Font Problem









कावडी - अभंग ५



कावडी - बांबूच्या दोन टोकांना शिंक्याच्या रचनेप्रमाणे दोऱ्या बांधून त्यात घागरी किंवा रांजण घालून नेण्याचे साधन.

एकदा चैत्रमासी । तुकाराम चालिले यात्रेसी ।
शंभूचे शिखर पाहावयासी । हेत मानसी धरियेला ॥
सवे सोबती दोघेजण । गंगाजी मवाळ ब्राह्मण ।
दुसरा संताजी तेली जाण । वैष्णवजन घेतले ॥
पंथ क्रमिता भजन करीत । रात्री मुक्कामी कीर्तन होत ।
सातवे मजलीसी शिखर दिसत । मग सद्भावे दंडवत घालीतसे ॥
कोथळेश्वर पर्वत थोर । त्यावरी वसे पार्वतीवर ।
तळवटी क्षेत्र शिंगणापूर । तेथे सरोवर एक असे ।।
पर्वती उदक नसेची जाण । यास्तव तळ्यात केली स्नाने ।
सोबती म्हणती तुकयाकारणे । आता घ्यावे दर्शन शंभूचे ।।
यावरी म्हणे वैष्णवजन । आधी घालोनी शंभूसी भोजन ।
मग धाल्या पोटी घेऊ दर्शन । गुंता उरकणे ये ठायी ।।
जाणोनी तुकयाचे मनोगत । चवघांचा स्वयंपाक केला तेथ ।
तो नग्न दिगंबराच्या रूपे अकस्मात । कैलासनाथ पातले ।।
जटामुकुट मस्तकी शोभत । सर्वांगासी चर्चिली विभूत ।
अंगावरी तेज नसे मावत । तुंबा हातात एक असे ।।
तुकयाप्रती बोले वचन । आम्हासी येथे घाली भोजन ।
बहुत दिवस क्षुधित जाण । तुझे दर्शन इच्छितसे ।।
ऐसे बोलता अतीत । अवश्य म्हणे वैष्णव भक्त ।
बैसावयासी देऊनी त्वरीत । दंडवत घातले ।।
पाक सिद्ध होताची जाण । चार पात्र मांडिली गंगाजीने ।
आधी अतीताचे होऊ द्यावे भोजन । जेवू आपण मागुनी तिघे ।।
ऐकोनी तुकयाची वचनोक्ती । मग एकेची पात्री अन्न वाढिती ।
देखोनी तुकयाची सप्रेम भक्ती । कैलासपती जेवीतसे ।।
चवघांचे रांधले होते अन्न । तितुकेही भक्षिले अतीताने ।
मग ढेकर दिधला जाण । आशीर्वचन बोलतसे ।।
भोपळाभर पिउनी जीवन । करशुद्धी घेतली त्याने ।
मुखशुद्धी विडा भक्षून । म्हणे होईल कल्याण तुकया तुझे ।।
ऐसे वचन बोलोनी निश्चित । कोथळापर्वती गेला अतीत ।
गंगाजी मवाळ विस्मित होत । तुकयासी बोलत काय तेव्हा ।।
तुम्ही बरी सांगितली युक्ती । नाही तरी क्षुधित राहता अतिथी ।
सामग्री आणावयासी सत्वरगती । संताजी धाडिती गावा ।।
माशा घोंगती भांड्यांवर । म्हणोनी वस्त्र झाकिले तयांवर ।
गावातुनी साहित्य आणिले सत्वर । तो अद्भुत चरित्र वर्तले ।।
स्वयंपाक करावा लवलाहे । गंगाजी भांडी घेउनी उघडिताहे ।
तो अन्न तयांत भरिले आहे । अवघेची ठाव परिपूर्ण ।।
मग उभयता खूण बाणली निश्चिती । की अतीतरूपे जेविल कैलासपती ।
साक्षात दर्शन झाले निश्चिती । धरिता संगती संतांची ।।
मग तो प्रसाद पात्री वाढोन । तिघे जेविले निजप्रीतीने ।
तेव्हा पर्वतावर सत्वर जाऊन । घेतले दर्शन शंभूचे ।।
सप्रेमभरित ते अवसरी । कीर्तन केले महाद्वारी ।
कावडीचे अभंग सप्रेमभरी । नानापरी बोलिले ।।
पंचरात्री क्रमोनी पाही । परतोनी गेले देहूगावी ।
देहीची तुका झाला विदेही । हेची नवाई अगाध ॥

[श्री महिपती कृत ओवीबद्ध
श्री तुकाराम चरित्र
अध्याय १३]
*****

कावडी - अभंग

आहा रे भाई । प्रथम नमो तो विनायक । ठेवुनी गुरुचरणी मस्तक ।
वदेल प्रासादिक वाणी । हरिहरांचे पवाडे ॥१॥
माझी असे ब्रीदावळी । दासे दासत्वे आगळी ।
पान्हेरीने मार्ग मळी। जीवन घ्या रे कापडी हो ॥२॥
जे या सीतळाहुनी सीतळ । पातळाहुनी जे पातळ ।
परम अमृत रसाळ । ते हे सेवा अहो भाग्याचे ॥३॥
जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान ।
धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥४॥
काळा घेऊं नेदी वाव । आला तो राखे घावडाव ।
शुध्द सत्वी राखोनि भाव । म्हणा महादेव हरिहर वाणी गर्जो द्या॥५॥
पराविया नारी माउली समान । परधनी बाटो नेदी मन ।
जीवित्व ते तृणासमान । स्वामिकाजी जाण शूर तया म्हणो आम्ही ॥६॥
शक्ती वेचाविया परउपकारा । खोटा खोट्याचा पसारा ।
सत्य ते भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे अहो सांगतो ॥७॥
व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर ।
पुण्य ते असे गाता नाचता बहु फार ।
पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे ॥८॥
संग संताचा करिता बरवा। उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा।
पंथ तो सुपंथे चालावा। उगवावासना लिगाड ॥९॥
तुका चालवितो कावडी । प्रवृत्ती निवृत्ती चोखडी ।
पुढती पुढती अधिक गोडी ।
भरुनी कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥१०॥
६७८ पृष्ठ १२८ (संताजी), ७१३ पृष्ठ १६२ (देहूकर सांप्रदायिक),

४५० पृष्ठ ८४ ( शासकीय)

kawdi001

[या पानावरील छायाचित्र - सासवड येथील काशिनाथ विश्वनाथ कावडे (भुतोजीबुवा तेली) यांची मानाची कावडीचे आहेत. पुणे जिल्ह्यात फलटन जवळ शिखर शिंगणापूरचे मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे अतिशय महत्त्व होते. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत.शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेची सुरवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता महादेव आणि पार्वती यांचे लग्न लावतात. चैत्र शुध्द एकादशीस हरहर महादेव गर्जना करीत इंदापूर, बारामती, माळशिरस यासह पुरंदर तालुक्यातील सासवड, खळद, बेलसर, एखतपूर, शिवरी, कुंभारवळण आदी भागातील मानाच्या कावडी मानवी साखळीच्या साह्याने भक्तिमय वातावरणात अमाप उत्साहात मुंगीघाटातून चढवितात. द्वादशीला सासवड येथील भुतोजीबुवा तेली यांच्या मानाच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर यात्रेची सांगता होते.]


आहा आहा रे भाई । हे अन्नदानाचे छत्र ।
पव्हे घातली सर्वत्र । पंथी अवघे पंथ मात्र ।
इच्छाभोजनाचे आर्त पुरवावया ॥१॥
यावे त्याणे ते ते घ्यावे । न सरेसे केले सदाशिवे ।
पात्र शुध्द पाहिजे बरवे । मंगळ भावे सकळ हर म्हणा रे ॥२॥
नव्हे हे काही मोकळे। साक्षी चौघांचिया वेगळे ।
नेदी नाचो मताचिया बळे । अणु अणोरणीया आगळे ।
महदी महदा साक्षित्वे हर म्हणा रे ॥३॥
हे हरी नामाची आंबिली । जगा पोटभरी केली ।
विश्रांती कल्पतरूची साउली । सकळा वर्णा सेविता भली ।
म्हणा हर हर महादेव ॥४॥
तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ ।
या रे वंदू शिखरातळ । चैत्र मास पर्वकाळ महादेवदर्शने ॥५॥

६७९ पृष्ठ १२८ (संताजी), ७१४ पृष्ठ १६२ (देहूकर सांप्रदायिक),
४५१ पृष्ठ ८५ ( शासकीय)

आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा। आळविती देवा तया नमो ॥१॥
नमो तीर्थपंथे चालती तयांसी । नमो येती त्यांसी बोळवित त्या ॥२॥
नमो तया माता पित्यांचे पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥३॥
नमो तया संतवचनी विश्वास । नमो भावे दास गुरुचे त्या ॥४॥
नमो तया जाणे आणिकांचे सुखदुःख । राखे तान भूक तया नमो ॥५॥
नमो परोपकारी पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसी ॥६॥
तुका म्हणे नमो हरिचिया दासा। तेथे सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥

६८० पृष्ठ १२९ (संताजी), ७१६ पृष्ठ १६३ (देहूकर सांप्रदायिक),
४५२ पृ ८५ ( शासकीय)

आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥१॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वाया बाहेरी ॥ध्रु॥

बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा ॥२॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वाया बाहेरी ॥ध्रु॥

विद्याबळे वाद सागोनिया छळी । आणिकांसी फळी मांडोनिया ॥३॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वाया बाहेरी ॥ध्रु॥

गाविचिया देवानाही दंडवत । ब्राम्हण अतीत घडेचीना ॥४॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वाया बाहेरी ॥ध्रु॥

सदा सर्वकाळ करी संताची निंदा । स्वप्नी ही गोविंदा आठवीना ॥५॥
थुंका थुंका रे त्याच्या तोडावरी । वाणिली ते थोरी दवडा वाया बाहेरी ॥ध्रु॥

खासेमधी धन पोटासी बंधन । नेणे ऐसा दानधर्म काही ॥६॥
थुंका थुंका रे त्याच्या तोडावरी । वाणिली ते थोरी दवडा वाया बाहेरी ॥ध्रु॥

तुका म्हणे नटे दावुनीया सोंग । लवो नेदी अंग भक्तिभावे ॥७॥
थुंका थुंका रे त्याच्या तोडावरी । वाणिली ते थोरी दवडा वाया बाहेरी ॥ध्रु॥

६८१ पृष्ठ १२९ (संताजी), ७१७ पृष्ठ १६४ (देहूकर सांप्रदायिक),
४५३ पृष्ठ ८६ (शासकीय)

आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ ।
तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाच्या त्या ॥१॥
नदी समुद्र नव्हे पै गा । पाषाण म्हणो नये लिंगा ।
संत नव्हेती जगा । मानसां सारिखे ते काही ॥२॥
काठी नव्हे वेतू । अन्न म्हणो नये सातू ।
राम राम हे मातू । नये ती शब्द म्हणो हे ॥३॥
चंद्र सूर्य नव्हे तारांगणे । मेरु तो नव्हे पर्वता समान ।
शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥
गरुड नव्हे पाखरू । ढोर नव्हे नंदिकेश्वरू ।
झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥५॥

kawdi002

कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह ।
ब्रम्हा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥
गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड ।
परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥
सोने नव्हे धातू । मीठ नव्हे रेतू ।
नाही नाही चर्मातू । कृष्णाजिन व्याघ्रांबर ॥८॥
मुक्ताफळे नव्हेती गारा । खड्या ऐसा नव्हे हिरा ।
जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेने ॥९॥
गाव नव्हे द्वारावती । रणछोड नव्हे मूर्ती ।
तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शने ॥१०॥

kawdi003
कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी ।
तुका पांडुरंगी । हा प्रसाद लाधला ॥११॥

६८२ पृष्ठ १२९ (संताजी), ७१५ पृष्ठ १६३ (देहूकर सांप्रदायिक),
४५४ पृष्ठ ८६ ( शासकीय)

मागील अभंग




पुढील अभंग