाखाली गाई वत्से आली लोक । पक्षी सकळीक जीवजाति ॥५॥
जिही म्हणविले हरिचे अंकित । जातीचे ते होत कोणी तरी ॥६॥
जाति कुळ नाही तयासी प्रमाण । अनन्या अनन्य तुका म्हणे ॥७॥
४५६८ पृ ७६६ (शासकीय), ३८६९ पृ ६८२ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
६२
म्हणविती भक्त हरीचे अंकित । करितो अनंत हित त्यांचे ॥१॥
त्यांसी राखे बळे आपुले जे दास । कळिकाळासि वास पाहो नेदी ॥२॥
पाउस न येता केली यांची थार । लागला तुषार येऊ मग ॥३॥
येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारी शिळाचिये ॥४॥
शिळांचिये धारी वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरे ॥५॥
एक सरे गिरि धरिला गोपाळी । होतो भाव बळी आम्ही ऐसे ॥६॥
ऐसे कळो आले देवाचिया चित्ता । म्हणे तुम्ही आता हात सोडा ॥७॥
हासती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥८॥
दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलिता ॥९॥
भार आम्हा वरी घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥१०॥
निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहो कैसा गिरी धरितोसि ॥११॥
सिणले हे होते ठायींच्या त्या भारे । लटिकेचि खरे मानुनिया ॥१२॥
यांणी अंत पाहो आदरिला याचा । तुका म्हणे वाचा वाचाळ ते ॥१३॥
४५६९ पृ ७६६ (शासकीय), ३८७० पृ ६८२ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
६३
वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुले ते बळ वाखाणीती ॥१॥
बळे हुंबरती सत्य त्या न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥
आसुडिल्या माना हात पाय नेटे । तव भार बोटे उचलिला ॥३॥
लटिकाचि आम्ही सीण केला देवा । कळो आले तेव्हा सकळांसी ॥४॥
आले कळो तुका म्हणे अनुभवे । मग अहंभावे सांडवले ॥५॥
४५७० पृ ७६६ (शासकीय), ३८७१ पृ ६८२ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
६४
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणी ॥१॥
लोटांगणी आले होऊनिया दीन । मग नारायण म्हणे भले ॥२॥
भला आजी तुम्ही केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥
लागती चरणा सकळ ते काळी । आम्हा मध्ये बळी तूचि एक ॥४॥
एका तुजविण नयो आम्ही कामा । कळो कृष्णा रामा आले आजी ॥५॥
आजी वरी आम्हा होता अभिमान । नेणता चरण महिमा तुझा ॥६॥
तुझा पार आम्ही नेणो नारायणा । नखी गोवर्धना राखियेले ॥७॥
राखियेले गोकुळ आम्हा सकळांसी । दगडांच्या राशी वरुषता ॥८॥
वर्णावे ते काय तुझे महिमान । धरिती चरण सकळीक ॥९॥
सकळ ही तान विसरली भूक । सकळ ही सुख दिले त्यांसी ॥१०॥
त्यांसी कळो आला वैकुंठनायका । तुका म्हणे लोक निर्भर ते ॥११॥
४५७१ पृ ७६७ (शासकीय), ३८७२ पृ ६८३ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
६५
लोका कळो आला देव आम्हा मधी । टाकिली उपाधि तिही शंका ॥१॥
शंका नाही थोरा लाहाना जीवासी । कळला हा हृषीकेशी मग ॥२॥
मग मनी जाले निर्भर सकळ । संगे लोकपाळ कृष्णाचिया ॥३॥
कृष्णाचिया ओव्या गाणे गाती गीत । कृष्णमय चित्त जाले त्यांचे ॥४॥
त्यांसी ठावा नाही बाहेतील भाव । अंतरीच वाव सुख जाले ॥५॥
सुखे तया दिस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥६॥
चिंतनेचि धाली न लगे अन्नपाणी । तुका म्हणे मनी समाधान ॥७॥
४५७२ पृ ७६७ (शासकीय), ३८७३ पृ ६८३ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
६६
समाधान त्यांची इंद्रिये सकळ । जया तो गोपाळ समागमे ॥१॥
गोविंदाचा जाला प्रकाश भीतरी । मग त्या बाहेरी काय काज ॥२॥
काज काम त्यांचे सरले व्यापार । नाही आप पर माझे तुझे ॥३॥
माया सकळांची सकळां ही वरी । विषय ते हरि दिसो नेदी ॥४॥
दिसे तया आप परावे सारिखे । तुका म्हणे सुखे कृष्णाचिया ॥५॥
४५७३ पृ ७६७ (शासकीय), ३८७४ पृ ६८३ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
६७
कृष्णाचिया सुखे भुक नाही तान । सदा समाधान सकळांचे ॥१॥
कळलेचि नाही जाले किती दिस । बाहेरील वास विसरली ॥२॥
विसरु कामाचा तुका म्हणे जाला । उद्वेग राहिला जावे यावे ॥३॥
४५७४ पृ ७६७ (शासकीय), ३८७५ पृ ६८३ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
६८
जावे बाहेरी हा नाठवे विचार । नाही समाचार ठावा काही ॥१॥
काही न कळे ते कळो आले देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥
कवतुकासाठी भक्त देहावरी । आणिताहे हरि बोलावया॥३॥
यांसी नाव रूप नाही हा आकार । कळला साचार भक्तां मुखे ॥४॥
मुखे भक्तांचिया बोलतो आपण । अंगसंगे भिन्न नाही दोघा ॥५॥
दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥
तयासी घडली सकळ ही पापे । भक्तांचिया कोपे निंदा द्वेषे ॥७॥
द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेवी प्राणा नाश करी ॥८॥
करिता आइके निंदा या संतांची । तया होती तेचि अधःपात ॥९॥
पतन उध्दार संगाचा महिमा । त्यजावे अधमा संत सेवी ॥१०॥
संतसेवी जोडे महालाभरासी । तुका म्हणे यासी नाश नाही ॥११॥
४५७५ पृ ७६७ (शासकीय), ३८७६ पृ ६८४ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
६९
नाही नाश हरि आठविता मुखे । जोडतील सुखे सकळ ही ॥१॥
सकळी ही सुखे वोळली अंतरी । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥
येऊ विसरली बाहेरी गोपाळे । तल्लीन सकळे कृष्णसुखे ॥३॥
सुख ते योगिया नाही समाधीस । दिले गाई वत्स पशु जीवा ॥४॥
वारला पाऊस केव्हा नाही ठावा । तुका म्हणे देवावाचूनिया ॥५॥
४५७६ पृ ७६८ (शासकीय), ३८७७ पृ ६८४ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
७०
यांसी समाचार सांगतो सकळा । चलावे गोकुळा म्हणे देव ॥१॥
देव राखे तया आडलिया काळे । देव सुखफळे देतो दासा ॥२॥
दासा दुःख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळता ॥३॥
नाही मेघ येता जाता देखियेला । धारी वरुषला शिळांचिये ॥४॥
एवढे भक्तांचे सांकडें अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥५॥
४५७७ पृ ७६८ (शासकीय), ३८७८ पृ ६८४ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
७१
काकुलती एके पाहाती बाहेरी । तया म्हणे हरि वोसरला ॥१॥
वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥
कवतुक जाले ते काळी आनंद । कळला गोविंद साच भावे ॥३॥
भावे तयापुढे नाचती सकळे । गातील मंगळे ओव्या गीत ॥४॥
गीत गाती ओव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥५॥
वत्से गाई पशु नाचती आनंदे । वेधलिया छंदे गोविंदाच्या ॥६॥
चित्त वेधियेले गोविंदे जयाचे । कोण ते दैवाचे तयाहुनि ॥७॥
तयाहुनि कोणी नाही भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥
गोविंदाचा संग तुका म्हणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळीचे ॥९॥
४५७८ पृ ७६८ (शासकीय), ३८७९ पृ ६८४ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
७२
गोकुळीची गती कोण जाणे परी । पाहो आला वरी इंद्रराव ॥१॥
इंद्रापाशी मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलो ॥२॥
आता जीव नाही सांगाया ते रानी । पुरिले पाषाणी शिळाधारी ॥३॥
रिता कोठे नाही राहो दिला ठाव । जल्पती तो भाव न कळता ॥४॥
न कळता देव बळे हुंबरती । साच ते पावती अपमान ॥५॥
माव न कळता केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥६॥
पाहता ते आहे जैसे होते तैसे । नाचती विशेषे तुका म्हणे ॥७॥
बाळक्रीडा अभंग
७३
नाचता देखिली गाई वत्से जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥
लागला पाऊस शिळांचिये धारी । वाचली ही परी कैसी येथे ॥२॥
येथे आहे नारायण संदेह नाही । विघ्न केले ठायी निर्विघ्न ते ॥३॥
विचारिता उचलिला गोवर्धन । अवतार पूर्ण कळो आला ॥४॥
आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचे ॥५॥
त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रम्हयासि ॥६॥
सीणता जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळा समागमे ॥७॥
समागमे गाई वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळिता अंगसंग ॥८॥
संग जाला मायबापां लोकपाळा । आळिंगिती गळा कंठाकंठ ॥९॥
करिते हे जाले स्तुती सकळीक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥
करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला ॥११॥
पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणे नादे ॥१२॥
नामाचे गजर गंधर्वा चीं गाणी । आनंद भुवनी न माये तो ॥१३॥
तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळी देवासी दोही ठायी ॥१४॥
दोही ठायी सुख दिले नारायणे । गेला दरुषणे वैरभाव ॥१५॥
भावना भेदाची जाय उठाउठी । तुका म्हणे भेटी गोविंदाचे ॥१६॥
४५८० पृ ७६९ (शासकीय), ३८८१ पृ ६८५ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
७४
गोविंदाचे नाम गोड घेता वाचे । तेथे हे कइंचे वैरभाव ॥१॥
भावे नमस्कार घातले सकळी । लोटांगणे तळी महीवरी ॥२॥
वरी हात बाहे उभारिली देवे । कळलीया भावे सकळांच्या ॥३॥
सकळ ही वरी बहुडविले स्थळा । चलावे गोपाळा म्हणे घरा ॥४॥
राहिली ही नाचो गोविंदाच्या बोले । पडिलीया डोले छंदे होती ॥५॥
छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसी ॥६॥
त्यांच्या तुका म्हणे आनंदे सकळ । ठेंगणे गोपाळ समागमे ॥७॥
४५८१ पृ ७६९ (शासकीय), ३८८२ पृ ६८६ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
७५
समागमे असे हरि नेणतिया । नेदी जाऊ वाया अंकितांसि ॥१॥
अंकिता सावध केले नारायणे । गोपाळ गोधने सकळीका ॥२॥
सकळही जन आले गोकुळासी । आनंद मानसी सकळांच्या ॥३॥
सकळांचा केला अंगीकार देवे । न कळता भावे वाचवी त्या ॥४॥
त्यां जाला निर्धार हरि आम्हांपासी । निवांत मानसी निर्भर ती ॥५॥
निर्भर हे जन गोकुळीचे लोक । केले सकळीक नारायणे ॥६॥
नारायण भय येऊ नेदी गांवा । तुका म्हणे नांवा अनुसरे त्या ॥७॥
४५८१ पृ ७७० (शासकीय), ३८८३ पृ ६८६ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
७६
अनुसरे त्यांसी फिरो नेदी मागे । राहे समागमे अंगसंगे ॥१॥
अंगसंगे असे कर्म साक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥२॥
फळपाकी देव देतील प्राणीये । तुका म्हणे नये सवे काही ॥३॥
४००८ पृ ६५५ (शासकीय), ३८८४ पृ ६८६ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
७७
ये दशे चरित्र केले नारायणे । रांगता गोधने राखिताहे ॥१॥
हे सोंग सारिले या रूपे अनंते । पुढे ही बहु ते करणे आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे । केला नारायणे अवतार॥३॥
४५८३ पृ ७७० (शासकीय), ३८८५ पृ ६८६ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
७८
अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥१॥
परपीडा करी दैत्य कंसराव । पुढे तो ही भाव आरंभिला ॥२॥
लाविले लाघव पाहोनिया संधी । सकळा ही वधी दुष्टजना ॥३॥
दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणि न साहती ॥४॥
न साहवे दुःख भक्तांचे या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥५॥
रूप हे चांगले रामकृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारिता ॥६॥
उच्चारिता नाम कंस वैरभावे । हरोनिया जीवे कृष्ण केला ॥७॥
कृष्णरूप त्यासी दिसे अवघे जन । पाहे तो आपण कृष्ण जाला ॥८॥
पाहिले दर्पणी आधील मुखासी । चतुर्भुज त्यासी तोचि जाला ॥९॥
जाली कृष्णरूप कन्या पुत्र भाज । तुका म्हणे राज्य सैन्य जन ॥१०॥
४५८४ पृ ७७० (शासकीय), ३८८६ पृ ६८६ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
७९
सैन्य जन हासे राया जाले काई । वासपे तो ठायी आपणासी ॥१॥
आपणा आपण जयास ती तैसी । वैरभाव ज्यांसी भक्ति नाही ॥२॥
नाही याचा त्याचा भाव एकविध । म्हणऊनि छंद वेगळाले ॥३॥
वेगळाल्या भावे ती तया हासती । तयास दिसती अवघी हरि ॥४॥
हरिला कंसाचा जीव भाव देवे । द्वेषाचिया भावे तुका म्हणे ॥५॥
४५८५ पृ ७७० (शासकीय), ३८८७ पृ ६८७ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
८०
द्वेषाचिया ध्याने हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक ॥१॥
देहादिक कर्मे अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥
नारायण जोडे एकविध भावे । तुका म्हणे जीवे जाणे लागे ॥३॥
४५८६ पृ ७७१ (शासकीय), ३८८८ पृ ६८७ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
८१
जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हासे कंसा ॥१॥
सावध करिता नये देहावरी । देखोनिया दुरी पळे जन ॥२॥
जन वन हरि जालासे आपण । मग हे लोचन झाकियेले॥३॥
झाकुनि लोचन मौन्ये चि राहिला । नाही आता बोलायाचे काम ॥४॥
बोलायासि दुजे नाही हे उरले । जन कृष्ण जाले स्वये रूप ॥५॥
रूप पालटले गुण नाम याती । तुका म्हणे भूती देव जाला ॥६॥
४५८७ पृ ७७१ (शासकीय), ३८८९ पृ ६८७ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
८२
जालो स्वये कृष्ण आठव हा चित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥
उरली आहे रूप नाव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥
तोवरी हा देव नाही तयापासी । आला दिसे त्यासी तोचि देव ॥३॥
देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरी तो भयाभीत भेदे ॥४॥
भेदे तुका म्हणे अंतरे गोविंद । साचे विण छंद वाया जाय ॥५॥
४५८८ पृ ७७१ (शासकीय), ३८९० पृ ६८८ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
८३
वाया तैसे बोल हरिशी अंतर । केले होती चार भयभेदे ॥१॥
भेदभय गेले नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा जाली ॥२॥
जाली भेटी कंसा हरीशी निकट । सन्मुखचि नीट येरयेरा ॥३॥
येरयेरा भेटी युध्दाच्या प्रसंगी । त्याचे शस्त्र अंगी हाणितले ॥४॥
त्याचे वर्म होते ठावे या अनंता । तुका म्हणे सत्तानायक हा ॥५॥
४५८९ पृ ७७१ (शासकीय), ३८९१ पृ ६८८ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
८४
नारायणे कंस चाणूर मर्दिला । राज्यी बैसविला उग्रसेन ॥१॥
उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभक्ताचा ॥२॥
अवघेचि केले कारण अनंते । आपुलिया हाते सकळ ही ॥३॥
सकळ ही केली आपुली अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसी ॥४॥
मथुरेसी आला वैकुंठनायक । जाले सकळीक एक राज्य ॥५॥
राज्य दिले उग्रसेना शरणागता । सोडविली माता पिता दोन्ही ॥६॥
सोडवणे धावे भक्ताच्या कैवारे । तुका म्हणे करे शस्त्र धरी ॥७॥
४५९० पृ ७७१ (शासकीय), ३८९२ पृ ६८८ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
८५
धरी दोही ठायी सारखाचि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥
दोन्ही एके ठायी केल्या नारायणे । वाढविला तिणे आणि व्याली ॥२॥
व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणे मायबापा ॥३॥
माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासी ॥४॥
कोण जाणे याचे अंतरीचा भाव । कळो नेदी माव तुका म्हणे ॥५॥
४५९१ पृ ७७१ (शासकीय), ३८९३ पृ ६८८ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
८६
दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥
हासे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये पराकृत म्हणो यासी ॥२॥
यासी कळावया एक भक्तिभाव । दुजा नाही ठाव धांडोळिता ॥३॥
धांडोळिता श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपीसवे ॥४॥
गोपिकाची वाट पाहे द्रुमातळी । मागुता न्याहाळी न देखता ॥५॥
न देखता त्यासी उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळा ॥६॥
वेळोवेळा पंथ पाहे गोपिकाचा । तुका म्हणे वाचा नातुडे तो ॥७॥
४५९२ पृ ७७२ (शासकीय), ३८९४ पृ ६८८ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
८७
तो बोले कोमळ निष्ठुर साहोनि । कोपता गौळणी हास्य करी ॥१॥
करावया दास्य भक्तांचे निर्लज्ज । कवतुके रज माथा वंदी ॥२॥
दिले उग्रसेना मथुरेचे राज्य । सांगितले काज करी त्याचे ॥३॥
त्यासी होता काही अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥
शरणागता राखे सर्व भावे हरि । अवतार धरी तयासाठी ॥५॥
तया साठी वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥
तळमळ नाही तुका म्हणे चित्ता । भक्तांचा अनंता भार माथा ॥७॥
४५९३ पृ ७७२ (शासकीय), ३८९५ पृ ६८९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
८८
मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥
ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥
वारिले ते दूतीयमाचिया दंडी । नुच्चरिता तोंडी नारायण ॥३॥
नारायण नाम नावडे जयासी । ते जाले मिरासी कुंभपाकी ॥४॥
कुंभपाकी सेल मान तो तयांचा । तुका म्हणे वाचा संतनिंदा ॥५॥
४५९४ पृ ७७२ (शासकीय), ३८९६ पृ ६८९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
८९
वास नारायणे केला मथुरेसी । वधूनि दुष्टांसी तये ठायी ॥१॥
ठायी पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोका ॥२॥
लोका दुःख नाही मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांनी ॥३॥
