Font Problem

     
 

 

 

‘एवढे दे पांडुरंगा

 
सुरेश श्रीधर भट जन्म : १५ एप्रिल, १९३२.
  मृत्यू : १४ मार्च, २००३.

कवी, पत्रकार. गझल हा वाङ्‍मयप्रकार मराठीत लोकप्रिय करणारे कवी.

सुरवातीला काही काळ शिक्षक. नंतर पत्रकार. कविवर्य सुरेश भट ह्यांच्या लेखणीतून सिध्द झालेले साहित्य : ‘आपुलिया बळें...’, ‘रूपगंधा’, ‘एल्गार - कैफियत’, ‘रंग माझा वेगळा’, ‘गझलेची बाराखडी’ आणि ‘माझ्या कवितेचा प्रवास’.

 

गडचिरोली येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

 
 

‘एवढे दे पांडुरंगा’

 


माझिया गीतांत वेडे
दुःख संतांचे भिनावे
वाळल्या वेलीस माझ्या
अमृताचे फूल यावे !

आशयाच्या अंबरांनी
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा !

स्पंदने ज्ञानेश्वराची
माझिया वक्षात व्हावी;
इंद्रियांवाचून मीही
इंद्रिये भोगून घ्यावी !

एकनाथाने मलाही
बैसवावे पंगतीला
नामयाहाती बनावे
हे जिणे गोपाळकाला !

माझियासाठी जगाचे
रोज जाते घर्घरावे
मात्र मी सोशीन जे जे
ते जनाईचे असावे !

मी तुकयाच्या लोचनांनी
गांजल्यांसाठी रडावे;
चोख व्यवहारात माझ्या
मी मला वाटून द्यावे !

ह्याविना काही नको रे
एवढे दे पांडुरंगा !
ह्याचसाठी मांडिला हा
मी तुझ्या दारात दंगा !

***

 

 ‘तुकारामाला’

 
     
   
  तुझे दुःख तुझे नाही !
तुझे दुःख आमचे आहे !
अजून त्याच्या डोळियांनी
आम्ही प्रत्यय पारखत आहोत !
अजून त्याच्या प्रकाशात
आम्ही शब्द वेचत आहोत !
अजून त्याच्या सोबतीने
आम्ही वाट चालत आहोत !
तुझे दुःख तुझे नाही ...

 

अनुक्रमणिका