धरणेकऱ्याचे अभंग

बाबाजी गणेश परांजपे

भगवद्‌भक्तशिरोमणी श्रीतुकाराम महाराज यांच्या कवित्वाबद्दल प्रत्येक लेखकानें कांहीं तरी बाहेरच्या कल्पना उसन्या आणून त्या झरोक्यांतून अभंगाकडे पाहिलेलें आढळतें, पण कोणाहि लेखकानें महाराजांनीं स्वतः आपल्या कवित्वाबद्दल काय लिहिलें किंवा म्हटलें आहे हें फारसें लक्ष्यात घेतलेलें दिसत नाहीं. याती शुद्र वंश या अभंगांत कवित्वस्फूर्ति केव्हां झाली तें दिलें आहे. श्रीपंढरीनाथ व नामदेवराय यांनी स्वप्नांत जागे करून नामदेवांचे अपुरे राहिलेलें काम तडीस लावण्याचें महाराजांवर सोपविलें असें वृत्त दुसऱ्या दोन अभंगांत सांगितलें आहे. तेव्हां हे अभंग अपक्व स्थितींतील वगैरे म्हणणें अज्ञानाचें द्योतक आहे. प्रसंगोपात स्वतःच्या कवित्त्वाबद्दल महाराजांचे काय उद्गार होते हें वरवर पाहिलें तरी नित्याचे चरित्र व काव्यविवेचनाचे नियम या उद्गारांस लावतां येणार नाहींत येवढें कोणासहि कबूल करावें लागेल.

बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे
२०-०७-१८८९ ते २१-१२-१९५३

करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥

काय मी पामर जाणें अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदे ॥

निमित्त मापासी बैसविलों आहे । मी तो कांहीं नव्हें स्वामिसत्ता ॥

*****

प्रसादाचि वाणी वदे ती उत्तरें । नाहीं मतांतरें जोडियेलीं ॥

*****

आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥

साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥

तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरी वेदांत वाहे पाणी ॥

*****

बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जाती कुळ ॥

वाचेचा चालक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥

*****

कृपा या केली संतजनीं । माझी अलंकारिली वाणी ॥

*****

विठ्ठलाचे नाम घेतां जालें सुख । गोडावलें मुख तुका म्हणे ॥

*****

पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥

हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप अमृताचें जळ ॥

तुका म्हणे थोर पुण्यें । ओघ आला पंथे येणें ॥

*****

फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥

*****

निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥

*****

तूं बोलसी माझे मुखें । मी तो तुजमाजी सुखें ॥

वर जे थोडेसेच उद्गार दिले आहेत त्यांवरून आपल्या मुखाचा उपयोग करून श्रीहरीच बोलत आहे अशी महाराजांची स्वत:ची प्रचिती होती. आपल्या वाचेस संतवचनांचा अलंकार झाला आहे व नामघोषानें वाचा गोडावली आहे अशी त्यांची प्रचिती होती. अशी ही संतवचनांनी अलंकारिलेली, नामघोषानें गोडावलेली वाचा हरिगुणगान करण्यांत तल्लीन होई, तेव्हां हरिनाम वेलीस भक्तिप्रेसुखाचीं जीं फळें लागत ते हे अभंग होत, हे अभंग महाराज कीर्तनांत सहज स्फृर्तीनें म्हणत किंवा अगोदरं अभंग रचिलेले असून पुढें कीर्तनांत विषय प्रतिपादन करित असतांना तो विषय स्पष्ट व्हावा, श्रोत्यांस लक्ष्यांत ठेवण्याची सोय व्हावी म्हणून अभंगांत गोवीत हें समजण्यास सध्यां तरी कांहीं साधन नाहीं. तसेंच कोणत्या अभंगानंतर कोणता अभंग रचला गेला हें समजण्यासहि कांहीं साधन नाहीं. तसेंच बहुतेक अभंग सुट्टे सुट्टे असल्यामुळें महाराजांची कीर्तनाची रीती काय होती, ते रसपरिपोष, विषयप्रतिपादन कसें करीत, श्रोत्यांस एखादा विषय समजावून कसा देत हें समजण्यास आज साधन नाहीं. नाहीं म्हणावयास (1) वह्या बुडविल्या व तरल्या त्यावेळचे अभंग (2) श्रीपंढरीरायास पाठविलेलें पत्र; ज्यांच्याबरोबर पत्र पाठविलें त्यांची वाट पाहणें; ते आल्याचा आनंद (3) निर्याणाचे अभंग (4) चिंचवडच्या देवाकडे गेले त्यावेळचे अभंग (5) स्त्रीभ्रतार संवाद (6) धरणेकऱ्याचे अभंग अशीं कांही प्रासंगिक प्रकरणें प्रचलित गाथ्यांतून उपलब्ध आहेत; त्यांवर सध्यां तरी आपण आपली जिज्ञासा तृप्त करुन घेतली पाहिजे.

धरणेंकऱ्याचे अभंग

हें प्रासंगिक प्रकरणांपैकींच एकतीस अभंगांचें एक अपूर्व व अमूल्य असें रत्न आहे. संत व भक्त चरित्रकार महिपीबोवा यानीं या प्रकरणाची थोडी पूर्वपिठीका दिलेली आहे. ती अशी :- एकदां बीड परगण्याचा ब्राह्मण देशपांडे पंढरीस पुराण व्युत्पत्ति प्राप्त व्हावी म्हणून अन्नपाणी वर्ज्य करून धरणें धरून बसला. दहा दिवस असें तामसी अनुष्ठान झाल्यावर त्यांस स्वप्नांत असें सांगण्यांत आलें कीं आळंदीस जावें व श्रीज्ञानेश्वरांचें अनुष्ठान करावें, ते जी युक्ती सांगतील ती ऐकली असतां मनोरथ पूर्ण होतील. तेथून तो ब्राह्मण आळंदीस येवून अन्नपाणी वर्ज्य करून बसला. अशा तऱ्हेंनें बारा दिवस तामसी अनुष्ठान झाल्यावर त्यास स्वप्नांत पुन: आज्ञा झाली कीं देहूस त्वरित जावें, तेथें जगदोध्दारार्थ श्रीनामदेवांचे साक्षात् अवतार श्रीतुकाराम अवतरले आहेत, ते तुला जो अनुग्रह करतील त्यावर विश्वास ठेवून वागला तर तुझें कार्य सुफल होईल. जागा होऊन ब्राह्मण स्वप्नांतील दृष्टांत मनाशीं आठवूं लागला तोंच मनांत विकल्प उत्पन्न झाला कीं देहूचा तुकशेटवाणी तर आहे शूद्रा मी आहे ब्राह्मण, व मला शास्त्रव्युत्पत्ति प्राप्त होऊन पुराण वेदांत सांगतां यावें ही इच्छा, तेव्हां हें घडावें कसें ? पण स्वप्नांत आज्ञाच झालेली तेव्हां तो तसाच देहूस गेला व त्यानें आपली मनीषा महाराजांस सांगितली. त्याच सुमारास अहमदाबादेच्या एका व्यापाऱ्यानें एक नवस श्रीज्ञानेश्वर महाराजांस केला होता तो फेडण्यासाठीं तोहि आळंदीस आला होता. त्यानें नवस केलेला ऐवज एका नारळांत घालून श्रीज्ञानेश्वर महाराजांपुढें ठेवला, तेव्हां त्यासहि आज्ञा झाली कीं हा नारळ देहूस तुकशेटवाणी यांच्या पुढें नेऊन ठेव म्हणजे आम्हांस पावेल; त्यानें तें श्रीफळ श्रीतुकोबारायापुढें ठेविलें. देहूस बीडचा देशपांडे ब्राह्मण येवून त्यानें आपलें वृत्त, मनीषा महाराजांस सांगितली म्हणून महिपतीबोवानीं म्हटलें आहे परंतु त्यानें काय सांगितलें हें महिपतबोवानीं दिलेलें नाहीं त्या बद्दल अनुमानच बांधलें पाहिजे व तें महाराजांच्या अभंगांवरूनच बांधले पाहिजे.

त्या ब्राह्मणास मोक्ष हवा होता. त्यासाठीं विद्या शिकण्यास - विद्या शिकण्याचें वय गेलें होतें तरी - तो तयार होता. वेदशास्त्रें, पुराणें शिकावींत, पडतील तीं उपासपारणीं करण्यास, योगयाग करण्यास सांगतील ते विधिनिषेध सांभाळण्यास, उपास करून, अन्न सोडून शरीर कष्टविण्यास, तो तयार होता. व भवसागरांतून पार तरून जाण्याचा शास्त्रोक्त मार्ग तो शोधीत होता. या सर्व लक्षणांवरून असें दिसतें की त्यानें कोठेतरी नरदेहाचें सार्थक मोक्ष असें कथा कीर्तनांत ऐकलें असावें; व मोक्ष मिळविण्याचे कांहीं देहदंडणाचे उपासतापास करण्याचे मार्ग अमूक अमूक; ज्ञानाचे ग्रंथाध्ययन, वेदपठण हेहि मार्ग त्यास कोणी सांगितले असावेत. कदाचित् एखाद्या जगन्नाथ किंवा वामन पंडितासारख्यांच्या पांडित्यानें तो दिपला असावा. एखाद्या गाढया विद्वानाच्या गाडाभर पोथ्या व त्याचे ब्रह्ममायेचे वाद ऐकून तो स्तंभित झाला असावा; एखाद्या आत्मनिष्ठ जीवनमुक्त यांच्या योगबळाच्या गोष्टी ऐकून तो चकित झाला असावा. पण आपण काय मागतों तें समजो कां न समजो पण मला मोक्ष हवा असें तो म्हणत होता. तरीहि त्याचा त्यांत अंतस्थ हेतु कांहीं वेगळाच होता हें स्पष्ट आहे.

तो ब्राह्मण आपले वृत्त महाराजांस सांगत होता त्यावेळीं त्याचे अंतरंग महाराजांचे लक्ष्यांत आलें नसेल असें नाहीं. पण कळून अगर न कळून पण तो मोक्षासाठीं लालचावलेला होता, श्रीपंढरीनाथाच्या आज्ञेनें श्रीज्ञानोबा रायांच्या अपुज्ञेनें आलेला, तेव्हां त्या धरणेकऱ्याची आर्तता पाहून महाराजांचें अंत:करण प्रवलें असल्यास नवल नाहीं. ते मोक्ष देण्यास (पुरुषार्थ सिध्दी चौथी । घेवोनि आपुले हातीं । निघाला भक्तीपंथी । जगा देत ) समर्थ होते. तेव्हां या धरणेकऱ्यानें धरणें कशासाठीं धरले आहे हें मनांत आणुन त्याचें सांकडें फेडण्यासाठीं प्रेममूर्ति श्रीपंढरीनाथानें प्रेम व ज्ञानमूर्ति श्रीज्ञानराजानें ज्ञान द्यावें म्हणून उभयतांचा धांवा त्यांनीं आरंभिला. हे धाव्याचे अभंग सात आहेत. या सात अभंगांतील पहिल्या दोंन अभंगांत श्रीपंढरीयास आळविलें आहे; पण अनंत रुपानीं व अनंत वेषांनीं, गुणांनीं मंडित असलेल्या श्रीहरीनें याप्रसंगी कोणत्यारूपानें-गुणानें-प्रगट व्हावें हेंहि खुबीनें सुचविलें आहे. पतितपावन, अनाथांचा कैवारी, उदार, कृपावंत, विश्वभंर, सत्ताधीश अशा अर्थपूर्ण विशेषणांनीं आळवून- 'या आळवण्याचे प्रयोजन काय हें तुला न सांगता समजलेंच असेल कीं :- या (आळी) धरणेंकऱ्यांचें समाधान करावयाचें आहे. तेव्हां मला अभयदान असावें (बाकी मी तरी काळजी कां करावी? ) तूंच दोन्हीं ठिकाणीं खेळतो आहेस. पण नारायणा, एवढें माझें करुणेचें वचन ऐकच या धरणेंकऱ्याचें समाधान करावयास उपदेश करावा-असा कांहीं माझा अधिकार नाहीं. मी कांहीं असा मोठा भक्त लागून गेलों नाहीं कीं मी कोणासाठीं पुण्य खर्च करीन; कारण तसें पुण्यहि माझें गाठीं नाहीं, पण एवढें खरें कीं माझ्या नांवाचा (भक्त म्हणून) डांगोरा झाला आहे खरा पण देवा, ही उपाधी तुम्हीं कांही वाढविलीत !हेंहि खरेंच तुमचे सत्तेशिवाय माझी वाचा दुसरे कोण वदविणार तेव्हां मी या काळजीबद्दल तसा उदास आहे.

लहरीवर लहरी याव्यात तसा प्रेमाच्या आळविण्याचा हा ओघ चार अभंग पुरे होऊन पांचव्या अभंगाच्या मध्यावर कांहीं तरी साक्ष पटली असावी, कारण पुढील चरणांत

'तुम्ही दिला धीर । तरी मन जालें स्थीर ॥'

अशा स्पष्ट शब्दांत मनस्थितींत-प्रियचितींत-झालेला फरक नमूद केला आहे. यापुढें कसें करूं, काय करूं ही वृत्ति नसून प्राप्त कर्म करण्याची तयारी स्पष्ट आहे 'मला आड करून आपण बोलणार हें तुम्ही, देवा तुम्ही आपल्या लेंकराचें कोड (कौतुक) करतहांत हेंहि मी जाणतों पण कौतुक झालें म्हणून काय झालें ? मी काय तुमच्याहून शहाणा लागून गेलों आहे कीं मी उपदेश करण्याचा अतिप्रसंग करावा. बाकी मी बोलणार ती वाणी तुमचीच आहे म्हणा (हें देवा तुमचें कौतुक झालें) पण श्रीज्ञानेश्वराजवळ काय वाण पडली कीं त्यानी धरणेरी येथें पाठवावा ! पण हें लिखित (पत्र) वाचून ही गोष्ट लक्ष्यांत आली. बाकी एवढें खरें धनी काय करावयाचें तें लक्ष्यांत आणून ती गोष्ट सेवकाकडून वदवितो. मी तराळ म्हणजे ओझें हलकें करणारा हमाल आहे, तेव्हां तुम्ही जें बोधरूपीं अन्न द्याल तें खावून मी राहीन असें म्हणून मी पायावर डोई ठेवितों. असा हा धांवा, नमन, मंगलाचरण, होऊन, पुढें अकरा अभंग उपदेशाचे आहेत.

नको कांहीं पडों ग्रंथांचिये भरी ।

(1) ग्रंथांच्या भरीस पडूं नको, देहभाव ओस पाडून देवास देवासाठीं आळवावें हेंच व्रत लवकर कर. याहून इतर साधनें काळाच्या तोंडी घालतील व गर्भवास चुकणार नाहीं, कारण साधनें करून मिळवावयाचा मोक्ष ही गोष्ट उधारीची आहे. पण त्यांत पतन हें मात्र निश्चित तुला तर वृध्दपणा गांठू आला, तेव्हां नामासाठीं उडी घालणाऱ्या श्रीपांडुरंगाचें नाम घे; श्रीपांडुरंग पैलथडीस निश्चयानें पाववितो.

नाहीं देवापाशीं मोक्षाचें गांठोळें ।

(2) आणून हातीं गांठोडें द्यावें असा कांहीं देवाजवळ मोक्ष नाहीं. मन व इंद्रियें यावर जय मिळविणें म्हणजे मोक्ष, उपास, पारणीं अक्षरांची अटाअटी यांनीं सत्कर्म होत असेल, व त्यास, फळहि येत असेल, पण त्यासाठीं आदरानें संकल्पहि वाहावे लागतात. तेव्हां दु:खें सहज जाणार. स्वप्नांत धाव पडावा व मनुष्य विव्हळत उठावा तसें जग विव्हळत आहे. त्याबरोबर तूहि विव्हळत आहेस. (सर्व विश्वाचें) मूळ जो ईश्वर त्याचेजवळ फळ आहे, तेव्हां त्वरित त्यातच शरण जावें (इतर साधनांच्या भरीस न पडतां).

त्यजिलें भेटवी आणुनी वासना।

(3) (व्रत करण्यास्तव हें सोड तें सोड असें केल्यानें) सोडलेल्या वस्तूंबद्दल वासना उत्पन्न होवून ती गोष्ट सारखी भेटत असते. (तेव्हां मी हा त्याग केला, तो त्याग केला) असलीं सोंगें जनांस दाखवून त्याचा काय उपयोग ? त्यापेक्षां आपण आपलें मन साक्षी करून, देवाची करूणा भाकून, त्यास आळवावें. त्यासाठीं कोठें दूर यावें जावें लागत नाहीं. कारण ज्यास आपला भाव कळावा तो अंतरी आहे व साक्षी आहे. तो कृपासिंधु असून तात्काळ भवबंध तोडतो.

गोविंद गोविंद। मनां बैसलियां छंद।

(4) माणसाच्या मनाला गोविंद गोविंद हा एकच छंद होवून बसला कीं फुलपांखराच्या ध्यासानें आळी फुलपांखरू बनते तशी त्या माणसाची काया गोविंद होते. देव व तो यांतील भेद नाहींसा होतो ; मन आनंदाने व डोळे प्रेमानें पाझरतात.

ज्याचें जया ध्यान। तेंचि होय त्याचें मन॥

(5) ज्यास ज्या गोष्टीचा ध्यास तसें त्याचें मन होतें. म्हणून सर्व बाजूस सारून-सर्वव्यापी पण विटेवर उभा, आकाशाहूनहि मोठा पण लहानाहूनहि लहान असा सम पाउलांचा पांडुरंग दृढ धरावा.

पाहोनियां ग्रंथ करावें कीर्तन।

(6) वेदपठण्याचें पर्यवसान हरिगुणगाण्यांत व श्रीहरीचे कीर्तनांत झालें तर योग्य फळ आलें म्हणावयाचें, नाहींतर व्यर्थ बडबड तेव्हढी पदरीं उरावयाची. तप, तीर्थाटणें, यज्ञ, याग, दान, धर्म यांच्या शेवटीं हरिनामानें बुध्दि स्थिर झाली तर या कार्यापासून सिध्दि झाली म्हणावयाची. नाहींतर हे सर्व काबाड (होत) तेव्हां यांतील सार (हरिगुणगान, हरिनामकीर्तन) तेव्हढेंच घे.

सुखें खावें अन्न। त्याचें करावें चिंतन।

(7) (अन्नत्याग वगैरे न करितां) श्रीहरीच्या चिंतनांत सुखानें अन्न खावें. म्हणजे ज्यानें अन्न दिलें त्यास तें पावतें व त्याचें फळ तेवढें आपणांस मिळतें. पांडुरंग विश्वाचा आधार आहे; त्याशिवाय रिता ठाव नाहीं असा भाव (अंतरांत) पसरूं दे.

संकोचोनी काय झालासी लहान।

(8) मी-माझा संसार-असें घरकुल केल्यानें (जीवाचा संकोच होतो) व (या अज्ञानानें) अंधार पडतो. (तेव्हां श्रीहरि हृदयसंपुटी सांठविल्यानें) संसारास आंचव व ब्रह्मांडाचा ध्यास कर. उगाच उशीर करूं नकोस. लहान मुलास हवी असेल ती गोष्टी दाखवाव्यात तसा हा संसार हा श्रीहरीचा खेळ आहे.

माझ्या बापें मज दिल्हेसे भातुकें।

(9) मी (माझा) बापा (श्रीज्ञानेश्वर) जवळ आळी करून त्यांचेपुढें कांहीं वचनें बोलतों, व त्यांनीं मला खाऊ दिला म्हणून कौतुकानें ही क्रीडा केली. हें जें तुझ्या वांटयास त्या क्रीडेचें फळ म्हणून ''उत्तम दान''आलें आहे तें घेवून आपल्या घरीं लवकर जा. श्रीज्ञानदेवांच्या नांवानें समुदाय गोळा कर, मी तेथें पायावर डोकें ठेवण्यास येतों.

ज्ञानियांचा तू राजा महाराव।

(10) हें (उपदेश करण्याचें) थोरपण मला कां म्हणून! पायींची वाहाण पायीं बरी. ब्रह्मादिकांनीं आपली बरोबरीं करण्याची हाव धरावी, तेथें इतरांची काय कथा! आपण ज्ञान्यांचे राजे (नव्हे) महाराजे व आपले नांव ज्ञानदेव! आपली उपदेश करण्याची खोच मला कशी साधणार । तेव्हां मी आपल्या पायांवर डोकें ठेवतों.

बोलिलीं उत्तरें । वेडीं वाकडीं लेंकरें ॥

(11) मी माझा अधिकार काय याचा विचार न करितां वेडींवाकडीं उत्तरें बोललों; महाराज आपण सिध्द आहांत, तरी हा अपराध क्षमा करा, व या सेवकास पायाजवळ ठेवा.

या अकरा अभंगात जो उपदेश केला आहे-जो पंथ सांगितला आहेत्तो 'आधीं केलें । मग सांगितलें । 'या वचनाप्रमाणें किंवा 'बोले तैसा चाले या वचनाप्रमाणें पाहिलें तरी महाराजांनीं स्वत:आक्रमिलेला मार्ग सांगितला आहे.हें त्यांचें चरित्र डोळयांपुढें आणलें तर लक्षांत येण्याजोगें आहे. शिवाय पंडित, वाचक, ज्ञानी यांना दुर्लभ असें जें भक्तिप्रेमसुख तें लाभण्याचें साधन या मार्गांत - या सिध्दपंथांत-सांगितलें आहे. अठरा अध्याय गीता सांगितल्यावर 'सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।'हा जो श्रीकृष्णांनीं अर्जुंनास उपदेश केला; तेथूनच महाराजांनीं केलेल्या उपदेशास सुरवात आहे.

’शरण देवासी जाये वेगीं’

कारण तूं ज्या फळाची (ज्ञानाची) इच्छा करून आहेस तें विश्वाचें मूळ जो श्रीहरी त्याचे जवळ आहे. तो कृपावंत आहे व भवबंध तात्काळ तोडतो अशी धरणेकऱ्यास कारणें सांगितलीं आहेत. 'आंधळा पांगुळ'म्हणून सहा अभंगांचें स्फुट प्रकरण आहे त्यांतहि सुरवात

'शरण आलो तुज आतां'

येथूनच-आहे.

'माझें मज आतां न देखे निरसतां ।'

ही स्थिति प्राप्त झाल्यावर 'जीवभाव तुज दिलां'व पुढें

'तारीं मारी करी भलतें दातारां'

असें होवून

'आतां तुझाचि ठेलों रे'

अशी अनन्यशरणागत स्थितीच प्राप्त होतें. नाटाचे अभंगांतहि

'माझा (बुध्दीचा) तंव खुंटला उपाय'

अशी प्रचीती आली

’म्हणोनि जालों शरणागत। तुझा दास मी अंकितं'

असें म्हटलें आहे.

शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना॥

भावें आलों लोटांगणीं । रुळे तुमचे चरणीं ॥

सांडियेली काया । वरी ओवाळुनि पाया ॥

तुका म्हणे शीर । ठेवियेलें पायांवर ॥

अशारीतीनें एकदां श्रीहरीस शरण गेल्यावर आपण त्याचे सांभाळीं लागतो अशा स्थितीत जीवाची रहणी कशी असावी याचें विवेचन श्रीज्ञानेश्वरींत बाराव्या अध्यायांत खालीलप्रमाणें केलें आहे.

परि मने वाचा देहें । जैसा जो व्यापार होए ।

तो मी करितु आह । ऐसें न म्हण ॥

करणें कां न करणें । आधवें तोचि जाणें ।

विश्व चलिजत असे जेणें । ऐसें जाण ॥

उणेया पुरयाचें कांही । उरों नेवी आपुलां ठाई ।

संजात चि करुनि घेई । जीवीत हे ॥

माळिये जेउतें नेले । तेउतें निवांत चि गेले ।

पाणिया ऐसें जालें । नाठवें हें ॥

तें येऱ्हविं तऱ्ही सुभटा । हें उजवूं कां अव्हांटा ।

या व्यर्थ खटपटा । करित आहे ॥

तरि प्रवृत्ति आणि निवृत्ति । इयें वोझीं नेवो मती ।

अखंड चित्तवृत्ति । आठवी मी ॥

आणि जें जें कर्म निफजे । तें थोडें बहुत न म्हणिजे ।

निवांतचि अर्पिजे । माझां ठाई ॥ 117-124

अशी ही आत्मसमर्पणाची पहिली पायरी व त्यांतील रहणी कशी याचें विवेचन श्रीज्ञानेश्वरीच्या आधारें झालें. ही रहणी चुटकीसरशी प्रत्येकांस साधेलच असें नाहीं. पण मी मीपणानें जोंवर जगांत वावरत होतों त्यावेळीं आपण आपल्यांत बुध्दीनें केलेला उपाय कुंठित झाला, तेव्हां श्रीहरीस शरण जावून त्याचे पायावर शीर ठेविलें कीं मग माझ्या कायिक-वाचिक-मानसिक उध्दाराचा तू काय उपाय करतोस तो पहातों, येवढेच जीवाचें काम उरतें.

असें माझें कोडें तुज हें सांकडे । मी असेन निवाडे सुखरुप ॥

बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥

तेव्हां आत्मसमर्पण केल्यावर, त्या धरणेंकऱ्यास भवसिंधुचें भय वाटून तो जसा ग्रंथाध्ययन, वेद पठण, यज्ञ, याग, उपास, पारणी, तप, तीर्थ, दानें, व्रत याबद्दल विचारावयास गेला तसें, जीवानें तळमळण्याचें कारण उरत नाहीं; कारण आपला भार-सांकडें- श्रीहरीस या साधनाच्या उपयुक्ततेबद्दल महाराजांचें मत असें कीं :-

माझे मज आता न देखे निरसता । म्हणऊन आधार केला ।

संसाराची आस सांडुनि लौकिक । जीव भाव तुज दिला ।

नव्हतीमाझीं कोणी मी कवणांचा । अर्थ मोहो सांडवला ।

तारी मारी करी भलते दातारा । होऊन तुझा आता ठेलो रे ॥१॥

असो माझे कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप ।

बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरी मायबाप ॥धृ॥

पापपुण्ये श्रुति आटिल्या। शास्त्रांस न लगे चि ठाव ।

विधिनिषिधें गोविली पुराणे वेदांसी तो अहंभाव ।

ओंकाराचे मूळ व्यापिले माया । तेथेन धरे च भाव ।

म्हणऊन काबाड सांडिले उपसतां ।

केलें काय ? तर

धरिले तुझे चि नांव ॥२॥

तनमनइंद्रिये ठेवूनि राहिलो । सर्व आशा तुझे पायी ।

तप तीर्थ दान करवू कवणा हाती। अधीन ते मज काई ।

आहिक्ये परत्रे चाड नाही सर्वथा । जन्म सदा मज देही ।

मायामोहपाश करी विष तैसे । तुका म्हणे माझ्या ठायी ।।

या महाराजांच्या वचनास आधार काय म्हणून जर कोणी विचारलें असतें तर त्यांनीं आपले मायबाप श्रीज्ञानेश्वर महाराज यांच्याशिवाय दुसरीकडे कोठें बोट दाखविलें असतें ? श्रीज्ञानेश्वरींत स्पष्टच म्हटलें आहे कीं :-

'स्वर्ग नरक ह्या वाट चोरांचिया ।'

'योग याग येणें नोहे सिध्दी । वायांचि उपाधी दंभधर्म ।'

योग याग करणाऱ्या दीक्षितांबद्दलचे उद्गार नमुनेदार आहेत.

आईके यया परि ते दीक्षित ।

यजुनि मातें याचित । स्वर्गभोग ॥

मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे ।

मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी तरे ।

आणि येवो लागती माघारे । मृत्यूलोका ॥

जैसा वेश्याभोगीं कवडा वेचे । मग दारहि चेपूं नये तियेचे ।

ऐसें लाजिरवाणें दीक्षिताचें । काइ सांगों ॥ 9 : 328, 329

आतां आणीक ही संप्रदायें । परी मातें नेणति समवायें ।

जे अग्निइंद्रसूर्य सोमाये । म्हणौनि यजिति ॥

तें हि कीर मातें चि होये । कां जें हें आधवें मीचि आहे ।

परी ते भजती उजिरी नोहे । विषम पडे । 9 : 344, 345

म्हणून करावें काय ? तर

तैसा मी तो यजावा । मीचि म्हणौनि ॥

महाराजांच्या उपदेशाचें सारसर्वस्वहि :-

'देवाचिये चाडे आळवावें देवा । वोस देहभावा पाडोनिया ।'

हेंच आहे.

आळवणें व गाणें यांत फरक आहे. गाणें म्हटलें कीं ताल, राग, स्वर वगैरे सर्वशास्त्र आलें, म्हणून महारांजांनी प्रत्येकाची सोडवणुक करून ठेविली आहे कीं :

नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥

नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥

देवापाशीं मागें आवडीची भक्ती । विश्वासेसी प्रीती भावबळें ॥

देव तुझ्या गोड बोलण्याला भुकेलेला आहे - सुस्वराला भुकेलेला नाहीं ; तेव्हां अंतर्यामींच्या ओलाव्याचें - जीवींच्या कळवळयाचें व आवडीच्या गोडीनें जय जय रामकृष्णहरि म्हण - म्हणजे आळव. भावार्थ असा नव्हे कीं आळवणें म्हणजे फुटक्या मडक्यासारखे बदसूर बेताल व ताशासारखे कर्कश, शिराताणून म्हटलेलेंच असावें, उलट आवडीच्या गोडीनें, अन्तर्यामींच्या कळवळयानें व श्रीहरी याबद्दलच्या पूज्यभावनेनें व कळवळीनें महाराजांच्या करुणापर किंवा नाटाच्या अभंगांच्या आधारें जें बोल बोलले जाणार त्या बोलानें देव डोलेल, तेथें माणसाची काय मातब्बरी ! यांतच एखाद्याचा आवाज गोड असून त्यास थोडें फार ताल, राग अनुरूप लावतां येईल इतकें शास्त्र कळत असेल तर दुधांत साखर पडावी तशी.

गायनाचे रंगीं । शक्ती अद्भुत हे अंगी ॥

हें तों देणें तुमचे देवा । घ्यावी अखंडीत सेवा ॥

असें म्हणून स्वत:स धन्य समजावें.

(1) श्रीपंढरीशा (2) अगा ये उदारा, या दोन्ही अभंगांत महाराजांनीं श्रीपंढरीशास आळविलें आहे. नाटाचे अभंगात पुष्कळसे अभंग आळविण्याचेच आहेत. फक्त महाराजांचेच घेतले तरी करुणापर अभंग सुमारें तीनशें आहेत. यांत कोठें तरी आपल्या विचाराचा, चित्तवृत्तीचा ठसा उमटलेला प्रत्येकास आढळेल; तो प्रत्येकाचा अभंग. शिवाय माणसाची रोज एकच वृत्ति असते असेंहि नाहीं, तेव्हां त्यास नित्य नवा रंग भोगता येईल. नाटाच्या व करुणापर अभंगांत मनाच्या विविधवृत्तींच्या लीला पहावयास सांपडतात; पण कमी जास्त कळवळयाचे हे जे निरनिराळे अभंग आहेत, ह्या नित्य नव्या पालटणाऱ्या चित्तवृत्तीच्या लहरी होत. या अभंगाचें नीट आकलन न झाल्यामुळें कांहीं पंडितमन्यांनीं हे अभंग मनाच्या अपक्वस्थितींतले, हे पापीवृत्तीच्या पश्चात्तापानें म्हटलेले असे या अभंगांवर शेरे मारले आहेत! पण या शहाण्या गाढवांची महाराजांच्या अभंगांशीं ओळख किती म्हणून पाहिलें तर नुसती तोंड ओळखी पुरती. महाराजांना कवित्वस्फूर्ति केव्हां झाली ही गोष्ट महाराजांनीं स्पष्ट सांगूनहि ज्या ऱ्हस्व बुध्दीच्या लोकांच्या डोक्यांत ती शिरली नाहीं; 'तुका म्हणे मज ऐसा भरंवसा । विंठ्ठल सरसा चालतसे ॥ रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ।' या वचनाचा बोध त्यांच्या अन्तरांत काय प्रगटणार ? या ज्या निरनिराळया वृत्ती रोज नित्य नव्या असत त्या वरील दोन्ही वचनांची स्पष्ट प्रियप्रतीति होती. तरीहि श्रीहरी जितका निकट- जवळ -अंगसंगीं असावा असें वाटे; तो तसा वाटेना म्हणून निरनिराळया हांका घेवून मन कळवळे. येवढें हे चित्तवृत्तीचे निरनिराळें तरंग उठून व्हावयाचें काय, तर श्रीहरीच्या जवळिकेची प्रतीति वाढत जावयाची. चित्तवृत्तीच्या या अनंत तरंगांत आपल्या मनांत येणारा अमुक एक विचार त्यांत उमटलेला नाहीं असें क्वचितच आढळेल. त्यांत प्रत्येक माणसास या हरघडी येणाऱ्या हांका त्यांत घेतलेल्या आहेत. घ्वेदांचें वीर्य तर गेलें नसेल ना ? नारायण वृध्द तर झाला नसेल ना ? प्रारब्ध, संचित आपल्या आड येत नसेल ना'देवास हजारो भक्तांचीं हजारों कामें त्यांतच हा श्रीकृष्ण छंदी फंदीत्तेव्हां आपण ''येवो येवो पांडुरंगे, प्रेमपान्हू, मज देगे 'म्हणून करुणेची चोंची पसरून जरी आळवीत असलों तरी त्याला गोपिकांचीं मुखें सोडवत नसलीं तर काय करावें, संतांचा शब्द मानतो तेव्हां त्यांसच म्हणावें कीं तुला जर बनत नसेल तर कोणातरी संतांच्या मला ताब्यांत दे म्हणजे मी तुला कंटाळा आणणार नाहीं. वर उध्दारास उशीर लागला तर त्याचेंच गीत करून विचारावें कीं 'कां बा उशीर कां केला? मला कोणाच्या हातीं दिलें ?'केव्हांहि मनुष्य कोणत्याहि गोष्टीचा आषुक झाला कीं आपले माषुकास 'करिसी कीं न करिसी माझा अंगिकार'असें म्हणणारच. मग त्यांत येणारीं विघ्नें आठवून, ही तर गोष्ट आड येत नसेल ना, असे विचार मनांत येवून त्यासच आळवायचें कीं 'इतुलें करी देवा ऐके हें वचन । समूळ अभिमान जाळी माझा ।' म्हणून विनंति करावयाची. अशा रीतीनें माणसास जेवढया म्हणून वृत्ती येणें शक्य त्या सर्वांचा परिहार करुणापर अभंगांत दिलेला आढळेल. या सर्व आळविण्याचा उद्देश एवढाच कीं एकवार जीव हा आत्मसमर्पण करून अन्तर्मुख झाला कीं त्यास कोणीहि न सांगतां स्वत:चे दोष आरशांत पाहिल्यासारखे स्वच्छ दिसूं लागतात व मग जीव व शिव यांच्या प्रियसंगमाच्या आड या गोष्टी-देहभाव वोस पडला नाहीं-विरला नाहीं -तोंवर डोकें वर करतात असें वाटून त्यावर उपाय करण्यास तो जीव श्रीहरीस आळवूं लागतो. अशा वेळीं महाराजांचा उपदेश असा कीं -

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥

येणें सोसें मन जालें हावभरी । परती माघारी घेत नाहीं ॥

बंधनापासुनि उकलली गांठीं । देतां आली मिठी सावकाशें ॥

तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधीं घर केलें रितें ॥

बंधनें बंधनें म्हणून ज्या गोष्टींबद्दल सर्व शास्त्रें ओरड करून आहेत, व त्यांतून मुक्त होण्यास, योग, याग, उपास पारणीं, तीर्थक्षेत्र यांची आटाआटी सांगितलेली आहे, त्या बंधनांची गांठ उकलण्यास - म्हणजे त्यांतून अनायासें मुक्त होण्यास या सिध्दपंथातील उपाय काय 'बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव.' मनानें विठ्ठलाची सोसानें हाव धरीली कीं मग तें मागें - देहभावानें वळून पाहत नाहीं. अशा रीतीनें बंधनांची गांठ आपसुखच ढिली होते; याची प्रतीति अशी कीं जितका-जसजसा -विठ्ठल या देहाचा ताबा घेईल तसतसे कामक्रोध जागा रिकामी करून चालूं लागतात. स्वत: अनुभवानें सिध्द झालेलें साधन येथें धरणेकऱ्यास सांगतांना षड्रिपु-प्रारब्ध-संचित-देहभाव यासर्वांवर एकच काट मारून त्या धरणेकऱ्यास ते म्हणाले कीं तूं दुसऱ्यांचें कांहीं तरी ऐकून त्यांच्या अनुकरणानें रडतो आहेस. वर सांगितल्याप्रमाणें इंद्रियांचा जय हा तुझ्या हातीं आहे. बरे निर्विषय असण्याचें तरी कारण काय ? 'बोलावा विठ्ठल' या अभंगात मनास तोच वेध लागला कीं, 'विषय तो त्यांचा जाला नारायण'अशी स्थिती झाली तर बिघडलें कोठें। अभंगांच्या आधारें श्रीहरीस आळवीत आळवीत अंतर्मुख होऊन जीव आपल्या देहभाषाची ओझो-पूर्वसंस्कार-संकल्प-विकल्प ही सर्व आठवून त्यांस श्रीहरीपुढें ठेवून यांतून मला सोडूव-त्याची गांठ उकल-असें म्हणून ती क्रिया होईपर्यंत-बुध्दि त्या गोष्टीस अनुकूल होईपर्यंत जीवानें धीर सोडण्याचें कारण नाहीं, उतावीळ होण्याचेंहि कारण नाहीं.

सुखे खावें अन्न। त्याचें करावें चिंतन ॥

अशा रहणीस जो काळ लागेल त्याची खंत बाळगण्याचें कारण नाहीं. कारण विश्वंभराचे सांभाळीं लागल्यावर आपणास तो सबाह्याभ्यंतरीं निर्मळ करीत आहे हें लक्ष्यांत आल्यावर आपण आपल्या बुध्दीनें उध्दारार्थ प्रयत्न करीत होतों तेव्हां आपले प्रयत्न निष्फळ होऊन आपलें आयुष्य वायां जात आहे असें वाटे, तेंच आतां उसाच्या एका पेऱ्यांतून दुसऱ्या पेऱ्याचा डेरा फुटतो तसा एकापुढे एकेक गोष्ट वाढून ठेविलेली पाहून श्रीहरीच्या लीलेचें तर कौतुक वाटतेंच पण श्रीहरीची आपणासाठीं एवढी काळजी, एवढी कळकळ पाहून स्वत:बद्दलहि धन्य वाटतें. अशा रीतीनें वृत्ति-विचार-निर्मळ होऊन अन्तर्यामीं ज्ञानाची -प्रेमाची-ज्योत प्रकाशमान होत जाते; अशा तऱ्हेनें दृष्टि निर्मळ होऊ लागली कीं विटेवर समपाउलांची खूण दिसूं लागते, त्यानें मनास आनंद होऊन तो डोळयांवाटें पाझर फुटून बाहेर पडतो; व या प्रेमाच्या पाझरानें दृष्टि निर्मळ होऊ लागली कीं नराचा नारायण होतो- 'विंठ्ठल विठ्ठल झाला देह माझा ।'अशी ज्याची त्यासच प्रचीति येते. अशीही सिध्दपंथांतील किमयेची प्रक्रिया (1) गोविंद गोविंद (2) ज्याचें जया ध्यान, या दोन अभंगांत सांगितली आहे. पाहून यास ज्यास्त आधार तरी काय द्यावयाचा व विवेचन तरी काय करावयाचें ! या दोन्ही अभंगाचें येथें एकवारीच समपाउलें म्हणून दर्शन घ्यावें.

गोविंद गोविंद। मना बैसलिया छंद ॥1॥

मग गोविंद ते काया। भेद नाहीं देवा तया॥ धृ॥

आनंदलें मन। प्रेमें पाझरती लोचन॥ 2॥

तुका म्हणे आळी। जेषीं नुरेची वेगळी॥ 3॥

*****

ज्याचें जया ध्यान। तेंचि होय त्याचें मन॥ 1॥

म्हणउनी अवघें सारा। पांडुरंग दृढ धरा॥ धृ॥

समखुण त्याचे पाय। उभा व्यापक विटे ठाम॥ 2॥

मुका म्हणे नभा। सरसा अणूचाही गाभा॥3॥

स्वत: महाराजांचें चरित्र हें या उपदेशाप्रमाणें झाल्याने इतिहासात नमुद आहे. उपदेशांतील शेवटचे तीन अभंग समारोपाचे आहेत. त्यांत श्री ज्ञानेश्वर महाराजांबद्दल महाराजांचे मनांत काय भावना होती याचें आणखी एक चित्र या तीन अभंगांत आहे. तसेंच एक गोष्ट येथें स्पष्ट सांगितली आहे ; ती ही कीं माझ्या बापें-ज्ञानदेवें-जें भातुकें म्हणजे खाऊ दिला तें हें उत्तमज्ञान-दान होय. दुसरी गोष्ट यांत अशी दिसते कीं उपदेश करण्याची महाराजांची ही पहिलीच वेळ असावी. हळूं हळूं गळती होऊन महाराजांचा घट बोध-प्रेम यांनीं पूर्ण भरल्यावर हा श्रीज्ञानोबारायांनीं महाराजांस प्रकट करण्यास उपाय योजला असावा. धाव्यांत व उपदेशाच्या समारोपांतहि उपदेश करणें हा अधिकार श्रीज्ञानराजांचा-आपण त्या पदवीस पाय तर लावीत नाहीं ना? असें कचरतांना जे महाराज आढळतात तेच पुढें स्पष्ट सांगूं लागले, 'मेघवृष्टीनें होतसे उपदेश'या उपदेशांत सर्वत्र हरिपाठाची छाया पसरली आहे असेंहि आढळून येईल.

उपदेशाचे हे अकरा अभंग व श्रीफळ श्रीतुकोबारायांनीं त्या धरणेकऱ्यास दिलें व माझ्या बापें-मोठया प्रेमानें-जो हा खाऊ दिला आहे तो घेऊन तूं आपल्या ठिकाणीं जा म्हणून सांगितलें. देव देतो व कर्म नेतें. त्या बीडच्या ब्राह्मण देशपांडयानें बेचाळीस दिवस धरणें धरलें होतें. पण त्यास आलेलें फळ त्याच्या पूर्वग्रहाप्रमाणें नव्हतें म्हणून तो तें श्रीफळ व अभंग टाकून आळंदीस गेला. व पुन: तेथें धरणें धरून बसला. त्यावेळी झालेल्या वृत्तांताचें पत्र श्रीतुकोबारायांकडून आल्यावर धरणेकऱ्यास पिटाळून लाविलें असें महिपतीबोवांनीं वृत्त नमूद केलें आहे. श्रीतुकोबारायांनी लिहिलेलें पत्र व त्यास आलेलें पत्र 'आइकोनिया लिखित'- या दोन पत्रांचे काय झालें तीं एकमेकांकडे कशीं गेलीं हें वृत्त आजवर कोठें नमूद नाहीं. श्रीतुकोबांनीं श्रीज्ञानोबारायांस लिहिलेल्या पत्रांत हे अभंग कोणासाठीं निर्माण झाले आहेत अशी पृच्छा केली होती ती देशपांडे परत फिरल्यावर त्याच्याच सारखा वयाने जास्त, बुध्दीनें जड, असा कोंडभट ब्राह्मण तेथे आला व त्यानें विश्वासानें तें श्रीफळ व अभंग घेतले. अभंगाच्या नित्यपारायणानें तो पुढे व्युत्पन्न ब्राह्मण होऊन राजदरबारीं पोथ्यापुराणें सांगूं लागला. व श्रीफळ फोडून पाहतों तों त्यास गुप्तधन मिळालें व त्याचें जन्माचें दैन्य गेलें. असा त्याचा संसार व परमार्थ सांग झाल्याचें वृत्त महिपतीबोवांनीं लिहिले आहे. तेव्हां संसारयुक्त गढूळ मन व कोरा कागद यांत कोरा कागद श्रेष्ठ ठरला.

श्रीज्ञानेश्वरांस लिहिलेल्या पत्रांत धरणेकऱ्यानें अविश्वासानें कथेचा अव्हेर केला म्हणून श्रीतुकोबांनीं गाऱ्हाणें सांगितलें आहे. तेव्हां सात अभंगाचा थांबा हा अकरा अभंगाचा उपदेश हें महाराजांनीं केलेलें कीर्तन आहे. थांब्याचे अभंगात पहिल्या दोन अभंगात आवाहन,पुढें आपल्या उद्दिष्ट कार्याचें निवेदन व पुन: नमन असे तीन भाग डोळयापुढें येतात. उपदेशाच्या पहिल्याच अभंगात उपदेशाचें सारसर्वस्व-पहिल्या प्रथम ठसठशीतपणें सांगून पुढें सात अभंगांत त्या उपदेशामृताचें तपशीलवार विवेचन करून पुढील तीन अभंगांत हें कीर्तन हें ज्ञानोबांनीं दिलेलें दानभातुकें -होय म्हणून सांगितलें आहे. महाराजांच्या कीर्तनाचा एक नमुना म्हणून या अठरा अभंगाकडे पहावें लागतें. भगीरथाच्या प्रयत्नानें वाहणारी गंगा ही वरून खाली वाहात येते. महाराजांनीं सांगितलेंल्या सिध्दपंथात हरिकथा हि खालून वर वाहणारी अमृताची धार आहे. असा हा योग याग विधी येणें जी सिध्दी प्राप्त होत नाहीं ती सिध्दी प्राप्त करून देणारा हा उलटपंथ - सिध्दपंथ होय - यांत एकदांच श्रीहरीस शरण जावयाचें व मग श्रीहरीवर भार घालून 'असे माझें कोडें तुज सांकडें। मी असे निवाडे सुखरूपें । असा जीव असावयाचा. या सिध्दपंथाचे आचार्य व अध्वर्युं श्रीनामदेवराय व श्रीतुकोबाराय. दोघेहि श्रीहरीस शरण जावून 'देवाचिये चाडे देवास आळवीत' होते. असें आळवीतां आळवीतां त्या उभयतांच्या उध्दाराची काळजी, त्यांस ज्ञान व प्रेम कसें प्राप्त होईल याची काळजी श्रीहरीस लागली. तेव्हां नको नको म्हणत असतांनां श्रीनामदेवरायाकडून विसोबा खेचरांची सेवा करविली. तोच कार्यभाग श्रीतुकोबारायांच्या बाबतीत स्वप्नांतल्या दृष्टांतावर उरकून घेतला. येथें एक गोष्ट लक्ष्यांत घेण्याजोगी आहे. महाराजांनीं मला श्रीनामदेवरायांसारखा अनुभव कां नाहीं. म्हणून हट्ट धरला नाहीं उलट, 'माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणहि होय देव गुरु। म्हणून श्रीहरीस गीत गाइलें आहे. श्रीहरीस शरण जावून गोविंद गोविंद म्हणत मग गोविंद ते काया असा भोग भोगण्याचा- 'शरीरें साध्य केलें परब्रह्म हें अनुभविण्याच्या सिध्दपंथाचें यथाशक्ति यथामति विवेचन केलें आहे. हें विवेचन वगळून कोणीहि त्या अभंगाकडे वळेल त्यास तोच अनुभव येईल. असा अनुभव घेण्याची एकाद्यास जरी बुध्दि झाली तरी हा लेख लिहिण्याचें सार्थक झालें असें मी समजेन.

(1) श्रीपंढरीशा (2) अगा ये उदारा, या दोन्ही अभंगांत महाराजांनीं श्रीपंढरीशास आळविलें आहे. नाटाचे अभंगात पुष्कळसे अभंग आळविण्याचेच आहेत. फक्त महाराजांचेच घेतले तरी करुणापर अभंग सुमारें तीनशें आहेत. यांत कोठें तरी आपल्या विचाराचा, चित्तवृत्तीचा ठसा उमटलेला प्रत्येकास आढळेल; तो प्रत्येकाचा अभंग. शिवाय माणसाची रोज एकच वृत्ति असते असेंहि नाहीं, तेव्हां त्यास नित्य नवा रंग भोगता येईल. नाटाच्या व करुणापर अभंगांत मनाच्या विविधवृत्तींच्या लीला पहावयास सांपडतात; पण कमी जास्त कळवळयाचे हे जे निरनिराळे अभंग आहेत, ह्या नित्य नव्या पालटणाऱ्या चित्तवृत्तीच्या लहरी होत. या अभंगाचें नीट आकलन न झाल्यामुळें कांहीं पंडितमन्यांनीं हे अभंग मनाच्या अपक्वस्थितींतले, हे पापीवृत्तीच्या पश्चात्तापानें म्हटलेले असे या अभंगांवर शेरे मारले आहेत! पण या शहाण्या गाढवांची महाराजांच्या अभंगांशीं ओळख किती म्हणून पाहिलें तर नुसती तोंड ओळखी पुरती. महाराजांना कवित्वस्फूर्ति केव्हां झाली ही गोष्ट महाराजांनीं स्पष्ट सांगूनहि ज्या ऱ्हस्व बुध्दीच्या लोकांच्या डोक्यांत ती शिरली नाहीं;

'तुका म्हणे मज ऐसा भरंवसा । विंठ्ठल सरसा चालतसे ॥

रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ।'

या वचनाचा बोध त्यांच्या अन्तरांत काय प्रगटणार ? या ज्या निरनिराळया वृत्ती रोज नित्य नव्या असत त्या वरील दोन्ही वचनांची स्पष्ट प्रियप्रतीति होती. तरीहि श्रीहरी जितका निकट- जवळ -अंगसंगीं असावा असें वाटे; तो तसा वाटेना म्हणून निरनिराळया हांका घेवून मन कळवळे. येवढें हे चित्तवृत्तीचे निरनिराळें तरंग उठून व्हावयाचें काय, तर श्रीहरीच्या जवळिकेची प्रतीति वाढत जावयाची. चित्तवृत्तीच्या या अनंत तरंगांत आपल्या मनांत येणारा अमुक एक विचार त्यांत उमटलेला नाहीं असें क्वचितच आढळेल. त्यांत प्रत्येक माणसास या हरघडी येणाऱ्या हांका त्यांत घेतलेल्या आहेत. घ्वेदांचें वीर्य तर गेलें नसेल ना ? नारायण वृध्द तर झाला नसेल ना ? प्रारब्ध, संचित आपल्या आड येत नसेल ना'देवास हजारो भक्तांचीं हजारों कामें त्यांतच हा श्रीकृष्ण छंदी फंदीत्तेव्हां आपण ''येवो येवो पांडुरंगे, प्रेमपान्हू, मज देगे म्हणून करुणेची चोंची पसरून जरी आळवीत असलों तरी त्याला गोपिकांचीं मुखें सोडवत नसलीं तर काय करावें, संतांचा शब्द मानतो तेव्हां त्यांसच म्हणावें कीं तुला जर बनत नसेल तर कोणातरी संतांच्या मला ताब्यांत दे म्हणजे मी तुला कंटाळा आणणार नाहीं. वर उध्दारास उशीर लागला तर त्याचेंच गीत करून विचारावें कीं 'कां बा उशीर कां केला? मला कोणाच्या हातीं दिलें ?'केव्हांहि मनुष्य कोणत्याहि गोष्टीचा आषुक झाला कीं आपले माषुकास 'करिसी कीं न करिसी माझा अंगिकार'असें म्हणणारच. मग त्यांत येणारीं विघ्नें आठवून, ही तर गोष्ट आड येत नसेल ना, असे विचार मनांत येवून त्यासच आळवायचें कीं 'इतुलें करी देवा ऐके हें वचन । समूळ अभिमान जाळी माझा ।' म्हणून विनंति करावयाची. अशा रीतीनें माणसास जेवढया म्हणून वृत्ती येणें शक्य त्या सर्वांचा परिहार करुणापर अभंगांत दिलेला आढळेल. या सर्व आळविण्याचा उद्देश एवढाच कीं एकवार जीव हा आत्मसमर्पण करून अन्तर्मुख झाला कीं त्यास कोणीहि न सांगतां स्वत:चे दोष आरशांत पाहिल्यासारखे स्वच्छ दिसूं लागतात व मग जीव व शिव यांच्या प्रियसंगमाच्या आड या गोष्टी-देहभाव वोस पडला नाहीं-विरला नाहीं -तोंवर डोकें वर करतात असें वाटून त्यावर उपाय करण्यास तो जीव श्रीहरीस आळवूं लागतो. अशा वेळीं महाराजांचा उपदेश असा कीं -

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥

येणें सोसें मन जालें हावभरी । परती माघारी घेत नाहीं ॥

बंधनापासुनि उकलली गांठीं । देतां आली मिठी सावकाशें ॥

तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधीं घर केलें रितें ॥

बंधनें बंधनें म्हणून ज्या गोष्टींबद्दल सर्व शास्त्रें ओरड करून आहेत, व त्यांतून मुक्त होण्यास, योग, याग, उपास पारणीं, तीर्थक्षेत्र यांची आटाआटी सांगितलेली आहे, त्या बंधनांची गांठ उकलण्यास - म्हणजे त्यांतून अनायासें मुक्त होण्यास या सिध्दपंथातील उपाय काय 'बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव.' मनानें विठ्ठलाची सोसानें हाव धरीली कीं मग तें मागें - देहभावानें वळून पाहत नाहीं. अशा रीतीनें बंधनांची गांठ आपसुखच ढिली होते; याची प्रतीति अशी कीं जितका-जसजसा -विठ्ठल या देहाचा ताबा घेईल तसतसे कामक्रोध जागा रिकामी करून चालूं लागतात. स्वत: अनुभवानें सिध्द झालेलें साधन येथें धरणेकऱ्यास सांगतांना षड्रिपु-प्रारब्ध-संचित-देहभाव यासर्वांवर एकच काट मारून त्या धरणेकऱ्यास ते म्हणाले कीं तूं दुसऱ्यांचें कांहीं तरी ऐकून त्यांच्या अनुकरणानें रडतो आहेस. वर सांगितल्याप्रमाणें इंद्रियांचा जय हा तुझ्या हातीं आहे. बरे निर्विषय असण्याचें तरी कारण काय ? 'बोलावा विठ्ठल' या अभंगात मनास तोच वेध लागला कीं, 'विषय तो त्यांचा जाला नारायण'अशी स्थिती झाली तर बिघडलें कोठें। अभंगांच्या आधारें श्रीहरीस आळवीत आळवीत अंतर्मुख होऊन जीव आपल्या देहभाषाची ओझो-पूर्वसंस्कार-संकल्प-विकल्प ही सर्व आठवून त्यांस श्रीहरीपुढें ठेवून यांतून मला सोडूव-त्याची गांठ उकल-असें म्हणून ती क्रिया होईपर्यंत-बुध्दि त्या गोष्टीस अनुकूल होईपर्यंत जीवानें धीर सोडण्याचें कारण नाहीं, उतावीळ होण्याचेंहि कारण नाहीं.

