***
वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति
॥१॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
चातक पाखरू । त्यासी वर्षे मेघधारु ॥२॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
पक्षी राजहंस । अमोलिक मोती त्यास॥३॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
तुका म्हणे देवा । का गा खोचलासी जीवा ॥४॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
***
कासया या लोभे केले आर्तभूत । सांगा माझे चित्त नारायणा ॥१॥
चातकाचे
परी एकचि निर्धार । लक्ष भेदी तीर फिरो नेणे ॥धृ॥
सावळे रूपडे चतुर्भुज मूर्ति । कृष्णनाम चित्ती संकल्प हा ॥२॥
चातकाचे
परी एकचि निर्धार । लक्ष भेदी तीर फिरो नेणे ॥धृ॥
तुका म्हणे करी आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगो देऊ ॥३॥
चातकाचे परी एकचि निर्धार । लक्ष भेदी तीर फिरो नेणे ॥धृ॥
***
नित्य उठोनिया खायाची चिंता । आपुल्या तू हिता नाठवीसी ॥१॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे
॥धृ॥
चातका लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवी ॥२॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे
॥धृ॥
पक्षी वनचरे आहेत भूमीवरि । तया लागी हरि उपेक्षीना ॥३॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे
॥धृ॥
तुका म्हणे भाव धरुन राहे चित्ती । तरी तो श्रीपति उपेक्षीना
॥४॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे
॥धृ॥
***
तुझे प्रेम माझ्या हृदयी आवडी । चरण न सोडी पांडुरंगा ॥१॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
चातकाची चिंता हरली जळधरे । काय त्याचे सरे थोरपण ॥२॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याची कळा न्यून होय ॥३॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
तुका म्हणे मज अनाथा सांभाळी । हृदयकमळी स्थिर राहे ॥४॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
***
पक्षीयाचे घरी नाही सामुग्री । त्याची चिंता करी नारायण ॥धृ॥
अजगर जनावर वारुळात राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग ॥१॥
पक्षीयाचे घरी नाही सामुग्री । त्याची चिंता करी नारायण ॥धृ॥
चातक हा पक्षी नेघे भूमिजळ । त्यासाठी घननीळ
नित्य वर्षे ॥२॥
पक्षीयाचे घरी नाही सामुग्री । त्याची चिंता करी नारायण ॥धृ॥
तुका म्हणे आम्ही पिप्पलिकाची जात । पुरवी मनोरथ पांडुरंगा ॥३॥
पक्षीयाचे घरी नाही सामुग्री । त्याची चिंता करी नारायण ॥धृ॥ |