५६
जाणवले इंद्रा चरित्र सकळ । वाकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥
तातडिया मेघा आज्ञा करी राव । गोकुळीचा ठाव उरो नेदा ॥२॥
नेदाविया काई म्हसी वाचो लोक । पुरा सकळीक शिळाधारी ॥३॥
धाक नाही माझा गोवळिया पोरां । सकळीक मारा म्हणे मेघा ॥४॥
म्हणविती देव आपणा तोवरी । जव नाही वरी कोपलो मी ॥५॥
मीपणे हा देव न कळेचि त्यांसी । अभिमाने रासि गर्वाचिया ॥६॥
अभिमान राशी जयाचिये ठायी । तुका म्हणे तई देव दुरी ॥७॥
४५६३ पृ ७६५ (शासकीय), ३८६४ पृ ६८० (शिरवळकर) |