सुखे खावें अन्न। त्याचें करावें चिंतन ॥

अशा रहणीस जो काळ लागेल त्याची खंत बाळगण्याचें कारण नाहीं. कारण विश्वंभराचे सांभाळीं लागल्यावर आपणास तो सबाह्याभ्यंतरीं निर्मळ करीत आहे हें लक्ष्यांत आल्यावर आपण आपल्या बुध्दीनें उध्दारार्थ प्रयत्न करीत होतों तेव्हां आपले प्रयत्न निष्फळ होऊन आपलें आयुष्य वायां जात आहे असें वाटे, तेंच आतां उसाच्या एका पेऱ्यांतून दुसऱ्या पेऱ्याचा डेरा फुटतो तसा एकापुढे एकेक गोष्ट वाढून ठेविलेली पाहून श्रीहरीच्या लीलेचें तर कौतुक वाटतेंच पण श्रीहरीची आपणासाठीं एवढी काळजी, एवढी कळकळ पाहून स्वत:बद्दलहि धन्य वाटतें. अशा रीतीनें वृत्ति-विचार-निर्मळ होऊन अन्तर्यामीं ज्ञानाची -प्रेमाची-ज्योत प्रकाशमान होत जाते; अशा तऱ्हेनें दृष्टि निर्मळ होऊ लागली कीं विटेवर समपाउलांची खूण दिसूं लागते, त्यानें मनास आनंद होऊन तो डोळयांवाटें पाझर फुटून बाहेर पडतो; व या प्रेमाच्या पाझरानें दृष्टि निर्मळ होऊ लागली कीं नराचा नारायण होतो- 'विंठ्ठल विठ्ठल झाला देह माझा ।'अशी ज्याची त्यासच प्रचीति येते. अशीही सिध्दपंथांतील किमयेची प्रक्रिया (1) गोविंद गोविंद (2) ज्याचें जया ध्यान, या दोन अभंगांत सांगितली आहे. पाहून यास ज्यास्त आधार तरी काय द्यावयाचा व विवेचन तरी काय करावयाचें ! या दोन्ही अभंगाचें येथें एकवारऱ्हींच समपाउलें म्हणून दर्शन घ्यावें.

गोविंद गोविंद। मना बैसलिया छंद ॥1॥

मग गोविंद ते काया। भेद नाहीं देवा तया॥ धृ॥

आनंदलें मन। प्रेमें पाझरती लोचन॥ 2॥

तुका म्हणे आळी। जेषीं नुरेची वेगळी॥ 3॥

*****

ज्याचें जया ध्यान। तेंचि होय त्याचें मन॥ 1॥

म्हणउनी अवघें सारा। पांडुरंग दृढ धरा॥ धृ॥

समखुण त्याचे पाय। उभा व्यापक विटे ठाम॥ 2॥

मुका म्हणे नभा। सरसा अणूचाही गाभा॥3॥

स्वत: महाराजांचें चरित्र हें या उपदेशाप्रमाणें झाल्याने इतिहासात नमुद आहे. उपदेशांतील शेवटचे तीन अभंग समारोपाचे आहेत. त्यांत श्री ज्ञानेश्वर महाराजांबद्दल महाराजांचे मनांत काय भावना होती याचें आणखी एक चित्र या तीन अभंगांत आहे. तसेंच एक गोष्ट येथें स्पष्ट सांगितली आहे ; ती ही कीं माझ्या बापें-ज्ञानदेवें-जें भातुकें म्हणजे खाऊ दिला तें हें उत्तमज्ञान-दान होय. दुसरी गोष्ट यांत अशी दिसते कीं उपदेश करण्याची महाराजांची ही पहिलीच वेळ असावी. हळूं हळूं गळती होऊन महाराजांचा घट बोध-प्रेम यांनीं पूर्ण भरल्यावर हा श्रीज्ञानोबारायांनीं महाराजांस प्रकट करण्यास उपाय योजला असावा. धाव्यांत व उपदेशाच्या समारोपांतहि उपदेश करणें हा अधिकार श्रीज्ञानराजांचा-आपण त्या पदवीस पाय तर लावीत नाहीं ना? असें कचरतांना जे महाराज आढळतात तेच पुढें स्पष्ट सांगूं लागले, 'मेघवृष्टीनें थेंबें होतसे उपदेश'या उपदेशांत सर्वत्र हरिपाठाची छाया पसरली आहे असेंहि आढळून येईल.

उपदेशाचे हे अकरा अभंग व श्रीफळ श्रीतुकोबारायांनीं त्या धरणेकऱ्यास दिलें व माझ्या बापें-मोठया प्रेमानें-जो हा खाऊ दिला आहे तो घेऊन तूं आपल्या ठिकाणीं जा म्हणून सांगितलें. देव देतो व कर्म नेतें. त्या बीडच्या ब्राह्मण देशपांडयानें बेचाळीस दिवस धरणें धरलें होतें. पण त्यास आलेलें फळ त्याच्या पूर्वग्रहाप्रमाणें नव्हतें म्हणून तो तें श्रीफळ व अभंग टाकून आळंदीस गेला. व पुन: तेथें धरणें धरून बसला. त्यावेळी झालेल्या वृत्तांताचें पत्र श्रीतुकोबारायांकडून आल्यावर धरणेकऱ्यास पिटाळून लाविलें असें महिपतीबोवांनीं वृत्त नमूद केलें आहे. श्रीतुकोबारायांनी लिहिलेलें पत्र व त्यास आलेलें पत्र 'आइकोनिया लिखित'- या दोन पत्रांचे काय झालें तीं एकमेकांकडे कशीं गेलीं हें वृत्त आजवर कोठें नमूद नाहीं. श्रीतुकोबांनीं श्रीज्ञानोबारायांस लिहिलेल्या पत्रांत हे अभंग कोणासाठीं निर्माण झाले आहेत अशी पृच्छा केली होती ती देशपांडे परत फिरल्यावर त्याच्याच सारखा वयाने जास्त, बुध्दीनें जड, असा कोंडभट ब्राह्मण तेथे आला व त्यानें विश्वासानें तें श्रीफळ व अभंग घेतले. अभंगाच्या नित्यपारायणानें तो पुढे व्युत्पन्न ब्राह्मण होऊन राजदरबारीं पोथ्यापुराणें सांगूं लागला. व श्रीफळ फोडून पाहतों तों त्यास गुप्तधन मिळालें व त्याचें जन्माचें दैन्य गेलें. असा त्याचा संसार व परमार्थ सांग झाल्याचें वृत्त महिपतीबोवांनीं लिहिले आहे. तेव्हां संसारयुक्त गढूळ मन व कोरा कागद यांत कोरा कागद श्रेष्ठ ठरला.

श्रीज्ञानेश्वरांस लिहिलेल्या पत्रांत धरणेकऱ्यानें अविश्वासानें कथेचा अव्हेर केला म्हणून श्रीतुकोबांनीं गाऱ्हाणें सांगितलें आहे. तेव्हां सात अभंगाचा थांबा हा अकरा अभंगाचा उपदेश हें महाराजांनीं केलेलें कीर्तन आहे. थांब्याचे अभंगात पहिल्या दोन अभंगात आवाहन,पुढें आपल्या उद्दिष्ट कार्याचें निवेदन व पुन: नमन असे तीन भाग डोळयापुढें येतात. उपदेशाच्या पहिल्याच अभंगात उपदेशाचें सारसर्वस्व-पहिल्या प्रथम ठसठशीतपणें सांगून पुढें सात अभंगांत त्या उपदेशामृताचें तपशीलवार विवेचन करून पुढील तीन अभंगांत हें कीर्तन हें ज्ञानोबांनीं दिलेलें दानभातुकें -होय म्हणून सांगितलें आहे. महाराजांच्या कीर्तनाचा एक नमुना म्हणून या अठरा अभंगाकडे पहावें लागतें. भगीरथाच्या प्रयत्नानें वाहणारी गंगा ही वरून खाली वाहात येते. महाराजांनीं सांगितलेंल्या सिध्दपंथात हरिकथा हि खालून वर वाहणारी अमृताची धार आहे. असा हा योग याग विधी येणें जी सिध्दी प्राप्त होत नाहीं ती सिध्दी प्राप्त करून देणारा हा उलटपंथ - सिध्दपंथ होय - यांत एकदांच श्रीहरीस शरण जावयाचें व मग श्रीहरीवर भार घालून 'असे माझें कोडें तुज सांकडें। मी असे निवाडे सुखरूपें । असा जीव असावयाचा. या सिध्दपंथाचे आचार्य व अध्वर्युं श्रीनामदेवराय व श्रीतुकोबाराय. दोघेहि श्रीहरीस शरण जावून 'देवाचिये चाडे देवास आळवीत होते. असें आळवीतां आळवीतां त्या उभयतांच्या उध्दाराची काळजी, त्यांस ज्ञान व प्रेम कसें प्राप्त होईल याची काळजी श्रीहरीस लागली. तेव्हां नको नको म्हणत असतांनां श्रीनामदेवरायाकडून विसोबा खेचरांची सेवा करविली. तोच कार्यभाग श्रीतुकोबारायांच्या बाबतीत स्वप्नांतल्या दृष्टांतावर उरकून घेतला. येथें एक गोष्ट लक्ष्यांत घेण्याजोगी आहे. महाराजांनीं मला श्रीनामदेवरायांसारखा अनुभव कां नाहीं. म्हणून हट्ट धरला नाहीं उलट, 'माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणहि होय देव गुरु। म्हणून श्रीहरीस गीत गाइलें आहे. श्रीहरीस शरण जावून गोविंद गोविंद म्हणत मग गोविंद ते काया असा भोग भोगण्याचा- 'शरीरें साध्य केलें परब्रह्म हें अनुभविण्याच्या सिध्दपंथाचें यथाशक्ति यथामति विवेचन केलें आहे. हें विवेचन वगळून कोणीहि त्या अभंगाकडे वळेल त्यास तोच अनुभव येईल. असा अनुभव घेण्याची एकाद्यास जरी बुध्दि झाली तरी हा लेख लिहिण्याचें सार्थक झालें असें मी समजेन.

सौजन्य : प्रेमबोध - मार्च,१९४३. ( फाल्गुन,१८६४)

बहेणी म्हणे हात घातला मस्तकी

दिलीप पुरुषोत्तम चित्रे

जन्म - १७ सप्टेम्बर, १९३८ ( बडोदा).

मृत्यू - १० डिसेम्बर, २००९ ( पुणे).

‘बहेणी म्हणे हात घातला मस्तकी’
कार्तिक वद्य ५ शके १९२०
रविवार दि. ९ नोव्हेंबर १९९८
संत बहिणाबाईंच्या अनुग्रहदिनी वितरित
भागवत प्रबोधन संस्था, श्रीक्षेत्र देहू.

तुकोबांच्या वैकुंठगमनाच्या ३५० व्या वर्षात घडणारी एक विशेष महत्त्वाची घटना म्हणजे आठ नोव्हेंबर रोजी देहूच्या विठ्ठल मंदिराच्या आवारात तुकोबांच्या शिष्या संत बहिणाबाई यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. बहिणाबाईंना वस्तुत: वारकऱ्यांनी यापूर्वीच मानाचे स्थान द्यायला हवे होते. पण उशिरा का होईना आजवरच्या दुर्लक्ष्याची ते भरपाई करत आहेत. करत आहेत.

अलीकडच्या काळात अत्यंत निष्ठापूर्वक, कष्टपूर्वक आणि व्यवस्थितपणे संत बहेणाबाईंच्या गाथ्या’ ची शालिनीताई जावडेकर यांनी तर देहूकर डॉ. सदानंद मोरे यांनी जागोजाग आणि वारंवार बहिणाबाईंच्या असामान्य कर्तुत्वाची आपल्या वाचकांना आणि श्रोत्यांना आठवण करुन देण्याचा एक उपकमच चालू ठेवला. देहूच्या देऊळवाडयातल्या तुकोबांच्या परिवारात, त्यांच्या पवित्र शिळेजवळ बहिणाबाईंची मूर्ती असणार आहे, आणि तिची प्रतिष्ठापना कार्तिक शुध्द पंचमीच्या मुहूर्तावर होणार आहे. यात मोठेच औचित्य आहे. याच तिथीला अल्पवयीन बहिणाच्या स्वप्नात येऊन तुकोबांनी तिला कवित्वाचा वर दिला आणि तिची प्रतिभा भानावर आणली. हे भान खुद्द तुकोबांना नामदेवाने पांडुरंगासमवेत त्यांच्या स्वप्नात येऊनच दिले होते. स्वप्नातल्या साक्षात्कराने प्रतिभा जागृत होण्याची ही एक परंपराच वारकरी भक्त्तीचे ‘आहेवसूत्र’ बनलेली दिसते. ज्ञानदेव ज्याला ‘आहेवतंतू’ म्हणतात तो हाच गुरुकृपेने घडणारा शक्त्तिपात. मूखाच्या शैव अनुग्रहाला वैष्णव भक्त्तीच्या उत्कट भावमयतेने दिलेले हे रुप.

तुकोबांच्या आणि बहिणाबाईंच्या सबंध अस्तित्वाला जागृत प्रतिभेचे स्पंदनशील स्वरुप स्वप्नातल्या गुरुप्रसादने लाभावे, याचा अर्थ उलगडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शालिनीताई जावडेकरांनी सिध्द केलेल्या ‘संत बहेणाबाईंचा गाथा’ (काँटिनेंटल प्रकाशन, पुणे - १९७९ आणि १९८९) या पुस्तकात अभंग २१ (पान२११) ते अभंग ५३ (पान२३०) ही अभंगाची ओळ (माळका) बारकाईने वाचल्यास बहिणाबाईंच्या शब्दांतच क्रमश: अमेरिकेन मिशनरी जस्टिन ऍबट यांनी १९२९ साली ‘महाराष्ट्र कविसंतमाले’ मध्ये पाचवे पुष्प म्हणून इंग्रजी भाषांतरासकट याच गाथ्याच्या तेव्हा उपलब्ध पाठाचे प्रकाशन ‘संत बहिणाबाई’ या नावाने केले होते. या पुस्तकाची नवी आवृती १९८५ साली (मोतीलाल बनारसीदास, दिल्ली-वाणारासी-पाटणा-मद्रास यांनी) ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या डॉ. ऍन फेल्डहाऊस यांच्या मार्मिक प्रस्तावनेसकट प्रसिध्द केलेली आहे. जिज्ञासूंनी ही दोन्ही पुस्तके वाचून पाहावी. ऍन फेल्डहाऊस यांनी त्यांच्या प्रस्तावनेत बहिबाईंच्या आत्मसंघर्षाबद्दल असे म्हटले आहे की, “ईश्वरावरील प्रेम आणि पतिव्रतेची कर्तव्ये यांच्यातला संघर्ष, बहिणाबाईंच्या बाबतीत तरी, काहीसा योगायोगामुळे, सुदैवाने किंवा ईश्वरकृपेने म्हणा टळला. तिच्या पतीचा (तिच्या भक्त्तीला असलेला) विरोध मावळतो आणि तोही तिच्या भक्त्तीत सामील होतो. पण हे घडून येण्यापूर्वी तिच्या पतीने तिला टाकण्याची धमकी दिली होती आणि तिने ईश्वराऐवजी त्याला धरुन राहावयाचे ठरविले होते. ( ती म्हणते “भ्रताराची सेवा तोचि आम्हां देव । भ्रतार स्वमेव परब्रह्म ॥” अभंग ३५, ओळ चवथी.) या घटना कदाचित अपूर्व आणि इतरांच्या आयुष्यात असंभवनीय असू शकल्या तरी एवढे मात्र खरे की हिंदू स्त्रियांपुढे बहिणाबाईने ठेवलेला आदर्श असाच आहे की पतिव्रतेची कर्तव्य पाळूनही भक्त्तिपंरपरेत सामील होणे स्त्रीला शक्य आहे.” ऍन फेल्डहाऊस यांनी पुढे जाऊन बहिणाबाईंच्या तत्त्वज्ञानातल्या काही ‘विसंगती’ सांगितल्या आहेत आणि बहिणाबाई ‘सामोपचारी समन्वयवादाच्या’ मवाळ परंपरेत बसतात; आंताळ महादेवी, लल्ला किंवा मीरा यांच्यासारख्या त्यांची भक्त्ती मूलत: परंपराविद्रोही नाही” असे आपले मत मांडतात. या कवयित्री महाराष्ट्राबाहेरच्या आहेत आणि त्यांचे सांस्कृतीत-ऐतिहासिक संदर्भ वेगळे आहेत, हे त्या ध्यानात घेत नाहीत.

बहिणाबाईंच्या जीवनात जो संघर्ष उभा झाला त्याचे स्वरुप ‘ईश्वराची भक्त्ती विरुध्द पतिव्रतेची कर्तव्य’ इतके सरळ नव्हते. वर्णव्यस्था, वर्णवर्चस्ववाद, ब्राह्मणी आत्मप्रतिमा, ‘वेदांचा अर्थ’, आणि कर्मकांडची शिस्त अशा अनेक बाबी त्या संघर्षात गुंतलेल्या होत्या. बहिणीबाईंच्या आत्मसंघार्षाकडे पाहताना आपण, त्या सतराव्या शतकातील एक महाराष्ट्रीय ब्राह्मण स्त्री होत्या आणि त्यांचा पती स्त्रीयांना वेदांचा किंवा धर्म चर्चेत भाग घेण्याचा आधिकार नाही अशा कट्टर मताचा, कर्मकांडाचा आणि ब्राह्मणत्वाचा पुरस्कर्ता होता, हे सतत ध्यानात ठेवले पाहिजे. बहिणाबाई जहाल होत्या या पेक्षाही त्या, स्त्रियांना दुय्यम दर्जाचा मानव मानणाऱ्या एका व्यवस्थेतून आणि कालखंडातून भक्त्तीची सापेक्षत: विद्रोही वाट चोखाळणारी स्त्री आणि पत्‍नी होत्या, यावर भर दिला पाहिजे. म्हणजे त्यांची भक्त्ती ही एका प्रतिभावंत आणि बुध्दिमान स्त्रीची कौटुंबिक आणि सामाजिक रणनीती होती, हे कळू शकेल. ज्या काळात वारकरी संप्रदाय ब्राह्मणांचा सहभाग अपवादात्मक होता, त्या काळात वारकरी परंपरेत सामील होणारी ब्राह्मण स्त्री म्हणून पाहिले तर आजपर्यंत बहुसंख्येने ब्राह्मणेतर असलेल्या वारकऱ्यांनीही बहिणाबाईंकडे का दुर्लश करावे, त्याचे सामाजिक कारण सापडते. तत्कालीन ब्राह्मणांनी ‘शूद्र’ ठरवून हेटाळलेल्या तुकोबांसारख्या कुणब्याचे आध्यात्मिक गुरुत्व एका ब्राह्मणाच्या पत्‍नीने पतीचा विरोध सहन करुनही स्वप्नात का होईना स्वीकारणे, ही घटना क्रांतिकारच होती. ‘मवाळ’ स्त्रीला झेपण्यासारखी ही कृती नाही. या कृतीत निग्रह आहे, सामोपचार किंवा समेट नाही. या कृतीत विद्रोह आहे, समन्वय नाही.

विसाव्या शतकातल्या स्त्रीवादी दृष्टीकोनातून सतराव्या शतकातल्या स्त्री कृतीचे नैतिक मूल्यमापन करणे म्हणजे तेराव्या शतकातल्या चोखोबांच्या विद्रोहाची धार जपणाऱ्या अनन्य विठ्ठलभक्त्तीकडे विसाव्या शतकातल्या बौध्द-दलित दॄष्टीकोनातून न बघण्याचाच प्रयत्न करण्यासारखे आहे. वारकरी पंरपरेचा इतिहास हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-सामाजिक उत्क्रांतीचा आरसा आहे आणि त्यात चोखोबांसारखा तेराव्या शतकाला दलित कवी आणि बहिणाबाईसारखी सतराव्या शतकातील ब्राह्मण कवयित्री हे महत्त्वाचे मैलाचे दगड आहेत. या व्यक्तिमत्वांचे आरशातच मराठी संस्कृतीने निर्माण केलेले संतत्व आणि कवित्वाचे मूलभूत समीकरण कळून येते. आपण आपल्या मानवतेचे आणि आध्यात्मिकतेचे प्रतिबिंब या उज्ज्वल उदाहरणात पाहिले की अठराव्या शतकापासून पुन्हा एकदा वर्णव्यवस्थेचे सावट पडून वारकरी परंपरा का झाकोळकी, तेही दिसू येऊ लागले.

ज्ञानदेव, त्यांची भावंडे, एकनाथ आणि बाहिणाबाई ही सर्व वर्णव्यस्थेच्या कोशाबाहेर पडून एकविधभावातून प्रतीत होणाऱ्या जीवनमुक्त दशेकडे झेपावलेली ‘पूर्वाश्रमींची ब्राह्मण मंडळी. त्यांच्या लेखी ‘ब्राह्मण’ कोण हे बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगितले पाहिजे:

“ब्रह्म जाणे तोचि ब्राह्मण बोलिजे । येर ते सहजे ब्रह्मबीज ॥”

तर तुकोबांनी ठोस आणि नाट्यपूर्ण रीतीने ‘ब्राह्मण्या’ चे मर्म सोदाहरण सांगितले आहे:

“ब्राह्मण तो एक चोखामेळा महार”

म्हणजे ब्राह्मण बहिणाबाईला ब्रह्म जाणारे कुणबी वंशाचे तुकोबा ‘ब्राह्मण’ दिसतात आणि देहूच्या महाजन तुकोबांना महार चोखामोळा हाच एक खराखुरा ब्रह्मरुप ब्रह्मज्ञ ब्राह्मण वाटतो. सतराव्या शतकापर्यंत वर्णांधळेपणापासून मुक्‍त झालेला हा वारकरी दुष्टीकोन कुठून उत्क्रांत होत आला होता ? ज्या गोरखनाथांच्या परंपरेत निवृत्ती-ज्ञावदेव आले, त्या गोरखनाथांनी अनेक, कनिष्ठवर्णियांवर गुरुकृपा केली. ‘संत’ किंवा ‘वैष्णव’ किंवा नैष्ठिक वारकरी हा खरे तर वर्णमुक्तांचा समुदाय असायला हवा. भक्ती वर्णमुक्तच काय जीवन्मुक्त करते, असा वारकरी संतपरंपरेत वारंवार व्यक्त झालेला भरवसा आहे. या दुष्टीने पाहिले तर अठराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत वारकरी परंपरेचे मुख्य अपयश हेच दिसते की ब्राह्मणांचा आणि शूद्रांचा तिच्यातला सहभाग कमी होत गेला आणि मागील दाराने एक प्रकाराचे कर्मकांड तिच्यात शिरले. तसेच चोखोबांसारख्या तेजस्वी महार वारकरी कवी तेराव्या शतकानंतर किंवा बहिणाबाईसारखी तेजस्वी ब्राह्मण वारकरी कवयित्री सतराव्या शतकानंतर अवतरली नाही.

आज सुध्दा स्त्री-शूद्रांच्या वेदनेला आणि विद्रोहाला, मुक्तीच्या धडपडीला आणि अभिव्यक्तीच्या ईर्ष्येला मराठी वाड्मयात आपली परंपरा शोधावीशी वाटली तर ती वारकरी भक्तीकाव्यातच सापडेल. या भक्तीकाव्याच्या मुळाशीही स्त्रियांची ओव्या रचून गाण्याची उत्स्फूर्त मौखिक परंपरा आहे. अलीकडे गी पॉतव्हँ आणि हेमलता राईरकर यांनी इंग्रजीत “स्टोनमिल अँड भक्ती” किंवा “जाते आणि भक्ती” नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यात आजच्या काळात मावळ भागात लेखकद्वयांनी गोळा केलेल्या सर्वसाधारण स्त्रियांनी रचलेल्या ओव्यांची उदाहरणे आहेत. माझ्या मते स्त्रियांच्या मौखिक परंपरेत ज्ञानदेवांनी आपला ओवी हा छंद वेचून वाढवला. तेव्हापासून मौखिक परंपरा आणि वारकरी भक्तिपरंपरा यांच्यात, परस्परांचे प्रतिध्वनी जास्त स्पष्ट ऐकू येऊ लागले. ह्या शतकात अशिक्षित पण स्वाभाविक प्रतिभावंत कवयित्री बहणाबाई चौधरींनी परंपरेचे सूत्र अचूक पकडले, दु:ख याच गोष्टीचे वाटते की तुकोबांच्या कवितेचे अनुकरण करणारे फुले आणि तिचा रसास्वाद घेणारे आंबेडकर वारकरी परंपरेला जाणूबुजन टाळून गेले. सात शतके विकसित होत गेलेल्या ह्या समावेशक सामूहिक परंपरेत वर्णव्यवस्थेने पुन्हा फूट पाडली. स्त्रिया आणि दलितांनी या परंपरेला वंचित राहावे आणि हा संप्रदायही स्त्रियांच्या आणि दलितांच्या ऊर्जेपासून आणि प्रतिभेपासून वंचित राहावा हे आपले सांस्कृतिक दुर्दैव आणि दैन्य.

संत बहिणाबाईंची मूर्ती देहूच्या देऊळवाडयात आपल्या योग्य जागी प्रतिष्ठापित होते आहे, ही एक नवी सुरुवात आणि दिशा ठरो, एवढीच इच्छा.

तुकोबांचे अनुवादक

दिलीप पुरुषोत्तम चित्रे

जन्म - १७ सप्टेम्बर, १९३८ ( बडोदा).

मृत्यू - १० डिसेम्बर, २००९ ( पुणे).

कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कविश्रेष्ठ तुकोबांवरील अनन्यभक्‍तीचा आणि त्यातून उत्क्रांत झालेल्या त्यांच्या स्वत:च्या कवितेचा अन्वय...

समृध्द आणि उज्ज्वल वारकरी परंपरेतील ज्ञानदेवांच्या अभंगातील राजस शब्दकळा, नामदेवांच्या रचनेचा डौलदार गोडवा, एकनाथांची खेळकर शैली, तुकोबांच्या अभंगांची सर्वंकष भाषा हे मूळ मराठीचे आदर्श आहेत. ही परंपरा आग्रही, आक्रमक, व्यक्‍तिकेंद्रित नसून, समावेशक सहिष्णुता जोपासणारी आहे. विठ्ठलाची प्रतिमा वाङ्‍मयीन निरुपणाची दृश्यबिंदू असलेली वारकरी परंपरा हीच मराठी वाङ्‍मयाची खरी परंपरा आहे आणि मराठी साहित्यिक या नात्याने आपल्याला याच परंपरेत स्थान हवे. ही परंपरा हरवली असेल तर साहित्यिक या नात्याने आपल्या अस्तित्वालाही अर्थ नाही, ही भावना कविवर्य दिलीप पुरुषोत्तम चित्रे आपल्या रचनेत व्यक्‍त करतात.

हरवले जेथे ज्ञानदेव तुकाराम
तिथेची मला तुम्ही द्यावा पूर्णविराम
सूक्ष्मपणे सर्व परंपरा वसे
तिथेची मला स्थान द्या थोडेसे

ज्ञानदेव-तुकारामांचा धागा चित्रेंच्या साहित्यिक कारकीर्दीत प्रथमपासून अव्याहतपणे अनुस्यूत आहे. ‘श्रीज्ञानदेव : आद्य मराठी संतकवी’ हा लेख त्यांच्या लिखाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरील आहे. ‘ज्ञानदेव आणि आपण’ मध्ये चित्र्यांनी मांडलेले विचार मराठी संस्कृतीचे उगमस्थान दर्शवते. ज्ञानदेवांनी सर्वप्रथम मराठीला वाङ्‍मय भाषा म्हणून स्थान मिळवून दिले. त्याद्वारे मराठी वाङ्‍मयाच्या ज्ञानसाधनेचा पायाही त्यांनी रचला. स्त्रियांनी मौखिक परंपरेतून घेतलेली जात्यावरची ओवी ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’साठी निवडली.

लौकिक-अलौकिकात अद्वैत आहे, असे सांगणाऱ्या ज्ञानदेवांनी धर्मनिरपेक्षता कृतीत उतरविली. अनेक वंश, धर्म, जाती, पंथ यांतून जो बहुपारंपरिक भारत तयार झाला, त्याचे प्रतिनिधित्व ज्ञानदेव करतात. संस्कृतीकडे बघण्याची व्यापक दृष्टी त्यांनी दिली. त्यांच्या कालखंडात अनेक दिग्गज कवी मराठीत एकत्र नांदताना दिसतात. चोखोबा, गोरोबा, नामदेव, सावता माळी हे वेगवेगळया बलुत्यांचे प्रतिनिधित्व करीत होते. त्या- त्या बलुत्यांची भाषा ज्ञानदेवांनी वापरली. एकसंध सर्वसमावेशक मराठी समाज कसा असू शकतो, याचे १३व्या शतकात त्यांनी दर्शन घडविले. भक्‍ती हा रसात्मक अनुभव आहे, हे प्रथम ज्ञानदेवांनी मांडले आणि तुकोबांनी ते पूर्णतेला नेले. तुकोबांची कविता हा भक्‍तीचा चिद्विलासात्मक प्रत्यय आहे आणि तो ‘अनुभवामृता’ पासून सुरू झालेल्या अव्याहत परंपरेचा उत्कर्ष आहे.

‘मुळात आपण मराठी कवितेकडे वळलो, याचे कारण तुकोबा’ असे चित्रे सांगतात. ‘१६ व्या वर्षी मला वाटले की, मी मराठी कवीच होणार. तेव्हा दहशत फक्‍त तुकोबांची वाटली होती. पण आज ५१ व्या वर्षी वाटते की, मराठी कवी तर मी आहेच आणि हा आपला खापर- खापर- खापर- खापर पणजोबा हा कवितेचाच पूर्वज आहे काय?’ चित्र्यांचे तुकोबा केवळ मराठी कवितेपुरते वा भाषेपुरते मर्यादित नाही, तुकोबांशिवाय आपण मुळात कवितेचीच कल्पना करू शकत नाही, असे ते सांगतात.

१८६० ते १९६० या शंभर वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेऊन चित्रे निदर्शनास आणतात की, ‘आपली वाङ्‍मयीन संस्कृती ही मुळात वारकरी संस्कृती होती. वारकरी चळवळीचा मूळ गाभाच एकभाषिक आणि वाङ्‍मयीन समाजनिर्मितीचा होता. तिच्या स्वाभाविक पर्यावरणाचा त्याग करून आपले कवी व समीक्षक एक शतकभर पोकळीतच साहित्यव्यवहार करीत राहिले. तेव्हा तुकोबांची गाथा न वाचणे आणि आपले सांस्कृतिक अज्ञान सुरक्षित ठेवणे - हाच वरील लोकांना उपाय होता. जागतिक वाङ्‍मयाचा एक उच्चांक, त्यातले एक सर्वोच्च शिखर आपल्या परिसरात असताना त्याचा आपल्याला विसर पडला. ज्याप्रमाणे प्रत्येक शेर्पा काही एव्हरेस्ट चढून जात नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मराठीभाषी व्यक्‍ती काही तुकोबांची गाथा अनुभवत नाही, हेही खरे.’

१९६४ मध्ये सुर्व्यांच्या ‘ऐसा मी गा ब्रह्म’ या संग्रहाचे परीक्षण करताना चित्रे लिहितात, ‘सुर्व्यांनीच काय, सर्व मराठी कवींनी तुकारामांकडे परत वळावे. मराठीत त्याहून जिवंत, सडसडीत, संपूर्णपणे अर्थस्वी कविता अन्य नाही.’ सुर्व्यांची ‘माझी आई’ ही कविता त्यांना सर्वात चांगली वाटली, कारण त्यात तुकारामी प्रामाणिक उच्चार आहे.

स्वत:च्या कवितेची जाणीव असलेले चित्रे आपली ओळख सांगताना ‘कवी’ म्हणून सांगण्याऐवजी ‘तुकोबांचे अनुवादक’ अशी सांगतात. तुकोबांच्या कवितेचा अनुवाद करण्याची प्रेरणा का झाली, याचे स्पष्टीकरण करताना त्यांना तुकोबा कवी व मानवी अवस्थेचे वर्णन करून तिच्यावर मात करणारे - या दोन्ही नात्यांनी आजही प्रस्तुत वाटतात. तुकोबा जसे मराठी वाङ्‍मयाच्या पहिल्या पर्वातले शेवटचे व सर्वश्रेष्ठ कवी ठरतात, तसेच ते मराठी वाङ्‍मयाच्या आधुनिक पर्वातले पहिले आणि सर्वश्रेष्ठ कवी ठरतात. तुकोबा मराठीतले एकमेव संपूर्ण कवी म्हणावे लागतील. कारण कविता हेच त्यांनी आपले एकमेव आणि कायम कर्तव्य मानले.

तुकाराम वाचताना किर्केगार्द यांची त्यांना आठवण येते. तुकोबांची पार्श्वभूमी असल्यामुळे एखार्ट, क्रुझ, ब्लेक कवींचे चांगले आकलन होणे आपणाला शक्य झाले, असाही एक अनुभव ते नोंदवतात. इतकेच काय, पण तुकोबांचे हे साम्य केवळ साहित्य क्षेत्रापुरते मर्यादित न राहता त्यांना तुकोबांची कविता आणि बाखचे संगीत यांच्यात साम्य दिसते. ‘कन्या सासुरासि जाये’ सारख्या सांसारिक जीवनातल्या काळजाला स्पर्श करणाऱ्या अभंगाची वाजीद अली शाहांच्या ‘बाबुल मोरा...’ या अप्रतिम बंदिशीशी तुलना करण्याचा त्यांना मोह होतो.

१९७६ मध्ये अमेरिकेतील वास्तव्यात चित्र्यांनी तुकोबांच्या अनुवादाचे हस्तलिखित रशियन कवितेचा इंग्रजी अनुवाद करणारे डॅनियल वाईसबोर्ट यांना दाखविले. ते वाचून डॅनियल वाईसबोर्ट यांना तुकोबा वैश्विक महात्म्याचे कवी वाटले. विल्यम ब्राऊन, ऍंजला एल्सटोन अशा इतरही कवी-अनुवादक मित्रांना त्यांनी अनुवाद वाचायला दिले. चित्रे सांगतात, ‘यातल्या कोणाला तुकारामाची कविता जॉन डन या एलिझाबेथकालीन कवीसारखी भासली, तर कोणाला विल्यम ब्लेकसारखी, कोणी सान हुआन द ला कुझ या स्पॅनिश गूढवादी कवीशी तुकारामांची तुलना केली, तर कोणाला माइष्टर एखार्टसारख्या जर्मन गूढवादी भक्‍ताची आठवण झाली. काहींना तिच्यामुळे नित्शे, हायडेगर यांच्यासारख्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञांची आठवण झाली. या वाचकांच्या दृष्टीने तुकाराम जुना नव्हता, निव्वळ मराठी नव्हता, भक्‍तीमार्गी हिंदूही नव्हता, तर कायमचा समकालीन असा अभिजात कवी होता. त्या लोकांना ना विठ्ठल ठाऊक, ना पंढरपूर! मानवी आत्मस्थिती त्यांना ओळखता येते. कारण तिला स्थळ-काळाचं बंधन नाही.’

वैश्विक परिप्रेक्ष्यात मराठी असण्याचे जे भान चित्रे दाखवतात, ते फार महत्त्वाचे आहे. ते केवळ वाङ्‍मयीन नसून, सांस्कृतिक आहे. तुकोबांची गाथा ही वाङ्‍मयीन महाकृती आहे आणि म्हणून मानवाच्या वैश्विक वाङ्‍मयीन वारशाचा एक भाग आहे. मराठी संस्कृतीत, मराठी भाषेत एका विशिष्ट कालखंडात तुकोबांची गाथा निर्माण झाली असली तरी तिचा संदर्भ वैश्विक आणि मानवी आहे. कारण तुकोबा स्वत:चे अनुभव वैश्विक परिप्रेक्ष्यात किंवा सार्वभौम मानवी पातळीवरच मांडतात.

‘पुन्हा तुकाराम’ मध्ये मराठीतल्या वाङ्‍मय-विचारांचा आणि वाङ्‍मय-अभ्यासाचा तुकाराम केंद्रबिंदू आहेत, अशी भूमिका चित्र्यांनी मांडली आहे. ‘पुन्हा तुकाराम’ आणि जर्मन भाषेतला अनुवाद ‘वोर्ट देस तुका’ (Wort des Tukaram) हे त्यांनी तुकोबांचे इंग्रजी अनुवाद ‘सेज तुका’ला (Says Tuka) समांतर असे रचलेले आहेत. एकाच वेळी तीन वेगळया संस्कृतींमधून तुकोबांच्या गाथेसारख्या वाङ्‍मयीन महाकृतीकडे येण्याचा तो प्रयत्‍न आहे. तुकोबांच्या व्यक्‍तित्वाच्या अनेक पैलूंपैकी ‘कवी असणे’ यावर चित्र्यांचा भर आहे आणि त्याद्वारे ते एका महाकवीचे दर्शन घडवितात.

तुकाराम दर्शन - प्रस्तावना

राम बापट

राम बापट - राज्यशास्त्राचे व त्या संदर्भात अन्य समाजविज्ञानांचे अभ्यासक; पुणे विद्यापिठात 1965 पासून 1991 पर्यंत राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागात प्रथम व्याख्याता व नंतर प्रपाठक म्हणून काम केले. काही काळ त्या विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग. दलित, आदिवासी, मागास व स्त्रीया आणि पर्यावरण याविषयीच्या चळवळीत रस.

डॉ. सदानंद मोरे हे तुकारामांचे दहाव्या पिढीतले वंशज. स्वत: पिढीजात वारकरी. त्याशिवाय तत्त्वज्ञ. मराठी भाषेच्या संस्कृतीचा बहुजन समाज हा गाभा आहे. देहूकर मोरे घराणे जणू त्याच्या केंद्रस्थानी आहे. या घराण्यातून आधुनिक विद्येचा पहिला पदवीधर होण्याची संधी डॉ. मोरे यांचे वडील श्री. श्रीधरअण्णा यांना लाभली असती. पण त्यांनी १९४२ च्या स्वांतत्र्य संग्रामात भाग घेतल्याने त्यांची ही संधी हुकली. तथापि त्यांचे चिरंजीव सदानंद यांनी विद्यापीठीय शिक्षणातील सर्वोच्च पदवी तर मिळविलीच पण स्वत:च्या कर्तृत्वाने पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक वर्गात प्रवेश मिळविला.

प्राप्त परिस्थितीत माणुकसीला धरून पुढची वाट कशी काढावी याविषयी जगभरची व भारतातीलही नानाविध दर्शने व विचारप्रणाली आज गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. अशा वेळी आपल्या परंपरेशी जैव नाते राखत आणि आपल्या वडिलांच्या व्यासंगी आशिर्वादाच्या कृपेने डॉ. मोरे मराठी भाषेच्या संस्कृतीचा वेध घेऊन आपण यापुढे कशी वाटचाल करावी याचे विश्लेषण वारकरी दर्शनाच्या नव्या अभिनव व मौलिक मांडणीतून करीत आहेत. त्यांचा हा ग्रंथ म्हणजे आत्मभान आलेल्या बहुजन समाजात तुकोबांचा वारसा घेऊन यापुढे जोमाने नव्या दार्शनिक मांडणीला सुरुवात होणार आहे याचे प्रसादचिन्हच आहे. अशा या प्रेरणा देणाऱ्या नव्या द्दष्टीच्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळणे ही गोष्ट मी मोठ्‍या आनंदाची मानतो.

प्रथमत: हे लेखन करण्यामागील डॉ. सदानंद मोरे यांची उद्दिष्टे कोणती,मराठी संस्कृती, वारकरी परंपरा व तुकोबा यांच्या अन्योन्य संबंधाविषयी त्यांची धारणा कोणती, कोणत्या शत्रू / मित्रांच्या संदर्भात ते संघर्ष/ संवाद करीत आहेत आणि या सर्वांमागे त्यांची स्वत:ची जीवननिष्ठा काय आहे हे मी थोडक्यात जास्तीत जास्त त्यांच्याच शब्दांत सांगणारे आहे.

वारकरी संप्रदायाची खूण म्हणून गळयात तुळशीमाळ घालतात. ती १०८ मण्यांची असते. डॉ. मोरे यांची लेखमालाही १०८ लेखांचीच असून नंतरचे काही लेख तिला जणू पूरक म्हणून त्यांनी समाविष्ट केले आहेत. एखाद्या साप्ताहिकामधून एखाद्या मूलभूत, तात्विक विषयाची, तीही नवी अशी मांडणी करणे सोपे नसते. अशा वेळी आपल्या 108 लेखांच्या धारावाही मांडणीत त्या मर्यादा ओलांडून मोरे यांनी मराठी संस्कृतीचे व तिच्या भागवत संप्रदायी सत्त्वधारेचे स्वरूप साररूपाने आपल्या पुढे मांडले आहे. ते मांडताना त्यांची उद्दिष्टे आपल्याला लक्षात घेतली पाहिजेत.

ते असे रास्तपणे मांडतात की, ज्याला महाराष्ट्राचा आणि मराठी संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे त्याला तुकोबा ही मोक्याची जागा पकडावी लागेल. तुकोबा हा सांस्कृतिक टेहळणीसाठी मोक्याचा बुरुज आहे. येथून चौफेर द्दष्टिक्षेप टाकता येतो, आणि एरवी नजरेरून सुटणाऱ्या अनेक बाबी अचूकपणे टिपता येतात. त्यांच्या मते तुकोबा एक सम्यक् सांस्कृतिक परिप्रेक्ष्य आहे, म्हणूनच तुकोबांच्या व्यक्तित्वाचा वेध थेट ज्ञानदेवांपर्यंत, खरे तर पुंडलिकापर्यंत पोहचला व दुसऱ्या बाजूला शिवकाल, उत्तर मराठेशाही, पूर्वोत्तर पेशवाई आणि अव्वल इंग्रजी काळातील प्रबोधन इत्यादि टप्पे ओलांडत थेट इथे आणि आत्ता अशा जिवंत वर्तमानात उतरतो.

ही धारणा बाळगून या मालेची तीन प्रमुख उद्दिष्टे ते नमूद करतात. संतविषयक सर्वसाधारण गैरसमजांशिवाय स्वत: तुकोबा या व्यक्तिविषयकही अनेक चुकीच्या कल्पना रूढ आहेत. त्या दूर करून तुकोबांचे यथार्थ दर्शन घडविणे हे पहिले उद्दिष्ट. महाराष्ट्राचे संस्कृतीपुरुष म्हणून तुकोबांचे वेगवेगळया कालखंडांमधील वेगवेगळया व्यक्तिंनी आणि सांस्कृतिक समूहांनी मूल्यमापन केले. त्यातून तुकोबांचे दर्शन घडते. त्याशिवाय त्या त्या व्यक्ति व व्यक्तिसमूहांचेही दर्शन आपोआप घडते. ते एकत्रितपणे प्रकट करणे हे दुसरे उद्दिष्ट. अर्थातच संबंधित व्यक्ती वा समूहांना तुकोबा नेमके असेच का दिसले यामागील कार्यकारण भावाचा हा तिसरा उद्देश. या तिहेरी प्रक्रियेतून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा पट उलगडायला मदत होते. ही सिध्दी पण त्यांना मिळवायची होती.

वेगळया भाषेत मांडायचे म्हणजे तुकोबांच्या अभंगांमधून त्यांचे दर्शन घडविणे हा या लेखमालेचा प्रधान हेतू नव्हता. त्याचप्रमाणे तुकोबांसंबंधी कोणी काय लिहिले आहे, याचा आढावा घेणे हेही तिचे उद्दिष्ट नव्हते. भाविक विवेचनाला त्यात स्थान नव्हते, तर पारलौकिक आणि लौकिक किंवा तत्त्वदर्शन व व्यवहार असे कप्पे न पाडता तुकारामरुप महाराष्ट्र संस्कृतीचे मूल्याधिष्ठित व सर्जनशील विश्लेषण करण्याचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या पुस्तकात तुकोबांचा गौरव करण्याचा किंवा त्यांचे उन्नयन करण्याचा खटाटोप नाही. तुकोबांचा मोठेपणा इतका आहे, की असल्या गोष्टींची त्यांना गरजच नाही. मराठी संस्कृतीची चोख समीक्षा व्हावी आणि त्याकरिता तुकोबांच्या दर्शनाचा अंजन म्हणून उपयोग व्हावा अशी त्यामागे धारणा आहे. झाले असेल तर एवढेच की तुकोबांचे देणे तुकोबांना देण्यात कुणी खळखळ केली असेल तर त्याचे माप त्याच्या पदरात टाकण्यात आले आहे.

मराठी संस्कृती, वारकरी दर्शन व संप्रदाय आणि तुकाराम यांच्याविषयी डॉ. मोरे यांची धारणा पुढीलप्रमाणे सांगता येईल. वारकरी संप्रदाय हा मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह. तुकोबांना समजावून घेतले म्हणजे वारकरी परंपराच समजली; म्हणजेच मराठी संस्कृतीच्या आकलनाची कळच हातात आली. तुकोबांचे विचार हे वेगळे आणि स्वतंत्र दर्शन आहे. त्याच्या मांडणीची सुरुवात प्रथम ज्ञानदेवांनी केली. तुकोबांनी ते पूर्णतेला नेले. ही वारकरी परंपरेची निर्मिती असल्याने म्हटले तर ते वारकऱ्यांचे स्वतंत्र दर्शन आहे. पण त्याचबरोबर ते तुकोबांमध्ये परिपूर्ण स्वरूपात दिसत असल्याने तुकोबांचे दर्शन आहे. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम या क्रमाने ते पूर्णत्वाला पोहचले. ही एक आत्मभान असणारी परंपरा आहे. त्यात भेद नाहीत तर एक अखंड संवाद आहे. म्हणूनच कालद्दष्टया पहिल्या तिघांचेही संस्कार व विचार तुकोबांच्या ठायी एकवटले आहेत. त्यामुळे तुकोबांचे आकलन या सर्वांच्या आकलनाला उपकारक ठरते. या स्वायत्त दर्शनाच्या व परंपरेच्या संदर्भात ज्ञानेश्वर व तुकाराम यांत भेदाभेद करणे हे वारकऱ्यांच्या लेखी महापाप. त्यांना पाहायचे तर वारकरी होऊन पाहावे. ज्ञानोबा-तुकाराम हा वारकऱ्यांचा मूलमंत्र, ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा अर्थ तुकोबांच्या अभंगांनी आणि अभंगांचा अर्थ ओव्यांनी उलगडून दाखवणे ही खास वारकरी पध्दती देहूकरांमध्ये चालत आलेली.

डॉ. मोऱ्यांना बहुपरिमाणी तुकोबांचे दर्शन ही काही सोपी बाब नव्हे असे रास्तपणे वाटते. म्हणून त्यांची मांडणी एका वेगळया पध्दतीची आहे. पूर्वसूरींना तुकोबा कसे दिसले, कसे समजले याचे दर्शन ते पहिल्यांदा घडवतात. पण एवढेच सांगणे पुरणार नाही. म्हणून त्या दर्शनांचे विश्लेषण करून त्यांची काही कारणमीमांसा करता येते का, याचा प्रयत्नही ते करतात. ही कारणमीमांसा आवश्यक तेथे व्यक्तिगत, तर आवश्यक तेथे सामाजिक आहे असे त्यांना वाटते. तुकोबांच्या व्यक्तित्वाचे कोणते पैलू कोणाला दिसले, कोणते दिसले नाहीत, का दिसले व का दिसले नाहीत इत्यादि प्रश्नांची चर्चाही ते करतात.

या दर्शनाची सुरुवात तुकोबांच्या समकालिनांपासून होणार असे वाटणे स्वाभाविक असताना ते सुरवात करतात ते थेट ज्ञानदेवांपासून आणि येतात पार समकालीन दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांपर्यंत. या प्रदीर्घ कालखंडातील तुकारामदर्शनांचा वेध हा आपोआपच मराठी संस्कृतीमधील स्थित्यंतरांचा आलेख ठरतो. झाले दर्पणाचे अंग, ज्याचा त्यासी दावी रंग असे तुकोबांनी स्वत:बद्दल म्हटले आहे. मोरे ठासून सांगतात, की आपल्या समकालिनांना तुकोबा त्यांचे प्रतिबिंब दाखविणारा आरसा ठरले. पण त्यांचे हे दर्पण असणे अजूनही संपलेले नाही. तुकोबांना त्यांच्या उत्तरकालिनांनी जो प्रतिसाद दिला, त्यातून त्यांची स्वत:ची इयत्ता आणि गुणवत्ता यांचे दर्शन घडतेच, तुकोबांचे आपल्याला घडणारे दर्शन हे आपले स्वत:चेही दर्शन असते. ती आपल्या द्दष्टीची परीक्षाही असते.

तुकारामदर्शन म्हणजे मराठी संस्कृतीचे दर्शन म्हणायला आणखी एक निर्णायक कारण आहे. त्याच्या अतूट संबंधाचे बीज भाषिक आहे. मराठी भाषेवर व म्हणूनच मराठी संस्कृतीवर तुकोबांचा प्रचंड ठसा आहे. राजारामशास्त्री भागवतांच्या शब्दांत आम्हा मराठयांचा आगम खरोखर मराठीत आहे, संस्कृतात नाही. आम्हा मराठयांस श्रुती, स्मृती, वेदांतभाष्याची गरज नाही. ज्ञानेश्वरी व तुकारामबुवांची गाथा म्हणजे आमचे आगम. भाषा, संस्कृती, तत्त्वज्ञान व जीवन यांचा हा एकात्म संबंध लक्षात घेतला तर तुकोबा समजून घेतल्याने मराठी माणसालाच नव्हे तर तुकोबांची भाषिक गुणवत्ताच अशी की जगातल्या कुठल्याही माणसाला आत्मभान गवसेल. तुकोबांच्या भाषेत गुंफल्या गेलेल्या आत्मभानाला तोड नाही. ते व्यापक होते, एकसंध होते. त्यांच्या या अभंग आत्मप्रत्ययामुळे आत्मनिष्ठा आणि सामाजिकता यातील द्वैत विरून जाते. आमुचा स्वदेश । भुवनत्रयामाजी वास ॥ असे म्हणणाऱ्या तुकोबांच्या आत्मप्रत्ययाचा आवाका; देश, धर्म, जातींच्या सीमा ओलांडून एकूण मानवतेलाच कवेत घेणारा आहे. तुकोबांच्या या भूमिकेमुळे मराठी संस्कृतीला व माणसाला स्वत:चा अस्सलपणा राखून वैश्विकतेला जैवपणे जोडणारा एक शुध्द जीवनरसच लाभला आहे.

तुकारामदर्शनाची मांडणी डॉ. मोरे एका विशिष्ट सामाजिक - सांस्कृतिक संदर्भात करीत आहेत. एकाच परंपरेत वेगवेगळे अंत:प्रवाह संभवतात, मतभेदही संभवतात ह्या वस्तुस्थितीची जाणीव मनाशी सदैव बाळगत बाळगत महाराष्ट्रातील प्राचीन , अर्वाचीन , तसेच सनातनी, पुरोगामी तसेच ब्राह्मण, ब्राह्मणेतर परंपरांनी तुकोबांकडे कोणत्या द्दष्टीने पाहिले, त्यांना कोणत्या प्रकारचा प्रतिसाद दिला, यांचा विचार मांडताना हे संदर्भ महत्त्वाचे ठरतात. कारण त्यावरून डॉ. मोरे कोणत्या शत्रू - मित्र वाचकांशी संघर्ष संवाद साधू पाहात आहेत याचाही उलगडा होतो.

त्यांच्या मते या मांडणीचा एक संदर्भ असा; की गेल्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तुकारामदर्शन स्वायत्त असल्याने अबाधित होते. परंतु त्यानंतरच्या काळात वारकरी संप्रदायाशी मुळात संबंध नसलेली काही मंडळी त्यात घुसून गीता-भागवताला व ज्ञानेश्वरी-गाथेला वेदोपनिषदांच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न करून संप्रदायाचे स्वरूपच बिघडवीत आहेत. खरे तर ते त्यांनी बिघडविलेलेच आहे. या उच्चस्तरीय पोपटपंची करणाऱ्या धर्मठकांची वारकऱ्यांना झालेली लागण सदानंद मोरे यांना दूर करावयाची आहे. महाराष्ट्रातल्या काही मंडळींना ज्ञानदेवांनी वारकरी असणे रुचत नाही. ते ज्ञानदेवांना तुकोबांपासून तोडून तुकोबांना गौण स्थान देऊ पाहतात. म्हणूनच तुकारामकालीन महाराष्ट्रात ज्ञानाच्या सर्व किल्ल्या ब्राह्मणांच्याच कमरेला असल्यामुळे तुकोबा किती खोल पाण्यात आहेत हे अनुभवलेल्या रामेश्वर भट्टांना म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा । तुका विष्णू नाही दुजा हे समकालीन ब्राह्मणांना सांगावे लागते यातच महाराष्ट्रातील ज्ञान, अभ्यास आणि अधिकार यांचा पूर्ण आलेख आलेला आहे, ही गोष्ट डॉ. मोरे यांना आवर्जून प्रगट करावी लागते. आणि मग तुकारामकालीन परिस्थितीत आजही काही गुणात्मक फरक पडला आहे, असे म्हणायला निदान मला तरी जागा दिसत नाही असे ते साधार म्हणतात त्याचे रहस्य आपल्याला कळते.

याच संदर्भात डॉ. मोरे यांना सनातन परंपरा आणि वर्तमानकालीन आधुनिक बुध्दिवाद यांची कप्पाबंद विभागणी करणाऱ्या व म्हणून तुकारामरूप बहुजनांपासून तुटलेल्या अभिजनवादी उच्चशिक्षितांकडे वळावे लागते. आधुनिक महाराष्ट्रातील उपयुक्ततावादी बुध्दिवादी तसेच यांत्रिक जडवादाच्या छायेत वावरणारे मार्क्सवादी प्राचीन भारतीय अभिजात परंपरा आणि पाश्चात्य नवविचार ही दोनच विश्वे गृहीत धरतात मराठी संतांच्या विचारांचे एक स्वतंत्र विश्व आहे हे त्यांना उमजतच नाही. त्यांनी गृहीत धरलेली दोन विश्वे फारच थोडया लोकांसाठी अस्तित्वात होती. येथील बहुसंख्य समाज तिसऱ्या विश्वात वावरणारा आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे या तिसऱ्या विश्वातील समृध्द शक्तिमत्तेमुळे इतर दोन विश्वांची कोणताही ताण निर्माण होऊ न देता सांधेजोड होऊ शकते हे त्यांना कळतच नाही. असे विचारवंत मराठी संताचे अर्थातच तुकोबांचे विश्व ही प्राचीन अभिजात विश्वाची बाळबोध प्रतिकृती मानतात, व म्हणून ती अनावश्यकही ठरवतात. ते या भरात ज्यावेळी तुकोबांविषयी व म्हणून मराठी परंपरेविषयी तुच्छतेने उद्गार काढतात त्यावेळी डॉ. मोरे यांना त्यावर शरसंधान करावेच लागते. बोलूनचालून आहेत ते तुकोबांचेच वंशज !

या संदर्भात डॉ. सदानंद मोरे यांची वैचारिक भूमिका समजावून घेतली तर आपल्याला या ग्रंथाचे मर्म समजावून घेता येईल. पाश्चात्य पध्दतीने विचार करणाऱ्या आपल्या विद्वानांना भारतीय संदर्भात धर्म आणि राज्य यांचा संबंध कसा असला पाहिजे याची कल्पना करता येत नाही. तसेच येथील सेक्युलॅरिझम सुध्दा पाश्चात्य वळणाचा असण्याची गरज नाही, हेही समजत नाही आणि परिणामत: ते जनसामान्यांकडून अलग पडतात, काही वेळा तर हास्यास्पद बनतात असे मोऱ्यांना वाटते. राजा, राज्य, शासन या उपटसुंभ पण अटळ आपत्ती आहेत. परंतु पाश्चत्य राज्यसंस्था आणि भारतीय राज्यसंस्था यांच्या विकासात एक महत्त्वाचा फरक आहे. राज्यसंस्था आणि यांच्या विकासात एक महत्त्वाचा फरक आहे. राज्यसंस्था आणि धर्मसंस्था यांच्या संघर्षातून तिकडे सेक्युलॅरिझमची कल्पना निघाली. परंतु राज्यसंस्था धर्माच्याच वळणावर जाऊन लोकांच्या डोक्यावर बसू लागली. 'सिव्हिल सोसायटी' आणि 'स्टेट'असे नवे द्वैत उत्पन्न झाले. हा झाला पाश्चात्य राज्यसंस्थेच्या विकासाचा क्रम. भारतात एकतर धर्मसंस्था आणि राज्यसंस्था असा विरोध दिसत नाही. आणि दुसरे असे की औपचारिक लोकशाही नसतानाही सत्तेचे आणि अधिकारांचे मोठया प्रमाणावर विकेंद्रीकरण भारतात पहिल्यापासून आहे. त्यामुळे वरील तऱ्हेचे 'सिव्हिल सोसायटी' विरुध्द 'स्टेट' हे द्वंद्व येथे उत्पन्न झाले नाही. येथे केंद्रस्थानी कोणाचेही राज्य आले तरी सामान्य माणसाला त्याची पर्वा नसे. म्हणून राजवाडे प्रभृती मंडळी भारतीय मानसिकतेला दूषण देतात ते त्यांनी आधुनिक राष्ट्र - राज्य संकल्पना पश्चिमेकडून घेतल्यामुळे असा अन्वयार्थ डॉ. मोरे लावू पाहतात. आशियाई शासने दमनसाधन म्हणून युरोपीय शासनांपेक्षा वेगळया प्रकारची होती, अशी कबुली काही मार्क्सवादी विचारवंतांनी केल्याचा दावाही ते मांडतात. थोडक्यात आशियात भारतीय आणि भारतात परत मराठी राज्यपध्दतीचा विचार वेगळया रीतीने करावा लागतो हे त्यांचे म्हणणे.

डॉ. सदानंद मोरे यांच्या या द्दष्टिकोनाच्या बुडाशी आणखी एक खोल तत्त्व आहे. जीवनाचे आत्मनिष्ठ आणि सामाजिक असे दुभंगलेपण मान्य केल्यावर त्यावर मात करण्यासाठी, मेळ घालण्यासाठी आपण राज्यसंस्था नावाच्या तिसऱ्याच गोष्टीच्या विषारी वर्तुळात अडकतो. यासाठी समाजरचनाच बदलली पाहिजे हा एक मार्ग. परंतु हा बाह्य मार्ग झाला. या बाबतीत उदारमतवादी आणि त्यांचे शासन किंवा उलट मार्क्सवादी आणि त्यांचे शासन प्रश्न अधिकच जटील बनवतात. म्हणून परत एकदा व्यक्तीला तिची सामाजिकता पटावी, नैसर्गिक वाटावी, आपण इतरांनाही जबाबदार आहोत, अशी भावना तिच्यात निर्माण व्हावी असे पाहिले. उठसूट आपले प्रश्न शासनाकडे किंवा अन्य संस्थांकडे न सोपवता त्याबाबतचे आपले कर्तव्य अगोदर पार पाडायला शिकविले पाहजे, त्यातून आपला लाभ झाला नाही (किंबहुना हानी झाली) तरीही. साहित्यात काय, किंवा शासनात काय, साहित्यिकांचा आणि शासनकर्त्यांचा दुभंगलेपणा प्रतिबिंबीत होत असतो, म्हणून तर भूमिका (रोल) बदलली की, माणूसच बदलल्यासारखा वाटतो असे डॉ. मोरे यांना मनोमन वाटते.

तुकोबासांठी वैयक्तिकता आणि सामाजिकता, आत्मनिष्ठा आणि वस्तुनिष्ठा या दोन भिन्न बाबी भिन्न नाहीतच. म्हणूनच मन आणि जन, आत्मविष्कार आणि उपदेश, करुणा आणि क्रोध, औचित्य आणि कठोर समीक्षा, माणूस आणि निसर्ग यांच्यातला दुभंगलेपणा तुमाराम मानत नाहीत. मुख्य म्हणजे असल्या द्वंद्वांवर मात करून निरपेक्ष, नैतिक, आनंदभावी अशी सर्व जडचेतन विश्वाची सर्वसमावेशक जीवनद्दष्टी व आत्मनिष्ठा वेळोवेळी घनघोर संग्रमांचे आव्हान सहजगत्या स्वीकारून जगून दाखवतात. हेच त्यांच्या जीवनाचे सार, हेच वारकरी परंपरेचे दर्शन, हेच ज्ञानोबा - तुकोबा नामजपाचे इंगीत.

आता या प्रकाशात लेखांक दोन ते सदतीस व नंतर एकशेएक व एकशेतीन या लेखांतून मोरे तुकोबांच्या आरशात आधुनिकपूर्व मराठी संस्कृतीचे अंतरंग कसे दिसते याचा उलगडा करतात. त्यातून आपल्याला स्वतः तुकोबा, ज्ञानोबा - तुकोबा; वेद, प्रस्थानत्रयी, वेदांत, वेदप्रामाण्य; तत्कालीन ब्राह्मण समाज व त्याचे ब्राह्मणेतरांशी नाते; तत्कालीन हिंदु - मुसलमान संबंध, तत्कालीन स्त्रीविषयक द्दष्टिकोन, तत्कालीन धर्मसत्ता व राजसत्ता यांच्यातील अन्योन्यसंबंध, तत्कालीन संप्रदायांच्या एकमेकांविषयीच्या धारणा आणि खुद्द तुकोबांचे स्वतःचे विश्व व त्यांच्या कुटुंबियांचे जग उजळून दिसते.

तुकोबांचे व्यक्तित्व कमालीचे आत्मनिष्ठ होत. आपल्या ज्ञानाचे, वाणीचा, अभंगांचा झरा साक्षात ईश्वरी स्फूर्ती हाच आहे अशी त्यांची धारणा होती. फार मोठी किंमत देऊन त्यांनी हा अनुभव घेतला होता. म्हणून आपण श्रुतीचे अंकित नसून साक्षात ईश्वराशी संबंध असल्याच्या खात्रीपोटी आणि वेदांचे अध्ययन न करताही तुकोबांनी वेदांची खंडे निवडण्याचे धारिष्ट ईश्वरी प्रसाद लाभल्याच्या डोळस अनुभवामुळेच केले. अशा निमित्ताने दिसणारे वेद व त्यांच्या विचारातील अर्थसाम्यमूळ वेद नसून वेदांचे जे मूळ म्हणजे ईश्वरच आहे अशी त्यांची धारणा होती. ईश्वरानेच आपली निवड केली आणि आपल्याला अभिषिक्त केले अशी बेडर भूमिका म्हणूनच ते घेऊ शकले.

हेच सत्य अनुभवाने प्रतित झालेल्या ज्ञानदेवांनी गीता नामक स्मृतीला वेदांपेक्षा जास्त प्रामाण्यदर्जा देऊन, प्रामाण्याच्या क्षेत्रात जणू 'कोपर्निकन क्रांती' घडवून आणली. ऋषींच्या वाणीहून परमात्म्याच्या वाणीला प्रमाण मानल्याने ज्ञानदेवांनी गीतेच्याच जोडीला अन्य दोन प्रस्थानांवर भाष्ये करण्याची प्रथा मोडली. या भूमिकेची पूर्तता एकनाथांनी केली. त्यांनी कृष्णवाणी असलेल्या एकादशस्कंधावर मराठीत भाष्य लिहिले. तेव्हापासून मातृभाषेला प्राधान्य देण्याच्या प्रवृत्तीची साथ घेऊन ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत हीच वारकऱ्यांची प्रमाणे आणि प्रस्थानद्वयी. ही बैठक एकदा पक्की असली म्हणजे वेदांची व्यापक प्रमाण चौकट स्वीकारण्यामुळे काही बिघडत नाही, असे मोऱ्यांना दिसते.

याच पध्दतीने गुरुपरंपरेला वारकरी परंपरेने कसा छेद दिला हे कळते. नाथपंथ या गुरुमार्गी परंपरेचे वारसदार असताना सुध्दा गहनीनाथ आणि म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञान संक्रात करण्याच्या पध्दतीत एक क्रांतिकारक कृती केली. मेघवृष्टीने करावा उपदेश । परि गुरुने न करावा शिष्य अशी नवी उन्नत द्दृष्टी वारकरी संप्रदायाला लाभली. निवृत्तीनाथ हे पारंपरिक अर्थाने वारकरी संप्रदायाचे अखेरचे गुरु ठरतात. त्यानंतर गुरु हा शब्द राहिला असेल पण वजन आणि परिमाण दोन्ही बदलली. या संदर्भात अद्वैतशास्त्र न आवडणाऱ्या तुकोबांनी स्वप्नात बाबाजी चैतन्यांकडून रामकृष्णहरी हा मंत्र घेण्याच्या कथेच्या निमित्ताने तुकोबांनी परंपरेला कलाटणी कशी दिली व गुरु हाच देव या पारंपरिक समजुतीऐवजी देव हाच गुरु ही उघडया मंत्राची रीत कशी सिध्द केली याचे मोरे फार मार्मिक वर्णन करतात. गुरु फार तर ब्रह्मज्ञान देऊ शकतात पण विठोबाची प्रेमखुण देऊ शकत नाहीत, पण संत नेमके ते करतात. प्रेमाची अवस्था ही ईश्वरी ज्ञान पोटात घेऊन पुढे जाण्याची आहे. व हे रहस्य सर्वांपुढे प्रेममय जीवनाकरता प्रगट करणे ही वारकरी परंपरेची देणगी आहे व तिची स्पष्ट मांडणी तुकोबांच्या अभंगांमधून सापडते.

याच संदर्भात वारकऱ्यांचे आणि अर्थातच तुकोबांचे प्रतिपादन पूर्वमीमांसक, शंकराचार्यादि पंडित तसेच लोकमान्य टिळकांपेक्षा वेगळे आहे. भक्तीची प्राप्ती हे कार्य आणि त्यासाठी ब्रह्मज्ञान हा मार्ग किंवा कारण हा तुकोबांचा मुद्दा मात्र पारंपरिक, कार्यकारणक्रमाची उलटापालट आहे. म्हणजेच भक्तीशिवाय ज्ञान सांगणे त्यांना मान्य नाही. पाखंडी ठरतो. दोघेही वेदप्रामाण्यवादी. पण एवढा मोठा फरक. त्यामुळे तुकोबा हे एक ऋषीच आहेत असे प्रतिपादन मोरे करतात.

असे असेल तर वारकऱ्यांनी वेदप्रामाण्य का नाकारले नाही? डॉ. मोरे यांच्या मते वेद तेव्हाचा कायदा, घटना, 'पॅरॅडाईम' च होता व मुख्य म्हणजे जनमानसावर त्याचा पगडा होता. अशावेळी वेदप्रामाण्य मानल्यामुळे सुधारणावाद हा कमअस्सल होतो हा समज मोऱ्यांना भाबडा, अनैतिहासिक, साहसवादी वाटतो. वेदप्रामाण्य हा शब्द या संदर्भात आधुनिकांना व सुधारकांना चकवतो, त्यांचा गोंधळ होतो. म्हणून वारकऱ्यांना प्रतिगामी मानणारे आधुनिक आणि त्यांना आपल्या कळपात ओढू इच्छिणारे परंपरागत यांच्या गफलती स्पष्ट करण्याकरता वेदांताचे सार सांगताना गोब्राह्मणहिता होऊनि निराळं । वेदांचे ते मूळ तुका म्हणे म्हणजे वेदांचे मूळ गोब्राह्मणाहितापेक्षा वेगळे आहे असे तुकोबा ठामपणे सांगतात ही गोष्ट डॉ. सदानंद मोरे यांना फार महत्त्वाची वाटते. हा मुद्दा त्यांनी इतका आवेशाने मांडला आहे की त्या भरात त्यांनी तुकोबांना ज्ञानोबांच्या तुलनेत जादा गुण बहाल केले आहेत.

याचमुळे तुकोबांनी उच्चवर्णीय नसणे, त्यांना वेदांचा अधिकार नसणे, त्यांनी औपचारिकरीत्या अध्ययन केलेले नसणे या गोष्टींचे भांडवल करणाऱ्या तुकारामशत्रू खोडसाळ पंडितांचा प्रतिवाद तुकारामांनी कसा केला हे पाहण्यासारखे आहे. वेद हे ब्रह्मज्ञानाचे एकमेव प्रमाण नाही. वेदज्ञान आणि ब्रह्मज्ञान यांच्यात अनिवार्य संबंध नाही. समकालीन वेदवेत्ते ज्ञानहीन असून आपणाला वेदांचा अधिकार नसूनही आपण ज्ञानी आहोत, असा तुकोबांचा धाडसी दावा होता असे मोरे सप्रमाण दाखवतात.

हेच तुकोबा ज्ञानदेवांना कशी मानवंदना देतात व त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सार अन्य कोणीही अजून सांगू शकले नाहीत अशा अचूकपणे आणि कमीत कमी शब्दांत कसे मांडतात हे मोऱ्यांनी अगदी दुसऱ्या लेखातच आग्रहाने व आवर्जून सांगितले आहे. म्हणूनच मुलाला जसे आईबाप प्रिय, तसे वारकऱ्यांना ज्ञानोबा - तुकाराम प्रिय असतात. आणि या धारणेच्या अधिष्ठानावर वारकऱ्यांनी महाराष्ट्रातील ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादाच्या समंधांची आपल्यापुरती वाट केव्हाच लावली आहे असा निष्कर्ष ते आपल्याला सादर करतात.

सामाजिक - राजकीय कार्य निरपेक्षपणे पार पाडणारे कार्यकर्ते व त्यांच्या घरातील मंडळी यांच्यातील नात्याच्या संदर्भात लोकांची या प्रश्नाकडे पाहण्याची रीत किती बोथट व अजब असते याची जाण मोऱ्यांना आहे. आणि म्हणूनच तुकोबा व त्यांचे बंधू कान्होबा आणि त्याहूनही मुख्य म्हणजे तुकाराम व जिजाई यांच्यातील परस्परसंबंधाचे व भावभावनांचे एक अतिशय हृद्य, संवेदनशील, ताणतणावांमागील माणुसकीचा गहिवर टिपणारे चित्रण त्यांनी आपल्याला दिलेले आहे.

तुकोबांचे समकालीन रामेश्वर भट हे ज्ञानदेवांचे भक्त होते. परंतु वारकरी नव्हते. ज्ञानदेवांचा अर्थ सांगण्याचा तुकोबांचा अधिकार हळूहळू ब्राह्मणांना मान्य होऊ लागला होता म्हणून त्यांनी तुकारामांना कडवा विरोध केला. पण काही चमत्कारांनी रामेश्वरांना तुकोबांची खात्री पटली. हा जसा तुकोबांचा वैयक्तिक प्रभाव होता, तसाच तो ज्ञानोबा - तुकाराम या वारकरी परंपरेचाही होता असे मोरे आवर्जून सांगतात.

हिंदु - मुस्लिम संघर्षाचा आणि संबंधाचा मराठी अनुभव हा अन्य ठिकाणच्या अनुभवापेक्षा निश्चित वेगळा आहे. मराठयांनी इस्लामाला आत्मसात केले. म्हणून त्यांचे स्वतंत्र राज्य उभे राहू शकले. मराठे कोणत्याही प्रकारच्या इस्लामगंडापासून मुक्त राहिले. दरबारी लाळघोटेपणा किंवा अलिप्तपणा या दोन्ही प्रतिक्रिया मराठयांच्या नव्हेत. मराठी संस्कृती आणस इस्लाम यांच्यात एक प्रकारचे निकोप राज्य साकार झाले. या संस्कृतीची जडणघडण करण्यात वारकरी पंथाचा व साधुसंतांचा मोठा वाटा होता हा मोऱ्यांचा सिध्दांत तुकोबांची दख्खनी हिंदीतली रचना, कबीरांना वारकरी परंपरेने संत म्हणून सामावून घेणे, तुकोबांनी कबीर आणि इतर मुस्लिम साधुंची घेतलेली दखल तसेच तुकोबांचे समकालीन शेख महंमद हे श्रीगोंद्याचे संत, पेशवाईतला सगनभाऊ हा मुसलमानी शाहीर, या दोघांचे वारकरी परंपरेबद्दलचे उद्गार, मालोजीराजांनी स्वीकारलेले शेख महंमदांचे शिष्यत्व यांच्या प्रकाशात तुकोबा व त्यांच्या परिसरातील अनघडशा फकिर यांच्यातील प्रेममय नात्याचा उलगडा ते करतात. जाताजाता असले चमत्कार व कथा याविषयी संशय व्यक्त करण्याऱ्या वा. सी. बेंद्रेसारख्या इतिहास संशोधकांच्या 'पॉझिटिव्हिस्ट' भूमिकेवर तडाखेही हाणले आहेत !

त्यानंतर तुकोबांच्या ब्राह्मण शिष्या बहिणाबाई, त्यांचे वारकरी वर्तुळाला मान्य असणाऱ्या वज्रसूचीचे मराठी भाषांतर, आणि त्यांना स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी अवकाश देणाऱ्या वारकरी परंपरेच्या थोरपणाचा परामर्श मोरे घेतात. मात्र तुकारामोत्तर वारकरी संप्रदायाला बहिणाबाई पचनी पडल्या नाहीत. निदान आजच्या वारकरी नेतृत्त्वाने तरी बाईंची उपेक्षा थांबवली पाहिजे असे प्रांजळ व स्पष्ट मत व अपेक्षा ते व्यक्त करतात.

नंतर समकालीन राजसत्तेच्या संदर्भात मुसलमानी सत्तांकडून इनामे मिळवण्यात दंग झालेल्या समकालीन महंतांच्या संदर्भात आपुलकीवर आधारलेली समाजाभिमुखता राखून सुध्दा आचरणात आणलेला अंतिम टोकाचा निःस्पृहपणा तुकोबा या ध्रुवताऱ्याने कसा सिध्द केला याचे फार मनोज्ञ दर्शन डॉ. मोरे आपल्याला सादर करतात, त्याचवेळी ही गोष्ट वरवर जरी थोडी विसंगत भासली तरी पेशवे सोडून सर्व मराठी सत्ताधाऱ्यांनी तुकारामांच्या वंशजाकडे कसे आपुलकीने पहिले याची कहाणी सांगतात. हे सूत्र ते पार श्री. शरद पवार यांजपर्यंत आणून पोहचवतात.

डॉ. मोरे यांनी तुकोबा आणि शिवाजी या दोन मराठी महापुरुषांची एक अभिनव तुलना केलेली आहे. तुकोबांपुढे राज्य राजकारण अशा बाबी प्राधान्याने नसल्यामुळे तुकोबांपुढे राज्य, राजकारण अशा बाबी प्राधान्याने नसल्यामुळे तुकोबांनी परंपरेला शरण जाऊन 'मीही क्षत्रिय आहे, द्विज आहे, मला जनकादिकांप्रमाणे वेदाचा अधिकार आहे' असा युक्तिवाद न करता ईश्वरी प्रसादाचा दावा सांगून केला सामरस्ये अभिषेक अशी भूमिका घेतली. तो मान्य करणारे व इतरांनाही मान्य करायला विनादक्षिणा सांगणारे ब्राह्मण तुकोबांना भेटले. म्हणून त्यांचे कार्य अधिक बिकट न होता दिग्विजयी ठरले. पण स्वजातीय रांगडया सरंजामदारांना मोडणाऱ्या शिवरायांना समर्थ रामदासांसारख्या समर्थकांनी ठाम भूमिका न घेतल्याने व त्यांचे क्षेत्रच राजकारणाचे असल्याने सनातनी पंडितांशी तडजोड करावी लागली. यामुळे तुकोबांच्या भूमिकेमुळे मराठी संस्कृतीला जणू शुध्द जीवनरसच लाभला, तर शिवाजी महाराजांच्या तडजोडीने महाराष्ट्र शक्तीचा अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अमाप अपव्यय झाला, असा निष्कर्ष डॉ. मोरे काढतात.

देहू व देहूकरांच्या संदर्भात डॉ. आंबेडकरपूर्व दलित समाज हा बहुसंख्येने वारकरी होता. आंबेडकर आणि वारकरी हा वेगळया अभ्यासाचा विषय आहे असे सांगून काळाच्या गरजा ओळखून काही पारंपरिक मर्यादा ओलांडून व्यापक द्दृष्टी स्वीकारली, तर देहूकर फडांकडून भरीव कामगिरी होऊ शकेल असे सुचवले आहे. आजरेकर फड हा वारकरी संप्रदायाचे मूळ रूप जास्तीत जास्त जपणारा फड आहे असा अभिप्रायही मोरे यांनी नमूद केला आहे.

शैव आणि नाथ परंपरेतील वामाचार टाळून ज्ञानदेवांनी केवळ मातृभावाचा पुरस्कार केला. या नैतिक उत्थानाचे वारसदार तुकाराम शाक्त तांत्रिकावर कसे तुटुन पडतात हे मोरे दाखवतात. या संदर्भात तंत्र म्हणजे ब्राह्मणी वर्णव्यवस्थेला विरोध करणारा मार्ग असे सांगणाऱ्या कॉ. शरद पाटील यांच्या सिध्दांतनातील धोकेही ते प्रगट करतात. या उलट 1681 ते 1850 इतक्या व्यापक कालखंडात बहुसंख्य समर्थ संप्रदायात प्रवेश करुनही ते नित्यनियमाने पंढरीची वारीही करणारे होते आणि रामदासानंतर आपला सुजाण पूज्यभाव त्यांनी तुकोबांविषयीच व्यक्त केलेला दिसून येतो. ही वस्तुस्थिती डॉ. र. रा. गोसावी यांच्या मौलिक संशोधनाच्या आधाराने डॉ. मोरे यांनी आवर्जून सविस्तर मांडली आहे. राजवाडेपूर्व समर्थ सांप्रदायिकांचे रामदासांचे आकलन आणि राजवाडयांपासूनचे रामदासांचे आकलन यांच्यामधील भेद स्पष्ट होण्याच्या द्दृष्टीने फार योग्य व प्रशंसनीय गोष्ट केली आहे. पण त्याचवेळी वारकऱ्यांनी रामाला महत्त्व दिलेले असले, तरी त्यांचा भर कृष्णावर आहे. पण त्यांचा हा कृष्ण उत्तर पूर्व भारतातील भागवतपंथीय पण रासक्रीडेत गुंतलेला कृष्ण नसून गीतेचा प्रतिपादक तत्त्वज्ञ आणि नीतीच्या साह्याने धर्माची संस्थापना करणारा कृष्ण आहे, हा मुद्दाही फार मार्मिकपणे मांडला आहे.

कृष्णाच्या, देवाच्या अवताराचे जे प्रयोजन म्हणजे धर्मरक्षण हे आपले जीवितकार्य असल्याचे तुकोबा घोषित करतात. दुसऱ्या बाजीरावाची तुकोबांकडे, वारकरी परंपरेकडे पाहण्याची, वागण्याची रीत अधम होती. पण तुकारामांच्या कार्याचे मर्म समजलेल्या मोरोपंतांनी पेशव्यांवर सडेतोड टीका केली व उलट तुकारामांची भरघोस प्रशंसा केली. पंत परंपरेतील आर्यासम्राट मोरोपंतांनी संतपरंपरेच्या कलशस्थानी असलेल्या तुकोबांची श्रेष्ठ अशी वाखाणणी केली.

तुकोबांच्या आधुनिकपूर्व कालखंडातील चरित्रलेखनाच्या संदर्भात त्या त्या चरित्रलेखकांचे व त्यामागील समूहांचे सिंहावलोकन केल्यावर डॉ. मोरे यांनी उत्तर पेशवाई काळातील शाहिरांचे वारकरी परंपरेशी असलेले नाते उलगडून दाखवले आहे. आधुनिक अभ्यासक या दोन्ही परंपरा पूर्णपणे अलग करू पाहतात हा मोठाच प्रमाद आहे. पण दोघांचीही पाळेमुळे मराठीच्या मातीत खोलवर रुजलेली असल्याने देशीपणाचा समान धागा त्यांच्यात आहे. संतपरंपरा आणि शाहिरी काव्य, तसेच त्यांच्या संगीतपरंपरा यांच्यातील अनुबंध मराठी संस्कृतीच्या जडणघडणीच्या द्दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत याचे अतिशय अपूर्व, मौलिक, मनोज्ञ आणि प्रतिभावंत विवेचन मोऱ्यांनी या निमित्ताने आपणा सर्वांपुढे ठेवले आहे.

सरते शेवटी डॉ. सदानंद मोरे यांनी एक महत्त्वाची मीमांसा आपल्याला सादर केली आहे. मराठी समाजाची सांस्कृतिक व नैतिक इयत्ता ठरविण्याचा तुकोबा हा मानदंड आहे. मराठी समाजाच्या उन्नत सांस्कृतिक अवस्थेत तुकोबांना मिळणारा प्रतिसाद आणि अधःपतित अवस्थेत त्यांची होणारी किंमत शिवकालीन आणि बाजीरावकालीन समाजांची तुलना केली तर स्पष्ट दिसते. पेशवाईतील अधोगतीची कठोर समीक्षा करणारा तुकोबांसारखा नैतिक वचक असलेला कोणी महापरुष त्या काळात झाला नाही. नेमक्या याच काळापासून मराठी सत्तेला उतरती कळा लागली. भजन / कीर्तन / राजकीय / आर्थिक मसलती, कुस्त्या-आखाडा व तमाशा हे मराठी संस्कृतीचे चार फड इतर फडांत काय चालते आहे याचा कानोसा घेऊन त्याची समीक्षा करणे हे एक श्रेष्ठ कर्तव्य आहे. ते तुकोबांनी पार पाडले. पण अठराव्या शतकात महाराष्ट्राबाहेर सर्वत्र पसरलेल्या मराठ्‍यांची अर्थ, कला व बळ या तिन्ही क्षेत्रात भरभराट झाली. परंतु नेमक्या याच वेळी ते आध्यात्मिक - नैतिक क्षेत्रात खचले.

वास्तविक नव्या राजकीय संबंधांना पूरक नवे नैतिक संबंध निर्माण करण्याची क्षमता संतवाङ्मयात व परंपरेत होती. पण वारकरीही तुकोबांचा बाणा विसरले. त्यांनी समाजसमीक्षेचे काम झटकून टाकून केवळ आध्यात्मिक व्यवहारांवर लक्ष सीमित केले. अर्थात अशा अवस्थेत देखील जी काय थोडीबहुत समीक्षा झाली ती वारकऱ्यांकडूनच वारकरी पंथ हाच अवनतीच्या काळात सामाजिक चिकित्सा वगळता संतांचा परिपाठ जपणारा व म्हणून मराठयांचे मूळ सत्त्व निदान जिवंत ठेवणारा घटक ठरला.

तुकोबांच्या वाणीने आधुनिक काळात वेगवेगळया तापांनी पोळलेल्या समाजाला, जनसमूहांना व व्यक्तींना कायकाय विश्राम दिला याचा हा आढावा मी होता होईल तो डॉ. मोरे यांच्याच शब्दात मांडला.

आता डॉ. सदानंद मोरे तुकोबांचे शत्रू - मित्र, परंपरा, विचारप्रणाली आणि त्यांची जडणघडण व त्यामुळे झालेला इष्टानिष्ट परिणाम हा १८१८ ते १९४७ च्या पारतंत्र्याच्या व नंतर स्वातंत्र्योत्तर साडेचार दशकांच्या संदर्भात मांडतात. तुकाराम हाच या सर्व खेळाचा केंद्रबिंदू आणि तोच त्याचा परीक्षकही.

धर्म ही समाजाच्या धारणेसाठी आवश्यक असलेली बाब असून धर्माच्या पायावर सुधारणा हवी. भागवत धर्माचे प्रवर्तक, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्यामध्ये ज्ञान, वैराग्य, समताबुध्दी आणि धर्मश्रध्दा हे गुण किती व कसे जागृत होते यांचे भान असलेल्यांना आमच्या सामाजिक चालीरीतीत फेरबदल कसा घडवता येतो हे समजते हा लोकमान्य टिळकांचा मार्ग समाजिक परिवर्तनाच्या कार्यात डॉ. मोरे यांना एक आदर्श प्रारूप वाटतो. व्यक्तिगत चारित्र्य, स्वार्थत्याग, समत्व आणि विशेषतः त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती, हे सुधारक संतांचे गुणधर्म त्यांना भावतात.

या प्रकाशात मुद्रणकलेचा परिचय झालेल्या वासाहतिक राजवटीतील पहिल्या पिढीने साधलेल्या तुकारामबोवांच्या गाथेच्या प्रकाशनाचा इतिहास सांगून सर अलेक्रझांडर ग्रँटसारखे काही दूरद्दृष्टीचे शासक, तुकारामाच्या सेतूवरून खिस्ताला मराठी माणसाच्या हृदयात प्रवेश मिळवू पाहणारे मिशनरी, नवजागृत स्त्रीशूद्रादि पददलित समाजाला चेतना देणारे आद्य प्रवर्तक, सर्वांगीण विकासाकरिता आत्मटीकेची गरज मनोमनी पटलेले पांढरपेशा तत्त्वचिंतक यांनी अनेक समकालीन विद्वानांप्रमाणे प्रवाहहतित होऊन आपली मराठी नाळ तर तुटून दिली नाहीच, पण संतपरंपरेशी व विशेषतः तुकोबांशी असलेल्या मराठी माणसाच्या स्वाभाविक नात्याची पुनःस्थापना त्यांनी कशी केली याचा एक सुसंगत, माहितीपूर्ण आणि त्याचवेळी विश्लेषक असा आढावा डॉ. मोरे घेतात. यामुळे संस्कृतनिष्ठ आणि इंग्रजीवर भक्ती असणाऱ्या दोन्ही वर्गातील विद्वानांना धक्का बसला. त्यांच्या व विशेषतः भाषेच्या व काव्याच्या पातळीवर तुकोबांऐवजी मोरोपंतांना 'प्रोजेक्ट' करू पाहणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात जातिवाचक ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेला कसा हातभार लागला याचे चित्रण ते करतात. तुकोबामय वातावरणात तुकारामप्रबोधनामागे उभ्या होत्या दोन संस्था. एक म्हणजे प्रार्थना समाज आणि दुसरा म्हणजे सत्यशोधक समाज. त्यामागे पार्श्वभूमी होती अत्युत्साही परंमहंस सभेची. आजरेकर फडाच्या प्रभावाखाली वाढलेले महादेव गोविंद रानडे यांनी ऍरिस्टॉटलच्या चौकटीत भागवत धर्माची मांडणी करुन मिल -बेंथामप्रणीत उपयुक्ततावादी - सुखवादी नीतिशास्त्राला पर्याय उभा केला. परमहंसमंडळीतल्या काही नामवंत व्यक्तींचे तुकारामप्रेम, मिशनरी मरे मिचेलची तुकोबांच्या चाहत्याची भूमिका, फुल्याच्या निस्सीम हितचिंतकापैकी काहींची वारकरी उत्सवातील ये - जा यामुळे जोतिराम फुले यांनी तुकारामगाथेचा बारकाईने अभ्यास केला. वारकऱ्यांची अस्सल मराठी पोताची शब्दकळा, शैली, वृत्ती फुल्यांच्या नसानसात भिनलेली आहे. वारकरी संप्रदाय आणि संत यांच्या बाबतची फुल्यांची भूमिकाव्यामिश्र आहे.

वारकरी पंथाच्या विचारात जातीयता आणि अस्पृश्यता यांच्या विरोधात उभे राहण्याची बीजरूप क्षमता आहे. पण प्रत्यक्षात समकालीन वारकऱ्यांची प्रवृत्ती मात्र ईश्वरसाधना आणि नामस्मरण यांच्यात दंग होती. बाहेरील कोणाला संप्रदायात प्रविष्ट होऊन नेतृत्व काबीज करणे अशक्य होते. संप्रदायाचा मूळ ब्राह्मण्यविरोधी रोख फिरवून त्याचे ब्राह्मणीकरण करण्याची प्रक्रिया त्याच सुमारास सुरू झाली होती. तेव्हा फुल्यांनी आपला मोर्चा वारकरी सांप्रदायिकांकडेच वळवला यात नवल नाही. फुल्यांचा श्रोता / वाचक हा वारकरी पार्श्वभूमी लाभलेला होता आणि स्वतः फुल्यांवर तुकोबांचा प्रभाव होता. या कारणाने जातिप्रथेने गांजलेले व सांप्रदायिक साचेबंदपणामुळे कोंडी झालेले अनेक वारकरी सत्यशोधक समाजाच्या चळवळीत उतरले. पण फुल्यांच्या रणनीतीमुळे फुल्यांनी ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज यांच्या शुध्द हेतूंचा अभद्र विपर्यास केला याची नोंद विठ्ठल रामजी शिंदे यांनी घेतली. अर्थात असे का घडले याबद्दल शिंदे यांनी घेतली. अर्थात असे का घडले याबद्दल शिंदे आणि मोरे यांची कारणमीमांसा पूर्णपणे भिन्न आहे. फुल्यांनी चळवळीच्या द्दृष्टीने इतिहासाची फेरमांडणी केली. त्यांचा शिवाजी हा शेतकऱ्यांचा राजा होता, तर तुकोबांकडे ते शेतकऱ्यांचा संत म्हणून पाहातात. राजसत्ता ज्या सामाजिक गटामधील आहे त्याच सामाजिक गटामधील वैचारिक नेतृत्व असले पाहिजे असे महत्त्वाचे सूचनही फुल्यांच्या तुकारामदर्शनातून घडते हा नवा व धाडसी सिध्दांत मोरे मांडत आहेत. अभंगांचे अस्सल मराठी सामर्थ्य जाणणाऱ्या या आधुनिक कवी क्रांतीकारकाचे हे नवे चित्रण पोथीनिष्ठ फुलेवाद्यांन मान्य होणे कठीणच आहे, पण आपण सत्यशोधकांचा वारसा सांगत असू तर फुल्यांमधील पारंपरिक सूत्राला सामोरे जाण्याची हिंमत आपल्यात असली पाहिजे असे आव्हान ते असल्या कर्मठांना देतात.

'जातिभेद विवेकसारा' चे लेखक तुकारामतात्या पडवळ, जोतिराव फुले व 'व्रजसूची' चे प्रकाशक वासुदेव बाबाजी नवरंगे या त्रिकूटाला एकत्र आणणारा धागा तुकोबा होता. तुकोबांनी ब्राह्मण्याची सडेतोड चिकित्सा केली. जातिभेदाविरुध्दची चळवळ नव्हे, हे डॉ. मोरे आवर्जून सांगतात. मुळात फुल्यांचा सत्यसमाज व्यापक सकारात्मक भूमिकेवरच उभा होता. ब्राह्मण्याची चिकित्सा हा त्याचा तात्कालिक व विध्वंसक भाग होता. पुढे ब्राह्मणेतरांच्या चळवळीत या भागाला मुख्य मानण्यात आले. तेव्हा फुल्यांची भूमिका काही प्रमाणात सुटली असे मोरे म्हणतात.

तुकोबा ही प्रार्थना समाजिस्टांनी केलेली एक जाणीवपूर्वक व विचारपूर्वक निवड होती. ही गोष्ट रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्यांचे चिरंजीव प्र. रा. भांडारकर, नारायण गणेश चंदावरकर इत्यादींच्या तुकोबाभक्तीच्या प्रवासाच्या आधाराने सांगता येते. सतत आत्मपरीक्षण करणाऱ्या तुकोबांच्या धर्माला बौध्द, खिस्ती आणि इस्लाम या धर्मांच्या तुलनेत विश्वधर्म करण्याचा पण प्रार्थना समाजाने प्रयत्न करावा असे रा. गो. भांडारकरांचे कळकळीचे व अपूर्व असे मत होते. रानडे, भांडारकर, शिंदे हे वीर तुकोबांच्या प्रकाशात शर्तीचे जीवन जगले. म्हणून ते समाजाला चिरप्रकाश देऊ शकतात असा डॉ. मोरे यांचा निष्कर्ष आहे. विष्णु मोरेश्वर महाजनी प्रार्थनासमाजिस्ट नव्हते. पण लोकमान्य टिळकांच्या 'गीतारहस्या' ची मुक्त कंठाने प्रशंसा करणाऱ्या महाजनींनी टिळकांचे व वेदांत्यांचे मोक्ष हे ध्येय अमान्य केले. येथे त्यांनी तुकोबांचाच मार्ग अनुसरला अशीच मांडणी वारकऱ्यांच्या फडावर होत असते असेही मोरे सांगतात.

मध्यंतरी ब्राह्मो आणि प्रार्थना समाजातील आदानप्रदानात तुकोबांना महत्त्वाचे स्थान होते. शहाजी प्रतापसिंह सातारकर महाराज, रवींद्रनाथ टागोरांचे बंधू सत्येंद्रनाथ आणि गुजरातमधील भोलानाथ साराभाई यांच्यावरील तुकोबांचा खोल प्रभाव व त्याचा अन्वयार्थ व परिणाम सांगितल्यावर डॉ. सदानंद मोरे लोकमान्य टिळक व तुकोबा या विषयाकडे वळतात. टिळकांचे 'ज्ञानेश्वरी' चे आकलन निर्दोष नव्हते. पण निष्काम कर्म हा शब्दप्रयोग पहिल्यांदा वापरला तुकोबांनी. 'गीतारहस्यात' जास्तीत जास्त अवतरणे असतील तर ती तुकोबांच्या अभंगांची वारकरी पंथ हा समाजाच्या तळागाळात पसरलेला पंथ असल्यामुळे त्याचा उपयोग स्वातंत्र्यासाठीची राजकीय चळवळ उभारण्याकरता व्हावा म्हणून टिळक बहुजन समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत राहिले. पण विष्णुबुवा जोगांचा अपवाद सोडला तर विनायकबोवा सारवऱ्यांसारख्या वेदांती परंपरेतून वारकरी संप्रदायात शिरलेल्या सनातनी विद्वानांच्यामुळे टिळकांचा हिरमोड झाला. टिळक त्यांचे गुरु विष्णुशास्त्री चिपळूणकर व शिष्य यांच्या कैचीत सापडले. एरव्ही वरच्या वर्गाच्या लोकांनी भक्तिमार्गी मोठया जनसमूहांपासून तुटक राहू नये असेच त्यांना वाटत होते. कर्माशी विरोध नसणाऱ्या भक्तिमार्गाचे आचार्य, अशी टिळकांसमोरील तुकोबांची प्रतिमा आहे, असे सांगून मोरे टिळकांची एक अनोखी भूमिका सादर करतात. मिलबेंथामस्पेन्सरमुळे आलेल्या बधिरतेमुळे; कमालीचे स्वार्थत्यागी जीवन जगलेले गोपाळ गणेश आगरकर धरून उदारमतवादी उच्चभ्रू बहुजनांपासून व वारकऱ्यांपासून दूर राहिले. तर टिळक मात्र सतत परंपरांचा शोध घेत काही सापडते का हे शोधीत राहिले.

या आधुनिक तुकोबाप्रेमी व्यक्तींच्या कार्याची समालोचना करून डॉ. मोरे सरतेशेवटी राजारामशास्त्री भागवतांकडे वळतात. एका बाजूला वारकरी संप्रदायात चालू असलेले ब्राह्मणीकरण, दुसऱ्या बाजूला आगरकरवाद्यांनी परंपरेकडे केलेली डोळेझाक, तिसरीकडे प्रार्थना समाजिस्टांनी वारकऱ्यांची ज्ञानोबा-तुकोबा ही जोडी फोडून तुकोबांवर लक्ष केंद्रित करणे, तर आणखी एका बाजूने टिळकांनी प्राचीन धर्मोत्सव सोडून नवा सार्वजनिक गणेशोत्सव करणे, या बाबींविरुध्द परखड प्रतिक्रिया नोंदवणारा एकच विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेला. तो म्हणजे राजारामशास्त्री भागवत. त्यांचे वारकरी संप्रदायाचे व मराठी संस्कृतीचे आकलन सम्यक् आणि योग्य होते. त्यांचे तुकारामप्रेमही तितकेच विलक्षण होते. ज्ञान व भक्ती यांची सांगड घालणाऱ्या वारकरी प्रस्थानाला मानणे म्हणजे अस्सल मराठीपण असणे हीच त्यांची समजूत होती.

त्यानंतर वारकरी संप्रदायाची मूळ प्रेरणा सामाजिक घडामोडींपासून अलिप्त अथवा विन्मुख राहण्याची कधीच शक्यता नव्हती. पण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र हा संप्रदाय एक प्रकारच्या आध्यात्मिक आवर्तात सापडलेला दिसतो. त्याचे कारण नव्या इंग्रजी शिक्षणाचा अभाव असो, किंवा अन्य काहीही असो. तत्कालीन उदासीन, अलिप्त वारकरी नेते पाहून त्यांच्या संबंधीची आपली निरीक्षणे राजवाडेप्रभृतींनी व त्यांच्याच जोडीला बुध्दिप्रामाण्यवादी आधुनिक विचारवंतांनी व नेत्यांनी संतांवर व संतांच्या शिकवणुकीवर लादली. उलट संप्रदायाशी अधिकृत संबंध नसलेल्या विचारवंतांनी व नेत्यांनी संताच्या साहित्यातून व चरित्रातून नव्या प्रेरणा शोधल्या, याचा एक तपशीलवार, चौफेर, सुसंगत व चिकित्सक असा अर्वाचीन महाराष्ट्रातील यच्चयावत सर्व लहानथोर व्यक्ती, विचारवंत, नेते, अभ्यासक व परंपरा यांना सामावणारा विश्लेषक वृत्तांत डॉ. सदानंद मोरे आपल्यापुढे यानंतर ठेवतात. तो तुकोबा नावाच्या एका चौकटीत अगदी काळजीपूर्वक व साक्षेपाने रचलेल्या महाराष्ट्राच्या अर्वाचीन सामाजिक - सांस्कृतिक - भाषिक व विविध ज्ञानशाखात्मक जडणघडणीचा जणू काही एक लघुकोशच बनला आहे. त्यातल्या फक्त दोनचार गोष्टींची मी इथे नोंद घेऊ शकतो.

वारकऱ्यांच्यात एकोणिसाव्या शतकापासून तीन परंपरा आढळतात. उत्तरकालीन दुय्यम ग्रंथांच्या साह्याने वारकरी दर्शनाला वेदांती चौकटीत कोंबू पाहणारी आत्मलोप झालेली विनायकबुवा साखऱ्यांची ब्राह्मणी परंपरा, या कोंडीतून पूर्णपणे बाहेर न पडता आलेली जोग महाराज परंपरा. तर आजरेकरांचा धागा पकडून ब्राह्मणेतर नेतृत्त्व लाभलेली दादामहाराज सातारकर परंपरा. या तिन्ही परंपरांचे प्रवर्तक पारंपरिक वारकरी नसूनही त्यांनी वारकरी होऊन आपापली स्वतंत्र स्थाने निर्माण केली. या सदर्भात चिपळूणकरी मराठी व दादामहाराज सातारकरांची मराठी यांची एक मनोज्ञ तुलना मोरे करतात. सत्यशोधक व ब्राह्मणेतर परंपरेतील सत्यशोधक नवलकर पितापुत्र व कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांच्या तुकोबाधिष्ठित कार्याचीही ते दखल घेतात. पण असे अपवाद सोडले तर अनेक ब्राह्मणेतरांनी तुकोबांचा उपयोग ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादात तेल ओतण्याकरता केला व तो अजूनही तो थांबलेला नाही ही गोष्ट अगदी स्पष्टवक्तेपणाने मोरे सांगतात. कोलते प्रभूतींनी चक्रधर आणि त्यांचा पंथ यांचा अभ्यास करताना जी विचारपध्दती पुढे आणली तिचाच उपयोग हे नवब्राह्मणेतर वारकरी पंध आणि तुकोबा या अभ्यासक्षेत्रात करतात. या मांडणीचा फोलपणा लक्षात घेऊन कुणी कुणाला काय सांगायचे असे उद्गार मोरे काढतात.

बुध्द व तुकोबा यांच्यातील दुवा जोडणारी परंपरा म्हणून डॉ. सदानंद धर्मानंद कोसांबींचेही स्मरण करतात. आणि मग ओघानेच ते पोहचतात विठ्ठल रामजी शिंदे या अतिश्रेष्ठ पण उपेक्षित कर्मवीराकडे धर्मचिंतक, भारतवेत्ता, समाजशास्त्रज्ञ, शेतीतज्ञ, तत्त्वचिंतक, कार्यकर्ता या नात्याने हिमालयाच्या उंचीचा हा मनुष्य. भागवत धर्माविषयी शिद्यांनी केलेले संशोधन अत्यंत नाविन्यपूर्ण, स्वतंत्र आणि रूढ समजुतींना धक्का देणारे आहे. वारकरी पंथ हा आधुनिक भागवत धर्माचे शुध्द व विकसित रूप आहे. त्याच्या लोकसत्तात्मकतेचा विकास पंजाब सोडून महाराष्ट्राइतका कोठेही झालेला नाही. संतमालिकेत ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद माजविणे वारकरी वर्गात मोठे पाप मानले जाते. येणेप्रमाणे नामदेवाने स्थापिलेला भक्तिमार्ग प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या व अप्रत्यक्षपणे पंजाबच्या उध्दाराला आणि ह्या दोन स्वराज्यसंपन्न राष्ट्रांच्या द्वारा अखिल भारताच्या उध्दाराला एके काळी कारण झाला. महाराष्ट्र धर्म व भागवत धर्म यांच्यात गल्लत केल्याबद्दल न्यायमूर्ती रानडे यांना दोष देऊन भागवत धर्माचे आकाश महाराष्ट्र धर्माच्या मुठीत मावणार नाही असे एक प्रज्ञावंत विवेचन कर्मवीर शिंदे आपल्यापुढे ठेवतात. शिद्यांना तुकोबा भावले ते तुकोबांच्या भक्तिमूलक कर्मयोगामुळे.

शिंदे यावेळी शिवाजीचे हिंसात्मक राजकारण व गांधीजींचे अहिंसात्मक राजकारण यांच्यात अनुस्यूत असलेले सूत्र तुकोबांच्या आधारे उलगडून दाखवतात. विशेष म्हणजे त्यात ते वैचारिक व व्यावहारिक अशा दोन्ही स्तरांवर यशस्वी होतात. शिवाजीचा वारसा अभिमानाने मिरवणारा महाराष्ट्रातील बहुजनसमाज गांधीजींचे नेतृत्व पत्करून काँग्रेसच्या झेंडयाखाली सामील झाला. या मागची वैचारिक जागृती शिद्यांनी घडवून आणली असे डॉ. सदानंद मोरे जिव्हाळयाने सांगतात. शिंदे हे अभिजनवादी आणि प्रतिक्रियावादी ब्राह्मणेतर या दोघांनाही परवडत नाहीत.

त्यानंतर ते आधुनिक महाराष्ट्रातील तुकोबा व रामदासांच्या चारित्र्यहननाचा विषण्ण करणारा इतिहास सारांशाने आपल्यापुढे मांडतात. काळया-पांढऱ्या रंगांनी रेखाटलेली तुकाराम-रामदासांची ही भडक चित्रे दोघांवरही अन्याय करणारी आहेत. पण तुकोबांवर मात्र त्यामुळे मोठाच अन्याय झाला. महाराष्ट्रातील गेल्या दीड शतकांमधील राजकारण, समाजकारण आणि अभ्यासकारण यांच्यामधील निकट नाते समजण्यास या तुलनेचा चांगलाच उपयोग होऊ शकतो हे मात्र मोरे यांनी थोडक्यात पण सप्रमाण सिध्द केले आहे. तुकोबांचे अवमूल्यन करणारी मंडळी संकुचित राष्ट्रवादी, पुनरुज्जीवनवादी, अभिजनवादी, वर्णजातीअभिमानांनी ग्रस्त अशी होती त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी व स्वातंत्र्योत्सुक वृत्तींवर कृष्णछाया पडली.

'हा कोठला भागवत धर्म' या एकोणसत्तराव्या लेखाच्या प्रारंभी आधुनिक महाराष्ट्रातील पाच प्रवाहांची एक वर्गवारी डॉ. सदानंद मोरे यांनी केली आहे. तिच्या अनुषंगाने त्यांनी तुकोबांच्या प्रकाशात या साऱ्या विचारधनाचा परामर्श घेतला आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ते आपल्याला घेऊन येतात.

1920 नंतरच्या महाराष्ट्रातील इतिहाससंशोधन त्याचप्रमाणे समाजशास्त्र आणि इतर समाजविज्ञाने या संदर्भात जे प्रमुख वाद झाले ते सर्व आपल्या डोळयांपूढे असल्याने या संदर्भात या सर्व वादांचे तुकोबांच्या कार्याच्या संदर्भात डॉ. मोरे यांनी एकही ठळक मुद्दा किंवा कळीचा तपशील न विसरता विवेचन केले आहे. एवढे नमूद करूनच मी पुढे जातो. तसेच 1920 नंतर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विचारधारा आणि त्यांचे प्रणेते यांचेही तुकोबांविषयीचे आकलन काय होते आणि तुकोबांच्या चष्म्यातून या विचारधारांचा आणि व्यक्तींचाव्यवहार कसा दिसला असता हेही मोरे यांनी फार तपशीलाने मांडले आहे. इंग्रजीत ज्याला मिस्टिसिझम म्हणतात किंवा ज्याला मराठीत आजपर्यंत तरी साक्षात्कारवाद म्हटले जाते त्याही क्षेत्राचा त्यांनी आपल्या पध्दतीने आढावा घेतला आहे. या सर्व संदर्भातील फक्त एक दोन मुद्यांच्या बाबतीतील मोरे यांची मते मात्र आवर्जून लक्षात घेतली पाहिजेत.

महाराष्ट्रातील दलित चळवळ आणि विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात दलितांना तुकोबा कसे दिसतात आणि वारकरी संप्रदायाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरते. डॉ. मोरे यांच्या म्हणण्याप्रमाणे डॉ. आंबेडकरपूर्व दलित समाज हा वारकरी पंथाने देवू केलेल्या अल्पस्वल्प धार्मिक आणि आत्मिक संधींवर संतुष्ट होता. चोखामेळा, आजरेकर फडावरील शिवबा दरेकर इत्यादी मंडळींचा वारसा महार समाज अभिमानाने गौरवित असे. पण डॉ. आंबेडकरांसारख्या पाश्चात्य विद्येने क्षितीज व्यापक झालेल्या नेत्याने आपल्या स्वाभिमानी कार्याला सुरूवात केली तीच मुळी अस्पृश्यांच्या या वारकरी किंवा चोखामेळा या आयडेंटीटीला आव्हान देवून. डॉ. मोरे यांच्या या संदर्भातील विश्लेषणाचे थोडक्यात सार असे की चोखामेळयाचा आदर्श आणि दलितांची भागवत धर्माकडे असलेली ओढ यांचा प्रतिकार करणे बाबासाहेबांना चळवळीची गरज म्हणून अपरिहार्य ठरले. परंतु त्यांची या संबंधीची सर्वच मत परमार्थाने घेणे चुकीचे होईल. वारकरी पंथाशी व संतांशी आंबेडकरांचे नाते दोन प्रकारचे आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या सद्यकालीन मर्यादांमुळे ते व्यथीत झालेले दिसतात. डॉ. मोरे पुढे सांगतात की, बौध्द धर्माच्या वारकरी संतांशी असलेल्या आंतरिक नात्याची पुनःस्थापना करण्याचे त्यांच्या मनात होते हे खास. पण अपवाद वगळता, डावपेचात्मक भूमिका आणि वास्तविक मत यांच्यात फरक करता न आल्याने त्यांच्या अनुयायांनी संतांकडे पाठ फिरवलेली दिसते.

या सर्व लेखमालेच्या संदर्भात डॉ. मोरे यांनी आणखी एका प्रश्नाला तोंड फोडले आहे. त्यांनी स्वतःच असा प्रश्न उपस्थित केला आहे की, हिंदुत्ववादाच्या बुध्दिवादी आणि परंपरावादी शाखांचा विचार करताना असा प्रश्नही विचारता येईल की,तुकोबादि संतांच्या बाजूने हिंदुत्वाची मांडणी करता येईल काय ? तसा प्रयत्न कोणी केला आहे काय ? अशी मांडणी हिंदुत्वाच्या प्रचलित मांडणीपेक्षा किती वेगळी असेल ? नंतर डॉ. मोरे स्वतःच म्हणतात की, सावरकरादिकांनी अर्थातच हा प्रयत्न केलेला नाही. ब्राह्मणेतर मंडळींनी केलेला प्रयत्न अत्यंत क्षीण व विस्कळीत आहे. नंतर महात्मा गांधी, गोळवलकर गुरुजी इत्यादींची याबाबत तपासणी केल्यावर श्री. मोरे म्हणतात, ''आता संतांच्या पध्दतीने विचार करून हिंदुत्वाची मांडणी केली, तर आपल्याला एक चोख हिंदुत्व मिळू शकेल आणि मग या संदर्भात आपल्या 'धर्म, राष्ट्रधर्म आणि लोकधर्म' या लेखात हिंदुत्व आणि तुकोबा यांच्याबद्दलची एक महत्वाची मांडणी केली, तर आपल्याला एक चोख हिंदुत्व मिळू शकेल आणि मग या संदर्भात आपल्या धर्म, राष्ट्रधर्म आणि लोकधर्म या लेखात हिंदुत्व आणि तुकोबा यांच्याबद्दलची एक महत्वाची मांडणी वंगदेशीय लेखक योगेंद्रनाथांचे त्यांनी आवर्जून उद्धृत केलेले म्हणणे असे, हिंदुत्वरक्षण ही गोष्ट जोवर हिंदूंना गौरवास्पद व अगत्याची आहे असे वाटत राहील. तोपर्यंत खऱ्या हिंदुधर्माची जाणीव देणाऱ्या तुकाराम महाराजांचा गौरवच होत राहील, नव्हे तो तसा होत राहिला पाहिजे. प्रत्येक हिंदु संतान तुकाराम महाराजांबद्दल कृतज्ञताच बाळगील.

डॉ. मोरे यांनी 1818 पासून ते थेट अगदी आजच्या घटकेपर्यंत तुकाराम विषयक मीमांसा लिहिली आहे. त्या मागची वैचारिक भूमिका आपण सुरूवातीला पाहिली पण या विवेचनाच्या शेवटीही ती मांडून पुढे जाणे अगत्याचे आहे. प्रा. म. पुं. रेगे यांचा 'नवभारत' मधील संपादकियांचा संग्रह 'हिंदु धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन' या नावाने प्रसिध्द झाला आहे. त्यातील मांडणी आपल्याला मान्य आहे असे सांगून डॉ. मोरे म्हणतात, जोपर्यंत सामाजिक भेद वास्तवात अस्तित्वात आहेत तोपर्यंत त्या भेदांकडे मानवी द्दृष्टीने पाहून त्यांचा परिणाम भेदांमुळे ज्यांना कनिष्ठपणा प्राप्त झालेला आहे त्यांच्यावर जुलूम न करणे, त्यांचे शोषण न करणे, त्यांना तुच्छ न लेखणे इत्यादि गोष्टी याला जोपर्यंत असे भेद वास्तवात अस्तित्वात आहेत तोपर्यंत महत्त्वच आहे. समतेचा हा एक महत्त्वाचा अपरिहार्य पर्याय आहे. मोरे पुढे उद्गारतात की, दरम्यान कोणी हे सर्व भेद मोडीत काढून नव्या प्रकारचा समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे कार्य हातात घेतले तर, संतांना त्याचे दुःख व्हायचे कारण नाही.

त्यानंतर डॉ. सदानंद मोरे यांनी जवळजवळ 30-35 लेखांत मराठी साहित्यकारांनी आणि समीक्षकांनी तुकोबांकडे कवी म्हणून कसे पाहिले, त्यांना काय प्रतिसाद दिला याचा एक अत्यंत व्यापक, सर्वसमावेशक, चिकित्सक, अभिनव आणि वर्तमानकालीन चिंतन व संशोधनाला नवी दिशा सुचविणारा विचार मांडला आहे. या सर्व लेखांमध्ये डॉ. मोरे यांची प्रतिमा आणि मांडणीतला सूक्ष्मपणा यांचा ठसा आपल्यावर स्पष्टपणे उमटतो. मुख्य म्हणजे भाषा विज्ञानाच्या संदर्भात गेल्या एक-दोन दशकांमध्ये जी बहुमोल मांडणी आज जगभर चालू आहे तिचे अनुसंधान राखून मोरे यांनी हे फार मोठे काम केले आहे . वाङ्मय हे भाषेमध्ये निर्माण होत असते. भाषा ही एक सार्वजनिक आणि सामुदायिक बाब आहे. यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन अभ्यासकाला भाषाशास्त्राच्या अभ्यासाचा उपयोग होतो या सर्व गुंतागुंतीच्या अभ्यासपध्दींचा संदर्भ मनामध्ये नीट बाळगून मोरे यांनी तुकाराम आणि त्यांच्या प्रकाशात मराठीतील आधुनिक साहित्यव्यवहार याविषयी फारच मनोज्ञ विवेचन केले आहे.

डॉ. सदानंद मोरे यांचा हा ग्रंथ मला फार महत्त्वाचा वाटतो. महाराष्ट्राच्या सर्व सांस्कृतिक परंपरेचा एक दमदार आणि त्याच वेळी सडेतोड असा वेध घेऊन पुढची वाटचाल कशी व्हावी याचे स्पष्ट दिग्दर्शन करणारा त्यांचा हा लेखनव्यवहार आपल्याला मोठा दिलासा देतो. बहुजन समाजातून आलेल्या आणि सूक्ष्म चिंतनाचे सामर्थ्य अंगी बिंबविलेल्या पिढीचा हा एक पथदर्शक आविष्कार आहे असे मला वाटते. साहसवादी एकांगी भूमिका टाळून आत्मटीकेचे महत्त्व जाणून त्याच वेळी सांस्कृतिक संचिताचे प्रेरणादायी असे विवेचन करणे ही गोष्ट मुळात फार कठीण आहे पण डॉ. मोरे यांनी ती समर्थपणे पार पाडली आहे.

महाराष्ट्रातील सांस्कृतिक व्यवहार हा खराखुरा स्वातंत्र्यशील, समतावादी आणि जीवनाच्या लोकशाहीकरणाला पोषक असा व्हावयाचा असेल तर तुकोबा केंद्रस्थानी मानून खूपच मोठे कार्य निश्चित पार पाडता येईल. जनसमूहांना विश्वासात घेऊन आणि अलगपणाची बेटे न रचता, आत्मटीकेची जबाबदारी न विसरता क्रांतिकारकांना परंपरेशी जिव्हाळयाने जोडून घ्यावे लागेल ही गोष्ट निश्चित. पण या संदर्भात क्रांतिकारक शक्तीच्या जोडीला आजचा राज्यकर्ता समूहही तुकोबांच्या या वारकरी संतपरंपरेचा वापर आपल्या प्रभुत्ववादी नीतीकरिता राबविणार ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. अशा वेळी वारकरी परंपरेविषयी प्रेम राखूनही तुकोबांच्या पावलांवर पाऊले टाकून आजच्या प्रस्थापितांविषयी तुकोबाप्रेमी विचारवंत व जनसमूहांना बरोबर घेऊन पुढे गेले. पण ते करताना त्यांनी प्रस्थापितांचे वाभाडे तर काढलेच पण जनसमूहांच्या आंधळया व उदास भूमिकेचाही गौरव न करता त्यावर आपल्या वाणी व कृतीचे हत्यार उचलले. ही गोष्ट लक्षात ठेवून जर महाराष्ट्रातील आजचे कार्यकर्ते पुढे गेले तरच परत एकदा तुकोबांच्या वाणीचा व जीवनाचा परिसस्पर्श आमच्या जीवनाला खरोखरी लाभला असे म्हणता येईल. डॉ. मोरे यांचा हा ग्रंथ फारच मोठया दर्जाचा आहे, आणि महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांतील सार्वजनिक कार्यकर्ते, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाविषयी ओढ असणारे सामान्य वाचक आणि इतकेच नव्हे तर शिक्षणाच्या सर्व पातळयांवर कार्य करणारे अभ्यासक त्याची जाणतेपणाने दखल घेतील अशी आशा बाळगून मी हे विवेचन संपवतो.

पुन्हा तुकाराम

दिलीप पुरुषोत्तम चित्रे

तुकोबांच्या जन्मानंतर तीनशेऐंशी वर्षांनी आज आपण जी मराठी भाषा वापरत आहोत, तिचा कस तुकोबांच्या गाथेतून आलेला आहे. जवळजवळ चार शतके तो कोटयवधी निरक्षर वारकऱ्यांच्या मौखिक परंपरेद्वारा आपल्या भाषिक अभिसरणात मिसळलेला आहे.

हजार वर्षे जुन्या आणि सातशेपेक्षा जास्त वर्षांची वाङ्‌मयीन परंपरा असलेल्या आपल्या मराठी भाषेचा मानदंड असा लेखक कोण ? मी याचे उत्तर तुकाराम असे दिले, तर बहुधा कोणीही समंजस मराठी वाचक फारसा वाद घालणार नाही. आज आपल्या सर्वांच्या तोंडी असलेल्या मराठी भाषेवर इतका सर्वांगीण प्रभाव असलेला दुसरा कोणताही लेखक नाही. इंग्लंडात जेम्स राजाच्या कारकिर्दी बायबलाचे जे इंग्रजी भाषांतर झाले त्याच्या नंतरच्या इंग्रजी भाषेच्या जडणघडणीवरच प्रभाव पडला. तेच तुकोबांच्या गाथेच्या मराठी भाषेवरील प्रभावाच्या प्रभावाच्या बाबतीत म्हणता येईल. तुकोबांच्या जन्मानंतर तीनशेएेंशी वर्षांनी आज आपण जी मराठी भाषा वापरतो आहोत, तिचा कस तुकोबांच्या गाथेतून आलेला आहे.

जवळजवळ चार शतके तो कोटयवधी निरक्षर वारकऱ्यांच्या मौखिक परंपरेद्वारा आपल्या भाषिक अभिसरणात मिसळलेला आहे. नामदेवांनंतर मराठी भाषेशी इतकी जवळीक साधणारा कोणताही कवी मराठीत झाला नाही. तुकोबांनंतर - विशेषत: आधुनिक काळात - मराठी भाषेशी जवळीक करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला; पण ही जवळीक त्यांना केवळ शैली म्हणून आणि तेवढयापुरतीच साधली. समकालीन कवींमध्ये मर्ढेकर, अरुण कोलटकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा काही कवींमध्ये तुकारामी परंपरेच्या छटा आल्या; पण तुकोबांचे प्रचंड व्यवहारजन्य शब्दभांडार, बोलीच्या सहजतेतून छंदाच्या डौलदार तोलात विविधपणे चकित करत येणारे पद्यप्रभुत्व या कवींमध्ये नाही. याचे कारण एकच. तुकोबांच्या अस्तित्वानुभवाचा व्यापकपणा आणि त्यांच्या कवितेच्या संकल्पनेची सर्वंकष सहजता या आधुनिक आणि आधुनिकोत्तर कवींमध्येही नाही.

आपण तुकोबांच्या कवितेची काय किंमत करतो, या प्रश्नापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न तुकोबांनी आपल्या कवितेची काय किंमत केली असती, हा आहे. देश, काळ आणि परिस्थिती यांचे निव्वळ निष्पन्न नसते. जीवनमूल्यांच्या सातत्यावर परंपरा आणि नवता या दोन्हींची कसोटी लागते. परंपरा जशा मारक असू शकतात, तशी नवतासुध्दा मारक असू शकते. परंपरा जशी तारक ठरू शकते, तशी नवतासुध्दा तारक ठरू शकते. परंपरा एकसंध नसते. परस्परविरोधी परंपरांमधून पर्याय शोधत जीवनमूल्यांचे सूत्र आपले सातत्य टिकविण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे नवता एकसंध नसते. परपरेबाहेरचा प्रत्येक पर्याय नवतेत मोडत असला, तरी प्रत्येक नवा पर्याय इतर नव्या पर्यायांशी सुसंगत असतोच असे नाही. तसेच प्रत्येक नवा पर्याय जीवनमूल्यांशी सुसंगत असतो असेही नाही. तुकोबांच्या काव्यातली जीवनसृष्टी आपल्याला मानवी अस्तत्वाच्या सार्वभौम संदर्भात पाहावी लागेल माणूस असण्याचा अनुभव सर्वच माणसांना सर्वकाळ येणारा अनुभव आहे आणि या वैश्विक माणूसपणाच्या अनुभवावर तुकोबांची कविता कोणता प्रकाश कितपत टाकते, याचा आपल्याला विचार करावा लागेल.

वाङ्मयाची मूळ मराठी कल्पना ही मराठी भाषेच्या पर्यावरणापासून वेगळी करता येणार नाही. वाङ्मयात मौखिक परंपरा आणि लिखित 'साहित्य' यांच्यातही तटबंदी करता येणार नाही. उदाहरणार्थ, ओवी आणि अभंग हे मराठी पद्यरचनेचे मूळ प्रकार मराठी बोलीशी संलग्न आहेत आणि संस्कतोद्भव मराठी पद्यरचना ही मराठी बोलीच्या उपजत छंदोमयतेवर लादलेली शैली आहे. अशी शैली स्वीकारली. तर मराठीतच स्वाभाविक शब्दभांडार संकुचित करावे लागते आणि मराठी उच्चार-रचनेला न पेलणारी संस्कृतातून आयात केलेली शब्दकळा बळजबरीने वापरावी लागते. म्हाइंभटाचे सहज मराठी गद्य, ज्ञानेश्वरांच्या अभंगांमधील राजस शब्दकळा किंवा अमृतानुभवात मराठी भाषेला सहज प्राप्त झालेला सात्त्विपणा, नामदेवांच्या रचनेचा डौलदार गोडवा, तुकोबांच्या अभंगाची सर्वंकष भाषा हे मूळ मराठीचे आदर्श आहेत. मूळ उच्चार-रचनेशी इमान राखल्यामुळे बखरकरानाही फारशी, अरबी शब्द पेलता आले. अव्वल इंग्रजीत इंग्रजीच्या दबावाखाली तोल साधणाऱ्या मराठी गद्य - पद्यकारांना पुन्हा एकदा संस्कृतचा आसरा घ्यावासा वाटला; याचे मुख्य कारण हेच की, पेशवेकाळापासून अधिकृत संस्कृतीचा संतांच्या आणि बहुजन समाजाच्या सकस मराठीशी संबंध तुटला होता. हीच अधिकृत संस्कृती पुढे पुढे जास्त इंग्रजाळली आणि इंग्रजीमुळे संस्कृताळली. उच्चवर्णीय भारतीयांचा पुनरुज्जीवनवाद 'हिदुत्वाचा' च्या ब्राह्मणकेंद्रित कल्पनेवर आणि भाषेच्या संस्कृतकेंद्रित 'विकासा' वर अवलंबून होता. आज अधिकृत हिंदीला आलेले विकृत ग्रांथिक स्वरुप आणि अधिकृत मराठीचा तसलाच स्थूलपणा यांची तुलना करण्यासारखी आहे.

अनेक शतके उत्क्रांत होत आलेल्या मराठी भाषेला आधुनिक ज्ञानविज्ञानाची वळणे सहज झेपू शकली असती, हे गेल्या सव्वाशे वर्षांतील मोजक्या पण समर्थ लेखकांच्या उदाहरणांवरून सिध्द करता येईल. मात्र मराठी भाषेचे वरकरणी समर्थन करणाऱ्या अनेक विचारवंतांची आणि लेखकांची स्वत:ची मराठी भाषा मात्र इंग्रजीचा संस्कृतप्रचुर आणि अ-मराठी अनुवाद असल्यासारखी दिसते. तेव्हा ते नेमके कोणत्या मराठीचे समर्थन करत आहेत, याबाबत संशय वाटतो.

तुकोबांसारख्या श्रेष्ठ लेखकाला मराठीच्या अभ्यासक्रमांत सातत्याने महत्त्वाचे स्थान दिले, तर जिला भाषेचे ब्राह्मणीकरण आणि इंग्रजीकरण करणारे उगाचच 'गावरान' किंवा 'साधीभोळी' मराठी मानतात, तीच खरी आधुनिक, विकसित मराठी भाषेचे अभिजात रूप असलेली मराठी आहे, हे सर्वांना कळून येईल. भाषेच्या आणि वाङ्मयाच्या अभ्यासक्रमात आजतागायत् विविध प्रयोजनांसाठी वापरलेली मराठी भाषा दुर्लक्षित राहलेली किंबहुना केली गेलेली आहे. जे काही तुरळक, पण उत्तम आणि कार्यक्षम गद्य गेल्या सव्वाशे वर्षांत मराठीत लिहिले गेले आहे. त्याचे मासले समोर ठेवण्याऐवजी पोकळ, शैलीबाज, कृतक -लालित्याने सजवलेल्या तथाकथित 'साहित्या' ला प्राधान्य देण्यात आलेले आहे. विद्यापीठीय आणि ग्रांथिक मराठी, वर्तमानपत्री आणि शासकीय मराठी यांच्यात आणि ठिकठिकाणी बोलल्या जाणाऱ्या मराठीत एक वाढती दरी तर आहेच; पण आठशे वर्षे सातत्याने विकसित झालेल्या मराठीत आणि आकाशवाणी व दूरदर्शनवर बोलल्या जाणाऱ्या, रंगभूमीवर आणि व्यासपीठावर वापरल्या जाणाऱ्या मराठीतसुध्दा वाढता फरक आढळतो आहे. पेशवाईपासून मराठी वाङ्मयात वर्णीयतेची वाढ होत आहेच. त्यात स्वातंत्र्योत्तर काळात वर्गीयतेची भर पडलेली आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सत्तारचनेतील विकृती सांस्कृतिक एकात्मतेला तडे पाडतात, याचा आपल्याला विसर पडू नये. भक्तिसंप्रदायाचे आणि लोकसंस्कृतीतील मौखिक परंपरांचे खरे महत्त्व त्या हिंदुत्ववाद्यांना अधूनमधून सोयीस्कर वाटतात. यात नसून, त्यात मराठी भाषेची स्वायतत्ता प्रकट झालेली आहे; त्यात आहे. उदाहरणार्थ, हिंदुत्ववादी 'ज्ञानेश्वरी' डोक्यावर घेतात ती भगवद्गीतेखातर, मराठीखातर नव्हे. एरवी ज्ञानदेवांच्या जास्त अस्सल अभंगरचनेचा आणि 'अनुभवामृता' सारख्या मौलिक आविष्काराचा त्यांनी जास्त जयजयकार केला असता. नामदेव आणि तुकाराम हे मराठी कवितेचे मुख्य मानदंड आहेत, हे त्यांनी आनंदाने मान्य केले असते. जनाबाई, चोखोबा, सेना, सावता, शेख महंमद, बहिणाबाई इत्यादिकांना त्यांचे खरे स्थान दिले असते, तर प्राथमिक शाळेपासून मुक्तेश्वर, वामनपंडित किंवा मोरोपंत वाचण्याची वेळ निष्पाप विद्यार्थ्यांवर आली नसती. आमच्या शिक्षणक्रमात सगनभाऊ, प्रभाकर, होनाजी, पठ्ठे बापूराव वगैरे असते, तर भास्करराव तांबे किंवा पुरुषोत्तम शिवराम रेग्यांची कविता वाचतानासुध्दा आम्हाला व्यापक संदर्भात विचार करता आला असता; पण मराठी भाषा आणि वाङ्मयाच्या इंग्रजोत्तर अभ्यासाची दिशाच अ-मराठी आहे आणि हा निव्वळ योगायोग किंवा अपघात नसून, वर्णांध, पुनरुज्जीवनवादी आणि क्वचित पश्चिमाभिमुख प्रवृतींचा हा संमिश्र परिपाक आहे. तुकोबा मराठी वाङ्मयाच्या केंद्रस्थानी आहेत हे मानल्यावर, मराठीचे स्वतंत्र पण वैश्चिक संदर्भात मांडण्याजोगे काव्यशास्त्र आपल्याला मराठीबाहेरच दिसल्यामुळे मराठी काव्याच्या यशाचीच आपल्याला कल्पना येणार नाही. तुकोबांच्या वह्या एकदा ब्राह्मणांपायी इंद्रायणीत बुडविल्या गेल्याच होत्या. विसाव्या शतकातील विद्यापीठीय साहित्यिकांच्या षडयंत्राने त्या पुन्हा बुडविण्याच्या पराक्रम केलेला आहे. गेल्या पाव शतकातील दलित साहित्याचे समकालीन महत्त्व आम्हाला विद्यापीठीय भोंदूंपेक्षा अगोदरपासून आणि मनापासून मान्य आहे. पण नामदेव किंवा तुकाराम हे साडेतीन टक्क्यांच्या संस्कृतीतले लेखक नाहीत आणि सार्वभौम, सर्वसमावेशक मराठीचे मूळपुरुष म्हणता येतील एवढे ते मोठे आहेत, हे दलितांनाही सांगण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. मराठी वाङ्मय बिनइतिहासाचे नाही; तसेच मुद्दाम आपमतलबी पध्दतीने त्याचा इतिहास लिहिता येणार नाही. कवी म्हणून आम्ही एक वेळ रामदासांची मौलिक प्रतिभा वाखाणू; पण ज्या अर्थाने त्यांना संत म्हणणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा किंवा शिवसेना या आधुनिक राजकीय चळवळी सांस्कृतिक अर्थाने आम्हाला अ-मराठी वाटतात. ज्ञानदेव, चक्रधर, नामदेव, तुकोबा यांच्याशी तर त्यांचा संबंध जोडता येत नाहीच; पण शिवछत्रपतींशीही तो जोडता येत नाही. उलट या मुख्य मराठी परंपरेत धर्माच्या विकृत सामाजिक आविष्कारांना विरोध करणारे फुले आणि आंबेडकर चपखल बसतात आणि भारतात अन्यत्र न आढळणारे दलितांचे पुनरुत्थान महाराष्ट्रातच का व्हावे, या प्रश्नाचेही उत्तर त्यातच आहे.

तुकोबांच्या नशिबात हे का नसावं ?

दिलीप पुरुषोत्तम चित्रे

देहू ही संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी; पण या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्मारकाची आज कमालीची दुरवस्था आहे. महाराष्ट्राच्या लेखी तुकाराममहाराजांचे जन्मस्थान शेक्सपियरच्या जन्मस्थानाइतकेच महत्त्वाचे हवे: पण हे कोण समजावून घेणार ?

महाकवींची जन्मक्षेत्रं धर्मनिरपेक्ष अर्थानं तीर्थक्षेत्रं असतात. शेक्सपिअरवर इंग्रज इतकं प्रेम करतात, त्याहूनही जास्त प्रेम आम्ही ज्ञानदेव-तुकोबांवर करत असू, पण अर्थातच आमच्या या प्रेमाला धार्मिकतेची काहीशी झालरसुध्दा आहे. कारण आमच्या या प्रेमाला धार्मिकतेची काहीशी झालरसुध्दा आहे. कारण आमच्या मातृभाषेतलं वाङ्मय वारकरी संतांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे आमच्या जुन्यात जुन्या संस्काराशी ते निगडीत झालं. यामुळे धर्म आणि काव्य, जीवन आणि वाङ्मय, भाषा आणि परंपरा यांची सहजासहजी फारकत करणं आम्हाला जमत नाही.

मराठी भाषेतले सर्वश्रेष्ठ कवी तुकाराम महाराज. जगातल्या महान कवींमध्ये त्यांची गणना होईल आणि हे मान्य करायला वारकरी किंवा हिंदू भारतीयच असलं पाहिजे, असं नाही. तुकोबांच जन्मस्थान देहू. पुणे शहरापासून ते जवळच आहे. देहू हे नुसतंच तुकोबांच जन्मस्थान नाही, तर ती त्यांची कर्मभूमीसुध्दा आहे. याच देहू गावी इंद्रायणी नदीच्या डोहात तुकोबांच्या कवित्वाच्या बुडवलेल्या वह्या तेरा दिवसांनी पुन्हा कोरडया निघण्याचा चमत्कार झाला. या चमत्कारावर एवढंच भाष्य करावंसं वाटतं की, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाइतकंच तुकोबांच्या काव्याचं पुनरुत्थान मानवतेचे अंतश्चक्षू उघडण्याला समर्थ आहे.

तुकोबांचं १६४९ मध्ये निर्वाण झालं. या घटनेला आता 340 वर्षे उलटून गेली. त्यानंतर पुढे देहूहून तुकोबांच्या पादुकांची पालखी प्रत्येक आषाढीला पंढरीची वारी करू लागली आणि आजही परंपरा अव्याहत टिकून आहे. आळंदीहून निघणारी ज्ञानदेवांची, देहूहून निघणारी तुकोबांची, आणि वेगवेगळया ठिकाणांहून निघणाऱ्या इतर पालख्या आणि दिंडया मिळून केली जाणारी वारी ही महाराष्ट्राची एक वैशिष्टयपूर्ण परंपरा आहे. सर्व जगाचं लक्ष ती हळूहळू वेधून घेत आहे.

याचं ताजं उदाहरण म्हणजे डॉ. गुंथर साँथायमर या जर्मन भारताभ्यासकाने लिहिलेल्या भाष्यानुसार, हेन्निंग ष्टेगमुलर या चित्रपट - दिग्दर्शकाने निर्माण केलेला 'वारी' हा माहितीपट. या माहितीपटाची मूळ लांबी नव्वद मिनिटं असून, यंदाच्या म्युनिख माहितीपटोत्सवात. तो प्रथम प्रदर्शित होत आहे. या माहितीपटाची दूरदर्शन आवृत्ती साठ मिनिटांची असून, अलिकडेच जर्मन चित्रवाणीवर तो प्रदर्शित झालेला आहे.

एका प्रमुख युरोपीय देशातल्या चित्रवाणीवर एक तास लांबीचा माहितीपट जेव्हा दाखवला जातो, तेव्हा त्या विषयाला फार मोठं सांस्कृतिक महत्त्व दिलं जाण्याचं ते द्योतक मानावं लागतं. 'वारी' या चित्रपटाच्या ध्वनिपट्टीवर जे भाष्य आहे, ते जर्मन भाषेत असलं, तरी त्या चित्रपटातल्या सर्व मुलाखती, सर्व संभाषणं, सर्व भजनं-कीर्तनं, सर्व घोषणा मूळ मराठीतच आहेत. अस्सल माहितीपटाचं पोत मूळच्या संस्कृतीचंच असावं लागतं, तसं या चित्रपटाचं आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर दूरदर्शनवर दाखवला जावा आणि त्यासाठी त्यातल्या जर्मन भाष्याचा खास हिंदी - मराठी अनुवाद करण्यात यावा, अशी दूरदर्शनला जाहीर विनंती करावीशी वाटते, इतका तो महत्त्वाचा आहे.

साँथायमर आणि ष्टेगमुलर यांनी जेव्हा या चित्रपटाचं चित्रण केलं, तेव्हा त्यात त्यांनी तुकोबांच्या काव्याविषयी माझी एक छोटीशी मुलाखत घेतली. या मुलाखतीचा एक भाग देऊळवाडयात पाणी दरवाजाच्या अलीकडेच ओसरीवर चित्रित केला, तर एक भाग इंद्रायणीचा डोह जिथं तुकोबांच्या वह्या बुडवण्यात आल्या होत्या त्या तरंगून आल्या अशी आख्यायिका आहे - ही वस्तुत: देहूतली फार महत्त्वाची जागा; पण या स्थानाची दुर्दशा पाहवत नाही. जुनं, पडीक मंदिर, इतस्तत: विखुरलेले भग्नावशेष, छपराचे पत्रे उडालेले. तुकोबांच्या वह्या ज्या डोहातून कोरडया निघाल्या, त्यात आज गावतलं सांडपाणी साचतं आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी तर जलप्रदूषणामुळे या डोहातले हजारो मासे तडफडून मेले. सुदैवाने त्यांचा संपूर्ण क्षय अजून झालेला नाही. इंद्रायणीत आज या डोहात आणि इतरत्र चोरून मासेमारीसुध्दा चालते. माशांचा क्षय झाल्यास पाण्याचं प्रदूषण जास्तच वाढणार हे उघड आहे. या माशांविषयी इथल्या भाविकांची अशी श्रध्दा आहे की, ते 'वारी' करतात ! कार्तिकीला देहूहून मासे आळंदीला जातात अशीही समजूत आहे. आणखी एक लोकपरंपरा अशी आहे की, जेव्हा तुकोबा वैकुंठाला गेले, तेव्हा त्यांची कन्या भागीरथी ही आपल्या सासरी म्हणजे डोहापलीकडे एलवाडीला होती. तुकोबांच्या वियोगाची कल्पना सहन न होऊन तिने जीव देण्यासाठी याच डोहात उडी घेतली. त्या वेळी या डोहातल्या माशांनी तिला वरच्यावर झेलून पुन्हा सुखरूप काठावर आणली.

बाबा गेले कोण्या गावा
भागीरथी करी धावा
उडी डोहात टाकिली
वरी मत्स्यांनी झेलिली

अशी अनामिक पारंपरिक रचना आजही गायिली जाते.

लोकांच्या या श्रध्दांची दखल ब्रिटिश सरकारनेही घेतली होती. ब्रिटिश काळापासून मुंबई पोलिस ऍक्टान्वये देहू येथे इंद्रायणी नदीत मासेमारीला बंदी आहे. डोहाच्या खालीसुध्दा इंद्रायणी संगमापर्यंत हे माशांना अभयक्षेत्र आहे. पूर्वी देहूच्या पुलापाशी फलकावर या ऍक्टान्वये मासेमारीविरध्द सार्वजनिक इशारा दिलेला होता. आज तो फलकच गायब झालेला असून, पुन्हा नवा फलक लावण्याची दक्षता कोणीच दाखवलेली नाही.

आळंदी किंवा इतर काही क्षेत्रांप्रमाणं देहू गावचं धार्मिक व्यापारीकरण झालेलं नाही, ही गोष्ट जरी भाग्याची असली, तरी वस्तुत: महाराष्ट्राच्या लेखी शेक्सपियरचं जन्मस्थान स्ट्रॅटफर्ड - ऑन - ऍव्हन - इतकंच तुकाबांचं जन्मस्थान महत्त्वाचं हवं. तसं ते आज तरी दिसत नाही.

मुंबई राज्याचे पहिले 'प्रधानमंत्री' (मुख्यमंत्री) कै. बाळासाहेब खेर यांनी तुकोबा आणि देहू यांचं महत्त्व ओळखून चाळीस वर्षांपूर्वी इंद्रायणीवर पूल बांधला, कै. पु. मं. लाडांकरवी शंकरपांडुरंगी गाथेची नवी शासकीय आवृत्ती प्रकाशित केली. (आज प्रचंड मागणी असूनही, शासकीय गाथेचे पुनर्मुद्रण झालेले नाही.) कै. खेरांच्या कारकीर्दीत तुकोबांच्या निर्वाणाला तीनशे वर्षं झाली आणि त्यानिमित्तानं वरील गोष्टींखेरीज तुकोबांच्या जन्मस्थान - मंदिराचाही जीर्णोध्दार झाला. आता पुढच्या सुधारणांसाठी चारशेव्या निर्याणदिनाची वाट पाहायची म्हटल्यास 2049 पर्यंत थांबावं लागेल ! ज्ञानेश्वरीच्या जन्मशताब्दी वर्षात यंदा तरी आळंदी, नेवासे, पैठण वगैरे ज्ञानदेवांच्या चरित्राशी संबंधित स्थानाच्या बाबतीत आपण काय केलं ? ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वरी अजून भारतीय टपालाच्या खास तिकिटावरसुध्दा झळकली नाहीत !

तुकोबांच्या चरित्राशी संबंधित स्थानांचा निर्देश करणारे फलक देहूत दिसत नाहीत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये ते हवेत. देऊळवाडा, जन्मस्थान, गोपाळपुरा आणि डोह अशी जी चार प्रमुख स्थानं आहेत, तिथं त्यांचं तुकोबांच्या चरित्रातलं महत्त्व विशद करणारे फलक हवेत. काही ठिकाणी गाथेतले संबंधित अभंग मार्मिकपणे उध्दृत करता येतील. मराठीतील आणि अन्य भाषांमधील तुकारामविषयक वाङ्मयाचे एक कायम प्रदर्शनसुध्दा देहूत हवं. तेही वरीलपैकी महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणी.

देहू गावात येणाऱ्या पर्यंटकांना उतरण्याच्या किंवा राहण्याच्या फारशा सोयी नाहीत. स्वच्छ उपाहारगृहाचीसुध्दा उणीव आहे.या बाबतीत सुध्दा आधुनिक नागरिक आणि प्रशासकांपेक्षा जुने भाविक आणि दानशूर आश्रयदातेच उजवे ठरतात. खेड तालुक्यातील महाळुंगे गावचे सरदार इंगळे - जे शिंद्यांचे सरदार होते - त्यांनी पूर्वी श्रध्देपोटी देहूची अर्धी पाटीलकी विकत घेतली. त्यांनी मंदिराच्या परिसरातली जागा खरेदी केली, तटबंदी बांधली, घाट बांधला. तसाच देहूत नगारखाना आणि एक घाट अहिल्याबाई होळकरांनीही बांधला. पुढच्या काळात, म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी, श्रीजंगली महाराज यांनी धर्मशाळा तर बांधलीच; पण निर्वाणस्थळापर्यंत सावलीसाठी झाडे लावली. आता त्यांची तोड झालेली आहे. निदान सामाजिक वनीकरणाचा या परिसराला स्पर्श होवो. अलिकडच्या काळात संत गाडगेमहाराजांनी आपल्या परीनं देहूत सोयी केल्या.

वस्तुत: देहूकडे खुद्द महाराष्ट्र शासनानं लक्ष पुरविणं आवश्यक आहे. या गावाचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व ओळखून अधोरेखित करणं आणि त्याच्याकडं केवळ भाविकांच्या मेळाव्याचं एक स्थान म्हणून न पाहता राष्ट्रीय सांस्कृतिक स्मारकक्षेत्र म्हणून पाहणं आवश्यक आहे.

जे शेक्सपियच्या भाग्यात आहे, ते तुकोबांच्या नशिबी नाही, असे म्हणण्याची पाळी आमच्यावर येऊ नये

प्रस्तावना - श्रीतुकाराम गाथा (देहू प्रत)

सदानंद मोरे

महाराष्ट्रातील भागवत धर्माच्या मंदिराचे कळस संतश्रेष्ठ, कविकुलगुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगांनी भाविकांना व बुध्दिमंतांना, ग्रामीणांना आणि नागरांना, कवींना आणि समीक्षकांना, स्वदेशवासीयांना आणि परदेशस्थांना गेले साडेतीन शतके सारखाच वेध लावला आहे.

ब्रिटिशांनी १८१८ साली पेशवाई बुडविल्यानंतर थोडयाच दिवसांत महाराष्ट्राच्या ग्रंथव्यवहारात मुद्रणयुग अवतीर्ण झाले. मुद्रणयुगाच्या प्राथमिक अवस्थेपासूनच तुकाराम महाराजांच्या अभंगांनी वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून येते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या आरंभापासून मुद्रित झालेल्या तुकाराम-गाथ्यांचा परामर्श वि. ल. भावे, बाबाजी गणेश परांजपे, पु. मं. लाड यांनी घेतला आहे. अलीकडच्या काळात सदानंद मोरे यांनी 'तुकाराम दर्शन' या ग्रंथामधून विस्तृतपणे या प्रयत्नांचा ऐतिहासिक आढावा घेऊन त्यांचे सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले आहे.

सर्व प्रकाशित गाथ्यांचे परीक्षण केले असता असे लक्षात येते, की त्यांच्यापैकी एकही गाथा तुकाराम महाराजांच्या श्रीक्षेत्र देहूच्या परिसरात प्रचलित असलेल्या बोलीत रचलेल्या अभंगांच्या संहितेवर आधारित नाही. स्वतः महाराजांनी स्वहस्ते सर्व अभंग लिहून काढले असते आणि ते सर्व जतन करून ठेवण्यात आले असते, तर कोणतीच समस्या वा अडचण उभी राहिली नसती; परंतु त्यांच्या हातचे समजले जाणारे एकुलते एक हस्तलिखित देहू देवस्थानच्या संग्रहात आहे. इंद्रायणीच्या डोहातून तुकोबांच्या वह्या तरंगून सुरक्षित, कोरडया वर आल्यावर भाविकांनी प्रसाद म्हणून त्यांची पाने लुटून नेल्याचे तुकाराम-चरित्रकार महिपती सांगतात. कारण काहीही असो, महाराजांच्या हातची पूर्ण संहिता उपलब्ध नाही, हे खरे.

महाराजांचे लेखक संताजी तेली जगनाडे व संताजींचे चिरंजीव बाळोजी यांनी लिहून ठेवलेले सुमारे दोन हजार अभंग हे पाठप्रामाण्याचा विचार करता महत्त्वाचे ठरतात, यात काहीच शंका नाही. त्यांतील संताजीच्या हातचे तेराशे अभंग वि. ल. भावे यांनी प्रकाशित करून बरीच वर्षे झाली. बाळोजींचे हस्तलिखित अप्रकाशितच आहे. अर्थात संपूर्ण जगनाडे संहिता विचारात घेतली, तरीदेखील तिच्यात महाराजांच्या एकूण अभंगांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक अभंग दाखल नाहीत.

सद्यःकालीन प्रचलित गाथ्यांपैकी बरेच गाथा पंढरपूर येथे सिध्द झालेले असून, ते उत्तरकालीन आहेत. त्यामुळे त्यांचे प्रामाण्य शाबीत करू पाहणाऱ्यांना दंतकथांचा व आख्यायिकांचा आधार घ्यावा लागतो. याविषयीचे सविस्तर विवेचन पु. मं. लाड व अ. का. प्रियोळकर यांनी केलेले आहे.

अशा परिस्थितीत देहू येथेच सिध्द झालेली संहिता महत्त्वाची ठरते, हे उघड आहे. ही संहिता संपूर्ण आणि प्राचीन असेल, तर दुधात साखर पडली, म्हणावी लागेल.

देहू परिसरात सिध्द झालेली एक संपूर्ण संहिता देहूचे संशोधक ह.भ.प. श्रीधरबुवा मोरे-देहूकर यांच्या संग्रही आहे. ही संहिता तिच्यापेक्षा प्राचीन संहितेची नक्कल असली, तरी एकोणिसाव्या शतकातील असल्याने, तिचे मूल्य तसे कमी वाटत असले, तरी देहू परंपरेतील संपूर्ण अशी एकमेव उपलब्ध हस्तलिखित प्रत असल्याने तिला अमूल्यच मानावे लागेल आणि तिच्यापेक्षा प्राचीन पाठ देणारी हस्तलिखित प्रत उपलब्ध होत नसल्याने, देहू प्रत म्हणून तीच छापली गेली पाहिजे, असा एक पर्याय होता. स्वतः तुकोबांनी स्वहस्ते लिहिलेले अभंग, तुकोबांच्या समकालीनाने किंवा लगतच्या उत्तरकालीनाने लिहिलेले अभंग साडेचार हजारांच्या आसपास मिळत नसल्याने आणि देहूप्रत पुढे येणे हे सांप्रदायिकांच्या व अभ्यासकांच्या दृष्टीने गरजेचे असल्याने, हाही पर्याय अजिबात टाकाऊ होता, असे नाही.

दुसरे असे, की तुकोबांच्या पश्चात देहू देवस्थान संस्थानमध्ये तुकोबांचे सर्व अभंग समाविष्ट असलेली संहिता (अर्थात अनेक वह्यांमध्ये) उपलब्ध होती. त्यामुळे एका बाजूला आपण मृगजळाच्या पाठी लागलो आहोत, असे म्हणण्याचीही सोय नव्हती. महाराजांच्या वैकुंठगमनानंतर थोडयाच दिवसांनी तुकोबांचा वेध लागलेले कचेश्वर भट ब्रह्मे चाकणकर, अभंग लिहून घेऊन पाठ करावे व त्यांच्या आधारे कीर्तन करावे, या हेतूने तेव्हा खेड मुक्कामी असलेले तुकारामपुत्र नारायणबाबा यांना भेटले. काही अभंग लिहून द्या, अशी विनंती केली. त्यावर नारायणबाबांचे 'अंबाजीचे घर। तेथे जावे। सर्वही संग्रह तुकोबाच्या वह्या। जावे लवलाह्या तुम्ही तेथे॥' असे सांगितले. त्यानुसार कचेश्वर देहूला गेले. अंबाजीला- म्हणजे तुकोबांच्या नातवाला- थोरल्या मुलाचे- महादेवबाबांचे चिरंजीव आबाजीबाबा यांना भेटले व त्यांनी त्यांजकडून अभंग मिळवले.

इंग्रजी राजवट स्थिर झाल्यावर येथील नवशिक्षित तरुण आपल्या धर्माचा व समाजरचनेचा पुनर्विचार करू लागले. यातूनच दादोबा पांडुरंग यांनी कधी पुढाकार घेऊन, तर कधी मागे राहून, परमहंस सभा, प्रार्थना समाज या चळवळी सुरू केल्या. या चळवळींचे तत्त्वज्ञान सिध्द करताना त्यांना तुकोबांच्या अभंगांचा उपयोग झाला. दरम्यान १८५८ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हाचे डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन सर अलेक्झांडर ग्रँट व गव्हर्नर सर बार्टल फ्रिअर सुज्ञ व उदारमतवादी होते. ग्रँट साहेबांनी तुकाराम महाराजांचे अभंग वाचले, तेव्हा ते चकितच झाले व ते त्यांची स्तुती करू लागले. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शंकर पांडुरंग पंडित ही मातब्बर मंडळी ग्रँटचे विद्यार्थी. तुकोबांचा महिमा त्यांनी आपल्या गुरूकडून ऐकलेला. शिवाय दादोबा आणि त्यांचे परमहंस सहकारी तेच सांगत होते. त्यामुळे या नवपदवीधरांमध्ये तुकारामविषयक आकर्षण निर्माण झाले व तुकोबा त्यांच्या प्रार्थना समाजाचे केंद्र बनले. दरम्यान प्रसिध्द कायदेपंडित विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी गणपत कृष्णाजींच्या छापखान्यातून गाथ्याची पूर्ण आवृत्ती पंढरपूर प्रतीवरून प्रसिध्द केली.

महाराष्ट्राच्या सुशिक्षितांमधील वातावरण अशा प्रकारे तुकाराममय होत असताना इंदुप्रकाश प्रेसचे जनार्दन सखाराम गाडगीळ यांनी गाथा छापायचे ठरवले व मुंबई सरकारकडे आश्रय मागितला. ग्रँट साहेबांच्या शिफारशीवरून सरकारने २४००० रुपये मान्य केले. संस्कृत, प्राकृत, ग्रीक, लॅटिनचे जाणकार शंकर पांडुरंग पंडित आणि विष्णु परशुराम पंडित यांच्याकडे संपादनाची जबाबदारी टाकण्यात आली. १८६९ व १८७३ मध्ये हा गाथा दोन भागांत प्रकाशित झाला.

पंडितांनी संपादनासाठी देहू, तळेगाव, पंढरपूर व कडूस येथील प्रती वापरल्या. पैकी देहू हस्तलिखित त्यांना तुकाराम महाराजांच्या तत्कालीन वंशजांकडून प्राप्त झाले. हे हस्तलिखित वंशजांकडे परंपरेने आलेले असून, ते महाराजांचे ज्येष्ठ पुत्र महादेवबाबा यांच्या हातचे असल्याचे संपादकांना सांगण्यात आले. तळेगाव प्रत ही त्र्यंबक कासार यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस केलेली देहू प्रतीची व्यवस्थित नक्कल होती.

पंडितद्वयीने संपादनासाठी देहूहून नेलेले महादेवबाबांच्या हातचे हस्तलिखित देहूला परत आलेच नाही. त्यामुळे परंपरेवर विश्वास ठेवून सदर हस्तलिखित महादेवबाबांच्या हातचे मानायचे नाही, असे ठरवले, तरी हे हस्तलिखित प्राचीनतम व पारंपरिक, महाराजांच्या घरातलेच असल्याने त्याच्या विश्वसनीयतेसंबंधी शंकाच उरत नाही.

प्रस्तुत गाथा प्रसिध्द झाल्यानंतर वारकऱ्यांना तो मान्य होणे साहजिकच होते. तत्कालीन प्रसिध्द वारकरी कीर्तनकार ह.भ.प. भाऊसाहेब काटकर यांचे शिफारसपत्र गाथ्याला जोडले आहे. ते प्रातिनिधिक समजायला हरकत नाही. नंतर पंढरपूरमधील महंतमठपतीच आपापल्या पोथ्या घेऊन प्रकाशनाच्या व्यवहारात उतरल्यावर वारकऱ्यांमध्ये प्रस्तुत गाथा काहीसा मागे पडणे स्वाभाविकच समजायला हवे.

अर्थात प्रस्तुत इंदुप्रकाश किंवा पंडिती गाथा अंतिमतः देहू येथील हस्तलिखितावर आधारित असला, तरी तो देहू प्रतीची यथाशब्द छपाई नाही. पंडित आधुनिक विद्येत पारंगत असल्याने त्यांनी देहूप्रत सरळ छापण्याऐवजी त्यांना उपलब्ध झालेल्या हस्तलिखित पोथ्यांवरून तुकाराम-गाथ्याची चिकित्सक किंवा पाठशुध्द आवृत्ती सिध्द करण्याचे ठरवले. उपलब्ध हस्तलिखितांमधील जे पाठ त्यांना शुध्द वाटले, ते स्वीकारून त्यांनी त्यांचा समावेश मुख्य संहितेत केला. जे पाठ त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अस्वीकार्य वाटले, ते त्यांनी स्वीकृत पाठांवर आकडे टाकून तळटीपांमधील त्याच आकडयांपुढे पाठभेद म्हणून छापले. ते कोणत्या हस्तलिखितात आढळले, याचाही उल्लेख केला.

तुकाराम-गाथ्याची संशोधित आवृत्ती म्हणून पंडिती प्रतीचे स्थान व मूल्य काय, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु इतिहासाचार्य राजवाडयांसारख्या चिकित्सक शिरोमणीने त्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली, तर त्यांचेच शिष्य म्हणविणाऱ्या भाव्यांनी त्यावर टीकेची झोड उठवली.

संशोधितचिकित्सक संहितेचे म्हणून एक महत्त्व असते, हे निदान ज्यांना महाभारताच्या भांडारकर प्रतीची माहिती आहे, त्यांना सांगायला नको. पण प्रत्येक संहितेचे सुध्दा स्वतंत्र स्थान व महत्त्व असते, हेही विसरता कामा नये. विशेषतः गाथ्याला आधारभूत ठरलेल्या देहू संहितेचे, ती देहूत सिध्द झालेली, स्वतः तुकोबांच्या उच्चारशैलीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिचित असलेल्यांनी सिध्द केलेली व उपलब्ध संपूर्ण संहितांमधील सर्वांत प्राचीन असल्यामुळे तर अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण ठरते.

संपादक, प्रकाशक, मुद्रक यांनी त्यांना उपलब्ध झालेल्या हस्तिलिखितांपैकी देहू व तळेगावची हस्तलिखिते मूळ मालकांस परत न करता गहाळ केली, या त्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांना बोल लावण्यात आता अर्थ नाही. 'यद् गतं तद् गतं' एवढेच म्हणून त्याविषयी शोक करण्याने काही निष्पन्न होणार नसल्यामुळे तो मुद्दा सोडून देऊ. (पंढरपूर प्रत म्हणजे गणपत कृष्णाजीचा छापील गाथा. कडूस प्रतीचे मालक देहूकरांपेक्षा चतुर असल्याने त्यांनी संपादनाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच आपले हस्तलिखित परत नेले.) उलट, शंकर पांडुरंग आणि विष्णु परशराम या पंडितांचे आभार यासाठी मानायला हवेत, की त्यांनी अस्वीकार्य वाटलेले देहूप्रतीतील पाठ तळटीपांत नोंदवले. कारण त्यामुळे या तळटीपांमधील संपादकांनी न स्वीकारलेल्या पाठांची त्यांची मुख्य संहितेतील मूळ ठिकाणी पुनःस्थापना करून देहू संहितेची पुनर्रचना करणे शक्य होते. तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाच्या त्रिशतकोत्तर सुवर्णसोहळावर्षाचे निमित्त साधून देहू देवस्थान प्रकाशने करीत असलेला प्रस्तुत गाथा म्हणजे पंडितीप्रतीवरून सिध्द करण्यात आलेली देहू संहितेची पुनर्रचना किंवा पुनःस्थापना होय. हा काहीसा उलटा प्रवास आहे. संशोधित प्रतीचे निस्संपादन करून मूळ प्रतीचे केलेले पुनःसंपादन आहे. पण ते आवश्यक होते व त्याला दुसरा पर्याय नव्हता, इलाजही नव्हता.

अर्थात हे काही यांत्रिकपणे केलेले तांत्रिक काम नव्हे. तळेगाव, पंढरपूर व कडूस येथील संहिताही महत्त्वाच्या आहेत. त्यांत निर्माण झालेले पाठभेद म्हणजे निव्वळ प्रमाद अशी आमची भूमिका नाही. देहू प्रतीतही हस्तदोष, नजरचुका यांमुळे घोटाळे होणे शक्य होते. तसेच, अन्य संहितांचे कर्तेही आपापल्या परीने जबाबदारीनेच काम करीत होते. तेव्हा ज्या ठिकाणी देहू प्रतीतील पाठ भाषिक, तात्त्वि, सामाजिक, ऐतिहासिक, इ. बाजूंनी विचार केला असता, निःसंशयपणे निरर्थक किंवा असंभाव्य वाटले, तेथे इतर प्रतींमधील पाठ आदरपूर्वक स्वीकारले आहेत. या प्रक्रियेत आमची निवड शंभर टक्के अचूक व आक्षेपातीत आहे, असा आमचा दावा नाही, ही प्रक्रिया कधीही न संपणारी आहे.

प्रश्न केवळ पाठभेदांचाच नाही. कोणताही अभंगगाथा हे एक संकलन-संपादन असते. गाथा म्हणजे जाणीवपूर्वक ठरवून केलेली प्रकरणवार ग्रंथरचना नव्हे. प्रत्येक अभंग हा एक स्वतंत्र एकक (unit) म्हणून वाचून, त्याचा अर्थनिर्णय करता येतो व बहुतेकांचा कल त्याकडेच असतो.

पण हे काही एवढे सरळ-सोपे प्रकरण नाही. तुकोबांचे अभंग सहजस्फूर्त असत. पण ते एखाद्या विवक्षित प्रसंगाला अनुलक्षून एकापेक्षा अधिक अभंगही रचीत. अशा वेळी हे सर्व अभंग एकमेकांशी आंतरिकरीत्या संबध्द असल्याने त्या सर्वांचा मिळून एक गट होई. या गटातील अभंगांचा क्रम अथवा ओळही तितकीच महत्त्वाची. अर्थनिर्णयाच्या दृष्टीने ही बाब फार महत्त्वाची.

महाराजांच्या अभंगांच्या देहू प्रतीच्या संपादकांना, ते देहूचेच असल्यामुळे कालदृष्टया तुकोबांना अधिक जवळचे असल्याने तुकारामचरित्र चांगले अवगत होते. महाराजांनी कोणत्या प्रसंगी, किती अभंग, कोणत्या क्रमाने रचले, याचीही माहिती त्यांना बरीच होती. नसल्यास बुजुर्गांकडून मिळण्याचीही शक्यता होती. त्यांनी हे काम गंभीरपणे व कष्टपूर्वक केलेले दिसते. संहितेत अनेक ठिकाणी अभंगांचे गट आकडे टाकून निश्चित केले आहेत. कितीतरी गटांना अनुरूप शीर्षके देण्यात आलेली आहेत. कालांतराने संहितीकरणाचे केंद्र देहूहून पंढरपूरला गेल्यावर ही जाणीवच लुप्तप्राय झाली व महाराज मंडळींनी मूळ ओळींत ढवळाढवळ करून कीर्तनाची सोय वगैरे आनुषंगिक बाबी पुढे ठेवून अभंगांची आपापल्या बुद्ध्यनुसार वर्गीकरणे केली. देहूप्रत ही या ढवळाढवळीपासून मुक्त असल्याने सर्वश्रेष्ठ प्रत आहे.

पंडिती प्रतीत दुबार आलेले अभंग प्रस्तुत प्रतीत एकदाच घेण्यात आलेले आहेत. प्रचलित पंढरपूरकेंद्रित प्रतींपेक्षा या प्रतीत जास्त अभंग आहेत. पंडितांनी घेतलेले काही अभंग वगळण्याची वेळ एकदाच आली. तिचा खुलासा करणे भाग आहे.

॥शिवाजी राजे यांचे स्वामीस अबदागिरी घोडा,

कारकून असे न्यावयास पाठविले, ते अभंग॥

या मथळयाखाली पंडिती प्रतीत १४ अभंग येतात. त्यांतील ९ अभंग पंढरपूर प्रतीत व वारकऱ्यांमध्ये प्रचलित असलेल्या अन्य प्रतींत सापडतात. पंडिती प्रतीतील अतिरिक्त 5 अभंग प्रस्तुत गाथ्यात आम्ही वगळले आहेत. हे अभंग सरळ सरळ उत्तरकालीन प्रक्षेप आहेत. अशा प्रकारचे प्रक्षेप होण्याचे एक कारण म्हणजे मूळ वहीत कोरी राहिलेली पाने.

उपर्युक्त पाच अभंगांतील (महाराष्ट्र शासनाची आवृत्ती, अभंग क्रमांक १८८६-१८९०) तुकाराम महाराजांचे स्वतः विषयीचे उल्लेख त्यांच्या स्वरूपाशी व विचारांशी विसंगत आहेत.

परंतु हा काही आमच्या व्यक्तिनिष्ठ धारणेचा भाग नव्हे. तुकाराम महाराज शिवरायांना रामदासांकडे जायला सांगत असतील, तर त्याला आम्ही कोण हरकत घेणार ? पण ऐतिहासिक वस्तुस्थिती अशी आहे, की इ. स. १६५० पर्यंत रामदास कृष्णाकाठी नुकतेच येऊन, दाखल होऊन, कार्य करू लागले होते व त्यांची माहिती फारशी कोणाला असण्याची शक्यता नव्हती. त्यांना मानमान्यताही मिळाली नव्हती. उलट, तुकोबा प्रसिध्दीच्या आणि सन्मानाच्या शिखरावर होते. अशा परिस्थितीत ते स्वतःची अशी निंदा करीत शिवबांना विन्मुख पाठवतील, हे शक्य नाही.

पण मुद्दा केवळ शक्यतेचाही नाही. ज्या कोणी रामदासभक्ताने हेतुतः किंवा सद्भावनेने (good faith) हे अभंग रचले, तो इतिहासविषयक पूर्ण अडाणी असल्यामुळे त्याने या अभंगांमध्ये अष्टप्रधानांचा उल्लेख करताना प्रतिनिधी, राजाज्ञा अशा शिवोत्तर काळातील अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे, १६५० पर्यंत ज्याला शिवरायाचे नावही माहीत असणे सुतराम् शक्य नव्हते, तो भूषण कवी शिवदरबारात आणून बसवला आहे आणि सुमंत व डबीर ही एकाच पदाची दोन भाषांमधील दोन नावे असली; तरी ती दोन स्वतंत्र अधिकाऱ्यांची पदनामे मानली आहेत. त्यातही मौज अशी, की शिवराज्यभिषेकापर्यंत प्रचलित असलेल्या डबीर या फारशी भाषेतील शब्दाला सुमंत हा पर्याय राज्यव्यवहारकोशामुळे त्यानंतर प्रचलित झाला. रामदासभक्तांनी भूषण कवीप्रमाणे राज्यव्यहारकोशकर्ते रघुनाथपंत यांनाही १६५० पूर्वी पुणे परिसरात दाखल करण्याचा चमत्कार केला आहे.

अर्थात या प्रसिध्द रचना रामदासभक्तांच्या असल्या, तरी त्यांचा समावेश देहू वा तळेगाव प्रतीत करण्याचे काम मात्र त्यांचे नव्हे. त्याच्या निदान दोन शक्यता आहेत. १) देहू प्रतीची नक्कल करणारे त्र्यंबक कासार यांनी एखाद्या रामदासी बाडातून हे अभंग आपल्या (तळेगाव) प्रतीत समाविष्ट केले असतील. तेथून ते मूळ देहू प्रतीत नकलून घेण्यात आले असतील. देहू प्रतीत मुळाला सोडून वेगळया पाठांचा समावेश (मूळ पाठ खोडून) झालेले दिसून येतात. हे उत्तरकालीन देहूकरांचे काम होय. २) अशाच एखाद्या उत्तरकालीन देहूकराने उपर्युक्त रामदासी प्रक्षेप देहू प्रतीत सामावून घेतले असतील. तिथून ते त्र्यंबक कासाराच्या वहीत नकलले गेले.

मुळात रामदासी संप्रदायातच या अभंगांची निर्मिती कशी झाली, याचा उलगडा करणेही फारसे अवघड नाही. मल्हार रामराव चिटणीस हे शिवशाहीचे बखरकार अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या संधिकाळात होऊन गेले. त्यांचा रामदासांच्या संप्रदायाशी निकट संबंध होता. खुद्द सांप्रदायिक बखरकार हनुमंतस्वामी आणि चाफळ संस्थानाधिकारी रंगो लक्ष्मण मेढे व चिटणीस हे एकत्र लिखाण करीत. हनुमंतस्वामीच्या रामदासांच्या बखरीची वाढीव दुसरी आवृत्ती स्वामींच्याच आज्ञेवरून चिटणीस व मेढे यांनी तयारकेली.

शासकीय प्रतीतील उपर्युक्त अभंग चिटणीसांच्या बखरीत शिवाजीत्तुकाराम भेटीचा प्रसंग सांगताना येतात, हे सांगितले, म्हणजे या प्रक्षेपांचा वेगळा उलगडा करायची गरज नाही. चिटणीस, हनुमंतस्वामी व कदाचित मेढे यांनी भेटीचे वर्णन करताना बहुधा हे अभंग रचले असावेत. अर्थात त्यात आपण काही गैर करत आहोत, असे त्यांना वाटायचे काही कारण नव्हते. त्यांनी केले, ते प्रामाणिकपणे व रामदासांचा महिमा वाढविण्यासाठी. ही घटना खरोखर घडली व तुकोबांनी शिवरायांना रामदासांकडे जायला सांगितले, ही त्यांची प्रामाणिक समजूत होती. तिच्या पोटी त्यांनी हे केले. तुकोबांनी शिवरायांना गद्यात उपदेश करण्याऐवजी अभंगांत करणे अधिक सयुक्तिक वाटल्याने त्यांची गद्याऐवजी पद्य अभंग करून ते मूळ अभंगांची ओळ विस्कळीत करून त्यांच्यांत मध्येच घुसडले. पण त्यामुळे वृत्तविसंगती निर्माण होते, ओघ बिघडतो, हे त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु साताऱ्याच्या दरबारात प्रचलित असलेली, पण शिवकाळात मुळातच नसलेली अधिकारपदे त्यांची अडाणीपणे अभंगांत आणली. अर्थात त्यांच्या अडाणी प्रामाणिकपणामुळेच प्रस्तुत प्रक्षेप ओळखणे शक्य झाले. असो.

सौजन्य : श्री तुकाराम महाराज देवस्थान, देहू – ४१२१०९.

मानवी जीवनाचा महाभाष्यकार

सदानंद मोरे

मानवी जीवन ही एक अत्यंत गुंतागुंतीची व बहुजिनसी अशी बाब आहे. इतिहासाच्या प्रारंभिक अवस्थेत ते सरळ साधे असेलही; परंतु ज्ञान आणि विज्ञान यांच्या प्रगती बरोबर ते व्यापक, समृध्द आणि व्यामिश्र होत गेले. या जीवनात नाना नाना प्रकारच्या व्यवहारांचा अंतर्भाव होतो. हे व्यवहार कधी एकमेकांना पूरक ठरतात तर कधी परस्परविरोधी होतात. उदाहरण द्यायचे झाले, तर स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक आणि राजकीय सुधारणा या जीवन व्यवहारांच्या परस्परसंबंधांबद्दल झालेल्या वादाचे देता येईल. आगरकरांना ते पूरक वाटायचे, तर टिळकांना विरोधी वाटायचे. आज्या काळापुरते बोलायचे झाले, तर धर्म आणि राजकारणाच्या संबंधांच्या मुद्याकडे बोट दाखविता येईल. 'धर्मराजकारण समवेत चालती...,' असे महाराष्ट्राचे वर्णन मराठी कवींनी केलेले आहेच; पण मग सेक्युलॅरिझमच्या मुद्याचे काय, हा प्रश्नही उपस्थित होतोच !

मानवी जीवनाच्या वेगवेगळया क्षेत्रांचे तर सोडाच; पण एकाच व्यक्तिच्या जीवनाचे आपण खासगी आणि सार्वजनिक, असे भाग करीत असतो. कधी त्या दोन्हींत सुसंगती आढळते, कधी नाही. आढळली नाही तर तशा व्यक्तीला आपण दांभिक म्हणतो.

जीवन, व्यवहार आणि त्यांचे परस्परसंबध या विषयाला आधुनिक काळात एक वेगळाच आयाम प्राप्त झालेला आहे. तो म्हणजे विशेषीकरणाचा, स्पेशलायझेशनचा. एकेक क्षेत्राच्याच गरजा इतक्या वाढल्या आहेत, टोकदार झाल्या आहेत, की एका क्षेत्रातील माणसाला दुसऱ्या क्षेत्रात काय चालले आहे, याची दखल घेणेही अवघड होत चालले आहे.

अशा काळी परिपूर्ण जीवनाची, अष्टपैलू व्यक्तित्वाची आणि समग्रतेची आपण कल्पनाही करू शकत नाही. तत्त्वज्ञान, राजकारण, कला, क्रीडा या क्षेत्रांत मुक्त संचार करणारा श्रीकृष्ण; चित्रे काढणारा, वैज्ञानिक शोध लावणारा प्रबोधनकालीन लिओनार्दो द व्हिन्सी; रवींद्रनाथ टागोर आता परत होऊ शकतील का, हा अडचणीत टाकणाराच प्रश्न आहे. आजच्या काळात अष्टपैलुत्त्वाची व्याख्या एका क्षेत्रातील विशेष प्राविण्य आणि अन्य क्षेत्रांत साधारण संचार, अशीच करावी लागते.

परंतु मुद्दा एखाद्या व्यक्तीने जीवनाचे अनेक प्रांत आत्मसात करणे, हा नाही. जीवनाचे वेगवेगळे तुकडे हाताळता येण्याचा किंवा न येण्याचा प्रश्न नाही. जीवनाचे समग्रतेचे भान असणे, वेगवेगळी क्षेत्रे व व्यवहार एका जीवनसूत्रात गोवता येणे, हा खरा मुद्दा आहे. त्यासाठी जीवनाचे भाष्यकार होता आले पाहिजे. हे तत्त्वज्ञाचे, विचारवंतांचे काम आहे. उदाहरणार्थ चांगल्या कलावंताला कला आणि जीवन यांच्या संबंधाचे योग्य आकलन असेलच, असे नाही. त्यासाठी सम्यक जीवनभान असायला हवे. अशा भाष्यकाराला वाट पुसत इतरांचे जीवन सफल सुरळीत होऊ शकते.

संत तुकाराम महाराज हे मानवी जीवनाचे एक श्रेष्ठ भाष्यकार होते. संत हे जीवनविन्मुख होते, असा भल्याभल्यांचा गैरसमज असतो. या मंडळींचे मानवी जीवनाचे आकलनच संकुचित व एकदेशी असते. त्यामुळे त्यांचा फारसा विचार करण्याचे कारण नाही. तुकोबा जीवनाचे भाष्यकार होते; परंतु त्यांचे भाष्य हे पुस्तकी पंडिताने केलेले भाष्य नव्हते. किंबहुना, तत्कालीन विशिष्ट समाजरचनेमुळे ते पुस्तकी पंडित होऊ शकलेही नसते. अर्थात ही एक प्रकारची इष्टापत्ती म्हणायला हवी.

तुकोबांचा जन्म ज्या कुळात झाला ते पारंपरिक विठ्ठलभक्त वारकऱ्याचे कूळ होते. तुकोबांच्या मालकीची शेती होती, शिवाय विठ्ठलदेवाला इनाम असलेल्या शेतीची व्यवस्थाही ते पाहायचे. त्यामुळे शेतकऱ्याच्या वाटयाला येणारे सर्व अनुभव त्यांनी घेतले होते. 'मोडी पुसे पिटी ढोरे' असा बैलबारदानाचा अनुभव त्यांच्या गाठी होता. प्रत्यक्ष मशागतीचे बारकावेही त्यांना माहीत होते.

तुकोबांच्या घराण्याचे दुसरे वैशिष्टय म्हणजे गावाच्या महाजनकीचे वतन त्यांच्याकडे होते. ते सावकार व व्यापारी घराणे होते. गावच्या बाजारपेठेची व्यवस्था व देखरेख त्यांच्याकडे असे. व्यापारउदिमाच्या व्यवहारात काही कज्जे खटले झाले, तर त्यांचा निवाडा करण्याचे काम ते करीत. शेती, सावकारी, व्यापार व महाजनकी यांच्यामुळे त्यांचे घराणे परिसरातील एक सुखी, संपन्न व प्रतिष्ठित घराणे समजले जाई. विठ्ठलभक्तिमुळे धार्मिक नेतृत्वही त्यांच्याकडे अनायासे आले होतेच.

आयुष्याच्या पूर्वार्धात तुकोबांनी हा सर्व अनुभव घेतला. उत्तरार्धात महाराष्ट्रातील भयानक दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीला त्यांनी तोंड दिले. या आपत्तीत त्यांना स्वत:चे आप्त, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचा नाश होताना पाहावा लागला. मानवजीवनातील अनिश्चिततेचा प्रत्यय आला.

थोडक्यात सांगायचे, म्हणजे त्यांचे अनुभवविश्व हे विस्तीर्ण आणि समृध्द होते. पुढेही ते आणखी विस्तारत गेले. त्यांनी ईश्वरानुभूती मिळवली. कवित्व करताना निर्मितीप्रक्रिया अनुभवली. एका बाजूला या कवित्वाची वाढती लोकप्रियता, तर दुसऱ्या बाजूला त्याला प्रखर विरोध त्यांनी अनुभवला. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामधील सर्वांत लोकप्रिय; परंतु वादग्रस्त व्यक्ति म्हणजे तुकोबा होती. मावळ परिसरात परकीय सत्तेला ग्रहण लागले असून, शिवाजीचा उदय होत आहे, हेही त्यांना पाहायला मिळाले.

या सर्व अनुभवप्रक्रियेला तुकोबा जाणीवपूर्वक सामोरे जात होते. त्यावर विचारचिंतन करीत होते.

‘विचारावाचोन। न पावेजे समाधान।‘

स्वत:चे समाधान होईपर्यंत, खात्री पटेपर्यंत विचार करीत होते.

विचारिले आधी आपुल्या मनासी,

तुका म्हणे करू मनासी संवाद

अशी त्यांची आत्मसंवादाची प्रक्रिया सातत्याने सुरू होती.

सत्य-असत्यासी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता'

अशी त्यांची प्रामाण्यपध्दती होती. वेद, स्मृती, सदाचार आणि आत्मतृष्टी ही चार धर्मप्रमाणे परंपरेने सांगितली आहेत. त्यातील आत्मतृष्टी प्रमाण जवळ जवळ लुप्तप्राय झाले होते. तुकोबांनी त्याचाच अवलंब केला. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन, अशा दुहेरी सामग्रीमुळे तुकोबा जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. आपले अनुभव व चिंतन त्यांनी अभंगांमधून अभिव्यक्त केले. ते प्रतिभावंत कवी तर होतेच. आता एवढी तयारी असल्यावर त्यांची वचने विलक्षण प्रभावी ठरली नसती तरच नवल. गेली साडेतीन शतके तुकोबांनी दिलेली सामग्री मराठी मनाला पुरून उरली आहे.

तुकोबांनी वेगवेगळया जीवन व्यवहारांचे जे अनुभव घेतले ते त्यांच्या वचनांमधून कधी प्रत्यक्ष, तर कधी दृष्टान्तांच्या स्वरूपात प्रगट झाले आहेत. त्यांच्या अभंगांमधून कितीतरी व्यवहारसूत्रे आढळून येतात. त्यांना मराठी भाषेत म्हणींचा, वाक्यप्रचारांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यांचा उपयोग करणाऱ्यांना कित्येकदा ही वचने तुकोबांची आहेत, याचा पत्ताही नसतो; इतकी ती मराठी भाषेशी एकरूप झालेली आहेत. ती वचने म्हणजे नुसतेच लिहिणे बोलणे नटवण्यासाठी वापरलेले शोभादायक अलंकार राहिले नाहीत. ती भाषेतून थेट मराठी माणसाच्या विचारपध्दतीत व जीवनशैलीत उतरली आहेत. एखाद्या संकटाला सामोरे जाताना मराठी माणूस 'आलिया भोगासी असावे सादर', 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' , 'आले देवाजीच्या मना' असे उद्गार सहजगत्या काढतो, तो यामुळेच. ही मनाची एक चौकटच म्हणायला हवी. तुकोबांनी घडवलेली. केवळ भाषिक अभिव्यक्ती नव्हे, तर ती जणू वैचारिक वर्गवारीच होऊन बसली आहे.

रोजच्या सर्वसाधारण विविध जीवन व्यवहारांत तुकोबांचे सूत्ररूपाने मार्गदर्शन कसे होत असते, ते पाहा. वेगवेगळया व्यवहारांची ब्रीदवाक्ये, घोषवाक्ये, नीतितत्त्वे तुकोबा पुरवतात.उदाहरणादाखल पाहा. 'एकमेकां साह्य करू। अवघे धरू सुपंथ' हे सहकार क्षेत्रातले, 'बल बुध्दी वेचुनिया शक्ती ।उदक चालवावे युक्ती' हे जलनियोजनाचे, 'शुध्द बीजापोटी। फळे रसाळ गोमटी' हे बी - बियाणे निवडण्याबद्दल, 'असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे' प्रयत्नाची महती पटवून देते.

क्षणभंगुर हा येथील पसारा, नाशिवंत देह जाणारे सकळ । आयुष्य खातो काळ सावधान, चालले सोबती काय मानिली निश्चिती, अशी वचने अटळ भवितव्यतेची आठवण करून देऊन सतत सावध ठेवतात. 'दया तिचे नाव भूतांचे पाळण । आणिक निर्दलण कंटकांचे', 'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा' 'तुका म्हणे तोचि संत । सोशी जगाचे आघात', 'भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु' या सुत्ररूप व्याख्या मनात कायमच्या ठसून राहतात, 'नाही निर्मळ जीवन । काय करील साबण', 'गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले', 'तुका म्हणे ऐशा नरा । मोजूनी माराव्या पैजारो', 'तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधमे' अशा स्पष्टोक्ती प्रतिपक्षावर तुटून पडताना उपयोगी पडतात, मोले घातले रडाया । नाही आसू नाही माया, 'तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे । येरा गबाळाचे काम नोहे ', 'धनवंता लागी । सर्वमान्यता आहे जगी', 'पोट लागले पाठीशी । हिंडविते देशोदेशी ' या प्रकारची वचने जीवनामधील कठोर वास्तविकतेची जाणीव करून देतात. नरदेह दुर्लभ जाणा , आयुष्याचिया साधने । सच्चिदानंद पदवी घेणे यामुळे आपणाला मनुष्यजन्माची किंमत कळते. कुळी कन्यापुत्र होती जे सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा हा एक प्रकार, तर 'तुका म्हणे त्यांनी । केली मनुष्यपणा हानी ' हा दुसरा नमुना याबद्दल 'मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचा धोंडा येऊनी ठाके' हीच प्रतिक्रिया योग्य. 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ' हे एकूणच मानवी जीवनाचे नियमन करणारे अर्थनीतीचे सूत्र. 'तुका म्हणे जिणे । शर्तिविण लाजिरवाणे 'हा मिळमिळीत, ध्येयशून्य जगण्याचा धिक्कार. 'मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू ऐसे' हा आत्मविश्वासाचा प्रत्यय. 'भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊ माथा' यातील दिलदारपणा आणि प्रतिकारप्रवणता अशा तुकोबांच्या अनेक गोष्टी मराठी मनाने आत्मसात केलेल्या आहेत. जीवन ही एक समभूमीच आहे. तुकोबांच्या वाटयाला तर 'रात्रंदिवस युध्दाचा प्रसंग' आलेला. त्यामुळे जीवन संघर्षात तुकोबांकडून नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. पाइकाचे अभंग लिहून त्यांनी तत्कालीन मावळयांना राष्ट्रभक्तीची सूत्रे आणि गनिमी काव्याच्या खुब्या शिकवल्या आणि छत्रपतींचे स्वराज्यसाधनेचे काम सोपे केले. 'तुका म्हणे मरण आहे या सकळा । भेणे अवकळा अभये मोल ', असे मरणाच्या भीतीपेक्षा मरणाच्या प्रकारातील प्रतिष्ठा जपण्याचे महत्त्व सांगितले, 'शूर मिरवे रणांगणी । मरणीच संतोष 'असे नमूद करून 'शूरा साजती हत्यारे । गांढया हासतील पोरे ' म्हणत शेंदाड शिपायांची थट्टाही केली.

तुकोबांच्या निर्वाणासंबंधी अनेक वादप्रवाह आहेत. त्यांची चर्चा येथे प्रस्तृत नाही; पण मृत्यूवर मात केल्याची ग्वाही त्यांच्या अभंगांमधून अनेक ठिकाणी मिळते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अंत्यंसंस्काराच्या वेळी हे अभंग म्हणण्याची प्रथा आहे. 'आम्ही जातो आमच्या गावा । आमुचा रामराम घ्यावा', 'मरण माझे मरोनी गेले । मज केले अमर', 'आपुले मरण पाहिले म्या डोळा । तो झाला सोहळा अनुपम्य', मरणाहाती सुटली काया इत्यादी. या प्रसंगीचे अभंग अत्यंत हृद्य; परंतु तरीही या दु:खद प्रसंगाला धीराने सामोरे जाऊन त्याच्यावर मात करायला शिकवणारे आहेत. अमंगलाचे रूपांतर मंगलात करणारे आहेत.

मनुष्य आणि त्याच्या भोवतालची सृष्टी यांच्या नात्याविषयी तुकोबा अत्यंत जागरूक व संवेदनशील होते. त्यांचा 'बुडताहे जन न देखवे डोळा' हा माणसांबद्दलचा कळवळा सर्वज्ञात आहेच; परंतु मानवतेवर सजीव आणि निर्जीव सृष्टीशीही त्यांनी आत्मिक संबंध प्रस्थापित केलेला होता. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' किंवा 'झाडेझुडे जीव सोयरे पाषाणे' हे त्यांचे उद्गार आजच्या कोणत्याही पर्यावरणवादी संघटनांची ध्येयवाक्ये ठरावीत, असे आहेत.

तुकोबांचा सर्वसाधारण मराठी माणसांच्या जीवनव्यवहारांशी काय संबंध आहे, याची थोडी चर्चा केल्यावर कदाचित असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, की सर्वसामान्य याचा अर्थच मुळी सरासरी बुध्दिमत्तेचा व कर्तृत्वाचा माणूस. त्याला असा कोणाचा तरी आधार लागणारच. जे असाधारण आहेत, प्रतिभावंत आहेत, स्वयंप्रज्ञ आहेत त्यांना तुकोबांची काय मातब्बरी?

या बाबतची वस्तुस्थिती अशी आहे, की महाराष्ट्रातल्या अनेक प्रज्ञावंतांना, प्रतिभावंतांना आणि कार्यवंतांना तुकोबांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. लेखकांना शब्द आणि शीर्षके देण्यात तुकोबा सतत अग्रेसर राहिलेले आहेत; परंतु भाषिक पातळी ओलांडून त्यांनी विचार आणि स्फूर्तीही पुरविलेली आहे. अभंग या छंदावर त्यांची एवढी पकड होती आणि तो त्यांनी इतक्या परिपूर्ण अवस्थेला नेला, की 'अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची ' असे समीकरणच रूढ झाले व त्यानंतर हा छंद हाताळणाऱ्यांना तुकोबांना मार्गदर्शक व आदर्श मानणे जणू अनिवार्यच ठरले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 'अखंड ' या नावाखाली जे अभंग लिहिले, ते तुकोबांचे अभंग समोर ठेवूनच; पण तुकोबांचा फुले यांच्यावरील प्रभाव केवळ छंदशास्त्रीय वा भाषिक नव्हता. फुले यांच्या विचारांवर व जीवनशैलीवरही तुकोबांचा प्रभाव होता. तुकोबांकडे ते 'शेतकरी संत ' म्हणून पाहत. फुले यांचे तरुण सहकारी आणि अनुयायी कृष्णराव भालेकर हे तर पारंपरिक घरंदाज वारकरी होते. त्यांनी फुले यांचे तुकारामप्रेरित अभंगलेखन आणखी पुढे नेले. त्यात वैविध्य आणले. विशेष म्हणजे भालेकर आणि त्यांचे सत्यशोधक सहकारी हे सामाजिक आशयाचे अभंग वारकरी पध्दतीने दिंडी काढून टाळमृदंगाच्या साथीवर गात असत. भालेकर पुढे पत्रकार झाले. अर्थात पत्रकारितेमागचा त्यांचा (व तेव्हाच्या बहुतेक पत्रकारांचा) उद्देश जनजागृतीचा होता.उपदेशकाचा होता.ते त्यांचे जीवनध्येयच होते. तुकोबाप्रमाणे आपण उपदेशकाचे कार्य पत्करले आहे, असे ते सांगत. सत्यशोधकांनी व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अस्पृश्यांनी सुरू केलेल्या समाजजागृतीच्या कीर्तनामधून भर तुकोबांच्या अभंगांवरच असायचा. धर्मशास्त्राच्या पोथ्यापुराणांपेक्षा सदसद्विवेक बुध्दिला प्राधान्य द्यावे, हे सांगताना 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता 'या तुकोक्तीचा ते विशेष उपयोग करीत.

तुकोबांनी केवळ बहुजनांनाच साद घातली नाही, तर एकोणिसाव्या शतकामधील उच्चशिक्षित अभिजनांच्या आचारविचारांवरही तुकोबांचा मोठया प्रमाणावर प्रभाव पडला. प्रार्थना समाजाचे धुरीण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, वामन आबाजी मोडक, सदाशिवराव केळकर, न्यायमूर्ती चिंतामण नारायण भट, सर चंदावरकर यांचा येथे उल्लेख करता येईल. डॉ. भांडारकर तुकोबांना मानवजातीचे मार्गदर्शक मानीत. त्यांच्या मते तुकोबांचा धर्म हा बुध्द, येशू व महंमद यांच्या धर्माप्रमाणे विश्वव्यापक व्हायच्या पात्रतेचा आहे व तसा व्हायलाही हवा होता; परंतु त्या तिघांच्या धर्माला राजाश्रय लाभून मोठी प्रचारयंत्रणा उपलब्ध झाली, तसे तुकोबांच्या संदर्भात न घडल्याने त्यांचा धर्म मागे पडला. या धर्माला विश्वव्यापक करण्याचे प्रार्थना समाजाचे स्वप्न होते.

मात्र रानडे, भांडारकर 'तुकोबांचा उपदेश केवळ ईश्वरप्राप्तीचे साधन सांगणारा आहे एवढाच. म्हणजे पारमार्थिक आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. असे मानत नव्हते. तो एकूण मानवी जीवनाविषयी आहे. परमार्थाबरोबरच प्रपंचाविषयी, लौकिक व्यवहारांविषयीही आहे, ' असा त्यांचा दावा होता. रोजच्या जीवनात आपणाला तुकोबांकडून मार्गदर्शन होते, अशी त्यांची धारणा होती. न्यायमूर्ती रानडे तर न्यायनिवाडे लिहिताना अडले, की तुकोबांचे अभंग म्हणत. त्यातून त्यांना स्फूर्ती मिळे, मार्ग दिसे. केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक व आर्थिक क्षेत्रांमधील जीवनमूल्ये त्यांनी तुकोबांकडून घेतली. एखाद्या विशिष्ट पेचप्रसंगात निर्णय घ्यायची वेळ आली, तर तुकोबा अशा प्रसंगी कसे वागले असते, याचा विचार करून ते निर्णय घेत व कृती करीत. प्रार्थना आणि ब्राह्मो समाजांमुळे तुकोबांचे विचार बंगाल आणि गुजरात या प्रांतात पोचले व तेथेही त्यांचा प्रभाव पडला.

सत्यशोधक समाजाचे आणि प्रार्थना समाजाचे धोरण स्थूलमानाने राजकीय क्षेत्रात मवाळ म्हणता येईल असे होते. प्रार्थना समाजातील मंडळी सामाजिक सुधारणांच्या बाबतीतही नेमस्त होती. सत्यसमाज सामाजिक क्षेत्रात विशेषत: जातिभेदाच्या क्षेत्रात जहाल होता. याउलट चिपळूणकर, टिळक यांची परंपरा सांगणारे विचारवंत व कार्यकर्ते राजकीय स्वातंत्र्याच्या बाबतीत जहाल असले तरी, सामाजिक संदर्भात मात्र नेमस्तांपेक्षाही नेमस्त होते. या गटाकडून रामदासांची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला; पण तरीसुध्दा टिळकांसारखे खोलवर विचार करू शकणारे स्थिरबुध्दीचे विचारवंत तुकोबांचे महत्त्व जाणून होते. 'गीतारहस्य ' ची सुरवात व समारोप तुकोबांच्या वचनांनी होतोच; पण एकूणच 'गीतारहस्य ' त सर्वात अधिक अवतरणे तुकोबांच्या अभंगांची आहेत. 'ज्ञानोत्तर कर्म करायचे की नाही', या भारतीय तत्त्वज्ञानातील यक्षप्रश्नाला शांकरवेदान्ती संप्रदायाचे उत्तर 'नाही ' असे होते, तर लोकमान्य टिळकांचा कर्मयोग लोकसंग्रहासाठी ज्ञान्यानेही कर्म करावे, असा सांगू इच्छित होता. प्राचीन काळातल्या जनकादिकांची गोष्ट ग्रंथांत राहिली. आपल्या नजीकचे उदाहरण हवे असेल, तर 'तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता' असे सांगणाऱ्या तुकोबांचेच आहे. वस्तुत: टिळकांनी वापरलेला 'निष्काम कर्म ' हा शब्द सर्वांत प्रथम तुकोबांनी वापरलेला आहे आणि तोहि नेमका क्षत्रियांच्या युध्दकर्माच्या संदर्भात. 'हत्या क्षात्रधर्म । नव्हे निष्काम ते कर्म'. क्षत्रियांनी त्यांचा स्वधर्म पाळताना केलेली शत्रूची हत्या ही वस्तुत: हत्या नसून निष्काम कर्म आहे, असे तुकोबा सांगतात. भगवद्गीतेवरील हे खास देशी शैलीतील रोख ठोक भाष्य आहे. गीता आणि ज्ञानेश्वरीचे सार त्यात उतरले आहे. तुकोबांमधील हा पैलू महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विशेष भर देऊन पुढे आणला. 'तुका म्हणे गेला आळस किळस । अकर्तव्य दोष निवारला', 'कर्म अकर्म जळाले । प्रौढ तुका ते ठरले'.

कर्त्याचे चित्त शुध्द असेल तर 'अकर्तव्य नीत होय तया' अशा शब्दांत तुकोबांनी कर्मयोगाचे तत्त्वज्ञान थोडक्यात सांगितले आहे. लोकमान्य टिळकांची भाषणे आणि अग्रलेख तुकोबांच्या संदर्भांनी सजलेले दिसतात. सामाजिक - राजकीय बहुजनांनी व अभिजनांनी तुकोबांकडून हव्या त्या गोष्टी घेतल्या. बहुजनांच्या चळवळीतच अंतर्भृत असलेली दलितांची चळवळ पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृतांची चळवळ म्हणून स्वतंत्र केली. तिचा पहिला उच्चार त्यांनी 'मुकनायक' या पत्रातून केला. बहिष्कृत वर्ग आजपर्यंत मूक होता आता तो बोलला. आपली गाऱ्हाणी त्याने भीडभाड न ठेवता वेशीवर टांगली, तरच त्याला त्याचे हक्क मिळू शकतील. गप्प राहून कुणालाच काही मिळत नसते, हा 'मुकनायक' या नावामागचा आशय व्यक्त करणारे घोषवाक्य आंबेडकरांना तुकोबांच्या अभंगामध्ये मिळाले आणि ते 'मुकनायक' च्या अंकाच्या शिरोभागी झळकू लागले.

काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥

नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोन हित नव्हे ॥'

बाबासाहेबांनी लिहिलेले अग्रलेख । ('बहिष्कृत भारत', 'जनता' पत्रांमधून) आणि त्यांची मराठी भाषणे ज्ञानदेव - तुकोबांच्या संदर्भानी सजलेली असत. 'ज्ञानेश्वरी' आणि 'गाथा' हे दोन ग्रंथ सोडून सारे मराठी साहित्य समुद्रात बुडवले तरी मराठीचे फारसे नुकसान होणार नाही, असे त्यांचे प्रक्षोभक मत होते. ज्या आपल्या बहिष्कृत, अस्पृश्य बांधवांशी ते संवाद करीत होते, त्यांची भाषा ही ज्ञानदेव तुकोबांचीच भाषा होती. चिपळूणकर, आगरकर, केशवसुत त्यांना अज्ञातच होते. स्वत: बाबासाहेबांवर लहानपणी संतवाङ्मयाचे संस्कार झाले होते. खुद्द अस्पृश्यांमध्ये पंढरी, आळंदीची वारी करणारे, भजन - कीर्तन करणारे अनेक लोक होते. त्यामुळे आंबेडकरांच्या मुखातून सहजगत्या संतवचने निघत असत. पण येथेही मुद्दा केवळ अलंकारिक सजावटीचा नव्हता, आधार घेण्याचाही नव्हता. वैचारिकतेचा होता. बाबासाहेब गौतम बुध्दांच्या विचारांचा पुरस्कार करीत, त्या वेळी महात्मा गांधी अहिंसेचे तत्त्वज्ञान मांडत होते. साहजिकपणे आंबेडकरांना कोणीतरी विचारलेच, ''गांधीजी अहिंसा सांगतात, बुध्दही अहिंसा सांगायचे, मग तुम्हाला गांधी विचार का मान्य नाहीत ?'' आंबेडकरांनी उत्तर दिले ''तुकोबांनी अहिंसेची पूर्ण व्याख्या दिली आहे. 'दया तिचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्दलण कंटकांचे.' गांधीजी याचा अर्धाच भाग सांगतात. माझी अहिंसा तुकोबांची अहिंसा आहे.'' अर्थात बाबासाहेबांनी लावलेला गांधी विचारांचा अन्वयार्थ तेव्हा बहुसंख्य लोकांना मान्य नव्हता. महाराष्ट्रातल्या टिळकांच्या अनुयायांनी टिळकांना रामदासांचे अवतार मानले, तर गांधींच्या अनुयायांनी गांधींना तुकोबांचे रूप मानले. टिळकांचे काही अतिउत्साही अनुयायी हेच समीकरण स्वीकारत होते; पण उपहासाने. त्यांना तुकोबा व गांधी हे अहिंसक, अप्रतिकारक , दुर्बल वाटत. अर्थात स्वत: लोकमान्यांना वाटत नव्हते व त्यांच्या समतोल अनुयायांनाही वाटत नव्हते. 1924 मध्ये लोकमान्यांचे नातू (मुलीचा मुलगा) गजानराव केतकर यांनी 'किर्तन' मासिकातून 'दोन महात्म्यांची अकल्पित भेट' या नावाचा लेख लिहिला. त्यात मुंबई येथील गांधींच्या निवासस्थानी तुकोबा येतात, गांधींची त्यांची चर्चा होते. तुम्ही माझेच कार्य पुढे चालू ठेवले आहे. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, असे तुकोबा गांधींना सांगतात, अशी मजेदार कल्पना केलेली आहे. काँग्रेसच्या चळवळीत शिरलेल्या सत्यशोधक ब्राह्मणेतरांनी तर या वेळी तुकोबा-महात्मा फुले-महात्मा गांधी अशी परंपरा सांगायला सुरवात केली.

तुकोबांच्या आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय जीवन व्यवहारांचा प्रभाव असा सार्वत्रिक असताना व त्यामुळे मराठी माणसाचे विचारविश्व ढवळले जात असताना त्यांचे काव्य पूर्णत: दुर्लक्षित राहिले होते, असे मात्र नाही. विष्णू मोरेश्वर महाजनी आणि प्रा. वासुदेव बळवंत पटवर्धन हे इंग्रजी काव्याचे नामवंत अभ्यासक होते. पटवर्धन तर प्रार्थना समाजाने चालविलेल्या तुकाराम चर्चा मंडळाचे सभासद होते. इंदूरचे इंग्रजीचे प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे नावही या संदर्भात घ्यायला हवे. या मंडळींनी तुकोबांच्या काव्याचा विचार इंग्रजी कवितेच्या संदर्भात करून तुकोबांचे महत्त्व सांगितले. शेक्सपियर आणि ब्राऊनिंग ही दोन नावे त्यांना विशेष महत्त्वाची वाटली. अगदी अलीकडच्या काळात कविवर्य विंदा करंदीकर यांनी तुकाराम - शेक्सपियरची संवादकविता लिहिली असल्याचे आपणास ठाऊक आहे.

बा. सी. मर्ढेकरांनी नवकविता लिहून मराठी काव्यविश्वाला हादरे दिले. तुकोबांचे अनुकरण करीत त्यांनी नाठाळ गाथा लिहिली खरी; परंतु त्यांच्या काव्यविचारात आणि समीक्षेत त्याचे प्रतिबिंब पडले नाही. मर्ढेकरांकडून अपुरे राहिलेले कार्य अलीकडच्या काळात दिलीप पुरुषोत्तम चित्रे पूर्णतेला नेत आहेत. तुकोबांना मराठी काव्याच्या केंद्रस्थानी ठेवून, तुकोबांच्या कवितेच्या अनुषंगाने स्वतंत्र समीक्षा उभी करून, तिच्या तत्त्वांच्या आधारे इतर मराठी कवींची समीक्षा करणे, हे चित्रे यांचे वैशिष्टय आहे; पण आणखी महत्त्वाच्या मुद्दा म्हणजे चित्रे यांनी तुकोबांच्या कवितेकडे वैश्विक आणि तौलनिक परिप्रेक्ष्यातून पाहिले आहे. तुकोबांशिवाय आपण कीर्तनाची कल्पना करू शकत नाही, असे आर्यासम्राट मोरोपंतांनी पूर्वी म्हटलें होते. तुकोबांशिवाय मराठी कविता अपुरी राहील, ही जाणीव अनेक मराठी कवींना व समीक्षकांना होती; परंतु चित्रे यांना तुकोबांशिवाय कविता हा वाङ्मयप्रकारच अपूर्ण वाटतो. चित्रे यांच्या या भूमिकेनुसार तुकोबा विश्वकवी ठरतात. तुकोबा हे राष्ट्रकवी असल्याचे विधान सर अलेक्झांडर ग्रँट यांनी एकोणिसाव्या शतकाच्या सहाव्या दशकात केले होते. चित्रे तुकोबांना वैश्विक पातळीवरून पाहत आहेत. महाकवी मानवी अस्तित्वाच्या गाभ्याला भिडून मानवी जीवनावर भाष्य करीत असत. ऐतिहासिक व भौगोलिक योगायोगामुळे त्याला ते कोणत्या तरी काळात, कोणत्या तरी देशात व साहजिकच त्या काळातील त्या देशाच्या भाषेत त्याला ते करावे लागते; पण अनुवादांद्वारे या योगायोगावर, तात्कालिकतेवर व एतद्देशीयतेवर मात करून या कवितेतील मानवी अस्तित्वाची जाणीव व तिच्यावरील भाष्य कोणत्याही प्रकारांच्या लोकांपर्यंत पोचवता येते, असे चित्रे यांचे म्हणणे व अनुभव आहे. ते स्वत: तुकोबांच्या कवितांचे अनुवाद इंग्रजीत करतात. त्यांच्या इंग्रजी अनुवादांवरून अन्य युरोपियन भाषांमध्ये तुकोबांचे आणखी अनुवाद सिध्द होत आहेत. काव्याबरोबरच इतर कलामाध्यमे हाताळण्याचाही त्यांचा इरादा आहे. तुकोबांवरील इंग्रजी चित्रपट काढण्याच्या गडबडीत सध्या ते आहेत.

हॉलंडमध्ये स्थायिक झालेले मराठी चित्रकार भास्कर हांडे यांनी तुकोबांच्या अभंगांवर अमूर्त शैलीत चित्रें काढली असून , या अभंगांचा अर्थ ते रंगरेषांच्या माध्यमातून युरोपच्या कलादालनांतील प्रदर्शनांमधून तेथील रसिकांपर्यंत पोचवत आहेत.

मराठी कवितेत विद्रोह आणि क्रांती यांची जाणीव व्यक्त करणारे आंबेडकरी वारशाचे महत्त्वाचे कवीही तुकोबांचा वारसा मानतात. दीनबंधू शेगावकर, बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ ही त्यांच्यापैकी महत्त्वाची नावे, बाबूराव बागूल म्हणतात,

अरे ती माझी बंदूक तरी द्या

नाही तर तुक्याची वीणा तरी द्या

गावोगावी जाईन म्हणतो.....

या वीणेवर क्रांतीची गीते गाईन म्हणतो.

मानवी जीवनात क्षमा आणि नम्रता यांचे महत्त्व प्रतिपादन करणारा कवी क्रांतीचीही प्रेरणा देऊ शकतो. याचे कारणच मुळी त्याला मानवी जीवनाच्या व्यापकतेचे, व्यामिश्रतेचे आणि समयाचे भान होते. ग्वाल्हेर घराण्यात चतुरंग'नावाचा एक प्रकार गाण्यात येतो. त्यात ख्याल, टप्पा, ठुमरी, तराणा या चारही बाबींचा अंतर्भाव असतो; पण हे काम तितक्या तयारीच्याच गायकाचे आहे. तुकोबांचे काव्य हे असे आहे. त्यात मानवी जीवनाचे आभाळ त्यांच्यातील ग्रह, तारे, नक्षत्रे, धूमकेतूंसह प्रतिबिंबित झालेले आहे.

तुकोबा मानवी जीवनाचे महाभाष्यकार आहेत.

संत तुकारामांच्या अभंगांचा शैलीवैज्ञानिक अभ्यास

डॉ. दिलीप धोंडगे

तुकोबांच्या अभंगवाणीचा अभ्यास करण्यासाठी शैलीलक्ष्मी अभ्यासपध्दतीची उपयोजना केली आहे. शैलीमीमांसा (stylistics) ही युरोपात विकसित झालेली अभ्यासपध्दती असल्यामुळे तिचा वापर कसा करायचा असा प्रश्न उपस्थित होणे शक्य आहे. ही पध्दती युरोपात विकसित झालेली असली तरी साहित्याची जी मूलभूत तत्त्व व सार्वत्रिक तत्त्वे आहे त्यांच्याशी संबंधित आहे. शैलीमीमांसा ही साहित्यकृतिकेंद्री अभ्यासपध्दती असल्यामुळे संबंधित साहित्यकृतीकडून तिला आवश्यक ती गमके मिळत असतात. साहित्यकृती ज्या परंपरेशी संबंधित असते, ती परंपरा व कलाकृती यांनी परंपरेशी संबंधित राहून पृथगात्म वैशिष्टे टिकविणे, यामुळे संबंधित परंपरेचे व्यापक कलात्मक स्वरूप वाङ्मयव्यवहारासंबंधी काही एक भान देते. साहित्यकृती ही भाषेच्या साह्याने साकार होते व भाषा या माध्यमाच्या मुखानेच बोलते, तेव्हा भाषेच्या अभ्यासाची तत्त्वेही सार्वत्रिक व त्या त्या भाषेच्या जडणघडण व वर्तनव्यवहाराशी पृथगात्मपणे संबंधित असतात. म्हणून भाषाविज्ञानातून मिळालेली तत्त्वे ही साहित्यकृतीच्या आविष्काराची पध्दत समजून घ्यायला उपयोगी पडतात. शैलीमीमांसा ही साहित्यकृतीची कलाकृती म्हणूनच दखल घेते. यामुळेच कलाकृतीची जडणघडण ज्या तत्त्वांनी होते, ती तत्त्वे व कलाकृतीचा रुपांतर्गत पसारा याला महत्त्व प्राप्त होते. कलाकृतीतील आशयाचाच केवळ शोध घेण्याने अगदी प्रारंभीच कलाकृतीचे कलापण नाकारले जाते. कलाकृती आशयसंपन्नच असते; पण त्या आशयाची अभिव्यक्ती कलेच्या मुखाने होत असते व कलाकृतीचा अवघा देहच कलारूप असल्यामुळे ती अनेक मुखांनी बोलत असते. हे लक्षात घेतले नाही तर झाडाच्या नादात जंगलाचे भान सुटावे तसे आशयाच्या नादात कलाकृतीच्या कलेच्या पसाऱ्याचे भान सुटते व तिच्या सौंदर्याची प्रतीती होणे अशक्य होते. आशयही सत्य व त्या आशयाला मंडित करणारा पसाराही सत्य ही कल्पना एक प्रकारे चिद्विलासवादीच आहे.

कुठल्याही श्रेष्ठ साहित्याचे नवनवीन द्दृष्टींनी अध्ययन होणे हे साहित्यनिर्मिती व साहित्यसमीक्षा या उभयविध व्यवहारांसाठी आवश्यक असते. संतसाहित्याच्या बीजभूत श्रेष्ठतेमुळे व कसदार विपुल निर्मितीमुळे नवीन अभ्यासपध्दतींची कसोटी संतसाहित्याचा अभ्यास करण्यानेच लागू शकते याची टीकाकारांना खात्री पटलेली आहे. तसेच संबंधित साहित्याचे नित्यनूतनत्व प्रगट करण्याची क्षमता लक्षात यावी यासाठी नवीन अभ्यासपध्दतीच अभ्यासकांना जुन्या अभ्यासपध्दतींच्या कचाटयातून मुक्त करीत असतात. शेक्सपीअरच्या संदर्भात लिहिताना टी. एस. एलियट यांनी म्हटले आहे की Meanwhile, the reader may ask himself why need I be conscious of all these things in Shakespeare’s plays of which Shakespeare himself was perhaps not quite concious ?Why I cannot enjoy the play simply, as a contemporary would have done ? The answer is of course, that we cannot escape from the criticism of the past except through the criticism of the present. संतसाहित्याच्या अभ्यासाबाबतही हेच म्हणता येईल.

शैलीमीमांसेसाठी भाषाविज्ञानाची मदत होते; पण मूल्यमापनात त्याचा सहभाग नसतो. भाषाविज्ञान समीक्षेसाठी स्तरावर कार्य करीत नाही तर मूल्यपातळीवर जाणवलेल्या व्यवस्थापूर्व प्रतिसादांचे भाषावैज्ञानिक विश्लेषण करून मूल्यमापनासाठी ते आधारभूमी तयार करून देते. मूल्यमापन, मूल्यात्मकता हे समीक्षेचे स्तर आहेत. शैलीमीमांसा या स्तरांमध्ये येते.

तुकोबांच्या अभंगवाणीची शैलीमीमांसा करताना मी जो विचार केला, त्याचे दिङ्मात्र दर्शन प्रस्तृत निबंधात करीत आहे. विस्तारपूर्वक शैलीमीमांसा मी अन्यत्र केली आहेच.

तुकोबा हे वारकरी संप्रदायातले संत. म्हणून वारकरी परंपरेच्या संदर्भात विचार करणारी 'वारकरी शैली' ही संकल्पना मांडली आहे. साहित्येतिहासात युग ही संकल्पना स्वीकारली जाते. वाङ्मयेतिहासात वाङ्‌मयीन परंपरांचा शोध घेण्यासाठी युग ही कल्पना वापरली जाते, तर शैलीविज्ञानात एखाद्या विशिष्ट काळातील भाषेचे सर्वसाधारण शैलीगत स्वरूप म्हणून युगशैली ही संकल्पना वापरली जाते. युगशैली व वारकरी शैली या संकल्पनांत काही भेद आहे काय ? युगशैली ही संकल्पना इतिहासाधिष्ठित आहे. युगशैलीचे स्वरूप हे सर्वसाधारण असते. वाङ्मयेतिहासात युगशैली निश्चित करीत असतांना वाङ्मयीन भाषेची कालाधिष्ठित वैशिष्टे केवळ नोंदवली जातात. युगशैली कालखंडाशी संबंधित असल्यामुळे त्या त्या विशिष्ट कालखंडात जे जे काही बरेवाईट लिखित साहित्य असेल, ते सगळेच त्या काळातील वाङ्मयीन सामग्री ठरते. एखाद्या विशिष्ट कालखंडाची एकूणच सर्जक प्रवृत्ती म्हणजे त्या युगाची शैली असे म्हणायला हरकत नाही.

शैलीचा विचार हा केवळ भाषेशीच निगडित ठेवता येत नाही. युगशैलीची संकल्पना ही आंतर व्यक्तिनिष्ठ, व्यक्तिबोलीबाह्य व संस्कृतीइतकी वरचढ असते. युगशैलीत विशिष्ट युगातील सर्वच लेखनाचा समावेश होत असल्यामुळे, ह्या सर्व लेखनाला सामावून घेणारी, ह्या लेखनाचे विविध गटांत वर्गीकरण करून व्यवस्था लावणारी अशी ही युगशैलीची संकल्पना दिसते. या विशिष्ट कालखंडात काही लेखनप्रकार प्रभावी असतील तर काही खचितच वापरले गेलेले असतील. यावरून या कालखंडातील प्रमाणके व चलघटक निश्चित होतील. ही प्रमाणके चलघटक शैलीनिर्देशक असतात. एन्केव्हिस्टने संहितानिष्ठ संदर्भ व संहिताबाह्य संदर्भ असे भाग करून त्यात समाविष्ट होऊ शकणाऱ्या विविध चल घटकांची नोंद करणारा एक नमुना दिला आहे.

वारकरी शैली ही संकल्पना परंपराधिष्ठित आहे. परंपरेमध्ये ऐतिहासिक कालखंडापेक्षा एक सलग कालपरंपरा अनुस्युत आहे. त्यामुळे विविध कालखंडांतून वर्तणारी एक सलग परंपरा इथे लक्षात घ्यावी लागते. शैलीविज्ञानातल्या युगशैली या कल्पनेचा यामुळे कालिक विस्तार होऊन अनेक समान चल घटकांचा त्यामुळे प्रत्यय येतो.

वारकरी शैली म्हणजे वारकरी संप्रदायाच्या साहित्याची शैली. निवृत्तिनाथ ते निळोबा या कालखंडातील संबंधित संतांचे हे साहित्य आहे. एवढा विस्तृत कालखंडातील हे साहित्य प्रकृतिदृष्टा एकजिनसी आहे. संत बहिणाबाईंनी देवालयाच्या इमारतीचे रूपक कल्पून वारकरी संप्रदायाचे जे वर्णन केले आहे ते एकजिनसीपणाच सूचित करणारे आहे.

वारकरी शैलीचा विचार करतांना जसा वारकरी महत्त्वाचा घटक ध्यानात घ्यावा लागतो तसे साहित्यबाह्य घटकही ध्यानात घ्यावे लागतात. यांत वारकरी संप्रदायाचे दैवत, आचारधर्म, उपासनापध्दती, पेहराव वगैरे गोष्टींचा समावेश होतो. साहित्य व साहित्यबाह्य घटक यांना जोडणारा तत्त्वज्ञान हा घटक आहेच. वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल, त्याचे विविधांगी निराळेपण, आचारधर्मांतर्गत वारी, भजन, नामस्मरण, कीर्तन यांचे व्यवच्छेदकत्व यामुळे या संप्रदायाला शैलीगत परिमाणे प्राप्त होतात. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञानही पूर्वकालीन तत्त्वज्ञानांपेक्षा निराळे आहे. हा संप्रदाय शुध्द भक्तिच्या परिमाणात आहे. भक्ती ही मुळात आहेच, ती काही वैयक्तिक भावना नाही. परमेश्वर स्वप्रीतिस्तव विलास करतो. याचा अर्थ प्रेम हे त्याच्या अंगभूत आहे. त्या प्रेमाला आस्वादण्यासाठी भक्तीची गरज आहे. भक्तीनेच केवळ प्रेम व प्रेमाची रूची आस्वादता येते. ज्ञानी फक्त स्वसंवित्तीच पहातो, शैव फक्त शक्तीच जाणतो; पण दोन्हींचा जो गाभा ती परमभक्ती तिच्यावर आमची दृष्टी आहे, असे ज्ञानदेव सांगतात. परमात्मा हा मानवी जीवनाचा जिव्हाळा आहे. त्याला बाहेर काढायचे म्हटले तरी अशक्य. अशा वेगळया नसलेल्या परमेश्वराचा अनुभव सतत जागवण्याचा उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण. नामस्मरणामुळे जीवनाच्या अधिष्ठानी असलेला परमात्मप्रेमाचा झरा सतत उचंबळत ठेवता येतो. परमेश्वराला जीवाच्या भक्तीची उत्कंठा असल्यामुळे तो सगुण साकार होतो. यासाठी जीवाने भक्त होऊन भक्तीच्याच वाटला लागावे असे ज्ञानदेव आवाहन करतात. या चिद्विलासवादी तत्त्वज्ञानाचे निनाद तुकोबांच्या अभंगवाणीत उमटणे स्वाभाविकच. एक प्रातिनिधिक उदाहरण पाहूः

तरूवर बीजा पोटीं । बीज रूवरा सेवटीं ॥१॥

तैसे तुह्मां आह्मां जाले । एकीं एक सामावलें ॥धृ॥

उदकावरील तरंग । तरंग उदकाचे अंग ॥२॥

तुका म्हणे बिंबछाया । ठायी पावली विलया ॥३॥

(अभंग क्र. ३०६९)

चिद्विलासवादाचा पाया क्रिडा आहे. प्रभूची स्वप्रीतिस्तव क्रीडा म्हणजे हे जगत. या दृष्टीकोनामुळे जगाकडे पहाण्याचा एक खेळकर दृष्टीकोन प्राप्त होतो व तोच खेळकरपणा साहित्यातून आविष्कृत होतो. काव्याची प्रकृती क्रीडामय व त्याला क्रीडामय तत्त्वज्ञानच अभिव्यक्त करायचे, म्हणून ज्ञानदेवादी संतांचे काव्य हे क्रीडामय आहे. विविध खेळांची रूपके, विश्वव्यापी भरगच्च प्रतिमानसृष्टी, लोककलेतील रचनाबंध, संसाहित्याला लाभलेली गायन - वादन - नृत्य यांची परिमाणे व त्यांचे सामूहिक पातळीवरील सादरीकरण या सर्व गोष्टी क्रीडामयताच सुचवितात. अशी ही वारकरी शैली मराठी संस्कृतीची शैली असल्याचे संस्कृतीच्या आघाडीच्या अभ्यासकांनी सिध्द केले आहे.