देखोनिया देवा विसरली कंसा । ठावा नाही ऐसा होता येथे ॥४॥
येथे दुजा कोणी नाही कृष्णाविणे । ऐसे वाटे मने काया वाचा ॥५॥
काया वाचा मन कृष्णी रत जाले । सकळा लागले कृष्णध्यान ॥६॥
ध्यान गोविंदाचे लागले या लोका । निर्भर हे तुका म्हणे चित्ती॥७॥
४५९५ पृ ७७२ (शासकीय), ३८९७ पृ ६८९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
९०
चिंतले पावली जया कृष्णभेटी । एरवी ते आटी वायाविण ॥१॥
वासना धरिती कृष्णाविणे काही । सीण केला तिही साधनांचा ॥२॥
चाळविले डंबे एक अहंकारे । भोग जन्मांतरे न चुकती ॥३॥
न चुकती भोग तपे दाने व्रते । एका त्या अनंतेवाचूनिया ॥४॥
चुकवुनि जन्म देईल आपणा । भजा नारायणा तुका म्हणे ॥५॥
४५९६ पृ ७७३ (शासकीय), ३८९८ पृ ६८९ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
९१
भजल्या गोपिका सर्व भावे देवा । नाही चित्ती हेवा दुजा काही ॥१॥
दुजा छंदु नाही तयांचिये मनी । जागृति स्व्प्नी कृष्णध्यान ॥२॥
ध्यान ज्या हरीचे हरीसी तयांचे । चित्त ग्वाही ज्यांचे तैशा भावे ॥३॥
भाग्ये पूर्वपुण्ये आठविती लोक । अवघे सकळीक मथुरेचे ॥४॥
मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथे नारायण राज्य करी ॥५॥
राज्य करी गोपीयादवांसहित । कर्मिले बहुतकाळ तेथे ॥६॥
तेथे दैत्यी उपसर्ग केला लोका । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥
४५९७ पृ ७७३ (शासकीय), ३८९९ पृ ६९० (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
९२
रचियेला गाव सागराचे पोटी । जडोनि गोमटी नानारत्ने ॥१॥
रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥
कळा सकळ ही गोविंदाचे हाती । मंदिरे निगुती उभारिली ॥३॥
उभारिली दुर्गें दारवंठे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥
शोभले उत्तम गाव सागरात । सकळा सहित आले हरि ॥५॥
आला नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणी ॥६॥
निवडीना याति समानचि केली । टणक धाकुली नारायणे ॥७॥
नारायणे दिली अक्षई मंदिरे । अभंग साचारे सकळांसी ॥८॥
सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥
रचिले ते देवे न मोडे कवणा । बळियाचा राणा नारायण ॥१०॥
बळबुध्दीनीति देवाच सारिखी । तुका म्हणे मुखी गाती ओव्या ॥११॥
४५९८ पृ ७७३ (शासकीय), ३९०० पृ ६९० (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
९३
गाती ओव्या कामे करिता सकळे । हालविता बाळे देवावरी ॥१॥
ॠध्दिसिध्दी दासी दारी ओळंगती । सकळ संपत्ति सर्वा घरी ॥२॥
घरी बैसलिया जोडले निधान । करिती कीर्तन नरनारी ॥३॥
नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयासी संगती गोविंदाची ॥४॥
गोविंदे गोविंद केले लोकपाळ । चिंतने सकळ तुका म्हणे ॥५॥
४५९९ पृ ७७४ (शासकीय), ३९०१ पृ ६९० (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
९४
काही चिंता कोणा नाही कोणेविशी । करी द्वारकेसी राज्य देव ॥१॥
द्वारकेसी राज्य करी नारायण । दुष्ट संहारून धर्म पाळी ॥२॥
पाळी वेदआज्ञा ब्राम्हणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचे ॥३॥
अतीत अलिप्त अवघिया वेगळा । नाही हा गोपाळा अभिमान ॥४॥
अभिमान नाही तुका म्हणे त्यासी । नेदी आणिकांसी धरू देव ॥५॥
४६०० पृ ७७४ (शासकीय), ३९०२ पृ ६९० (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
९५
