Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

६४
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणी ॥१॥
लोटांगणी आले होऊनिया दीन । मग नारायण म्हणे भले ॥२॥
भला आजी तुम्ही केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥
लागती चरणा सकळ ते काळी । आम्हा मध्ये बळी तूचि एक ॥४॥
एका तुजविण नयो आम्ही कामा । कळो कृष्णा रामा आले आजी ॥५॥
आजी वरी आम्हा होता अभिमान । नेणता चरण महिमा तुझा ॥६॥
तुझा पार आम्ही नेणो नारायणा । नखी गोवर्धना राखियेले ॥७॥
राखियेले गोकुळ आम्हा सकळांसी । दगडांच्या राशी वरुषता ॥८॥
वर्णावे ते काय तुझे महिमान । धरिती चरण सकळीक ॥९॥
सकळ ही तान विसरली भूक । सकळ ही सुख दिले त्यांसी ॥१०॥
त्यांसी कळो आला वैकुंठनायका । तुका म्हणे लोक निर्भर ते ॥११॥
४५७१ पृ ७६७ (शासकीय), ३८७२ पृ ६८३ (शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग