८७
तो बोले कोमळ निष्ठुर साहोनि । कोपता गौळणी हास्य करी ॥१॥
करावया दास्य भक्तांचे निर्लज्ज । कवतुके रज माथा वंदी ॥२॥
दिले उग्रसेना मथुरेचे राज्य । सांगितले काज करी त्याचे ॥३॥
त्यासी होता काही अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥
शरणागता राखे सर्व भावे हरि । अवतार धरी तयासाठी ॥५॥
तया साठी वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥
तळमळ नाही तुका म्हणे चित्ता । भक्तांचा अनंता भार माथा ॥७॥
४५९३ पृ ७७२ (शासकीय), ३८९५ पृ ६८९ (शिरवळकर) |