तुकोबांच्या अभंगांचा रूप व नादमयता या दृष्टीने विचार करता येऊ शकतो. 'अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची' हे निर्धारक उदाहरण आहे. तुकोबांच्या अभंगरचनेचे शैलीगत विशेष शोधण्याच्या दृष्टीने भाषावैज्ञानिक तत्त्वांचा उपयोग होऊ शकतो, कारण वृत्त किंवा छंद यांचे रूपांतर्गत खूप भाषिक विशेष असतात असे रोमन याकोबसन यांचे म्हणणे आहे. काव्यबंधात कालौघात बदल न होता सातत्यच राहिले आहे. रूपक (Metaphor) आणि लक्षणा (Metonymy) व समांतर - न्यास (parallelism) म्हणतात. आघात, अक्षर किंवा मात्रा यांच्या आवर्तनाला वृत्त किंवा छंद असे म्हणतात. विविध प्रकारच्या स्वर व व्यजनात्मक आवर्तनाला यमक, प्रास, स्वरावृत्ती किंवा व्यंजनावृत्ती असे म्हणतात.

ओवी हा छंद आघातप्रधान आहे. संख्येच्या निर्बंधापासून मुक्त असे गद्यलेखनाचे विचारप्रधान आंदोलनतत्त्व व पद्यातील यमकतत्त्व या दोहोंच्या मिश्रणाने हा छंद तयार झालेला असल्याचे डॉ. ना. गो. कालेलकर यांचे म्हणणे अभंग या छंदासही लागू पडते. अभंग हा तालगेय आहे व ही तालगेयता भावगर्भ विचारांदोलननिष्ठ आघाताशी निगडित आहे . उदाहरणार्थ

भवनिर्दाळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥

भवनिर्दाळण व विठ्ठल तसेच नाम व काम यांतील अनुक्रमे आघाततत्त्वयुक्त व यमकतत्त्वयुक्त परस्परसंबंधांमुळे एक अर्थप्रधान रचनाबंध तयार होतो तसेच त्याची एकाच ओळीत पुनरावृत्ती झाल्यासारखी वाटते.

विठ्ठल भवनिर्दाळण नाम । (नाम) विठ्ठल नासी काम ॥

या वाक्यपातळीवरच्या समांतर-न्यासामुळे (syntactic parallelism) अर्थपातळीवरील समांतर-न्यास (syntactic parallelism) कळतो. ओवीघटकांच्या सममूल्य मांडणीमुळे (equivalence) हे घडते. ध्रुवपद हे अभंगप्रबंधाचे वैशिष्टय आहे. ते गायनाचे व अर्थाचेही एकक आहे. ध्रुवपद घोळवले जाते याचा समांतर - न्यास म्हणून विचार अर्थपूर्ण ठरतो. आवर्तनाचे अंग म्हणून यमकतत्त्वाचा विचार महत्त्वाचा असतो. स्वरावृत्ती व व्यंजनावृत्ती यामुळे निर्माण होणारी नादमयता यमकतत्त्वाचाच भाग असते. ध्वनिपरिणामांच्या दृष्टीनेही यमकाचा विचार महत्त्वाचा ठरतो. यमकान्वित पदांतीत साधर्म्य व वैधर्म्य यांच्या द्वारा स्पष्ट होणाऱ्या सामीप्यमूलक संबंधांचे विश्लेषण उद्बोधक ठरते. उदाहरणार्थ

तुका ह्मणे माझे । हेचि सर्व सुख ।पाहीन श्रीमुख । आवडीने ॥

यातील पहिले दोन चरण एका भावबंधाचे निदर्शक, तर तिसरा चरण दुसऱ्या भावबंधाचा निदर्शक आहे. या दोहोंचा अन्वय यमकाने साधला आहे. याला सामीप्य म्हणायचे. श्रीमुख आवडीने पहाणे हेच सर्व सुख असे तुकोबा म्हणतात. श्रीमुख या घटकानयवावे परमेश्वर दर्शनाचा, परमेश्वरप्रेमानुभवाचा भाव सूचित होतो. यामुळे लक्ष्यार्थाची जाणीव होते.

दगडाची नाव आधीच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥

दगड व जड या यमकान्वित पदांत गुणीगुणभाववाचक अन्वय स्पष्ट आहे. हा साधर्म्यमूल संबंध आहे. दगडाची नाव व तारू जाणे यातील अप्रत्यक्ष अन्वय यमकामुळे स्पष्ट होतो. दगडाची नाव व काय तारू जाणे यात उघडच विरोध आहे. दगडाच्या नावेला पुन्हा दगडच तारायचे आहेत. हे कसे शक्य आहे ? अर्थातच अशक्य. अयाचितवृत्ती असलेल्या गोसाव्याच्या संदर्भात तुकोबांचे वरील वाक्य लक्षात घेतले तर त्याचे रूपकीय कार्य खूपच ठसते. आता मूलतः वैधर्मीय असलेले व यमकाने समन्वित झालेले एक उदाहरण पाहूः

सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वतांएवढें ॥

जवापाडे व पर्वताएवढे यांतील अंत्ययमकामुळे नातेसंबंध स्पष्ट होऊन ही पदे ठळक होतात. परिणामतः सुख व दुःख ही पदेही ठळक होतात. सुखाने खरे तर पर्वताएवढे असावे व दुःखाने जवाएवढे . पण ती आकांक्षा फोल ठरते. उलट जवाएवढया सुखासाठी पर्वताएवढे दुःख पहावे लागते. तुकोबांच्या अभंगावाणीतील विविध प्रकारच्या वाक्यपातळीवरील समांतर - न्यासाची उदाहरणे विश्लेषिता येऊ शकतात. काही उदाहणांतीत व्याकरणिक प्रवर्गांचे आवर्तनही विश्लेषित करता येऊ शकते. उदाहरणार्थः

ढेंकणाचे संगे हिरा जो भंगला । कुसंगे नाडला तैसा साधु ॥

ओढाळाच्या संगे सात्त्वि नासली । क्षण एक नाडती समागमें ॥

डांकाचे संगती सोने हीन जाले । मोल ते तुटले लक्ष कोडी ॥

नामपदबंध अ पूरक अ .... असे हे व्याकरणिक प्रवर्गांचे आवर्तन आहे. या समांतर - न्यासामुळे तळमळ, उत्कटता, उत्स्फूर्तता, संवाद साधणे, लोकांना शहाणे करण्याची खटपट, भक्तांच्या ठायी असणारी आर्तता, उपास्य दैवतावरचा दृढ विश्वास, परमेश्वराशी संवाद साधण्याची धडपड वगैरे काही गोष्टींचा प्रत्यय येतो. तुकोबांची भक्त म्हणून आर्तता व जगदुध्दाराची तळमळ या दृष्टीने त्यांच्या कवितेतील आर्वतन महत्त्वाचे ठरते.

तुकोबांच्या काव्यात्म वाक्याचा विचार करतांना काही एक क्रम निश्चित करावा लागतो. प्रथम पदांची वैशिष्टये ध्यानात घ्यावी लागतात. कारण पदे ही वाक्यात कार्यशील होतात. पदविन्यास हा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याजोगा भाग आहे. व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या भाषेतील पदांचा विकार (Inflection) व सिध्दी (Derivation) या दोन स्तरांवर व्याकरणिक विचार करता येतो. विकारजन्य पदे ही वाक्यरचनेच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. एकाच रूपघटकाची विविध व्याकरणिक विकरणाने पुनरावृत्ती झालेली दिसते. तिचा पदपातळीवर विचार, एकाच पदाच्या व व्याकरणिक विकरणाने मिळणाऱ्या परस्परविरोधी पदांच्या जोडया व त्यांचा काव्यात्म वापर, काही पदांची संक्षिप्त व वैशिष्टयपूर्ण रूपे, अभंगांच्या एकूण परिवेशातच उलगडणारी दुर्बोध पदे, बोलभाषेतील पदे, नामधातू व क्रियानामे यांची निर्मिती व वापर, सामासिक पदे, त्यांचे विभाजन, संबंधी सर्वनामांचा विलोप, सामासिक शब्दांतील उत्तरयोगी पूर्वयोगी करणे, अभ्यस्त शब्दांचा वैशिष्टयपूर्ण वापर, बोलभाषेतील शब्दांचा मुक्त वापर इत्यादी बाबींची पदविन्यासाच्या अंगाने सोदाहरण चर्चा करता येऊ शकते. तत्सम संस्कृत शब्दांपासून बोलभाषेत वापरल्या जाणाऱ्या शब्दांपर्यंत विविधता असणारा असा तुकोबांचा शब्दनिधी आहे.

तुकोबांच्या काव्यात्म वाक्याची बरीच वैशिष्टये कळतात. तुकोबांच्या अभंगावाणीतील काव्यात्म वाक्य कमालीचे लवचिक आहे. व्याकरणिक वाक्यातील काटेकोरपणा मोडल्यामुळे ही लवचिकता येते. वाक्यात सर्वसाधारपणे ज्या व्याकरणिक घटकांची उपस्थिती अभिप्रेत असते, त्या घटकांचा विलोप हे तुकोबांच्या काव्यात्म वाक्याचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे. या विलोपित पदांमुळे वाक्यातील उर्वरित पदे लक्षवेधी ठरतात. काव्यात्म वाक्य बंदिस्त असते. या संघटनतत्त्वामुळे पदांचे परस्परसंबंध निश्चित होतात. त्यामुळे वाचकाला विलोपित पदांचा बोध होत होतो. परिणामतः वाचकाच्या सजर्क सहभागाला वाव मिळतो. छंद किंवा वृत्त या संघटनतत्त्वांमुळे वाक्य लयबध्दही होते. साहजिकच यति व विरामाच्या जागा निश्चित होतात. यति व विरामामुळे काव्यात्म वाक्य अर्थदृष्टया नियंत्रित होते.

तुकोबांच्या काव्यात्म वाक्यातील पदक्रम एका बाजूला स्वतंत्र आहे व दुसऱ्या बाजूला तो छंदाच्या परिघात यमक या संघटनतत्त्वाशी बांधील आहे. पदक्रम स्वतंत्र असल्यामुळे यमक या संघटनतत्त्वाशी कृत्रिमपणे बांधील नाही; तर लयतालपोषक व अर्थपोषक असा नैसर्गिक आहे. म्हणून पदक्रमभंग हे तुकोबांच्या काव्यात्म वाक्याचे वैशिष्टय आहे. काव्यात्म वाक्यात अन्वय लावणे अवघड ठरावे इतका हा पदक्रमभंग आहे. मराठी या बहुतांश प्रत्ययप्रधान व काहीशा शब्दक्रमप्रधान (काव्यातील दर्शन) भाषेच्या मुक्त व लवचिक व्यवस्थेचा वापर करून घेतल्याने व त्याला विविध संघटनतत्त्वे असणाऱ्या अभंग या छंदाची जोड मिळाली त्यामुळे लवचिक पण बंदिस्त असे एकात्म दर्शन घडते.

संभाषणत सर्वच पदघटकांची आवश्यकता नसते. यामुळे संभाषण मितभाषी असते. तुकोबांची कविता ही या अर्थाने बोलणारी कविता आहे. ती अभंग या छंदातून बोलते म्हणून ती गाणारीही आहे. परिणामतः तिचे लिखित रूप सहजासहजी उमगत नाही. वाचकाला आपली भाषिक व साहित्यिक क्षमता वापरून सर्जकतेने सहभागी व्हावे लागते.

समांतर - न्यास व अधिअनुचलन (parataxis) ही तुकोबांच्या अभंगांतील काव्यात्म वाक्याची वैशिष्टे आहेत. समांतर - न्यासाची चर्चा यापूर्वी केली आहेच. अधिअनुचलनाची दोन विविध उदाहरणे पाहू.

बैसों खेळूं जेवूं । तेथे नाम तुझे गाऊं ॥ (७३३)

अधिअनुचलन सुसंगत विचार

राम वेळावेळा आम्ही गाऊं ओविये । दळितां कांडिता जेवितां गे बाइये ॥ (११०६)

एका चरणार्धात अधिअनुचलन व दुसऱ्या चरणार्धात त्याच्याशी विरोधी विचार असतो. उदाहरणार्थः

जन धन तन । केले तृणाही समान ॥ (५२१)

अधिअनुचलन विरोधी विचार

जन धन तन । वाटे लेखावें वमन ॥ (१८८५)

अधिअनुचलनात जेवढे घटक असतात, त्यातील एकेका घटकाचे स्वतंत्र वाक्य होऊ शकते. म्हणून संबंधित वाक्यात गर्भित समांतर - न्यास (Implied parallelism) असतो. वरील उदाहरणांतील वाक्यांमुळे अभिप्रेत विषयाचे प्रस्तुतीकरण ठाशीवपणे होते. जे तळमळीने, उत्कटतेने म्हणावयाचे आहे, ते पुनरावृत्तीमुळे ठसते. प्रतिपक्षात्मक मांडणीचा समांतर - न्यास हे तुकोबांच्या काव्यात्म वाक्याचे व्यवच्छेदक वैशिष्टय आहे. वास्तव हे कधीच एकांगी नसते. मात्र त्याचे आपले आकलन एकांगी असते. परिणामतः आदर्श आणि व्यवहार यापैकी कुठल्यातरी एकाच अंगाचा एकांगी पुरस्कार होतो. यामुळे व्यक्तीच्या तसेच सामाजिक जीवनात संतुलन राहात नाही. सर्वसाधारणपणे पारंपरिकतेने आदर्शाच्याच अंगावर भर दिला जात असल्यामुळे नीतीचाच एक भाग असलेल्या व्यवहाराचे भान राहात नाही. तुकोबा आदर्श व व्यवहार यांची सांगड घालून ते भान आणून देतात. एकाच पदाची पुनरावृत्ती होऊन साधलेल्या गर्भित - वाक्य समांतर - न्यासाच्या उदाहरणांत क्रियापदांच्या पुनरावृत्तीमुळे अधीरता, ठामपणा, निषेध, कळकळ या मनोवृत्तींचा बोध होतो. जगदुध्दाराच्या तळमळीपोटी तुकोबा संवाद साधतात. संबोधनार्थी, आज्ञार्थी, विध्यर्थी, प्रश्नार्थी अशा वाक्यांद्वारा तुकोबा संवाद साधतात. अभंगाच्या परिवेशात अशी वाक्यें ही काही वैशिष्टये. अजूनही काही वैशिष्टये मिळू शकतात. तुकोबांच्या काव्यात्म वाक्याचा महावाक्याच्या संदर्भात विचार करता येऊ शकतो.

तुकोबांच्या प्रतिमासृष्टीचा अभ्यास करताना नवी दृष्टी वापरता येऊ शकते. प्रतिमा ही नवीन समीक्षेतील संकल्पना आहे. तिचे उपयोजन कोणकोणत्या अर्थाने होऊ शकते हा विचार महत्त्वाचा आहे. सर्वच संतांच्या साहित्याचे प्रधान आशयसूत्र हे भक्तितत्त्व हे आहे. भक्तितत्त्व हे अतींद्रिय अनुभवाला इंद्रियांकरवी भोगायला लावणारे तत्त्व आहे. मनवाचातीत अशा ईश्वरानुभवाला मनगोचर वा इंद्रियगोचन करण्यासाठी विविध लौकिकानुभवातील उदाहरणांनी, दृष्टांतानीच हे कार्य होते. अनुभव इंद्रियसंवेदन करायचा तर वाक्चातुर्य हे हवेच. वाक्चातुर्य म्हणजे प्रतिभेच्या बळाने निर्मिलेले विश्व. इथे भक्तितत्त्व व काव्यतत्त्व यांची एकरूपता होते. संतांच्या वाङ्मयातील प्रतिमा या अलंकरणरूप नाहीत. प्रतिमा या अप्रस्तुत नाहीत; तर त्या प्रस्तुतच आहेत. जिच्यामुळे आध्यात्मिक अनुभव प्रस्तुत ठरतो त्या व्यावहारिक जगातील प्रतिमासृष्टी ही जगाच्या वास्तव स्वरूपापेक्षा मूल्ययुक्त स्वरूपाने सिध्द झालेली असते. म्हणून इथे मूल्यांच्या जाणिवेच्या अर्थप्रकाशातच इंद्रियसंवेदन प्रतिमा निर्माण होतात. ह्या इंद्रियसंवेदन प्रतिमा इंद्रियांनी भोगून परत हृदयात भोगायच्या, त्यामुळे प्रतिमा सार्थ होतात. तुकोबांच्या अभंगांतील प्रतिमानरून लौकिकसृष्टी मूल्ययुक्त आहे. ही मूल्ये अनुभवाच्या संदर्भात समजून घेतली नाहीत तर ती मूल्यगर्भ विधाने केवळ अलंकरणरूप सुभाषिते ठरतील. तुकोबांची विधाने सुभाषिते म्हणून वापरताना संदर्भांपासून तोडली जातात. प्रतिमेच्या संदर्भात बिंब - प्रतिबिंब असे म्हणण्यापेक्षा बिंब - प्रभा असा प्रयोग करणे अधिक युक्त. कारण संतांच्या काव्यात उपमा - रूपक - उत्प्रेक्षा - दृष्टांताची जी उतरंड येते - त्यामुळे उपमाने घडतात. उपमेयाला जर बिंब मानले तर ही उपमाने ही त्या बिंबाची प्रभाच ठरतात. अभंगाचा घाट व प्रतिमा यांच्या संबंधांचा विचार करता ध्रुवपद हे उपमेय किंवा दार्ष्टान्तिक असते. इतर ओळीतील उपमाने ही दार्ष्टान्तिकाचाच आशय प्रक्षेपित करीत असतात. परिणामतः आशय व घाटाचा विस्तार होत असतो. प्रतिमेच्या संदर्भातील पारंपरिक प्रतिमा व अपारंपरिक प्रतिमा हा भेद रूढ अर्थाने बरोबर नाही . एखादी पारंपरिक प्रतिमा नवी संवेदनशीलता प्रकट करीत असेल, तर अपारंपरिकच ठरेल. प्रतिमा ही समग्र कलाकृतीच्या संरचनेचा एक भाग असल्यामुळे त्या संदर्भातच तिचा विचार व्हायला हवा. तुकोबांच्या अभंगांतील प्रतिमांची काही वैशिष्टये खालीलप्रमाणेः

तुकोबांच्या उपमानप्रतिमा या सबलनिर्देशक तर उपमेयप्रतिमा दुर्बल निर्देशक दिसतात. त्यांची मांडणी द्वैती असते पण या द्वैताचा निरास होऊन अद्वैतानुभवाचा प्रत्यय यावा अशी तुकोबांची मनीषा असते. दुर्बळांमुळेच सबळांचे थोरपण सिध्द होते. भक्तीमध्ये देव आणि भक्त असे द्वैत असतेच. भक्ती त्यामुळेच रंगते. बौध्दिकता, चिंतनात्मक विचारप्रवणता, ही तुकोबांच्या प्रतिमांची वैशिष्टये आहेत. काही मूल्ययुक्त प्रतिमांची प्रतिपक्षात्मक मांडणी करून तुकोबा आपल्या कल्पकतेची व बुध्दिमत्तेची चुणुक दाखवितात. कधी एकाच प्रतिमेचा विस्तार करून तुकोबा आपले म्हणणे युक्तिवादपूर्वक मांडतात. रूपकातिशयोक्ती हे तुकोबांच्या प्रतिमेचे वैशिष्टय आहे. प्रतिकात्मक प्रतिमा हेही तुकोबांच्या प्रतिमांचे वैशिष्टय आहे. रूपकाचा सरळ वापर होऊन निर्माण झालेल्या प्रतिमा हेही त्यांच्या प्रतिमांचे वैशिष्टय आहे. नादप्रतिमा तसेच यमकजन्य नादसाम्यातून मानसिक पातळीवर जाणवणाऱ्या प्रतिमा हे तुकोबांच्या प्रतिमांचे एक वैशिष्टय आहे. चेतन व कृतिशीलता हे तुकोबांच्या प्रतिमांचे वैशिष्टय आहे. अमूर्त अशा आध्यात्मिक तत्त्वांची चिंतनगर्भ प्रतीती ही कृतिशील असल्यामुळे ती तशाच स्वरूपात अभिव्यस्त होते. तुकोबा एकच प्रतिमा विविध संदर्भात वापरतात. परिणामतः त्या प्रतिमानाच्या नानाविध गुणवैशिष्टयांचे सूक्ष्मावलोकन कळतेच व त्यामुळे त्या प्रतिमेची संरचनागत बरीच वैशिष्टये स्पष्ट होतात. उदा. तुकोबांच्या गाथेत श्वानप्रतिमा एकूण 42 वेळां आलेली आहे. त्यातून उभक्त दुर्जन व भक्त या उफमेयप्रतिमा समूर्त होतात. गुणाकडे अवगुण म्हणून पाहिल्यानंतर प्रतिमेचा चेहराच पालटतो व संबंधित प्रतिमेचे द्विदलत्व लक्षात येते. तुकोबांची प्रतिमासृष्टी विश्वव्यापी आहे. विश्वातील बारीकसारीक घटकांचा मूल्ययुक्त वापर या प्रतिमासृष्टीत येतो. तुकोबांच्या प्रतिमासृष्टीत नित्याच्या वस्तू, प्राणी यांचे आधिक्य आहे. या वस्तू व प्राणी यांच्या सर्वसाधारण अनुभवाचा आधार घेऊन तुकोबा विचार व भावना यांची खोली केवळ संबंधित वस्तू वा प्राणी यांच्या स्तब्ध वर्णनाने वाढत नाही, तर त्यांच्या ठायी असलेल्या व्यवच्छेदक गुणांचे सूक्ष्मावलोकनजन्य नवे व कल्पकतापूर्ण दर्शन ते घडवतात, म्हणून वाढते. परिणामतः तो अनुभव चित्तात खोलवर ठसतो. काव्यातील प्रतिमांचे हेच महत्त्वाचे कार्य असते.

तुकोबांच्या अभंगवाणीतील कथांची कथनमीमांसा करता येऊ शकते. नीतितत्त्वांचा प्रसार करण्यासाठी कथा हे माध्यम परिणामकारक असल्यामुळे सर्वच संप्रदायांनी या माध्यमाचा वापर केला आहे. संतांनी नीतितत्त्व व भक्तितत्त्व यांच्या सम्यक प्रसारासाठी कथांचा वापर करणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.

कथनगुणपरता हा कथावाङ्मयाचा समान गुणधर्म तुकोबांच्या अभंगांचा कथनगुणपरतेच्या अंगाने विचार करायला हवा. शैलीमीमांसा व कथनमीमांसेचा संबंध आहे. रशियन रूपवादी व फ्रेंच संरचनावादी यांनी कथनपर साहित्याचा नव्या दृष्टीने विचार करून कथनमीमांसेची उभारणी केली आहे. सोस्यूरची चिन्हमीमांसा ही या कथनमीमांसेचा पाया आहे. रशियन रूपवाद, संरचनावाद, मानववंशविज्ञान, भाषाविज्ञान यांनी विकसित केलेल्या मर्मदृष्टींचा शैलीविज्ञान उपयोग करून घेते.

तुकोबांच्या अभंगवाणीतील अवतरणक्षम विधानांनी जुन्या - नव्या अशा सर्वच अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्यावहारिक प्रबोधनशक्ती, सौंदर्यशक्ती यामुळे अवतरणक्षमतेची व्यापकता सिध्द झालेली. तुकोबांच्या अवतरणांमध्ये एक मंत्रशक्ती आहे. या मंत्रशक्तीचे रहस्य शोधणे, ही अवतरणे ज्या मुखातून निघाली त्या मुखनायकाचे व्यक्तीमत्व, अवतरणांचा रचनाबंध, रचनाबंधामुळे मानवी मनाला होणाऱ्या विविध जाणीवा, अवतरणांतून प्रत्ययाला येणाऱ्या वैश्विक व सार्वकालीन सत्यामुळे अवतरणांना लाभलेला चिरकालीन ताजेपणा या गोष्टींचा शोध घेता येतो.

गीतेतील अक्षरे ही आत्म्याला प्रकट करणारे मंत्रच होत असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे. गीतेच्या संदर्भात हे जितके सार्थ आहे तितके ते सबंध संतसाहित्याबाबतही सार्थ आहे. म्हणून संतवाणी ही मंत्रवाणी आहे. मंत्रवाणी ही दैवीवाणी असते. दैवीवाणी ही प्रेरक, प्रचोदक असते. ही प्रेरकता ती वाणी अखंड वाक्यरूप असते म्हणून असते. अखंड वाक्यअभंग वाक्य हे महावाक्यस्वरूप असते. महावाक्य हे वैखरीच्या रूपाने मूर्त होते. मंत्रद्रष्टया ऋषींनी अवर ऋषींना वैखरी स्वरूपातच उपदेशपध्दतीने मंत्र प्रदान केले. पण याचबरोबर हे मंत्र जेथून अवतरले त्या उगमस्थानाचा साक्षात्कार करून घ्या असे सुचविले. मंत्राची सार्थकता यातच असते. ज्ञानदेव आत्मा अवतरविते मंत्र म्हणतात ते आत्मतत्त्व हे उगमस्थान परावाणीचे तत्त्व. म्हणजेच परतत्त्व. यासाठीच काव्याला परतत्त्वाचा स्पर्श लाभावा असे ज्ञानदेव म्हणतात. तुकोबांनीही माझा शब्द नव्हे एकदेशी । सांडी गवशी कोणाला ॥ असे का म्हटले, त्याचे मर्म ध्यानात येते.

महावाक्य स्वरूपातल्या वैखरीत तुकोबांसारख्या महाकवीचा अनुभव साठलेला असतो. तो आकळण्याऐवजी त्या अनुभवाच्या स्पष्टीकरणार्थ दिलेली उदाहरणे किंवा स्फुटानुभव वैखरी पातळीवर आकळतो. यमकतत्त्व, ध्वनींची पुनरावृत्ती, ध्वनिविरोधजन्य अर्थविरोध, मानसिक परिणाम करणारे घटक महत्त्वाचे असतात. थोडक्यात, भाषावैज्ञानिक तत्त्वांचा वापर करून वैखरीच्या पातळीवरच्या - आलंकारिक कार्य पाडणाऱ्या अंगाला समजून घेता येते.

तुकोबांची अवतरणक्षम वचने तुकोबांना अभिप्रेत अर्थाने वापरली जात नाहीत. तुकोबांचे महावाक्य व त्यातील अवतरणक्षम विधान, तुकोबांचा महावाक्यांतर्गत अर्थ व चलनातील सर्वसाधारण अर्थ या पध्दतीने तुलनात्मक तपासणी करता येऊ शकते. तुलनात्मक अध्ययनावरून काही निष्कर्ष हाती लागू शकतात. तुकोबांची अलौकिक आध्यात्मिक अनुभव व्यक्त करणारी महावाक्ये मराठी भाषक समाजाकडून लौकिक अनाध्यात्मिक अनुभव व्यक्त करण्यासाठी वापरली जातात. आपल्या लौकिक कृतींना भव्य परिमाण लाभावे व आपणास कृतकृत्य वाटावे यासाठी तुकोबांच्या मुखाने आपला अनुभव व्यक्त करण्याची धडपड होते. यात सामान्यांपासून विद्वानांपर्यंत, वृत्तपत्रीय लेखन करणाऱ्यापासून साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकापर्यंत सर्वांचा सहभाग असतो. म्हणून ग्रंथांची अन्वर्थक शीर्षके, सभासमारंभातील भाषणे, दैनंदिन व्यवहारातील सामान्य संभाषणे, अग्रलेखांची शीर्षके, ग्रंथांचे उपोद्धात, उपसंहार यासाठी तुकोबांची भाषा वापरली जाते.

तुकोबांच्या अभंगवाणीतील पारिभाषिक संज्ञांचा भावार्थविचार समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. वारकरी संप्रदाय हा अनुभवप्रतीतिवादी आहे, केवळ ज्ञाननिष्ठ नाही. परिणामतः इथे शुष्क अर्थवादाला स्थान नाही. भावार्थ, संकल्पना यांना महत्त्व आहे. शास्त्राची परिभाषा ही वाच्यार्थक असते; पण भक्तिमार्गी वारकरी संप्रदायाची परिभाषा ही स्वानुभवांच्या बोलांची ओल कायम टिकवून ठेवणारी, भावार्थक अशी आहे असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी संबध्द क्षेत्रनिर्देशक पदे ही त्या क्षेत्राची सर्वसाधारण परिभाषा असते. ह्या क्षेत्रनिर्देशक पदे ही त्या क्षेत्राची सर्वसाधारण परिभाषा असते. ह्या परिभाषेला स्तरभाषा (register) असे म्हणतात. ही परिभाषा क्षेत्रस्थ आचारविचार, तत्त्वज्ञान, दैवतविचार इत्यादी बाबींचा निर्देश करणारी असते. कालौघात नवीन संप्रदाय उदयास येणे, जुन्या तत्त्वज्ञानाची बैठक बदलणे किंवा नवीन तत्त्वज्ञानाची स्थापना करणे, आचारविचारात बदल होणे वगैरे घडामोडी घडत असतात. रूपदृष्टया पद तेच असले तरी त्यामागची संकल्पना बदलते. भाषाविज्ञानात याला अर्थविन्यासात्मक बदल (Semantic change ) असे म्हणतात. एखाद्या संप्रदायविशिष्ट लेखकाच्या शैलीचा अभ्यास करताना त्याच्या साहित्यकृतीत येणाऱ्या संज्ञांपाठीमागचा भावार्थ समजून घेणे हे फार आवश्यक असते. या अभ्यासामुळे पारंपरिक संकल्पना व संप्रदायविशिष्ट लेखकाची संकल्पना यातील नाते कळते. हे नाते संकल्पनाविस्तार (extension), संकल्पनाविपथन (deviation), संकल्पनालोप (syncope), संकल्पनाविपर्यय (metathesis) वगैरे स्वरूपाचे असू शकते. त्यांच्या साक्षेपानुसार संप्रदायाची भूमिका, लेखकाचे व्यक्तिमत्व यांची कल्पना येते. प्रस्तुत अभ्यासानंतर जे निष्कर्ष हाती लागतात ते या प्रमाणेः

तुकोबांनी भारतीय तत्त्वविचारातल्या सर्वच संज्ञा तपासून त्यांच्यातली ग्राह्याग्राह्यता पारखून त्यांच्या स्वीकारनकाराचे धोरण ठरविले आहे. विशिष्ट संज्ञा ही केवळ ज्ञानरूप असेल व भावजागृती करीत नसेल तर ती केवळ अर्थवाद करणारी म्हणून टाळलेली आहे.

पारंपरिक तत्त्वविचारातील संज्ञांची भक्तितत्त्वाशी सांगड घालून त्यांना भक्तिमुखी बनविले आहे. नामस्मरण हा भक्तीचा अत्युत्तम मार्ग असल्यामुळे योगयागतप व इतर आगमनिगमोक्त गोष्टींना सपशेल नाकारले आहे. ही नकाराची रीत कधी संज्ञारूपाने स्वीकारायची; पण त्यात आशय मात्र आपल्याला अभिप्रेत असा भरायचा. याला संकल्पनाविपर्यय म्हणता येऊ शकते. जीवनाचे ध्येय आध्यात्मिक उन्नती हेच असेल, तर्ककर्कश चर्चेने ते गाठता येणार नाही. त्यासाठी अंतःकरणात परमेश्वर ठसविणे आवश्यक आहे. यामुळे अंतःकरणशुध्दी होईल. अंतःकरण प्रभुप्रेममय करण्यासाठी नामस्मरण हाच उत्तम उपाय असल्याचे त्यांच्या संज्ञा ध्वनित करतात. या उपायात देहदंड नाही, श्रेष्ठकनिष्ठता नाही, ज्ञानी - अज्ञानी, जातीपातीचा असा विषम भेद नाही. एक सामूहिक चळवळ म्हणून वारकरी पंथाने एक विशिष्ट आचारधर्म स्वीकारलेला होता. त्याचा अनुवाद संतांनी जिवेभावे केला हे तुकोबांच्या पारिभाषिक संज्ञांच्या भावार्थातून दिसते.

काव्यमीमांसा मध्यवर्ती ठेवून शैलीमीमांसा कशी होऊ शकते याचे प्रारूप तयार करण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल. सबंध गाथा आधाराला घेऊन अनेक उदाहरणांच्या साह्याने ह्या प्रारूपातील मुद्दे विस्ताराने अन्यत्र चर्चिलेले आहेत.

संदर्भ :

1. Bethell, S. L.: ‘Shakespeares and Popular Dramatic Tradition’, P. S. King and Staples Limited, Westminster, 1944 (Introduction).

2. Roman Lakobson: ‘Linguistics and Poetics’, in “Style in Language”, (ed.) T. A. Sebeok, MIT, Massachusetts, 1960, P. 365.

3. Paul Kiparsky: ‘The Role of linguistics in a Theory of Poetry’ in Essays in Modern Stylistics’’ (ed.)Freeman Donald, Methnen, London and New York, 1981.

4. कालेलकर, ना. गो.: ध्वनिविचार, मौज प्रकाशन, मुंबई, १९९० पृ. १३१.

तुकारामांची प्रतिभा

पुरुषोत्तम यशवंत देशपांडे

कधीकधी कलावंताची पूर्णपणे पार्थिव अशी आंतरिक भावगतीची ओढ धार्मिक अथवा आध्यात्मिक स्वरूपांत प्रगट होते. पण तेवढामुळें कलावंताच्या वास्तवताप्रधान भूमिकेस बाध येईल, असें मला वाटत नाही. पुरातन कालीन आणि मध्ययुगकालीन, पूर्णपणे भौतिक असे अनेक सामाजिक कलह व समाजक्रांत्या, धार्मिक अथवा आध्यात्मिक स्वरूपांत प्रकट झाल्या; पण त्या कलहांची आणि क्रांत्यांची भाषा धार्मिक अथवा आध्यात्मिक होती म्हणून त्यांचे भौतिक स्वरूप निरर्थक ठरत नाही; त्याचप्रमाणे भूतकालांतील अनेक कलावंतांची आंतरिक ओढ धार्मिक अथवा आध्यात्मिक भाषेंत व्यक्त झाली म्हणून ते कलावंत कमी प्रतीचे ठरत नाहीत. अथवा केवळ धार्मिक अथवा अध्यात्मिक भाषा वापरली म्हणून त्यांचें वाङ्मय हें कलात्मक वाङ्मय नव्हे, असेंहि म्हणतां येणार नाही. कलावंत ही व्यक्ति इतर सामान्य माणसाप्रमाणें समकालीन समाजसंघर्षाच्या कलहपूर्ण वातावरणांत घडविली जाते. विशिष्ट कालखंडांत रूढ सामाजिक जाणिवा ज्या स्वरूपाच्या असतात त्या स्वरूपांतच कलावंताला आपली आंतरिक विरोधगतीची ओढ प्रगट करावी लागते. पुष्कळ वेळा जुन्या निष्ठांची जी रूढ भाषा असते तींतच नवा आशय ओतावा लागतो. जुन्या कलेचें आकलन करतांना भाषेपेक्षा आशयाकडे अधिक लक्ष दिल्यास कलावंताची भौतिक भूमिका सहज स्पष्ट होऊं शकते. कोणत्याही कलाकृतींतील आशय आकलन होण्यासाठी तत्कालीन समाजजीवनाच्या व्यावहारिक संघर्षांतील विरोधमय वातावरणांतच कलावंताचें व्यक्तित्व आकारास येत असतें. आपलें जुने संत वाङ्मय हें बहुतांशी आध्यात्मिक भाषेंत व्यक्त झालें आहे. तरीपण त्यांतील बराचसा भाग कलेच्या कसोटीस पूर्णपणें उतरण्यासारखा आहे. तुकारामाचें काव्य आजही मनाला आकर्षित करण्याइतकें सामर्थ्यवान् आहे. संत या नात्यानें तुकाराम कदाचित् विसरला जाईल. पण कवी या नात्याने तुकारामाचे महाराष्ट्राला विस्मरण पडणें दुरापास्त आहे. कारण तुकारामाच्या काव्यांतील वास्तवतेचा स्पर्श इतका प्रभावी आहे की, त्यामुळें धार्मिक आणि आध्यात्मिक कल्पनांची गडद् नी गूढ आवरणें क्ष किरणांप्रमाणे आरपार छेदून त्यांतील विशुध्द मानवता आजही आपल्या नजरेसमोर मनोरम स्वरूपांत तरंगूं लागते. तुकारामाच्या आधी आणि तुकारामाच्या नंतरही अनेक संत उदयास आले. पण तुकारामाचें माहात्म्य दुसऱ्या कोणत्याही संताच्या वाटाला आलें नाही. याचें कारण तुकाराम सदेह स्वर्गाला गेला, या असंभाव्य आणि असत्य चमत्कारांत नसून समाकालीन समाजसंघर्षात झगडत असतां प्रत्यक्षपणें अनुभवास आलेल्या वास्तवतेच्या स्पर्शाचें त्याला कधीही विस्मरण पडलें नाही, हें होय. तुकाराम ज्या काळांत जन्मास आला तो काळ लोकभाषेच्या उदयाचा काळ होता. भारतीय संस्कृतीची मिरासदारी बळकावून बसलेल्या संस्कृत पंडितांनी आणि भटभिक्षुकांनी, ज्ञान हें संस्कृत भाषेंतूनच व्यक्त होऊं शकते अशा बथ्थड समजुतीला बळी पडून मराठी मायबोलीच्या असंख्य खेडुतांना अज्ञानांत खितपत पडूं दिलें होतें. तेराव्या शतकांत ज्ञानेश्वराने संस्कृत पांडित्याच्या पुरातन आणि अतिप्रतिष्ठा पावलेल्या प्रथे विरुध्द पहिलें प्रभावी बंड उभारलें, परंतु दोन तीन शतकेंपावेतो या सांस्कृतिक बंडाला सामुदायिक पाठिंबा मिळूं शकला नाही. सोळाव्या शतकांत तुकाराम जन्मास आला. जातीचा शुद्र पण धंदा उदीमपणाचा----

मातापीता बंधु सज्जन । घरीं उदंड धनधान्य ।

शरीरीं आरोग्य लोकांत मान । एकहि उणें असेना ॥

अशा सुस्थितींत आणि श्रीमंतींत वाढलेल्या तुकारामावर तारुण्याच्या ऐन उमेदींत दारीद्राचें दैन्य अनुभविण्याचा प्रसंग आला आणि दारिद्राशीं झगडतां झगडतांच एक दुष्काळ पडला. त्यांत तुकारामाचें होतें नव्हतें तें सर्व गेलें. पुन्हा व्यापार थाटावा, मोडलेली घडी पुन्हा बसवावी या हेतूने त्याने प्रयत्न केले. परंतु ते सर्व निष्फळ ठरले. आणि शेवटीं,

सावकार पिशुन आणि खळ । गृहासी पातले जैसे काळ ॥

अशी मरणप्राय स्थिति प्राप्त झाली. तुकारामाच्या जुन्या जीवनांतील सारें सौंदर्य विलयास गेलें. नव्या जीवनांतील नव्या सौंदर्याचा शोध त्याने सुरु केला. बेचिराख झालेल्या संसाराच्या थंड राखेंतून पुन्हा नवी ज्योत तुकारामाने पेटवावी यासाठीं अहोरात्र अट्टाहास करणाऱ्या बायकोला आणि मुलाबाळांना सोडून तुकाराम वेडासारखा वणवण भटकूं लागला !

अशा आत्यंतिक विपन्नावस्थेंत आणि उदास मनःस्थितींत काळ कंठींत असतां तुकारामाला अखेरचा आसरा सापडला, तो संतवाणींत. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ यांच्या भक्ति - भाव - गीतांत तुकारामाने आपल्या भावनेचे तारू विमुक्तपणें सोडून दिलें. घरादाराला पारखा झालेला, समाजांतून पूर्णपणें उठलेला तुकाराम पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनी असें गुणगुणत तल्लीन होऊं लागला तेव्हा आरंभीं सर्व लोक त्याची कुचेष्टा करूं लागले. खुद्द त्याच्या बायकोने त्याचें जें वर्णन केलें आहे, त्यावरून त्या वेळीं त्याची किती निरर्भत्सना होत असेल याची चांगली कल्पना येते ---

न करवे धंदा । आईता तोंडीं पडे लोंदा ॥

उठितो तो कुटितो टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥

जिवंत असूनि मेले । लाजा वाटूनिया प्याले ॥

अशा गहिऱ्या शब्दांत ती आपल्या नवऱ्याचा उध्दार करीत असे !

सर्व समाज आणि समाजांतील तत्कालीन सर्व रूढ व प्रतिष्ठित जाणिवा एकीकडे आणि एकटा तुकाराम दुसरीकडे, अशा दारूण संघर्षाच्या घणाचे घाव खात खात, तुकारामाने पांडुरंगाला आपल्या सर्व आंतरिक आकांक्षांचें प्रतीक कल्पून नव्या जीवनासाठीं नव्या सौंदर्याची मूर्ति घडविली. आपल्या वैयक्तिक संसारांतील विझलेल्या ज्योति पुन्हा चेतविण्यास असमर्थ ठरलेल्या तुकारामाने पांडुरंगाच्या पाषाणमूर्तीला पाझर फोडण्याचा अट्टाहास सुरू केला. पाषाणाला पाझर फुटणें अशक्य होतें. आणि पाषाणाला पाझर फुटण्याची वाट पहात तुकाराम बसला असता तर त्याच्या जीवदेहाचाच पाषाण बनून तुकारामाची नाव निशाणीहि आज बाकी उरली नसती. पण पाषाणाला जरी पाझर फुटला नाही, तरी भावनोत्कटतेच्या केंद्रीभूत प्रभावानें तुकारामाच्या प्रतिभेला मात्र नितांत सुंदर काव्याचे पाझर फोडले ! तुकारामाला मात्र आपलें काव्य सुंदर आहे अथवा त्यातील नितांतरम्य सौंदर्य म्हणजे आपल्याच प्रतिभेचा प्रभाव होय, असें कधींच वाटलें नाही. कारण आजकालच्या प्रथितयश लेखकांप्रमाणें त्याला कवि अथवा कलावंत म्हणून मिरवावयाचें नव्हतें. अथवा कलेकरतां कलाही निर्माण करावयाची नव्हती ! त्याला कथानक, गुंतागुंत, निरगाठ, सूरगाठ, उकल, इत्यादि यांत्रिक नि कृत्रिम साधनांच्या साहाय्यानें प्रतिभासधान करावयाचें नव्हतें ! त्याला केवळ आपल्या अवरुध्द भावजीवनाला वास्तवतापूर्ण व्यक्तता द्यावयाची होती. निर्दय संघर्षाचे घाव सहन करीत करीत तो आपल्या सौंदर्यप्रतीकाशी संपूर्ण आत्मसमपर्णानंतर, समरस होतांच,वसंतात निष्पर्ण मुळे निर्जीव झालेल्या आणि आंतल्याआंत गुदमरून मरूं लागलेल्या त्याच्या भावनोत्कटतेला काव्याचे नवनवे बहर येऊं लागले ! जीवनसंघर्षाच्या वणव्यांत सारा जीव होरपळून निघत असतांहि अनुभवांच्या साकल्यांतून द्दग्गोचर होऊं लागलेल्या सौंदर्यप्रतीकावरील आपली द्दष्टि जो क्षणभरही चळूं देत नाही, त्यालाच सौंदर्याची आत्मप्रतीति होऊं शकते. आणि सौंदर्याची आत्मप्रतीति ज्याला होते तोच अस्सल कला निर्माण करूं शकतो. सौंदर्यसाधन म्हणजे येराबाळाचें काम नव्हे !

तुकारामाच्या अभंगवाणींत त्याचें भावजीवन सहजसौंदर्याने प्रकट होऊं लागतांच ज्या समाजाने त्याला झिडकारून वेडांत काढलें होतें. त्याच समाजापैकीं कांही लोक त्याच्या रसाळ वाणीने मोहित होऊन एका नव्या जाणिवेने त्याच्या - भोवती जमा होऊं लागले. संस्कृत पंडितांनी अवहेलिलेल्या आणि सत्ताधाऱ्यांनी आणि शेठ सावकारांनी पिळून काढलेल्या असंख्य अज्ञ खेडुतांना तुकारामाच्या वाणींत आपल्याच सुप्त भाव जीवनाचें सजीव प्रतिबिंब आढळून येऊं लागलें. तुकारामाचें सौंदर्यप्रतीक हेंच त्यांच्याहि निरस जीवनावर नवा प्रकाश पाडणारें सौंदर्यप्रतिक बनलें. गरीब बिचारे खेडापाडांतील लोक ! खडतर कष्ट करण्यापलीकडे त्यांच्या जीवनांत कसलेंहि सार उरलें नव्हतें. संस्कृत पंडितांनी उपेक्षिल्यामुळे शेकडों वर्षे ते अज्ञानाच्या गाढ अंधारात खितपत पडले होते. अखंड कष्टाच्या सहारा वाळवंटांत त्यांच्या सर्व भावसरिता विरून गेल्या होत्या. रुक्ष आणि खडतर व्यावहारिक जीवनाच्या कंटाळवाण्या घाण्यांतून बाहेर पडायला त्यांना मार्गच उरला नव्हता. आत्माविष्करणाचे सारे मार्ग अनेक शतकें बंद झाले होते. अशा परिस्थितींत ते असतांना त्यांच्या सुदैवाने तुकारामालाहि त्यांच्याच खडतर जीवनाचा कटुतम अनुभव घेणें भाग पडलें. वास्तवतेच्या वणव्यांत तुकारामाच्या पूर्वानुभूत वैभवसंपन्नतेवर आधारलेल्या, सर्व कल्पनांची राखरांगोळी झाली. खडतर आणि रुक्ष जीवनाचें दगडाशिवाय अधिक वास्तवताप्रधान असें दुसरें कोणतें प्रतीक बनणार ! समाजातील साऱ्या माणसांचे दगड बनले असतांना कोणत्याही व्यक्तीवर तुकारामाचें भावजीवन केंद्रित होणें त्या काळीं अगदी अशक्य होतें. दगडाभोवतीच सारी मानवता कोणत्याहि एकाच जाणिवेने एकत्रीत झाली तरच कदाचित् नव्या मानवतेचा उदय होण्याचा संभव अशीच तत्कालीन परिस्थिती होती. दगडाची पूजा आधीच रूढ होती. व्यावहारी जीवनांतील रखरखीत वाळवंटांत विरून गेलेली मानवता दगडी देवाविषयीच्या पूज्य भावांत कसाबसा जीव धरून तगून राहिली होती. तुकारामाने आपलें सारें उदास भावजीवन तिथेंच केंद्रीभूत केलें.

पण तिथेहि समाज - संघर्षाने त्याला मोकळें सोडलें नाही. देवाच्या दगडी मूर्ती सभोवती पोटभरू पूजाऱ्यांचा, भटाभिक्षुकांचा, प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पंडितांचा, टिळेमाळा घालणाऱ्यांचा, मंत्रतंत्र करणाऱ्यांचा, जटावेषधारी भस्मासुरांचा, आणि साध्याभोळया लोकांच्या धर्मभावनेवर बाजार करणाऱ्या इतर अनेक प्रकारच्या पुंड - गुंडांचा गराडा पडला होता. धन- धान्य, मालमत्ता, व्यापार उदीम, घरदार गमावून बसलेला तुकाराम बाकी उरलेलें केवळ भावजीवन घेऊन देवाच्या दारीं उभा राहीला. त्या व्यावहारिक जीवनांत कवडीमोल ठरलेल्या भावजीवनाला देवाच्या दारीं तर मोल येईल या आशेनें तो देवाच्या मूर्तीकडे गेला. पण तिथेही कळकळीच्या शुध्द भावापेक्षा देवाचे दलाल बनलेल्या भोंदू लोकांच्या बाह्य सोंगाला अधिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली त्याला दिसून आली. देवाच्या दगडी मूर्तीवरहि मालकी हक्क प्रस्थापित करून बसलेल्या, आपमतलबी भोंदू लोकांनी तुकारामाला देवापाशी आपलें भावकथन करूं दिलें नाही. तुकारामाचा शेवटचा आसराही सामाजिक प्रतिष्टांच्या वेदीव चिरडला गेला. आता मात्र प्रत्यक्ष प्रतिकाराशिवाय त्याला जगणें अशक्य झालें. प्रतिष्ठा पावलेल्या धार्मिक दांभिकपणावर त्याने जोराचा हल्ला सुरूं केला. कोणापाशीहि कशाचीहि याचना न करणारें त्याचें भावजीवन रूढ सामाजिक प्रतिष्ठेच्या आघाताखालीं अन्यायाने चिरडलें जाऊं लागतांच त्याच्या अंतर्यामांतील प्रतिकारशक्ति खडबडून जागी झाली. त्याने दलितांच्या खडा बोलीत बेधडकपणें पाखंड खंडनाचा सपाटा सुरूं केला. धर्मभ्रष्ट व आचारभ्रष्ट झालेल्या परंतु केवळ परंपरेच्या जोरावर प्रतिष्ठेच्या दिमाखाने इतरांना तुच्छ लेखणाऱ्या ब्राह्मणसमाजाला उद्देशून तुकारामाने लिहिलेल्या अनेक अभंगांत ब्राह्मण्याचें हिडिस स्वरूप सडेतोडपणें उघडकीस आणलें आहे. देव म्हणवुनी न येती देवळा अशी त्यांची अहंता ! स्वार्थाकरतां विकी स्नानसंध्याजप अशी त्यांची धर्मपरायणता ! अनाचार इतका की करिती लेकीची धारणा टिळे लपविती पाताडी, लेती विजार कातडी ! इतकेच नव्हे, तर नीचांचे चाकर, चुकलिया खाती मार ही परकीय राज्य - कर्त्यांविषयीची त्यांची वृत्ति ! इकडे परकीय राजपुरषांचा लत्ता प्रहार सोसतील पण आपल्या देशबांधवांशी प्रसंग आला कीं, बैसोनि तक्ता, अन्यायविण पीडिती लोका अशी त्यांची बेशरम कृति । संस्कृत पंडीतगिरीवरही तुकारामाने तितक्याच निकराचा हल्ला चढविला.

नाना मतान्तरें शब्दांची व्युप्तत्ति, पाठांतरें होती वाचाळ ते ........शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभवभेद नाही कोणा...........। कोडियाचें गोरेपण, तैसें अहंकारी ज्ञान अशा विदारक शब्दांत पंडीतगिरीवर तुकारामाने प्रहार केले. आणि पंडीतांच्या पांडित्याचा पिंडपोषकांच्या जळो ज्ञानगोष्टी असा मर्मभेद करून निःस्वार्थ, निरहंकारी आणि मानवी भावजीवनाचें, आत्मप्रत्ययाचें आणि अनुभवसाकल्याचें महत्त्व आपल्या रसाळ वाणीने, निरभिमान वृत्तीने आणि निर्मळ वागणुकीने त्याने प्रस्थापित केलें. पोटार्थी कथेकऱ्यांवर, ढोंगी गुरुबाजीवर, नवससायासादि वेडगळ रूढीवर, सारांश सर्व महत्त्वाच्या रूढ सामाजिक जाणिवांवर निकराचा हल्ला चढवून नव्या मानवतेच्या, विशुध्द भावजीवनाच्या , वस्तुनिष्ठ अनुभवाच्या बंडाचें निशाण तुकारामाने केवळ आपल्या व्यक्तित्वावर आश्वासून उभें केलें. या बंडखोरपणामुळें तुकारामाला अनन्वित छळ सहन करावा लागला. सर्व प्रतिष्ठित सामाजिक जाणिवा एकीकडे आणि तुकाराम दुसरीकडे असा तो अतीविषम समाज संग्राम होता. या संग्रामाच्या अखंड माऱ्याखालीं तुकारामाचें व्यक्तित्व आकारास आलें. सर्व प्रतिष्ठीत सामाजिक जाणिवांपेक्षा त्याला आपला अंतरीचा भाव अधिक वास्तवतापूर्ण वाटला. तीव्रतम सामाजिक विरोधाचे घण वारंवार सहन करतां करतां त्याच्या अंतरींच्या भावनेला अनेक पैलू पडून दैदीप्यमान हिरकणीप्रमाणें ती चमकूं लागली. विपरीत परीस्थितीतहि अनुभवजन्य वास्तवतेचा स्पर्श न सोडल्यामुळें त्याच्या अंधाऱ्या एकाकी जीवनांत नव्या जाणिवेचा प्रकाश पडला. देऊळींचा देव मेला अंतरींचा जागवारे असे दिव्य बोल त्याच्या मुखांतून बाहेर पडूं लागले.

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणवी जो आपुले ॥

तोचि साधू ओळखावा । देव तथेचि जाणावा ॥

हें नव्या जाणिवेचें नवें गमक प्रत्यक्ष व्यावहारीक जीवनांत त्यानें प्रसृत केलें. नव्या जाणिवेमुळें व्यक्ति आणि विश्व यांची नवीं संगती त्यांच्या अंतःकरणांत उदयास आली. नव्या द्दृष्टिकोनांतून तो जगाकडे आणि जीवनाकडे पाहूं लागला. आणि या नव्या द्दृष्टिकोनांतून जें तुकारामाच्या अनुभवास आलें तेंच त्याचें वास्तवता दर्शन ! या वास्तवतादर्शनामुळेच तुकारामाचें शब्द नव्या आशयाने परिपूर्ण झाले. देवाविषयींच्या निर्जीव झालेल्या जुन्या रूढभक्तीत नव्या भावाचा जीव ओतला गेला. रूढ सामाजिक जाणिवांच्या दडपणामुळे निर्जीव बनलेले असंख्याचे भाव, सजीव झाले. प्रतिष्ठितांचीं देवळें सोडून लोक तुकारामाच्या भोवती, अंतरींच्या देवाच्या कलात्मक प्रतिकाभोवती गोळा होऊं लागले. सारा दलित महाराष्ट्र व्यावहारिक जीवनाची गुलामगिरी बाजूस सारून रंजल्यागांजल्यांना जो आपला म्हणवूं लागला होता त्याच्याकडे भराभर जाऊं लागला. दलितांची खडतर व रूक्ष जीवनांतील स्थिति प्रधानता नाहीशी होऊन ते टाळमृदंग घेऊन तुकारामाच्याभोवती हर्षभराने नाचूं लागले. सात्विक आनंदाचा एक क्षणहि ज्यांना मिळेनासा झाला होता, त्यांच्या आनंदाला आता पारावार उरला नाहीं, सहानूभूतीचा एक शब्दहि ज्यांच्या कानावर पडेनासा झाला होता, त्यांच्या कानांत लक्षावधि लोकांच्या मुखांतून एकाच वेळीं निघूं लागलेला एकात्मभावाचा एकच एक रसाळ निनाद, अखंड दुमदुमूं लागला. तुकारामाच्या कलात्मक वाणीने देवाच्या दगडी मूर्तीभोवती सारी मानवता एका नव्या जाणिवेने एकत्रीत केली. असंख्य लोक एकाच जाणिवेने एकत्र येतांच एकेकाच्या जाणिवेच्या चिमुकल्या ज्योती एकजीव होऊन त्या असंख्य ज्योतींचा प्रचंड वणवा बनला. त्या वणव्यांत सर्व मानवताशून्य रूढ सामाजिक जाणिवा एका क्षणांत भस्म होऊन गेल्या !

नव्या जाणिवेच्या त्या प्रचंड वणव्याचें दर्शन घेऊन आपापल्या लहान लहान खेडांकडे परत गेलेले शेतकरी आपल्या धन्याकडे, शेठ सावकाराकडे एका नव्या आत्मविश्वासाने पाहूं लागले. ब्राह्मण, पंडीत, भटभिक्षुक यांना नव्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगूं लागले. शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या या सर्वांना, नव्या जाणिवेने उत्स्फूर्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रचंड एकतेपुढें हळूहळू विनम्र व्हावें लागले. मानवामानवांत नव्या माणुसकीचें नातें उदयास आलें. तीनशें वर्षांपूर्वी ज्ञानेश्वराने आरंभिलेली सांस्कृतिक समाजक्रांति तुकारामाच्या कलात्मक वाणीने परिपूर्ण झाली. संतांच्या कलात्मक वाणीने निर्माण केलेल्या नव्या जाणिवेने महाराष्ट्रांतील मराठमोळा आधीच सचेतन झाला नसता तर शिवाजीला स्वराज्याची स्थापना करतां येणें अशक्य झालें असतें. नव्या जाणिवेने, नव्या स्वाभिमानाने, नव्या आत्मविश्वासाने उठून उभ्या झालेल्या, असंख्याबरोबर एकात्मभावाने चालूं लागलेल्या सत्ताधारी आणि प्रतिष्ठित वर्गाच्या धार्मीक, नैतिक आणि सांस्कृतिक वर्चस्वाला झुगारून देऊन नव्या प्रतिकाराच्या भावनेने गतिमान झालेल्या मराठांना राजकीय स्वरूपाच्या प्रतिकारास सज्ज करणें फार प्रयासाचें काम नव्हतें. सांस्कृतिक क्रांतिचें लवकरच राजकीय क्रांतीत रूपांतर होऊन खेडाखेडांत कुजत पडलेला मराठा घोडावर स्वार होऊन हर हर महादेव अशी रणगर्जना करून अटकेपार गेला ! भारताच्या चारहि दिशा त्याने पादाक्रांत केल्या !

तुकाराम महाराज आणि महात्मा गांधी

सचिन परब

चले जाव, करेंगे या मरेंगे, हे राम... अशा साधासुध्या शब्दांना वेदमंत्रांहून मोठं प्रामाण्य भारतवर्षात मिळालं. कारण त्यामागे मोहनदास करमचंद गांधी या साध्यासुध्या दिसणाऱया महापुरुषाच्या संतपणाचं सामर्थ्य होतं. हे संतपण आलं होतं ते खरयाच्या प्रयोगातून आणि संस्कारातून. देशोदेशींचे, पिढ्यानपिढ्यांचे संस्कार रिचवून असं सामर्थ्य उभं राहतं. त्यात एक संस्कार मराठी माती घडवणाऱ्या तुकाराम महाराजांचाही होता.

आपल्या मराठी मनांवर कळत नकळत असा संस्कार होत असतो. पण रिचवण्या आणि पचवण्याआधीच तो संस्कार कापरासारखा उडून जातो. मात्र गांधीजींनी तुकोबारायाचे संस्कार कसे पचवले होते, ते समजून घेण्याचा सोपा मार्ग आहे. गांधीजींनी तुकोबांच्या सोळा अभंगांचे भाषांतर वाचण्याचा. गांधीजींच्या भाषांतरात साहेबाचा भाषेचा, त्या भाषेच्या संपूर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीचा कोणताही अडथळा न होता तुकोबांचे विचार जसेच्या तसे वाचकांपर्यंत पोहचतात. लेखक आणि भाषांतरकारातलं असं अद्वैत क्वचितच अनुभवायला मिळतं. दोन सच्च्या वैष्णवांमधलं हे अद्वैत.

विशेष म्हणजे गांधीजींनी मराठी मातीत बसून हे लिहिलंय. हे भाषांतर त्यांनी येरवडा तुरुंगात म्हणजे त्यांच्या शब्दांत येरवडा आश्रमात बंदी असताना केलंय. त्यांच्या सगळ्या सोळा अभंगाचं भाषांतर आता एकामागून एक रोज देणार आहोत. त्यानंतर संतपरंपरेतल्या आणखी काही अभंगांची भाषंतरे आम्ही वारी संपेपर्यंत सादर करणार आहोत.

आज त्यातला पहिला अभंग गाधीजींचा सर्वाधिक आवडता अभंग. भाषांतराची तारीख आहे, १६ ऑक्टोबर. आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रांत त्यांनी या अभंगाचा उल्लेख केला आहे. त्यांना या अभंगांमध्ये आपली तीन माकडे दिसत असत...

पापांची वासना नको दांवू डोळा | त्याहुनि आंधळा बराच मी ||

निंदेचे श्रवण नको माझे कानी | बधिर करोनि ठेवी देवा ||

अपवित्र वाणी नको माझ्या मुखा | त्याजहुनि मुका बराच मी ||

नको मज कधी परस्त्रिसंगती | जनांतुन मातीं उठता भली ||

तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा | तू एक गोपाळा आवडसी ||

O God, let me not be witness to desire for sin, better make me blind;

Let me not hear ill of anyone, better make me deaf;

Let not a sinful word escape my lips, better make me dumb;

Let me not lust after another's wife, better that I disappear from this earth.

Tuka says: I am tired of everything worldly, Thee alone I like, O Gopal.

संत नामदेवांनी भागवतधर्माची पताका अटकेपार लावली. संपूर्ण भारतभर त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीची मोहर उमटवली. गुजरातही त्याला अपवाद नव्हता. गुजराततेतल्या वैष्णव संतावंर नामदेवांचा प्रभाव स्पष्ट आहे. सर्वात प्रसिद्ध गुजराती संतकवी नरसी मेहतांच्या काव्यात तर नामदेवांचा उल्लेख अनेकदा येतो. ज्याने नामदेवासाठी दूधभात खाल्ला. ज्याने नामदेवासाठी मंदिर फिरवले असे भगंवताचे वर्णन त्यांनी केले आहे.

नरसी मेहतांच्या भक्तिकाव्याने सबंध गुजरातेवर प्रभाव टाकलाय. धामिर्क वैष्णव कुटुंबात जन्मलेल्या गांधीजींवरही त्याचा प्रभाव होता. विशेषत: नरसींच्या 'वैष्णव जन तो...' ने तर त्यांच्यावर लहानपणापासून गारूड केलं होतं. गांधीजींचा ध्यास नरसींनी वर्णन केलेला खरा वैष्णव बनण्याचाच होता.

त्यामुळे गांधीजींनी तुकाराम गाथा हाती घेतली असेल तेव्हा त्यांना 'जे का रंजले गांजले' हा अभंग सर्वात आधी आपला वाटला असावा. गांधीजींनी आपल्या अनुवादातही सर्वात वरचे स्थान याच अभंगाला दिले आहे.

शाळेतल्या निबंधपासून प्रमुख पाहुण्याच्या वापरून गुळगुळीत झाला असला तरी पुन्हा एकदा मूळातून वाचायला हवा. 'आपल्या नोकरचाकरांवर मूलासारख प्रेम करणारा तोच खरा साधू' अशी रोकडी व्याख्या त्यात आहे. आनंदाची गोष्ट ही इथे ही व्याख्या आणि त्याचा अनुवाद हे शब्दांचे बुडबुडे नाहीत. दोन्ही महात्म्यांनी हे शब्द आपल्या जीवनात उतरवून दाखविलेत.

जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपले ।। १।।

तोची साधू ओळखावा ।। देव तेथे चि जाणावा ।।धृ.।।

मृदू सबाह नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ।। २।।

ज्यासि अंपगिता नाही । त्यासि घरी जो हृदयी ।। ३।।

दया करणे जे पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ।। ४।।

तुका म्हणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ।। ५।।

Know him to be a true man who takes to his bosom those who are in distress. Know that God resides in the heart of such a one. His heart is saturated with gentleness through and through. He receives as his only those who are forsaken. He bestows on his man servants and maid servants the same affection he shows to his children. Tukaram says: What need is there to describe him further? He is the very incarnation of divinity.

गांधीजी आणि आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचा प्रवास एकाच दिशेने पण समांतर झाला. आंबेडकरवाद्यांनी गांधीजींना समजून घेतले नाही आणि गांधीवाद्यांनी आंबेडकरांना. दोघांचा वारसा सांगणाऱ्या पुढाऱ्यांनी या दोघांना एकत्र आणलं ते फक्त राजकीय फायद्यासाठी. अन्यथा या दोन्ही विचारधारा जवळही येऊ नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून प्रयत्न केले.

असे कितीही प्रयत्न केले असले, तरी अनेक बाबतीत गांधी आणि आंबेडकर एकमेकांची गळाभेट अनेकदा झालीय. तुकाराम त्यातली एक गोष्ट. स्वत:ला 'यातिहीन' म्हणणारा आणि विद्रोहाची पताका उंचावणारा तुकाराम आंबेडकरांना आपलासा वाटलाच. पण तितकाच 'विष्णुदास' असणारा आणि पदोपदी संतसंग मागणारा तुकाराम गांधीजींना आवडणे तितकेच स्वाभाविक होते. आपण दोघांच्याही पूर्वपरंपरेत शोभून दिसणारा तुकाराम समजून घेऊया. एकदा ते झाले की गांधी आणि आंबेडकर दोघेही आरशासारखे समोर दिसू लागतील.

महारासि सिवे। कोपे ब्राम्हण तो नव्हे।।

तया प्रायश्चित्त कांही। देहत्याग करितां नाही।।

नातळे चांडाळ। त्याचा अंतरी विटाळ।।

ज्याचा संग चित्ती। तुका म्हणे तो त्या याती।।

He who becomes enraged at the touch of a Mahar is no Brahmin.

There is no penance for him even by giving his life.

There is the taint of untouchability in him who will not touch a Chandal.

Tuka says: A man becomes what he is continually thinking of.

नंतरच्या काळात सर्वोदयीचे आश्रमातल्या प्रार्थना, भजन हे सारे माणसं घडवण्याचेच प्रयोग होते. स्वत: मोहनदासाचा महात्मा बनण्याचा प्रवासही अशाच प्रयोगांचा होता. प्रयोग, सत्याचे प्रयोग. साधन स्वत:, साधक स्वत: आणि साध्यही स्वत:चंच. तुकारामही असेच आतआत डोकावत सत्यापर्यंत पोहोचलेले. भगवंताच्या भेटीसाठी स्वत:च धावायचं, स्वत:च पडायचं, स्वत:च स्वत:ला हुरूप द्यायचा आणि स्वत:च स्वत:ला घडवायचं. तुकारामांचा कोणी गुरु नाही. गांधीजींचही तसंच. त्यांनी अनेकांचा गुरु म्हणून उल्लेख केला, पण फुलटाइम गुरु त्यांनाही नव्हता.

तसं पाहिलं, तर सद्विचार हेच या दोघांचे मार्गदर्शक होते. हे विचार जीवनात उतरवण्यासाठी दोघांनीही आटापिटा केला. विचार जीवनात उतरविणं हेच ज्ञान असतं. सॉक्रेटिस याविषयी ठाम सांगतो , virtue is knowledge असे विविध सद्विचार गांधीजींनी आश्रम भजनमाला मध्ये एकत्र आणले आहेत. आजचा अभंग संतपणाबद्दलचा.

नाहीं संतपण मिळतें हें हाटीं। हिंडतां कपाटीं रानींवनीं ।।

नये मोल देतां राशी । नाहीं तें आकाशीं पातळीं तें।।

तुका म्हणे मिळे जिवाचियें साठीं । नाहीं तरीं गोष्टी बोलों नये ।।

Saintliness is not to be purchased in shops nor is it to be had for wandering nor in cupboards nor in deserts nor in forests. It is not obtainable for a heap of riches. It is not in the heavens above nor in the entrails of the earth below. Tuka says: It is a life’s bargain and if you will not give your life to possess it better be silent. 24-10-1930

पावन देश कोणता, तुकाराम महाराज म्हणतात, जेथे हरिचे दास जन्म घेतात तो. त्या अर्थाने महाराष्ट्र आणि सौराष्ट्र हे दोन्ही प्रदेश अती पावन. संतांची मांदियाळी दोन्हीकडे बहरली. गांधीजी सौराष्ट्रातलेच. दुदैर्व हे की सौराष्ट्रातली जातीची उतरंड अजूनही पूर्णपणे ढळलेली नाही. तुकारामांनंतर शंभर वर्षांतच देहू ते पंढरीच्या वाटेत असणाऱ्या पुण्यात अस्पृश्यांना थुंकण्यासाठी गळ्यात गाडगी बांधावी लागली.

पण म्हणून भागवत धर्माने केलेल्या क्रांतीचं महत्त्व कमी होत नाही. महाराष्ट्रात अशी एकही जात नव्हती ज्यात त्याकाळी एकही संत झाला नाही. तुकोबांनी आपल्या अभंगात या संतांची जातवार यादीच दिली आहे. हा एक सामाजिक दस्तावेजच आहे. ज्ञानदेवे रचिला पाया... तुका झालासे कळस या बहिणाबाईंच्या अभंगा इतकाच मोलाचा.भारतीय इतिहासातील एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा हा सज्जड पुरावा आहे. गांधीजींनी अनुवादासाठी हा अभंग निवडला नसता तरच नवल. त्यांनी उभ्या केलेल्या स्वातंत्र्य संगरातही अशीच समाजाच्या प्रत्येक घटकांत त्यांना जागृती अपेक्षित होती. काही प्रमाणात ती सफलही झाली. दोन्ही क्रांत्या अस्सल भारतीय मातीतल्या होत्या. दोन्ही तत्त्वज्ञानांचं अधिष्ठान भक्ती होतं. परिभाषा ही आध्यात्मिक होती, भारतीयांच्या मनात रूजलेली. त्यामुळेच वेदांचा हवाला देत जाती-धर्म नाकारण्यात विरोधाभास उरला नाही...

पवित्र तें कुळ पावन तो देश। जेथें हरिचे दास घेती जन्म।।

कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक।।

वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं।।

अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं।।

वैश्य तुळाधार गोरा कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ।।

कबीर मोमीन लतिब मुसलमान। शेणा न्हवी जाण विष्णूदास।।

काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु। भजनीं अभेदू हरिचे पायीं।।

चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सवेर्श्वर ऐक्य करी ।।

नामयाची जनी कोण तिच भाव । जेवी पंढरीराव तियेसवें।।

मैराळ जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों।।

यातायातीधर्म नाहीं विष्णूदासा । निर्णय हा ऐसा हा वेदशास्त्रीं।।

तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ। तारिले पतित नेणों किती।।

Blessed is that family and that country where servants of God take birth. God becomes their work and their religion. The three worlds become holy through them. Tell me who have become purified through pride of birth? The Puranas have testified like bards without reserve that those called untouchables have attained salvation through devotion to God. Tuladhar, the Vaishya, Gora, the potter, Rohidas, a tanner, Kabir, a Momin, Latif, a Muslim, Sena, a barber, and Vishnudas, Kanhopatra, Dadu, a carder, all become one at the feet of God in the company of hymn singers. Chokhamela and Banka, both Mahars by birth, became one with God. Oh, how great was the devotion of Jani the servant girl of Namdev! Pandharinath (God) dined with her. Meral Janak’s family no one knows, yet who can do justice to his greatness? For the servant of God there is no caste, no varna, so say the Vedic sages. Tuka says: I cannot count the degraded.

नामजपाला भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानात मोठी जागा मिळाली आहे. भगवत्भक्तीच्या या पहिल्या पायरीबद्दल संतसाहित्यात सर्वाधिक लिहिले गेलंयं. विशेष म्हणजे सामाजिक दृष्टी असलेल्या संतांनी आणि वेदांताचा पुरस्कार करणाऱ्या नव्याजुन्या तत्त्ववेत्त्यांनीही नामजपला प्राधान्य दिले आहे.

तुकाराम महाराजांनी अनेक अभंगांमध्ये याच नामजपाचं महात्म्य गायले आहे. आजचा अभंगही त्यातलाच एक. हा अभंग सांगतो, विठोबाला शरण जाणं आणि त्याच्या नामाचा जप करणं हेच सगळ्या ज्ञानाचे सार आहे. मात्र लोक यापैकी पहिला भाग सोडून केवळ दुसरा दर्शनी सोपा वाटणारा नामजपाचाच मार्ग उचलतात. त्यामुळे देवाचिये द्वारी क्षणभरच काय तासंतास उभं राहूनही अधीर्मुर्धी मुक्तीही मिळत नाही.

गांधीजींनी अनेकदा रामनामाचा महिमा सांगितला आहे. त्यांच्या या श्रद्धेविषयीचे काही प्रसंगही आहेत. एवढंच नाही तर शेवटचा श्वास घेतानाही त्यांच्या मुखी रामनामच होतं.

वेद अनंत बोलला । अर्थ इतकाचि शोधिला ।।

विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावें ।।

सकळशास्त्रांचा विचार ।अंति इतकाचि निर्धार ।।

अठरापुराणी सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ।।

The essence of the endless Vedas is this:

Seek the shelter of God and repeat His name with all thy heart.

The result of the cogitations of all the Shastras is also the same;

Tuka says: The burden of the eighteen Puranas is also identical.

'कसं जगायचं, कसं वागायचं' या विषयावरच सर्वाधिक आणि सवोर्त्तम चिंतन भारतात झालं. दुदैर्व हेच आयतेपणाला मिळालेल्या फाजील प्रतिष्ठेमुळे या सगळ्या चिंतनाचे वाटोळे झाले. कर्मसिद्धांत, कर्मकांड यांना तर अकर्मण्यतेसाठी पूरेपूर वापरून घेण्यात आलं.

'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' चही तेच झालं. वास्तविक हे समर्पण आणि भगवतनिष्ठेच्या परमावधीचे तत्त्वज्ञान आहे. मी भगवंताचे काम करीन, तर माझा चरितार्थ तोच चालवेल असा विश्वास सांगणारं हे तत्त्वज्ञान. हे जीवनात उतरवणही महाकर्मकठीण.

भारतीय तत्त्वज्ञानावरची राख झटकताना संतांनी प्रामुख्याने कर्मयोगाचाच अंगार फुलवला. कबीर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, चोखामेळा यांनी शिकवला तो आत्मगौरवातून उभा राहणारा कर्मवादच. गेल्या शतकातही विवेकानंद, टिळक, अरविंद, गांधीजी, विनोबा, गाडगेबाबा यांनीही हाच कर्मयोग वेगवेगळ्या परिभाषेत मांडला.

तुकारामांनी या अभंगात आपल्या नेहमीच्य पद्धतीने रोकडा कर्मवाद मांडला आहे. योग्य अयोग्य हे असं आहे. आता तुम्हीच काय करायचं ते ठरवा असं सांगणारा हा तुकोबाचा कर्मवाद... आणि गांधीबाबाचाही.

पुण्य पर उपकार पाप ती परपीडा । आणिक नाही जोडा दुजा यासी ।।

सत्य तो चि धर्म असत्य ते कर्म । आणिक हे वर्म नाही दुजे ।।

गति ते चि मुखी नामाचे स्मरण । अधोगती जाण विन्मुखते ।।

संताचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ।।

तुका म्हणे उघडे आहे हित घात । जयाचे उचित करा तैसे ।।

Merit consists in doing good to others, sin in doing harm to others.

There is no other pair comparable to this.

Truth is the only religion (or freedom); untruth is bondage,

there is no secret like this.God’s name on one’s lips is itself salvation,

disregard (of the name)know to be perdition.

Companionship of the good is the only heaven,studious indifference is hell.

Tuka says: It is thus clear what is good and what is injurious, let people choose what they will.

गांधीजींना मराठी येत होतं का, बहुधा नव्हतंच. महाराष्ट्रात त्यांचं अनेक वर्षाचं वास्तव्य, मराठीचं गुजराती-हिंदी-संस्कृतशी असलेलं साम्य यामुळे त्यांना निदान मराठी कळत असावं, असं मानता येईल. असं असतानाही त्यांनी तुकारामांच्या गाथेमधल्या शेकडो अभंगांमधून अवघे सोळा अभंगांची केलेली निवड निव्वळ अप्रतिम आहे.

तुकारामांच्या अभंगांचे अनुवाद आश्रम भजनावलीसाठी आहेत. त्यातून गांधीजींचं सगळं तत्त्वज्ञान आणि संस्कार स्पष्ट होतात. गांधीजींनी आपले वाटतील ते ते अभंग यात निवडले आहेत. त्यामुळे तुकोबांच्या अभंगांची निवड एवढी उत्तम झाली असावी.

अर्थात या अभंगांचे अर्थ समजून घेण्यासाठी त्यांना अनेकांची मदत झाली असेलच. महादेवभाई देसाई, स्वामी आनंद, काका कालेलकर, विनोबा, किशोरीलाल मश्रूवाला या गांधीजींच्या सगळ्या सावल्यांना मात्र मराठी उत्तम येत होतं. त्यापैकी काहीजण अनुवादाच्या प्रसंगी येरवड्यालाही सोबत होते. पण त्यांनी शब्दांचे अर्थ सांगितले असतील, या हृदयीचे त्या हृदयीपर्यंत पोहोचलेला भाव ट्रान्स्लेट होण्यासाठी हवं असतं अद्वैत. ते या दोन महात्म्यांमध्ये निश्चित होतं.

लगेच आठवणारे तुकारामांचे बहुतेक अभंग या सोळा अभंगांमध्ये सापडतात ते उगाच नव्हे! उदाहरणार्थ पुढे गाणं म्हणून गाजलेला, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हा अभंग.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हात धरुनिया ।।

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालविसी भार सवे माझा ।।

बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा ।।

अवघे जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ।।

तुका म्हणे आता खेळतो कौतुके ।जाले तुझे सुख अंतर्बाही ।।

Wherever I go, Thou art my companion.

Having taken me by the hand Thou movest me.

I go alone depending solely on Thee.

Thou bearest too my burdens.

If I am likely to say anything foolish,

Thou makest it right.

Thou hast removed my bashfulness and madest me self-confident,

O Lord. All the people have become my guards, relatives and bosom friends.

Tuka says: I now conduct myself without any care.

I have attained divine peace within and without.

तुकारामांचा गांधीजींच्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर प्रभाव होता. त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्यांनीही तो प्रभाव नोंदवलाही आहे. ‘लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका’ नावाचं सदाशिव विनायक बापट यांचं पुस्तक आहे. त्यात १९१७ सालच्या आठवणींमध्ये त्यांनी लिहिलं आहे, ‘आश्रमाची सर्व व्यवस्था पाहून आम्ही परत येत असता निम्या वाटेवर महात्माजी आश्रमाकडे चालले आम्हास भेटले. भगवद्भक्त श्री तुकोबाप्रमाणे ती शांत वैराग्यमूर्ती डोक्यास गुजराथी पांढरे पागोटे घालून अंगात खादीचा अंगरखा घातलेली अनवाणी येत असलेली आम्ही दुरून पाहिली‘.

लोकमान्यांच्या प्रभावात असलेल्या बापटांचे हे निरीक्षण आहे, हे विशेष. वास्तविक टिळकवादी बड्या नेत्यांनी गांधीजींना कधीच आपले मानले नाही. उलट राष्ट्रीय लढ्याचे केंद्र पुण्यातून हलले याविषयी कायम हळहळ व्यक्त केली. त्यात ब्राह्मण बहुजन असा संघर्षाचाही एक पदर होता. त्यातून मग गांधीजींवर विखारी टीका झाली.

असं असलं तरी गांधीजींना टिळकांविषयी प्रचंड आदर होता. आपल्या महाराष्ट्रयात्रेचे वर्णन करताना त्यांनी लिहिलं आहे, जिथे लोकमान्य टिळक महाराजांचा जन्म झाला. आधुनिक युगाचे नायक असलेले शिवाजी महाराजांची जी भूमी आहे. जिथे तुकारामांनी आपले कार्य केले. ती महाराष्ट्राची भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्राइतकीच पवित्र आहे... महाराष्ट्राने एकदा ठरवलं की तो कोणतीही अशक्य गोष्ट वास्तवात उतरवू शकतो, असं मी नेहमीच म्हणतो.

वादाचे, कार्यपद्धतीतले फरक असले तरी टिळक आणि गांधी या दोन्ही महापुरुषांमधले अद्वैतही आगळे होते. त्यामुळेच तर टिळकांच्या नेतृत्त्वाची धुरा गांधीजींनी यशस्वीपणे खांद्यावर घेतली. दोघांच्याही तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान श्रीमद्भगवद्गीताच होते. गांधीजींवर तुकारामांचा प्रभाव होता. टिळकांवरही तो होताच होता. गीतारहस्याची सुरुवात तुकोबांच्याच अभंगाने झाली आहे. गीतारहस्यात तुकोबांचे एकूण २३ अभंग आहेत. टिळक आणि गांधी उपकारे देह कष्टवणाऱ्या या दोन विभूती होत्या.

काय वाणू आता न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ।

थोरीव सांडिली आपुली परिसे । नेणे सिवों कैसे लोखंडाशी ।

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती उपकारें।

भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देही ।

तुका म्हणे सुख पराविया सुखें। अमृत हे मुखे स्रवतसे ।

How now shall I describe (the praises of the good);

my speech is not enough (for the purpose).

I therefore put my head at their feet.

The magnet leaves its greatness and does not know that it may not touch iron.

Even so good men's powers are for the benefit of the world.

They afflict the body for the service of others.

Mercy towards all is the stock-in-trade of the good.

They have no attachment for their own bodies.

Tuka says: Others' happiness is their happiness; nectar drops from their lips.

१०

आपल म्हणजे भारतीय अध्यात्म म्हटल की जगण्यापासून पळून गेलेला जंगलामध्ये ध्यान लावून बसलेला साधुबुवा आठवतो. मोक्ष हेच आपल्या अध्यात्माचे अंतिम ध्येय, मग समष्टीचा, समाजाचा त्याच्याशी काय संबंध, अस वाटत खर. पण जगन्मिथ्या मानणाऱ्या शंकराचार्यांनी भारतभर चारदा परिक्रमा का केली? भवसागर पार करण्याविषयी बोलणाऱ्या संतांनी सर्वसामान्यांची काळजी का वाहिली?

मला मुक्ती नको, असं रोकडेपणे सांगणारा तुकोबा या प्रश्नांची अगदी खणखणीत उत्तर देतात. आजच्या अभंगात हे उत्तर अगदी सविस्तर आहे. नाहीतर आधीच्या वाक्यात 'बैसला गोविंद जडोनिया चित्ती' म्हणणारा तुकाराम पुढच्याच वाक्यात 'बळबुद्धी त्याची उपकारासाठी' कसे सांगतात ? चित्ती गोविंद जडवण्यासाठी बळबुद्धी उपकारासाठी वापरण्याचं हे अध्यात्म आहे. हे आर्मचेअर तत्त्वज्ञान नाही, जीवनाचं, जगण्याचं आणि मातीशी जोडलेलं तत्त्वज्ञान आहे.

भवसागरातून पार व्हायचं आहे, हे खरं. पण त्यासाठी संसार सोडून संन्यास नको. उलट सुखी संसारच हवा. आपले देव, ऋषी, आचार्य, संत सगळे बहुतांशी संसार करणारे आहेत.सगळ्या महापुरुषांनी लोकांमध्ये लोकांसारखं राहुन लोकांमधला राम जागवून रामाला आपल्याशी जोडण्याचे काम त्यांनी केलं. रामाचे काम करण्याचा त्यांचा मार्ग हाच होता आणि हाच मार्ग असू शकतो. तुकाराम आणि गांधीजी दोघांचीही आयुष्य याला साक्ष आहेत.

मुक्तिपांग नाही विष्णुचिया दासा । संसार तो कैसा न देखती ।।

बैसला गोविंद जडोनिया चित्ती ।आदि तेचि अंती अवसान ।।

भोग नारायणा देऊनि निराळी । ओविया मंगळी तोचि गाती ।।

बळबुद्धी त्यांची उपकारासाठी । अमृत ते पोटी साठवले ।।

द्यावेत तरी देवा च सारिखी । आपुली पारखी नोळखती ।।

तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ।।

To the servants of Vishnu there is no yearning even for salvation;

they do not want to know what the wheel of birth and death is like.

Govind sits steadily settled in their hearts; for them the beginning and the end are the same.

They make over happiness and misery to God and themselves remain untouched by them,

the auspicious songs sing of them.

Their strength and their intellect are dedicated to benevolent uses;

their hearts contain gentleness.

They are full of mercy even like God; they know no distinction between theirs and others’.

Tuka says: They are even like unto God and Vaikuntha is where they live.

११

आजकाल साधू आणि संत म्हणवून घेणाऱ्यांचे मठ आणि आखाडे एकमेकांविरुद्ध खरोखरच्या आखाड्यात उभे असल्यासारखे झगडत असतात. त्यांच्यात वर्षानुवर्षं कोर्टकेस सुरु असतात. साधुबोवांना सिक्युरिटी घेऊन फिरावं लागतं. असे आपल्या संतसमाज वगैरे युनियन बनवणारे हे संत खऱ्या संतांना कसं काय ओळखू शकणार. खरा भक्तच दुसऱ्या भक्ताला ओळखू शकतो.

म्हणून तर विठ्ठलाचे समकालीन भक्त एकटेदुकटे नाही, तर मांदियाळीने फिरत आलेले दिसतात. त्यांनी एकत्र यात्रा केलेल्या आहेत. एकमेकांशी चचेर्तून, एकमेकांच्या व्यक्तित्वातून प्रेरणा घेत विकसित झालेले आहेत. भगवंताच्या आणखी जवळ गेले आहेत. कधी ज्ञानोबांच्या प्रभावातून नामदेवांनी गुरु करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो, तर त्याचवेळेस नामदेवांमुळे ज्ञानेश्वर योगाच्या प्रभावातून बाहेर पडून भक्तीकडे आलेले दिसतात. याचमुळे ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत वारकरी संप्रदायाने सदैव आपल्या पूर्वसूरींकडे केवळ आदराने पाहिलेले आहे.

फक्त आपल्या संप्रदायातीलच नाही, तर अन्य संप्रदायांतील संतांशी या संतांचं फार सौहार्दपूर्ण संबंध होते. नामदेव, तुकाराम, एकनाथ हे तर सुफी संतांशीही अगदी आपलेपणाचे वागल्याचे दाखले आहेत.

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारुनि ।।

विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे धन जन माता पिता ।।

निर्वाणी गोविंद असे मागेंपुढें । कांहीच सांकडे पडो नेदी ।।

तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साहे । घातलिया भये नरका जाणें ।।

He is a devotee who is indifferent about body, who has killed all desire,

whose one object in life is (to find) Narayana,

whom wealth or company or even parents will not distract,

for whom whether in front or behind there is only God in difficulty,

who will not allow any difficulty to cross his purpose.

Tuka says: Truth guides such men in all their doings.

१२

गांधीजींच्या लिखाणात , वक्तव्यांत तुकारामांच्या उल्लेख अनेकदा आलाय. गांधींचे समग्र साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे , त्यात ' तुका ' असा सर्च दिला , की अनेक संदर्भ समोर येतात.

त्यातला महत्त्वाचा संदर्भ वाईच्या भाषणाचा आहे. त्यात असहकार आंदोलनाची तात्त्विक भूमिका समजावून सांगताना त्यांनी तुकारामांचा दाखला दिला आहे. त्यात गांधीजींना ' कठीण वज्रास भेदू ऐसे ' आणि ' नाठाळाच्या माथी हाणू काठी ' सांगायचं असावं , असं वाटतं. महाराष्ट्रयात्रेच्या संदर्भात त्यांनी तुकोबांचा केलेला उल्लेख याच सदरात पूवीर् एकदा आला आहे.

पुढे हरिजनांच्या सभेसमोर हिंदूधर्माचं मोठेपण सांगताना त्यांनी हा ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा धर्म असल्याचे सांगितले आहे. हा धर्म चिरकाल टिकणार आहे , असं त्यांनी पुढे म्हटलं आहे. आंबेडकरांच्या धर्मांतराकडे आकर्षणाऱ्या दलितांना हिंदूधर्मात ठेवण्याची गांधीजींची कळकळ होती. कदाचित त्याचाही संदर्भ याला असू शकेल. याच भाषणात दाक्षिणात्य संत थिरुवल्लुवर यांची तुलना केवळ तुकारामांशीच होऊ शकते , असं सांगत ते तुकोबाचं मोठेपण अधोरेखित करतात.

बंगालहून पाठवलेल्या एका पत्रात गांधीजी देवाच्या अवतारांविषयी लिहितात. तुकाराम , ज्ञानेश्वर , नानक , कबीर हे दैवी अवतार नव्हते का , असा सवाल त्यांनी विचारला आहे. गावांच्या विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांनी तुकारामासारख्या संतांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी , असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच गोपुरी आश्रमातील एका अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्या आग्रहानंतर विनोबांनी तुकारामांचा अभंग गायल्याची आठवणही त्यांनी एका प्रार्थनासभेत सांगितली आहे. तसेच आणखी एका अशाच प्रार्थनासभेत बाळासाहेब खेर आणि ठक्करबापांच्या उपस्थितीत त्यांनी तुकारामांचा ' पापाची वासना नको दावूं डोळा ' हा आवडता अभंग उद्धृत केला आहे.

डॉ. इंदुभूषण भिंगारे यांनी तुकाराम गाथेचं हिंदी भाषांतर केलं होतं. त्याची एक छोटी प्रस्तावना गांधीजींनी लिहिली आहे. आपल्याला फारसं मराठी येत नसलं तरी मला तुकाराम खूप प्रिय आहे , असं त्यांनी यात आवर्जून लिहिलं आहे. या गाथेसाठी त्यांनी शांतिनिकेतनातून खास तुकारामांचं चित्र काढून घेतलं होतं. गांधीजींनी अनुवादित केलेला तुकोबाचा आणखी एक अभंग.

न कळता काय करावा उपाय । जेणे राहे भाव तुझ्या पायी ।।

येऊनिया वास करिसी हृदयी । ऐसं घडे कई कासयाने ।।

साच भावे तुझे चिंतन मानसी । राहे हे करिसी कैं गा देवा ।।

लटिके हे माझे करुनिया दुरी । साच तू अंतरी येउनि राहे ।।

तुका म्हणे मज राखावे पतिता। आपुलिया सत्ता पांडुरंगा ।।

When one does not know, what is one to do so as to have devotion to Thy sacred feet?

When will it so happen that Thou wilt come and settle in my heart?

O God, when wilt Thou so ordain that I may meditate on Thee with a true heart?

Remove Thou my untruth and, O Truth, come and dwell Thou in my heart.

Tuka says: O Panduranga, do Thou protect by Thy power sinners like me.

१३

'नेमिले या चित्तापासुनिया ' चा इंग्रजी अनुवाद करताना गांधीजींनी मेडिटेट असा शब्द वापरला आहे. मेडिटेशन म्हणजे ध्यान. त्याचा थेट संबंध चित्ताशी आहे. चित्तामधले तरंग नाहीशे करणे म्हणजे योग , असं भगवान पतंजली सांगतात. ध्यान त्या योगाची एक पायरी. त्यामुळे चित्त म्हणजे योग असं समीकरण बांधलं गेलं आहे.

भगवान पतंजलींनी सांगितलेला योग देव मानणारा आहे की नाही , यावर बरीच मतमतांतरे आहेत. पण असे वाद पुस्तकं लिहिणाऱ्या विद्वानांसाठी असतात किंवा मग डॉक्टरेट मिळवणाऱ्यांसाठी तरी. तुकारामांच्या काळी डॉक्टरेट नव्हती. मग असे लोक शास्त्रार्थाचा किस पाडत मोठे पंडित बनत. त्यातलेच मग तुकारामांना गाथा इंद्रायणीत बुडवण्याचे फतवे काढत. आता इंटरनेटवर एक सर्च मारला की जगभरची विद्वत्ता आपल्या बोटांजवळ येऊन पडते. या ग्लोबल जगात अशा पंडितांची दुकानं बंद पडली आहेत , हे बरं झालंय. पण सर्च मारून मंबाजी होता येईल , तुकाराम नाही.

तुकारामांना या अशा वादांशी काही घेणंदेणं नव्हतं. तत्त्वज्ञानासाठी त्यांचं जीवन नव्हतं. त्यांच्या जीवनात तत्त्वज्ञान जगायचं होतं. त्यामुळे मग त्यांचा योग त्यांच्या पांडुरंगाशीच होता. योग म्हणजे जोडलं जाणं. ते पूर्णपणे पांडुरंगाशी जोडले गेले होते. तुकारामांनी पतंजलींनी लिहिलेली थिअरी अभ्यासली असेलही , नसेलही. पण त्याने काय फरक पडतोय. ते ती थिअरी प्रॅक्टिकलमधे आणत होते. किंबहुना पतंजलींनी त्यांच्या भोवतालच्या तुकारामांसारख्या योग्यांच्या जीवनातच आपली सूत्र शोधली असतील.

पतंजलींचं एक भन्नाट योगसूत्र आहे , ' वीतरागविषयं वा चित्तम् '. संतांना आपल्या चित्ताचा विषय बनवा , असा त्याचा साधा अर्थ. आपण ज्यांच्याविषयी विचार करतो , तसे बनतो. संतांचा विचार करा , त्यांच्यासारखे व्हाल. पण रोजच्या व्यवहारातही हे तुकड्या तुकड्यात वापरता येण्याजोगं तत्त्वज्ञान आहे. कॉपोर्रेट जगात आपल्याला एखादा गुण आपल्यात हवा , असं वाटतंय. मग तसा रोजच्या पाहण्यातला माणूस शोधा. त्याचं बारीक निरीक्षण करा. त्या माणसाच्या त्या गुणासंबंधी विचार करून बघा. आपल्यात त्याच्यातला तो गुण कमीअधिक कधी येईल ते कळत पण नाही.

माणसंच आपल्याला शिकवत असतात. पुस्तकं नाहीत. पुस्तकांनी शिकवलं असं वाटलं , तर बारकाईनं विचार करा. बहुतेक त्या पुस्तकातल्या माणसांनीच आपल्याला शिकवलेलं असतं. गांधीजी , तुकाराम असेच शिकले असावेत.

आणिक दुसरे मज नाही आता । नेमिले या चित्तापासुनिया ।।

पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी । जाग्रती स्वप्नी पांडुरंग ।।

पडिले वळण इंदिया सकळां । भाव तो निराळा नाही दुजा ।।

तुका म्हणे नेत्री केले ओळखण । साजिरे ते ध्यान विटेवरी ।।

This heart of mine is determined that for me now there is nothing else;

I meditate on Panduranga, I think of Panduranga,

I see Panduranga whether awake or dreaming.

All the organs are so attuned that I have no other desire left.

Tuka says: My eyes have recognized that image standing on that brick transfixed in meditation unmoved by anything

१४

आतापर्यंत एकही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनलेला नाही , अशी दोन महत्त्वाची राज्यं कालपर्यंत होती , एक महाराष्ट्र आणि दुसरं बंगाल. आज प्रतिभा पाटलांनी शपथ घेतली की महाराष्ट्र या यादीतून गळेल. या दोन राज्यांत अनेक साम्य असली तरी राष्ट्रपती-पंतप्रधान नसणं , हा निव्वळ योगायोग नाही.

या दोन्ही राज्यांनी गेल्या दोनशे वर्षांत एकमेकांवर खूप प्रभाव पाडलाय. बंगालचा आपल्या संस्कृती साहित्यावरचा प्रभाव आपल्याला ठावूक आहेच. पण महाराष्ट्राचा प्रभावही बंगालवर आहे. गुरुदेव रवींदनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या बंगाली कवितेचा पुलंनी केलेला अनुवाद शाळेच्या पुस्तकात अभ्यासालाच आहे. पण गुरुदेवांच्या तोडीचेच महाकवी असणाऱ्या अरविंद घोषांनी आपल्या पल्लेदार इंग्रजीत एक दीर्घकविता केलीय , कोणावर माहीतेय , बाजीप्रभूंवर.

गुरुदेव टागोरांवर तुकारामांचाही प्रभाव होता. त्यांनी तुकारामांचे बारा अभंग बंगालीत अनुवादितही केले आहेत.गुरुदेव आणि गांधीजींचे अगदी घनिष्ट संबंध होते. पण गुरुदेवांना तुकाराम आधीपासूनच माहीत होता. भारतातील पहिले आयसीएस आणि वडील बंधू सत्येंदनाथांमुळे रवींदनाथ तुकारामांकडे आकषिर्ले गेले.

गांधीजींमुळे गुरुदेवांच्या अगदी जवळच्या एका कलाकाराला तुकाराम कळला. तो कलाकार म्हणजे नंदलाल बोस. ते जागतिक कीतीर्चे चित्रकार. जगभर त्यांची प्रदर्शने भरली होती. तीस वर्ष त्यांनी शांतिनिकेतनातल्या कलाभवनचं प्रमुखपद भुषवलं. गांधीजींनी त्यांना तुकारामाची चित्र काढण्याची विनंती केली होती. डॉ. इंदूभुषण भिंगारेंनी तुकारामांच्या अभंगांचं ' तुकाराम की राष्ट्रगाथा ' या नावाने हिंदी भाषांतर केलं होतं. त्याला गांधीजींनी प्रस्तावना लिहिली आहे. आणि या पुस्तकात तुकारामांची चांगली चित्रं छापून यावीत म्हणून नंदलाल बोसांकडून चित्रं काढून घेतली. यात पुस्तकात बोसांची तीन चित्रे आहेत.या तुकारामाला गांधीजी , रवींदनाथ आणि नंदलाल बोस अशा तीन दिग्गजांचा स्पर्श असल्याचा विचार डोक्यात येतो. आणि मग हा तुकाराम वेगळाच वाटू लागतो.

न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो।।

ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणि लोकांसी हेचि सांगे।।

विटंबो शरीर होत का विपत्ती । परि राहो चित्ती नारायण।।

तुका म्हणे नासिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेचि हेत।।

What though I get nothing to eat and have no progeny? I

t is enough for me that Narayana’s grace descends upon me.

My speech gives me that advice and says likewise to the other people.

Let the body suffer; let adversity befall one,

enough that Narayana is enthroned in my heart.

Tuka says: All the above things are fleeting; my welfare consists in always remembering Gopal.

१५

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र ग्यानबा तुकारामाच्या गजरात डोलत असताना , आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तुकारामाचे शब्द ऐकू आले. नव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या पहिल्या भाषणात तुकारामांचा अभंग सांगितला. जे का रंजले गांजले...

विठ्ठलमुक्तीला साठ वर्ष होत असताना महाराष्ट्राची लेक देशातील सवोर्च्च पदावर बसते , हा एक आनंददायी योगायोग आहे. आणि तेव्हा ती लेक आपल्या भाषणात तुकाराम , गांधीजी आणि आंबेडकर या तिघांची नावं घेते , यापरता आनंद तो काय.

मावळते राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनाही तुकाराम माहित आहे. त्यांनीही त्यांच्या ' विंग्ज ऑफ फायर ' या प्रसिद्ध पुस्तकात तुकारामांचा अभंग दिलाय. बहुधा पद्मभूषण मिळाल्यानंतरचा आनंद व्यक्त करताना त्यांनी लिहिलंय , आनंदाचे डोही आनंद तरंग. या प्रकरणाचा हिंदीतला अनुवाद करताना प्रख्यात कवी गुलजारांनी या अभंगाचाही गोड हिंदी अनुवाद केला आहे. तो अगदी मिळवून वाचण्यासारखा आहे.

लागोपाठ दोन राष्ट्रपतींवरचा तुकारामांचा प्रभाव हा काय फक्त एक योगायोग मानायचा ?

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।

गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।

न लगे मुक्ती आणि संपदा । संतसंग देई सदा ।।

तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।

O God, grant only this boon. I may never forget Thee; and I shall prize it dearly. I desire neither salvation nor riches nor prosperity; give me always company of the good. Tuka says: On that condition Thou mayest send me to the earth again and again.

१६

सामाजिक परिवर्तनाचा रथ गांधीजींनी आणि त्यांच्या अनुयायांनी पुढे नेला. साने गुरुजींनी विठ्ठलमंदिराची मुक्तीचा दिलेला यशस्वी लढा याचं खणखणीत उदाहरण आहे.

विठ्ठलमुक्ती आंदोलनाचा यंदा हिरकमहोत्सव. विठ्ठलमंदिरात कथित अस्पृशांना प्रवेश मिळाला त्याला या १० मे रोजी साठ वर्षं पूर्ण झाली. दलितांच्या मंदिरप्रवेशासाठी एक ब्राम्हण नेता आपला जीव पणाला लावतो. आपल्याच जातीतल्या कट्टरांशी भांडतो. त्याच्या पाठिशी उभे राहतात तेही बहुसंख्य ब्राम्हणच. ही भारताच्या इतिहासातली एक फार मोठी घटना आहे. साने गुरुजींच्या दहा दिवसांच्या उपोषण काळात सेनापती बापट , आचार्य अत्रे , अच्युतराव पटवर्धन , दादासाहेब मावळंकर , बबनराव बडवे , पांडुरंग उत्पात , तात्या डिंगरे अशा ब्राम्हण पुढाऱ्यांनी आपली सारी पुण्याई चंदभागेच्या वाळवंटात उभी गुरुजींच्या मागे पुढे केली.

साने गुरुजी गांधीजींचं तत्त्वज्ञान आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच लढत होते. पण बडव्यांनी एका गांधीवादी पुढाऱ्याला गाठून गांधीजींना या आंदोलनाबद्दल गैरसमज करून दिले. त्यामुळे गांधीजींनी गुरुजींना उपोषण मागे घेण्याची तार केली. पण गुरुजी हाडाचे गांधीवादी. सत्य आपल्या सोबत असल्याचा पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी गांधीजींचा आदेशही धुडकावून लावला. लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळंकर यांनी गांधीजींचे गैरसमज दूर केल्यावर मात्र त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर लागलीच पावलं उचलली गेली आणि विठ्ठलमंदिर सर्वांसाठी खुले झाले.

तुकोबाच्या विठोबाची मुक्ती करण्यासाठी गांधीजींचं तत्त्वज्ञान धावलं. पण मुळात ते तत्त्वज्ञान तुकोबांच्या तत्त्वज्ञानापेक्षा वेगळं कुठे होतं ?

शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ।।

विसर तो न पडावा । माझा देवा तुह्यांसी ।।

पुढे फार बोलो काई । अवघे पायी विदित ।।

तुका म्हणे पडिलो पाया । करा छाया कृपेची ।।

This is my last prayer, saintly people listen to it,:

God, do not forget me; now what more need I say,

Your holy feet know everything.

Tuka says: I prostrate myself before Your feet,

let the shadow of Your grace descend upon me.

तुकाराम आणि शेक्सपीयर

अरुण अनंत भालेराव

अरुण अनंत भालेराव ( जन्म: ४ डिसेंबर १९४२)

शिक्षण : बी.ई.(इलेक्ट्रिकल),एम.बी.ए.

अभ्यासाचा विषय : तुकाराम

तुकारामांचा सर्वांगाने अभ्यास करताना तुकारामांच्या साहित्याचा अभ्यास व त्यांच्या इतर भूमिकांचा अभ्यासावर अनेक लेख किर्लोस्कर मासिकात लिहिलेले आहेत. तसेच एक "ई-तुका" नावाचा ब्लॉग नित्यनेमाने लिहितात. सध्या निवृत्त असून मुंबईस घाटकोपर येथे राहतात.

सर्व मोठी माणसे एकसारखाच विचार करीत असावेत. भाषा, काळ, वेगळाले असले तरी मुळात विचार एकसारखे असणे शक्य आहे का ? असा विचार शेक्सपीयर आणि तुकाराम महाराज यांचे साहित्य वाचून करण्याचे ठरविले, तर खूपच सारखेपणा आढळतो. वानगीदाखल शेक्सपीयरचे एक प्रसिद्ध वाक्य घेऊ: "नावात काय आहे ? " मुळात हे वाक्य रोमियो-ज्युलियट मध्ये ज्युलियटच्या तोंडी असे येते:"नावात काय आहे ? ज्याला आपण गुलाब म्हणतो ते दुसऱ्या कुठल्याही नावाने तेवढेच गोड, सुवासिक लागेल . ( व्हाट इज इन ए नेम? दॅट विच वि कॉल ए रोज, बाय एनी अदर नेम, वुड स्मेल ऍज स्वीट ! )." ह्याला समविचारी मराठी वाक्प्रचार लोक देतात: नाव सोनुबाई नि हाती कथलाचा वाळा ! म्हणजेच नावात काय आहे ? हाच मतितार्थ. हेच तुकाराम महाराज असे म्हणतात : "तुका म्हणे राजहंस ढोरा नावें , काय तया घ्यावे अळंकाराचे ॥ ( अभंग २००६,जोग प्रत ) ." म्हणजे एखाद्या बैलाचे "राजहंस" असे नाव ठेवले तर ह्या अलंकारिक नावाचा त्या बैलाला काय उपयोग ? असाच मतितार्थ असणारा अजून एक अभंग आहे : "सावित्रीची विटंबना , रांडपणा करीतसे ॥ काय जाळावे ते नाव , अवघे वाव असे तें ॥ कुबेर नाव मोळी पाहे , कैसी वाहे फजीती ॥ ( १४७७,जोग प्रत ). " नाव सावित्री पण विधवा झाल्यावर त्या नावाची फजीती. नाव कुबेर पण विकतो लाकडाच्या मोळ्या . अशी नावे काय जाळायची ? शेक्सपीयरच्या अवतीभवतीच्या सुबत्तेमुळे गुलाबासारखे गोड उदाहरण तो घेऊ शकला असेल व जीवनाच्या खडतर धबडग्यामुळे तुकाराम महाराज रोखठोक, पण जमीनीवरचे ( भले ते गोड, आशावादी नसेल ) उदाहरण घेत असतील. पण मुळातला विचार दोघांचाही सारखाच ! नावात काय आहे हा !

