२८
नारायण भूती न कळे जयांसि । तयां गर्भवासी येणे जाणे ॥१॥
येणे जाणे होय भूतांच्या मत्सरे । न कळता खरे देव ऐसा ॥२॥
देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुध्दि ॥३॥
बुध्दीचा पालट नव्हे कोणे काळी । हरि जळी स्थळी तया चित्ती ॥४॥
चित्त ते निर्मळ जैसे नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥
तयामाजी हरि जाणिजे त्या भावे । आपले परावे सारिखे चि ॥६॥
चिंतने तयाच्या तरती आणीक । जो हे सकळिक देव देखे ॥७॥
देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥८॥
काया वाचा मने पूजावे वैष्णव । म्हणउनि भाव धरूनिया ॥९॥
यांसि कवतुक दाखविले रानी । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥१०॥
गोपाळांसि डोळे झांकविले हाते । धरिले अनंते विश्वरूप ॥११॥
पसरूनि मुख गिळियेले ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥
संधि सारूनिया पाहिले अनंता । म्हणती ते आता कळलासी ॥१३॥
कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥
तो तया कळला आरुषां गोपाळा । दुर्गम सकळा साधनांसि ॥१५॥
सीण उरे तुका म्हणे साधनाचा । भाविकासि साचा भाव दावी ॥१६॥
४५३५ पृ ७५५ (शासकीय), ३८३६ पृ ६७० (शिरवळकर)
|