Font Problem

आरती

महा जी महादेवा महाकाळमर्दना । मांडियेले उग्रतप महादीप्त दारुणा ।
परिधान व्याघ्रांबर चिता भस्म लेपना । स्मशान क्रीडास्थळ तुम्हा जी त्रिनयना॥१॥
जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा । आरती ओवाळिन कैवल्यदातारा ॥ध्रु॥

रुद्र हे नाम तुम्हा उग्र संहारासी । शंकर शिव भोळा उदार सर्वस्वी ।
उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देसी । आपुले पद दासा ठाव देई कैलासी ॥२॥
जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा । आरती ओवाळिन कैवल्यदातारा ॥ध्रु॥

त्रैलोक्यव्यापका हो जन आणि विजन । विराटस्वरूप हे तुझे साजिरे ध्यान ।
करितो वेद स्तुती कीर्ती मुखे आपण । जाणता नेणवे हो तुमचे महिमान ॥३॥
जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा । आरती ओवाळिन कैवल्यदातारा ॥ध्रु॥

बोलता नाम महिमा असे आश्चर्य जगी । उपदेश केल्यानंतर पापे पळती वेगी ।
हरहर वाणी गर्जे प्रेम संचरे अंगी । राहिलि दृष्टी चरणी रंग मीनला रंगी ॥४॥
जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा । आरती ओवाळिन कैवल्यदातारा ॥ध्रु॥

पूजुनी लिंग उभा तुका जोडोनी हात । करिती विज्ञापना परिसावी हे मात ।
अखंड राहू द्यावे माझे चरणी चित्त । घातले साष्टांग मागे मस्तकी हात ॥५॥
जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा । आरती ओवाळिन कैवल्यदातारा ॥ध्रु॥

८४६ पृष्ठ २०१ (देहूकर सांप्रदायिक),१५७९ पृष्ठ २७५( शासकीय)

मागील अभंग

पुढील अभंग