धरियेले रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रम्ह क्षिती उतरले ॥१॥
उत्तम हे नाम राम कृष्ण जगी । तरावयालागी भवनदी ॥२॥
दिनानाथ ब्रिदे रुळती चरणी । वंदितील मुनी देव ॠषि ॥३॥
ॠषी मुनी भेटी दिली नारायणे । आणीक कारणे बहु केली ॥४॥
बहु कासावीस जाला भक्तांसाटी । तुका म्हणे आटी सोसियेली ॥५॥
४६०१ पृ ७७४ (शासकीय), ३९०३ पृ ६९१ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
९६
सोसियेला आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागविता ॥१॥
वाहोनि सकळ आपुलिये माथा । भार दासा चिंता वाहो नेदी ॥२॥
नेदी काळाचिये हाती सेवकासी । तुका म्हणे ऐसी ब्रिदावळी॥३॥
४६०२ पृ ७७४ (शासकीय), ३९०४ पृ ६९१ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
९७
ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणी । पाउले मेदिनी सुखावे त्या ॥१॥
सुखावे मेदिनी कृष्णाचिये चाली । कुंकुमे शोभली होय रेखा ॥२॥
होउनि भ्रमर पाउलांचे सुख । घेती भक्त मुख लावूनिया ॥३॥
याचसाटी धरियेला अवतार । सुख दिले फार निजदासा ॥४॥
निज सुख तुका म्हणे भक्ता ठावे । तींही च जाणावे भोगू त्यासी ॥५॥
४६०३ पृ ७७४ (शासकीय), ३९०५ पृ ६९१ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
९८
भोगिला गोपिका यादवा सकळा । गौळणीगोपाळा गाईवत्सा ॥१॥
गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरी ॥२॥
भक्ति नवविधा तयांसी घडली । अवघीच केली कृष्णरूप ॥३॥
रूप दाखविले होता भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाही ॥४॥
नाही राहो दिले जाता निजधामा । तुका म्हणे आम्हांसहित गेला ॥५॥
४६०४ पृ ७७४ (शासकीय), ३९०६ पृ ६९१ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
९९
गेला कोठे होता कोठुनिया आला । सहज व्यापला आहे नाही ॥१॥
आहे साच भावे सकळव्यापक । नाही अभाविक लोका कोठे ॥२॥
कोठे नाही ऐसा नाही रिता ठाव । अनुभवी देव स्वये जाले ॥३॥
जातो येतो आम्ही देवाचे सांगात । तुका म्हणे गात देवनाम ॥४॥
४६०५ पृ ७७५ (शासकीय), ३९०७ पृ ६९१ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
१००
मना वाटे तैसी बोलिलो वचने । केली धिटपणे सलगी देवा ॥१॥
वाणी नाही शुध्द याति एक ठाव । भक्ति नेणे भाव नाही मनी ॥२॥
नाही जाले ज्ञान पाहिले अक्षर । मानी जैसे थोर थोरी नाही ॥३॥
नाही मनी लाज धरिली आशंका । नाही भ्यालो लोका चतुरांसी ॥४॥
चतुरांच्या राया मी तुझे अंकित । जालो शरणागत देवदेवा ॥५॥
देवा आता करी सरतीही वचने । तुझ्या कृपादाने बोलिलो ती ॥६॥
तुझे देणे तुझ्या समर्पूनि पायी । जालो उतरायी पांडुरंगा ॥७॥
रंकाहुनि रंक दास मी दासांचे । सामर्थ्य हे कैचे बोलावया ॥८॥
बोलावया पुरे वाचा माझी कायी। तुका म्हणे पायी ठाव द्यावा ॥९॥
४६०६ पृ ७७५ (शासकीय), ३९०८ पृ ६९२ (शिरवळकर)
बाळक्रीडा अभंग
१०१
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥
चहु युगांचे हे साधन साधिले । अनुभवा आले आपुलिया ॥२॥
एवढे करूनि आपण निराळा । प्रत्यक्ष डोळा दाखविले ॥३॥
दावुनि सकळ प्रमाणाच्या युक्ति । जयजयकार करिती अवघे भक्त ॥४॥
भक्ति नवविधा पावली मुळची । जनार्दननामाची संख्या जाली ॥५॥
नवसे ओव्या आदरे वाचिता । त्याच्या मनोरथा कार्यसिध्दि ॥६॥
सीमा न करवे आणीक ही सुखा । तुका म्हणे देखा पांडुरंगा ॥७॥
४६०७ पृ ७७५ (शासकीय)