असेच एक प्रसिद्ध सुभाषित आहे, शेक्सपीयरचे, "चमकते ते सर्व सोनेच नसते"(ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड). मर्चंट ऑफ व्हेनिस (ऍक्ट २ सीन ७) ह्या नाटकातल्या ह्या वाक्याचा संदर्भ मजेशीर आहे. पोर्टियाचे स्वयंवर असते. तिच्या बापाच्या मृत्युपत्राबरहुकूम. तीन परड्या असतात. एक सोन्याची,एक चांदीची, नि एक शिसाची. परडीत पोर्टियाचे चित्र निघाले तर तो राजपुत्र तिला वरणार. मोरोक्कोच्या राजपुत्राला वाटते हिचे चित्र सोन्याच्या परडीतच असणार. तो सोन्याची परडी उचलतो. पण त्यात पोर्टिया ऐवजी मरणाचे चित्र असते व ओळी असतात : "ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड;ऑफन हॅव यू हर्ड दॅट टोल्ड; मेनी ए मॅन हिज लाइफ हॅथ सोल्ड; बट माय आउटसाइड टु बिहोल्ड; गिल्डेड टूम्ब्‍स डू वर्म्स एनफोल्ड ". राजपुत्र तिथून पळ काढतो व पोर्टिया म्हणते : ए जेंटल रिडन्स ! ( कटकट गेली!). सुभाषिताचा रूढ मतितार्थ आहे की सोन्यासारखे चमकणारे दिसत असले तरी सगळेच सोने नसते. म्हणजे, खऱ्या खोटयाचा निवाडा नीट समजून उमजून करावा. ह्याच थेट अर्थाचे तुकाराम महाराजांचे वचन आहे : "तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले , जरी हिंडवले देशोदेशी ॥". अजून एका अभंगात असेच आहे: "सोने दावी वरी तांबे तया पोटी , खरियाचे साठी विकू पाहे ॥ पारखी तो जाणे तयाचे जीवीचे , निवड दोहींचे वेगळाले ॥ क्षीरा नीरा कैसे होय एकपण , स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी ॥ तुका म्हणे थिता आपणची खोटा , अपमान मोठा पावईल ॥ ( ५४५ जोग प्रत )." थोडासा फरक करीत अशाच अर्थाचे अजून एक वचन आहे : " सोनियाचा कळस , माजी भरिला सुरा रस ॥ काय करावे प्रमाण , तुम्ही सांगा संतजन ॥ मृत्तिकेचा घट , माजी अमृताचा सांठ ॥ तुका म्हणे हित , ते मज सांगावे त्वरित ॥ ( ६७३ जोग प्रत )." इतक्या थेट, सारख्या विचाराचे असणे पाहून आसमंतातच असे सारखे विचार असतात की काय असा संशय यावा. कारण त्या काळात दळणवळण अगदी नगण्य आणि तरीही विचार पहा थेट ताजे आणि शेक्स्पीयरीयन ! भारतात आज जगाच्या एकूण सोन्याच्या उत्पादनातले जवळ जवळ ६० टक्के सोने वापरले जाते. आणि हे पूर्वापार चालत आलेले आहे. त्यामुळे शेक्सपीयरपेक्षा तुकाराम महाराजांना सोन्यासंबंधी ज्यास्त जाण असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे सोन्यासारखे चकाकणारे पितळ व खरे सोने ह्यासंबंधी तुकाराम महाराज सांगतात : "काळकूट पितळ सोने शुद्ध रंग , अंगाचेच अंग साक्ष देती ॥". म्हणजे पितळ हे जरी पिवळे आहे तरी कलंकाने काळेकुट्ट होते; आणि सोने हे पिवळे असून निरंतर शुद्ध राहते. एकूण काय शेक्सपीयर असो का तुकाराम दोघेही म्हणतात, चमकते ते सर्व सोनेच असत नाही !

शिर्डीच्या साईबाबांचे प्रसिद्ध वचन आहे :"सबूरी का फल मीठा ". ह्याच सबूरीबद्दल रविंद्रनाथ टागोरांनी म्हटलेय की "वि आर टू पुअर टु वेट ( आपण सबूरी राखू शकत नाही इतके गरीब आहोत )." ऑथेल्लो ह्या शेक्सपीयरच्या नाटकात असेच एक प्रसिद्ध सुभाषित येते : "हाऊ पुअर आर दे दॅट हॅव्ह नॉट पेशन्स" . ऑथेल्लो नाटकात इऍगो हे पात्र डेस्डेमोनाला ऑथेल्लो पासून खलनायक रॉड्रीगोला मिळवून देण्याचा कट रचतो. पण उतावीळ होऊन रॉड्रीगो लवकरच व्हेनिसला परततो व त्याला डेस्डेमोना मिळत नाही, असा ह्या वचनाचा संदर्भ आहे. अधीर असणे ह्या दोषामुळे शेक्सपीयरच्या बऱ्याच पात्रांना अपयश येते असे दाखवण्यात येते. धीराचे महत्व सांगणाऱ्या ह्या वचना पुष्ट्यर्थ शेक्सपीयर म्हणतो की, "असा कोणता घाव आहे जो थोडा थोडा न भरता एकदम मिळून येतो ?". अर्थातच शेक्सपीयरच्या काळातली युद्धसदृष्य परिस्थिती तुकाराम महाराजांच्या काळी नसावी म्हणून धीराचे महत्व ते वेगळ्या उदाहरणांनी सांगतात. "तुका म्हणे धीरा , विण कैसा होतो हिरा ॥". इथे हिरा कसा तयार होतो हे जाणावे लागते. पृथ्वीच्या आत खोल थरात असा प्रचंड दाब यावा लागतो की कार्बन असलेल्या वस्तू "हिरा" होतात. जुन्या चित्रपटात खाणींची दृश्ये आठवून पहा. ह्या हिरा होण्याच्या प्रक्रियेत प्रचंड काळ वाट पाहणे व दाब सोसणे ह्या सद्‍गुणांचा निर्देश तुकाराम महाराज असा करतात, ( फळाची वाट पाहण्यासाठी धीर धरावाच लागतो असे ते एका अभंगात असे म्हणतात) :"फळ कर्दळी सेवटी येत आहे , असे शोधिता पोकळीमाजी काये ॥ धीर नाही ते वाउगे धीर झाले , फळ पुष्प ना यत्न ते व्यर्थ गेले ॥". केळीच्या झाडास केळी व फूल अगदी शेवटी येणार. त्या अगोदर उतावीळपणा करून सर्वत्र उपटले तर सर्व व्यर्थच जाणार. हेच प्रमेय ते एके ठिकाणी असे देतात : "धीर तो कारण , साह्य होतो नारायण ॥". धीर धरणाऱ्या सृष्टीतली काही मनोज्ञ उदाहरणे तुकाराम महाराज अशी देतात : "धीर तो कारण एकविध भाव , पतिव्रते नाहो सर्वभावे ॥ चातक हे जळ न पाहती दृष्टी , वाट पाहे कंठी प्राण मेघा ॥ सूर्यविकसिनी नेघे चंद्रामृत , वाट पाहे अस्त उदयाची ॥ धेनू येऊ नेदी जवळी आणिका , आपुल्या बाळकाविण वत्सा ॥ तुका म्हणे नेम प्राणां संवसाटी , तरीच माझ्या गोष्टी विठोबाच्या ॥ ( १३२१, जोग प्रत ) ." असं म्हणतात की, चातक हा पक्षी प्रत्यक्ष पडणाऱ्या पावसाचेच थेंब पितो, इतर पाण्य़ाकडे बघत नाही. त्याचे हे वाट पाहणे अगदी धीराचे आदर्श उदाहरण आहे. जी कमळे सकाळी उमलतात ती रात्रीचे चांदणे सोडून सकाळच्या सूर्योदयाची वाट पाहतात. गाय इतर वासरांना दूध न देता आपले वासरू लुचायला येण्याची वाट पाहते. धीराचा मूलमंत्र अजून एका ठिकाणी तुकाराम महाराज असा देतात : " चरफडे चरफड शोकें शोक होये , कार्यमूळ आहे धीरापाशी ॥" किंवा "धीर शुद्धबीजें गोमटा तो , ". धीराचा महिमा हा कसा वैश्विक आहे हेच जणुं इथे तुकाराम व शेक्सपीयर मिळून सांगत आहेत. धीराचे महत्व असे दोघा वेगवेगळ्या ठिकाणच्या विचारवंतांना एकसारखेच कळणे हे तसे साहजिकच म्हणावे लागेल.

तुकाराम महाराजांच्या लौकिक आयुष्य़ात अनेक आपत्ती आल्या. त्यात धीर न सोडता हरी-भक्ति ज्यास्तच करता आली व तो फायदाच झाला, असे तुकाराम महाराज म्हणतात. उदाहरणार्थ :

बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥ध्रु॥

बाईल मेली मुक्त जाली । देवे माया सोडविली ॥२॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥ध्रु॥

पोर मेले बरे जाले । देवे मायाविरहित केले ॥३॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥ध्रु॥

माता मेली मज देखता । तुका म्हणे हरली चिंता ॥४॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥ध्रु॥

तुकाराम

(१६०९-१६५०)

चित्रकार - सत्यजीर रे

भावनेच्या जगात इतके कठोर म्हणणे भलतेच वाटते. स्त्रीयां मुलांवर अन्यायाचे वाटते. पण इथेच तुकाराम महाराजांच्या समर्थनार्थ शेक्सपीयर महाराज येतात. ते म्हणतात, "आपत्तींचा उपयोग मोठा गोड असतो."( इंग्रजी वचन : स्वीट आर द युजेस ऑफ ऍडव्हर्सिटी ) . ऍज यु लाइक इट ह्या नाटकातले ड्यूकच्या तोंडचे हे वचन आहे. तो पदच्युत झाल्यावर त्याला ह्या आपत्तीचे फायदे ( युजेस) जाणवतात. त्याला तो उपमा देतो, बेडकाच्या माथी असलेल्या औषधी मण्याची आणि आता लोकात "ड्यूक" हे पद न राहिल्याने खाजगी स्वातंत्र्याचा लाभच आहे असे तो म्हणतो. जसे निसर्ग पुस्तकांपेक्षा, भाषणांपेक्षा, शीलालेखां पेक्षा ज्यास्त बोलका असतो. जणु काही शेक्सपीयरच्या "स्वीट आर द युजेस ऑफ ऍडव्हर्सिटी" चे मराठीत थेट भाषांतर करावे तसे एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात : "भोगावी विपत्ती गर्भवास (१०६७,देहू प्रत)." मग ह्या विपत्तीतूनही "बरे झाले" असे काय काय फायदे झालेत त्याची यादीच ते देतात. "बरे जाले देवा निघाले दिवाळे , बरी या दुष्काळे पीडा केली ॥ अनुतापे तुझे राहिले चिंतन , जाला हा वमन सवंसार ॥ बरे जाले जगी पावलो अपमान , बरे गेले धन ढोरे गुरे ॥ बरे जाले नाही धरिली लोकलाज , बरा जालो तुज शरण देवा ॥ बरे जाले तुझे केले देवाईल , लेकरे बाईल उपेक्षिली ॥ तुका म्हणे बरें व्रत एकादशी , केले उपवासी जागरण ॥." विपत्तीतून माणूस तावून सुलाखून निघतो असे लोक म्हणतात. दुष्काळामुळे दोन तीन वर्षांनी जमीनीचा कस वाढतो, महापुराच्या गाळाने शेते ज्यास्त उत्पादक होतात, असे शेती-तज्ज्ञ म्हणतात. आजारी पडलात की, रोग प्रतिकारक शक्ती वाढते असे डॉक्टर म्हणतात. तर असे आपत्तीतून काही फायदे होतात असे जवळ जवळ वैश्विक ( युनिव्हर्सल ) मत आढळून येते. मग तुकाराम महाराज स्वत: दुष्काळात होरपळताना ( त्यांची पत्नी अन्न अन्न करून दुष्काळात मरते ) जेव्हा म्हणतात : "दुष्काळे आटिले, द्रव्य नेला मान", तेव्हा त्यांच्या अध्यात्मिक दृष्टीला दाद द्यावीशी वाटते. आपत्ती, संकटे विपन्नावस्था भोगावी लागावी व त्यावर दोघाही महापुरुषांची समान प्रतिक्रिया यावी ह्याची इथे गंमत वाटते.

सध्या "थ्री इडियट्‍स" मधले गाणे "आल इज वेल" बरेच प्रसिद्ध झाले आहे. हे बहुदा शेक्सपीयरच्या प्रसिद्ध नाटक "ऑल इज वेल दॅट एन्ड्‍स वेल !" बेतले असावे. नाटकातल्या हेलेनाच्या तोंडी अशा ओळी आहेत : "ऑल इज वेल दॅट एन्ड्‍स वेल स्टिल, द फाइन इज द क्राउन ; व्हाटेव्हर द कोर्स, द एन्ड इज द रिनाऊन" ह्यात शेक्सपीयर म्हणत आहे की, "द एन्ड" किंवा शेवट हेच महत्वाचे असते. आणि हेच तर तुकाराम महाराज म्हणत आले आहेत की, " याजसाटी केला होता अट्टाहास , शेवटचा दिस गोड व्हावा ॥." दोघांची ही सुभाषिते इतकी चपखल आहेत की, त्यावर काही भाष्य तर लागत नाहीच शिवाय सर्व ठिकाणी सर्व वेळी लागू पडणारी, वैश्विक अशी, ही सुभाषिते आहेत हे सहजी पटते. "देशकाल परिस्थिती" ह्या सर्वांच्या पल्याड असलेल्या विचारांचे वैश्विक असणे व ते त्याच दृष्टिकोणातून शेक्सपीयर व तुकारामाला एकसारखे दिसणे हे अगदी मोहवून टाकणारे आहे.

"मर्चंट ऑफ व्हेनिस" ह्या शेक्सपीयरच्या नाटकात ऍंटोनिओ मर्चंटबरोबर एक करार करतो. त्या अन्वये तो जर त्याने पाळला नाही तर त्या बदल्यात मर्चंट त्याच्याकडून एक पौंड मासाचा लचका ( पाऊंड ऑफ फ्लेश ) घेऊ शकतो. ऍंटोनिओची वकीली करीत पोर्टिया मर्चंटला म्हणते की तू स्वत: होऊन त्याला क्षमा कर. तुला कायदेशीर शिक्षा द्यायचा अधिकार असला तरी क्षमेची गुणवत्ता तू ताणू नकोस, स्वेच्छेने क्षमा कर. "द क्वालिटी ऑफ मर्सी इज नॉट स्ट्रे‍न्‌ड;इट ड्रॉपेथ ऍज द जेंटल रेन फ्रॉम हेवन; अपॉन द प्लेस बिनीथ. इट इज ट्वाइस ब्लेस्ट; इट ब्लेसेथ हिम दॅट गिव्हज ऍंड हिम दॅट टेक्‌स. " पाऊस जसा नैसर्गिक रित्या पडतो तशी आपण होऊन क्षमा करावी, जीत दुहेरी आशिर्वाद आहेत. एक क्षमा करणाऱ्याचे व दुसरे ज्याच्यावर क्षमा केली त्याचे. हा तसा वैश्विकच विचार असावा. कारण तुकाराम महाराजांचे असेच एक वचन आहे : "दया, क्षमा, शांती , तेथे देवाची वसती ॥" इथे शेक्सपीयरसारखे कार्यकारण भाव ( क्षमा करणाऱ्याला व घेणाऱ्याला देवाचे आशिर्वाद मिळतात म्हणून, असा ) न दाखवता तुकाराम महाराजांना वाटते की प्रत्यक्ष परमेश्वरच तिथे वसतीला असतो व म्हणून प्रमेयासारखा विश्वास ते देववतात. क्षमा व करुणेची महती सांगणारा तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग असा आहे : "जे का रंजले गांजले , त्यांसी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा , देव तेथेचि जाणावा ॥ मृदु सबाह्य नवनीत , तैसे सज्जनांचे चित्त ॥ ज्यांसी आपंगिता नाही , त्यांसी धरी जो हृदयीं ॥ दया करणे जे पुत्रासी , तेचि दासा आणि दासी ॥ तुका म्हणे सांगू किती , त्याचि भगवंतांच्या मूर्ती ॥". इथे ज्यास कोणाचा आधार नाही ( आपंगिता ) त्यांस हृदयी लावा हे कारुण्याचे उच्च परिमाण तुकाराम महाराज सांगत आहेत. तसेच लोण्यासारखे आत बाहेर मृदू असे सज्जन असावे असे आवाहन करीत आहेत. दया, क्षमा, शांतीचे परम महत्व सांगणारे हे तुकाराम आणि शेक्सपीयर अगदी सख्खे देवदूत आहेत असेच इथे वाटते !

शेक्सपीयरच्या ऑथेल्लो नाटकातल्या इयागो ह्या पात्राच्या कबूलीनाम्यावरून "वेअरिंग वन्‌स हार्ट ऑन द स्लीव्ह" असा एक वाक्‌प्रचार इंग्रजीत रूढ झाला आहे. त्यात तो रॉड्रिगोला फसवण्याच्या इराद्याने म्हणतो की माझे हृदय शर्टाच्या बाहीवर वागवीन व मग ते सर्वांना खरेच वाटेल. त्यानंतर इंग्रजीत हा वाक्‌प्रचार चांगलाच रुळला. अगदी अंतर्मनातले भाव बाहेर बाळगणे, दाखवणे अशा अर्थाचा हा वापर आहे. अगदी ह्याच चपखलतेने तुकाराम महाराजांनीही असाच एक वाक्‌प्रचार मराठीत रूढ केलेला आढळतो. तो म्हणजे "अंतरीचे धांवे स्वभावे बाहेरी !". इथे ते नुसताच वाक्‌प्रचार देत नाहीत तर त्यामागचा कार्यकारण भावही देतात, त्याची साहजिकता दाखवून देतात ती अशी : "न लगे चंदना सांगावा परिमळ , वनस्पतीमेळ हाकारूनी ॥ अंतरीचे धांवे स्वभावे बाहेरी , धरिता ही परी आवरे ना ॥ सूर्य नाही जागे करीत या जना , प्रकाश किरणा कर म्हून ॥ तुका म्हणे मेघ नाचवी मयूरे , लपविता खरे येत नाही ॥ ". तुकाराम महाराज ह्या अंतरमनाचे महत्व ओळखून मग एके ठिकाणी चक्क धावा करतात की, "तुका म्हणे देवा , माझे अंतर वसवा ॥". माणसांच्या भावभावनांचे खेळ कसे चालतात हे नेमकेपणे कळालेले तुकाराम आणि शेक्सपीयर हे दोघे अगदी मुरब्बी दिग्दर्शक आहेत हे मात्र इथे प्रकर्षाने जाणवावे !

राजाचे सार्वभौमत्व कसे सर्वदूर असते ह्या अर्थाचे शेक्सपीयरचे "रिचर्ड द थर्ड" नाटकातले एक वचन आहे : "किंग्ज नेम इज अ टॉवर ऑफ स्ट्रेंग्थ". आजकाल आपण लोकशाही व्यवस्थेला चटावलेलो असल्याने राजाचा एवढा मोठा मान असू शकतो हे समजायला कदाचित अवघड जाईल. पण दहा वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त बॅंकॉकला असताना ह्या राजाच्या प्रेमाची चुणूक पाहायला मला मिळाली होती. त्यावेळी तिथे लोकशाही होती तरी थायलॅंडचा राजा त्यावेळी फार प्रसिद्ध होता. त्याला प्रजा खूप मान देत असे. तेथे चलनी नोटांवर राजाचे चित्र असे. त्यामुळे बाजारात पैशांचा व्यवहार करताना नोटा हाताळताना त्या दोन्ही हातांनी अगदी मान लववून द्याव्या/घ्याव्या लागत. हा त्या राजाचा मान असे. इतका मान म्हणजेच शेक्सपीयरचे "टॉवर ऑफ स्ट्रेंग्थ" ! आता तुकाराम महाराजांच्या काळातही राजा व त्याचा दंडक हा सार्वभौम असाच प्रकार होता. त्यासाठी ते म्हणतात : "राजा करी तैसे दाम , ते ही चाम चालती ॥ कारण ते सत्ता शिरी , कोण करी अव्हेर ॥ वाइले ते सुने खांदी , चाले पदी बैसविले ॥ तुका म्हणे विश्वंभरे , करुणाकरे रक्षिले ॥"( २५७८, देहू प्रत ). राजे लोक त्यांच्या आज्ञेने नाणी पाडत व ह्या "सिक्क्यावरून" त्याचे मोल ठरे. काही राजांनी धातूच्या दुर्भिक्षतेपायी चामड्यावर अक्षरे उमटवून ( जाळून, डाग देऊन ) नाणी केली होती असेही इतिहासात सापडते. त्याचाच उल्लेख करून तुकाराम महाराज म्हणतात, "ते ही चाम चालती !". ह्या मागच तत्व सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, "राजा चाले तेथे वैभव सांगाते , हे काय लागते सांगावे त्या ॥"( ८१८, देहू प्रत ). कदाचित ह्या मागची सामान्य माणसाची मनोवृत्ती सेवकाचीच असते असेही तुकाराम महाराज ह्या निमित्ताने सांगतात ते असे : "सेवकासी आज्ञा निरोपासी काम , स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥". राजाच्या दंडकाची सार्वभौमता अशी दोघाही साहित्यकांना वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळी, पण सारख्याच तत्त्वाने, पटावी हे मोठे मजेशीर आहे.

तुकाराम व शेक्सपीयर ह्यांच्यात आढळणारा अजून एक समान धागा आहे : चित्त व चित्ताची आवडी हा. ह्याविषयीचे तुकाराम महाराजांना खूप अप्रूप आहे. म्हणून ते निरनिराळ्या ठिकाणी ह्याविषयीचे निष्कर्ष असे काढतात : "नाही काष्ठाचा गुमान , गोवी भ्रमरा सुमन ॥ प्रेम प्रीतीचे बांधले , ते न सुटे काही केले ॥"( १२८८, जोग प्रत); "प्रेम नये सांगता बोलता दावितां , अनुभव चित्ता चित्त जाणे ॥ "( २७०४, जोग प्रत) ; "चित्ताचा चाळक , त्याचे उभय सूत्र एक ॥ "( २३३५, जोग प्रत). चित्त व चित्ताची आवडी हे अगदी आदिम सत्य असावे. कारण हेच असेच शेक्सपीयरच्या दृष्टीपथात आले आहे. "अ मिडसमर नाईट्‌स ड्रीम" ह्या नाटकात हेलेनाच्या तोंडी त्याचे वचन आहे : "प्रीती डोळ्यांनी नव्हे तर चित्ताने पाहते." ( "लव्ह लुक्स्‌ नॉट विथ द आईज बट विथ द माईंड"). तुकाराम महाराज व शेक्सपीयर यांना एकच विचार स्थळकाळ परत्वे स्फुरावा यावरून ह्या विचाराचे वैश्विक असणे हे जसे पटते तसेच एकमेकांशी दूरान्वयानेही संबंध न येता विचारांचे हे साधर्म्य असे लख्खपणे दिसावे हे मोहवून टाकणारे आहे.

ह्या जगात कितीतरी प्रत्यक्ष जड पदार्थ असे आहेत की ते सर्वत्र सारखेच आढळून येतात. जसे : गहू, तांदूळ, डाळी हे अन्नपदार्थ, कपडेलत्ते व त्यातल्या चालीरीती वगैरे. पण विचारही सारखेच आढळावे हे वेगळेच वैश्विकतेचे परिमाण दाखवते. माणसाच्या वागण्याच्या पद्धती, निरनिराळ्या संस्था, शाळा एकसारख्या विचाराचे असणे कधी कधी दिसते. ते एकवेळ विचारांच्या उत्क्रांत होण्याच्या पद्धतीमुळे रास्त वाटते, पटते. पण साहित्यात, कविता हा प्रकार तर केवळ दैवयोगाने कवीला सुचणारा प्रकार समजतात. त्या फार क्वचितच एकाच विषयावर आढळतात. त्यातही आपण कित्येकवेळा अनेक कवींनी आईवर, देशभक्तीपर, गुरुजनांवर, सारख्याच आशयाच्या व वळणाच्या कविता केलेल्या पाहतो. त्या जेव्हा भाषा, प्रांत, काळ ह्यांची बंधने झुगारून एकासारख्या एक दिसल्या तर साहजिकच त्या सार्वत्रिक अशा वैश्विक जाणिवेच्या आहेत असे आपण म्हणू. असेच विषयाचे वैश्विकपण दाखवणाऱ्या शेक्सपीयर व तुकारामाच्या काही कविता आपण पाहू व विचारांचे हे साधर्म्य व सार्वत्रिकपण पाहू: शेक्सपीयरची एक प्रसिद्ध कविता आहे, "ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज" ह्या नावाची. माणसाच्या जीवनात कशी स्थित्यंतरे येतात व हे जीवन जणु जगाच्या रंगमंचावर घडणारे नाटकच आहे अशा भावार्थाची ही कविता आहे. "ऍज यू लाइक इट"ह्या नाटकातली. ह्या कवितेला "सेव्हन एजेस ऑफ मॅन" असेही संबोधतात. मुळात ही कविता अशी (देवनागरीत लिहिलेली): G

ऑल द वर्ल्ड इज ए स्टेज,

ऍंड आल द मेन ऍंड विमेन मिअरली प्लेयर्स ;

दे हॅव्ह देअर एक्झिट्‌स ऍंड देअर एन्ट्रन्सेस;

ऍंड वन मॅन इन हिज टाइम प्लेज मेनी पार्ट्‌स,

हिज ऍक्टस्‌ बींईंग सेव्हन एजेस. ऍट फर्स्ट द इनफंट,

म्यूलिंग ऍंड प्यूकींग इन द नर्सेस आर्मस्‌ ;

ऍंड देन द व्हाइनिंग स्कूल बॉय, विथ हिज सॅचेल

ऍंड शायनिंग मॉर्निंग फेस, क्रीपींग लाइक स्नेल

अनविलिंगली टू स्कूल. ऍंड देन द लव्हर,

साईंग लाइक फरनेस, विथ ए वूफुल बॅले

मेड टू हिज मिस्ट्रेसेस आइब्रो. देन ए सोल्जर,

फुल ऑफ स्ट्रेंज ओथस्‌, ऍंड बिअर्डेड लाइक द पार्ड,

जेलस इन ऑनर, सडन ऍंड क्विक इन क्वारल,

सीकींग द बबल रेप्युटेशन

ईव्हन इन कॅनन्स माउथ. ऍंड देन द जस्टिस,

इन फेअर राउंड बेली विथ गुड कॅपॉन लाइन्ड,

विथ आईज सीव्हीयर ऍंड बिअर्ड ऑफ फॉर्मल कट,

फुल ऑफ वाइज सॉज ऍंड मॉडर्न इन्स्टन्सेस ;

ऍंड सो हि प्लेज हिज पार्ट . द सिक्स्थ एज शिफ्टस्‌

इन्टू द लीन ऍंड स्लिपर्ड पॅंटॅलून,

विथ स्पेक्टॅकल्स ऑन नोज ऍंड पाउच ऑन साईड,

हिज युथफुल होज, वेल सेव्हड्‍ ए वर्ल्ड टू वाईड

फॉर हिज श्रंक श्रॅंक; ऍंड हिज बिग मॅनली व्हॉइस,

टर्निंग अगेन टुवर्ड चाइल्डिश ट्रेबल्‌, पाइप्स,

ऍंड व्हिसल्स्‌ इन हिज साऊंड, लास्ट सीन ऑफ ऑल,

दॅट एन्डस्‌ धिस स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्टरी,

इज सेकंड चाइल्डिशनेस ऍंड मिअर ऑब्लिव्हिअन;

सॅन्स टीथ, सॅन्स आईज, सॅन्स टेस्ट, सॅन्स एव्हरिथिंग.

विलियम शेक्सपीयर

(१५६४-१६१६)

( साधारण अर्थ असा: सर्व जग एक मंच आहे, सर्व नर नारी त्यावरची फक्त पात्रे आहेत, त्यांना त्यांचे निश्चित प्रवेश व निघून जाणे आहे, एक माणूस त्याच्या हयातीत अनेक भूमीका वठवतो, त्याचा एक अंक सात स्थितींचा/कालांचा असतो, प्रथम बाल्यावस्था, मातेच्या/दायीच्या हातातले चोखणे, हुंदके वगैरे, नंतर खोडकर शाळकरी अवस्था, सकाळचा तरतरीत चेहरा घेऊन पण गोगल गायीसारखा, मनाविरुद्ध हळूहळू शाळेला जाणारा, मग तिसरी अवस्था प्रेमिकाची, भट्‍टीचे सुस्कारे सोडणारा, प्रेमिकेची मनरिझवणी करणारे बॅले नृत्य करणारा, मग चौथी अवस्था शिपायाची/ योद्ध्याची , जीत अगम्य आणाभाका, पटकन हमरीतुमरीवर येणे, तोफेच्या तोंडीही मानाचे वलय शोधणारा, मग पाचवी अवस्था न्यायाधीशाची, दोंद सांभाळत वस्त्रे मिरवीत तीक्ष्ण नजर, दाढी लेवून, हुशारीने उदाहरणे दाखवीत न्याय करणारा, मग सहावी अवस्था त्याला दुबळ्या शरीरात नेते, डोळ्यावर चाळशी, कमरेला बाक, दोंद सुटलेले, तारुण्याचा उत्साह मागे पडलेला, जग खूपच्‌ मोठे वाटणारे, आवाजात गुणगुणणे आलेले, मग सगळ्यात शेवटची सातवी अवस्था जी हा सगळा घडामोडींचा इतिहास मोडीत काढते, दुसरे बाल्य/शैशवच जणु, दांताविना, दृष्टीविना, रुचिविना, सर्वांविना ! ( विनाश ! )

आता ह्याच चेहऱ्यामोहऱ्याची तुकाराम महाराजांची कविता शोधायची हे मोठे बिकट काम ह्यासाठी आहे की शेक्सपीयरचे साहित्य हे लिखित होते तर तुकाराम महाराजांचे मौखिक परंपरेत टिकलेले होते. त्यामुळे तुकारामांची कविता सलग एकेठिकाणी व एकत्र सापडत नाही. शिवाय तुकाराम महाराज मुख्यत्वे अभंग ह्या चारपाच खंडाच्या छोट्या वृत्तातच कविता करीत. त्यामुळे ती एकसंध व विस्तृत अशी एकत्र सापडत नाही. तुकाराम महाराजांची सबंध गाथाच जिथे विषयवार विखुरलेली आहे तिथे ही अडचण अगदीच साहजिक म्हटली पाहिजे व ती शोधून जोडणे हे सहजी केलेल्या कवितेसमानच मानले पाहिजे. शिवाय तुकाराम महाराजांच्या काळात नाटक हा प्रकार, शेक्सपीयरची नाटके असत त्या प्रकारची तर नसणारच. पण कीर्तनानंतर, कथा किंवा काला किंवा "लळित" नावाचा जो हलका-फुलका प्रकार असे तो नाटक-वजाच असे. त्याचे वर्णन तुकाराम असे करतात : "गळित झाली काया , हे चि लळित पंढरीराया ॥" (४०२४, जोग प्रत). इथे शेक्सपीयरने जी सातवी अवस्था, वृद्धावस्था, वर्णिली आहे त्याचेच रेखाटन करीत जीवन हे एक नाटक आहे असे म्हणताना तुकाराम महाराज गलित-गात्र झाल्याचे व हे एक लळित असल्याचे शेक्सपीयरसारखेच सांगत आहेत. नाटकाला "खेळ"ही म्हटले जायचे. त्यावर ते म्हणतात : "म्हणउनि खेळ मांडियेला ऐसा , नाही कोणी दिशा वर्जियेली ॥"( २१३, जोग प्रत). शेक्सपीयरने जे म्हटले की जग हा एक मंच आहे व आपण सर्व पात्रे आहोत तेच सांगणारा तुकाराम महाराजांचा हा अभंग पहा : "नटनाट्य अवघे संपादिले सोंग , भेद दाऊ रंग न पालटे ॥ मांडियेला खेळ कौतुके बहुरूप , आपुले स्वरूप जाणतसो ॥"( २५९, जोग प्रत). अजून एका ठिकाणी असेच : "नटनाट्य तुम्ही केले याचसाठी , कवतुके दृष्टी निववावी ॥"( ८२२, जोग प्रत). नाटकांपूर्वी कळसूत्री बाहुल्यांचा नाटकवजा खेळ असायचा त्याचा दाखला देत तुकाराम म्हणतात : "लाघवी सूत्रधारी , दोरी नाचवी कुसरी ॥"( १५४१,जोग प्रत). किंवा "चित्ताचा चाळक , त्याचे उभय सूत्र एक ॥ नाचवितो नाचे छंदे , सुखे आपुल्या विनोदे ॥"( २३५, जोग प्रत). जीवन हे एक रंगमंच आहे असेच वेगळ्या प्रकाराने तुकाराम असेही म्हणतात की "खेळ मांडियेला वाळवंटी घाई , नाचती वैष्णव भाई रे ॥ "( ३७३३, जोग प्रत). तुकाराम महाराजांचा "जग हा एक रंगमंच आहे" हा दृष्टांत असा सजलेला दिसेल.

आईच्या/दायीच्या हातात, कुशीत निर्धास्त असलेले बाल्य जसे शेक्सपीयरने चितारले आहे तसेच तुकाराम महाराजही बाल्यावस्थेची चित्रे अशी रेखतात : "धाकुट्याच्या मुखीं घास घाली माता , वरी करी सत्ता शहाणिया ॥ "( १११, जोग प्रत) ; "काय कळे बाळा , बाप सदैव दुबळा ॥ लागलिया मुख स्तनां , घाली पान्हा माऊली ॥" (४३१, जोग प्रत) : "लेकरां आइते पित्याचे जतन , दावी निजधन सर्व जोडी ॥"( ४३७, जोग प्रत)" . पुढे जे शाळकरी मुलाचे शेक्सपीयरने वर्णन केले आहे त्या अवस्थेचे तुकाराम असे वर्णन करतात : "ओनाम्याच्या काळें , खडे मांडविले बाळे ॥"( ३५९, जोग प्रत). इथे हा खडे ठेवून शिकवण्याचा प्रकाराचा संदर्भ हा खास तुकाराम कालीन असल्याने शेक्सपीयरला अज्ञात असावा. तसेच "अर्भकाचे साटी , पंते हाती धरीली पाटी ॥" ह्यात शिक्षणावस्थेचे चित्रण छानच दिसते. ह्या अवस्थेचे जे व्यवच्छेदक लक्षण आहे ते म्हणजे "खेळ" ह्याचेही तुकाराम महाराज सविस्तर वर्णन असे करतात : "बाळपणे ऐसी , वरुषे गेली बारा , खेळता या पोरा , नानामते ॥ विटू-दांडू चेंडू , लगोऱ्या वाघोडी , चंपे पेंड खडी , एकीबेकी ॥ हुमामा हुंबरी , पकव्याच्या बारे , खेळे जंगी भोवरे , चुंबाचुंबी ॥ सेलडेरा आणि निसरभोवडी , उचली बाले धोंडी , अंगबळे ॥ तुका म्हणे ऐसे बालपण गेले , मग तारुण्य आले गर्वमूळ ॥"( इथे वर्णिलेले हे त्या काळातले खेळ आहेत ). तारुण्याच्या येण्याचा उल्लेखही तुकाराम महाराज "वर्वमूळ" असा करतात ते मोठे मार्मिक आहे. ह्याच तारुण्यावस्थेचा पुढे तुकाराम असा देखावा दाखवतात : "तारुण्याच्या मदे , न मनी कोणासी ॥ सदा मुसमुसी , घुळी ( अर्थ : बैल) जैसा ॥ अठोनी वेठोनी , बांधला मुंडासा ॥ फिरतसे म्हैसा , जनामधी ॥ हाती दीड पान , वरतीच मान , नाही तो सन्मान , भलियासी ॥ श्वानाचिया परी , हिंडे दारोदारी , पाहे नरनारी , पापदृष्टी ॥ तुका म्हणे ऐसा , थोर हा गयाळी , करिता टवाळी , जन्म गेला ॥" ह्याच अवस्थेतला कामातुर कसा असतो त्याचेही वर्णन तुकाराम असे करतात : "कामातुर चवी सांडी , बरळ तोंडी बरळे ॥ रंगले ते अंगी दावी , विष देववी आसडे ॥ ". ज्या वीर योद्ध्याचे शेक्सपीयरने बहारदार वर्णन केले आहे त्याचेच जणु तुकाराम असे सांगतात : "आम्ही वीर झुंजार , करू जमदाडे मार , थापटिले भार , मोड झाला दोषांचा ॥ जाला हाहाकार , आले अंकित झुंजार , शंखचक्राचे शृंगार , कंठी हार तुळसीचे ॥ रामनामांकित बाण , गोपी लाविला चंदन , झळकति निशाण , गरुडटके पताका ॥ तुका म्हणे काळ , झालो जिंकोनि निश्चळ , पावला सकळ , भोग आम्हा आमचा ॥"( ९४०, जोग प्रत).

शेक्सपीयरच्या ज्या प्रसिद्ध ओळींनी सॅन्स टीथ ( सॅन्स म्हणजे विथाउट), सॅन्स आईज, सॅन्स टेस्ट, सॅन्स एव्हरिथिंग ,वृद्धावस्थेचे वर्णन हे खासे नेटके होते तसेच नेटकेपणे तुकारामही असे करतो : "म्हातारपणी थेटे पडसे खोकला , हात कपाळाला , लावुनि बसे ॥ खोबरियाची वाटी , जाले असे मुख , गळतसे नाक , श्लेष्मपुरी ॥ बोलो जाता शब्द , न ये चि हा नीट , गडगडी कंठ , कफ भारी ॥ सेजारी म्हणती , मरेना का मेला , आणिला कांटाळा , येणे आम्हा ॥ तुका म्हणे आता , सांडूनि सर्व काम , स्मरा राम राम , क्षणा क्षणा ॥ चालिले सोबती , काय मानिली निश्चिंती , काय करीसी एकला , काळ सन्निध पातला ॥ काही सावध तो बरवा , करी आपुला काढावा ॥ चालिले अगळे , हळूच कान केश डोळे ॥ वोसरले दात , दाढा गडबडल्या आत ॥ एकली तळमळ , जिव्हा भलते ढायी लोळे ॥ तुका म्हणे यांणी , तुझी मांडली घालणी ॥"

वेगळेपणाचे आजकाल आपल्याला खूपच कौतुक असते. त्यामुळे वेगळेपण आपण मिरवतोही . वेगळाल्या वाटेमुळे वेगवेगळे कवी हे खरे तर ह्या मरातबाचे अप्रूप आहेत . तसेच दोन कवींना एकाच विषयाविषयी सारखेच वाटावे हे साधर्म्यही सुखावणारे असते. इतके हे वाटणे साहजिक असते की प्रसिद्ध ज्ञानपीठ विजेते व मनस्वी कवी विंदा करंदीकरांना तर तुकाराम व शेक्सपीयर हे जिवाभावाचे मैत्रच वाटतात व ते एका कवितेत त्यांची भेटही नाट्यमयतेने रंगवतात. ती अशी :

तुकोबांच्या भेटी , शेक्सपीयर आला ;
तो जाहला सोहळा , दुकानात.
जाहली दोघांची , उराउरी भेट ;
उरातले थेट , उरामध्ये .

तुका म्हणे "विल्या, तुझे कर्म थोर ,
अवघाची संसार , उभा केला" .

शेक्सपीयर म्हणे, "एक ते राहिले ,
तुवा जे पाहिले , विटेवरी ."

तुका म्हणे, "बाबा, ते त्वा बरे केले;
त्याने तडे गेले , संसाराला .
विठ्ठल अट्टल , त्याची रीत न्यारी ;
माझी पाटी कोरी , लिहोनिया ,"

शेक्सपीयर म्हणे , "तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले , शब्दातीत ."

तुका म्हणे, "ऐक , घंटा ही मंदिरी !
गड्या, वृथा शब्दपीट ;
प्रत्येकाची वाट , वेगळाली .
वेगळीये वाटे , वेगळाले काटे ,
काट्यासंगे भेटे , पुन्हा तोच ".

तुका म्हणे, "ऐक , घंटा ही मंदिरी !
कजागीण घरी , वाट पाहे ."

विंदा करंदीकर ( १९१८-२०१० )

चित्रकार - अरविंद मुळगांवकर

आकाशा एवढ्या दोन श्रेष्ठ कवींनी, आपापले वेगळेपण जपत, एकसारखेच वैश्विक विचार कवीतेतून द्यावेत ह्याचे कौतुक मात्र रसिकांना कायमच भारून टाकील !


अरुण अनंत भालेराव

arunbhalerao67@gmail.com


पत्ता:,

१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर,

घाटकोपर ( पूर्व ),

मुंबई : ४०० ०७७

भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२

तुको बादशहा - (कविता संग्रह) - प्रस्तावना

डॉ. सदानंद मोरे

मराठी काव्यपरंपरेतील तुकोबांचे स्थान हा खरे तर चर्चेचा विषय राहिला नाहीच. वेगवेगळ्या काळात तुकोबांच्या या सर्वोच्च स्थानाचे कोणी समर्थन करीत तर कोणी त्याला विरोध करीत म्हणजेच त्याचा खुंटा हलवून हलवून इतका बळकट केलेला आहे की त्याबद्दल आता शंका घेण्यासही वाव नाही. मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू सर ऍलेक्झांडर ग्रँट यांनी तुकोबांना महाराष्ट्राचे राष्ट्रीय कवी असे म्हटले. तर अलीकडे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी आपण तुकोबांशिवाय कविता या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही. असे सांगून महाकवी या नात्याने तुकोबांच्या विश्वकाव्यातील स्थानावर शिक्कामोर्तब केले.परंतु मुद्दा केवळ तुकोबा कवी म्हणून किती श्रेष्ठ आहेत हा नाही. तुकोबांच्या अवतार समाप्तीला आता साडेतीनशे वर्षे होऊन गेली. मधल्या काळात इतिहासाच्या पुलाखालून कितीतरी पाणी वाहून गेले. साहित्यासह जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अनेक बदल झाले. त्याला महाराष्ट्रही अपवाद नाही. ही सर्व परिवर्तने आणि उलथापालथी जमेस धरूनही तुकोबांचे आजच्या मराठी कवीशी आणि माणसाशी काही नाते आहे का? तो तुकोबांच्या परंपरेचा पाईक होऊ शकतो का? हा खरा प्रश्न आहे. त्याचे उत्तर नकारार्थी आले तर तुकोबा आणि त्यांची कविता हा एक ऐतिहासिक चर्चेचा व स्वारस्याचा विषय ठरेल आणि या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर येणे पुरेसे नाही. तुकोबांच्या प्रमाणे काव्यव्यवहार आणि जीवनव्यवहार करणारे निदान तो करण्याचा प्रयत्न करणारे कोणी असतील तरच अशा उत्तराला काही एक अर्थ प्राप्त होतो. तुकोबांची जीवनमूल्ये आणि काव्यमूल्ये हाच निकष या संदर्भात वापरावा लागतो.

ज्या कवींमुळे या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मिळणे शक्य होते त्यात स्वत: चित्र्यांचा समावेश अर्थातच होतो. त्याच बरोबर भालचंद्र नेमाडेप्रभृती समानधर्मीचाही समावेश होतो. श्रीकृष्ण राऊत यांचाही अंतर्भाव आता यात करावा लागणार आहे आणि प्रस्तुत कविता संग्रह त्यासाठी पुरेसा आहे. स्वत: राऊत आपणाला तुकोबांच्या परंपरेतील मानतात. त्यांच्या कवितांची वाटचाल तुकोबांचे बोट धरूनच झालेली आहे. तुकोबांच्या संदर्भात अस्तित्व आणि कवित्व यांच्या अद्बैत असल्यामुळे तुकोबांचे जगणे एकीकडे ठेऊन केवळ शैलीच्या वा शब्दकळेच्या पातळीवर त्यांचे वरवरचे अनुकरण करणे यात तसा काही अर्थ उरत नाही. अर्थात तसे करता येणे शक्य नाही वा तसे कोणी करीत नाही असे मात्र नाही. पण अशा काव्यकसरतीचे पितळ उघडे पडायला फारसा वेळ लागत नाही. या बाबतीत फसवणूक करणे तितकेसे सोपे नाही.

राऊतांच्या अनेक कविता खुद्द तुकोबांना उद्देशून किंवा तुकोबांच्या विषयी आहेत आणि उरलेल्यांपैकीही बहुतेक तुकारामी बाण्याचा आहेत. त्यामुळे त्या अभंग छंदात असणे अर्थातच साहजिकही आहे. अभंग हा छंद मराठी भाषेच्या प्रकृतीशी सुसंगत तर आहेच परंतु शिवाय तो सरळ, रोखठोक अशा मराठी संस्कृती स्वभावाशीही सुसंगत आहे. तुकोबांसारख्याच संतकवींनी अभंगांमधून देवाशी संवाद साधीत त्यांना उपदेश केला. ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळे त्याला फसवता येत नाही. स्वत:ला फसवायला प्रश्नच उद्भवत नाही आणि ज्यांना उपदेश करायचा त्यांना फसवण्याचे संतांना काही प्रयोजन नव्हते. त्यांना त्यातून काही साधायचे नव्हते. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही आपोआपच अभंगाची वैशिष्ट्ये बनतात. तिथ लटपट आणि खटपट यांना वाव नाही. सजावटीला संधी नाही.

कवीचे तुकोबांशी असलेले नाते उलगडणाऱ्या अनेक कविता या संग्रहात आहेत. परंतु त्याचा परामर्श घेण्यापूर्वी आणखी एका बाबीचा खुलासा करायला हवा. हा आधुनिक कवी तुकोबांना त्यांच्या परंपरेसह स्वीकारणारा आहे. या परंपरेत विठ्ठलाचा आणि तुकोबांना मान्य असणाऱ्या त्यांच्या ज्ञानदेवनामदेवादी संतांचाही समावेश आहे.

मुखातून माझ्या । बोले तुकाराम ॥
तोच आत्माराम । अभंगाचा ॥
यमकाला शक्ती । देई नामदेव ॥
प्रतिमेचा भाव । पायरीला ॥
अर्थ समाधीत । नांदे ज्ञानेश्वर ॥
माखवी अक्षर । अमृताने ॥

या त्यांच्या ओळी पुरेशा स्पष्ट आहेत. परंतु तरीही कवीचे साक्षात नाते या परंपरेला कलशस्थानी असणाऱ्या तुकोबांशी आहे. कवी तुकोबांना बादशहा असे संबोधून विनवतो.

तुको बादशहा । देई शब्ददान ॥
करी धनवान । लेखणीला ॥

कवीच्या साठी तुकोबा कवितेचा निकषच आहे. श्लील अश्लीलाचा करी तू निवाडा । भाषेच्या कवाडा उघडोनी॥ तुकोबांना उद्देशून लिहिलेल्या कवितांमधून कवी तुकोबांच्या व इतरांच्याही कवितेची समीक्षा करतो. तुकोबांना तो कवितेचा देव मानतो.

तूच कलदार रोकडीचा दाम । बाकी जोडकाम कुसरीचे ॥

नामदेवांनी तुकोबांना कवित्वाचे वरदान दिले त्याप्रमाणे तुकोबांना तो अगा शब्दराजा, होई कृपावंत । ओत आशयात पंचप्राण ॥ अशी विनवणी करतो. तुकोबांनी कवीला झपाटले आहे. जसे विठ्ठलाने तुकोबांना केले होते.

काय करू आता धरले तुक्याने । जगणे सुखाने आटोपले ॥

तुकोबांनी त्याला अंतर्बाह्य व्यापले आहे.

तुकाराम श्वास तुकाराम ध्यास । सदा आसपास तुकाराम ॥

अर्थात तुकोबांपर्यंतचा त्याचा प्रवास सरळ सोपा वा एकरेषीय नाही. त्यासाठी त्याला स्वत:शीच व प्रचलित काव्यकल्पनांशी संघर्ष करावा लागला आहे. त्याच्या व्याकुळ आकांताला तुकोबा प्रतिसाद देतात -

म्हणे घालविले बेचाळीस वाया । अखेरीस पाया सापडला ॥
बांध ऐपतीने चिरेबंदी वाडा । हुड्यावर हुडा चढवावा ॥

उशिरा पटली मातीची ओळख । घेई आता पीक मनाजोगे ॥
शब्दापाशी ठेव जीव तू गहाण । तुला माझी आण म्हणे तुका ॥

तुकोबांच्या अशा प्रसादतुल्य प्रतिसादाने कवी हरखून जातो.
मिळाला अखेर हक्काचा आसरा । तुकोबा सोयरा झाला माझा ॥
असे जीवलग माझा प्राणासखा । मैतर तो तुका एकमेव ॥
आला वसतीला हृदयात तुका । काय वाण निका सापडला ॥

परंतु तुकोबा कवीला केवळ कवितेपुरते नको आहेत. तुकोबा त्याला तुकोबांच्या परंपरेसकट व जीवनमूल्यांसकट हवे आहेत.

स्फुरे नामयाचा आम्हा भक्तिभाव । झालो उमराव पंढरीचे ॥
ब्रह्मानंदी टाळी लावी ज्ञानदेव । काय आम्हा भेव काळाचे ते ॥
विठोबाचे घरी थांबलो पाहुणे । आता येणे-जाणे करी कोण ॥

तुकोबा कवीला प्रसन्न होतात तेव्हा त्याने तुकोबांना मागितलेले वरदान तुकोबांना साजेल असेच आहे.

तुका झालासे प्रसन्न । माग म्हणे वरदान ॥
काय मागू मी बापडा । शब्द माझ्या कामी पाडा ॥
नको गरुड विमान । नको संतत्वाचा मान ॥
मोक्ष मुक्ती घेई कोण । ज्यासी हुंगेना तो श्वान ॥
आकाशीचा स्वर्गवास । खाऊ कशा संगे त्यास ॥
असे नको काहीबाही । घाल विठोबाचे पायी ॥

तुकोबांचा एवढा ध्यास घेतलेल्या कवीवर तुकोबांचा परिणाम होणे स्वाभाविक आणि अपरिहार्य म्हटले पाहिजे तो काय तर-

फटकळापाशी जाई फटकळ । बोलणे सकळ तोंडफोड ॥
वाण नाही पण लागलासे गुण । संतसंगतीनं तुकोबांच्या ॥

परंतु या स्पष्टोक्तेपणाचा परिणाम जगाचे शत्रुत्व ओढवून घेण्यात झाला-

जळो, तुटो देवा अशी माझी जीभ । काय तिचा लाभ जग वैरी ॥

मग कवीच्या हे लक्षात येते की शब्द उद्दामपणे उधळणे म्हणजे तुकोबांची परंपरा नव्हे. तुकोबांच्या गुणांबरोबर त्यांचा वाणही जगायला हवा. त्यांच्या जिभेवर विठ्ठलाचे अधिष्ठान होते म्हणून त्यांचा फटकळपणा जगाने सहन केला. कवी आता देवालाही विनवतो की,

तुझी नाममुद्रा ठेव तिच्यावर । तेव्हा ताळ्यावर येईल ती ॥

तुकोबांच्या वाणीतील परखडपणाने तुकोबांनी देवालाही अपवाद केले नव्हते. आवश्यक तेथे तुकोबांनी देवाशी वाद करायला मागेपुढे पाहिले नाही.

ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥
करितो स्वामीसवे वाद । अधिकाधिक आनंद ॥

अशी त्यांची या मागची भूमिका होती. मग प्रसंगी ते देवाला बरोबरीच्या नात्याने आव्हान देतात तर प्रसंगी आपण जीव या नात्याने देवापेक्षा खालच्या दर्जाचे असू तर देवाचे वागणे कसे अन्यायाचे झाले आहे याचे माप चुकते करतात. राऊतांच्या कविता ही एकविसाव्या शतकातील श्रद्घावंताची कविता आहे. त्यामुळे त्यांनी देवाशी वादसंवादी करणे हे त्यांच्या तुकाराम परंपरेत बसते. पण त्यांची श्रद्घा आता कालमानपरत्वे विज्ञानामधील प्रतिमानांचा उपयोग करते.

हुबेहुब झालो तुझिया पासोन । तुझाच कलोन आहेना मी ॥
खाण तशी माती बाप तसा लेक । मसाला तो एक माझा तुझा ॥
झाली तुझीमाझी सिद्घ एकपेशी । तरी का न घेशी जवळ तू ॥

तुकोबांप्रमाणेच तेही आता देवा सांगू सुखदु:ख मागणे ते तुज मागो या भूमिकेवर आले आहेत. वेगवेगळ्या त्रुटींनी युक्त असलेल्या जीवांना काहीतरी बोनस देऊन पूर्ण करणाऱ्या देवाचे वर्णन करून

अडाण्याला भेट दिला भक्तिभाव । दातार तो देव नाही कसा ॥

असे विचारीत त्याच्या दातृत्वाचे ते कौतुक करतात. परंतु मग आपल्या बाबतीतच हा असा कसा वागतो ?

काय काळ्या तुझ्या पोटातही काळे । आरंभले चाळे मूलसांडे ॥
काय तुला कळे माझी तळमळ । आहेस तू काळ नैवेद्याचा ॥

असे उद्विग्न उद्गार त्यांच्याकडून निघतात.पण हा त्यांचा उद्वेग तात्कालिक असतो. शेवटी तोच खरा तारणहार आहे याची त्यांना पक्की खात्री आहे. वैद्य एक पंढरीराव अंतरभाव तो जाणे या तुकोक्तीप्रमाणे तेही म्हणतात,

युगे अठ्ठावीस उभा विटेवरी । खरा धन्वंतरी एकमेव ॥
तहानेचे हेच फळ उरफुटी धावपळ ॥
अवघ्यांचे आहे एक दु:खमूळ । अपेक्षिता फळ चुके वर्म ॥

हीच तृष्णा भवरोगांचे मूळ आहे आणि या रोगाची चिकित्सा करून औषध देणारा धन्वंतरी तो आहे, पण तो संतांच्या माध्यमातून भेटतो ते पुरेसे आहे कारण,

भेटल्या होशील तूही तृणवत । म्हणून अप्राप्य भला देवा ॥

ऐहिक आणि पारलौकिक जीवनात तोच खरा आसरा आहे. त्याला विनवणी करायची-

मागे पुढे होई विठ्ठला आरसा । दावी आहे तसा माझा मला ॥

त्याच्याकडे प्रेम मागायची कल्पना तर अत्यंत काव्यात्मक व हृदयंगम आहे.

धरी मजवरी प्रेमाची पाखर । घेई वो सत्वर पोटापाशी ॥
मारण्या भरारी आकाश थोकडे । ऐसे दे रोकडे पंखबळ ॥
तुझिया नामाची करी चिवचिव । जीवातला जीव विठ्ठले वो ॥

अनुभवात, आशयात आणि अभिव्यक्तीत संतसाहित्याशी आणि विशेषत: तुकोबांशी साक्षात नाते जोडणारा हा कवी मराठी कवितेला गवसला याचा आपल्याला आनंदच व्हायला हवा.